चवथी माळ ... रंग ????
हे गणपती ...नवरात्र.. असे मोठे सण आले की ती खुश व्हायची. नवरात्रीला तर जास्त खुश असायची. बरेचसे लोक घराला कुलूप लावून गरबा खेळायला बाहेर पडायचे. मग दोन तीन तास तरी तिला आरामात घर साफ करायला मिळायचे . फेसबुकवर काही स्वतःचे अपडेट ही द्यायचे प्लेयिंग गरबा विथ फॅमिली . आपण फक्त डोळे उघडे ठेवून नजर ठेवायची आणि हल्ली नऊ दिवस ठराविक रंगाचे ड्रेस किंवा साड्या नेसून बाहेर पडतात त्यामुळे ओळखायला ही कठीण जाते एखादीला.होय ती चोर होती.बराच काळ एका फॅमिलीला लक्ष करून संधी मिळताच घर साफ करायचे तिचे काम.
आजही ती आजच्या रंगाचा ड्रेस घालून निघाली होती . एक घर हेरूनच ठेवले होते . आज गरबा खेळायला जाताच घरात घुसण्याचा तिचा प्लॅन.सर्व रस्त्यावर एकाच रंगाचे ड्रेस साड्या दिसत होत्या.त्या घरातील आई वडील मुलगी बाहेर पडताना तिने पाहिले .
"वा....रे...वा...!! सर्वांनी एकाच रंगाचे कपडे घातले आहेत . ती हसली आता दोन तीन तास तरी येणार नाहीत.आजूबाजूचेही गरबा पाहण्यात मग्न .
हातातील हऱ्याराने कुलूप उघडून ती अलगद घरात शिरली.पार्टी श्रीमंत होती यात काही वादच नव्हता . तसेही ती पार्टी बघूनच काम करायची. हातातील बॅटरीच्या साहाय्याने तिने एका खोलीची तपासणी करण्यास सुरुवात केली.तिथला वॉर्डरोब उघडणार तोच शेजारच्या रूममधून खोकण्याचा आवाज ऐकू आला .. ती दचकली. हे काय भलतेच...??. घरात अजून कोण आहे ..?? हळुवार पावले टाकीत ती शेजारच्या रूममध्ये शिरली . आत बेडवर एक लहानशी आकृती झोपली होती . तिची काही हालचाल होत नसलेली पाहून ती पुढे गेली आणि धक्का बसून तिथेच उभी राहिली .बेडवर एक कृश शरीराची म्हातारी झोपली होती .जोरजोरात धापा टाकीत होती.
" च्यायला...!! घरचे म्हातारीला कोंडून बाहेर मजा मारायला गेले वाटते " तिने मनात म्हटले .
"पाणी..... म्हातारी खोकत खोकत म्हणाली.. तशी ती भानावर आली . म्हातारी सिरीयस झालीय हे तिच्या अनुभवी नजरेने ओळखले होते .काय करावे हा प्रश्न पडला . ती चोर होती पण निर्दयी नव्हती . किचनमधून पाणी आणून तिने तिला पाजले. कपाळावर हात ठेवला तर अंगात ताप होता . सहज खाली हात लागला तसे कळले बिछाना ओला झालाय . मग तिने तिला उचलले चांगले साफ केले . कपाटात तिच्या अनेक साड्या गाऊन होते . मुद्दाम तिने आजच्या रंगाचाच गाऊन निवडला आणि म्हातारीला घातला . किचनमध्ये जाऊन वस्तू शोधल्या आणि गरम चहा बिस्किटे घेऊन आली . समोर बसून तिला भरवली. आता कुठे म्हातारीला तरतरी आली .बाजूच्या ड्रॉवरकडे तिने हात केला तेव्हा त्यातील बॉक्स काढून औषधें तिला दिली. हे सर्व करीत असताना मनात सतत धागधुग होती . घरचे आले तर काय होईल ....??? पण पाय काही हलत नव्हता.म्हातारीच्या नजरेतील ओढ तिला थांबवत होती.
"घरचे बाहेर गेलेत ....आजची रात्र काय येणार नाहीत...?? म्हातारी क्षीण आवाजात बोलली .तशी ती शांत झाली . मग तिने रात्रभर म्हातारीच्या उशाशी बसून कपाळावर पट्ट्या ठेवल्या . सकाळीच तिचा ताप उतरला . परत तिला चहा बिस्किटे भरवून ती निघायच्या तयारीला लागली .
"घरचे बाहेर गेलेत ...पण मुलगा सांगून गेला रात्रीसाठी काहीतरी सोय करतो तुझी . तुला पाठवलंय हो त्याने . खूप छान केलेस तू माझे . मुलगा किती काळजी घेतो माझी .....". म्हातारी तिच्याकडे पाहून म्हणाली.
तिने मुलाला मनोमन शिव्या घातल्या आणि त्या माउलीला प्रणाम करीत बाहेर पडली . आज मन तृप्त करणारा अनुभव तिच्या पदरी पडला . होय ती देवीचं आहे .
© श्री . किरण कृष्णा बोरकर
Saturday, October 13, 2018
चवथी माळ ... रंग ????
Friday, October 12, 2018
तिसरी माळ.. रंग ..??
तिसरी माळ ..... रंग ????
धुळीने भरलेल्या रस्त्यावर ती ट्रॅफिक कंट्रोल करीत सकाळपासूनच उभी होती.दुपारी रिलिव्हर न आल्यामुळे अजूनच चिडली होती त्यात हे ट्रॅफिक तुंबलेले रोजचे ट्रॅफिक .संध्याकाळी आजच्या रंगाची साडी नेसून नाक्यावरच्या देवीला जायच तिचा प्लॅन ठरलेला होता.पण हा रिलिव्हर शेवटी पुरुषच.... स्त्रियांच्या भावनांचा विचार करणार नाहीच.
मुबईच्या ट्रॅफिकला इतरांप्रमाणे तीही शिव्या देत काम करायची . इतक्यात वायरलेसवर मेसेज आला एका मंत्र्याची गाडी येतेय ट्रॅफिक मोकळे करून घ्या. मनोमन शिव्या हासडत ती कामाला लागली. लोक काय मजा म्हणून ट्रॅफिक जाम करतात का ....?? तर ह्या मत्र्यांनाच घाई असते का ...?? इतरजण काय गाड्या घेऊन फिरायला बाहेर पडलेले असतात ....??? रस्त्यावरील धूळ ....गाडीतील कार्बन...आणि हॉर्नचा आवाज अंगावर घेत ती कामाला लागली. ट्रॅफिक थांबविताच इतर गाड्यांचे हॉर्न मोटारसायकलवाल्यांच्या शिव्या तिच्या कानावर पडल्या .इतक्यात एक मध्यमवयीन स्त्री हातात छोट्याला घेऊन धावत रस्ता क्रॉस करू लागली . फारच घाईत दिसत होती चेहरा ही रडवेला होता.त्या बाईच्या अंगावर ही आजच्या रंगाची साडी दिसत होती . तिची अवस्था बघून काहीतरी गडबड आहे हे तिला जाणवले . मुलाला काही झाले असेल का ..??? की अजून काही ...?? ड्युटी सोडून आपण तिला काही मदत करू शकत नाही हे तिला जाणवले. क्षणभर विचार करून तिने मंत्र्याची गाडी अडवली आणि तिला जाण्याची खूण केली . रस्ता क्रॉस करून त्या बाईने तिच्याकडे पाहून हात जोडले आणि धावायला सुरवात केली .एक चिडलेला आवाज त्या गाडीतून तिच्या कानावर पडला आणि तिडीक तिच्या मस्तकात निघाली आणि काहीतरी उत्तर देण्यासाठी ती गाडीजवळ आली .तिचा चेहरा पाहूनच ड्रायव्हर हादरला. इतक्यात आतून मंजुळ आवाजात तिला सॉरी म्हटले गेले . आश्चर्य चकित होऊन तिने आत पाहिले . आत एक तरुण स्त्री तिच्याकडे पाहून हसली . तिनेही त्याच रंगाची साडी नेसली होती . पुन्हा एकदा तिने सॉरी बोलून तिला हात जोडले आणि हाताने थंप्स अपची खूण करून गाडी पुढे नेण्याचा ड्रायव्हरला इशारा केला.
होय त्या देवीचं आहेत .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Thursday, October 11, 2018
दुसरी माळ ...रंग ..??
दुसरी माळ .... रंग ????
आजच्या रंगाची साडी नेसून आपल्याबरोबर मुलीलाही सजवून ती देवीच्या दर्शनाला जायला तयार झाली . नवऱ्याची लाडिक नजर पाहून ती मोहरून उठली . बाहेर पडणार इतक्यात मोबाईल वाजला . न घेण्याचा प्रश्नच नव्हता स्टेशनने कामासाठीच फोन दिला होता तिला.
"दहा मिनिटात हजर हो ... डहाणूकर रोडवर एका बिल्डिंगला आग लागली आहे. मूव्ह ...." साहेबांचा करडा आवाज कानावर पडताच मुलीचा हात सोडून बाईककडे पळाली . दोन मिनिटात तिची बाईक फायरबिग्रेड स्टेशनच्या दिशेने धावू लागली .तर सातव्या मिनिटाला ती व्हॅनजवळ हजर होती.
"आयला भारी .....!! सहकाऱ्यांच्या तशाही स्थितीत मारलेल्या कॉमेंट्स ऐकून तिला हसू आले आणि त्यांना हात दाखवून ती केबिनमध्ये शिरली .दोन मिनिटात कपडे बदलून ती चालत्या व्हॅनमध्ये चढली.
" कुठे ....?? दर्शनाला निघाली होतीस का ....?? साहेबांचा करडा आवाज ऐकून तिने मान डोलावली . "उद्या जा ...... भावनाहीन आवाजात त्यांनी उपाय सांगितला.हा उद्या कधी येत नाही हे तिला माहीत होते . काही न बोलता ती हसली .
त्या इमारतीच्या पाचव्या मजल्याला आगीने वेढले होते . आरडाओरड चालू होती. हातातील हत्यारे सावरत ती जिन्याकडे पळाली.एक एक मजला पार करत ती पाचव्या मजल्यावर पोचली . अडकलेल्या सर्वाना सुखरून बाहेर काढून तिने सुटकेचा निश्वास टाकला. इतक्यात एक छोटी मुलगी ओरडली "माझा चिंटू ....माझा चिंटू ....काही न कळून सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. तितक्यात एक घरचा म्हणाला "काही नाही हो .....आमचा छोटा कुत्रा आहे . राहिला असेल वर ..राहुद्या आता . आम्ही सर्व सुखरूप आहोत ना .??? पण त्या छोटीचे रडणे काही थांबत नव्हते . तिला राहवेना ,ती परत वर जाण्यास तयार झाली . साथीदारांनी तिला अडवले .कशाला एका कुत्र्यासाठी परत त्या आगीत जातेस .....पण एका थंड नजरेने त्यांना गप्प करून ती जिना चढू लागली.पाचवा मजला पूर्ण आगीच्या वेढ्यात होता . ती कानात प्राण आणून त्याच्या हालचालींचा मागोवा घेऊ लागली . अचानक एका जळत्या कापटामागून त्याचे रडणे ऐकू आले . सावधपणे ती तिथे गेली . एक छोटे गोजिरवाणे पिलू जीव मुठीत धरू बसले होते . मरणाची मूर्तिमंत भीती त्याच्या डोळ्यात दिसत होती. तिला पाहताच त्याने पुन्हा भुंकायला सुरवात केली . यावेळी त्याच्या भुंकण्यात आनंद दिसत होता . हळुवारपणे तिने त्याला उचलले आणि परत फिरली. त्या छोट्या मुलीच्या हाती त्याला सोपावताना चेहऱ्यावरचे हास्य पाहून तिला भरून आले.
खरेच ती देवीचं आहे.
© श्री . किरण कृष्णा बोरकर
Wednesday, October 10, 2018
पोखिला...अपहरणाचे 81 दिवस..…डॉ. विलास बर्डेकर
पोखिला...अपहरणाचे 81 दिवस..…डॉ. विलास बर्डेकर
सकाळ प्रकाशन
आसामी भाषेत पोखिला म्हणजे फुलपाखरू .फॉरेस्ट ऑफिसर असलेले लेखक डॉ. विलास बर्डेकर यांना फुलपाखरांचा अभ्यास करायचा छंद . त्या छंदापाई ते अरुणाचल प्रदेशमध्ये गेले . तिथे त्यांनापत्रकार समजून नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट फॉर बोडोलँड (NDFB) च्या दहशदवादी संघटनेकडून अपहरण केले गेले . त्या 81 दिवसाच्या कैदेतील वर्णन त्यांनी पुस्तकरूपाने मांडले आहे . चित्रपटात असते तसे काही थरारक नसते तर तीही सर्वसामान्य माणसे आहेत . पण तेथील वास्तव परिस्थिती फारच भयानक आहे . तेथील भौगोलिक परिस्थिती ,वेळी अवेळी येणारा पाऊस .निबिड अरण्य . जळवा ,विषारी कीटक अश्या परिस्थिती लेखक त्यांच्यासोबत राहिले .दहशदवाद्यांकडून लेखकाला चांगली वागणूक मिळाली याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे .आपल्याला आसाम ,अरुणाचल प्रदेशाची चांगली माहिती मिळते . तसेच दहशतवादयांच्या मनाची ही कल्पना येते .
पहिली माळ ...... रंग ?????
पहिली माळ ...... रंग ?????
नवरात्री आल्या की तिला आनंद व्हायचा.कोणत्या दिवशी कोणता रंग हे तिला तोंडपाठ असायचे .कचरा उलचणारी असली म्हणून काय झाले शेवटी तिलाही आवड होतीच.........
त्या दिवशीही ती ठरलेल्या रंगाची साडी नेसून घराबाहेर पडली. तिचे पिलू पाठीवर बांधलेल्या झोळीत खुशाल झोपून होते.आईजवळ असण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता .आजूबाजूच्यांच्या कुत्सित नजरा आणि पुरुषांचे अश्लील शेरे स्वीकारत ती बाहेर पडली .नेहमीच्या कचरापेटीतून हव्या त्या वस्तू गोळा करीत फिरू लागली . रस्त्यावरून त्याच रंगाचे ड्रेस आणि साड्या घालून जाणाऱ्या इतर स्त्रिया आणि।मुलींकडे पाहून ती खुश व्हायची . आपणही आज त्यातलेच आहोत याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटायचा .
एका पेटीत कचरा निवडताना तिचा हात अचानक थबकला . तोंडातून बाहेर पडणारी किंकाळी तिने कशीतरी दाबून धरली .आजच्या रंगाच्या कापडात गुंडाळलेले मृत मूल अलगद तिने हातात घेतले. नुकतेच जन्मलेले होते ते. पोटात काहीच नसल्यामुळे रडून रडून बिचाऱ्याचे प्राण निघून गेले होते . हुंदका देत तिने त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि नियमाप्रमाणे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला घेऊन गेली . नेहमीच्या गोष्टी असल्याप्रमाणे पोलिसाने पेपर बनविले आणि मूल बेवारस म्हणून नोंद केली . सगळेच दगडी मनाने काम करीत होते.....तिला रहावेना . धीर करून तिला त्या मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मागितली . समोरचा हवालदार आश्चर्याने तिच्याकडे पाहत बसला . तर इन्पेक्टरने विचार करून परवानगी दिली . तिने ते कलेवर अलगद उचलले.आणि विधिवत अंत्यसंस्कार करण्यासाठी पावले स्मशानाकडे वळवली. होय ती देवीचं आहे .
© श्री . किरण कृष्णा बोरकर
Sunday, October 7, 2018
कोमा.… रॉबिन कूक
कोमा.… रॉबिन कूक
अनुवाद .....रवींद्र गुर्जर
मेहता पब्लिकेशन
वैद्यकीय विश्वात खळबळ माजविणारी कादंबरी
डॉ. सुसान ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये जॉईन होते . हे अतिशय नावाजलेले हॉस्पिटलमध्ये आहे . पण त्या हॉस्पिटलमध्ये अचानक एका वर्षात सहा पेशंट कोमामध्ये गेले आहेत . एक वीस वर्षीय खेळाडू गुढग्याच्या छोट्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आणि आठ नंबरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू असतानाच कोमामध्ये जातो . त्या आधी ही नॅन्सी नावाची तरुणीही असेच छोटे ऑपरेशन चालू असतानाच कोमामध्ये जाते . डॉ सुसान या घटनेच्या मुळाशी जायचे ठरविते . मग तिच्यावर संकटे कोसळू लागतात . तर दोनवेळा प्राणघातक हल्लाही होतो . हॉस्पिटलमधून तिची बदली होते . तरीही न डगमगता ती या प्रकरणाच्या मुळाशी जाते . सत्य समजताच तिला धक्का बसतो पण अजूनही तिला काही धक्के बसणार आहेत .आता तिचा जीवच धोक्यात आहे . ज्या आठ नंबरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये हे घडतेय तिथेच तिला ऑपरेशनसाठी नेले जातेय . यातून कोण तिला वाचवेल .
Wednesday, October 3, 2018
द केस ऑफ द डेडली टॉय... अर्ल स्टॅनले गार्डनर
द केस ऑफ द डेडली टॉय... अर्ल स्टॅनले गार्डनर
अनुवाद..….ज्योती आफळे
मेहता पब्लिकेशन
पेरी मेसन सिरीजमधील ही रहस्यकथा
नोंडी अँलिसनला कळते की आपण चुकीच्या माणसाला जोडीदार म्हणून निवडले आहे . तिने ताबडतोब त्याच्याशी ठरलेले लग्न मोडून टाकले पण आता तो तिच्या मागे लागलाय.कायद्याच्या कटाच्यात न येता तो तिला धमक्या देऊ लागलाय . तिच्या मित्रालाही मारहाण केलीय . त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्याची पहिली पत्नी तिला आपल्या घरी बोलावते . तिथे गेल्यावर नोडाच्या आयुष्यात वेगळे वळण येते . तिला खुनाच्या आरोपाखाली अटक होते . तेव्हा तिच्या मदतीला येतो सुप्रसिद्ध वकील पेरी मेसन .