Thursday, October 5, 2023

क्रॅकडाऊन

क्रॅकडाऊन
काश्मीर मधील छोट्या गावात रॉच्या रियाझ पठाण आणि त्याच्या साथीदारांना एका घरात चार अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली .त्यांनी हल्ला करून चारही अतिरेक्यांना ठार मारले पण तिथे मारियम नावाची तरुणीही .तीही त्या हल्ल्यात ठार झाली.ती अचानक तिथे कशी कोणाला भेटायला आली याविषयी रॉकडे कोणतीच माहिती नव्हती.
अश्विनी रॉचा हेड.त्याने दिव्याला एका लग्नात पाहिले.दिव्या ब्युटीशियन होती.दिव्या हुबेहूब मारियमसारखी दिसत होती.अश्विनीने पठाणला दिव्याला मारियम बनविण्याची जबाबदारी दिली. तिला शत्रूच्या गोटात सोडून अधिकाधिक माहिती काढायची असा पठाण आणि अश्विनीचा प्लॅन होता. ठरल्याप्रमाणे प्लॅन यशस्वी झाला आणि दिव्याच्या मदतीने कट्टर अतिरेकी हमीद मारला गेला .पण इथेच काही संपले नव्हते .हमीदने मरणापूर्वीच तसे पठाणला सांगितले .याहून ही भयानक काही घडणार आहे निश्चित.
रॉच्या कार्यालयात बॉम्बस्फोट होतो .अश्विनी आणि रॉचे एजंट मारले जातात.यातून पठाण वाचतो.रॉचा नवीन चीफ झोरावर याची जबाबदारी पठाणवर टाकतो .
अफगाणिस्तानातील तुरुंगातून आयएसआय  अझीझ काझीची सुटका करते आणि तो दिल्लीत येतो. त्याच्याकडे स्लीपर सेलची लिस्ट आहे . त्यानेच रॉच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणलाय असा संशय आहे. आता तो अजून मोठा घातपात घडविणार आहे.
हा मोठा घातपात पठाण आणि दिव्या थांबवू शकतील का ?? काझी आपल्या योजनेत यशस्वी होईल का ? रॉमध्ये गद्दार कोण आहेत ?
श्रिया पिळगावकर ,सकीब सलीम, यात प्रमुख कलाकार आहेत.
जिओसिनेमावर फ्रीमध्ये ही सिरीज आहे .

Wednesday, October 4, 2023

प्रतिपश्चंद्र

प्रतिपश्चंद्र
डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे 
न्यू इरा प्रकाशन 
विजयनगर साम्राज्यातील राजांना आपल्या भूमीवर आज ना उद्या परकीय आक्रमण होणार हे माहीत होते.कारण शत्रू उत्तरेकडून निघाला होता. म्हणून त्यांनी दक्षिणेकडील सर्व राज्यांचा खजिना एकत्र करायला सुरुवात केली.
साधारण सोळाशे हत्तीवरून ती प्रचंड संपत्ती एके ठिकाणी एकत्र केली गेली .पण आज ना उद्या ते ठिकाण त्यांना सापडेल म्हणून सुमारे पंचवीस वर्षे हळूहळू तो खजिना पुन्हा दुसरीकडे हलविला गेला .
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ताबडतोब महाराजांनी दक्षिणेकडे मोहीम काढली. या मोहिमेत ते सर्वाना भेटले .अनेक करार केले .अनेक लोक त्यांना भेटायला यायचे .त्यात ते दोघे होते.चेहऱ्यावरून पितापुत्र वाटत होते .एक वृद्ध तर दुसरा तरुण .दोघांनी शिवाजी महाराजांची एकांतात भेट घेतली आणि विजयनगरच्या खजिन्याचे रहस्य त्यांना सांगितले.महाराजांनी आपण त्या खजिन्याचे मालक होणार नाही तर रक्षक होऊ असा शब्द त्यांना दिला .
बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक योजना आखून तो खजिना बंद केला .बहिर्जी नाईकांनी काही शिलेदारांची निवड त्या खजिन्याच्या रक्षणासाठी केली.आता त्या खजिन्याची जबाबदारी त्या शिलेदारांवर पिढ्यानपिढ्या राहणार होती. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते रहस्य सुपूर्द केले जात होते.
 मानसोपचारतज्ञ डॉ. रवीकुमार औरंगाबादला एका कॉन्फरन्ससाठी आपला मित्र आदित्यसोबत आला होता. न्यायमूर्ती कृष्णकांत दीक्षित यांच्या वाढदिवसाची पार्टीही त्याच हॉटेलमध्ये होती जिथे रवीकुमार आणि आदित्य थांबले होते.न्यायमूर्ती कृष्णकांत दळवी यांनी रवीकुमारवर विशेष लक्ष दिले .त्यांनी त्याला एक बुद्धमूर्ती गिफ्ट म्हणून दिली.पण दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या रूममध्ये कृष्णकांत दीक्षित गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले.आय बी ऑफिसर विजय मानेने त्यांच्या मृत्यूची जबाबदारी रवीकुमार  टाकली.
रवीकुमार आणि आदित्यच्या जामीनाची व्यवस्था प्रियल ह्या तरुणीने केली .पण आता डॉ. रवीकुमारला सत्य काय आहे ते शोधून काढायचे आहे .त्याने बुद्ध मूर्तीची कसून पाहणी केली आणि त्याला पहिला संदेश सापडला.
वीस वर्षांपूर्वी  हम्पीच्या भग्न अवशेषात प्रशील सोनवणेला अथक परिश्रमातून हवी ती वस्तू सापडली आणि तो ताबडतोब डॉ.रंगनाथस्वामींकडे आला .डॉ.स्वामींनी ती वस्तू चेक करून त्याला सरकारी वकील कृष्णकांत दीक्षित यांच्या हाती सुपूर्द केली होती.पण काहीवेळातच त्याला डॉ.स्वामींच्या खुनाची वार्ता कानावर आली .आपल्याही जीवाला धोका आहे हे तो समजून गेला .घरी गेल्यावर त्याला आपली पत्नी मृतावस्थेत सापडली .तो आपल्या मुलीला घेऊन ताबडतोब फरार झाला .
काय आहे हे खजिन्याचे रहस्य ज्यामुळे अनेकांचे जीव जातायत. रवीकुमार आणि आदित्य ,प्रियल ह्या खजिन्यापर्यंत पोचतील का ?

Monday, October 2, 2023

द बोन कलेक्टर

The Bone Collector (1999 )
द बोन कलेक्टर
लिंकन रायम पोलीस अधिकारी होता.एक फॉरेन्सिक एक्सपर्ट असे त्याला म्हटले जायचे. अनेक केसेस यशस्वीरित्या सोडविल्या होत्या. एका केसचा तपास करताना त्याचा अपघात झाला .आता तो बेडवर पडून आहे.त्याच्या फक्त मानेवरील भाग हालचाल करतो आणि डाव्या हाताचे पाहिले बोट चालते. त्याच्या मदतीला चोवीस तास नर्स आहे. त्याने अनेक पुस्तके ही लिहिलीत .अजूनही तो पोलीस खात्यात आहे .किचकट गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना मदत करतो .
अमेलिया  तरुण पोलीस ऑफिसर. ती नुकतीच पोलिसात भरती झालीय.
एक करोडपती बिल्डर आणि त्याच्या पत्नीचे विमानतळावरून अपहरण होते. अमेलियाला त्या बिल्डरची बॉडी जुन्या रेल्वे स्टेशनजवळ जुन्या रेल्वे रुळाजवळ सापडते. टीम येईपर्यंत ती सर्व पुराव्यांचे फोटो काढते. 
पोलीस मदतीसाठी लिंकनकडे येतात .लिंकन अमेलियाचे काम पाहून खुश होतो आणि अमेलियाला या तपासात येण्याचा आग्रह करतो .तिने दिलेल्या पुराव्यावरून तो बिल्डरच्या पत्नीपर्यंत पोचतो पण त्या आधीच तिचाही खून झालेला असतो .लिंकन पुन्हा अमेलियाकडून पुरावे गोळा करून घेतो.
खुनी खून करून एक पुरावा जाणूनबुजून मागे ठेवत असतो. तो जणू काही लिंकनला चॅलेंज देत असतो.
असे कोणते पुरावे आहेत जे त्या खुन्यापर्यंत लिंकनला घेऊन जातील. इथे बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. लिंकनच्या सोबत आता अमेलिया आहे. 
लिंकन आणि अमेलिया खुन्याला पकडण्यात यशस्वी होतील.
यात डेंझल वॉशिंग्टन लिंकनच्या प्रमुख भूमिकेत आहे. तो संपूर्ण चित्रपट बेडवर हालचाल न करता पडून आहे.तो चेहऱ्यातून आणि डोळ्यातून अभिनय करतो आणि ठामपणे बोलतो. तर अँजेलिना ज्यूली अमेलियाच्या भूमिकेत आहे. ती डेंझल वॉशिंग्टन समोर खंबीरपणे उभी राहिलीय.
1999 चा हा गाजलेला चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

Sunday, October 1, 2023

पाट

पाट
"चला, यावर्षीही सगळे पाट संपले बघ.गजानना तुझीच रे ही कृपा " राम मार्केटमधील आपले दुकान आवरीत गजा पावसकर मुलाला पाठीवर धपाटा मारीत म्हणाले. 
"बाबा दरवर्षी आपले पाट संपतात .गणपती दरवर्षी नवीन पाटावर बसून येतो का ?" समीर पाठ चोळत म्हणाला .
"छे रे ,त्याला काय फरक पडतो पाटाचा .अरे साधी मातीची मूर्ती ती.आपल्याला धंदा करायचा असतो .त्यामुळे पाट हलकेच बनवावे लागतात .नाहीतर दरवर्षी विकत कोण घेईल आपले पाट. दोन वर्षात पाट बदलावे लागतील असेच पाट बनवितो आपण.आणि काहीकाही इतके हलके असतात की गणपती त्या पाटासकट वाहून जातो "खो खो हसत गजा म्हणाला.
हा आमचा गजा पावसकर म्हणजे पक्का व्यवहारी .ह्याचा व्यवहार पाहून हा कोकणातला आहे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.
आहो स्वतःच्या मुलांकडून ही पैसे घेईल ,फुकट देणार नाही.राम मार्केटमध्ये त्याचे लाकडी वस्तूंचे दुकान होते.म्हणजे टेबल ,चौरंग ,पोळीपाट लाटणे वगैरे. आपल्या वस्तू कश्या संपवायच्या याचे नेमके ज्ञान होते त्याला .
"बाबा आपण ही यावर्षी पाट बदलायचा का ?"चार हात लांब होत समीरने विचारले.
" वेडा झालास का ? घोडेने गवताशी दोस्ती केली तो खायेगा क्या ?"कुठेतरी वाचलेला एक डायलॉग त्याच्या तोंडावर फेकून गजाने त्याला जवळ बोलावले.
पण समीरला परिणामांची कल्पना होती .तो अजून दूर सरकला.
गजाच्या खिशातून दहा रुपयांची नोट काढणे ही दिव्यच होते. भलेभले तो प्रयत्न करून थकले होते. त्या भल्याभल्यात त्याची पत्नी ,समीर, आणि बाबा इतकीच माणसे येत होती.शेजारीपाजारी तर याला हाय हॅलो म्हणायचेही पैसे घेईल या भीतीने शांतच राहत होते.
"बाळा आपल्याकडे गणपती एक जुनी परंपरा म्हणून येतो.आपण कोकणवासी एकदम रूढी परंपरा संस्कृती पाळणारे म्हणून जगात आपल्या गणपतीला मान आहे." 
"मुंबईत आल्यापासून परत कधी गावी गेलात का ?" हा प्रश्न समीरने गाडीवरच्या पाणीपुरी खाणाऱ्या मुलीकडे पाहत गिळून टाकला.
"आपण सर्व वर्षानुवर्षे वापरत असलेल्या वस्तूच वापरतो . त्यामुळे गणपती खुश असतो आपल्यावर. आपला  चौरंग साधारण ऐंशी वर्ष जुना आहे .आजोबांनी तेव्हा मधल्या आळीतून घेतला होता .तिथेच बाजूला टिळक राहायचे म्हणे." गजा शून्यात नजर ठेवून म्हणाला.
बाबांनी इतकी नजर कुठे लावली आहे हे समीरने पाहिले आणि तो चमकला .लाकडी चाळीतील सुनंदा पारकर आपले दुकान बंद करत होती.
"चौरंगाचे ठीक आहे पण निदान पाट तरी बदलू."समीर आता बिनधास्तपणे म्हणाला.सुनंदा पारकरसमोर तरी बाप धपाटा मारणार नाही याची खात्री होती त्याला .
" आपण काही बदलायचे नाही .गणपतीला आवडणार नाही." निर्वाणीचा इशारा नजरेतून देत गजा समीरकडे रोखून बघत म्हणाला .
"पण कितीतरी लोक दरवर्षी पाट बदलतात ,डेकोरेशन बदलतात काहीजण मूर्तीही बदलतात " आपण सुनंदा पारकरच्या जवळ आलोत याचा फायदा घेत समीर म्हणाला .
गजा चिडून समीरकडे सरकणार  इतक्यात सुनंदा पारकरची मधुर हाक त्याच्या कानावर पडली.
"काय गजाशेठ आज लवकर दुकान बंद केलेत "
तो स्वर ऐकताच गजा पाघळला .
"गजासेठ नका बोलू हो ,गजानन किंवा गजाननराव बोला " तो ही हळुवार आवाजात उत्तरला .
आख्खे मार्केट याला गजा नावाने ओळखते आणि याला गजाननराव बोलायचे .च्यायला माझे मित्र ही यांना गजाच बोलतात .नशीब माझा बाप आहे नाहीतर मलाही गजाच बोलावे लागले असते " समीर मनातल्या मनात पुटपुटला.
आज गणपती येणार .गजाच्या घरात गडबड उडाली होती. म्हणजे बाकी सर्व शांत होते फक्त गजाचाच आवाज ऐकू येत होता.मखर तर रेडी होता. बाकी डेकोरेशनही तयार होते. आता फक्त बाप्पाच्या आगमनाची सर्व वाट पाहत होते.
गजाच्या हातावर बसून तो घरात आला आणि थोड्या नाराजीनेच मखरात बसला .
"तुम्ही का येता यांच्याकडे ?" पाटाच्या भेगेतून आपली शेपटी सोडवत उंदीर म्हणाला." माझी शेपटी बघा काय हालत झालीय. गेली कित्येक वर्षे या पाटावर बसून येतोय आता भेगा पडल्यात त्याला .तो बदलायची तरी बुद्धी द्या."
" माझीही हालत फारशी चांगली नाहीय.चौरंग कसा डुगडुगतोय बघ " समीर आधी मला बसवितो मगच चौरंगाचा बॅलन्स सेट करतो .
खरेच बाप्पाला बसविल्यावर समीरने चौरंग सेट केला .योग्य ठिकाणी पॅकिंग दिले.
"तुझी शेपटीच अडकली नाही , तर माझाही शालू त्या फटीत अडकून फाटलाय."आपला शालू दाखवत तो म्हणाला.
"देवा त्याला मखर आणि बाजूचे डेकोरेशन तरी बदलायची बुद्धी दे.दरवर्षी तेच तेच .आपण इथेच कायम राहतो असे वाटते बघ " उंदीर चिडून म्हणाला.
" यावर्षी थर्माकोल वापरायचे शेवटचे वर्ष अशी ऑर्डर काढायला लावली आहे मी त्यामुळे पुढच्या वर्षी नवीन मखर असेल अशी आशा करू. हळू हळू प्लास्टिकवर ही बंदी आणू म्हणजे हा प्लास्टिक वापरायचे ही बंद होईल."तो हसतहसत उंदराला म्हणाला .
"पण तुम्ही कधीही त्याच्याविषयी तक्रारीचा सूर काढत नाही . ते बघा, गेली पाच वर्षे मी त्याचा तोच ड्रेस बघतोय." पूजेला बसणाऱ्या गजाकडे पाहत उंदीर म्हणाला ."तरी नशीब बाबांचा ड्रेस मागच्या वर्षी आरती करताना थोडा जाळलात , नाहीतर त्यांच्याही अंगावर नवे कपडे दिसले नसते.
"अरे ती तर गंमतच झाली .ती सुनंदा पारकर आरती संपल्यावर याच्या घरात शिरली आणि हा वेड्यासारखा तिच्याकडे पाहत बसला तीच संधी घेऊन मी बाबांचा ड्रेस खराब केला. नाहीतर आपल्याला कुठे अशी जादू करायला जमतेय"जुन्या आठवणीत तो रमून गेला .
" पण इतके असूनही दरवर्षी उत्साहाने त्याच्या घरी येता" उंदीर आश्चर्याने म्हणाला 
" हो ,गजा व्यवहारी आहे .इतरांच्या भाषेत कंजूस आहे.पण तो प्रामाणिक आहे.कष्टाळू आहे.घरी खाण्यापिण्यात कोणाचे हाल करत नाही ." समोरच्या मिक्स ड्रायफ्रुटच्या प्रसादकडे हात दाखवीत तो म्हणाला .
"पण उगाच वस्तू घ्यावी आणि जुनी चांगली वस्तू फेकून द्यावी हे पटत नाही त्याला .त्याचा धंदा चोख आहे. मुलांवर चांगले संस्कार आहेत .वहिनींवर मनापासून प्रेम करतो .अर्थात इतर स्त्रियांकडे पाहणे हा पुरुष स्वभावाचा एक भाग आहे म्हणा."तो हळूच डोळा मारीत उंदराला म्हणाला .
"पण या वस्तू बदलायला हव्या.हल्ली लोकांनाच काय पण आपल्याला ही चेंज आवडतो " उंदराने आपले म्हणणे पुढे रेटले 
" हो पण काहीजणांना समजवायला वेळ लागतो.हा चौरंग जुना असला तरी गेली ऐंशी वर्ष यावर बसतोय मी आणि याच्या आजोबांनी यासाठी किती मेहनत घेतली तेही पाहिलंय मी.नवीन चौरंग पाहून गजाच्या बापाचा चेहरा कसा हरकून गेला होता ते आठवतंय का ? त्यावेळी तू ह्याच चौरंगावर माझ्याभोवती प्रदक्षिणा घालायचाच. पण आता मी ही तोच आहे, चौरंग ही तोच, फक्त तूच आळशी झालास " रागाने उंदराकडे नजर टाकून तो म्हणाला.
" देवा हल्ली वेळ कुठय आणि प्रदक्षिणा  मारायला जागा ही नाहीय.त्यादिवशी चुकून खाली उतरलो आणि एका भक्तांच्या पायाखालीच आलो. नशिबाने वाचलो बघ " उंदीर शहारून म्हणाला .
"सोड , प्रत्येक गोष्टीची वेळ येते .याची ही येईल ,डोळे मिटून तो म्हणाला आणि शांतपणे घोरू लागला.
हे सहा दिवस  त्याचे मोठ्या आनंदात गेले. विसर्जनाला गाडीत बसून तो समुद्रावर आला .भरतीची वेळ आणि विसर्जनासाठी खूप गर्दी.आपल्या मित्रांना हात दाखवून त्यांचा निरोप घेत होता.सर्वांचे डोळे पाणावले होते.या दहा दिवसांत त्यांना जो आनंद मिळत होता तो वर्षभर पुरणार होता.
समुद्राला भरती आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे कोणाला समुद्रात जाऊ देत नव्हते.काही पट्टीच्या पोहणार्यांनी गणेश विसर्जनाची जबाबदारी अंगावर घेतली होती.
त्याला पाहून दोन माणसे पुढे झाली.पाटासकट त्याला उचलले आणि समुद्राकडे निघाले.डोळे पुसत गजाने हात हलवीत त्याला निरोप दिला आणि पाटाची वाट पाहू लागले.
पण हे काय ? ती माणसे रिकामीच हात हलवीत परत आली.
"पाट कुठेय ?" गजाने काळजीने विचारले .
"माफ करा साहेब.पण गणपती पाण्यात बुडवला आणि अचानक हाताला फटका बसला , त्यात पाट हातातून निसटला आणि बाप्पा सोबत वाहून गेला " दोन्ही हात जोडत ते दोघे म्हणाले.
"म्हणजे बाबा पुढच्या वर्षी नवीन पाट आणावा लागेल " समीर खुश होऊन म्हणाला ."पण यावेळी पाट मी आणेन माझ्या पैशांनी ,मला पाहिजे तसा.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या "
© श्री .किरण कृष्णा बोरकर

THE DEVIL"S PLAN

THE DEVIL"S PLAN
 द डेव्हिल प्लॅन 
त्या बंद बंगल्यात एकूण बारा व्यक्तींना बोलाविण्यात आले होते. हे बाराही जण आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध होते.यात काही तरुणीही होत्या.एक जण विज्ञानप्रेमी होता.तर एक वकील ,एक नामवंत अभिनेता ,तर एक पत्रकार ,एक खेळाडू  .एक तरुण आणि एक तरुणी प्रेक्षकांतून निवडून आले होते. बंगला अतिशय सुसज्ज अत्याधुनिक सुखसोयीने सज्ज होता.
इथे त्यांना आठवडाभर राहायचे आहे.प्रत्येकाला एक सोन्याचे नाणे दिले होते.त्यांना तिथे विविध खेळ खेळायचे आहेत . खेळाचा सूत्रधार तोंडावर बुरखा घालून खेळाचे नियम समजावून सांगायचा.
प्रत्येक खेळातून अधिकाधिक सोन्याची नाणी मिळवायची असतात.अर्थात या खेळात ते सोन्याची नाणी गमवूही शकतात .हे खेळ कसे असतील ? काय नियम असतील ? याची कल्पना कोणालाच नसते .
यातील खेळाडू काही काळ काळकोठडीत जाऊ शकतात . कधी एकमेकांची साथ घेऊन तर कधी एकमेकांवर वरचढ होऊन हे खेळ खेळायचे आहेत.बुद्धीला चालना देणारे हे खेळ त्या बाराही जणांच्या बुद्धीचा कस पाहणारे आहेत.यात जो जास्त नाणी मिळवेल तो प्रचंड श्रीमंत होईल .पण त्यासाठी त्याला खूपच प्रयत्न करावे लागतील.
यात हाणामारी नाही,रक्तपात नाही,एकमेकांवर आरडाओरड नाही.राजकारण नाही .शिव्या आणि घाणेरडी भाषा नाही.फक्त खेळा आणि जिंका.हसतखेळत चालू राहणारी ही स्पर्धा निश्चितच बघण्यासारखी आहे. चला आपणही या कोरियन सिरीजचा भाग होऊ आणि खेळाचा आनंद घेऊ.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, September 27, 2023

LUPIN

LUPIN
लुपिन
बाबकर डिओप हा सरळ साधा पण स्वाभिमानी गृहस्थ .आपल्या चौदा वर्षाच्या मुलांसोबत राहतोय.अस्साने डिओप त्याचा मुलगा हा त्यांच्यासारखाच शांत आणि हुशार आहे.
बाबकारने त्याला लुपिनचे पुस्तक वाचायला दिलंय. लुपिन हा सभ्य बदमाश आणि हुशार चोर आहे .तो अतिशय हुशारीने चोऱ्या करतो आणि नेहमी सर्वांच्या दोन पावले पुढे असतो.
बाबकर पेल्लेग्रीनी नावाच्या उद्योगपतीकडे ड्रायव्हर असतो . आपल्या मुलाला तो नेहमी त्याच्याकडील लायब्ररीमधून पुस्तके वाचायला द्यायचा .पेल्लेग्रीनीकडे एक अतिशय दुर्मिळ हिऱ्यांचा नेकलेस आहे .त्याची किंमत करोडो रुपयात आहे.एक दिवस तो हार चोरीला जातो आणि त्याचा आळ बाबकरवर येतो. बाबकर गुन्हा कबूल करतो आणि त्याची त्याला मोठी शिक्षा होते. तो निराश होऊन तुरुंगात आत्महत्या करतो .त्याच्या मुलाची अस्सानची  रवानगी अनाथाश्रमात होते.पण पेल्लेग्रीनी पत्नी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेते.
पंचवीस वर्षानंतर  अस्सान मोठा होतो आणि लुपिनप्रमाणेच चोऱ्या करू लागतो . पेल्लेग्रीनीकडे असलेल्या त्या दुर्मिळ नेकलेसचा पुन्हा लिलाव होतो .यावेळी अतिशय शिताफीने अस्सान तो हार पळवतो.त्यावेळी त्याला कळते आपल्या वडिलांना यात मुद्दाम गोवण्यात आलेय.त्यांना बळीचा बकरा बनविण्यात आलेय.तो हळूहळू या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि  सर्व पुरावे जमा करतो .
खरे तर ही सरळ साधी रहस्य कथा आहे .पण तिचे सादरीकरण उत्तम आहे .अस्सानचा नेकलेस चोरीचा प्लॅन, त्यानंतर तुरुंगात जाऊन बाबकरच्या मित्राला भेटणे,  त्याच्या सामानातून वडिलांचे पुस्तक घेऊन तुरुंगातून पलायन करणे, हे सर्व कसे करतो ते बघण्यासारखे आहे.
पाच भागाची ही मालिका हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .पाच पाच भागाचे दोन सीजन आहेत . यात फारशी ऍक्शन गोळीबार नाही पण वेगवेगळ्या युक्त्या आहेत.पाहायला कंटाळा येत नाही.

Tuesday, September 26, 2023

शवागृह

शवागृह
"साहेब ,बॉडी लवकर मिळेल ना ? "तो वयस्कर गृहस्थ हात जोडून विष्णूला विचारत होता.विष्णूने नेहमीसारखे प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
"तसे नाही हो .उद्या गणपती येणार आहेत .कोणाचा खोळंबा नको. शिवाय प्रेताला चार माणसे तरी यायला हवीत."तो गृहस्थ म्हणाला .
"मी माझे काम करून ठेवतो .बाकी सगळे डॉक्टरांवर आहे ."थंड आवाजात विष्णूने उत्तर दिले आणि शवागृहात शिरला .
होय, विष्णू शवागृहातच कामाला होता .रात्री प्रेताची राखण करायची तर कधीकधी पोस्टमार्टेमची प्रेतही फाडून द्यायच्या .
आता डॉक्टर कुठे प्रत्येक शव फाडत बसणार .ते फक्त विष्णूला सूचना देऊन जायचे  हळूहळू विष्णुच शिकला शवाला कसे कुठून फाडायचे ,कवटी कशी कापायची. 
त्याच्याशी मेलेली माणसे बोलतात असे बरेचसे त्याला ओळखणारी माणसे बोलायची .खरे खोटे देव जाणे पण त्याला कोणी विचारले "भीती वाटत नाही का ?" तर "भीतीची सवय झालीय "असेच म्हणून चालू लागायचा .
प्रेतांच्या संगतीत राहून त्याच्या शरीरालाही विशिष्ट वास येऊ लागला होता.आता हरी,बंड्या सारख्या माणसांना तो वास परिचयाचा होता .कारण त्यांनाही अंत्यसंस्काराची हौस होती.कुठे प्रेत झाले म्हटले की हे दोघे तिरडी बांधायला हजर .
गणेशोत्सव जवळ आला होता .अर्थात विष्णूला त्याच्याशी मतलब नव्हते . याचा अर्थ तो देवाला मानीत नव्हता असे नाही पण गणेशोत्सव असला तरी मरायचे कोण थांबतो का ?? आणि हॉस्पिटलमध्ये एक दोन शव पोस्टमार्टेमला येणार हे नक्की होते.
पहिल्यांदा वाईट वाटायचे असे सणासुदीला कोणी मरताना पाहून. पण आपण फक्त त्यांना फाडायचे काम करू शकतो हे मनात पक्के बसल्यावर काहीच वाटेनासे झाले. 
शवागृहात गार्डची ड्युटी कशाला ? ती प्रेत काय पळून जाणार आहेत ? असे ही प्रश्न नातेवाईक विचारायचे .पण ते पळून जाणार नाहीत त्यांना पळवणारे भरपूर आहेत हे अनुभवाने माहीत झाले होते.
उद्या गणपती येणार म्हणून  रस्ते गजबजलेले होते. दुपारी जेवून विष्णू शवागृहात हजर झाला तेव्हा दोन प्रेते त्या टेबलावर झाकून ठेवली होती. 
सवयीने त्याने  शवागृहातील देव्हाऱ्यात बसलेल्या गणपतीला नमस्कार केला आणि पिशवीतील हार काढून त्याला घातला .हातातील पेढ्याचा बॉक्स समोर ठेवला आणि नंतर  प्रेतावरचे पांढरे कापड हटविले.
एक साठीचा वृद्ध तर तरुण स्त्री .
त्या वृद्ध पुरुषाला आधी घे. अटॅकने गेलाय आणि दुसरी कॅन्सरने .साध्या केस आहेत मी येणार नाही गणपतीची तयारी करतोय .अशी डॉक्टरची चिट्टी होती. म्हणजे आता पुढे दरवर्षी डॉक्टरचे काम ही मीच करायचे ?
अप्रान घालून त्याने कवटी कापायला करवत हाती घेतली आणि दार लोटून तो तरुण डॉक्टर आत शिरला.
"आता हा कोण नवीन ?" विष्णूच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"काका , मी डॉक्टर अथर्व. मोठ्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्हच्या मदतीला जायला"तो प्रेताकडे बघत तोंड कसेनुसे करत म्हणाला .
"मला मदत ?? अरे , मलाच माहिती नाही किती प्रेतांचे पोस्टमार्टेम केले आहे मी ?"कामात व्यक्तय आल्यामुळे विष्णू चिडला .
"मला शिकायचे आहे पोस्टमार्टेम कसे करतात ते " तो तरुण म्हणाला .
"ठीक आहे ये .पण हीच वेळ मिळाली का ?? उद्या गणपती .म्हणजे आज पोस्टमार्टेम करून उद्या त्याची पूजा करणार का " देव्हाऱ्याच्या दिशेने हात दाखवीत विष्णूने विचारले.
देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती पाहून तो तरुण हसला .
"काय काका " इथेही त्याला आणलेच का ?? या असल्या जागेत त्याची पूजा तरी कशी करता ? आणि समोर काय तर ही फाडलेली प्रेत ? कसे जमते हो तुम्हाला ??" डॉ. अथर्व हसत म्हणाला.
"ही पण कामाचीच जागा आहे ना ? इथेच मृत्यूची कारणे शोधली जातात .माणूस आपल्या शरीराची वाट कशी लावतो हे इथेच कळते .तर आत्महत्या आणि खुनाचे वेगवेगळे प्रकार इथेच समजतात आणि त्याचा तपास ही इथे होतो .पण म्हणून काय देवाला इथे आणायचे नाही का ? " विष्णूने प्रश्न केला.
"कबूल ,पण तुम्ही कसे राहता इथे ? आणि तुमच्या घरी गणपती येत नाही का ?" त्या तरुणाने उत्सुकतेने विचारले.
"येतो ना .पण गावी. इथे माझ्या अंगाला येणारा वास पाहून आजूबाजूची माणसे दूर जातात मग हा कसा राहील तिकडे . त्यापेक्षा इथेच त्याची पूजा करतो ," देव्हाऱ्यात पाहून विष्णू म्हणाला . 
"चल आता काम सुरू कर लवकर " असे बोलून दोघेही कामाला लागले. ते काम करताना त्या तरुणाला मळमळून येत होते .शेवटी एकदाचे काम संपले .
"चला निघतो मी. हात जोडून तो तरुण म्हणाला आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागला .
"डॉक्टर अथर्व , खणखणीत आवाजात विष्णूने हाक मारली .तिकडे कुठे चाललात .तुमची जागा सोडून ?"
अथर्व वळला त्याच्या नजरेत आश्चर्य होते.विष्णूचे हात देव्हाऱ्याकडे होता .
"मी नाही समजलो " तो म्हणाला 
"अथर्व नावाचा कोणीही डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये नाहीय.नवीन तर मुळीच नाही .पण तू कोण हे ओळखले मी .हार घातलेल्या फुलाची पाकळी अजून तुझ्या कॉलरवर आहे. तर पेढ्याचे कण तुमच्या उंदराच्या तोंडाला लागलेय" सहजपणे विष्णू उद्गारला 
"खरे आहे ,तो मीच आहे .बरीच वर्षे बघतोय तुला .इतरांना तिरस्कारणीय असणारे काम तू करतोयस . तुझ्या अंगाला येणारा वास घेऊन लोक नाके मुरडतात .सुट्टी नाही म्हणून मलाही गावी पाठविलेस . कधी कधी वाटते तुझ्यातील भावना मेल्यात ,एक दगड ,यंत्र बनून राहिलास तू .पण आज ज्या तत्परतेने काम करून त्या माणसाच्या नातेवाईकांनाही मोकळे केलेस ते पाहून खुश झालो मी म्हटले तू काय घरी येत नाहीस मग मीच भेटायला जाईन " टेबलावरील गृहस्थाच्या प्रेताकडे बोट दाखवून तो म्हणाला .
"पण मला पाहून तुला काहीच वाटले नाही का ?? भीती आनंद ?? " अथर्व आश्चर्याने म्हणाला 
" काय वाटणार .मुदड्यांच्या सहवासात राहतो मी .मला भेटणारा जिवंत आहे की मुडदा हे एका नजरेत ओळखतो .तुझे वेगळेपण आत शिरताच जाणवले. थोडा वेळ का होईना एक प्रसन्न वातावरण इथे निर्माण झाले. पण माणूस ही नाही भूत ही नाही मग तिसरा कोण असणार हे कळले मला "हात जोडत विष्णू म्हणाला "बरे झाले रोज रोज त्या भुतांशी बोलून कंटाळा आलेला आज तू भेटलास".
त्याला आशीर्वाद देत अथर्व निघून गेला .
तिकडे गावी तो विष्णूच्या घरात शिरताच अचानक काही लोकांनी नाक मुरडली हे त्याच्या लक्षात आहे .
विष्णूच्या मुलाने तर "आये बाबा इले की काय ?" असे ही विचारले .
"आता मेलेल्यांचे शरीरही फाडायला लागलात तुम्ही " दोन्ही हाताने नमस्कार करीत त्याच्या शेजारचा उंदीर ओरडला ."हीच कामे करायला येता का इकडे .तुमच्या सोबत राहून हे असे काही पहायची पाळी येईल असे वाटले नव्हते आणि यावेळी त्याने तुम्हाला ओळखलेच ना " उंदराच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
"काय झाले रे, त्याला मदत केली तर.समाजात मोजकीच माणसे आहेत अशी कामे करणारी.दिवसरात्र, सणवार न पाहता त्यांना असली कामे करावी लागतात .कधीकधी त्यांच्याच जवळच्या नातेवाईकांचे पोस्टमार्टेम करावे लागते .त्यांच्या कामामुळे आणि वासामुळे लोक दूर पळतात. तर ते आपल्याजवळ येत नाहीत म्हणून मीच त्याच्याकडे गेलो आणि हो, या पुढे काहीही खाल्यावर तोंड व्यवस्थित पुसत जा .त्याने पेढा ठेवल्यावर पटकन तोंडात घातलास मला तयारीसाठी वेळ ही दिला नाहीस " रागाने उंदराकडे पाहत तो म्हणाला आणि तबकातील मोदक खात समोरच्या भक्तांना आशीर्वाद देत बसला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर