Monday, November 5, 2018

त्यांचीही दिवाळी ...१

"चल रे लवकर .....!!  लवकरच दिवाळी सुरू होईल.."
"हो ग ....!! तयार तरी होऊ दे मला.दिवाळी आहे.चांगले दिसायला नको का ???
"हा... हा.. हा.. जोक करू नकोस ... मला काही फरक पडत नाही .. किती वर्षे अनुभवतेय तुझा सहवास ..... चल लवकर मी खूप उत्साहित झालीय ते फटाक्यांचे आवाज ऐकायला ..."
"हो ..हो .... चल निघू .."
"ओ दादा ... !! टॅक्सीवाले भाऊ ...!! चौपाटीवर चला घेऊन .. हॅपी दिवाळी तुम्हाला. चला मॅडम हात पकडा नाहीतर हरवाल त्या गर्दीत.."
"तुम्ही म्हणजे ना .... किती वर्षे जातोय  दिवाळीत ..??चौपाटीवर कधी हरवले आहे का .. ?? त्या निमित्ताने तुम्ही हात धरून ठेवता .."
"चला चौपाटी आली ... किती गर्दी आहे नाही ...किती गोगांट ..?? नुसती आनंदाने फुलून गेली आहे चौपाटी ...".
"हो ना... किती छान वाटते ऐकून .. बघ बघ फाटक्या वाजू लागल्या ..खरेच यार ..ही खरी दिवाळी ..
"हो ना ...किती वेगवेगळ्या आवाजाचे फटाके लावतायत लोक.किती छान वाटते वेगवेगळे आवाज ऐकून ..."
"अरे बापरे ....हा सायरनसारखा आवाज कुठून येतोय ....काय अपघात वगैरे झालाय का ....
"नाही हो .. तुमचे आपले काहीतरीच ..हा ही फटाका आहे .. सायरन सारखा आवाज येणारा.
"अरे देवा...!! दरवर्षी काहीतरी वेगळे आवाज ऐकतोय..."
"अरे हे काय ....?? आवाज बंद का झाले ...?? इतकी शांतता कशी अचानक ..."??
"माहीत नाही ग  काय झाले ...?? थांब विचारतो  कोणाला तरी ... ओ भाऊ काय झाले ..?? हे अचानक शांत का .."??
"आहो दहा वाजले ..कोर्टाने आदेश दिलाय रात्री दहा नंतर फटाके वाजवू नये . पोलीस आले आणि सर्व बंद करून गेले . तुम्हाला कुठे सोडू का ...??
"नको.. नको ... आम्ही ठीक आहोत धन्यवाद".
"काय ग .... हे काय नवीन ... अग फटाक्यांचे आवाजच ऐकू आले नाही तर आपण दिवाळी कशी साजरी करणार . आपल्या आयुष्यात अश्या मार्गाने येणारा प्रकाशही आपल्यातून निघून गेला ....."
"हो ना ... आयुष्यभर डोळ्यासमोर काळोखच असतो आपल्या.पण दरवर्षी किती हौसेने आपण इथे दिवाळी अनुभवायला येतो. ही गर्दी..उत्साहाने भरलेली माणसे..,ते फटाक्यांचे विविध आवाज ..यांच्यावरच आपली दिवाळी साजरी होते . आता तोच आवाज आपल्या आयुष्यातील एका आनंदाच्या प्रसंगातून निघून गेला .आता दिवाळी कशी साजरी करायची आपण . इतरांचे ठीक आहे हो.त्यांना सगळे दिसते .. ती रोषणाई ..फटाक्यांची आतिषबाजी . पण आपले काय .. आपण त्या फटाक्यांच्या आवाजात आणि आजूबाजूच्या माणसांच्या उत्साहाने भरलेल्या वाजताच रंगून आपली दिवाळी साजरी करतो . आता पासून ते ही नाही .. चला घरी निघू
"हो चल ... सांभाळून... हात धर माझा.. मी टॅक्सीला आवाज देतो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, November 4, 2018

पॉपिलॉन.... हेन्री शॅरियर

पॉपिलॉन.... हेन्री शॅरियर
अनुवाद.....रवींद्र गुर्जर
श्रीराम बुक एजन्सी
पॉपिलॉन हे लेखकाचे गुन्हेगारी विश्वातले टोपणनाव . खरे तर ही एक पलायन कथा आहे . पॉपीलॉनला त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होते . जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी त्याला फ्रेंच गियानातील भयानक तुरुंगात पाठविण्यात येते .ह्या तुरुंगातून फक्त मृत्यू किंवा पूर्ण शिक्षा भोगणे या दोन गोष्टीच तुमची सुटका करू शकतात .त्यातुरुंगातून पॉपिलॉन सुटका करून घेतो पण नंतर पुन्हा पकडला जातो . पुन्हा तो दोन वर्षे एकांतवासाची शिक्षा भोगतो . अश्या वेगवेगळ्या ठिकाणी तो आठवेळा पलायनाचे प्रयत्न करतो आणि शेवटी यशस्वी होऊन सामान्य नागरिकांचे जीवन जगू लागतो.या घटनांचा काळ हा1932 ते 1945 सालातील आहे . त्याने सुटण्यासाठी केलेले प्रयत्न ,तुरुंगातील अवस्था,वेगवेगळ्या स्वभावाचे कैदी, तुरुंगात जनावारांपेक्षाही खालच्या दर्जाची मिळणारी क्रूर वागणूक वाचून अंगावर काटा येतो . त्यासर्व काळात पॉपिलॉन कसा राहिला आणि त्याने आपली मनःस्थिती आणि तब्बेत टिकवून पलायनाची कशी योजना बनवली ते वाचण्यासारखे आहे .

Wednesday, October 31, 2018

द गॉडफादर रिटर्न्स ...... मारिओ पुझो/ मार्क वाईनगार्डनर

द गॉडफादर रिटर्न्स ...... मारिओ पुझो/ मार्क वाईनगार्डनर
अनुवाद.... डॉ. अजित कात्रे
श्रीराम बुक एजन्सी
मारिओ पुझोच्या सुप्रसिद्ध गॉडफादर या कादंबरीचा दुसरा भाग किंवा पुढची गोष्ट असे म्हणता येईल.लेखक मार्क वाइनगार्डनरने मारिओ पुझोची पात्रे घेतलीच पण त्याबरोबर काही स्वतःची पात्रे निर्माण केली . खरे तर यात इतकी पात्रे झालीत की कादंबरीची मूळ कथा बरीच पाने वाचली तरी लक्षात येत नाही .वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडत असतात त्यांचा संबंध लक्षात येत नाही .मुख्य म्हणजे मारिओ पुझो आणि मार्क वाइनगार्डनर यांची शैली वेगळी आहे . मूळ गॉडफादर वाचताना अंगावर काटा येतो आणि पुढे वाचण्याची उत्सुकता वाढते तसे ही कादंबरी वाचताना वाटत नाही .मूळ डॉन विटो कॉर्लीऑन नंतर त्यांचा धाकटा मुलगा मायकेल कॉर्लीऑन डॉन झालाय आणि तो फॅमिली चालवतोय .त्याची फॅमिली चालविण्याची पद्धतच आपण वाचत राहतो . अर्धे पुस्तक वाचून झाले तरी लिंक लागत नाही ,वाचायला कंटाळा येतोय

Monday, October 29, 2018

मी टू ...1

सुप्रसिद्ध मराठी सुपरस्टार विनयकुमार मी टू  प्रकरणात अडकला आणि त्याच्या कुटुंबात मित्र परिवारात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या
स्थळ.... कोकणातील एक छोटे गाव
"मेले नरकात पडतील सगळे....... !! फटकी येऊन मरतील.....माझ्या लेकावर नको नको ते आरोप करतात.....??  घरात शिरताच बायकोच्या तोंडाचा पट्टा चालू असलेला पाहून सुदाम सुर्वे काय झाले ते समजून गेला.
सध्या गावात विनायकुमारचीच चर्चा होती.विन्याला त्यांनी मुलासारखे वाढविले होते त्यामुळे ती संतापणार हे नक्की होते. त्याच्या शांत आणि भिडस्त स्वभावामुळे तो या गोष्टीची चर्चा करत नव्हता आणि गाववाले ही त्याच्यासमोर काही बोलत नव्हते .
सुदाम घरात शिरलेला बघताच ती अजून बिथरली. आतून दोन चार भांडी पडताच सुदाम स्वतःशीच हसला.ती चहा घेऊन बाहेर आली .त्याच्यासमोर चहाचा पेला आपटत म्हणाली "तुम्ही कायच बोलूंचा नाय असा ठरवलाव की काय ...??? माझो पोर अशी भांनगड करुचो नाय हे म्हायती आहे तुमका .."
"पण लोकांची तोंडा बंद करता येतात काय...?? सुदाम चहाचा घुटका घेत म्हणाला.
"कोण हो ती सटवी... ??? खयसून इली ती ...?? समोर तर येऊ दे .. झिंझ्या उपटून हातात देईन तरच खऱ्या बापाची मी ..." तिचा आवाज चढला तसा सुदामला ठसका लागला.
"आपल्या गावाची तर दिसत नाय... !! .नायतर तिचो इतिहास काढलो असतो.. "सुदाम सहज म्हणाला
"म्हणजे ...?? गावाच्या सर्व बायकांचो इतिहास तुमाक माहिती असा... "तिचा आवाज चढला तसा सुदाम वरमला. आपण काहीतरी भलतेच बोलून गेलो याची जाणीव त्याला झाली.
"तसा नाय गो ....पण गावातली असती तर माहिती झाली असती खरा खोटा काय ता...?? त्याने ताबडतोब सारवासारव केली .
"मी काय म्हणते ...?? कोणी काय बाहेरचा केला नसात ना ...??? त्या दिवशी दोन कोंबड्या मेल्या ... बाहेर पिंजर लावलेलो लिंबू पण होतो .भटाला जाऊन विचारायचा काय ...?? पोराची प्रगती कोणाक बघवत नसात...?? चिंतातुर नजरेने ती सुदामकडे पाहत म्हणाली .आपल्या बायकोचे छोट्या दिरावरचे हे निरागस प्रेम पाहून सुदाम गहिवरला.
" तू म्हणतेस तर बाहेरचा काय ता बघू ... लोकांका त्याची प्रगती डोळ्यावर आली असेल .. असे बोलून त्याने बायकोला धीर दिला.
खरे तर विन्यावर कितपत विश्वास ठेवायचा याबाबतीत तो साशंक होता . दोन वर्षांपूर्वी तो मुंबईला विन्याकडे गेला होता तेव्हा त्याच्या बेडरूम मध्ये स्त्रियांची अंतवस्त्रे त्याने पहिली होती . पण तरुण मुलगा आहे त्यात प्रसिद्ध .... अश्या गोष्टी आयुष्यात घडतात हे त्याला माहित होते म्हणून तो गप्प राहिला .पण रात्री फोन करून त्याला विचारायचे आणि आम्ही पाठीशी आहोत हे सांगून त्याला धीर द्यायचा हे पक्के ठरवून तो उठला .
© श्री . किरण कृष्णा बोरकर

मी टू ....2

सुप्रसिद्ध मराठी सुपरस्टार विनयकुमार मी टू  प्रकरणात अडकला आणि त्याच्या कुटुंबात मित्र परिवारात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
स्थळ .... कॅनडातील एक शहर
मारियाने अव्याला हलवून जागे केले ."हे अवि ...!!लुक विन्या भाऊजी इन ब्रेकिंग न्युज टुडे..?? व्हाट्स हॅपंड.....??
तसा अरविंद सुर्वे उर्फ अवि खडबडून जागा झाला .टीव्ही वरची न्युज पाहताच त्याची रात्रीची खाडकन उतरली . रात्रीच तो एका क्यायंटबरोबर बाहेरून जेवून आला होता आणि त्यात त्याला थोडी जास्तच झाली होती .
"च्यायला ...विन्यापण या मीटूच्या लफडयात अडकला शेवटी .त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून बायकोकडे पाहिले .ती त्याच्याकडेच पाहत होती . झाले आता हिला समजावताना आपला दिवस फुकट जाणार हे अवि समजून चुकला.
"नथीग रॉगं बेबी ....जस्ट सिम्पल हरॅसमेंट केस ...तो सहज स्वरात म्हणाला.
तशी ती उसळली" कोणाची हरॅसमेंट .....???
देवा आता ही  मराठीत बोलणार म्हणजे अजून वाट ...अव्या मनात चरफडला.तसे तिला मराठी समजत होते आणि थोडेफार ती मोडकेतोडके बोलतही होती . गणपतीला कोकणात सर्व मराठी बोलायचे ,तेव्हा तिचे दोन दिरच तिला इंग्रजीत समजावून सांगायचे. विन्यावर तिचा जीव . आपला लाडका दिर मराठीत सुपरस्टार आहे याचे तिला कौतुक .पुढे मागे तो हॉलिवूड मध्ये येईल अशी स्वप्ने तीही पाहत होती.
"अग ...कोणत्यातरी बाईने त्याच्यावर  सेक्सच्युल हरॅसमेंटचा आरोप केलाय "
"शक्य नाही ... विन्या असे करणार नाही. उलट तीच त्याच्या मागे लागली असणार . विन्या हँडसम आहे त्यात फेमस आहे . अजून लग्न झाले नाही. मग मागे लागणारच त्याच्या" ती चिडून म्हणाली "आणि काय हरकत आहे त्याने केले तर ...???तिची इच्छा असेल म्हणून हा ही तयार झाला असेल".
"ए बाई ....! ते भारत आहे कॅनडा नाही.  कोण आवडला की गेले डेटिंगला ..आधी ती बाई कोण ते शोधायला हवे.बहुतेक ती वरच्या वाडीतील बाबू पळसकरची पोरगी शोभा असेल . खूप मागे मागे फिरायची आमच्या.." सहजपणे अवि बोलून गेला.
" तुमच्या ...?? व्हॉट डू यू मीन ....तुमच्या ??? तिचा आवाज चढला."म्हणजे तुही त्यात आहेस का ???? तिने शेवटी बायकोपणा दाखविलाच .
"अग बाई ....तेव्हा आम्ही सर्व एकत्र असायचो म्हणून बोललो "अवि हात जोडून म्हणाला. च्यायला ह्या विन्याच्या ......हजारवेळा म्हटले प्रोफेशनल घेऊन जा . बोंबाबोंब कमी होते .ठरलेले पैसे आणि त्यावर टीप दिली तर बाई खुश .कसला त्रास नाही .पण ह्याला ते नको . स्वतःहून येतात तर नाही कशाला बोलू असे याचे म्हणणे . मग अशी लफडी होतात . तरी बरे याच्याइतका फेमस नाही मी.... नाहीतर ह्या मी टू मध्ये मीही अडकलो असतो.तरी बरे त्यावेळी शोभाला चित्रपट पाहायला घेऊन जायचो तेव्हा माझी हातचलाखी तिला विन्याचीच वाटायची,तेव्हाही मीच सेफ असायचो . जाऊदे रात्री विन्याला फोन करून झापले पाहिजे . शेवटी मोठा भाऊ आहे मी त्याचा .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, October 28, 2018

द ओडेसा फाइल... फ्रेडरिक फॉरसिथ

द ओडेसा फाइल... फ्रेडरिक फॉरसिथ
अनुवाद.....अशोक पाथरकर
मेहता पब्लिकेशन
जर्मनीतील माजी एस.एस. सभासदांची संघटना आहे . त्या संघटनेचे संक्षिप्त नाव ओडेसा. जर्मनी दुसरे महायुद्ध हरल्यावर बहुतेक एस.एस.अधिकाऱ्यांनी आपली ओळख लपवून जगभरातील विविध देशांमध्ये आश्रय घेतला आणि एकमेकांच्या संपर्कात राहू लागले . आपल्या लोकांचे रक्षण करणे ..जर्मनीला पुन्हा बलवान बनवायचे ..इस्त्रायलाजगाच्या नकाशावरून नष्ट करायचे हे त्यांचे उद्दिष्ट होते. अतिशय गुप्तपणे ओडेसाचे कार्य चालू होते .पण 22 नोव्हेंबर1963 ला राष्ट्राध्यक्ष केनेडीची हत्या झाली आणि त्याच दिवशी हॅम्बुर्गला एक वृद्ध इसमाने आत्महत्या केली . फ्री पत्रकार असलेल्या पीटर मिलरने सहजच त्या व्यक्तीची चौकशी केली आणि त्याच्या हाती लागली त्या व्यक्तीची डायरी . आत्महत्या केलेली व्यक्ती ज्यू होती आणि ती हिटलरच्या छळछावणीतून सुटून आलेली होती . डायरीत होती त्याच्या क्रूर छळाची हालअपेष्टाची कहाणी .पण त्यातही एक रहस्य होते .80000 ज्यूच्याहत्याकांडाला कारणीभूत असलेला एस एस अधिकारी एडवर्ड रोशमन अजूनही जिवंत आहे असे त्यात नमूद केले होते . ह्या एडवर्डला जगापुढे आणून त्याला शिक्षा व्हावी अशी त्या ज्यूची इच्छा होती . एक मोठी स्टोरी मिळेल या आशेने मिलर त्या घटनेचा माग घेण्याचे ठरवतो आणि चालू होतो एका क्रूरकर्म्याचा जीवघेणा पाठलाग .यात कोणाची सरशी होते ते पुस्तक वाचल्यावरच कळेल .

Thursday, October 25, 2018

जंगली माणूस ..... बाबूराव अर्नाळकर

जंगली माणूस ..... बाबूराव अर्नाळकर
मनोरमा प्रकाशन
आफ्रिका खंडातील घनदाट अरण्यात राहणाऱ्या आदिवासी टोळ्यांच्या रोमहर्षक कथा . ब्रिटिश कमिशनर सँडर्स या पुस्तकातील नायक आहे . तो या टोळ्यांवर लक्ष ठेवून आहे . तिकडचा सगळा कारभार त्यांच्या कायद्याने चालतो . बऱ्याच आदिवासी टोळ्या त्याला घाबरून आहेत  तर काही टोळ्या त्याच्या जीवावर ही उठल्या आहेत . एकमेकांवर ते कशी बाजी पलटवतात ते यात वाचायला मिळते . खरे तर अर्नाळकरांचे नेहमीचे नायक नसल्यामुळे पुस्तक थोडे कंटाळवाणे आहे  शिवाय एक सलग कथानक नसल्यामुळे वाचताना लिंक लागत नाही .अर्नाळकरांच्या चाहत्यांना आवडणार नाही हे निश्चित .