Wednesday, June 13, 2018

वीरभरारी.....डॉ. मीना शेटे-संभू

वीरभरारी.....डॉ. मीना शेटे-संभू
विश्वकर्मा पब्लिकेशन
ग्रुप कॅप्टन ( निवृत्त) दिलीप परुळकर या हवाई दलातील फायटर पायलटची ही  कथा आहे . १९७१ च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धात त्यांचे विमान कोसळले आणि ते युद्धकैदी झाले . रावळपिंडी येथील तुरुंगात त्यांना ठेवले गेले . त्यांनी अतिशय धैर्याने आणि अचूक योजना आखून आपली आणि आपल्या दोन सहकाऱ्यांचीही सुटका केली .परंतु  केवळ चार किलोमीटर अंतरावर भारतीय सीमा रेषा असताना बांगला देशी नागरिक म्हणून पुन्हा पकडले गेले .पण प्रसंगावधान राखून त्यांनी पुन्हा सुटका करून घेतली . कशी...??? ते हे पुस्तक वाचूनच कळेल .

Monday, June 11, 2018

आम्ही मुले घडवू

प्रमोद नवले अमेरिका सोडून भारतात परत आलाय हे मला विक्रमकडूनच कळले. त्यानेच निरोप देऊन आम्हाला बोलावले होते. हा आमचा कॉलेज मित्र . अतिशय हुशार . उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि तिथेच स्थायिक झाला.
संध्याकाळी आम्ही त्याच्या घरी गेलो . महाशय नेहमीप्रमाणे पाय पसरून बसले होते . जुनी सवय... पण यावेळी मांडीवर पुस्तकाऐवजी लॅपटॉप होता."काय रे अचानक मुंबईत ..."??कोपऱ्यातल्या बाटलीकडे पाहत विक्रमने डायरेक्ट विचारले . "अमेरिकेत सध्या तंगी आलीय. भारतात नवीन काहीतरी सुरू करू... खूप स्कोप आहे इथे".प्रमोद हसत हसत म्हणाला .
"अरे वा....! कसला बिझनेस.."? मी कुतूहलाने विचारले .
"एक सर्विस कंपनी स्थापन करतोय. एक आदर्श कर्तबगार मुलगा / मुलगी तयार करण्याची .."?? प्रमोद हसत हसत उत्तरला.
"काय ..???. ही कसली कंपनी .."?? आम्ही दोघे एक सुरत ओरडलो.
" अरे मित्रानो ....हल्ली सगळीकडे पॅकेज घेतले जाते ना.. ?? लग्नाचे ...बारश्याचे..कार्यक्रमाचे ..इतकेच काय ..?? अंत्यसंस्काराचे ही.. . पण आपण त्याच्या आधीचे पॅकेज घेऊ ".डोळे मिचकावत प्रमोद म्हणाला .  "हल्ली आई वडिलांना आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ कुठेय ..?? लहानपणी पाळणाघरात ,नंतर इंटरनॅशनल स्कूल,मग पुढील शिक्षणासाठी कॉलेज/क्लास या सर्वांचे एकत्र पॅकेज आपण घ्यायचे ..अर्थात आपले ग्राहक अतिश्रीमंत असणार".
"काही लक्षात येत नाही मित्रा..," मी चिडून म्हटले.
" अरे भाऊ ...हल्ली बऱ्याच पालकांना सगळे काही रेडी हवे असते . आपण त्यांना त्यांच्या मुलांसाठी घरबसल्या सर्विस देऊ.म्हणजे बघ त्यांना पाळणाघर हवे... ते आपण देऊ . त्यांच्या मुलांना पाहिजे त्या शाळेत ऍडमिशन घेऊन देऊ . त्यांच्या मुलांना त्यांना काय बनवायचे आहे..? ते बनविण्याची जबाबदारी आपण घेऊ".
" म्हणजे ...?? आता विक्रमचेही कुतूहल जागे झाले . "म्हणजे समजा ..एका आईवडिलांना वाटले आपला मुलगा सीए व्हावा तर आपली कंपनी त्या मुलाला सीए बनवायची जबाबदारी घेईल .त्यासाठी त्याच्या मनात लहानपणापासून ती आवड निर्माण करायची जबाबदारी घेईल. एका मुलीला सैन्यात जायचे तर त्यासाठी काय काय करावे लागते ते सर्व आपली कंपनी करेल. तिला पहिल्यापासूनच सैनिकीपेशा बद्दल आवड निर्माण करायची जबाबदारी ही घेईल...म्हणजे कसे..? मूल झाल्यावर आई वडिलांनी आपल्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केले आणि वर्षाचे पेमेंट फिक्स केले की आपली जबाबदारी सुरू ...मुलाचे बारसे..मग त्याच्यासाठी डॉक्टर...मग पालकांच्या आवडीच्या शाळेत ऍडमिशन मिळवून देणे .त्यानंतर आई वडिलांनी आपल्याला कळवायचे मुलाला कोण बनवायचे ...? तशी कागदपत्रे बनली की पुन्हा आपली जबाबदारी सुरू ... .आपले पॅकेज ठरलेले असेल. त्याप्रमाणे आपले काम सुरू . मुलांची  घडविण्याची जबाबदारी आपली . त्यासाठी जे काही करायचे ते आपण करू . वेगवेगळ्या शाळा,कॉलेज,हॉस्पिटल बरोबर आपण कॉन्ट्रॅक्ट करू.....बोलता बोलता प्रमोदला दम लागला.तो पाणी पिण्यासाठी थांबला.
तीच वेळ साधून विक्रम म्हणाला "अरे.. हे शक्य आहे का... ?
"का शक्य नाही ...?? प्रमोद जोरात म्हणाला" तुम्ही मुलांना पाळणाघरात ठेवत नाहीत का.. ??? तुम्ही त्यांना पाचगणीला पाठवीत नाहीत का.. ??तुम्ही त्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवीत नाही का.. ?? फरक इतकाच आहे हे सर्व करण्यासाठी आई वडिलांना धावाधाव करावी लागते  . त्यांना आपली मुले मोठी  कर्तबगार बनवी असे वाटते पण त्यासाठी योग्य माहिती आणि वेळ त्यांच्याकडे नसतो .परिणामतः त्यांच्यात आणि मुलांच्यात समन्वय साधला जात नाही .हेच काम आपण करणार फक्त भरमसाठ पैसे घेऊन. पालक कायदेशीर कागदपत्र बनवून आपल्या मुलांच्या भवितव्याबाबतीत निर्धास्त राहणार .नाहीतरी आज आय आय टी च्या ऍडमिशन साठी मुलांची नववी पासूनच तयारी करून घेतात त्यासाठी पॅकेज आहेतच ना ???प्रमोद हसत म्हणाला . मी गपचूप उठलो आणि कोपर्यात ठेवलेली बॉटल उचलून विक्रमला खूण केली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, June 10, 2018

कबंध...... रत्नाकर मतकरी

कबंध...... रत्नाकर मतकरी
मेहता पब्लिकेशन
गूढकथा आणि मतकरी यांचे नाते अतूट आहे . गूढकथा म्हटल्या की रत्नाकर मतकरीच डोळ्यासमोर येतात.आयुष्याच्या एखाद्या मुलखावेगळ्या पैलू विषयी लिहिलेली कथा म्हणजे गूढकथा .यात त्यांच्या बारा गूढकथा आहेत . सर्वच कथा वाचनीय आहेत . यात माझ्या आवडीची सुप्रसिद्ध द्रष्टा ही कथा आहे.काही वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या एका मालिकेत द्रष्टा  कथा दाखविली होती . दिलीप कुलकर्णी आणि दिलीप कोल्हटकर यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या .

Saturday, June 9, 2018

बापलेक

एक कंटाळलेला बाप
च्यायला.....वाटलेच.. हा घोळ घालणार.वर्ष सुरु झाल्यापासून मागे लागलोय.दहावीचे वर्ष आहे. नीट अभ्यास कर . सोसायटीतून कर्ज काढून ह्याच्या वलासची फी भरली. आहे थोडा अभ्यासात कमी... पण मेहनत करून भरून काढ ..असे सांगत राहिलो . हल्ली चांगल्या टक्क्यांनी पास झालेच पाहिजे.नाहीतर पुढे भविष्य बेकारच आहे .आमच्यासारखे आयुष्य जाऊ नये म्हणून प्रयत्न करतोय . पण याला काहीच नाही त्याचे.नव्वद टक्के मार्क  मिळाले.अजून थोडी मेहनत केली असती तर पंच्यांणव टक्के मिळाले असते....आता  ते काय माझे होते का.... ?? त्यालाच मिळणार होते. नशीब साहेबांच्या मुलाला कमी टक्के मिळाले .आता काही दिवस तरी पुढ्यात मान खाली घालून येतील. आम्ही मोठे  झालो नाही निदान हा तरी होईल.आम्ही आमची स्वप्ने मुलांकडूनच पूर्ण करून घेणार  ना ....?? काय चुकते आमचे.ह्यावर्षी कपडे शिवलेच नाही मी . भाऊबीजेचे पॅन्टपीस ह्याच्यासाठी ठेवले . म्हटले नवीन ठिकाणी शिक्षण सुरू होईल जरा हौसेने नवीन कपडे घालून जाईल. ऑफिसातले बरेचजण अभिनंदन करतायत . खरेतर इतरांपेक्षा यालाच जास्त टक्के आहेत ...तरीही अजून मिळायला हवे होते.आपलेच चुकले . यावर्षी जरा जास्तच फिरणे जाणे झाले त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले . हरकत नाही पुढे पाच वर्षे आहेत .यापुढे जास्त लक्ष देऊ .

एक कंटाळलेला मुलगा
च्यायला ..... बाप आहे की कोण आहे ..?? वर्षभर बैलासारखा राबलो आणि नव्वद टक्के मिळवले तरी ह्याला कमी .! म्हणे अजून पाच टक्के तरी जास्त मिळवायला हवे होतेस. आता काय दिवसाचे तीस तास अभ्यास करू.ह्याला शक्य असते तर दिवसही तीस तासांचा केला असता. वर्षभरना टीव्ही पाहू दिला ना स्वतः पहिला....आहो माझ्यासाठी का इतरांची मने मारत तुम्ही ..? लहान असल्यापासून तुमची मुलाला इंजिनियर बनवण्याची इछा ऐकतोय . तुमच्या इच्छेसाठी मी माझ्या इच्छा मारतोय. खरे तर नाही बनायचं इंजिनियर मला.नाहीं आवडत त्या तांत्रिक गोष्टी. पण हे सगळीकडे सांगत सुटलेत... . पोराला टॉपचा इंजिनियर बनवेन.आहो ..नोकरीसाठी साहेबांकडे आतापासूनच वशिला लावून ठेवलाय त्यांनी .म्हणजे मीही यांच्यासारखा लोकलने लोकांचे धक्के खात ऑफिसला जाणार. सोसायटीतून कर्ज काढून त्यानी क्लासची फी भरली माझ्या ...काय बोलणार . ती बिचारी आई कधीपासून वाढलेले मंगळसूत्र बनवायचे आहे बोलते पण तिच्याकडे लक्ष देत नाही . स्वतःकडे तरी कुठे लक्ष देतात म्हणा . रोजच्या गोळ्या घेणे परवडत नाही म्हणून वर्षभर त्या बंद केल्या हे माहीत नाही का आम्हाला . वर्षभर स्वतःसाठी कपडे शिवले नाहीत .ऑफिसमधील सेफ्टी शूज सर्व ठिकाणी वापरतात तेही माहीत आहे आम्हाला. पण ...कधी विचारलेत का मला तुला काय करायचे आहे.. ?? तशी संधीही तुम्ही मला दिली नाहीत . तुमची स्वप्ने मला दिसत होती आणि ती पूर्ण करण्यासाठी मीही मेहनत केली.करेन मी तुमची स्वप्ने पूर्ण ....कारण हे सर्व तुम्ही माझ्या सुखी आणि उज्ज्वल भविष्यासाठी करतयात हे ठाऊक आहे मला . पण एक नक्की मी माझ्या मुलांच्याबाबतीत असे वागणार नाही . मी स्वप्ने पाहणार नाही पण त्यांना वेगवेगळी स्वप्ने दाखवीन . त्यांनाच सांगेन त्यांची स्वप्ने निवडायला आणि ती पूर्ण करण्यासाठी पाठीशी राहीन.निसर्गाशी ओळख करून देईन . तर साहित्यातली रुची वाढवीन . या जगात खूप काही बघण्यासारखे आहे .शिकण्यासारखे आहे . आयुष्य कसे जगायचे हे त्याला शिकविन.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, June 7, 2018

द हाफ मदर .....शहानाज बशीर

द हाफ मदर .....शहानाज बशीर
अनुवाद...... गीतांजली वैशंपायन
मनोविकास प्रकाशन
ही कहाणी आहे एका कुटुंबाची .....एका स्त्रीची  हलीमाची.जी एक मुलगी आहे... नवऱ्याने सोडून दिलेली पत्नी आहे.... आणि एका तरुण मुलाची आई आहे .
१९९० साली काश्मीर पुन्हा एकदा धगधगु लागले . आणि त्याची झळ पोचली हमीलाला . तिच्या डोळ्यादेखत तिच्या वडिलांना गुलाम रसून यांना गोळ्या घातल्या जातात  आणि चौकशीसाठी तिच्या मुलाला इमरानला पकडून नेले जाते . इमरानने नुकतीच दहावीची परीक्षा दिली असते.या धक्क्यामुळे हलीमा सैरभैर होते .पण ती त्यातूनही सावरते आणि आपल्या मुलाच्या शोधासाठी कंबर कसून उभी राहाते. रुग्णालय,शवागर, तुरुंग ,लष्करी छावण्या सगळीकडे आपल्या मुलाचा न थकता शोध घेते. तिचा शोध पूर्ण होतो का ....?? काश्मीरच्या निसर्ग रम्य खोऱ्यातील मन हेलावून टाकणारी कहाणी .

Sunday, June 3, 2018

तो म्हातारा

रस्त्यावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची गरज नसते. पण हे बंड्याला सांगेल कोण .... ?? त्यातही कोण वर गेलेला असला की हा पुढे ....
आता मयत झाले ते नाक्यावरच्या एक सोसायटीत . हा मॉलमध्ये गेलेला... येतायेता ती परिचित शांतता दिसली तेव्हा याला काही राहवले नाही . गेला त्या गर्दीत.बाजूला उभा राहून तयारी पाहू लागला आणि सहजच शेजारच्या म्हातार्याला नेहमीप्रमाणे दबक्या आवाजात विचारले "कोण गेला...."??
"चौथ्या मजल्यावरचे एक वृद्ध गृहस्थ " शेजारच्या वृद्धाने शांतपणे उत्तर दिले.
"अरे रे .... वाईट झाले .सुटले बिचारे ...'. बंड्याचे टिपिकल उत्तर.
"खरेच सुटले ..कारण आता कोणाच्या डोळ्यातून पाण्याचा टिपूसही येत नाही . म्हणजे सर्वच सुटले असे दिसतंय . म्हातारा दारू खूप पियाचा आणि घरच्यांना नेहमी शिवीगाळ . कर्जही भरपूर करून ठेवलय . ही काही माणसे दिसतायत ना ....ती सर्व आपले पैसे कोण देणार ते पाहायला आलेत .तो म्हातारा बंड्याला सांगू लागला .
"म्हणजे आता घरच्यांना ताप सुरू झाला तर .."?? बंड्या सहानुभूतीने म्हणाला .
"कसला ताप ..?? घरच्यांनी काय कमी ताप दिला नाही त्याला .रिटायर्ड झाल्यावर त्याची सर्व सर्व्हिस मुलांनी ,जावयानी खाल्ली . बायकोबरोबर भारत फिरू ही त्याची इच्छा . पण नातवंडांना सांभाळायची जबाबदारी खांदयावर पडली.आयुष्यभर फक्त जबाबदारीच घ्यायची का ?? अडकले परत मुलांच्या मोहपाशात.ह्याला कधी कधी दारू पियाची सवय . पण तीही नशिबात नाही . बायकोला नवीन चित्रपट पहायची सवय पण त्यासाठी ही वेळ नाही . खर्चाला पैसे पाहिजे त्यासाठी मुलांपुढे हात पसरावे लागले . साले पेन्शन पण त्यांच्या घशात जाऊ लागले.त्यात तुमच्या माधुरीची बकेट लिस्ट मोठी आहे यांची  फक्त एकच इच्छा ...सुखाने आनंदाने जगू द्या. दोन वर्षांपूर्वी बायको गेली हा अजून एकटा पडला .आता तर गप्पा मारायला ही कोण उरले नाही . तरीही संध्याकाळी बाहेर गार्डनमध्ये बसून चार मित्र जमवले . त्यांचीही हीच व्यथा . शेवटी ठरले आपल्या पद्धतीने थोडावेळ जगू . जुने कॉन्टॅक्ट वापरून एका सावकाराकडून कर्ज काढले . माझे काही बरेवाईट झाले तर मुले फेडतील असे लिहून दिले . त्या चार म्हातार्यांना बरोबर घेतले आणि तीन महिने भारत फिरून आलो . मध्ये मध्ये दारू ही पिऊन घेतली . केली आमचीही बकेट लिस्ट पूर्ण .. आज संध्याकाळी फिरून आले आणि येऊन झोपले ते झोपलेच .तो सावकार बघ आलाय चार लोक घेऊन . बोलेल आता घरच्यांशी . बसुदे त्यांना धक्का .त्यांची धक्का बसलेली तोंड पहायची आहेत म्हणून उभा आहे मी " म्हातारा पोटतिडकीने बंड्याशी बोलत होता .
काही वेळाने मयत खाली आले . मुलांबरोबर सावकारही होता .सर्वांचे चेहरे गंभीर होते .पायाशी उभे राहून मुलांनी त्यांच्यासमोर हात जोडले ."माफ करा बाबा ...मुले असूनही आम्ही तुमच्या ह्या सध्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही .आम्ही आमच्या संसारात गुरफटून गेलो . पण तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. तुमचे सगळे कर्ज आम्ही फेडू  हे वचन देतो तुम्हाला ....?? .
च्यायला .....ते ऐकुन म्हाताऱ्याला बसलेला धक्का पाहून बंड्याला हसू आवरले नाही .
"ओ काका ... हे काय ....?? मुले तर खूप चांगली आहेत की... ?? म्हाताऱ्याच्याच मनात काही गैरसमज झालेले होते " बंड्या हसून म्हणाला .
त्या म्हाताऱ्याने मान खाली घातली.
"मुले चांगली आहेत हे आता लक्षात येऊन कांय उपयोग पण... ?? म्हातारा गेला वर .त्याला कसे कळणार ....?? बंड्या आता थांबणार नव्हता .
"कळेल कळेल त्याला नक्की कळेल ....?? आता त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित आले .
"कसे कळेल ..? तुम्ही जाताय निरोप द्यायला.." बंड्या छद्मीपणे म्हणाला .
"त्याची काही गरज नाही.तो म्हातारा मीच आहे .."असे म्हणून त्याने समोरच्या प्रेताकडे बोट दाखविले .
बंड्याने नजर फिस्कारून समोर पाहिले तेव्हा बाजूचा म्हातारा समोरच्या तिरडीवर शांतपणे निजला होता.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, June 1, 2018

तानापिहिनिपाजा.......द्वारकानाथ संझगिरी

तानापिहिनिपाजा.......द्वारकानाथ संझगिरी
मॅजेस्टिक प्रकाशन
लेखकाने आपल्या लहानपणा पासून ते मोठेपणापर्यतच्या आठवणी सांगितल्या आहेत . तरीही हे आत्मचरित्र नाही . फक्त मी आणि माझ्या आठवणी . कधी कधी त्यांचा मीपणा वाचायला कंटाळा येतो .त्यांचे मित्र ,त्यांची शाळा त्यांचे कॉलेज  त्यांनी क्रिकेट साठी केलेला जगभर प्रवास .तेथील अनुभव सर्व काही या पुस्तकात आहे .