Tuesday, February 16, 2021

असे पाहुणे येती

असे पाहुणे येति
"भाऊ....." अशी ती परिचित हाक कानावर आली आणि भीतीने पोटात गोळा उठला.पण यावेळी स्वयंपाकघरातून भांडी पडल्याचे आवाज ऐकू आले नाहीत याचे आश्चर्य वाटले.म्हणजे संतोष दिघेचे येणे हिला मान्य असावे.
आता हा संतोष दिघे कोण ....?? स्वतःला साहित्यिक समजणारा आणि मालिका लिहिणारा माझा वर्गमित्र.वर्गात होता म्हणून वर्गमित्र म्हणायचे असा विक्रम म्हणतो. घरच्यांवर उपकार करायचे म्हणून हा शाळेत यायचा हे माझे मत. त्याला लिखाणाची आवड लहानपणापासूनच होती बरे का ....मुलींना प्रेमपत्र लिहिण्यात याचा हातखंडा. पण याने लिहिलेल्या प्रेमपत्रामुळे अनेकांचे संसार सुरू होण्याआधीच वाचले. असे विक्रमाची बायको वनिता म्हणते. दुर्दैवाने याने विक्रमला प्रेमपत्र का लिहून दिले नाही असे ही दोघांच्या भांडणात बऱ्याचवेळा म्हणते .
असो ... तर वेळीअवेळी घरी टपकणे ही त्याची जुनी सवय. सौ.लाही ते माहीत आहे कारण लग्नाच्या पहिल्या रात्री यानेच आमच्या बेडरूमचा दरवाजा वाजवून मला उठवले होते आणि भाऊ सावकाश असा सल्ला देऊन निघून गेला होता. तेव्हापासून सौ.हा घरात शिरला की भांडी आपटून निषेध व्यक्त करत असते.
दिघ्या घरात शिरताच त्याचे थंड पाण्याने स्वागत झालेले पाहून मी चक्रावलो. माझ्याविरुद्ध काही कट शिजणार याचा संशय येऊ लागला .
"दिघ्या.....अचानक इकडे कुठे ...?? सिरीयल बंद केल्यास का ...?? मी नजर  रोखूनच विचारले.असे मी नेहमी त्याला विचारतो.कारण कोणत्याही सिरियलमध्ये संतोष दिघे हे नाव कधीच वाचले नाही.
"वहिनीने बोलावले आहे ... "माझ्याकडे छद्मीपणे पाहत त्याने उत्तर दिले.
"हो....मीच बोलावले होते पण असे अचानक येतील याची कल्पना नव्हती. सौने त्याच्या पुढ्यात कांदाभजीची प्लेट ठेवली. ते पाहतच माझा राग थोडा निवळला . कांदाभजी आज खारट झाली होती म्हणून मी चिडलो होतो आणि ती फेकून द्यायचा हुकूम सौ ला केला होता. पण अन्न वाया जाऊ नये या सौच्या  धोरणामुळे तिने ती डिश संतोषच्या पुढ्यात ठेवली .
"भाऊजी .... "मोठ्या कष्टाने आपला आवाज मवाळ करीत सौ.म्हणाली .. माझी भाची आहे गावाला . तिच्या कामाचे बघा ना ...तिला एखाद्या सिरियलमध्ये काम द्या.."
"देवा .... शेवटी हेच काम तर...." बिचारी इतकी वर्षे माझ्यासोबत राहून ह्या दिघ्याला ती ओळखू शकली नाही याचे दुःख झाले मला .
"हात्तीच्या....!!  बस इतकेच ....तिचे काम झालेच म्हणून समजा. एका नवीन सिरियालमध्ये तिला नायिकेचा रोल देतो... "भजी तोंडात टाकून दिघ्या सहज स्वरात  म्हणाला .
 "पण भाऊजी ती थोडी तोतरी बोलते...."सौ चाचरत म्हणाली .
"त्यात काय...?? आपण तिच्या तोतरेपणावर कथा लिहू..." दिघ्या भजीला जागून म्हणाला .
"दिसायलाही इतकी खास नाही.... थोडी काळी आणि जाड.... "सौ.खाली आवाजात म्हणाली.
"असुदे.. नेहमीच नायिका गोऱ्या सडपातळ सुंदर हव्या असा नियम नाही.... आणि तसेही परडे परवडत नाही .त्यापेक्षा अश्या मुलींना नायिका करून चारशे भागाची एक मालिका बनेल . करून टाकू एक सिरीयल ..."पाण्याचा एक घोट घेत दिघ्या चेहऱ्यावरची रेषाही न हलविता म्हणाला .
मानलं दिघ्या तुला ..... मी मनात म्हटले. इतकी खारट भजी खाऊन चेहरा कोरा ठेवणे फक्त संतोष दिघेलाच जमू शकते हे आज पुन्हा पटले.
"वहिनी तुला काम करायचे आहे का ..??? संतोषने सौला डायरेक्ट विचारले.तसे सौचे डोळे मोठे झाले .
"अय्या काहीतरीच काय ..... थांबा मी सरबत घेऊन येते.."असे म्हणून ती धावत आत गेली.
हे अति झाले ... ते सरबत मी कॉकटेलसाठी ठेवले होते .आता विक्रम शिव्या घालणार मला ...मी मनात चरफडलो.
"भाऊ ... तू ही काम कर पाच दहा एपिसोडमध्ये....".संतोष दात कोरत म्हणाला. 
"काहीतरीच काय....?? मला कुठे अभिनय करता येतो.." मी उत्तरलो. 
"अरे... तुझा चेहराच केविलवाणा आहे . एका रंजलेल्या गांजलेल्या माणसाची भूमिका तुला फिट आहे. तोच चेहरा घेऊन वावरायचे . हल्लीच्या सिरीयल बघत नाहीस का ....?? मेकअप तरी करतात का सिरियालमधील पात्रे...?? संतोष हसत म्हणाला आणि सौ च्या हातातील ग्लास ओढून घेतला .
"ठरले तर ..... वहिनी तुमच्या भाचीवर मी सिरीयल लिहायला सुरुवात करतो. पाहिले पन्नास भाग तर तिच्या तोतरेपणाच्या विनोदावर जातील. ती दिसायला सुंदर नाही म्हणून तिची हेटाळणी होईल .पुढील पन्नास भागात तिचे प्रेम.. लग्नाच्या गोष्टी.नंतर पन्नास भाग तिला सासरचा त्रास....मग पुढे तिचा लढा यावर पन्नास भाग असे करून सिरीयल टीआरपी प्रमाणे वाढवत नेऊ .आता मी निघतो यापुढे येणे होईलच ...."सरबत संपवून दिघ्या उठला.
"हो नक्की या ... आणि यापुढे कधीही आलात तरी जेऊनच जायचं ...."सौ. आग्रहाने म्हणाली
पुन्हा एकदा माझ्याकडे पाहत छद्मीपणे हसत संतोष दिघे घरातून बाहेर पडला ते कधीही येऊन जेवायची परमिशन घेऊनच .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, February 12, 2021

हग डे

हग डे
खाडकन आवाज येताच आख्या बाजाराचे लक्ष त्या दिशेने गेले.भर गर्दीत ती संतापून त्याच्याकडे पाहत होती आणि तो खाली मान घालून उभा होता.
"तुझी लायकी तरी आहे का माझ्याकडे पहायची...?? आणि तरीही आज हॅपी हग डे म्हणत मिठी मारायची हिंमत केलीस...?? लाजशरम काही आहे का ...?? की दिसली तरुणी की मिठी मारायला धावत यायचे. इथे भर रस्त्यात चपलेने मारेन तुला.. पुन्हा माझ्या वाट्याला गेलास तर ..संतापाने थरथरत ती बोलत सुटली होती.
टाईट जीन्स त्यावर मॅचिंग शॉर्ट कुर्ता तिच्या गोऱ्या शरीराला खुलून दिसत होता. पाहणारा नक्कीच पुन्हा वळून पाहिलं अशी तिची शरीरयष्टी होती. संतापाने तिचा चेहरा लाल झाला होता आणि त्यातही ती अजून सुंदर दिसत होती.
 तो तिच्यासमोर केविलवाणा चेहरा करून उभा होता. साधी ट्राऊझर त्यावर गोल गळ्याचा साधा टी शर्ट .पायात चप्पल . साधारण बावीस वर्षाचा असेल. मित्रांसोबत नेहमी त्या नाक्यावर उभा असायचा . पण कधी कोणी त्याला थट्टा मस्करी करताना पाहिले नव्हते .
ती बऱ्याचवेळा बाजारात यायची . तिला कधीच यांचा त्रास नव्हताच. त्यांच्या जवळून जाताना ओळखीची चमक तिच्या डोळ्यात यायची . बस इतकेच ....
पण आज त्याने अचानक समोर येऊन हॅपी हग डे म्हणत तिला मिठी मारली आणि तिचा तोल गेला. त्याच रागात एक सणसणीत गालावर ठेवून दिली तिने आणि मग तोंड सोडून संतापाला वाट करून दिली होती.
काही वेळाने ती निघून गेली आणि बाजार पूर्वीप्रमाणे सुरू झाला . आताच काही घडलंय याची नावनिशाणीही शिल्लक नव्हती. 
तो रुबाबात आपल्या मित्रांसमोर उभा राहिला."चला.. काढा पाच हजार.. मी पैज जिंकलोय." मित्रांनी काही न बोलता पाच हजार काढून त्याच्या हातात दिले.
"उगाच पैज लावू नका.सध्या कोणतीही पैज काहीही करून जिंकायची अशी परिस्थिती आहे माझी..."तो हसून म्हणाला .
व्हॅलेंटाईन डे सुरू झाले होते. रोज कोणतातरी डे येत होता. आज हग डे.….
गमतीत त्याच्या मित्रांनी पैज लावली होती. आपल्या आवडत्या मुलीला जो हग करेल त्याला पाच हजार रु मिळणार होते.
ती नेहमी दिसायची म्हणून आज त्याने हे धाडस केले होते.अर्थात त्याचा परिणाम अपेक्षेपेक्षा जास्तच गंभीर झाला होता.
संध्याकाळी तो घरात शिरला.नेहमीसारखेच तणावग्रस्त वातावरण होते. ते नसते तर त्याला आश्चर्य वाटले असते. आजी आजोबा कोपऱ्यात बसून हळू आवाजात गप्पा मारत होते. तर बाप शांतपणे शिलाई मशीन चालवत होता.
तो आजीआजोबांच्या समोर उभा राहिला . खिशातून पाकीट काढून त्याने दोघांसमोर ठेवले. 
"तुमची अष्टविनायक यात्रेची तिकिटे. परवा सकाळी निघायचे आहे तुम्हाला. यात्रा कंपनी सगळी काळजी घेईल तुमची....."
एका क्षणात कुजबुज बंद झाली .शिलाई मशीनही पटकन थांबली.थरथरत्या हाताने आजोबांनी ते पाकीट उघडले.आत यात्रा कंपनीची पावती होती. संपूर्ण यात्रा पाच हजारात होती.डोळ्यात अविश्वास आणून आजी आजोबा त्याकडे पाहत बसले.
"आजोबा .... कित्येक वर्षे अष्टविनायक यात्रेचे स्वप्न बघताय....यावर्षी मनात ठरवून ठेवले होते काहीही करून तुमचे हे स्वप्न पूर्ण करायचे. आज पैसे मिळाले आणि ताबडतोब बुकिंग करून आलो.मस्तपैकी फिरून या दोघे .व्हॅलेंटाईन डे साजरा करा .... च्यायला आयुष्यात आहे काय अजून ... " डोळ्यातील अश्रू लपवत तो मोठ्याने म्हणाला.
खुश होऊन आजी आजोबाने त्याला जवळ घेतले . हग डे म्हणजे नक्की काय ते आता त्याला कळले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, February 4, 2021

लॉक ग्रिफिन......वसंत वसंत लिमये

लॉक ग्रिफिन......वसंत वसंत लिमये 
लॉक याचा अर्थ तलाव . हा स्कॉटलंड मधील पौराणिक भाषेतील शब्द .तर ग्रिफिन म्हणजे गरुडाचे डोके आणि सिहांचे शरीर लाभलेला प्राणी.अनेकदा येशूची तुलना गरुड आणि सिहाशी केली जाते. 
लॉक ग्रिफिन ही अमेरिकेतील एक गुप्त कमिटी आहे.अमेरिकेच्या दूरच्या भविष्यातील हितसंबंधांचे रक्षण करणे हे त्या कमिटीचे काम.निवृत्त झालेले उच्चपदस्थ सरकारी अधिकारी या कमिटीचे सदस्य .यांची ताकद इतकी अफाट आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही याना सॅल्युट करतात. सध्या लॉक ग्रिफिनला मूळ भीती भारतापासून आहे . भारताचा विकास होणे त्यांना परवडणार नाही.आणि त्यासाठीच त्यांनी ऑपरेशन कोब्रा ही मोहीम आखली होती.
सौभद्र कानिटकर मुंबई आयआयटीत शिकत असताना अचानक त्याला वडिलांच्या खुनाची बातमी देणारा फोन आला. त्यातून तो सावरत नाही तर दोन दिवसांनी त्याचे काका धनंजय आणि काकू नेहा यांचा नैनिताल येथे अपघाती मृत्यू होतो.अमेरिकेत स्थायिक असलेले काका काकू भारतात कधी आले...?? ते नैनितालला कसे गेले ....?? त्यांचा मृत्यू संशयास्पद होता. सौभद्रचे काका सायबर सिक्युरिटीत एक्सपर्ट होते.
नऊ वर्षानंतर सौभद्र आपल्या वडिलांचा खून आणि काका काकूंचा दुर्दैवी अपघात यामागे काय रहस्य आहे त्याचा तपास करण्याचे ठरवितो .त्यासाठी त्याला अमेरिकन मैत्रीण ज्युलिया साथ देते. 
दोघेही रहस्याचा तळाशी पोचतात आणि भयानक सत्य समोर येते.
काय आहे हे सत्य ....?? 
सुरवातीला अतिशय संथपणे चालणारी ही कादंबरी शेवटी एक स्पीड पकडते आणि आपण त्यात गुंतून जातो .

Saturday, January 30, 2021

रॉ... रवींद्रकुमार आमले

रॉ... रवींद्रकुमार आमले 
भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा
मनोविकास प्रकाशन 
रॉची स्थापना 1968 सालाची.त्या आधी देशाची फाळणी झाल्यानंतर  भारतीय केंद्रीय गुप्तचर यंत्रणा स्थापन झाली. तिचे नाव इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबी.
चीन युद्धाच्या अपयशानंतर देशाला बाह्य हेरगिरी यंत्रणेची आवश्यकता वाटू लागली. लष्करप्रमुखांनी या योजनेला मान्यता दिली आणि ती कशी असावी...?? याचा अभ्यास करण्यासाठी काही व्यक्तींनी अमेरिका आणि ब्रिटनला भेट दिली.
लालबहादूर शास्त्रीच्या अकाली निधनानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी या योजनेला मंजुरी दिली पण त्यावर पंतप्रधान कार्यालयाचे नियंत्रण असेल हे स्पष्ट केले आणि त्याची जबाबदारी रामेश्वरनाथ काव
कोण होते रामेश्वरनाथ काव ...??
रॉने स्थापने पासून कोणत्या कामगिरी केल्या.. ?? त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला .?? याचा आढावा लेखकाने या पुस्तकात घेतला आहे.
भारतात काहीही भयंकर घडले की पंतप्रधान या मागे परकीय शक्तीचा हात असल्याचा उल्लेख करतात. सामान्य नागरिकांना ते नेहमीच हास्यास्पद वाटते . पण खरोखरच परकीय शक्ती नेहमी यामागे असत. चीन,पाकिस्तान ,श्रीलंका नेपाळ नेहमीच आपल्या देशाविरुद्ध काही षडयंत्र रचत असतात. त्यांच्यावर सतत नजर ठेवणे,त्यांच्या कारवाया रोखणे तसेच त्यांच्या देशात आपले हेर घुसवून बातम्या गोळा करणे हे रॉ चे प्रमुख कार्य .
१९७१ च्या युद्धाच्या आधी काश्मीरमधून इंडियन एयरलाईन्सच्या विमानाचे अपहरण झाले . त्यात 26 प्रवासी होते.दहशतवादयानी ते विमान लाहोरला नेले .यात पाकिस्तानचा हात आहे असे इंदिरा गांधीनी जाहीर केले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी दहशतवाद्यांशी चर्चा केली नंतर 26 प्रवाश्यांना सोडून देण्यात आले आणि विमानाला आग लावली गेली. जगाला वाटले यात भारताची मानहानी झाली . पण यासर्व घटनेमागे रॉ चा हात होता. कसा ?? त्याने भारताला काय फायदा झाला ??? 
बांगला देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात रॉ ने बांगला देशाला पाठिंबा दिला.त्यांनी स्वातंत्रसैनिकाना प्रशिक्षण दिले.शस्त्र पुरवठा केला .याह्याखान पूर्व पाकिस्तानवर हल्ला करणार याची खबर इंदिरा गांधी आणि रॉ ला आधीच होती. त्यांनी आधीच आपली रणनीती ठरवली. 
 सिक्कीमच्या विलीनीकरणात रॉचा मोठा हात आहे.सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी रॉ ला काय काय करावे लागले याची रंजक माहिती मिशन सिक्कीम प्रकरणात मिळते.
मिशन काहुटा मध्ये रॉ ने पाकिस्तानात काहुटा गावी असलेल्या अणूऊर्जा प्रकल्पाचा कसा पर्दाफ़ाश केला याची माहिती मिळते .
पंजाबातील खलिस्तान चळवळ रॉने मोठ्या हिकमतीने मोडून काढली पण नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या रोखण्यात अपयशी ठरले.
10 एप्रिल 1983 ला रॉ चे प्रमुख बेपत्ता झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. ते दुसऱ्या राष्ट्रात पळून गेले अशी बातमी पसरली.पण ते कुठे गेले होते..?? त्यांनी मॉरिशसचे बंड कसे मोडून काढले .. याची माहिती आपल्याला ऑपरेशन लालदोरा प्रकरणात मिळते.
श्रीलंकेतील  राजकारणात हस्तक्षेप आणि राजीव गांधींची हत्या हे रॉचे प्रमुख अपयश मानले जाते.आंतराष्ट्रीय राजकारणात भारताच्या पाठीमागे रॉ खंबीरपणे उभी आहे.पाकिस्तान नेपाळ श्रीलंका आपली शेजारी राष्ट्रे अशांत ठेवण्यात रॉचा हात आहे.
एका मोठ्या आंतरराष्ट्रीय घटनेमागे किंवा साध्या वाटणाऱ्या घटनेमागे किती मोठा कट असू शकतो.हे या पुस्तकातून कळते.

Wednesday, January 27, 2021

परेड

परेड
चेहऱ्यावर टेन्शन दाखवतच त्याने मेजरला सवयीनुसार कडक सॅल्युट ठोकला.
"क्या बात है जोकर...?? बडे टेन्शन मे दिख रहे हो...?? घरकी याद आ रही है क्या ..."?? मेजर नेहमीप्रमाणे कडक आवाजात म्हणाला .आवाजात जरी विनोद असला तरी तो त्याच्या करड्या नजरेपर्यंत पोचत नव्हता.आवाजाची धारही कमी झाली नव्हती.
काश्मीरच्या दाट खोऱ्यात त्यांचे युनिट बरेच महिने तळ ठोकून होते. एकही दहशतवादी त्यांच्या तावडीतून जिवंत सुटत नव्हता.
त्याचे बोलणे ऐकून तो मनातच चिडला पण चेहऱ्यावर दाखवू दिले नाही .
"सर... यावर्षी सव्वीस जानेवारीला परेडमध्ये भाग घ्यायची इच्छा आहे . मुलाला आणि आई वडिलांना परेड बघायचीय .तुम्ही काही करु शकता का ...?? तो चाचरत म्हणाला .
 " साला जोकर.... गेली पाच वर्षे या जंगलात राहातोस. सरळ चालता तरी येते का तुला ...? कसली परेड ....?? चल भाग ... सव्वीस जानेवारीला इथे किती सावध राहावे लागते माहितीय ना तुला ..."?? मेजर चढ्या आवाजात बोलला तसे तो मान खाली घालून परत फिरला.
बाहेर आला तसा त्याचा फोन वाजला . पलीकडून छोटू बोलत होता.." काय झाले  पपा ..?? जायचे ना परेड पाहायला. मिळाली परमिशन ..."?? 
सहा वर्षाच्या छोटूशी खोटे बोलायचे त्याच्या जीवावर आले ."अरे मला नाही जमणार पण तुमच्यासाठी करतो काहीतरी.... "म्हणत त्याने फोन ठेवला.
सकाळी पुन्हा मेजरने त्याला बोलावले. मनात शंभर शिव्या घालत तो पुन्हा त्याच्यासमोर उभा राहिला. 
"ये लेटर ले और भाग परेड के लिये..सबको बुलाओ दिल्ली और दिखा.. अपने रेजिमेंट की ताकद..." मेजर हसत म्हणाला .
आश्चर्याचा धक्का बसून त्याने लेटर हाती घेतले आणि कडक सॅल्युट करून बाहेर धाव घेतली. डायरेक्ट लेटर घेऊन छोटुसमोर उभा राहिलो तर त्याचा चेहरा कसा होईल ..?? याची कल्पना करत त्याने स्वतःचे समान बांधायला सुरवात केली.
रात्री सर्व तयारी करून झोपायला जाणार इतक्यात मेजरसाहेबांनी सर्वाना केबिनमध्ये जमायची सूचना झाली . सर्व जमताच त्याने सर्च ऑपरेशनची घोषणा केली .पण त्याचे नाव डावलले होते.
"सर... मला ऑपरेशनमध्ये भाग घ्यायचाय ..."त्याने धीर करून साहेबाना सांगितले.
" अबे जोकर.. तुम तो छुट्टीपर हो. परेडमे शामिल हो जावो. लढाईया होती ही रहेंगी...मेजरसाहेब  नेहमीच्या करड्या आवाजात म्हणाला .
"नाही ... मी राहणार आपल्या जवानांसोबत....जिंदा राहा तो अगले साल परेडमे  जाऊंगा ..." यावेळी मात्र त्याच्या स्वर मेजरसाहेबांपेक्षा मोठा आणि करडा झाला होता.
इथे मात्र सहा वर्षाचा छोटू खुश होता .ह्या वर्षी त्याची परेड पहायची इच्छा पूर्ण होणार होती. आजी आजोबा सोबत तो दिल्ली ला जायला तयार झाला. त्याचे आजी आजोबा ही खुश होते.पोरगा सैन्यात होता पण ह्या वर्षी सव्वीस जानेवारीच्या परेडमध्ये तो दिसणार होता.त्या दिवशीच त्यांना एक पाकीट पोस्टातून आले होते. त्यात भारतीय सैन्यदलाकडून परेड पाहण्यासाठी आमंत्रण होते.आपला पोरगा साधा सैनिक असूनही भारतीय सैन्यदलाकडून आलेले आमंत्रण पाहून आजी आजोबा खुश झाले होते .तिघेही मोठ्या उत्साहाने दिल्लीला निघाले होते .
आज सव्वीस जानेवारी....दिल्लीला परेड चालू झाली होती. छोटू टाळ्या वाजवत भारतीय सैन्याचे कौतुक करत होता.आजीआजोबा मात्र आपल्या मुलाला शोधत होते.
तिकडे बेस कॅम्पवर मेजरसाहेब  टीव्हीवर ती परेड पाहत होते. त्याच्या हातात परवाच्या मोहिमेत शाहिद झालेल्या आपल्या शूर सैनिकांची नावे होती. सर्वांच्या घरी त्यांची पार्थिव पोचविण्याची व्यवस्था झाली होती . पण एक सैनिक मात्र अजूनही शवागृहात होता . कारण त्याचे आई वडील आणि सहा वर्षाचा छोटू दिल्लीला परेडचा आनंद घेत होते. आईवडील आणि मुलाची परेड पहायची आपल्या शूर सैनिकांची इच्छा त्यांनी पूर्ण केली होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Monday, January 25, 2021

सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट

सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट
 दुपारी लाईट गेली आणि माझी झोपमोड झाली. सवयीनुसार कंपनीला चार शिव्या देऊन पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. पण गरम होऊ लागल्यामुळे झोप काही येईना.एक तास झाला तरी लाईट आले नाही म्हणून उठून बसलो.
इतक्यात सौ.बाहेरून आली आणि थोड्या काळजीनेच सांगितले की फक्त आपल्याच घरातील लाईट गायब आहे बाकी इतरांकडे आहे.
आता मात्र थोडा चिंतेत पडलो. रात्री आठ वाजता ऑनलाइन मीटिंग होती तो पर्यंत काही करणे भागच होते. ओळखीच्या एका इलेक्ट्रिशियनला फोन लावला तेव्हा महाराज नेमके गावी जाऊन बसले होते. आता मात्र मलाच काही हालचाल करणे भाग होते.
अंगावर शर्ट चढवून घराबाहेर पडलो. जवळच्या हार्डवेयर दुकानात कोणतरी इलेक्ट्रिशियन असेल याची खात्री होती.सौ. ने लाईट गेल्याचा निषेध म्हणून मला चहा द्यायला नकार दिला होता म्हणून कोपर्यावरच्या इराण्याकडे घुसलो आणि "भाऊसाहेब...."अशी दमदार हाक कानावर पडली.
कोपऱ्यातील टेबलवर आमचा केके बसला होता.समोर चहाचा कप हातात सिगारेट आणि चेहऱ्यावर तेच मिश्किल हासू.चहाला कंपनी मिळाली म्हणून मीही खुश झालो.आणि उत्साहाने त्याच्यासमोर बसलो.
केके उर्फ कमलाकर कदम.....नाव मोठे म्हणून आम्ही केकेच म्हणतो. त्याला आवडत नाही केके ऐकायला पण आमच्यासमोर काही चालत नाही .
"बोल भाऊ ... कुठे निघालास...?? वेटरला चहाची खूण करीत मला प्रश्न केला . 
"अरे इलेक्ट्रिशियन हवाय....लाईट गेलीय . संध्याकाळी ऑनलाइन काम आहे ..."मी पटकन बोलून गेलो. च्यायला ह्याने सुरवात केली तर माझे काम बाजूलाच राहील...मी मनात म्हटले 
"बस ... !! छद्मीपणे हसून त्याने फोन हातात घेतला . "पाच मिनिटात तुझे काम होईल...."असे म्हणत फोन कानाला लावला . मग समोरच्याला सूचना देत त्याने माझा अड्रेस त्याला सेंड केला .
"अरे त्याला भेटतो मी ... काही मदत किंवा सामान आणावे लागेल.....मी काळजीने म्हणालो 
"भाऊ ... बस शांतपणे .तो सगळे करेल फक्त काम झाल्यावर वहिनीला चेक करायला सांग आणि त्याला ऑनलाइन पेमेंट कर ....." चहाचा एक घोट घेत त्याने सांगितले.
"हुश्शह ....करीत मी आरामात बसलो.डोक्यावरचे टेन्शन गेले.
"मग ..... आता काय चालू तुझे केके.."?? मी सहज स्वरात विचारले. 
केके हा कमलाकर अकॅडमीचा मालक . जे विद्यार्थी 40ते 45% मार्क मिळवतात त्यांना समाजात उभे करायची जबाबदारी तो घेतो . त्यांना ताठ मानेने मेहनत करून जगायला शिकवतो.
"ह्या लॉकडाऊनमुळे प्रॉब्लेम झाले असतील खूप.मुले आली नसतील फारशी ....".मी चहाचा घोट घेत विचारले.
"नाय रे....!! .तो टिपिकल हेल काढीत म्हणाला. उलट खूप बिझी होतो आम्ही.."
"म्हणजे कसे ...."?? मी आश्चर्याने विचारले.
"भाऊ.... मी या लॉकडाऊनमध्ये सिंगल कॉन्टॅक्ट मोहीम राबवली.तुला माहितीय माझ्याकडे बरीच माणसे आहेत. लॉक डाऊनमुळे सगळेच घरी बसून. मग मी एक आयडिया काढली. सगळ्या सोसायटीत....सगळ्या चाळीत... माझा फोन नंबर दिला.काही काम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुमचे काम करून देईन..."
"अरे... पण बाहेरच्यांना सोसायटीत शिरायला ही परमिशन नव्हती..." माझ्या शंका सुरू .
"बरोबर आहे भाऊ ...पण काही गोष्टीला पर्याय नसतो .तुला ती कोपर्यावरची पारिजात माहितीय.तिथे तिसऱ्या मजल्यावर म्हातारी सिरीयस झाली. घरात म्हातारा म्हातारी दोघेच .शेजारचे दरवाजे बंद.मग त्यांनी मला फोन केला . दहा मिनिटात माझ्या पोरांनी गाडी तिच्या दारात आणली आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिटही केले .नंतर सर्व काळजी आमच्या पोरांनी घेतली.
"अरे वा ...!! पैसे भरपूर घेतले असशील मग .."मी हसत विचारले 
"अरे भाऊ ....त्यांना मदत करणारे बेकारच होते की. तो ड्रायव्हर, चोवीस तास हॉस्पिटलमध्ये राहणारे दोघे, सर्वच घरी.आणि ह्या आजीकडे भरपूर पैसा.काय झाले थोडे जास्त घेतले तर सेवाही तितकीच केली ना .असेच अनेक फोन मला येतात . कोणाला औषध हवी असतात ,कोणाला जेवण तर कोणाला गाडी. काहीजणांची पाण्याची पाईप लाईन तुटते तर काहींची वॉशिंग मशीन बिघडते . मला फोन आल्यानंतर मी सर्व कामे करून देतो.अरे भाऊ ...काहींचे अंत्यसंस्कारही मी केले तर काहींच्या तेराव्यासाठी भटजी शोधून दिले..." ताठ मान करीत के के म्हणाला .
"धन्य आहेस तू ..." मी हात जोडून म्हणालो.
"अरे यात काय मोठे ....??. आता तुझेच उदाहरण घे. आज तुला इलेक्ट्रिशियन भेटला नसता तर रात्रभर अंधारात राहावे लागले असते . तुझी ऑनलाइन मीटिंग ही झाली नसती .शिवाय इलेक्ट्रिशियन शोधायला वेळ लागला तो वेगळाच . एका फोनवर तुझा प्रॉब्लेम सोडवला मी वर तुला चहाही पाजला . खरे तर आभार मान माझे ....केके हसत म्हणाला.
"खरे सांगू भाऊ लोकांकडे पैसे भरपूर आहेत पण सर्व्हिस मिळत नाही .मी जास्तीतजास्त सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतोय..." अचानक केके थोडा गंभीर होत म्हणाला .
"खरंय मित्रा... तू आज या वाईट परिस्थितीत ही जगण्याचा नवीन मार्ग शोधलास. इतकेच नव्हे तर बेकराना कामे दिलीस . यातूनच खूप काही शिकलो मी .यापुढे काही लागले तर तुलाच फोन करेन मी फक्त मित्र आहे म्हणून पैश्यात सवलत देत जा ....असे म्हणून हसत बाहेर पडलो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, January 21, 2021

रावण....अमीश

रावण......अमीश 
आर्यावर्ताचा शत्रू
रामचंद्र मालिका पुस्तक 3
ऋषी विश्रव आणि कैकसीचा पहिला पुत्र रावण जन्मतः नागा होता.नागा म्हणजेच वैगुण्यासह जन्मलेले बालक. ह्यांना समाजात हीन दर्जाची वागणूक मिळते. म्हणूनच विश्रव ऋषी रावणाचा राग करायचे.
त्याचा भाऊ कुंभकर्ण हाही नागा म्हणूनच जन्माला आला . त्याला जन्मतः ठार मारण्याची योजना होती. पण रावणाने मारीचमामाच्या मदतीने त्याचे प्राण वाचविले आणि सर्वजण परागंदा झाले.
रावण लहानपणापासूनच चतुर आणि क्रूर होता. देवी कन्याकुमारी उर्फ वेदवतीवर त्याचे मूक प्रेम होते.पुढे त्याने लंकेचा धनाढ्य व्यापारी कुबेर याच्याशी मैत्री करून त्याचे राज्य हळू हळू बळकाविण्यास सुरवात केली. त्याने मोठ्या चतुराईने सप्तसिंधूचा सम्राट राजा दशरथ याचा पराभव करून संपूर्ण समुद्री व्यापार आपल्या ताब्यात घेतला आणि पुढे अधिकृतपणे लंकेचा राजा झाला . कुंभाकर्णाची त्याच्यावर निस्सीम भक्ती होती.
मलयपुत्रांकडे अतिशय बहुमूल्य धातू आणि औषधे होती. रावण आणि कुंभाकर्णाला लागणारी औषधे ही मलयपुत्रांकडे होती. ऋषी विश्वामित्र मलयपुत्रांचे प्रमुख . सातवा विष्णू ठरविण्याचा अधिकार ही त्यांचाच होता . 
सीता हीच सातवी विष्णू असेल असे रावणाला समजले. तिला ताब्यात घेतले तर मलयपुत्रांची सर्व औषधे ,महत्वाची खनिजे आपल्याला मिळतील असा रावणाचा डाव होता. सीतेच्या अपहरणाची योजना त्याने बनवली आणि त्यात तो यशस्वीही झाला ..
आता पुढे काय ....???
अमीशच्या रामचंद्र शृंखलेच्या तिसऱ्या पुस्तकातून एक वेगळा रावण आपल्यासमोर उभा राहतो. तो उत्कृष्ट वादक आहे ,गायक आहे ,चित्रकारही आहे. अर्थात हा रावण खलनायकच आहे .त्याची सीतेला पळविण्याची अनपेक्षित आणि वेगळीच कारणे आपल्यापुढे येतात.एखाद्या व्यक्तीला महान बनवायचे असेल तर त्याने काहीतरी भरीव लक्षात येण्याइतपत कार्य केले पाहिजे आणि ते भारी कार्य करण्यासाठी परिस्थिती निर्माण केली पाहिजे असे काहीसे सूत्र तिसऱ्या पुस्तकात स्पष्ट होते. सीता कोण याचेही रहस्य उलगडले जाते .
अपेक्षेपेक्षा वेगळेच रामायण आपण अमीशच्या पुस्तकातून वाचतो आणि अनपेक्षित धक्के मिळत जातात. पण हे रामायण वाचताना कंटाळा येत नाही उलट उत्सुकता ताणून धरते.