Thursday, November 30, 2023

लिओ

Leo
लिओ
पार्थिबन हिमाचल प्रदेशातील ठियोग गावात आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहतोय. त्याची पत्नी सत्या,सिद्धार्थ नावाचा मुलगा आणि चिंटू नावाची छोटी मुलगी आहे. त्याचे एक छोटे कॉफीशॉप आहे.
 पार्थिबन  प्राण्यांना पकडण्यात एक्सपर्ट आहे.नुकतेच त्याने  गावात फिरणाऱ्या हिंस्त्र तरसाला पकडण्यात मदत केलीय.
शहरात एका कलेक्टरची हत्या होते आणि खुनी पार्थिबनच्या कॅफेत शिरतात.आपल्या मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात तो त्यांना ठार मारतो. कोर्ट त्याला निरपराध ठरवते.पण त्याचे फोटो सगळीकडे प्रसिद्ध होतात.
अंटोनी दास आणि हॅरोल्ड दास दोघे भाऊ.त्यांची तेलंगणाला मोठी सिगारेट फॅक्टरी आहे. त्यांच्याकडेही पार्थिबनचा फोटो पोचतो आणि ते आपली माणसे घेऊन पार्थिबनला शोधायला निघतो.
इकडे त्या कलेक्टरच्या खुन्याचे नातेवाईक पार्थिबन आणि त्याच्या परिवाराला मारायला शहरात येतात.
अंटोनी दासच्या मते पार्थिबन हा त्याचा मुलगा लिओ दास आहे जो वीस वर्षांपूर्वी मारला गेला होता.आता तो त्याला परत घेऊन जायला आला आहे.पण पार्थिबन कोणत्याही अंटोनी किंवा लिओ दासला ओळखत नाहीय.
पण पार्थिबन नक्की लिओ आहे का ?? आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी तो काय करेल ? 
थलपती विजय,संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सारख्या मोठ्या स्टारनी भरलेला लिओ आपली चांगली करमणूक करतो.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

दोबारा

दोबारा ( 2:12 )
Do baa raa
साल 1996 
स्थळ .हिंजेवाडी पुणे 
त्या रात्री खूप मोठे वादळ चालू होते.जवळजवळ तीन दिवस हे वादळ चालेल असा हवामानखात्याचा अंदाज होता.
अनय बारा वर्षाचा मुलगा त्या कॉलनीतील एका बंगल्यात आईसोबत राहतोय.त्याची आई आर्किटेक्टर आहे.पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलचे डिझाइन ती करतेय.अनय व्हिडिओ कॅमेराद्वारे स्वतःच्या आणि वडिलांच्या मेमरी रेकॉर्ड करून टीव्हीवर पाहत असतो.तो स्वतःचे रेकॉर्डिंगही करतो.
त्या रात्री तो आपला व्हिडिओ रेकॉर्डर चालू करून टीव्हीवर बघत असताना शेजारच्या बंगल्यातून झटापटीचा आवाज येतो.
कुतूहलाने तो खिडकीतून पाहतो तेव्हा दोन व्यक्तींची झटापट चालू असते. इतक्यात लाईट जाते. तो बॅटरी घेऊन त्या बंगल्यात जातो तेव्हा तिथे खून झालेला असतो . खुनी अनयला पाहतो आणि मागे लागतो. अनय धावत बंगल्याबाहेर पडतो त्याचवेळी फायरबिग्रेडची गाडी त्याला उडवते आणि त्याचा मृत्यू होतो.त्यावेळी घड्याळात रात्रीचे दोन वाजून बारा मिनिटे झालेली असतात.
काही वर्षे उलटून गेलीत. ते हॉस्पिटल पूर्ण झालंय. त्या हॉस्पिटलमध्ये नर्स असणाऱ्या अंतरा अवस्थीने तो बंगला घेतलाय.ती नवरा विकास आणि सहा वर्षाची मुलगी अवंती सोबत राहायला आलीय.
 तिला अनय आणि खुनाची गोष्ट कळते.बंगला साफ करताना तेथे तिला तो टीव्ही आणि व्हिडिओ रेकॉर्डर सापडतो.त्या दिवशी ही वादळी रात्र आहे. रात्री झोप येत नाही म्हणून कुतूहलाने ती टीव्ही आणि व्हिडिओ रेकॉर्डर सुरू करते आणि टीव्हीत अनय दिसतो.
अनय तिला पाहतो आणि तिच्याशी बोलू लागतो .तीही त्याच्याशी बोलू लागते अचानक बाजूच्या बंगल्यात काही झटापट चालू आहे असे अनय तिला सांगतो .ती त्याला तिथे जाऊ नये असे  ओरडून सांगते पण तो तिथे जातो .तिथे एका स्त्रीचे प्रेत पडलेले असते.अनय ते पाहून पळतो त्याचवेळी लाईट जाते.बंगल्याच्या बाहेर येताच फायरबिग्रेडची गाडी अनयच्या समोरून जाते.तेव्हा दोन वाजून बारा मिनिटे झालेली असतात.
सकाळी अंतराला जाग येते तेव्हा ती दुसऱ्याच बंगल्यात असते. हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा सगळे तिला सर्जन समजत असतात.ती आपल्या मुलीला आणायला स्विमिंग क्लबला जाते.पण तिथे अवंती अवस्थी नावाची कोणीच मुलगी क्लबमध्ये नाहीय असे सांगितले जाते.
ती आपल्या नवऱ्याला विकासला भेटायला हॉटेलला जाते पण तो तिला ओळखायला नकार देतो. उलट तुम्ही डॉक्टर अंतरा वशिष्ट आहात आणि तुम्ही माझे ऑपरेशन केले होते असे सांगतो.तिचे वरिष्ठ डॉक्टरही ती डॉ.अंतरा वशिष्ठ आहे असे सांगतात. डिसीपी आनंद तिच्यावर विश्वास ठेवून अवंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो .
हा काय प्रकार आहे ? अंतरा नक्की कोण आहे  ? खरोखर तिला मुलगी आहे का ?? 1996 साली अपघातात मृत्यू पावलेला अनय अजून जिवंत आहे ?? डोके चक्रावून टाकणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहेत.
तापसी पनू  अंतरा अवस्थी आणि डॉ अंतरा वशिष्ठ च्या भूमिकेत आहे.अनुराग कश्यपचे दिग्दर्शन आहे.

Sunday, November 26, 2023

लिओ

Leo
लिओ
पार्थिबन हिमाचल प्रदेशातील ठियोग गावात आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहतोय. त्याची पत्नी सत्या,सिद्धार्थ नावाचा मुलगा आणि चिंटू नावाची छोटी मुलगी आहे. त्याचे एक छोटे कॉफीशॉप आहे.
 पार्थिबन  प्राण्यांना पकडण्यात एक्सपर्ट आहे.नुकतेच त्याने  गावात फिरणाऱ्या हिंस्त्र तरसाला पकडण्यात मदत केलीय.
शहरात एका कलेक्टरची हत्या होते आणि खुनी पार्थिबनच्या कॅफेत शिरतात.आपल्या मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात तो त्यांना ठार मारतो. कोर्ट त्याला निरपराध ठरवते.पण त्याचे फोटो सगळीकडे प्रसिद्ध होतात.
अंटोनी दास आणि हॅरोल्ड दास दोघे भाऊ.त्यांची तेलंगणाला मोठी सिगारेट फॅक्टरी आहे. त्यांच्याकडेही पार्थिबनचा फोटो पोचतो आणि ते आपली माणसे घेऊन पार्थिबनला शोधायला निघतो.
इकडे त्या कलेक्टरच्या खुन्याचे नातेवाईक पार्थिबन आणि त्याच्या परिवाराला मारायला शहरात येतात.
अंटोनी दासच्या मते पार्थिबन हा त्याचा मुलगा लिओ दास आहे जो वीस वर्षांपूर्वी मारला गेला होता.आता तो त्याला परत घेऊन जायला आला आहे.पण पार्थिबन कोणत्याही अंटोनी किंवा लिओ दासला ओळखत नाहीय.
पण पार्थिबन नक्की लिओ आहे का ?? आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी तो काय करेल ? 
थलपती विजय,संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सारख्या मोठ्या स्टारनी भरलेला लिओ आपली चांगली करमणूक करतो.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Friday, November 24, 2023

कन्नूर स्वाड

Kannur Squad
कन्नूर स्वाड
केरळ पोलिसांची कन्नूर स्वाड नावाचे स्वतंत्र युनिट आहे.ज्यात फक्त चार ऑफिसर आहेत.जॉर्ज मार्टिन त्याचा लीडर.
त्यांच्याकडे आलेली प्रत्येक केस त्यांनी कमीतकमी दिवसात यशस्वीपणे सोडवली आहे.पण एक दिवशी त्याच्या स्वाडमधील एका ऑफिसरवर लाच घेतल्याचा आरोप होतो आणि ते युनिट बरखास्त केले जाते.
कासारगोड शहरात एका अनिवासी भारतीय अब्दुल वहाबची हत्या होते. खुनी त्याच्या घरातून कॅश आणि दागिने लुटून नेतात. त्या आधी त्याच्या मुलीला ,मुलाला आणि पत्नीलाही बेदम मारहाण करतात.पोलिसांकडे काहीही पुरावा नसतो. त्यात राजकीय दबाव ही वाढत असतो.
कासारगोडचा एसपी मनू निधी पुन्हा कन्नूर स्वाडला बोलावतो. मला माझी पूर्ण टीम पाहिजे या अटीवरच जॉर्ज मार्टिन ही केस स्वीकारतो.मनू निधी त्याला फक्त दहा दिवसांत केस सोडविण्याची ऑर्डर देतो.जॉर्ज हे आव्हान स्वीकारतो आणि खुन्याच्या मागावर निघतो.
हा  केवळ  एक वेगवान पोलीस तपास नाहीय तर त्यामागे पोलिसांचे कष्ट, त्यांना तपासात येणाऱ्या अडचणी.लाल फितीचा कारभार ,प्रशासकीय अडचणी या सर्व गोष्टींचा प्रवास आहे.
कन्नूर स्वाड आपल्या वैयक्तिक अडचणी दूर सारून दहा दिवस आपल्या जीपसोबत 3000 किलोमीटर चा प्रवास करीत खुन्यांच्या मागावर आहे.त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत.ते रस्स्यावर आंघोळ करतात .मिळेल ते खातात. पण आपल्या कार्याशी प्रामाणिक आहेत.तरीही त्यांचे वरिष्ठ त्यांना भारत टूर करतायत असा आरोप करतात.
आपणही नकळत त्यांच्यासोबत प्रवासात गुंतून जातो.
यात ममूटीने जॉर्ज मार्टिनच्या भूमिकेत प्राण ओतले आहेत.त्याचा आत्मविश्वास आपल्या सहकार्यांना सांभाळून घेणे.त्यांच्यासाठी जीव धोक्यात घालणे हे बघण्यासारखे आहे.एका क्षणी तोही निराश आणि हतबल होतो.
आपल्याला हा थरार अनुभवायचा असेल तर हॉटस्टारवर कन्नूर स्वाड नक्की पहा.हिंदी भाषेत आहे.

Tuesday, November 21, 2023

पिपा

पिपा 
PIPPA
1971 साली रशियाने भारताला पाण्यावरून चालणारे रणगाडे दिले.कॅप्टन बलरामसिंह मेहता हा रणगाड्यांचे नेतृत्व करण्यात कुशल होता.चाचणी दरम्यान त्याने वरिष्ठांची ऑर्डर मोडून रणगाडा खोल पाण्यात नेला.परिणामतः त्याची चौकशी होऊन दिल्ली मुख्यालयात पेपरवर्क करण्यासाठी  बदली झाली.
बलरामसिहंचा मोठा भाऊ राम ही सैन्यात आहे तर बहीण राधा गुप्तलिपी तज्ञ आहे.
 पूर्व पाकिस्तानात मुक्तवाहिनी सेना आपला देश स्वतंत्र करण्यासाठी लढतेय. पाकिस्तान सतत पूर्व पाकिस्तानवर दबाव ठेवून आहे . राम मेहता  एका गुप्त मोहिमेसाठी पूर्व पाकिस्तानात गेलाय आणि मुक्तवाहिनी सेनेला प्रशिक्षण देतोय.
अचानक पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला. रशियन रणगाडयात काही बदल करायचे होते आणि त्यासाठी बलरामसिंह मेहताचे नाव पुढे आले.
बलरामसिंहने दिवसरात्र मेहनत करून त्यात अपेक्षित बदल केले.त्यामुळे त्याला पुन्हा फिल्डवर जाण्याची परवानगी मिळाली.
तिथे राम मेहता अचानक गायब झालाय.तो पूर्व पाकिस्तानात पकडला गेलाय अशी बातमी राधाला मिळते.
बलरामसिंह नवीन पिपा रणगाडे वापरून पाकिस्तानी सैन्याला धूळ चारेल का ? तो आपल्या भावाला शोधून काढेल का ?
1971 साली बांगलादेशच्या निर्मितीतील एक सत्य युद्धकथा . भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराजित करून बांगलादेश निर्माण केला .त्यातील ही एक कहाणी .
चित्रपट प्राईम व्हिडिओवर आहे .

Saturday, November 18, 2023

वॉन्टेड

WANTED
वॉन्टेड 
लोला एका मॉलमध्ये काम करते.तिला डेव्हिड नावाचा तरुण मुलगा आहे.ती मुळातच आक्रमक स्वभावाची आणि धाडसी आहे. 
चेल्सी एक तरुण अकाउंटंट .ती स्वभावाने  भित्री  पण टापटीप राहणारी. ऑडिटमध्ये तिने केलेल्या हिशोबात चुका सापडल्या त्यामुळे ती टेन्शनमध्ये आहे.
त्या दिवशी रात्री दोघीही एकाच स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या होत्या. दोघीही एकमेकांना अजिबात ओळखत नव्हत्या.नुकतीच नोकरी गेल्यामुळे लोला टेन्शनमध्ये होती.
 अचानक एक कार त्यांच्या अंगावर आली .त्यातील ड्रायव्हर जखमी होता .त्याला  मदत करायला दोघीही पुढे सरसावल्या. इतक्यात तिथे दुसऱ्या गाडीतून दोन बुरखेधारी उतरले त्यातील एकाने ड्रायव्हरला गोळ्या घातल्या.
लोलाने त्यांच्यावर आक्रमण केले. त्या झटापटीत एक मारला गेला तेव्हा दुसर्याने बंदुकीच्या धाकावर दोघींना कारच्या डिकीत बंद केले.
आता  दोन अनोळखी स्त्रियांचा कारच्या डिकीतून प्रवास चालू आहे . एका भंगार कार डेपोत गाडी थांबली आणि दोघींनी अपहरणकर्त्यावर हल्ला करून आपली सुटका करून घेतली आणि कार घेऊन पोबारा केला.कारची तपासणी केली तेव्हा त्यात बॅग भरून पैसे आणि ड्रग आढळून आले.
आता त्यांच्यामागे भ्रष्ट पोलीस, माफिया गुंड,आणि पोलीस लागले आहेत.
पोलिसांना त्या दोघी खुनाच्या आरोपाखाली हव्यात तर भ्रष्ट पोलीस आणि माफिया गुंडांना ड्रग आणि पैसे हवेत .
दरवेळी लोला आणि चेल्सी या सर्वांना चकमा देऊन पुढे जातायत .पण कुठपर्यंत पळतील ?? याचा शेवट व्हायलाच  हवा ?  त्यात दोघीही एकमेकांना पूर्णपणे अनोळखी स्वभाव भिन्न .त्या एकत्र राहतील ?
क्षणाक्षणाला पुढे काय होईल याची उत्कंठा वाढवणारी ही ऑस्ट्रेलियन सिरीज नेटफ्लिक्सवर इंग्रजी भाषेत आहे.
याचे एकूण तीन सिझन आलेत .पहिला सिजन पाहिल्यावर बाकी दोन्ही सीजन नक्की पाहणार याची खात्री आहे.

Wednesday, November 15, 2023

THE UNHOLY

THE UNHOLY ( 2021 )
द अनहोली
ते 1845 साल होते.बॅनफिल्ड येथे मेरी एलनॉरला काळ्या जादूटोण्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले आणि एका झाडाला टांगून जिवंत जाळले गेले.तिची राख एका  बाहुलीत ठेवून ती साखळीत घट्ट बांधण्यात आली आणि त्याच झाडाखाली पुरली होती.
आता वर्तमानकाळात ते झाड अजूनही आहे. गेरी फेन हा पत्रकार .खोट्या बातम्या देण्याच्या अपकीर्तीमुळे त्याला कोणीही उभे करत नाही.तो छोटीमोठी कामे करतो.अश्याच एका छोट्या कामासाठी तो बोस्टनला जातो आणि त्या झाडाखाली ती बाहुली मिळते.तो त्या बाहुलीचा चुराडा करतो आणि मेरीचा आत्मा मोकळा होतो.
एलिस एक मूकबधिर तरुणी .तीच्या शरीरात तो आत्मा शिरतो आणि मेरी बोलायला लागते.ती एका अपंग मुलाला चालायला लावते तर एका फादरचा असाध्य आजार बरा करते. चर्च आणि सारेजण तिला संत म्हणू लागतात. पण खरेच ती संत आहे का ?
 चर्चमधील एक फादर या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण काही दिवसांनी तो लटकलेल्या अवस्थेत चर्चमध्ये सापडतो.  गेरीवरही एक अमानवी व्यक्ती हल्ला करते.
एका मोठ्या समारंभात बिशप एलिसचा सत्कार करणार आहेत आणि एलिस सर्वाना त्यांचे आत्मे मेरीला समर्पित करण्याचे आवाहन करणार आहे . या सर्वांचे जीव धोक्यात आहेत.गेरी हे टाळू शकेल का ? 
ज्यांना हॉरर चित्रपट आवडतात अश्यांसाठी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.