Friday, July 24, 2020

अलक ..७

अलक....७
 गेले चार दिवस तो विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्काराचे काम करीत होता .आताही एक म्हातारा ट्रॉलीवर झोपला होता.बटन दाबून ट्रॉली आत जाणार इतक्यात एक तरुण हातात केकचा बॉक्स घेऊन धावत आला. "आज त्यांचा वाढदिवस आहे. जाण्यापूर्वी केक भरवू का ....??  काही न बोलता तो बाजूला झाला आणि घरी फोन केला . गेले कित्येक दिवस तो बापाशी बोलला नव्हता." मला वाटलेच तू फोन करशील . कालच माझा वाढदिवस सुनेने आणि नातवाने साजरा केला फक्त तुझी कमतरता जाणवली .."डोळ्यातील अश्रूंना वाहू देत त्यानं विद्युतदाहीनीचे बटन दाबले . ट्रॉलीवरचा म्हातारा छातीवर केकचा तुकडा घेऊन आत गडप झाला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

706 ... (2019)

706 ...( 2019)
आज बारा दिवस झाले डॉक्टर अनिल अस्थाना गायब आहेत. संपूर्ण मुंबई पोलीस त्यांचा शोध घेतेय. डॉक्टर शहरातील नामांकित व्यक्तींपैकी एक . त्यांचे स्वतःचे मोठे हॉस्पिटल आहे . त्यांची पत्नी सुमन ही प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आहे . हे प्रकरण फार गंभीर आहे म्हणून स्वतः डीसीपी शेखावत या केसमध्ये लक्ष घालतायत . 
याच वेळी डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये एक दहा वर्षाचा मुलगा नीरज ऍडमिट होतो . त्याला मधेमध्ये झटके येतात . खरे तर त्याचे संपूर्ण रिपोर्ट्स नॉर्मल आहेत . तरीही असे का होते....??. डॉक्टर त्याला डिस्चार्ज देतात पण तो डॉ.सुमनला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणतो .
नाईलाजाने डॉ.सुमन त्याची भेट घेण्यास तयार होते . केबिनमध्ये आल्याआल्या तो डॉ. सुमनला विचारतो तुमची बसण्याची जागा बदलली आहे . इतकेच नव्हे तो तिचे पती डॉ.अनिल जिवंत नाहीत हेही सांगतो आणि पोलिसांना ते कुठे सापडतील याची माहिती ही देतो .
ती माहिती खरी ठरते आणि शेखावत हादरतो. दहा वर्षाच्या मुलाला ही माहिती कशी....?? याचा छडा लावायचा प्रयत्न करतो.प्रसंगी तो निराजला धमकीही देतो . ते ऐकून नीरज शेखावतला असे एक रहस्य सांगतो की जे फक्त शेखावतलाच माहीत असते.
थंड डोक्याने शेखावत यामागील रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि काही धक्कादायक गोष्टी समोर येतात . या सगळ्या घटनांचा संबंध मेघदूत हॉटेलमधील रूम नंबर 706 शी आहे . काय घडलंय त्या 706 मध्ये....??? काय आहे शेखावतचे रहस्य ...??
एक उत्कंठावर्धक चित्रपट 
यात शेखावतच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी तर डॉ. सुमानच्या भूमिकेत दिव्या दत्ता आहे . 
चित्रपट श्रवणकुमारने दिग्दर्शित केलाय .

Wednesday, July 22, 2020

अलक ...६

अलक .........?????
गेले चार दिवस सतत तो स्मशानात कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत होता . मृतांची नुसती रांग लागली होती . एकच काम करता करता तो थकून गेला होता .त्याच वेळी दोघेजण त्याला आत येताना दिसले . च्यायला स्मशान काय फिरायची जागा आहे . तो मनात म्हणाला . पण ते दोघे त्याच्याजवळ आले . एकाने त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि बाजूला नेऊन म्हणाला . भाऊ किती काम कराल . थोडी विश्रांती घ्या . असे म्हणून त्याला बाजूला बसवले . या  कडक लॉकडाऊनमध्ये ही बाटली देऊन काळजी घेणाऱ्या मित्रांचे त्याला कौतुक वाटले . बाटली तोंडाला लावून दोन घोट घेऊन म्हणाला दोस्ती बडी चीज हैं .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

अलक ...५

अलक...५
जेवणाच्या वेळेलाच जिवलग मित्र घरी आलेला पाहून तो खुश झाला..आज बऱ्याच महिन्यांनी दोघे मित्र पोटभर गप्पा मारत जेवले.
"अरे ..उद्या  एक काम करशील.प्रकाशकडे जाऊन माझे पेपर्स घेऊन ये. मी ऑफिसला जाणार आहे मला जमणार नाही.याच वेळेस जा.."
मित्र होकार देऊन बाहेर पडला. तो जाताच याने प्रकाशला फोन केला.
"उद्या त्याला तुझ्याकडे पाठवतोय . जेवल्याशिवाय सोडू नकोस . काम नाहीय त्याला.आपणच सांभाळून घेऊ . मी चाळीस मित्रांची लिस्ट काढलीय . खूप स्वाभिमानी आहे तो . पैसे घेणार नाही . पण रोज कोणाकडे काही कामासाठी पाठवून जेवणाची सोय तरी करू .. दोस्ती बडी चीज हैं .."असे म्हणत अलगद डोळे पूसले.
कॉलेजमध्ये असताना वाईट काळात एकमेकांना सांभाळून घेऊ या शपथेचा मान राखण्याची वेळ आज आली होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, July 17, 2020

अलक...४

अलक...४
"बाबा...रोज दाढी करा हो .. काय हा अवतार बनवलाय...?? विडिओ कॉलवरून तो वडिलांना ओरडला.तसे हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार देणारा डॉक्टरही हसू लागला ."इकडे कोण करणार माझे ..?? असे बोलून त्यानी कॉल बंद केला .
पण आज स्मशानात त्या प्लास्टिक बॅगमध्ये नुकत्याच गुळगुळीत दाढी केलेल्या चेहऱ्यात त्याचे वडील शांत झोपलेले दिसत होते .
घरी आल्यावर त्याने डॉक्टरांना फोन केला . पलीकडून इतकेच उत्तर आले ."इतके तरी तुझ्या बाबांसाठी मी नक्की करू शकत होतो".
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, July 14, 2020

फॉर अ फ्यू डॉलर्स मोर ..1965

फॉर अ फ्यू डॉलर्स मोर ..1965
दिग्दर्शक सर्जिओ लिओनचा डॉलर्स ट्रिलॉजीमधील हा दुसरा चित्रपट.याही चित्रपटात क्लिंट इस्टवूड प्रमुख भूमिकेत आहे . पण त्याच्यासोबत ली व्हॅन क्लीफ हा तगडा कलाकार आहे .जियन मारिया हा प्रमुख खलनायिकेच्या भूमिकेत आहे .
पार्श्वसंगीत चित्रपटाचा प्राण आहे . संथ अंगावर काटा आणणारी थीम आपल्याला श्वास रोखून धरायला लावते .
क्लिंट आणि ली व्हॅन हे दोघेही शिकारी आहेत. सरकारने जाहीर केलेल्या गुन्हेगारांना शोधून त्यांना पुन्हा सरकारच्या ताब्यात देऊन बक्षीस कमावणे हा दोघांचा हेतू .दोघेही स्वतंत्र काम करतात . 
एका तुरुंगातून जियन मारिया आपल्या टोळीच्या मदतीने पळून जातो आणि एक बँक लुटण्याची योजना आखतो . त्याच्यावर नेहमीप्रमाणे मोठे बक्षीस जाहीर होते . त्याला पकडण्यासाठी हे दोन्ही शिकारी गावात दाखल होतात . पण जियनची टोळी बघता ते दोघे एकत्र येण्याचा निर्णय घेतात .
पुढे काय ....??
 खरोखर जियन बँक लुटेल...??  दोन्ही शिकारी आपल्या योजनेत यशस्वी होतील ...?? त्यासाठी त्यांनी काय केले हे मात्र बघण्यासारखे आहे .
क्लिंट इस्टवूडने आपली काऊबॉयची भूमिका अतिशय प्रभावीपणे केली आहे . यात हाणामारी नाही पण बंदुकबाजी खूप आहे . डोळ्यांची पापणी लवायच्या आत रिव्हॉल्वर होस्टरमधून बाहेर काढून गोळ्या झाडणे हे केवळ क्लिंट इस्टवूडलाच जमू शकते . कमीत कमी देहबोलीतून अभिनय कसा करून घ्यावा हे सर्जिओ लिओनकडूनच शिकावे

Monday, July 13, 2020

अलक ....३

अलक ...३
आज तीन महिन्यांच्या कोरोना  लॉकडाऊनंतर त्याने फॅक्टरीच्या गेट मधून आत प्रवेश केला .आतमध्ये पटांगणावर सर्व एकत्र जमले होते.समोर व्यासपीठावर चेअरमन उभे होते.त्यांनी हातातील कागदात पाहून नावे वाचण्यास सुरवात केली.आज त्याचा पहिला दिवस आपल्या बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यातच गेला .
©  श्री . किरण कृष्णा बोरकर