Friday, August 26, 2022

पोस्टमार्टेम

पोस्टमार्टेम
त्याला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्येच होता.नाक्याजवळच्या वळणांवरच त्याची बाईक स्लिप झाली. नेहमीप्रमाणे डोक्यावर हेल्मेट नव्हतेच .साधारण दहा फूट घसरत गेला आणि फूटपाथच्या दगडावर आपटला.
आता काय आपण वाचत नाही हीच शेवटची जाणीव. नेहमी हेल्मेट घालूनच बाईकवर बसायचे असे अनेकवेळा ठरविले होते पण अमलात काही येत नव्हते. आज ना उद्या हे होणारच होते.
 पण डोळे उघडताच समोर दिसला तो डॉ. अमन वर्मा.त्याचाच क्लासमेट . बारावीपर्यंत एकत्रच होते . मग हा बीएस्सी आणि अमन डॉक्टर झाला.
"साहेब, झालात का जागे ? अमनने हसून विचारले आणि त्याने फक्त मान डोलावली .
" तुझ्याकडेच आलो का मी ?" त्यानेही हसून विचारले. 
" अरे ,  सरकारी पाहुणा आहेस तू.रस्त्यावर पडला होतास .पोलीस केस झाली .मग इथेच घेऊन येणार ना तुला ," अमन त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला .
" मग आता बरा आहे मी.घरी कधी सोडणार  मला " त्याने सहज स्वरात विचारले.तसा डॉ.अमन थोडा चिंतेत पडला.
"थोडे दिवस थांब मग बघू .डोक्याचा घाव किती गंभीर आहे ते चेक करू" असे म्हणून बाहेर पडला.
काही वेळाने पुन्हा आत शिरला तेव्हा त्याच्या हातात एक फॉर्म होता.
" हा कसला फॉर्म ? " त्याने अमनला विचारले.
" अवयव दानाचा फॉर्म आहे. इथे बर्याचजणाना अवयवांची गरज पडते . पण दाते सहसा मिळत नाहीत.आता तू आलाच आहेस तर हा फॉर्म भरून जा . आपण गेल्यानंतर आपल्या अवयवांचा बऱ्याच जणांना उपयोग होईल .विचार कर. नाहीतरी तू ही बऱ्याचवेळा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतोच.आज ना उद्या तुलाही अवयवाची गरज लागेलच "अमन त्याच्या डोळ्यात रोखून म्हणाला.
" त्यात विचार काय करायचा.आपल्या शरीराचा मेल्यानंतर ही उपयोग होणार यापेक्षा चांगली गोष्ट कोणती ."असे म्हणून त्याने फॉर्मवर सही केली.
"ठीक आहे .झोप आता .सकाळी चेक करून डिस्चार्जचा निर्णय घेऊ."
मध्येच कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. तो उठून खिडकीसमोर जाऊन उभा राहिला.इतक्यात एक वॉर्डबॉय आत आला.
मी वसंत.डॉ.अमननी तुमचे पेपर आणायला पाठविलेय "तो थंड आवाजात  म्हणाला .

"कुठेय डॉ. अमन ? मला भेटता येईल का त्यांना ?" त्याने हसत विचारले.
"चला ," असे म्हणून वसंत चालू लागला.मागे वळून पाहण्याचे कष्टही त्याने घेतले नाहीत.
 एक अंधारा बोळ पार करून दोघेही त्या मोठ्या खोलीत शिरले. तेथील वासानेच त्याला मळमळू लागले. संपूर्ण पांढऱ्या टाईल्स लावलेली ती मोठी खोली होती.तिथे तीन चार सिमेंटचे ओटे बांधले होते.
त्यातील दोन ओट्यावर दोन व्यक्ती संपूर्ण नग्नपणे झोपल्या होत्या.त्यातील एक स्त्री तर एक पुरुष होता.दोघांचेही चेहरे पांढऱ्या वस्त्राने झाकले होते. त्या स्त्रीचे पोट फाडून आतडी बाहेर ठेवली होती.
सॅनिटाईझर आणि प्रेताचा कुबट वास सगळीकडे पसरला होता.
"ओ मला इथे काय आहे ? " तो ओरडला. 
" हे शवगृह आहे.इथे पोस्टमार्टेम होते."वसंत शांतपणे म्हणाला .
डॉ. अमन इथेच आहे का ..?"
"हो डॉक्टर येतील थोड्या वेळाने पोस्टमार्टेमसाठी.  त्या आधी थोडे खाऊन घेतो. "असे म्हणून वसंताने खुंटीवरच्या बॅगेतून डबा काढला आणि त्या मुदड्याशेजारी बसून शांतपणे खाऊ लागला.
"शी..तुला काहीच कसे वाटत नाही .फाडलेल्या प्रेताच्या बाजूला बसून डबा खायला.."त्याने नाक मुरडत विचारले.
"मग कुठे खाऊ ? तुम्ही ही तुमच्या केबिनमध्ये बसूनच डबा खातात ना ..? तुनच्या टेबलवर लॅपटॉप असतो .फाईल, पेन असते. तसेच माझ्या शेजारी मुडदे असतात .ही करवत असते .हातोडी असते.मुडदयाची फाईल असते. इथे रांग लागलेली असते नेहमी.बाहेर कुठे जाणार.म्हणून इथेच जेवतो आम्ही..चपातीचा तुकडा तोंडात टाकत वसंत म्हणाला." ही आमची कामाची जागा आहे. तुम्हाला  ज्या गोष्टींची गरज लागते ताधि इथेही लागते. तो बघ त्या देव्हाऱ्यात गणपतीही आहे.रोज सकाळी देवपूजाही होते इथे. इथेच चहा कॉफी नाश्ता बनविला जातो.
" तुम्ही डॉक्टर नाही तरीही कसे जमते तुम्हाला हे"त्याने कुतूहलाने विचारले.
 आता डॉक्टर काय प्रत्येक मुडदा फाडत बसणार आहेत का  ? ते आम्हाला सांगतात काय हवे आहे त्यांना.तेच आम्हाला शिकवतात .मग प्रॅक्टिस झाल्यावर सर्व काम सोपे असते .या करवतीने कपाळावर कापायचे. मग डोके उघडून त्यातून मेंदू बाहेर काढून ठेवायचा.मग छाती पार खालपर्यंत कापायची.चाकू हातोड्याने पिंजरा फोडून हृदय ,फुफ्फुस, आतडी बाहेर काढून ठेवायची. पहिल्यांदा कठीण जाते पण एकदा हात बसला की काहीच वाटत नाही. दहा मुडदे फाडले की अकरावा सफाईने फाडता येतो.." वसंताने बाजूच्या ओट्यावरील आतडे हातात घेऊन दाखविले आणि हातातील बाटलीतून घोट घेतला.
त्याने घशातून वर येणारी उलटी कशीतरी थांबवली.
आणि हे काय पितोयस तू..बाटलीकडे बोट दाखवत त्याने विचारले.
" हेच औषध आहे ज्याने सर्व जाणिवा नष्ट होतात" असे बोलून वसंत जोरात हसला.
इतक्यात दरवाजातून अमन आत आला .त्याने त्या नग्न पुरुषाच्या बॉडी शेजारील पेपर हातात घेतले. 
" डोक्याला मार लागून गेलाय. डोक्याचा काही उपयोग नाही.मेंदू बाहेर आलाय त्याचा . बाकी शरीर व्यवस्थित आहे.नीट फाड त्याला.आतील सर्व अवयव व्यवस्थित आहेत.कधीपासून सांगतोय त्याला देहदान कर.आज त्याचे अवयव दुसऱ्यांच्या कामी आले असते .नुसता फॉर्म घेऊन जायचा आणि आज आला तो असा.चल कामाला सुरुवात कर "असे बोलून बाहेर पडला.
"हा अमन माझ्याकडे पाहत का नाही ? त्याला मी दिसत नाही तर तुला कसा दिसतो ?"  त्याने वसंतला विचारले.
" कारण तू मेला आहेस. फूटपाथच्या दगडाला डोके आपटून तुझा मृत्यू झाला .डॉ.अमननेच तुला मृत घोषित केले आणि पोस्टमार्टेमला पाठविले.म्हणून तुला इथे घेऊन आलो. हे तुझे शरीर .चल करायची का सुरवात.." असे बोलत वसंताने करवत हातात घेतली.
"एक मिनिटं, मी तुलाच का दिसतो.आणि तुला भीती वाटत नाही का या मुडदयांची,या जागेची."तो नजर रोखून म्हणाला.
"पूर्वी वाटायची आता नाही वाटत. कारण भीतीचीही सवय होते. "त्या नग्न मुदड्याच्या तोंडावरील पांढरे कापड दूर करून हातात करवत घेत वसंत म्हणाला .
त्याने जवळ जाऊन पाहिले तेव्हा तोच ओट्यावर झोपला होता.डोके फुटून त्याचा मेंदू बाहेर आला होता आणि वसंत शांतपणे करवतीने त्याचे डोके कापीत होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Friday, August 19, 2022

श्रीकृष्ण जन्म

श्रीकृष्ण जन्म 
"आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे .लक्षात आहे ना ? रात्री बारा वाजता पूजा करायची आहे त्यानंतर भजन ."सासूने बाहेरून आवाज दिला आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
रात्री एक वाजेपर्यंत ती ऑनलाइन काम करत होती.हल्ली आयटीवाले ही हुशार झालेत . सतत वॉच ठेवून असतात.काम संपायला दीड वाजला आणि नंतर नवऱ्याने बेडवर आपला हक्क गाजवलाच. ह्याचे बरे असते इच्छा झाली की काळवेळ बघणार नाही पण आमची इच्छा झाली की याना कामे असतात.
सकाळी सातला जाग आली.डोळे चोळत ती बेडरूममधून बाहेर आली तेव्हा सासूच्या कपाळावरच्या आठ्या अधिक स्पष्ट झाल्या. सासर्याने हातातील पेपर बाजूला करून फक्त घडाळ्याकडे पाहिले.ती किचनमध्ये चहा पीत असतानाच सासूबाईनी जन्माष्टमीची आठवण करून दिली .
"अरे देवा, म्हणजे आजही जागरण का ? कशाला हा श्रीकृष्ण रात्री बारा वाजता जन्माला आला ? ती मनोमन चरफडली. 
म्हणजे आज साग्रसंगीत जागरण.पैठणी नेसा,दागिने घाला ,नथ घाला. मग नवऱ्याची कौतुकाची नजर पहा .सोसायटीतील इतर बायकांच्या मत्सरी तर पुरुषांच्या वासनेच्या नजरा सहन करा.त्यानंतर भजन ,गाणी ,रात्री बेडरूममध्ये पुन्हा जागरण .देवा का आलास तू रात्री जन्माला ? तिने मनात पुटपुटत हताश नजरेने श्रीकृष्णाच्या फोटोकडे पाहिले. फोटोत तो नेहमीसारखा बासरी वाजवत उभा होता. पण यावेळी अचानक तिला त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमटलेले दिसले.फारसा विचार न करता तिने आवरायला घेतले.
ती एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर होती.कंपनीचे बरेचसे काम परदेशी कंपन्यांसोबत असल्याने तिला दिवसरात्र मिटिंग कराव्या लागत.मोठ्या महत्वाकांक्षा असल्याने तिने सगळे लक्ष कामावरच केंद्रित केले होते.घरी सासुसासरे होते .थोडे जुन्या वळणाचे रीतीभाती,परंपरा, संस्कार  धरून वागणारे. कधी कधी छोट्या कुरबुरी व्हायच्या पण ती फारसे लक्ष देत नव्हती.घरी सणवार असले की हमखास छोटे वाद व्हायचे.
 ही फारशी धार्मिक नव्हती .जमेल तेव्हाच अश्या सण समारंभात भाग घ्यायची .पण रात्र म्हटली की अंगावर काटा यायचा .
शेवटी तिला जे वाटले होते तसेच झाले. मनासारखे झाल्यामुळे सासूबाई खुश होत्या .रात्री नवरा ही खुश. पहाटेचे तीन वाजले झोपायला. उद्याच्या  गोविंदाची सरकारने सुट्टी जाहीर केली होती.त्यामुळे नवऱ्याला उठायची घाई नव्हती पण हिला लोळत राहून कसे चालेल ? घरातली कर्ती गृहलक्ष्मी अशी वागली तर कसे चालेल ? तिला ऑफिस असल्यामुळे सकाळी सहाला उठून तयारी करावीच लागणार होती. रात्री झोपताना देवघरातील बाळकृष्णाकडे नजर टाकून ती झोपायला गेली.पण बाळकृष्ण  मिश्किलपणे हसतोय असे क्षणभर तिला वाटून गेले.
सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये शिरली तेव्हा थोडासा थकवा तिला जाणवत होता.आल्याआल्या बॉसने तिची  नवीन क्लायंटबरोबर मिटिंग फिक्स केली.
"अरे देवा ! आहेच का मिटिंग "? का रे बाबा ह्या श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झाला .सर्व श्येड्युलची वाट लावली याने.समोर तीन लाखाची हंडी आहे तीही पाहायला मुकणार मी ..असे मनात म्हणत तिने लॅपटॉप ऑन केला .
थोड्या वेळाने तिला मिटिंगची नोटिफिकेशन आली.ती क्लीक करताच कॅमेरा ऑन झाला आणि त्या क्लायंटचा चेहरा समोर आला .
तो चेहरा पाहताच ती स्तब्ध झाली. हा चेहरा तिला ओळखीचा वाटू लागला. तो दिसायला सुंदर होता. डोळ्यात एक मिस्कील हास्य होते पण चेहरा आश्वासक होता.हातात फिगेट स्पिनर घेऊन मधेमधे बोटावर फिरवत होता.ती तो कोणत्या देशाचा आहे ते विचारायलाच विसरली.
"सॉरी, आज तुमचा मोठा सण आहे. तरीही मिटिंग फिक्स करावी लागली".त्याने दिलगिरी व्यक्त करत मिटिंगला सुरवात केली. चेहऱ्याप्रमाणे त्याचा स्वरही मधुर होता.
महत्वाचे मुद्दे फायनल होताच त्याने तिची चौकशी करण्यास सुरुवात केली."आज मोठा सण आहे तुमच्या महाराष्ट्रात .बरेच लोक दहीहंडी फोडायला बाहेर पडतात असे ऐकून आहे मी "त्याने विचारले .
"हो आणि मोठमोठे थर लावायच्या उत्साहात हातपाय तोडून घेतात आणि जन्मभर अपंग बनून राहतात. बायकांना त्यांची आयुष्यभर सेवा करत राहावी लागते .खेळ त्यांचा शिक्षा स्त्रियांना. आदल्या दिवशी रात्रीपासूनच घरातील स्त्रीची धावपळ असते ती वेगळीच."ती पटकन रागात बोलून गेली.
"हो हो ..शांत व्हा "तो हसत म्हणाला .सण आहेत तर हे सर्व होणारच .भारतातील बहुसंख्य सणात स्त्रियांना मोठा सहभाग असतो .त्यांचा उत्साह प्रचंड असतो .शिवाय नटण्यामुरडण्याची हौस भागते. 
"सर ,अजूनही इथे स्त्री फक्त शोभेची बाहुली म्हणूनच ओळखली जाते.छान सुंदर दिसावी . नवऱ्याची सेवा करावी.घरच्यांची काळजी घ्यावी यासाठीच स्त्री हवीय.अजूनही स्त्रीकडे समानतेचा दर्जा नाही .मुलगी झाली की घरातील  कमीतकमी एका व्यक्तीचे नाक मुरडले जाते. आता तर काय तिने बाहेरही काम करून पैसे आणावेत आणि घरातली कामे ही करावी अशी अपेक्षा करतात.कालचेच बघा हे आमचे भगवान श्रीकृष्ण रात्री बारा वाजता जन्माला आले म्हणून त्याच वेळी त्यांची पूजा केली जाते शिवाय दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून त्याचा वाढदिवस साजरा केला जातो " ती चिडून म्हणाली तसा समोरचा चपापला.
"आहो, हल्ली बरेचजण रात्री बारा वाजता वाढदिवस साजरे करतात."तो हळुवारपणे म्हणाला.
"हो, पण ते सगळ्यांना वेठीस धरत नाहीत.केक कापतात झोपून जातात."ती अजून चिडली.
"नशिब काल रात्री माझी मिटिंग नव्हती.म्हटले लवकर झोपू तर या देवाचा रात्री बारा वाजता जन्म मग त्यासाठी जागरण. त्यानंतर इतर कामे.असे बोलून ती थांबली .रात्रीच्या आठवणीने तिचा चेहरा गुलाबी झाला.
"ओके ओके कळलं "तो हसून म्हणाला."म्हणजे आता तुमच्या सोयीनुसार सण साजरे करावे का ?"
"होय..काही गोष्टींमुळे आमच्या आयुष्यावर बरे वाईट परिणाम होत असतील तर त्याचा विचार  स्त्रियांनी नक्कीच केला पाहिजे. नाहीतर स्त्रियाना समानतेचा संदेश देऊ नका ."ती चिडून म्हणाली.
"तुमचे विचार फारच वादग्रस्त आहेत.पण बोलून छान वाटले.असे म्हणून तो हसला आणि कॅमेरा बंद केला.त्याचे ते हास्य पाहून ती चमकली.हे हास्य तिने काल पाहिले होते.
इथे लॅपटॉप बंद करून तो उठला.त्याने शेजारी बसलेल्या आपल्या मित्रांकडे पाहिले आणि म्हणाला "खरोखर बारा वाजता मी  जन्म घेऊन आताच्या पिढीला त्रास देतोय का "?
तो मित्र खुर्चीतून उठला आणि  आपल्या अधू पायाने लंगडत त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला "काळाबरोबर काही गोष्टी बदलायला हव्या हे खरे आहे.चल आपण लोणी खाऊ."
दोघेही काही न बोलता एकमेकांच्या गळ्यात हात टाकून ऑफिस मधून बाहेर पडले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, August 4, 2022

इग्लोरीयस बास्टर्ड.

इग्लोरीयस बास्टर्ड...2005
INGLORIOUS BASTERDS
1941
फ्रान्समधील एका छोट्या सुंदर गावात तो शेतकरी आपल्या तीन मुलींसमावेत सुखाने राहत होता . दुसरे महायुद्ध सुरू होते आणि जर्मन सेनेने फ्रांस ताब्यात घेतला होता .अचानक एक दिवस एक जर्मन अधिकारी  कर्नल हांस आपल्या काही सैनिकांना घेऊन त्या शेतकऱ्याच्या  दारात उभा राहिला . कर्नल हांसला  ज्यू हंटर असे टोपण नाव दिले होते.ज्यूना शोधून त्यांचा खातमा करणे हेच त्यांचे प्रमुख काम होते .कर्नल  हांसने अति सभ्यतेचा आव आणत चेहऱ्यावर मिश्किल मित्रत्वाचे हासू खेळवत त्या शेतकऱ्याकडे ज्यूंची चौकशी करू लागला . शेवटी त्याने हतबल होऊन जमिनीखाली लपलेल्या ज्यूंच्या जागेकडे बोट दाखविले. काही क्षणात सैनिकांनी गोळीबार करून त्या ज्यू कुटुंबाला संपविले . पण त्यातील एक ज्यू मुलगी निसटली .
चार वर्षानंतर त्या ज्यू मुलीने पॅरिसमध्ये एक चित्रपटगृह चालवायला घेतले . एक जर्मन अधिकारी फ़ॅड्रीक झोलर ज्याने एकट्याने  तीन दिवसात जवळजवळ तीनशे ब्रिटिश अमेरिकन सैनिक मारले होते तिच्या प्रेमात पडला.जोसेफ गोबल्स हिटलरचा खास माणूस. त्याने अनेक जर्मन चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याने त्या जर्मन अधिकाऱ्यावर अ नेशन प्राईड नावाचा चित्रपट काढला. त्या चित्रपटाचा प्रीमियर त्या मुलीच्या चित्रपटगृहात व्हावी अशी झोलरची इच्छा होती . ती गोबल्सने मान्य केली .
 इग्लोरीयस बास्टर्ड हे अमेरिकेचे छुपे सैनिकी युनिट होते. यात ज्यू सैनिकांचा भरणा होता . युनिफॉर्म घातलेल्या प्रत्येक नाझी सैनिकाला मारणे हेच त्यांचे काम.त्या युनिटची दहशत प्रत्यक्ष हिटलरलाही होती.लेफ्टनंट अल्डो राईन युनिट प्रमुख होता .
 अ नेशन प्राईड पाहायला प्रत्यक्ष हिटलर येणार होता .त्याच्या सोबत  गोरिंग ,बोरमन  मंडळीही हजर राहणार होती. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन या सर्वांना ठार करण्याची योजना आखली गेली आणि  इग्लोरीयस बास्टर्डवर ही कामगिरी सोपविण्यात आली. कर्नल  हांस या योजनेतील प्रमुख अडसर होता .त्याची नजर प्रत्येकावर होती.
ही कामगिरी यशस्वी होईल का ..?? हिटलरला मारण्यासाठी अजून कितीजणांनी योजना आखल्यात ?? कोणाची योजना यशस्वी होईल ..??
चित्रपटात लक्षात राहतो तो कर्नल  हांस लांडा. ख्रिस्तोफ वॉल्टझने हांसची भूमिका केली आहे.थंड रक्ताचा ,क्रूर आणि मनात काही ठाम ठरवून अतिसभ्य आणि नम्रपणाचा आव आणणारा कर्नल त्याने प्रभावीपणे उभा केला आहे . इग्लोरीयस बास्टर्डचा प्रमुख लेफ्टनंट अल्डोची भूमिका ब्रॅन्ड पिटने केली आहे . त्याची भूमिका छोटी आहे .
चित्रपटात लक्षात राहतात ही भयानक दृश्य. डोक्याची कातडी सोलणे, बेसबॉल बॅटने डोके फोडणे .कपाळावर चाकूने नाझीचे स्वस्तिक रेखाटने अशी काही क्रूर दृश्य चित्रपटात पाहताना अंगावर शहारे येतात .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Tuesday, August 2, 2022

माय कम्फर्ट फूड

#संकल्पना
#MyComfortFood
माय कम्फर्ट फूड
खरे तर मी खाण्याच्या बाबतीत फार हौशी नाही . पण बऱ्याचदा वेगळी डिश टेस्ट करायला आवडते. त्यातही मांसाहार करण्यात जास्त भर असतो .मला जेवणाची रेसिपी बघायला खूप आवडते. त्यांचे प्रेझेन्टेशन उत्तम असते.त्यावेळी वाटते जेवण बनविणे फार सोपे आहे पण प्रत्यक्षात कठीणच असते .
ऑम्लेट बऱ्याचजणांना बनविता येते .पहिल्यांदा थोडा त्रास होतो पण हळूहळू हात बसतो .माझाही हात बसला मग त्यानंतर मी अंड्यावर अनेक प्रयोग केले . त्यात बुर्जी, उकडलेल्या अंड्याची बुर्जी कधी कधी तव्यावर  कांदा टोमॅटो टाकून भाजी.तर कधी नुसती फ्राय. सोबतीला पाव असतातच . मग तितके पोट भरण्यासाठी पुरेसे असते .
पण अंडी किती खाणार ??   रोज तेचतेच  खाऊ शकत नाही ना ..?? मग मॅगी आहेच की..! 
 दोन मिनिटात तयार होणाऱ्या या पदार्थाने जगाला भुरळ पाडली आहे . उकळत्या पाण्यात मॅगी टाकायची आणि त्यांनी दिलेला मसाला टाकायचा आणि फक्त दोन मिनिटे ढवळायचे, झाली तुमची डिश तयार. 
पण नंतर त्याचाही कंटाळा आला.चला नवीन प्रयोग करून पाहू .मग त्या मॅगीत कांदा टोमॅटो आला .तिखटपणा हवा म्हणून मसाले आले .फ्रीजमध्ये काही मिळते का ते पाहू लागलो . कधी कधी मक्याचे दाणे असायचे तर कधी चणे.कधी कधी तर कोबी आणि बिट ही सापडायचा . मग ते ही मॅगीत एकरूप व्हायचे .आणि फ्रीझमधील नावडत्या वस्तू ही संपायच्या .
हल्ली रेडी टू इटचा जमाना आलाय .त्यात वेगवेगळे अँप तुम्हाला वेगवेगळ्या रेडी टू इट द्यायला तयार असतात .आहो व्हेज नॉनव्हेज काहीही मिळतील फक्त ऑर्डर करा आणि विडिओ पाहून बनवा .
शेवटी जिथे पैश्याचा आणि चवीचा प्रश्न येतो तेव्हा मॅगी आणि ऑम्लेट हेच आपले कम्फर्ट फूड आहे.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Wednesday, July 27, 2022

मुनिच


मुनिच
साल 1972 
मुनिक ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या इस्रायली गेस्ट हाऊसमध्ये अचानक काही लोक हातात बंदुका घेऊन घुसले . त्यांनी अकरा इस्रायली खेळाडूंना बंदी बनवून ताब्यात घेतले. स्वतःला ब्लॅक सप्टेंबर  म्हणवून घेणाऱ्या पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी ही जबाबदारी घेतली आणि त्या अकरा खेळाडूंना ठार केले .इस्रायलने या घटनेचा सूड घेण्याचे ठरविले आणि एक भयंकर योजना आकारास आली .त्या अतिरेक्यांना शोधून काढून ठार मारण्याची जबाबदारी मोसाद स्वीकारते.त्यासाठी त्यांनी एक सर्वोकृष्ट एजंट निवडला. पण आधी त्याला मोसादमधून राजीनामा घेऊन बाहेर काढले गेले. यापुढे त्यांच्याबाबतीत घडणाऱ्या कोणत्याही घटनेशी मोसाद आणि इस्रायलचा संबंध येणार नव्हता. जे अतिरेकी निवडले गेलेत त्यांना फक्त युरोपमध्येच ठार मारण्याचा हुकूम होता .
मग सुरू झाला प्रमुख गुन्हेगारांचा शोध. प्रत्येकाचा माग काढून त्याची शिकार केली गेली .अचूक प्लॅन, त्यानुसार हालचाली ,योग्यवेळी प्रसंगावधान हेच मोसादचे वैशिष्ट्य होते. 
स्टीव्हन स्पिलबर्गचे अप्रतिम दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 23 डिसेंबर 2005 साली प्रदर्शित झाला आणि 1972 साली घडलेल्या मुनिक हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या.अप्रतिम चित्रीकरण असलेला हा चित्रपट आपल्याला 72 च्या काळात घेऊन जातो.तेव्हाचे तंत्रज्ञान वापरून  गुन्हेगारांना ठार मारण्याचे कसब पाहून आपण आश्चर्यचकित होतो.
डॅनियल क्रेग ,एरीक बाना सारखी तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट एकदातरी पाहायला हवा.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे .

Sunday, July 10, 2022

शीख.... खुशवंत सिंह


शीख.... खुशवंत सिंह
अनुवाद..प्रशांत तळणीकर
चिनार पब्लिशर्स
खुशवंत सिंह यांच्या लेखणीतून उतरलेली एक वेगळी कलाकृती .त्यांच्या नेहमीच्या वादग्रस्त लिखाणापेक्षा वेगळेच आहे . यात त्यांनी शीख धर्माचा संपूर्ण इतिहास लिहिला आहे . शिख धर्माचे संस्थापक  गुरु नानक ( १४६९ ते १५३९ ) यांच्यापासून सुरवात होते . त्यानंतर आलेल्या प्रत्येक धर्मगुरूंनी शीख धर्म कसा वाढवत नेला त्याविषयी विस्तृत माहिती त्यांनी यात दिली आहे.
ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य लढ्यात शीख धर्मियांचे मोठे योगदान आहे .त्यांचा स्वातंत्र्यलढा ,जालियनवाला बाग हत्याकांड ,स्वातंत्र्यानंतर झालेल्या दंगली आणि त्यात झालेली प्रचंड हिंसा याचे हृदयद्रावक वर्णन लेखकाने केले आहे .
गुरू ग्रंथसाहेब या पूज्यनिय पवित्र ग्रंथाचा जन्म आणि त्याचे महत्व अतिशय सुंदरपणे रेखाटले आहे.

Saturday, July 9, 2022

पावनखिंड.....रणजित देसाई

पावनखिंड.....रणजित देसाई 
मेहता पब्लिशिंग हाऊस
आतापर्यंत आपल्याला पावनखिंड म्हटली की फक्त बाजीप्रभू देशपांडे आठवतात. छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिताफीने बाहेर काढून त्यांना विशाळगडावर सुखरूप पोचविण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती आणि आपल्या प्राणांची आहुती देऊन त्यांनी ती पार पाडली.
पण  बाजीप्रभू देशपांडे कोण आहेत ?? त्यांचा परिवार ,त्यांची हुशारी, त्यांची दूरदृष्टी या पुस्तकात लेखकाने सांगितली आहे .
बाजीप्रभू  हे बादलांचे सचिव .महाराजांनी खलिता पाठवून बांदलाना स्वराज्यात सामील होण्याची विनंती केली.पण त्यांनी ती नाकारली . नाईलाजाने महाराजांनी रोहिडा किल्ल्यावर हल्ला केला आणि बाजींचे मन जिकले त्यांना स्वराज्याचे महत्व सांगितले. तेव्हापासून बाजीप्रभू देशपांडे महाराजांचे भक्त झाले.
बाजींच्या मार्गदर्शनाखाली जासलोक गडाची दुरुस्ती केली गेली. अफझलखानाच्या मोहिमेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली . त्यांना माणसांची चांगली पारख होती. कोणत्या जागी कोणता माणूस उपयोगी पडेल याची त्यांना जाण होती.
भीमा झुनके मावळा लंगडा होता पण झाड तोंडणीत कोणीही त्याचा हात धरू शकत नव्हता. अफझलखानच्या स्वारीत त्यांनी इतकी बेमालूनपणे झाडे कापली होती की लहान मुलांच्या धक्क्याने ही ती पडतील आणि रस्ते बंद होतील.
 सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला तेव्हा  बाजीप्रभू देशपांड्यांनी  महाराजांना पन्हाळ्यावरून  विशाळगडावर पोचविण्याची जबाबदारी घेतली .रात्रीच्या अंधारात भर पावसात त्यांनी महाराजांना गडाबाहेर काढून विशाळगडाकडे कूच केले पण शत्रूला त्याचा सुगावा लागताच पाठलाग सुरू झाला .विशाळगड काही अंतरावर असतानाच शत्रू जवळ आला आणि त्यांना घोडखिंडीत अडविण्याची जबाबदारी बाजींनी आपल्या खांद्यावर घेतली. बाजींनी आपल्या बांदल सेनेसह सिद्धी जोहरच्या सेनेला घोडखिंडीत अडवून धरले. महाराज गडावर पोचेपर्यंत ते लढत राहिले .शेवटी तोफेचा आवाज ऐकून त्यानी प्राण सोडले.त्यांच्या पराक्रमाला वंदन करून घोडखिंडीचे नाव पावनखिंड करण्यात आले .
लेखकाने अतिशय बारकाईने आणि अचूकतेने बाजीप्रभूंचे चरित्र लिहिले आहे . महाराजांच्या निष्ठावान शिलेदाराची ही कादंबरी वाचायलाच हवी.