Sunday, March 7, 2021

एचएमएस युलिसिस ...अँलिस्टर मॅक्लिन

एचएमएस युलिसिस ...अँलिस्टर मॅक्लिन
अनुवाद....अनिल काळे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
आतापर्यंत आपण दुसऱ्या महायुद्धाच्या जमिनीवर लढल्या गेलेल्या शौर्याच्या कथा वाचल्या. त्यात जर्मनी तसेच मित्रराष्ट्रांच्या अतुलनीय शौर्याच्या कहाण्या होत्या . कमांडोच्या घातकी कारवाया होत्या तर थरारक अपहरणे होती. पण आज पहिल्यांदाच  समुद्रात लढलेले युध्द कसे असते याची माहिती या पुस्तकातून मिळते.
युलिसिस ब्रिटिश आरमारातील एक हलक्या जातीचे क्रूझर जहाज.सगळे तिला घोस्ट शिप म्हणत.कारण तिच्यासोबत नेहमी मृत्यू प्रवास करतो असे मानले जाते.तिची एकूण लांबी 510 फूट .वजन साधारण 5500 टन होते. एकूण साडेसातशे माणसे त्या बोटीवर होती. मालवाहू जहाजांच्या ताफ्याला संरक्षण देणे हे यूलिसिसचे प्रमुख काम.गेले शंभर दिवस युलिसिस सतत लढत होती. सैनिकांनी किनारा पहिलाच नव्हता . भयानक थंडी,बर्फाचा पाऊस ,वादळी वारे यामुळे सर्वच आजारी आणि अतिशय थकलेले होते.जहाजात शेकडो टन बर्फ साचत होते.जर्मनीची टेहळणी विमाने सतत डोक्यावरून घिरट्या घालीत होती. 
त्याचवेळी युलिसिसकडे 36 मालवाहू जहाजांना संरक्षण देण्याची कामगिरी आली. एफआर 77 या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्याला सुरक्षितपणे रशियाला पोचविण्याची जबाबदारी युलिसिसवर असते.
आता सुरू होतोय युलिसिसचा प्रवास. या प्रवासात त्यांचे दोन शत्रू आहेत. एक जर्मनी आणि दुसरा निसर्ग .भयानक थंडी,उपाशी नौसैनिक, प्रचंड वादळे,जीवघेणे घुके, थकवा ,आजारपण, आणि शिवाय या ताफ्याला हल्ला करणाऱ्या जर्मनीच्या यू बोटी, फायटर विमाने . या सर्व आघाड्यांवर युलिसिसचे नौसैनिक ,अधिकारी ,कॅप्टन मोठ्या धैर्याने सामना देतात.
रविवारी दुपारी सुरू झालेली ही सफर दुसऱ्या रविवारी सकाळी समाप्त होते. आठ दिवसातील युद्धातून एफआर 77 ताफ्यातील किती जहाजे रशियाला पोचली ....?? युलिसिसने आपली कामगिरी पार पाडली का ???  सागरीयुद्ध किती भयानक असू शकते हे या पुस्तकातूनच कळते.
दुसऱ्या महायुद्धावरील एक महान कादंबरी असे या पुस्तकाचे वर्णन केले जाते.

Monday, March 1, 2021

द स्पाय क्रॉनिकल्स

द स्पाय क्रॉनिकल्स 
रॉ आयएसआय आणि शांततेचा आभास ..
ए. एस. दुलत /असद दुर्रानी / आदित्य सिन्हा
अनुवाद....सुश्रुत कुलकर्णी 
मंजुल पब्लिशिंग हाऊस
अमर जितसिह दुलत.. 1999 ते 2000 या काळात रॉ चे सचिव होते 
जनरल असद दुर्रानी.. 1990 ते 1991..आय एस आय चे महासंचालक होते 
आदित्य सिन्हा... हे लेखक आणि पत्रकार 
खरे तर रॉचे सचिव आणि आयएसआयचे संचालक एकमेकांचे चांगले मित्र असू शकतात यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही . पण ते सत्य आहे आणि त्यांच्या काही अधिकृत बैठकी ही परदेशात झाल्या.त्यामध्ये त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आपली मते मनमोकळेपणानी मांडली.
या व्यक्तींना आपल्या देशातील महत्वाची गुपिते माहित आहेत इतकेच नव्हे तर आपले गुप्तहेर कुठे सक्रिय आहेत याची ही माहिती आहे. 
गेल्या दोन दशकांमध्ये काही देशाच्या माजी गुप्तहेरप्रमुखांनी एकत्र येऊन त्यांनी ट्रॅक टू बैठकांमध्ये आपापले विचार मांडले होते.
दोन्ही प्रमुखांनी इस्तंबूल नेपाळ बँकॉक  येथे बैठकी घेतल्या .यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली त्यात प्रामुख्याने 26/11... रॉ एजंट आणि पाकिस्ताना तुरुंगात असलेला कुलभूषण जाधव..., सर्जिकल स्ट्राईक...अजित डोभाल..काश्मीर प्रश्न ..ओसामा बीन लादेन ..तालिबान ...पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष... भारतातील पंतप्रधान .. खलिस्तान चळवळ...श्रीलंका नेपाळ मधील अशांतता अश्या विविध विषयांवर आपली मते मांडली आहेत.
पुस्तक वाचताना राजकीय भाषेचा कंटाळा येऊ नये म्हणून ते संवाद रुपात मांडले आहेत.
वाचकांना ह्या पुस्तकात काही थरारक आणि सनसनाटी वाचायला मिळेल अशी अपेक्षा ठेवली तर ते चुकीचे ठरेल . कधी कधी राजकारणी भाषेचा कंटाळा येतो.

गोल्डा एक अशांत वादळ .... वीणा गवाणकर

गोल्डा एक अशांत वादळ .... वीणा गवाणकर
इंडस सोर्स बुक 
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांवर अनन्वित अत्याचार झाले. युरोपातील बऱ्याच देशातून त्यांना परागंदा व्हावे लागले . पण या लोकांनी चिकाटी सोडली नाही . जी भूमी मिळेल ती आपली मानून कष्ट केले . पण काही लोकांना स्वतःचे राष्ट्र हवे होते. आपला देश जिथे फक्त आपले वर्चस्व असावे यासाठी काही लोक लढा देत होते .त्यातीलच एक कणखर स्त्री म्हणजे गोल्डा मेयर .
ज्यू हे पूर्वीपासूनच अरबांचे शत्रू . अरबांच्या आठ राष्ट्रांनी इस्त्रायलला चहूबाजूनी वेढले आहे. संधी मिळेल तेव्हा त्यांनी इस्त्रायलवर हल्ले केले .पण हे ज्यूचे छोटे राष्ट्र सर्वाना पुरून उरले.जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर संघटना मोसाद त्यांनी स्थापन केली. 
हे चरित्र आहे इस्रायलच्या उभारणीत मोठा वाटा असलेल्या परराष्ट्रमंत्री .. श्रम रोजगार मंत्री पंतप्रधान अश्या विविध भूमिका खांद्यावर घेऊन वाटचाल करणाऱ्या गोल्डा मेयर या महिलेचे .
गोल्डा मूळची युक्रेन ज्यू . इतरांसारखे तिच्या वडिलांनीही अमेरिकेत स्थलांतर केले. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय . ती पहिल्यापासूनच बंडखोर स्वभावाची .डेनव्हरमध्ये ज्यू विद्वानांच्या चर्चा चालायच्या त्याला ती उपस्थित असायची. यामध्ये स्वतंत्र यहुदी राष्ट्राची संकल्पना निर्माण होत होती. डेव्हिड बेन गुरियॉन यांचे नेतृत्व  आणि थोर जैव रासायनिक शात्रज्ञ डॉ. वाइझमन यांचा पाठिंबा  हे तिला जवळून पाहता आले आणि तिने या चळवळीत स्वतःला झोकून दिले. साधी कार्यकर्ती ते पंतप्रधान हा गोल्डाचा प्रवास विलक्षण आहे . वीणाताईनी सोप्या भाषेत तिचे चरित्र उलगडून दाखविले आहे .अधिक काही लिहिण्यापेक्षा हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असेच मी म्हणेन .

असुर...एका पराभूताची गोष्ट...आनंद नीलकांतन

असुर...एका पराभूताची गोष्ट...आनंद नीलकांतन
अनुवाद.....हेमा लेले
मंजुल पब्लिशिंग हाऊस
ही कथा आहे प्रमुख महाकाव्यातील सर्वश्रेष्ठ खलनायकाची अर्थात रावणाची.रणांगणात मृत्यूशय्येवर असताना कोल्हे... कुत्रे त्याच्या शरीराचे लचके तोडताना त्याने आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्याने आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला आहे.खरे तर लेखकाचा हा रावण  संपूर्ण पुस्तकात खूपच दुबळा..हतबल.. निराश वाटतो. 
लेखकाची कल्पनाशक्ती कशी बहरू शकते हे या पुस्तकातून दिसते. रामायणातील आपल्याला माहीत असलेल्या घटनांशी विसंगत आणि धक्कादायक गोष्टी यात आहेत.
तुम्हाला ठाऊक असलेले सर्वमान्य रामायण मनात ठेवून हे पुस्तक वाचाल तर फारच धक्के बसतील.
रावणाला दशमुख का म्हटले जाते ...?? आपल्यात बुद्धिमत्ता,राग,गर्व,द्वेष,दुःख,लोभ,आनंद,भीती,स्वार्थ..अभिलाषा आणि महत्वाकांक्षा  हे गुण असल्यामुळे आपण परिपूर्ण आहोत असे तो मानतो. थोर राजा महाबली त्याला बुद्धिमत्ता सोडून इतर गुणांचा त्याग करण्यास सांगतो.पण तो पावित्र्याचे उसने अवसान आणत नाही .जो माणूस म्हणून जसा असायला हवा तसाच आहे .
यात भद्र नावाची अजून एक व्यक्तिरेखा लेखकाने रंगविली आहे.भद्र एक सामान्य असुर सैनिक आहे . ज्याने आपली पत्नी आणि मुलगी देवांविरुद्ध लढताना गमावली आहे.आता तो एक गलिच्छ किळसवाणा दारुड्या भिकारी आहे . पण रावणाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टीचा साक्षीदार आहे . किंबहुना रामायणात जी महत्वाची वळणे आहेत त्यात हा प्रमुख आहे. तो रावणाच्या शयनगृहात ही शिरतो. रावण त्याचा तिरस्कार करतो पण आपल्या आयुष्यातून टाळू शकत नाही.
लंकेचा राजा कुबेर हा रावणाचा सावत्रभाऊ.तर रावण आपल्या कुंभकर्ण ,विभीषण, आणि कुरूप बहीण शूर्पणखा  आणि आई यांच्या समवेत दारिद्र्याचे जिणे जगतोय. मामा मारीच त्यांना जमेल ती मदत करतो. एकदा कुबेराच्या गाई चोरताना रावण आणि कुंभकर्ण पकडले गेले तेव्हाही मारीचने तो आळ स्वतःवर घेतला आणि शिक्षा भोगली.रावणाची आई असुर जमातीतील होती तर वडील ऋषी होते. विभीषण हा वडिलांच्या वळणार गेला होता. त्याला वेद धार्मिक ग्रंथात रुची होती .तो अतिशय शांत आणि घाबरट होता. तर कुंभकर्ण हा कुरूप लठ्ठ, ठेंगू केसाळ कुरळ्या केसांचा असुर. तो नेहमी अंमली पदार्थांच्या नशेत झोपून असायचा .शूर्पणखा काळीकुट्ट ,सरळ केसांची,पिंगट डोळ्यांची आहे . स्वतः रावण गोरा दाट कुरळ्या केसांचा आणि  काळ्या डोळ्यांचा आहे.
रावणाने कुबेरावर हल्ला करून लंका ताब्यात घेतली.त्यात भद्राचा सिहांचा वाटा होता.खरे तर अयोध्या रावणाच्या खिजगणतीत ही नव्हती. एक अतिशय गरीब छोटे राज्य म्हणून त्याने आयोध्याकडे पाहिले. तेथील प्रजा अतिशय गरीब ,घाणेरडी होती. ती रस्त्यावरच आपले नैसर्गिक विधी करत होती. रस्ते अरुंद होते त्यातच कचराकुंड्या होत्या. त्यांचा राजवाडा ही जीर्ण मोडकळीस आलेला होता.त्याने अयोध्येचा सहज पराभव केला.अयोध्येचा राजा अनर्ण्य याचा रावणाने वध केला. त्याच लढाईत रावणाची भेट वेदवती नावाच्या ब्राह्मण विधवेशी झाली. रावण तिच्या प्रेमात पडला पण तिने नेहमीच रावणाची निर्भत्सना केली. तरीही रावण तिच्या प्रेमात होता.
मंदोदरीपासून रावणाला पहिली मुलगी झाली. पण ज्योतिषाने ही मुलगी असुरांचा नाश करेल अशी भविष्यवाणी वर्तवली आणि तेव्हापासून सर्व नातलग रावणाशी विचित्र वागू लागले . एक दिवस संधी मिळताच त्यांनी वेदवती आणि रावणाची मुलगी भद्राच्या स्वाधीन केली. यात वेदवती मारली गेली पण ती छोटी मुलगी बचावली .एका राजाने तिला दलदलीतून बाहेर काढले.
हा भद्र जगण्यासाठी अनेक जागा बदलत गेला. तो आचारी होता ,तो धोबी होता. त्याची रखेल रावणाच्या दरबारात दासी होती. रावणापासून तिला एक पुत्र झाला.तो शेवटपर्यंत मेघनादाशी प्रामाणिक होता. 
हनुमानाच्या आगमनाची खबर ही भद्रानेच दिली.रावणाच्या मृत्यूसमयी तोच त्याच्या जवळ होता. मी माझ्यापरीने याचा सूड घेईन असे आश्वासन त्याने रावणाला दिले. पुढे तो अयोध्येत राहण्यास आला . आता अयोध्येत वर्णव्यवस्था सुरू होती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी व्यवस्था होती. भद्राने आपल्या रखेलीसमवेत धोब्याचे काम करण्यास सुरुवात केली. दिवसभर काम करून संध्याकाळी आपल्या रखेलीला मारहाण करायची शिव्याशाप द्यायचे हेच त्यांचे काम. त्यातूनच पुढे एक महत्वाची घटना घडली त्याचा परिणाम रामाच्या आयुष्यावर झाला .
हे अतिशय वेगळे रामायण आहे.रावणाच्या नजरेतून घडलेले. यात रामाला काहीच स्थान नाही .तर सीतेला महत्व आहे. भद्रसारख्या शूद्राचे समाजात किती महत्वाचे स्थान असते हे दाखविले आहे .
एक वेगळे पुस्तक म्हणून नक्कीच वाचावे .

Tuesday, February 16, 2021

असे पाहुणे येती

असे पाहुणे येति
"भाऊ....." अशी ती परिचित हाक कानावर आली आणि भीतीने पोटात गोळा उठला.पण यावेळी स्वयंपाकघरातून भांडी पडल्याचे आवाज ऐकू आले नाहीत याचे आश्चर्य वाटले.म्हणजे संतोष दिघेचे येणे हिला मान्य असावे.
आता हा संतोष दिघे कोण ....?? स्वतःला साहित्यिक समजणारा आणि मालिका लिहिणारा माझा वर्गमित्र.वर्गात होता म्हणून वर्गमित्र म्हणायचे असा विक्रम म्हणतो. घरच्यांवर उपकार करायचे म्हणून हा शाळेत यायचा हे माझे मत. त्याला लिखाणाची आवड लहानपणापासूनच होती बरे का ....मुलींना प्रेमपत्र लिहिण्यात याचा हातखंडा. पण याने लिहिलेल्या प्रेमपत्रामुळे अनेकांचे संसार सुरू होण्याआधीच वाचले. असे विक्रमाची बायको वनिता म्हणते. दुर्दैवाने याने विक्रमला प्रेमपत्र का लिहून दिले नाही असे ही दोघांच्या भांडणात बऱ्याचवेळा म्हणते .
असो ... तर वेळीअवेळी घरी टपकणे ही त्याची जुनी सवय. सौ.लाही ते माहीत आहे कारण लग्नाच्या पहिल्या रात्री यानेच आमच्या बेडरूमचा दरवाजा वाजवून मला उठवले होते आणि भाऊ सावकाश असा सल्ला देऊन निघून गेला होता. तेव्हापासून सौ.हा घरात शिरला की भांडी आपटून निषेध व्यक्त करत असते.
दिघ्या घरात शिरताच त्याचे थंड पाण्याने स्वागत झालेले पाहून मी चक्रावलो. माझ्याविरुद्ध काही कट शिजणार याचा संशय येऊ लागला .
"दिघ्या.....अचानक इकडे कुठे ...?? सिरीयल बंद केल्यास का ...?? मी नजर  रोखूनच विचारले.असे मी नेहमी त्याला विचारतो.कारण कोणत्याही सिरियलमध्ये संतोष दिघे हे नाव कधीच वाचले नाही.
"वहिनीने बोलावले आहे ... "माझ्याकडे छद्मीपणे पाहत त्याने उत्तर दिले.
"हो....मीच बोलावले होते पण असे अचानक येतील याची कल्पना नव्हती. सौने त्याच्या पुढ्यात कांदाभजीची प्लेट ठेवली. ते पाहतच माझा राग थोडा निवळला . कांदाभजी आज खारट झाली होती म्हणून मी चिडलो होतो आणि ती फेकून द्यायचा हुकूम सौ ला केला होता. पण अन्न वाया जाऊ नये या सौच्या  धोरणामुळे तिने ती डिश संतोषच्या पुढ्यात ठेवली .
"भाऊजी .... "मोठ्या कष्टाने आपला आवाज मवाळ करीत सौ.म्हणाली .. माझी भाची आहे गावाला . तिच्या कामाचे बघा ना ...तिला एखाद्या सिरियलमध्ये काम द्या.."
"देवा .... शेवटी हेच काम तर...." बिचारी इतकी वर्षे माझ्यासोबत राहून ह्या दिघ्याला ती ओळखू शकली नाही याचे दुःख झाले मला .
"हात्तीच्या....!!  बस इतकेच ....तिचे काम झालेच म्हणून समजा. एका नवीन सिरियालमध्ये तिला नायिकेचा रोल देतो... "भजी तोंडात टाकून दिघ्या सहज स्वरात  म्हणाला .
 "पण भाऊजी ती थोडी तोतरी बोलते...."सौ चाचरत म्हणाली .
"त्यात काय...?? आपण तिच्या तोतरेपणावर कथा लिहू..." दिघ्या भजीला जागून म्हणाला .
"दिसायलाही इतकी खास नाही.... थोडी काळी आणि जाड.... "सौ.खाली आवाजात म्हणाली.
"असुदे.. नेहमीच नायिका गोऱ्या सडपातळ सुंदर हव्या असा नियम नाही.... आणि तसेही परडे परवडत नाही .त्यापेक्षा अश्या मुलींना नायिका करून चारशे भागाची एक मालिका बनेल . करून टाकू एक सिरीयल ..."पाण्याचा एक घोट घेत दिघ्या चेहऱ्यावरची रेषाही न हलविता म्हणाला .
मानलं दिघ्या तुला ..... मी मनात म्हटले. इतकी खारट भजी खाऊन चेहरा कोरा ठेवणे फक्त संतोष दिघेलाच जमू शकते हे आज पुन्हा पटले.
"वहिनी तुला काम करायचे आहे का ..??? संतोषने सौला डायरेक्ट विचारले.तसे सौचे डोळे मोठे झाले .
"अय्या काहीतरीच काय ..... थांबा मी सरबत घेऊन येते.."असे म्हणून ती धावत आत गेली.
हे अति झाले ... ते सरबत मी कॉकटेलसाठी ठेवले होते .आता विक्रम शिव्या घालणार मला ...मी मनात चरफडलो.
"भाऊ ... तू ही काम कर पाच दहा एपिसोडमध्ये....".संतोष दात कोरत म्हणाला. 
"काहीतरीच काय....?? मला कुठे अभिनय करता येतो.." मी उत्तरलो. 
"अरे... तुझा चेहराच केविलवाणा आहे . एका रंजलेल्या गांजलेल्या माणसाची भूमिका तुला फिट आहे. तोच चेहरा घेऊन वावरायचे . हल्लीच्या सिरीयल बघत नाहीस का ....?? मेकअप तरी करतात का सिरियालमधील पात्रे...?? संतोष हसत म्हणाला आणि सौ च्या हातातील ग्लास ओढून घेतला .
"ठरले तर ..... वहिनी तुमच्या भाचीवर मी सिरीयल लिहायला सुरुवात करतो. पाहिले पन्नास भाग तर तिच्या तोतरेपणाच्या विनोदावर जातील. ती दिसायला सुंदर नाही म्हणून तिची हेटाळणी होईल .पुढील पन्नास भागात तिचे प्रेम.. लग्नाच्या गोष्टी.नंतर पन्नास भाग तिला सासरचा त्रास....मग पुढे तिचा लढा यावर पन्नास भाग असे करून सिरीयल टीआरपी प्रमाणे वाढवत नेऊ .आता मी निघतो यापुढे येणे होईलच ...."सरबत संपवून दिघ्या उठला.
"हो नक्की या ... आणि यापुढे कधीही आलात तरी जेऊनच जायचं ...."सौ. आग्रहाने म्हणाली
पुन्हा एकदा माझ्याकडे पाहत छद्मीपणे हसत संतोष दिघे घरातून बाहेर पडला ते कधीही येऊन जेवायची परमिशन घेऊनच .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, February 12, 2021

हग डे

हग डे
खाडकन आवाज येताच आख्या बाजाराचे लक्ष त्या दिशेने गेले.भर गर्दीत ती संतापून त्याच्याकडे पाहत होती आणि तो खाली मान घालून उभा होता.
"तुझी लायकी तरी आहे का माझ्याकडे पहायची...?? आणि तरीही आज हॅपी हग डे म्हणत मिठी मारायची हिंमत केलीस...?? लाजशरम काही आहे का ...?? की दिसली तरुणी की मिठी मारायला धावत यायचे. इथे भर रस्त्यात चपलेने मारेन तुला.. पुन्हा माझ्या वाट्याला गेलास तर ..संतापाने थरथरत ती बोलत सुटली होती.
टाईट जीन्स त्यावर मॅचिंग शॉर्ट कुर्ता तिच्या गोऱ्या शरीराला खुलून दिसत होता. पाहणारा नक्कीच पुन्हा वळून पाहिलं अशी तिची शरीरयष्टी होती. संतापाने तिचा चेहरा लाल झाला होता आणि त्यातही ती अजून सुंदर दिसत होती.
 तो तिच्यासमोर केविलवाणा चेहरा करून उभा होता. साधी ट्राऊझर त्यावर गोल गळ्याचा साधा टी शर्ट .पायात चप्पल . साधारण बावीस वर्षाचा असेल. मित्रांसोबत नेहमी त्या नाक्यावर उभा असायचा . पण कधी कोणी त्याला थट्टा मस्करी करताना पाहिले नव्हते .
ती बऱ्याचवेळा बाजारात यायची . तिला कधीच यांचा त्रास नव्हताच. त्यांच्या जवळून जाताना ओळखीची चमक तिच्या डोळ्यात यायची . बस इतकेच ....
पण आज त्याने अचानक समोर येऊन हॅपी हग डे म्हणत तिला मिठी मारली आणि तिचा तोल गेला. त्याच रागात एक सणसणीत गालावर ठेवून दिली तिने आणि मग तोंड सोडून संतापाला वाट करून दिली होती.
काही वेळाने ती निघून गेली आणि बाजार पूर्वीप्रमाणे सुरू झाला . आताच काही घडलंय याची नावनिशाणीही शिल्लक नव्हती. 
तो रुबाबात आपल्या मित्रांसमोर उभा राहिला."चला.. काढा पाच हजार.. मी पैज जिंकलोय." मित्रांनी काही न बोलता पाच हजार काढून त्याच्या हातात दिले.
"उगाच पैज लावू नका.सध्या कोणतीही पैज काहीही करून जिंकायची अशी परिस्थिती आहे माझी..."तो हसून म्हणाला .
व्हॅलेंटाईन डे सुरू झाले होते. रोज कोणतातरी डे येत होता. आज हग डे.….
गमतीत त्याच्या मित्रांनी पैज लावली होती. आपल्या आवडत्या मुलीला जो हग करेल त्याला पाच हजार रु मिळणार होते.
ती नेहमी दिसायची म्हणून आज त्याने हे धाडस केले होते.अर्थात त्याचा परिणाम अपेक्षेपेक्षा जास्तच गंभीर झाला होता.
संध्याकाळी तो घरात शिरला.नेहमीसारखेच तणावग्रस्त वातावरण होते. ते नसते तर त्याला आश्चर्य वाटले असते. आजी आजोबा कोपऱ्यात बसून हळू आवाजात गप्पा मारत होते. तर बाप शांतपणे शिलाई मशीन चालवत होता.
तो आजीआजोबांच्या समोर उभा राहिला . खिशातून पाकीट काढून त्याने दोघांसमोर ठेवले. 
"तुमची अष्टविनायक यात्रेची तिकिटे. परवा सकाळी निघायचे आहे तुम्हाला. यात्रा कंपनी सगळी काळजी घेईल तुमची....."
एका क्षणात कुजबुज बंद झाली .शिलाई मशीनही पटकन थांबली.थरथरत्या हाताने आजोबांनी ते पाकीट उघडले.आत यात्रा कंपनीची पावती होती. संपूर्ण यात्रा पाच हजारात होती.डोळ्यात अविश्वास आणून आजी आजोबा त्याकडे पाहत बसले.
"आजोबा .... कित्येक वर्षे अष्टविनायक यात्रेचे स्वप्न बघताय....यावर्षी मनात ठरवून ठेवले होते काहीही करून तुमचे हे स्वप्न पूर्ण करायचे. आज पैसे मिळाले आणि ताबडतोब बुकिंग करून आलो.मस्तपैकी फिरून या दोघे .व्हॅलेंटाईन डे साजरा करा .... च्यायला आयुष्यात आहे काय अजून ... " डोळ्यातील अश्रू लपवत तो मोठ्याने म्हणाला.
खुश होऊन आजी आजोबाने त्याला जवळ घेतले . हग डे म्हणजे नक्की काय ते आता त्याला कळले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, February 4, 2021

लॉक ग्रिफिन......वसंत वसंत लिमये

लॉक ग्रिफिन......वसंत वसंत लिमये 
लॉक याचा अर्थ तलाव . हा स्कॉटलंड मधील पौराणिक भाषेतील शब्द .तर ग्रिफिन म्हणजे गरुडाचे डोके आणि सिहांचे शरीर लाभलेला प्राणी.अनेकदा येशूची तुलना गरुड आणि सिहाशी केली जाते. 
लॉक ग्रिफिन ही अमेरिकेतील एक गुप्त कमिटी आहे.अमेरिकेच्या दूरच्या भविष्यातील हितसंबंधांचे रक्षण करणे हे त्या कमिटीचे काम.निवृत्त झालेले उच्चपदस्थ सरकारी अधिकारी या कमिटीचे सदस्य .यांची ताकद इतकी अफाट आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही याना सॅल्युट करतात. सध्या लॉक ग्रिफिनला मूळ भीती भारतापासून आहे . भारताचा विकास होणे त्यांना परवडणार नाही.आणि त्यासाठीच त्यांनी ऑपरेशन कोब्रा ही मोहीम आखली होती.
सौभद्र कानिटकर मुंबई आयआयटीत शिकत असताना अचानक त्याला वडिलांच्या खुनाची बातमी देणारा फोन आला. त्यातून तो सावरत नाही तर दोन दिवसांनी त्याचे काका धनंजय आणि काकू नेहा यांचा नैनिताल येथे अपघाती मृत्यू होतो.अमेरिकेत स्थायिक असलेले काका काकू भारतात कधी आले...?? ते नैनितालला कसे गेले ....?? त्यांचा मृत्यू संशयास्पद होता. सौभद्रचे काका सायबर सिक्युरिटीत एक्सपर्ट होते.
नऊ वर्षानंतर सौभद्र आपल्या वडिलांचा खून आणि काका काकूंचा दुर्दैवी अपघात यामागे काय रहस्य आहे त्याचा तपास करण्याचे ठरवितो .त्यासाठी त्याला अमेरिकन मैत्रीण ज्युलिया साथ देते. 
दोघेही रहस्याचा तळाशी पोचतात आणि भयानक सत्य समोर येते.
काय आहे हे सत्य ....?? 
सुरवातीला अतिशय संथपणे चालणारी ही कादंबरी शेवटी एक स्पीड पकडते आणि आपण त्यात गुंतून जातो .