Saturday, October 10, 2020

पत्थरातील पाझर

पत्थरातील पाझर
"शेवटचे कधी रडलायस तू ..."?? त्याच्या हातातून ग्लास खेचून घेत तिने विचारले.
तो फक्त हसला.
 तशी ती चिडली." बघ असेच वागतो तू नेहमी.. ती  घोट घेत म्हणाली.
खरे तर ती लाल शर्ट आणि ब्लॅक स्कर्ट मध्ये एकदम भारी दिसत होती .शर्ट नको तिकडे एकदम घट्ट बसला होता.दोन उघडी बटणे कोणालाही घायाळ करू शकत होती.
 त्याने काही न बोलता सिगारेट शिलगावली.
 "इथे भरदिवसा स्त्रियांवर अत्याचार होतायत.कोवळ्या मुलीही यातून सुटत नाहीत .पण तू यावर कधीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीस .माहीत तरी आहे का आपल्या देशात काय चालू आहे ...??ती चिडून म्हणाली.
 "बरे मग.... ?? मी काय करू ...?? त्याने थंड आवाजात तिला विचारले.."कालच दिलेला प्रोजेक्ट पूर्ण केलाय आपण तोही वेळेच्या आधी.कितीतरी पैसे वाचविले आपण कंपनीचे. तेच आपले काम आहे.आता चार दिवस आराम करू...." तो सहज म्हणाला.
"हेच ... हेच....!! फक्त स्वतःचे काम.अरे पाचशे वर्षे लढून आपण ती जागा ताब्यात घेतली.आता तिथे सुरेख मंदिर बांधू ... किती अभिमानाची गोष्ट आहे ही....". ती पुन्हा उत्साहात ओरडली.
" नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे ..."त्याने हसून मान डोलावली.
" परत तेच .....तुला कधी आनंद झालेला दिसला नाही . कधी चर्चा करताना पाहिले नाही मी...."तिने टोमणा मारलाच.
तो पुन्हा हसला.
" दगड आहेस दगड ....!!  देशात काय चालू आहे याची काहीच माहिती नाही तुला .. उद्या त्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा  निषेध करण्यासाठी कॅडल मोर्चा काढतोय . तू येणार आहेस का ...."?? तिने खोचकपणे विचारले.
"नाही मी बाहेर चाललोय .."त्याने हसत उत्तर दिले .
"ए.. उद्या शॉपिंग करायची का ...??  बोनस तर देणार आहे कंपनी आपल्याला ..." तिने विचारले . 
"तीन महिने झाले हे कपडे घेऊन ... पुन्हा नवीन ?? त्याने स्वतःकडे आणि तिच्याकडे डोळे वटारत विचारले .
"घ्या .. यातही अरसिक तू .. माहितीय मला.पण आहेत ना पैसे...?? थोडी मजा करू की..मी देईन पैसे दोघांच्या शॉपिंगचे .... " तिने त्याचा हात हाती घेऊन म्हटले .
त्याने खांदे उडवून बिल मागितले . बिल घेऊन आलेल्या वेटरकडे पाहून अचानक त्याला कसलीतरी आठवण झाली .
"मित्रा.. मी दिलेला मोबाईल पोरगी वापरते ना ..?? काही अडचण असेल तर सांग . आणि तिचा नेट पॅक संपत आला की आठवण कर मला . भरेन मी .." भारावून जाऊन त्या वेटरने त्याचा हात हाती घेतला . 
ती आश्चर्याने बघत होती.
"ऑनलाईन अभ्यासासाठी त्याच्या मुलीकडे स्मार्टफोन नव्हता.माझा जुना फोन दिला मी . पण फोन असला तरी नेट पॅक भरावेच लागते ..मग ते ही भरतो मी" सहज स्वरात म्हणत तो बाहेर पडला.
बाहेर येताच त्याने कोपर्यावरच्या फुलवालीकडे जाऊन हार घेतला आणि पैसे पुढे केले . 
"ताई ... काय म्हणते छोकरी ...??? जातेना क्लास ला नेहमी .. "?? त्याने आपुलकीने विचारले.
" हो भाऊ.... रोज जाते आणि सरांना तुमचा नमस्कार ही सांगते. पोरगी गुणांची आहे.पटापट शिकते सर्व आता आजूबाजूच्या मुलींनाही शिकवते ... "त्याने हसून हात जोडले.
ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती.
"कोण पोरगी ..?? कसला क्लास ...??? आणि हा हार का घेतोस तू .. कधी देवापुढे फारसे हात जोडलेले पाहिले नाहीत मी .." तिने पुन्हा डोळे वटारले.
तो हसला..
"अग काही नाही ग .. तिला एक दहा वर्षांची मुलगी आहे. मागे तिची कोणीतरी छेड काढली.तशी ही टेन्शनमध्ये आली.मला कळले.. मग आपला सुहास आहे ना....?? कराटे क्लास घेणारा..??त्याच्याकडे पाठविले तिला कराटे शिकायला.आता निदान कोणी छेड काढली तर चार फटके तरी मारेल आणि हार कधी तरी घ्यावाच लागतो देवासाठी . तो मी हिच्याकडूनच घेतो ...."त्याने सहजपणे हात झटकत सांगितले .
बोलता बोलता दोघेही घराजवळ आले."उद्या जायचे का शॉपिंग ला ...."?? तिने विचारले .
"उद्या नको... अजून तीन दिवस थांब .. मी गावी चाललोय तीन दिवस . तिथल्या मुलांना कॉम्प्युटर शिकवणार आहे मी . शिवाय तिथल्या काही वाड्यांमध्ये फिरणार आहे मी...".त्याने कान पकडत सांगितले .
"आणि म्हणूनच तू तुझे जुने कपडे तिथे देणार आणि नवीन घेणार.माझे मन राखायला .. हो ना .... ?? तिने कमरेवर हात ठेवून नजर रोखत विचारले ."सर्व माहितीय मला. सर्वांना खुश ठेवायला बघतोस . स्वतः दगड बनून.चल आल्यावर फोन कर मला ... ती वळून चालू लागली . 
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे नजरेआड होईपर्यंत पाहत बसला आणि स्वतःशी हसत घरात शिरला .टीव्ही वर नेहमीप्रमाणे ब्रेकिंग न्यूज चालू होत्या. अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या निषेधार्थ उद्या कॅडल मोर्चा निघणार होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, October 9, 2020

मित्रयादी

मित्रयादी 😊
फेसबुक सुरू करून झुक्याबाबाने आपल्यावर फारच उपकार केले असे म्हणायचे😀😀
 म्हणजे बघा ना....आधी लांबची मित्रमंडळी जवळ आली मग नातेवाईक... नंतर हरवलेल्या मित्रांचा शोध सुरू झाला...बरेचसे सापडलेही 🤔🤔 पण त्याचबरोबर मित्रांचे मित्रही आपल्या यादीत आले . काहींना आपण रिक्वेस्ट पाठविल्या तर काहींनी आपल्याला.
पण पुढे वेगळीच गंमत सुरू झाली. आता मित्रयादीत आले म्हणजे ओळख वाढविणे होणारच... 
आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी.. आठवणी शेयर करण्यासाठी... आपण आपली वॉल वापरू लागलो.🙄🙄
 काहींना आपली वॉल आवडू लागली .अर्थात आपल्याला ही काहींचे चेहरे तर ...काहींची वॉल आवडू लागली. काहींशी पर्सनली बोलून ओळख वाढवावी असे वाटू लागले आणि तिथेच मोठा घोळ झाला 😲
आता मित्रयादीत सुरू झाली हेरगिरी.काही याचा स्वार्थासाठी वापर करू लागले ..तर काही नुसते लक्ष ठेवून राहिले.😎😎😎
 म्हणजे कसे ते बघा हा ...आपला नेहमी भेटणारा गप्पा मारणार मित्र आपल्या लिस्टमध्ये आहे. पण तो आपल्या पोस्टला कधीच कॉमेंट देत नाही.. आहो लाईकही करत नाही. पण असतो मात्र दिवसभर ऑनलाईन .
तर आपल्याला लांबून ओळखणारे आहेत.तेही नेहमी दुसऱ्यांच्या पोस्टवर लाईक आणि कॉमेंट देत असतात पण आपल्या पोस्ट त्यांना कधीच दिसत नाहीत.😔😔
 बरेच पुरुष नेहमी स्त्रियांना स्वतःहून रिक्वेस्ट पाठवतात.काहीजणी त्या स्वीकारतात मग लगेच त्यांच्याशी ओळख वाढविणे सुरू होते. अर्थात प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो . रिक्वेस्ट स्वीकारलेली स्त्री बहुतेकवेळा रिस्पॉन्स देत नाहीत उलट त्यांना झापतात आणि ब्लॉक करतात . मोजक्याच काहीजणी रिस्पॉन्स देतात नशीब चांगले असेल तर दोघेही चांगले मित्र बनू शकतात .
 काही स्त्रियाच पुरुषांना रिक्वेस्ट पाठवतात.पुरुष खुश .. ताबडतोब तिच्या वॉलवर जाऊन तिच्या पोस्ट.. फोटो.. लाईक/ कॉमेंट करायला सुरुवात करतो . पण ही आपली ढिम्म.... तिला याची काही गंधवार्ताच नसते . ती विसरूनच गेलेली असते.... तो हैराण ... मग या बाईने रिक्वेस्टच का पाठवली ....?? बरे ही स्त्री फेसबुक वर नेहमी ऍक्टिव्ह बरे का ....पण तुमच्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ नाही....😊😊
 बरे असे का होते ....?? आता आपणच आपल्याला हा प्रश्न विचारतो . लिस्टमध्ये तर दोन हजार मित्र दिसतायत . त्यातील पन्नास टक्के तर प्रत्यक्षात भेटलेले . ऐंशी टक्के तर पूर्ण ऍक्टिव्ह . दहा टक्के पूर्ण झोपलेले . लोक चिडवू नयेत... मूर्ख समजू नये...म्हणून  अकाउंट उघडून बसलेले . तर दहा टक्के कधीकाळी वेळ मिळेल तेव्हा फेसबुक वर येणारे . तरीही आपल्या पोस्टवर जेमतेम दहा टक्केच मित्र येतात ....??  का ...?? काय कारण ...?? खरोखर आपल्या पोस्ट मित्रांना आवडत नाहीत ...?? की त्यांना आपल्या पोस्ट दिसत नाहीत ..?? की त्यांनी स्वतःची लिस्ट वाढविण्यासाठी आपला वापर केलाय ....?? असे बरेच प्रश्न आपल्या मनात येतात ..
कदाचित हे मित्र आपल्यावर हेरगिरीतर करीत नाहीत ना ...?? आपल्या पोस्टचा वैयक्तिक जीवनाशी काही संबंध असेल याचा शोध घेतायत ....??  आपल्या पोस्टमधून ते त्यांना पाहिजे तो अर्थ काढतायत ...??
मग आपणही विचार करू लागतो . झोपलेले मित्र कशाला लिस्ट मध्ये ठेवा. ज्यांना आपली कदर नाही त्यांना का लिस्टमध्ये ठेवा ...?? असा विचार करू लागतो आणि मग हळू हळू अश्याना लिस्टमधून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू होते .
आता यावर तुम्ही म्हणाल .. आपण लक्ष द्यायचे नाही अश्यांकडे . आपल्या आनंदासाठी लिहावे वगैरे वगैरे पण आम्ही खूप साधी सरळ माणसे आहोत हो .. आपल्या मनातील भावना शब्दात मांडून तो मित्रांसोबत शेयर करावा इतकीच आमची छोटी इच्छा असते .यात आमचे काय चुकते हो ....??
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, September 27, 2020

डॉटर्स डे

डॉटर्स डे
"देवा... आज पुन्हा उशीर होणार तर ...."भिंतीवरील घड्याळाकडे पाहत ती पुटपुटली मग रागारागाने आपल्या झोपलेल्या नवऱ्याकडे पाहिले आणि बाहेर पडली.
तिची सातची ड्युटी त्यामुळे सकाळी सहाला बाहेर पडावे लागे. ट्रेन मग बस..करत ती धावत ड्युटीवर जायची.
काल रात्री नवऱ्याने नवरेगिरी दाखवली त्याचा परिणाम उठण्यावर झाला. लग्नाला दहा वर्षे झाली तरी मुलबाळ नव्हतेच.त्यामुळे एकप्रकारचा तुसडेपणा तिच्या स्वभावात होता. 
ती सरकारी हॉस्पिटलच्या एका विभागात साफसफाईचे काम करायची.तिच्या तुसड्या स्वभावामुळे सर्वांच्याच नजरेतून उतरली होती.परिणाम तिच्या कामावर झाला. 
कोणीही नाक मुरडेल असा वॉर्ड तिला दिला होता. त्या वॉर्डमध्ये  मतिमंद आणि अपंग रुग्णमुली होत्या. त्या वॉर्डची आणि पेशंटची साफसफाई तिच्या गळ्यात पडली होती.
मग तीही आपला राग पेशंटवर काढायची.काम करताना सतत चिडचिड चालायची. तरी बरे त्या मुलींना हीचा राग कळत नव्हता.एकूण काय ....?? दोन्ही बाजूने छान चालले होते . 
मस्टरवर सही करून अंगावर अप्रोन चढवून ती वॉर्डमध्ये शिरली आणि तो परिचित गंध तिच्या नाकात शिरला. 
देवा....!!  तीन नंबरच्या पेशंटने आज अंथरुणातच.. शी....??? मस्तकात संतापाची तिडीक घुसून ती त्या मुलीकडे तरातरा चालत गेली.
 "किती वेळा सांगितले डायपर काढू नकोस ...ऐकत का नाहीस. तू राहशील दिवसभर अशीच हसत या घाणीत ..असे पुटपुटत तिने तिला उचलून बाजूला ठेवले . बेड स्वच्छ करून तिला आंघोळ घातली. ती मुलगी तोंडात अंगठा ठेवून खुदूखुदू हसत होती.
तीला नाही बेडवर ठेवत तर चार नंबर पेशंटने हाक दिली "मावशी ... टॉयलेट ....जन्मतः पोलियो झालेली ती मुलगी मतिमंद नक्कीच नव्हती पण तिला जागेवरून हालताच येत नव्हते . काही दिवसासाठी ऍडमिट झाली होती . दुसरीकडे जागा नाही म्हणून इथे ठेवले होते .
"येते ग बाई .. ती डाफरली..
" लवकर या नाहीतर इथेच होईल ..आणि मग तुम्हालाच करावे लागेल सर्व.." तिने हसत उत्तर दिले.
"खरे आहे ग पोरी.."असे म्हणत तिला अलगद उचलून टॉयलेटमध्ये घेऊन गेली .
प्रत्येकीची स्वच्छता आणि वॉर्डची साफसफाई करण्यात वेळ कसा निघून गेला ते समजलेच नाही तिला.
जेवणाची वेळ झाली तेव्हा आपला डबा उघडून जेवायला बसली इतक्यात एक नंबरच्या पेशंटने हातातील जेवणाचे ताट फेकून दिल्याचे पाहिले .
"मला नकोय हे .. चपाती भाजीच हवीय.. हे नकोय.." एक नंबर किंचाळून म्हणाली. इतरवेळी शांत असणारी ही मुलगी जरा काही मनाविरुद्ध झाले की संतापायची आदळआपट करायची . हातात मिळेल ती वस्तू फेकून द्यायची.हि जेवण सोडून तिच्याकडे धावत गेली . आपला डबा तिला देऊन शांत केले .पुन्हा तिला साफ केले . बेड स्वच्छ केला . मग पेशंटचे जेवणच तिने पोटात ढकलले .
"मावशी पत्ते खेळणार का ....?? पाच नंबर बेडवरची मुलगी म्हणाली . अर्थात तिच्या हातात काही नव्हते . ती रागारागाने तिच्याजवळ जाऊन बसली.
" मी नेहमी खेळते मामाशी....जो हरेल त्याने कपडे काढायचे असे ठरलंय आमचे . मीच हरते नेहमी .. आज तुम्ही खेळा  माझ्याबरोबर ..."
"देवा... ती मनात म्हणाली .. काय रे हे .... !! बरे झाले मला मूल नाही. काय ही अवस्था एकेकींची.." ती काही न बोलता तिच्या बाजूला बसली . बघ मी हरली आता काढू कपडे .. . 
"नको ग बाळा..मी सोडले तुला. चहा पिऊन खेळू "ती म्हणाली. नेहमीचे होते ते .
तितक्यात दोन नंबरची पेशंट जवळ आली.
"मावशी...सगळे कपडे घडी घालून ठेवले.अजून काही आहेत का घडी घालायला .ती अतिशय व्यवस्थित दिसत होती . टापटीप राहायची आणि हाच तिचा अवगुण होता. स्वमग्न असलेली ही मुलगी अचानक झटका आल्यामुळे इथे गेले पंधरा दिवस ऍडमिट होती .
पाहता पाहता ड्युटी संपायला आली तसे तिने प्रत्येकीजवळ जाऊन त्यांची पुन्हा तपासणी केली . स्वभावानुसार काहीतरी टोचून बोलणे सोडले नाही तिने.
 वॉर्डबाहेर पडणार इतक्यात चार नंबर ने हाक मारली "मावशी जरा थांबा की ...
त्रासिक चेहऱ्याने तिने तिच्याकडे पाहिले ."आता काय ...??  टॉयलेटला जायचे का ...??  तिने विचारले . 
"नाही पण एक काम आहे ...असे म्हणून खुर्चीवर बसलेल्या नर्सला खूण केली . 
नर्सने हसत एक बॉक्स टेबलाखालून काढला आणि तिच्यासमोर ठेवला . 
"चला या सर्वजणी.... आपल्याला केक कापायचा आहे ....असे म्हणतात सर्वजणी टेबलाभोवती गोळ्या झाल्या. चार नंबर तिचा आधार घेत व्हीलचेयरवर बसली .
बॉक्समध्ये एक छानसा केक होता आणि त्यावर लिहिलं होतं हॅप्पी डॉटर्स डे.
"मावशी...आम्ही तुमच्या मुलीच नाही का ..?? एक आई घेते त्याप्रमाणे काळजी घेता आमची. चिडचिड करता.... ओरडता... पण कर्तव्यात चुकत नाहीत तुम्ही .आम्ही तुमच्या लेकीचं आहोत.कराल का आज आमच्या बरोबर डॉटर्स डे साजरा....."??
डोळ्यातील अश्रू वाहून देत तिने सर्वांच्या हाती हात देऊन केक कापला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, September 26, 2020

अलक ....१६

अलक ....१६
बरेचजण त्याला हसरा सैतान म्हणायचे. तर काही खविस.टोचून बोलणारा..सतत दुसऱ्याची खेचत रहाणारा म्हणून तो प्रसिद्ध होता. हा माणूस सतत हसत कसा राहतो म्हणून लोक नवल करायचे.पण तो कसा आहे हे त्याच्या डोक्याखालील उशीलाच माहीत होते. आहो.. रोज रात्री त्याच्या अश्रूंने तीच तर भिजून जायची.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

Friday, September 25, 2020

गिफ्ट

गिफ्ट 
"तुझ्या वयाची मला दोन मुले आहेत.." ग्लासाने चियर्स करून तो हे नेहमी म्हणायचा. मी ही हसून मान डोलवायचो. कारण रंगात आला की शेवटी बिल तोच भरणार याची खात्री असायची आम्हाला.
 तो डिपार्टमेंटमधील सर्वात जुना वर्कर.
 फॅक्टरी चालू झाली तेव्हापासून तो आहे असे इतर विनोदाने म्हणायचे.
अशिक्षित होता ...पण सही करायला यायची . पगाराचे आकडे ही समजायचे.
कोणतीही मशीन रिपेयर करण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हते.
प्रॉब्लेम काय आहे आणि तो का आला हे त्याच्याइतके अचूक कोणी सांगू शकत नव्हते . तीन जणांची टीम होती त्यांची .
माझे आणि त्याचे पहिल्या दिवसापासून ट्युनिंग जुळले . मला तो साहेब कधीच म्हणाला नाही . अर्थात माझी ती अपेक्षा नव्हती म्हणा.
 पहिल्या दिवसापासून तो मला सांगत होता .." या पाच सहा वर्षात रिटायर्ड होईन.... पण माझी सर्व्हिस तेरा वर्षे झाली तरी तो रिटायर्ड झाला नव्हता. शेवटी रिटायर्ड झाला... तरीही कंपनीने त्याला कॉन्ट्रॅक्टवर ठेवले. 
त्याची मेमरी खूप शार्प होती . जवळच्या मित्र नातेवाईकांचे वाढदिवस तर लक्षात असायचेच . पण कोणते समान कुठे ठेवले आहे हेही त्याच्या डोक्यात पक्के बसलेले असायचे . म्हातारा वर गेला तरी स्वप्नात येउन कुठल्या भंगारात काय मिळेल हे सांगेल असे आम्ही गमतीत म्हणायचो .
आमच्यावर त्याचा खूप जीव होता . अनुभवाचा खजिना होता त्याच्याकडे .
शेवटी ती वेळ आली . कंपनीने त्याला जबाबदारीतून मुक्त केले . सर्वांचा हसत हसत निरोप घेतला त्याने. 
माझा हात हाती घेऊन म्हणाला." आठवण ठेव माझी"
 मी नेहमीसारखे हसून होय.. म्हटले.
मी दिलेले गिफ्ट त्याने घेतले नाही.
" देशील रे कधीही .. तुझ्याकडून असल्या गिफ्टची अपेक्षा नाही....." काही न कळून मी गप्प बसलो .
मला मिठी मारताना अलगद  पुसलेले डोळे बऱ्याच जणांनी पाहिले .
पुन्हा रुटीन सुरू झाले. काही दिवस त्याची कमी जाणवली.
पण म्हणतात ना कोण कोणासाठी थांबत नाही . काम तर मुळीच नाही..काही दिवस आमचा कॉन्टॅक्ट होता मग कामाच्या आणि इतर गडबडीत त्याला विसरून गेलो.
आता या लॉकडाऊनमध्ये अचानक त्याचा फोन आला . काहीसा थकलेला... चिंताग्रस्त...
 मी खुश झालो . लॉकडाऊनमध्ये हाचतर सहारा होता . छान गप्पा मारल्या आम्ही. पण कुठेतरी काही सतत खटकत होते . 
इतरांचे नंबर मागितले त्याने . त्यांना व्हाट्स अँप वापरता येत नाही म्हणून एसएमएस केले.
सध्या ते मुलीसोबत राहत होते . त्यानंतर त्यांचे वेळीअवेळी फोन सुरू झाले . सुरवातीला बरे वाटत होते पण नंतर थोडा कंटाळा येऊ लागला . तेच तेच बोलणे काहीसे असंबद्ध मग कधी कधी टीव्ही बघत असताना ,वाचन करताना फोन आला की कट करू लागलो. कधी त्यांचा मिस कॉल आला की मी फोन करायचो पण त्यांच्या लक्षात राहायचे नाही .
त्या दिवशी पुन्हा त्याने फोन केला . त्याच्या पेन्शनच्या काही अडचणी आल्या होत्या . चौकशी कर अशी विनती केली . पुन्हा काही वेळाने फोन ...पुन्हा तेच..
 आज पुन्हा त्याचा फोन... मी त्याला पेन्शनविषयी सांगितले..... तो विसरला होता.
 आता मात्र मी थोडा चिडलो .आवाज चढविला . इतक्यात फोनमधून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला.
" भाऊ... मी त्यांची मुलगी बोलतेय . सॉरी बाबांची मेमरी लॉस होते कधी कधी ..त्यामुळे काय बोलले ते विसरतात. पण अजूनही तुमची आठवण आहे त्यांना . खूप बोलत असतात तुमच्या विषयी .तुमचे गिफ्ट बाकी आहे म्हणे . कधीतरी नक्की द्याल असे म्हणतात . फक्त तुम्हालाच फोन करतात हो ते . बोलत राहा अधून मधून ....
 काही न बोलता मी फोन बंद केला . माझ्या डोळ्यातील दोन अश्रू मोबाईल स्क्रिनवर पडले . कदाचित हेच ते गिफ्ट होते ज्याची त्याला अपेक्षा होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, September 4, 2020

अलक ...१५

अलक...१५
कोरोनाचे निदान झाले आणि तो घरीच बसला . तेव्हापासून सतत फोनवर फोन सुरू होते.इतकेजण आपली चौकशी करतायत  सदिच्छा देतायत हे पाहून तो मनोमन खुश होता . चौदा दिवसानंतर तो दुकान उघडायला आला तेव्हा गिर्हाईक आधीच शांतपणे रांग लावून उभे होते .एका वाईनशॉपच्या मालकाची किंमत आज त्याला कळली होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, September 1, 2020

अलक ...१४

अलक.....१४
दरवर्षीचीप्रमाणे यंदाही तो भक्तांच्या आग्रहावरून आला होता.पण यावेळी त्याला भेटण्यासाठी कडक अटी होत्या. आपल्या भक्तांच्या चेहऱ्यावरील निराशा त्याला कळत होती . पण यावर्षीचे दहा दिवस मात्र खूपच शांततेत गेले होते . अगदी त्याला हवे तसे . खूप विचार करायला आणि भावी योजना आखण्यात त्याचा वेळ गेला होता . दहा दिवसानंतर तो आपल्या घरी पोचला तेव्हा चौदा दिवसासाठी त्याला कॉरनटाईन करण्यात आले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर