Friday, September 15, 2017

वाढदिवस

मध्यरात्री बारा वाजता तिला फोनवर वाढदिवसाच्या शुभेच्छाचा मेसेज आला.ती नेहमीप्रमाणे स्वतःशीच हसली .त्या हसण्यामागे एक वेदना होती .गेली तीन वर्षे रात्री बारा वाजता त्याचा मेसेज येतो.
तिला तीन वर्षांपूर्वी काळ आठवला .खूप छान दिवस होते ते .तशी ती सुखवस्तू कुटुंबातून आलेली. हा गरीब पण मेहनती .स्वभावाने प्रेमळ .वडील नको नको म्हणत असतानाही हिने लग्न केले .म्हणतात ना प्रेम आंधळे असते .माझ्या प्रेमाने संसार सुखाचा करू असे मोठे संवाद बोलत ही त्याच्या घरी आली.वर्ष दोन वर्षात परिस्थिती काही बदलली नाही आणि हिच्या जुन्या सवयी उफाळून येऊ लागल्या .दुकानातील उंची वस्तू ,रस्स्यावर पळणाऱ्या आलिशान गाड्या ,चांगल्या हॉटेलमधील जेवण हवेहवेसे वाटू लागले .कधी कधी बोलून दाखवायची पण हा सोयीने दुर्लक्ष करायचा .तिच्या वाढदिवसाला नेहमीप्रमाणे पूर्ण दिवस तो तिच्याबरोबर राहिला.तिला भेट दिलेला साधा ड्रेस खुलून दिसत होता. तो नेहमीप्रमाणे जीन्स आणि सध्या टी शर्टवर होता .केसातील मोगऱ्याच्या गजऱ्याने तिच्या सौंदर्याला वेगळीच झळाळी आली होती.हातातील शेंगदाणे एकमेकांना भरवीत त्या दिवसाचा प्रत्येक क्षण उपभोगला त्यांनी .संध्याकाळी  समुद्राच्या कट्ट्यावर बसून समोरच्या सप्ततारांकित हॉटेलकडे पाहून ती म्हणाली",  आपण इथे कधी येणार जेवायला ? त्याच क्षणी तो स्तब्ध झाला.डोळ्यात एक निश्चय पहिला तिने .काही न बोलता ते घरी परतले.
काही दिवस असेच गेले आणि एक दिवस त्याने नोकरीसाठी परदेशी जाण्याचे जाहीर केले .तिला तो धक्काच होता .पण पुढील सुखी आणि सोनेरी भविष्यकाळ पाहून तिने स्वीकारले .त्यानंतर दर महिन्यात तिला वेगवेगळ्या गिफ्ट मिळू लागल्या .वर्षातून पाच सहा दिवसासाठी तो तीन वेळा यायचा .दरवेळी तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज असायचे .लवकरच एक आलिशान फ्लॅट बुक झाला . पुढच्यावेळी गाडी घ्यायची ठरले .सगळे मिळत होते फक्त सहवास नव्हता .ती त्याच्या सहवासासाठी झुरू लागली.
आजही त्याच्या मेसेज आला आणि तिला त्याची कमी जास्त जाणवली .पुन्हा सकाळी त्याचे गिफ्ट आले .यावेळी ही उंची ड्रेस किंवा तसेच काहीतरी असेल या अपेक्षेने तिने उघडले तर आता चक्क साधा ड्रेस होता .असे ड्रेस तीन वर्षांपूर्वी ती वापरात होती .त्यात एक चिट्ठी होती .हा ड्रेस घालून नेहमीच्या ठिकाणी ये.ती मोहरली .शेवटी तो आलाच... नेहमीप्रमाणे सरप्राईज घेऊन.
लवकर तयार होऊन ती नेहमीच्या ठिकाणी आली .थोड्याच वेळाने समोरच्या बस मधून तो उतरला नेहमीप्रमाणे मळलेली जीन्स आणि टी शर्ट घालून .त्याला पाहून ती अश्रू रोखू शकली नाही .लोकांची तमा न बाळगता भर रस्त्यात मिठी मारून मनाचा बांध मोकळा केला .त्याने हळूच पिशवीतून मोगऱ्याचा गजरा काढून तिच्या समोर धरला .काही न बोलता तिने पाठ वळवली .मोठ्याने हसत त्याने विचारले अजूनही स्वतःला माळता येत नाही का ? तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिले.मग त्याने खिशातून शेंगदाण्याची पुडी काढून दोन शेंगदाणे तिच्या तोंडात भरविले .ती मोहरून गेली .नेहमीप्रमाणे त्यांनी तो दिवस साजरा केला .संध्याकाळी ते परत त्या सप्ततारांकित हॉटेल समोरच्या कट्ट्यावर  बसले .पण यावेळी तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते .त्यानेच विचारले चल जेवायला जायचे ना ?? तशी ती उठली त्याने हात धरून त्या हॉटेलमध्ये एन्ट्री केली .यावेळी त्याच्या वागण्यात एक आत्मविश्वास दिसत होता .वेटरच्या वेगळ्या नजरेकडे दुर्लक्ष करीत ते रिकाम्या टेबलवर बसले .आणि झोकात जेवणाची ऑर्डर दिली .पण आज तिला जाणवले तिच्यासाठी काय महत्त्वाचे आहे .
© श्री .किरण बोरकर

Tuesday, September 12, 2017

अलॉंग केम अ स्पायडर ...जेम्स पॅटर्सन

अलॉंग केम अ स्पायडर ...जेम्स पॅटर्सन
अनुवाद ..डॉ. चंद्रशेखर चिंगरे ...श्रीराम बुक एजन्सी
हॉलीवूडची सुप्रसिद्ध नटीची छोटी मुलगी आणि राष्ट्राध्यक्षाच्या कोषागाराच्या सचिवांचा मुलगा.यांचे शाळेतून अपहरण केले जाते .अपहरणकर्ता क्रूर,हुशार आणि विकृत आहे .अल्फ़्रेंड क्रॉस या निग्रो अधिकाऱ्याकडे ही केस दिली जाते .क्रॉस हा मानसोपचारतज्ञही आहे .जीवावर उदार होऊन आणि अतिशय हुशारीने तो खुन्याचा माग काढतो .नक्की कसे ते कळण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे .

Sunday, September 10, 2017

परमवीर चक्र

परमवीर चक्र ...... मेजर जनरल इयान कारडोझो
अनुवाद ..जोत्स्ना लेले   मेहता पब्लिकेशन
लेखक स्वतः एक धाडसी अधिकारी म्हणून नावाजलेले  आहेत .१९५७ च्या बांगलादेशातील सिल्हटच्या लढाईत त्यांचा एक पाय सुरुंगावर पडला तेव्हा त्यांनी स्वतः ची  कुकरी काढून पाय तोंडाला .अपंग होऊनही त्यांनी पुढे सैन्यदलात राहून देशाची सेवा केली.
परमवीर चक्र हा सैन्यदलातील सर्वात श्रेष्ठ पुरस्कार समजला जातो .आतापर्यंत एकवीसजणांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे .त्या प्रत्येकाची माहिती आणि लढाईतील पराक्रम या पुस्तकात लेखकाने लिहिला आहे .इतकेच नव्हे तर परमवीर चक्राची माहिती . त्याचा इतिहास हेही लिहिले आहे .या पदकाचे  डिझाईन एका स्त्रीने केले आहे हे विशेष आहे . पहिल्या पदकाच्या मानकऱ्यापासून ते कारगिल युद्धापर्यंत सर्वांचा इतिहास यात आहे .सर्वांनी आपल्या या शूरवीरांबद्दल  वाचलेच पाहिजे

Friday, September 8, 2017

इको फ्रेंडली

चौपाटीवर कचरा साफ करणाऱ्या निहारच्या मित्रांना पाहून अजय चमकला.तो वडिलांचे पिंड समुद्राला अर्पण करायला आला होता.चौपाटीवर बरीच कॉलेजची मुले गणपती विसर्जनानंतर झालेला कचरा साफ करण्यात गुंतली होती. न राहवून त्याने निहारच्या एका मित्राला हाक मारली .त्यांना बघताच तो धावत आला.
"काका निहार कुठेय ?? आला नाही तो साफसफाई करायला ?? आहो प्रोजेक्ट आहे हा .मार्क असतात.
ते ऐकून अजय आश्चर्यचकित झाला .प्रोजेक्ट असून हा  घरी कसा राहिला ??
"विचारतो घरी जाऊन "असे म्हणून तो निघाला .घरी निहार शांतपणे ड्रॉईग काढत बसला होता .
"काय रे ?? तुझे मित्र चौपाटी साफ करायला गेलेत आणि तू इथे बसला आहेस ?? प्रोजेक्ट आहे ना तो ?? उगाच मार्क्स कमी होतील .त्याने प्रश्नाची तोफ झाडली.
"नाही गेलो .मला पटत नाही"  तो शांतपणे उत्तराला.
"काय झाले साहेब ?? काय पटत नाही ?? अर्चनाने बाहेर येऊन विचारले .
"हेच ..! ज्या चूका आपण करतो त्याच निस्तरायला आपण जायचे ?मुळात माहीत असूनही चूक करायच्या का ?? निहारच्या या प्रश्नावर दोघेही गोंधळात पडले .
"काय म्हणायचे ते स्पष्ट बोल"अजय तिरसटला.
"पपा ..गणपतीचे विसर्जन दरवर्षी होते आणि दरवर्षी चौपाटी साफ करावी लागते .पण हे सर्व का घडते ?मुर्त्या वाहून का येतात ?.त्या विरघळत का नाहीत ?आपला गणपती पाण्यात विरघळला पाहिजे हा विचार का नाही करीत कोणी?? माफ करा आपण ही त्यातलेच .आपल्या बजेटमध्ये बसेल अशी मूर्ती आपण आणतो. पण ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळते का याचा विचार करतो का ?? बरे त्या बजेटमध्ये छोटी मूर्ती घ्यायला सांगितली की तुमच्या प्रथा ,परंपरा आड येतात .मूर्तीची उंची आता कमी करता येणार नाही .आज मी चौपाटी साफ करायला गेलो असतो आणि आपलीच मूर्ती माझ्या पायाखाली आली असती तर ?? इथे चौपाटी साफ करणार्यात किती मुले अशी आहेत ज्यांच्या घरच्या मुर्त्या पूर्ण पाण्यात विरगळल्या असतील?.आधी आपण आपल्यापासून सुरवात करायची आणि मग बाहेरचे पहायचे असे विचारवंत बोलतात .मी तुम्हाला मागच्या दोन वर्षापासून सांगतोय इको फ्रेंडली गणपती आणू .डेकोरेशन साधेच करू.. पण ते प्रदूषणमुक्त असेल .थर्माकोल ,प्लास्टिकचा वापर नाही करायचा .पण तुम्ही ते बजेटमध्ये बसत नाही म्हणून करत नाहीत .इतरजण काय म्हणतील ,याचा विचार करता .विसर्जनानंतर सर्व समुद्रात टाकून देता.ते प्लॅस्टिक ,थर्माकोल नष्ट होते का ?? आणि वर दुसऱ्या दिवशी मीच ते साफ करायला जातो .प्रत्येकाने पर्यावरणाचा विचार केला आणि पहिली सुरवात आपल्या घरापासून केली  तर चौपाटी स्वछ करायची गरजच भासणार नाही . शेवटी गणपतीची पूजा श्रद्धेने करणे महत्वाचे .चांगले चकचकीत डेकोरेशन ,उंच सुंदर मूर्ती महत्वाचे नाही .मला मार्क मिळाले नाही तरी चालतील पण मनाला पटत नाही ते काम मी करणार नाही .
निहारचे स्पष्टीकरण ऐकून अजय स्तब्ध झाला.त्याने वळून अर्चनाकडे पाहिले .तिनेही मान डोलावली.
"खरे आहे तुझे .जर असे सण घरातील सर्वांच्या मनाप्रमाणे साजरे होत नसतील तर त्यात बदल केले पाहिजे .आपण पुढच्या वर्षी नक्कीच विचार करू आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करू .निहारला मिठीत घेऊन अजय म्हणाला.
©श्री.किरण बोरकर

Tuesday, September 5, 2017

हिटलरचा अणुबाँब कसा फसला ..... विजय देवधर

हिटलरचा अणुबाँब कसा फसला ..... विजय देवधर
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाने आपल्याला खूप काही दिले आणि शिकवले .अनेक चित्रपट,कादंबऱ्या लिहिल्या गेल्या .दुसऱ्या महायुद्धात गुप्तहेरांनी बजावलेल्या अलौकिक आणि चित्तथरारक कारवाया ह्यावर हा कथासंग्रह आहे .या पुस्तकात केवळ गुप्तहेरांची कामगिरी नाहीच तर गुप्तहेर कसा तयार केला जातो . त्यांचे प्रशिक्षण कसे असते .याची माहिती आपल्याला मिळते .इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या देशातील गुप्तहेर प्रशिक्षणाची पद्धत आपल्याला कळते .हिटलरची अणुबाँब निर्मितीची फॅक्टरी कशी नष्ट केली त्यात गुप्तहेरांचा किती सहभाग होता हे वाचताना अंगावर काटा येतो .

अरविंद सुर्वे उर्फ अव्या

अरविंद सुर्वे उर्फ अव्या
कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अरविंद सुर्वे आपल्या कुटुंबासह बसला होता .आज तो कुटुंबासह कोकणातील आपल्या छोट्याशा गावी गणपतीसाठी निघाला होता .त्याची पत्नी शांतपणे पुस्तक वाचीत बसली होती तर मुले गप्पा मारीत होती.
दरवर्षी तो गणपतीसाठी सहकुटुंब भारतात जात होता .तसे त्याने आपल्या भावाला वचनच दिले होते .मुलांकडे बघता बघता तो भूतकाळात हरवून गेला.
कोकणातील एक छोट्या गावात त्याचा जन्म झाला .एकूण पाच भाऊ . आईवडील लहान असतानाच गेले .तेव्हा मोठ्या भावावर सगळी जबाबदारी  आली . हा दुसरा मागे तीन भाऊ .त्यामुळे जगण्यासाठी वाटेल ते करायची वृत्ती अंगात भिनली . मोठ्या भावाचे तत्वनिष्ठ वागणे ह्याला पटायचे नाही त्यामुळे याने  पैसे कमावण्याचा स्वतः चा मार्ग निवडला .फुकट कोणतेही काम करायचे नाही . प्रत्येक कामाची काहीतरी किंमत असतेच हेच तत्व पक्के करून आयुष्य जगू लागला .सुदामदादा आणि याने पाठच्या भावांची काळजी घेतली .पण आपली मते त्यांच्यावर लादली नाही .पुढे याने स्वतःचा छोटा उद्योग चालू केला  आणि संधी मिळताच कॅनडाला निघून आला .नागरिकत्व मिळविण्यासाठी लग्न केले .बायकोच्या मदतीने तिथेही छोटासा उद्योग चालू केला .मेहनतीवर आणि हुषारीवर हळूहळू वर चढत गेला .जमेल तसे गावी मदत करीत राहिला .नामदेव मुळातच हुशार त्यामुळे त्याच्यावर जास्त मेहनत घेतली त्याने .शंकरलाही आय टी आय चे शिक्षण घेऊ दिले .विन्या तर मुंबईला गेला.त्याला शिक्षणापेक्षा ऍक्टिग मध्ये जास्त रस त्यातच त्याला करियर करायचे होते . असो आता सगळे मार्गाला लागलेत.
कॅनडाला निघताना सुदामदादाचे भरलेले डोळे अजून डोळ्यासमोरून जात नाहीत .पण गणपतीत नक्की येईन असे वाचन देऊन तो निघाला आजगायत तो ते वाचन पाळीत आहे .त्याची कॅनेडियन पत्नी ऍना खूप हौशी आहे .मराठी सण खूप हौसेने साजरे करते .गणपतीचे दहा दिवस कोकणात राहून साजरे करते .पहिली काही वर्षे तिला भारतात राहण्याचा त्रास झाला .मग ह्याने जमेल तसे घर सजवायला सुरवात केली .आज कोकणच्या घरात सर्व सुख सुविधा आहेत.सर्व भाऊ आपापल्या परीने घरासाठी काहीतरी करीत असतात .मुले लहान असताना गणपतीसाठी तयार असायची पण मोठी झाली  तशी किटकीट करू लागली .मग एक दिवस त्यांना बाप काय चीज आहे दाखवून दिले .तेव्हा कुठे नरम पडली .च्यायला कोकणातल्या माणसाला मूर्ख समजतात की काय ही !!!. वाईट इतकेच वाटते की इथे कोणाशी मालवणीत बोलता येत नाही .पण भावाशी  बोलताना ही हौस भागवून घेतो .
यावर्षी नामदेवला सांगायचे इथे यायला .देवाने चांगली बुद्धी दिलीय त्याचा वापर इथे चांगला होईल .पण तोही देश सोडून यायला मागत नाही .शंकर ही तसाच राहिला .निदान या वर्षी तरी विन्याच्या लग्नाचे पक्के करू . इतक्यात विमानाची घोषणा झाली आणि अरविंद भानावर आला . समोर पाहिले तर ऍना त्याच्याकडे पाहत होती . तिच्या नजरेतले प्रेम पाहून सुखावला आणि मुलांच्या खांद्यावर हात टाकून विमानाकडे निघाला .
©श्री .किरण बोरकर

Sunday, September 3, 2017

श्रद्धा

"भाऊ ...!! हा बघ जगातील सर्वात भाग्यवान माणूस.ज्याने एका दिवसात जास्तीतजास्त स्रियांच्या विविध अंगाला स्पर्श करण्याचा रेकॉर्ड केला आणि एकाही स्त्रीने त्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार केली नाही.धन्य आहेस रे तू बाबा."असे म्हणत विक्रमने समोरच्या टीव्हीला हात जोडले.
मीही चमकून टीव्हीकडे पाहिले .तर समोरच श्रीबागेतील गणपतीच्या दर्शनाचे दृश्य चालू होते . गणपतीच्या पायाजवळ उभा असलेला एक कार्यकर्ता अगदी मन लावून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पकडून बाहेर लोटत होता .अर्थात त्या पकडीत त्याचे हात कुठे कुठे फिरत होते ते दिसतच होते .स्त्रियांवर तर त्याचा जास्त राग दिसत होता .कारण प्रत्येक स्त्रीला तो अंगावर जाऊन बाहेर ढकलत होता.खरे तर मला जास्त आश्चर्य वाटले त्या स्त्रियांचे . इतरवेळी कोणी नुसती नजर दिली तर वाघिणीसारख्या चवताळून उठणाऱ्या.भर रस्त्यात धक्के मारणाऱ्या पुरुषांच्या सात पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या स्रिया अश्या वेळी चुपचाप त्याचा कुठेही फिरणारा स्पर्श सहन करीत होत्या.
चार ते पाच तास रांगेत उभे राहून गणपतीच्या समोर गेल्यावर चार सेकंद ही समोर उभे राहू शकत नाही डोळे भरून त्याला पाहू शकत नाही .उलट धक्के खाऊन बाहेर पडावे लागते .त्या देवाचे दर्शन घेण्यात काय अर्थ आहे .मी हा प्रश्न विक्रमला विचारला . तर त्याने "तुझे काय जाते रे भाऊ ?? देवाचे दर्शन घेणे ही तुझी संकल्पना वेगळी आहे तशीच प्रत्येकाची असावी का ?? काहींना आवडते असे गर्दीतून धक्के खात दोन सेकंदासाठी का होईना त्याचे दर्शन घ्यावे .मग त्यांचा दिवस काय ,वर्ष ही छान जात असेल .खरोखर काही जणांच्या नवसाला पावत असेल म्हणून हजारो लोक त्याच्या दर्शनासाठी येतात . ही प्रत्येकाची श्रद्धा आहे ती आपण बदलू शकत नाही . ज्याने त्याने स्वतः ठरवावी.
मीही त्याचे विचार मान्य केले .खरेच आहे ...लोकांची श्रद्धा आपण बदलू शकत नाही .एरवी सदा घाईत असणारे मुंबईकर आवडत्या देवाला हवा तेवढा वेळ देतात . रात्ररात्र भर त्याच्या दर्शनाला रांगेत उभे राहतील .रांगेत उभे राहून सर्व सिस्टीमला दोष देत राहतील पण दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतरचा त्याचा चेहरा आनंदाने फुलून गेलेला असतो .रस्त्यावरच्या भिकार्याला हाड हाड करतील पण देवाच्या दानपेटीत पैसे प्रेमाने टाकतील . मुलमुलींना रात्रभर याच श्रध्येपोटी रात्रभर बाहेर फिरायला मिळतेय.
" मग विकी यावर उपाय काय"?? मी हसून विचारले . "काही उपाय नाही .जे चालले आहे ते चालू दे .कारण दरवर्षी अश्या भक्तांची संख्या वाढते आहे . काहीजण स्टेटस साठी येतात .तर काही पिकनिक म्हणून .तर काही गर्दीत स्पर्शसुख अनुभवण्यासाठी येतात .व्यक्ती तितक्या प्रवृत्ती . सध्या त्या कार्यकर्त्याची  किती मजा होत असेल याचाच विचार मी करतोय."असे बोलून परत टीव्ही पाहू लागला .
© श्री.किरण बोरकर