Friday, August 29, 2025

विसर्जन

विसर्जन
" आहो , या वर्षी गणपती आणलाच पाहिजे का ? "कावेरी काकू डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली ." प्रतीकला जाऊन महिनाही झाला नाही ."
" प्रतीक कुठेच गेला नाही .तो आहे . काहीही झाले तरी गणपती घरी आलाच पाहिजे हीच त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्याच्या इच्छेचा मान राखायलाच हवा " गणपत नाईक ठाम स्वरात म्हणाले.
" गणपती आगमनाला आठवडा राहिलाय .तू तुझी तयारी कर. मी गणपती ठरवून येतो." असे बोलून ते बाहेर पडले.
गेला महिनाभर नाईक कुटुंब दुःखात होते. त्यांचा मुलगा प्रतीक नाईक सैन्यात सुभेदार होता .नाईक घराण्यात सैन्यात कोणीच गेले नव्हते . ते शेतकरी होते . थोडीफार जमीन होती .काही कलमे होती .त्यातच सुखी होते. गणेशोत्सव जोरात साजरा करायचे. 
प्रतीक सैन्यात गेला हे त्यांना काही रुचले नव्हते पण नंतर स्वीकारले. सैन्यात गेला तरी प्रतीक गणपती विसरला नव्हता .संपूर्ण वर्षात फक्त गणपतीसाठी तीन दिवसच सुट्टी घेऊन घरी यायचा आणि विसर्जन झाले की निघायचा.
यावर्षी त्याची पोस्टिंग काश्मीरला होती. पूर्वीसारखे काश्मिर अतिसंवेदनशील राज्य राहिले नाही .आता खूपच शांत झालेय असे फोन करून आईवडिलांना तो सांगायचा .यावर्षी नेहमीसारखा तीन दिवस घरी येईन आणि विसर्जन करून निघेन असा निरोप ही गणपत नाईकांना दिला होता.
" पोरगो जगाच्या पाठीवर खंयसर पण रावांदे , पण गणपती विसर्जनाक हजर असता. स्वतःच्या डोक्यावरून गणपती विसर्जन करायचा हक्क सोडूचा नाय " गणपत फोन ठेवत हसत म्हणाले.
त्याच रात्री गस्तीवर असताना अतिरेक्यांच्या भयानक गोळीबारात प्रतीक शाहिद झाला. पण मरताना तो साथीदाराच्या कानात काहीतरी पुटपुटला .
दुसऱ्या दिवशी गावात तिरंग्यात लपेटून प्रतीकचे शव गावात आणले आणि सरकारी इतमामाने त्याचे अंत्यसंस्कार ही झाले. कालच फोनवर बोलणारा आपला मुलगा आज शाहिद झाला याचे दुःख नाईक कुटुंबाना सहन होत नव्हते.
यावर्षी गणपती आणायचा नाही हे दोघांनीही ठरविले होते . 
" यावर्षी एक घर तर सुटले .थोडा आराम आहे आपल्याला आणि पोटालाही .तसेही त्या सुतकी घरात काय आदरातिथ्य  होणार आपले "  पलंगावर स्वतःला झोकून देत उंदीर कुत्सितपणे म्हणाला.
" अरे प्रतीक देशासाठी शाहिद झालाय.सैनिकांचा आदर करा हेच आपण शिकवतो आणि तू आराम बघतोस ? यावेळी मलाच तुझी तक्रार केली पाहिजे " तो सोंड आपटत चिडून म्हणाला .
" हे बघ पृथ्वीवरील घराघरात आपले स्थान हळूहळू कमी होणार आहे आणि आपण ग्लोबल होणार आहोत हे सत्य स्वीकार .कोकणातून चाकरमानी मुंबईत आले आणि आता मुंबईतून परदेशी जाऊ लागले .हल्ली आपणही फॉरेन ट्रिप करतोच की " उंदीर शेपटी फिरवत म्हणाला .
पण आताच  एक तरुण नाईकांच्या  दारात उभा राहिला . प्रतीकच्या लॉकरमधील काही वस्तू त्याच्या हातात होत्या .
" मी सिद्धी वर्तक . प्रतीकच्या रेजिमेंटमध्ये आहे. " तो दारातूनच म्हणाला आणि आत शिरला. 
तो आत शिरताच एक चैत्यन्याची लहर घरात शिरली असा भास कावेरी आणि गणपतला झाला.
" या काही वस्तू आहेत प्रतीकच्या . मरणापूर्वी त्या मी  तुमच्याकडे पोचवाव्या अशी त्याची इच्छा होती."असे बोलून त्याने त्या गणपतरावांच्या हाती दिल्या .
सामानात गणपतीची छोटी मूर्ती .ताईत आणि एक चिट्ठी होती. आपण शाहिद झालो तरी गणपती आणणे बंद करू नये. दरवर्षी जसा उत्सव साजरा करतो तसाच साजरा करावा असे त्या चिट्टीत लिहिले होते .
म्हणूनच कावेरी काकूंचा विरोध असला तरी गणपती आणायचा या मतावर गणपतराव ठाम होते.
दरवर्षी प्रमाणे तो गणपतरावांच्या हातावर बसून घरात शिरला तेव्हा घरातील दुःखी वातावरण ताबडतोब जाणवले त्याला . आता गणपतरावांचे हात ही थरथरतायत याचीही जाणीव झाली. कावेरी काकूनी पूजेची तयारी नेहमीसारखीच केली होती.
" यावेळी वेगवेगळ्या नैवेद्याची अपेक्षा करू नकोस " त्याने बसतानाच बाजूला उभ्या असलेल्या उंदराला खडसावले .
" तुमच्या इतका मी दगडी काळजाचा नाही " तो चिडून म्हणाला .
" मी काय केले  आता ? तुझी  नेवेद्य खाण्याची आवड बघूनच तुला सांगितले आणि यावर्षी सगळेच ऍडजस्ट कर आपण दुःखी घरात आहोत ." तो डोळे मिटून म्हणाला.
" पण प्रतीकला वाचवू शकला असता तुम्ही .गोळीबार झाला तेव्हा तुम्हीच बाजूला होता त्याच्या .जास्त नाही पण काही दिवस त्याचे मरण पुढे ढकलता आले असते तुम्हाला " उंदीर शेपटी आवळून घेत म्हणाला.
" मी देव आहे जादूगार नाही . आपल्या जगात काही नियम ठरलेले  आहेत आणि यमराजांच्या कार्यात मी ढवळाढवळ करीत नाही .मी काही नियम मोडले पण कोणाचा मृत्यू थांबवू शकत नाही .त्या सत्यवानाचा जीव परत केला त्याचे परिणाम यमराज अजूनही भोगतायत , माहितीय ना " तो आजूबाजूला नजर फिरवीत पुटपुटला .
पूजा आरती झाल्यावर एक तांब्याचा छोटा कलश गणपतरावानी मूर्तीच्या बाजूला ठेवला .तो कलश लाल कपड्याने बंद केला होता.
" आता हे काय ' उंदीर चिडून म्हणाला .या कलशामुळे त्याची जागा बदलली होती.
" प्रतीकच्या अस्थी आहेत त्या .मीच गणपतरावाना ही आयडिया दिली होती ." तो हसत म्हणाला .
" आधीच मखरात जागा कमी .आपणच कसेतरी राहतोय. मला माझी शेपटीही मनासारखी फिरवता येत नाही .त्यात तुम्ही या स्मशानातील अस्थी इथेच ठेवायची आयडिया दिली. किती विचित्र वास मारतोय."  उंदीर कुरकुरत म्हणाला .
" तोंड सांभाळून बोल . या अस्थीच्या मालकाने आपल्या देशासाठी प्राण दिलेत हे विसरू नकोस .तूच काय माझ्या दर्शनाला येणाऱ्या कोणीही ते विसरू नये म्हणून त्या अस्थी माझ्या शेजारी राहतील . ही एक श्रद्धांजली असेल त्या शहीद प्रतीकला .अरे  त्या बीडीडी चाळीत यापेक्षा ही कमी जागेत आपण राहत होतो . झोपायला जागा नसायची तेव्हा घरातील पुरुष मंडळी बाहेरच्या पॅसेजमध्ये झोपायचे तर आपल्या माखराखाली छोटी मुले झोपायची तेव्हा नाही तक्रार केलीस. " तो चिडून आपली सोंड फिरवीत म्हणाला.
" तेव्हा प्रसाद भरपूर मिळायचा " उंदीर छद्मीपणे हसत म्हणाला .
आज त्याच्या विसर्जनाचा दिवस होता.विसर्जनाच्या  दिवशी प्रतीकची खूपच आठवण नाईक कुटुंबियांना आणि गावाला येत होती .गावातील गणपती हळूहळू बाहेर पडू लागले होते .गणपतराव गणपती उचलण्यास पुढे जाणार इतक्यात दारात सिद्धी वर्तक उभा राहिला .
" काका , प्रतीकचे काही झाले  तर गणपतीचे विसर्जन मी करावे अशी त्याची इच्छा होती .म्हणून आलोय ." सिद्धी हात जोडून म्हणाला .
गणपतरावानी  किंचित हसत मान डोलावली आणि अस्थीचा कलश मखरातून बाहेर काढला .
" काका कलश मूर्तीच्या बाजूलाच ठेवा .त्याचेही विसर्जन करू . गणेशासोबत प्रतीकच्या अस्थीचे विसर्जन ही भाग्याची गोष्ट आहे आणि माझीही इच्छा आहे. " तो कलश गणपती च्या बाजूला ठेवत म्हणाला .
काही न बोलता गणपतरावानी मान डोलावली.
सिद्धीने गणपती डोक्यावर घेतला आणि नदीकडे चालू लागला .आज गावात एक वेगळेच वातावरण होते .प्रत्यक्ष गणपतीच आपल्यासोबत चालतोय असा भास सगळ्यांना होत होता .
उघड्या अंगाने डोक्यावर गणपती आणि हातात अस्थीचा कलश घेऊन सिद्धी पाण्यात शिरला तो परत आलाच नाही .
बराचवेळ वाट पाहून गणपतराव खिन्न मनाने परत फिरले तेव्हा दारातच रिकामा कलश आणि पाट ठेवलेला दिसला .
" आज स्वतःचे विसर्जन स्वतःच केलेत .चला ही हौस ही पूर्ण केलीत आणि अस्थी विसर्जनाचे पुण्यही पदरात पाडून घेतलेत " टॉवेलने डोके पुसत उंदीर कुत्सितपणे म्हणाला.
" एका  शाहिदाचे अस्थी विसर्जन करणे हे पुण्याचेच काम आहे .आपले मरण डोळ्यासमोर दिसत असताना ही पाठ न दाखवणारे हे भारतीय सैनिक आहेत आपण देव म्हणून आपले सर्व करण्यात पुण्य मानणाऱ्या ह्या मानवांसाठी थोडे पुण्य आपण केले तर  काय हरकत आहे ." आपले ओले केस पंख्यापुढे करत तो हसत म्हणाला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment