सुखी संसार
प्रसादला मॉलमध्ये खरेदी करताना पाहून आम्ही हैराण झालो.स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने मॉलमध्ये सवलत होती म्हणून मी आणि विक्रम फिरायला आलो होतो .तसाही आज ड्राय डे असल्यामुळे कुठे बाहेर बसायचा चान्स नव्हताच .कमीतकमी मॅक्डोनाल्डमध्ये विक्रमच्यासोबत बर्गर खायला मिळेल म्हणून मीही निघालो होतो.
तेव्हाच आम्हाला फूड सेक्शनमध्ये प्रसाद दिसला...... नुसता दिसला नाही तर खरेदी करताना दिसला.... आणि साधारण एका वर्षाच्या बाळाला घेऊन दिसला....!! . आम्हा दोघांसाठी ते धक्कादायकच दृश्य होते.
विक्रमने जवळ जाऊन त्याच्या पाठीवर थाप मारली तो पटकन वळला आणि आम्हाला पाहून आनंदाने ओरडला . त्याला घेऊनच आम्ही कॉफीशॉपमध्ये शिरलो .
प्रसाद उते हा आमच्या कॉलेजचा मित्र . अतिशय शांत आणि संथ ही . पुढे व्यावहारिक जगात याचे कसे होणार याची आम्हाला काळजी . पुढे जो काही गायब झाला तो आज असा दिसला.
" बोला प्रसाद साहेब ........!! कसे चालले आहे तुमचे .....?? विक्रमने नेहमीप्रमाणे सुरवात केली .
तो हसत म्हणाला "उत्तम .... ! मस्त....
" छान ......!! मी म्हणालो "काय करतोस सध्या .!!
तसा पुन्हा हसत म्हणाला "घरकाम ..आणि आराम..
आमचे प्रश्नार्थक चेहरे पाहून तो हसला " माझे लग्न ठरले ते इंटरनेटवर .बायको डॉक्टर आहे ...म्हणजे शास्त्रज्ञ आहे.....खूप शिकलेली आणि सतत अभ्यासाच्याआणि संशोधनाच्या मूडमध्ये... तिने लिहिले होते मला सहकारी हवाय जो माझ्या गरजा भागवू शकेल..मला मदत करेल....संसारात मला बायकोची भूमिका पाळणारा नवरा पाहिजे. तुम्हाला माहितीय ....मी किती आळशी ..संथ माणूस.. लगेच होकार देऊन टाकला .तिने भेटायला बोलावले आणि सर्व काही सांगून टाकले ...मला ते पटले.. मी हो म्हणालो . नंतर महिन्यांनी लग्न केले आणि तिच्या फ्लॅटवर आलो "
"काय म्हणतो ...??? घरजावई ...."?? विक्रम आश्चर्याने ओरडला .
"नाही रे .....! स्वतंत्र संसार ..... तुम्ही नाही का स्वतंत्र संसार करत ....आणि मी तिच्या घरी गेलो ..... लग्न झाल्यावर एक स्त्री आपले घरदार सोडून नवऱ्याकडे येते तर पुरुषाने बाईच्या घरी का जाऊ नये .....?? प्रसादचा प्रश्न ऐकून आम्ही चूप झालो .
"बरे मग पुढे..... विक्रमचा प्रश्न
"पुढे ...दुसऱ्या दिवसापासून मी घरातील सर्व कामे हाती घेतली.धुणी भांडी करायला बाई होतीच . पण उठल्यावर चहा, नाश्ता जेवण सर्व मीच करू लागलो आणि ती कामावर गेल्यावर आराम. संध्याकाळी ती घरी आल्यावर चहा मग रात्रीचे एकत्र जेवण.. हेही मीच पाहू लागलो. तिच्या आणि माझ्या घरच्यांबरोबर संवाद साधू लागलो " त्याचे उत्तर तयार होते .
"बरे पैश्याचा व्यवहार कसा... ??? माझा प्रश्न .
"भाऊ वहिनीला कसे देतोस तू ... ?? तसेच मलाही मिळतात ...दर महिना ... कमी पडले तर मागायचे . पैसे खूप आहेत आमच्याकडे . प्रचंड कमावते ती. प्रसाद म्हणाला .
" बरे मग ह्याचे काय....?? विक्रम हाताची मूठ मागे पुढे हलवत म्हणाला ..अर्थात विक्रमलाच त्याची काळजी असणार म्हणा .
"जसे तुमचे होते तसेच ..याबाबतीत मात्र बायको आहे ती . तिला दोघांच्याही शारीरिक गरजा माहीत आहे त्यामुळे त्यात कोणाचाही इगो आड येत नाही " प्रसाद हसत म्हणाला .
"मग ह्या मुलांसाठी तरी बायको बनली ना ती.....?? सहन केले ना बाळंतपण ...??? विक्रम छद्मीपणे हसत म्हणाला .
"अरे नाही .....हे आमचे दत्तक मूल आहे .... रेडिमेड डायरेक्ट हातात.....तिने स्पष्ट सांगितले माझ्या कामात अडथळा येईल असे काही नको .तुझी मूल सांभाळायची तयारी असेल पण माझी मुलाला जन्म देण्याची तयारी नाही .एक छोटे मूल दत्तक घेऊ त्याचा सांभाळ दोघेही करू पण आई तू बाप मी .....
"अरे देवा ....!! आता तर विक्रमचा धीर सुटू लागला .
"काय रे अशी वेळ येत नाही का कोणावर ... ??पुरुष पत्नीला असे म्हणाला तर चालले असते पण स्त्री बोलते ते आवडले नाही का..." ?? मला पटले नाहीतरी जगात कित्येकजण आहेत ज्यांना मूल होत नाही ....ते दत्तक घेतात ना मुले ...?? तसे आम्ही घेतले ..प्रसाद सहजपणे उत्तराला.
"अरे तू पुरुष ना ....मग असे कसे वागतोस बायकांसारखे ....?? विक्रमचा तोल सुटला ...
" काय चुकते रे माझे .....? मी केवळ काम करून भरमसाठ पगार घरात आणत नाही की बायकोवर असेरावी करीत नाही ....?? एका बाईला वाटते आपला संसार सुखाचा असावा.... पुरेसे पैसे असावे...साथीदाराने वेळ द्यावा ....शारीरिक सुख द्यावे नातेवाईकांचा आदर करावा ...सगळी सुखें पायाशी लोळण घ्यावी ..मग हेच माझ्याबाबतीत घडत असेल तर वाईट काय.... ??? माझ्या बायकोला व्यसन नाहीत. सरळ काम संपले की घरी येते ...माझ्याशी गप्पा मारते ...एकत्र बसून जेवतो ..कधी कधी एकत्र फिरायला जातो .संपूर्ण भारत फिरून आलो आम्ही . पुढच्या वर्षी परदेशात जाऊ .आमचे शारीरिक संबंध छान आहेत . ती दोघांच्याही आई वडिलांचा आदर करते . कितीही खर्च करायची मुभा आहे मला . मुलाला ही पुरेसा वेळ देते . संसार यालाच म्हणतात ना ...??? फक्त स्थान बदलले . याच जागी जर एखाद्या मोठ्या पगाराच्या मुलाने गावातून कमी शिकलेली मुलगी लग्न करून आणली असती आणि तिला असे वागवले असते तर त्याची वाह वाह केली असती तुम्ही . खरेच आज मी सुखी आहे . घरातील एक प्रमुख जबाबदारी घेऊन संसार करतोय . जरुरी नाही पुरुषांनी पुरुषाचे आणि स्त्रियांनी स्त्रियांचे काम करायला हवे. शेवटी सुखी संसार महत्वाचा "
मीही मान हलवून त्याला दुजोरा दिला " तू आणि तुझी बायको सुखी आहात ना ....??तेच महत्वाचे ...
इतक्यात बिल आले तेव्हा आम्हाला अडवून त्याने खिश्यातून क्रेडिट कार्ड काढून दिले . विक्रम आ वासून त्याच्याकडे पाहत बसला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Saturday, August 18, 2018
सुखी संसार
Wednesday, August 15, 2018
उध्वस्त ...... उमेश कदम
उध्वस्त ...... उमेश कदम
मेहता पब्लिकेशन
अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्या युद्धातील ही एक गोष्ट आहे .मी लाय या क्वांग अंगै खेड्याजवळील छोट्या वस्तीत अमेरिकन सैनिक शिरतात आणि एकूण एक रहिवाश्यांना मारून टाकतात . त्यांच्या अत्याचारातून लहान मुले वृद्ध स्त्रियाही वाचत नाहीत. त्यांच्याबरोबर असलेला सरकारी छायाचित्रकार चोरून या संपूर्ण घटनेचे फोटो घेतो . योगायोगाने एक सहा वर्षाची मुलगी यातून वाचते पण तिला आपल्या आईवडिलांची प्रेते पहावी लागतात . अमेरिकन छायाचित्रकार ही सगळी माहिती प्रसारमाध्यमाला देतो आणि अमेरिकेत मोठी खळबळ उडते . सरकारला जनतेचा प्रचंड रोष सहन करावा लागतो. वरिष्ठ पातळीवरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो .खरे तर ही एक सत्यघटना आहे आणि लेखकाने यात कल्पनाविस्तार केला आहे .मन सुन्न करणारी कादंबरी .
Sunday, August 12, 2018
सैनिक
दोघेही एकाच बोगीतून प्रवास करीत होते. पहिला शांत बसून एकटक बाहेरील दृश्य पाहत होता... तर दुसरा सतत काहीतरी हालचाल करीत होता.
अखेर दुसर्याने मौन तोडले."शी.....किती गरम होतेय. बोगीतील एसी काहीच कामाचा नाही.थोडा वाढवावा लागेल....." असे बोलून पहिल्याच्या चेहऱ्याकडे पाहिले.त्याच्या चेहऱ्यावरचे शांत भाव हाच होकार समजून त्याने अटेंडन्ट ला एसी वाढविण्यास सांगितले.
"खरोखर ....या भारतात राहायचे म्हणजे एक शिक्षाच आहे.सरकारला भरमसाठ कर द्यायचा पण त्याबदल्यात काही मिळत नाही "
पहिला नुसता हसला . इतक्यात अटेंडन्ट परत जेवणाची ऑर्डर घ्यायला आला .दुसर्याने मेनू काय..??? असे विचारले .मेनू ऐकताच तोंड वाकडे केले . नाईलाज झाल्यासारखे नॉनव्हेजची ऑर्डर दिली. पहिल्याने मात्र काही न विचारता व्हेज सांगितले.
"ह्यांना धड जेवण ही ठेवता येत नाही चांगले ...थोड्या वेळाने जेवण आले . दुसऱ्याची जेवणाबरोबर बडबड ही चालू होती. शेवटी कंटाळून दुसर्याने अर्धे अन्न टाकून दिले. पहिला मात्र ताटात एकही कण न ठेवता जेवला .दुसऱ्याची बिसलरी पाण्याची ऑफर नाकारत स्वतःच्या बाटलीतील पाणी पियाला.रात्री झोपताना दुसर्याने बेडवरील चादर बदलायला लावली .ब्लॅंकेट बदलून घेतले .पहिला मात्र तसाच बेडवर पसरला.
" आपण कुठे निघालात.... ??? दुसर्याने पहिल्याला प्रश्न केला.
"घरी ....."पहिल्याने मोजकेच शब्द उच्चारले.
"मी एक उद्योजक आहे ... भारतातील प्रमुख ठिकाणी माझी ऑफिसेस आहेत . त्यामुळे सतत प्रवास करत असतो . पण आम्ही कर भरूनही सरकार आम्हाला पुरेसा लाभ देत नाही म्हणून चिडतो.तुम्ही काय करता ....."??? दुसर्याने विचारले.
"मी भारतीय सैन्यदलात एक सैनिक आहे".पहिला अजूनही शांत होता.
"अरे वा ..... सैनिक .....फारच छान .. खूप अभिमानाची गोष्ट आहे ही . संपूर्ण भारतभर नोकरी असते तुमची . देशाच्या रक्षणासाठी चोवीस तास डोळ्यात तेल घालून शत्रूवर लक्ष ठेवून असता"..दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता ."पण एक विचारू....?? खूपच अशक्त आणि अबोल वाटता तुम्ही .इथे जे काही चालते त्याविषयी काहीच बोलला नाहीत ...???
"काय बोलायचे .....???पहिल्याने शांतपणे विचारले . ह्या एसीबद्दल बोलू . राजस्थानमधील वाळवंटात 46℃ हातात ऐ के 47 घेऊन दोन दोन दिवस उभा राहिलोय मी... ह्यापेक्षा भीषण गर्मी तुम्ही अनुभवली आहे का.... ??? मी नुकताच सियाचेनमधून येतोय. तीन महिने सीमेच्या रक्षणासाठी होतो तिथे . उणे १५℃ वातावरण होते . चहूकडे बर्फच बर्फ .हरवून जाऊ नये म्हणून एकमेकांच्या कमरेला दोरी बांधून होतो. समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट बर्फात उभे होतो . कसली करमणूक नाही . हवाबंद डब्यातील अन्न पुरवून पुरवून खायचे .पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब करावा लागायचा . खाली आलो तेव्हा वजन घटले होते .तिथे सर्व कामे आम्हालाच करावी लागायची . त्या तीन महिन्यात आम्हाला प्रत्येक गोष्टीचे महत्व कळले .आता इथे आल्यावर कळते तुम्ही किती सुखी आहात. तुम्हाला अन्नाची पर्वा नाही . तुम्हाला पाहिजे तसे वातावरण हवे . पाहिजे ते कपडे हवे . तुम्ही फार भाग्यवान आहात...करण तुम्ही कर भरता त्यामुळे मागण्याचा तुम्हाला हक्क अधिकार आहे .
" नाही हो तसे नाही ....माफ करा ... पण इथे ती परिस्थिती नाही ना ...?? आणि जे शक्य आहे ते मागण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला . आम्ही खूप तुमचा आदर करतो....." दुसरा ओशाळवाणे हसत म्हणाला .
नाही हो मी तुम्हाला मुळीच दोष देत नाही . मला ज्या गोष्टीची सवय झालीय त्यातच मी राहतो तुम्ही ही तसेच राहता... पण दरवेळी या देशात काहीच होणार नाही असे बोलू नका .... तुम्हीही अप्रत्यक्षरीत्या हातभार लावू शकता . उदा. हे जे अन्न तुम्ही फेकून दिलेत त्या अन्नात अजून एक जण जेवला असता. खुपजणांची मेहनत त्या मागे आहे . तुम्हाला तर नेहमी गरम अन्न मिळते पण आमचे अन्न आधी विमानातून ,मग गाडीतून मग घोड्यावरून नंतर काहीजणांच्या पाठीवरून आमच्यापर्यंत पोचते . त्यामुळे त्याचा वापर योग्यरितीने करावा लागतो.." पहिला हसत हसत म्हणाला .
"माफ करा सर ....यापुढे वागताना बोलताना योग्यती काळजी घेईन मी... दुसर्याने पहिल्याला नमस्कार करून डोक्यावरील दिवा बंद केला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Friday, August 10, 2018
ट्रू ब्लू .....डेव्हिड बॅल्डसी
ट्रू ब्लू .....डेव्हिड बॅल्डसी
अनुवाद.....स्नेहल जोशी
श्रीराम बुक एजन्सी
मेस पेरीला जाणूनबुजून एका गुन्ह्यात अडकविले गेले आणि तिला दोन वर्षांची शिक्षा झाली.एका निडर धाडसी पोलिसांची कारकीर्द संपविण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले.तिची मोठी बहीण बेथ कोलंबियाची चीफ पोलीस अधिकारी आहे . पण तिलाही आपल्या बहिणीसाठी काही करता आले नाही .आता ती शिक्षा भोगून बाहेर पडली आणि कोलंबियात दोन वकिलांचे निर्घृणपणे खून झाले .अनधिकृतपणे एका वकीलासोबत पेरी या खुनाचा माग काढायचा प्रयत्न करतेय.कोण आहेत या खुनांच्या मागे ...?? कोण उठले आहेत पेरी आणि बेथच्या प्राणांवर .....??ज्या तपासाची नेहमीसारखी सुरवात होते ते पुढे किती भयानक गुंतागुंतीचे होते ते वाचायलाच हवे.
Wednesday, August 8, 2018
फ्रेंडशिप डे
खरे तर सगळा वर्गच आमचा मित्र परिवार ....पण त्यातही छोटे छोटे ग्रुप बरेच....
सव्वीस वर्ष झाली कॉलेज सोडून...त्यातील आम्ही बरेच एकमेकांशी कनेक्ट आहोत.फारसे असे सर्वांचे एकत्र भेटणे होत नाही . मग कधी कोणाला हुक्की येते भेटायची.त्याला दुसरा साथ देतो .न येणारे गप्प बसतात कारण त्यांना काहीही झाले तरी यायचे नसतेच. तर काही परदेशी असलेले त्यांचा हुरूप वाढवितात आणि अश्या तऱ्हेने एकएकाचा होकार येतो.
मग त्या गेटटूगेदरला स्टार्ट गिविंग फौंडेशनची अन्युअल जनरल मीटिंग असे भारदस्त नाव दिले जाते . पण तरीही बरेचजण येत नाहीत.काहीजण कामात बिझी... तर काही वैयक्तिक आयुष्यात ....तर काही इतर न सांगता येणाऱ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेले असतात.
असो.... पण प्रत्येकाची येण्याची इच्छा असतेच.एक जवळचा स्पॉट ठरविला जातो . जिथे फक्त बेसिक गरजा असल्या तरी चालतात . म्हणजेच हवा तितका वेळ गप्पा मारता येतील.एकमेकांना जोरात शिव्या देता येतील. ठरलेले मेम्बर आपल्याला सोपे पडेल त्या मार्गाने स्पॉटवर दाखल होतात.पण ते जेव्हा भेटतात आणि एकमेकांना पाहून जोरात ओरडत मिठ्या मारतात तेव्हा मधला काळ गायब झालेला असतो ..अजूनही ते 1992 चेच मित्र असतात . तोच निरागसपणा ...तीच चमक ...त्यांच्या डोळ्यात असते . आता तो समाजात वावरणारा एक प्रतिष्टित माणूस नसतो तर 1992 चा खोड्या काढणार ,मारामारी करणारा ,मुलींच्या मागे धावणारा आमचा मित्र असतो . आता त्या दिवशी तरी त्याचे आजार, काळजी ...चिंता त्याच्यापासून दूर गेलेले असतात . त्याच्या सुटलेल्या पोटावरचे आणि टक्कल पडलेल्या डोक्यावरचे विनोद तो सहन करतो .सध्या बंद केली आहे रे ....असे सांगणारा आज तुमच्याबरोबर घेईन दोन पेग असे हळूच सांगतो .आज तो आपला मोठेपणा सांगत नाही कारण दुसरे त्यांच्या क्षेत्रात कैकपटीने मोठे झालेत हे त्याला माहित आहे आणि त्याचा त्याला अभिमान आहे . तो मित्रांबरोबर क्रिकेट खेळतो ..एक सिगारेट चारजणात पितो .जास्त झाली की सांगतो आता कमी करा रे ...मी केलीय . रात्री तो नेहमीचा कार्यक्रम चालू होतो . मग सुरू होते आता काय करायचे पुढे .स्टार्ट गिविंग फौंडेशन समाजाला काहीतरी देण्याच्या हेतून चालू केली आहे .आताच अजेंडा चालू आहेच पण दोन वर्षानंतर काय बदल असावेत यावर चर्चा . मग त्याचे विचार बाहेर येतात . जगात आपल्याला येणारे अनुभव शेयर केले जातात . प्रत्येक मुद्याचा किस काढला जातो . इथे वाद किंवा विरोध नसतो तर चर्चा असते . आपले म्हणणे लादले जात नाही तर व्यक्त केले जाते .चारही बाजूने विचार करून निर्णय घेतले जातात . शेवटी इथे येणारा पैसा हा स्वतःच्या खिश्यातून येणार आहे याची जाणीव प्रत्येकाला असते .त्यामुळे सर्वानाच विचार करणे भाग असते .यात रात्र कधी सरते ते कळत नाही .
चला आम्ही तरी समाजाला काहीतरी देण्याचे ठरविले आहे तुम्ही कधी देणार ........???
© श्री. किरण कृष्णा बोरकर
द केस ऑफ द क्रिमसन किस ...अर्ल स्टँले गार्डनर
द केस ऑफ द क्रिमसन किस ...अर्ल स्टँले गार्डनर
अनुवाद ........ ज्योती आफळे
मेहता पब्लिकेशन
पेरी मेसन रहस्यकथा असे त्यावर लिहिले आहे पण पाच कथांपैकी पहिलीच कथा पेरी मेसनची आहे . बाकीच्या इतर रहस्यकथा आहेत पण त्यातील काही फारच किचकट आहेत . नीट लक्ष देऊन वाचले की लक्षात येतात . पहिली पेरी मेसनची कथा छानच आहे .ज्यांना रहस्यकथा आवडतात त्यांच्यासाठी हे उत्तम पुस्तक आहे .
Thursday, August 2, 2018
दूत
दूत
हॉस्पिटलच्या गेटजवळच तो त्याला भेटला.
"अरे तू ....?? इथे कुठे ...?? आज माझ्या एरियात ...?? पहिल्याने दुसऱ्याच्या हातात हात घेऊन विचारले.
"अरे ...एकाला पाहायला आलो.माझाच कस्टमर होता. पण काम झाले नाही..." .दुसरा उत्तरला.
"ठीकआहे ....आता आलाआहेस तर चल... चहा पिऊ"असे म्हणत दोघेही समोरच्या हॉटेलमध्ये शिरले.
अरे हो....तुमची ओळख करू दिली नाही मी .ते दोघेही हेलवर्ड या कंपनीचे ट्रान्सपोर्ट प्रतिनिधी .म्हणजेच थोडक्यात मृत्यूदूत .ज्यांची वेळ झाली त्यांना घेऊन जाणारे .
दोघेही चहाची ऑर्डर देऊन समोरासमोर बसले . दुसर्याने पहिल्याला विचारले" मग... कसे कांय चालू आहे सध्या ...."?
"फार काम नाही राहिले इथे.सिरीयस लोक येतात पण अत्यानुधिक उपकरणे.मनापासून मेहनत करणारे डॉक्टर्स आणि नवीन औषधे यामुळे बऱ्याचदा माणूस वाचतोच.त्यामुळे घेऊन जायला फारच कमी माणसे असतात . काल तर मोजून दोन जण सापडले त्यातही एक म्हातारा ....कितीतरी दिवस त्याचे नातेवाईक विनवणी करत होते घेऊन जा घेऊन जा ..पण त्या नवीन आणलेल्या मशीनने त्यांचा श्वास काही थांबत नव्हता .चुकून कोणाच्या तरी हातून त्याचे बटन क्षणभरासाठी दाबले गेले आणि मी त्याच क्षणी उचलले त्याला.फार कठीण परिस्थिती आहे इथे . इंसेंटिव्हसाठी जास्त तास काम करावे लागते.तुझे बरे आहे.फिरतीचा जॉब.... आज येथे तर उद्या तिथे...मलाही आता बदलीचा अर्ज दयावा लागेल".
तसा दुसरा हसला..." तुला वाटते तितके सोपे नाहीय ते . मला वेळ कमी पडतो त्यांना उचलायला ..घरी जाण्याची निश्चित वेळ नाही . पूर्वी काम कमी होते . एखादाच अपघात व्हायचा आणि क्वचित दंगल पण हल्ली दंगल वाढल्या . अतिरेकी कारवायांमुळे अपघात वाढले . एकाच वेळी शेकडो माणसे मरु लागली.त्यांना उचलून न्यायला वेळ नाही . हल्ली तर अपघातात जास्त माणसे सापडू लागली आहेत .मी तर दोन दोन दिवस घरी जात नाही . काय उपयोग त्या इंसेंटिव्हचा ...??
"म्हणजे आपल्या साहेबांनी समतोल साधला म्हणायचा ....कारण हल्ली नैसर्गिक मृत्यू लांबला आहे . लोकांच्या आजाराला अनेक उपचार आणि औषध निघाली आहेत .,काही काही जण अवयव ही बदलतायत. मी तर ऐकले आहे की अमरत्वावर संशोधन चालू आहेत .."पहिला आश्चर्याने म्हणाला.
" होय ....खरे आहे म्हणूनच आपल्या साहेबांनी दुसर्याप्रकारे हा समतोल राखायचा ठरविला आहे . इथे जन्माला येण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही उलट नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण कमी व्हायला लागले आहे . म्हणून आज अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढवले आहे . अतिरेकी जन्माला घातले गेले .तर काही ठिकाणी पूर वादळसारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण केली .शेवटी कितीही झाले तरी पृथ्वीवर समतोल राखणे हेच आपल्या साहेबांचे काम आहे ."
"खरे आहे तुझे ....पहिला हताशपणे म्हणाला .
" पण त्यामुळे माझे काम वाढलंय..दुसरा वैतागून म्हणाला " एका माणसांमुळे आज चार माणसे जातायत. आता बघ ना ....काही अतिरेकी शहरातील भर बाजारात बॉम्बस्फोट करणार आहेत त्यात ज्यांचे दिवस भरले नाहीत तेही हकनाक मारले जातील. पण पर्याय नाही .समतोल राखायचा असेल तर काही निरापराध्यांचा बळी द्यावाच लागेल आणि त्यांना घेऊन जाण्याचे काम करावेच लागेल..." . असे बोलून तो उठला आणि बाजाराच्या दिशेने चालू पडला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर