Wednesday, June 5, 2024

Knock at the Cabin

Knock at the Cabin
नॉक ऍट द केबिन 
एरीक आणि आंद्रु एक गे कपल . त्यांनी वेन नावाची मुलगी दत्तक घेतलीय. वेन आता आठ वर्षाची होईल.
आता ते तिघेही जंगलातील आपल्या छोट्या घरात सुट्टीसाठी आलेत. जंगलात फिरत असताना वेनला लिओनार्द भेटतो. तो एक शिक्षक आहे आणि लहान मुलांना शिकवतो . तो वेनशी मैत्री करतो आणि तिला सांगतो आम्ही चारजण तुझ्या घरी येणार आहोत.वेन घाबरून घरी येते आणि आपल्या दोन्ही वडिलांना ही गोष्ट सांगते.
अचानक दरवाजावर टकटक होते.लिओनार्द त्यांना सांगतो आम्हाला घरात घ्या पण एरीक आणि आंद्रु त्यांना आता घेत नाही. नाईलाजाने ते आपल्या हातातील हत्याराने दरवाजा तोडून आत येतात. रेमंड एक बार टेंडर आहे.सब्रीना नर्स आणि अद्रियन कुक आहे. 
हे चारही एकमेकांना ओळखत नाही . ते पूर्वी कधीही भेटलेले नाहीत .पण याना काही सारखेच भास होतात म्हणून ते एकत्र आलेत असे लिओनार्द एरीक आणि आंद्रुला सांगतो. 
ते सर्व त्या दोघांना बांधून ठेवतात .त्यांच्या जखमेवर मलमपट्टी करतात. जग विनाशाच्या काठावर आलंय आणि तुम्हीच जगाला विनाशपासून वाचवू शकाल असे लिओनार्द त्यांना सांगतो.त्यासाठी आम्ही तुम्हाला मारणार नाही पण तुमच्या तिघांपैकी एकाला दुसऱ्याच्या हातून मरावे लागेल अशी अट आहे.
जगाच्या विनाशाची सुरवात झालीय हे बातम्यांमार्फत त्यांना दाखवून देतो .जगात काही ठिकाणी सुनामी आलीय तर काही ठिकाणी भूकंप होतायत असे बतम्यांमधून दिसून येते.
एरीक आणि आंद्रु यांचा यावर विश्वास बसत नाही .ते नकार देतात .जगाला विनाशपासून वाचविण्यासाठी आमच्यातील एक का मरेल ? यावर त्यांचा विश्वास बसत नाही .
लिओनार्द आणि त्याचे साथीदार खरे बोलतायत का ? 
एरीक, आंद्रु , वेन यापैकी एकाची आहुती खरोखर जगाचा विनाश टाळेल ? लिओनार्द आणि त्याचे साथीदार नक्की कोण आहेत ?
एम.नाईट श्यामलनने आतापर्यंत अनेक गूढ रहस्यमय चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे .त्यातील हा एक चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Monday, June 3, 2024

जन गण मन

जन गण मन
Jana Gana Mana
कॉलेजची लाडकी  तरुण प्रोफेसर  साबा मरियमचे जळलेले प्रेत सुनसान रस्त्यावर आढळले आणि सगळे कॉलेज हादरले.पोलिस आणि मीडियाने हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झालाय असेही जाहीर केले. संपूर्ण कॉलेज त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी गांधी चौकात जमले पण तिथेही पोलिसांनी निर्दयपणे त्यांच्यावर लाठीचार्ज केला.आता तर देशच पेटला .राज्य सरकारने  एसीपी सज्जनकुमार सारखा हुशार अधिकारी या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी नियुक्त केला .
सज्जनकुमारने तीस दिवसात आरोपींना कोर्टात हजर केले जाईल असे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आणि दिवसरात्र मेहनत करून त्याने चार आरोपींना पकडले .
पण राजकीय हस्तक्षेपामुळे ऐनवेळी त्याच्याकडून केस काढून घेण्यात आली . आरोपींनाही दुसऱ्या कस्टडीत हलवा असा आदेश दिला गेला.सज्जनकुमारला वेगळीच शंका आली आणि त्यातच आरोपींना पकडले गेले ही बातमी मीडियात लिक झाली.
सज्जनकुमार स्वतः आरोपींना दुसऱ्या कस्टडीत घेऊन जायला निघाला आणि मध्येच त्यांचे एन्काऊंटर केले. आरोपींचे एन्काऊंटर झालेले ऐकून संपूर्ण राज्य खुश झाले.एसीपी सज्जनकुमारच्या मागे राज्यातील स्त्री वर्ग आणि समाज उभा राहिला .संपूर्ण पोलीस दल ही सज्जनकुमारच्या पाठीशी होता. पण केंद्रीय मानवअधिकारकडून कोर्टात  नकली एन्काऊंटरची केस उभी राहिली आणि सज्जनकुमारला आरोपी म्हणून उभे केले गेले.पण....
 तिथेच चित्रपटाचा मध्यंतर झाला .
मध्यंतरानंतर  कोर्टात आरोपी सज्जनकुमार विरुद्ध खटला सुरू झाला.एक अनोळखी, एका पायाने लंगडत चालणारा अरविंद स्वामी  नावाचा वकील सज्जनकुमार विरुद्ध खटला लढतोय.
पण हे इतके सरळ साधेसोपे नाही .खरा चित्रपट तर मध्यंतरानंतर सुरू होतो .आपल्याला अनपेक्षित धक्क्यावर धक्के मिळत जातात आणि हे धक्के चित्रपटाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत आहेत.
एक श्वास रोखून ठेवणारा हा चित्रपट मल्याळम भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .पण हिंदी सबटायटल्समुळे आपल्याला समजण्यात कोणतीही अडचण येत नाही.एका बैठकीत पाहता येईल असा हा चित्रपट आहे.

शिन्डलर लिस्ट

Schindler's List
शिन्डलर लिस्ट
ऑस्कर शिन्डलर मूळ झेकोस्लोवासियाचा जर्मन नाझी पार्टी मेम्बर .त्याला दुसऱ्या महायुद्धाचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी करायचा आहे म्हणून तो क्रकोवला आलाय.
क्रकोवच्या छावणीत भरपूर  पोलिश ज्यू आहेत. ऑस्करला तिथे तपेली आणि तवे बनविण्याचा कारखाना काढायचा आहे त्यासाठी त्याने तिथल्या जर्मन अधिकारी आणि शिपायांना मोठमोठ्या लाच दिल्या आहेत. त्याला ज्यूचा पैसा आणि ज्यू कामगार वापरून पैसे कमवायचे आहेत.
ऑस्कर रंगेल आहे .त्याची राहणीमान उच्च दर्जाची आहे.जिथे जाईल तिथे तो आपली छाप पडतो .
इट्झहक स्टर्न हुशार ज्यू अकाउंटंट .ऑस्कर त्याला बरोबर हेरतो आणि आपल्याकडे ठेवतो.त्याच्या मदतीने तो ज्यू वर्कर आणतो .पैसे उभारतो आणि कारखाना सुरू करून लाखो रुपये कमावतो.
पण एके दिवशी अमोन गोथ हा नाझी अधिकारी त्या छावणीत येतो आणि सगळे बदलून टाकतो.तो इच्छा झाली की कोणत्याही ज्यूला गोळी घालून ठार मारतो.त्यांच्यामुळे ऑस्करचा कारखाना बंद झाला.पण ऑस्करने त्याच्याशीही मैत्री केली.
क्रकोवची छावणीत आता इतर देशातूनही ज्यू येऊ लागलेत.त्यामुळे वृद्ध ज्यू स्त्री पुरुषांना गॅस चेंबरमध्ये पाठवायची वेळ झालीय.काही दिवसातच त्यांना वेगळे करण्यात येणार आहे .आता ऑस्करच्या मनात माणुसकी जागी झाली.त्याने गोथला विनंती करून ,लाच देऊन काही ज्यूना आपल्या सोबत कारखान्यात घेऊन जायची विनंती केली .गोथने परवानगी देताच त्याने ठराविक ज्यूची लिस्ट बनविण्यास सुरू केली .काही ज्यू इतर छावणीत होते त्यांना तिथल्या अधिकाऱ्यांना योग्य लाच देऊन परत आणण्यात आले.
एकूण अकराशे ज्यूची लिस्ट बनवून त्यांना ऑस्कर शिन्डलरच्या ताब्यात देण्यात आले .मृत्यूच्या दाढेतून एकूण अकराशे ज्यूना वाचविण्यात ऑस्कर कसा यशस्वी झाला ते चित्रपट पाहूनच कळेल.
स्टीव्हन स्पिलबर्गचा हा चित्रपट पाहून आपण अस्वस्थ होतो. काही प्रसंगी आपल्याला उठून जावेसे वाटते पण आपण जाऊ शकत नाही.आपल्या देशातून ,आपल्या घरातून काही न घेता हुसकावून लावले तर काय अवस्था होईल याची जाणीव हा चित्रपट पाहताना होते.त्याचवेळी ऑस्कर हा एक आशेचा किरण घेऊन येतो.तो स्वार्थी आहे पण माणूस आहे .भयंकर उकड्यात एका रेल्वेच्या बोगीत शेकडो ज्यू कोंबले असताना त्यांच्यावर पाण्याची फवारणी करणारा ऑस्कर ,त्यासाठी त्याने कित्येकांना वेगवेगळ्या प्रकारे लाच दिलीय. लिस्टमधील ज्यूना एकत्र करताना हातातील घड्याळ ,सिगारेट केस ,लायटर ,वाईन देऊन त्यांना एकत्र आणलय.
लियाम निसोन या त्यावेळच्या नवोदित अभिनेत्याला ऑस्कर शिन्डलरची प्रमुख भूमिका साकारायची संधी दिली आणि त्याच्या सोबत स्टर्न म्हणून बेन किंगस्ले सारख्या दमदार अभिनेत्याला उभे केले.
एकूण सात ऑस्कर अवॉर्ड या चित्रपटाला मिळाले .
हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Tuesday, May 28, 2024

crew

Crew
क्रू
कोहिनूर एयरलाईन्स दिवाळखोरीत चालली आहे .पण तिचा मालक विजय वालिया आणि सीईओ मित्तल हे कधीच मान्य करत नाही .
जास्मिन , दिव्या, गीता तिघी कोहिनूर एयरलाईन्सच्या एअर हॉस्टेस. स्टाफला वेळेवर पगार मिळत नाही. फ्लाईटच्या भत्त्यावर त्यांचे चालले आहे. गीताचा पीएफ अडकला आहे.  दिव्या पायलट आहे पण तिला जॉब मिळाला नाही म्हणून एअर हॉस्टेस झालीय.घरच्यांपासून ही गोष्ट लपवून ती नोकरी करतेय.तर जास्मिन आजोबांसोबत राहतेय.सर्वांच्या घरी पैश्याचे प्रॉब्लेम आहेत.
एके दिवशी त्यांना आपल्या फ्लाईटमधून  मुंबईतून दुबईला चोरट्या मार्गाने सोने जातेय याची माहिती मिळते. यात मित्तलचा हात असतो अशी खबर लागते.ते मित्तलकडून सोने दुबईला पोचविण्याची जबाबदारी घेतात .त्याबदल्यात त्यांना खूप पैसे मिळणार असतात.
हे सर्व सुरळीत चालू असताना एके दिवशी तिघांनाही अटक होते. त्यांच्याकडे सोने मिळत नाही . पण त्या फ्लाईटमधील सोने छतामध्ये सापडते.
अचानक विजय वालिया परदेशात पळून जातो आणि कोहिनूर एअरलाईन्सची दिवाळखोरी जाहीर करतो.एका क्षणात कोहिनूर एअरलाईन्सचा सर्व स्टाफ रस्त्यावर येतो. 
देशातून दुबईला जाणारे सर्व सोने विजय वालियाचेच आहे असे या तिघीना कळते.आपले हक्काचे पैसे न देता त्याने त्या पैश्याचे सोने घेऊन ते दुबईला नेले हे कळताच त्यांना धक्का बसतो आणि त्या दुबईला जाऊन विजय वालियाकडून ते चोरायचे ठरवितात.
पण या तीन साध्या एअर हॉस्टेसला हे शक्य होईल का ??
तब्बू ,करीना कपूर ,कीर्ती सोमण अनुक्रमे गीता, जास्मिन, आणि दिव्याच्या भूमिकेत आहेत..तब्बू आणि करीना कपूरचे वय स्पष्ट दिसून येते आणि त्या एअर हॉस्टेसच्या भूमिकेत फिटही बसत नाहीत. 
चित्रपट विनोदी थ्रिलर असल्यामुळे बऱ्याच गोष्टी खपून जातात .एक टाईमपास म्हणून पाहायला हरकत नाही.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.