Friday, April 11, 2025

Rekhachithram

Rekhachithram
रेखाचित्रम
त्या वृद्ध माणसाला आपला शेवट जवळ आलाय हे माहितीय .म्हणूनच तो आज फिरायला बाहेर पडलाय.फिरताना तो एका दाट जंगलात गाडी थांबवितो आणि हातात दारूची बाटली घेऊन बाहेर पडतो. तो एका झाडाखाली बसून आपला लाईव्ह व्हिडिओ शूट करू लागतो .त्यात तो आपण आणि काही मित्रांनी 1985 साली केलेल्या खुनाची कबुली देतो आणि त्या तरुणीला इथेच पुरल्याचे सांगतो त्यानंतर त्याचा डोक्यात गोळी लागून मृत्यू होतो.तो खून आहे की आत्महत्या हे कोणालाच माहीत नाही.
इन्स्पेक्टर विवेक गोपीनाथ सस्पेंड होता. ऑनलाइन जुगारात त्याने पंधरा लाख कमावले असा आरोप त्याच्यावर आहे.आजच तो ड्युटीवर जॉईन होतोय .त्याची बदली केरळातील मालाक्काप्पर गावात झालीय जिथे त्या वृद्धाचा मृत्यू झालाय.
वृद्धाच्या फेसबुक पोस्टवरून खरोखरच एक मानवी सांगाडा तिथे मिळतो .पण त्या वृद्धाने जी नावे घेतली आहेत ते आता शहरातील प्रतिष्ठित राजकारणी आणि उद्योगपती आहेत.
तो सांगाडा तरुणीचा आहे हे कळते पण तीची ओळख पटत नाही.
विवेकसमोर त्या तरुणीची ओळख शोधून तिचा मृत्यू का ? कसा ? झाला हे शोधून काढायचे आव्हान आहे.
विवेक ज्यांना ज्यांना भेटतो त्यांचे खून होतात.एकदा तर विवेकवर हल्ला होतो. पुराव्याची एक एक कडी जोडत विवेक त्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जातो पण सत्य समोर येते ते भयानक असते.
चित्रपटात सुपरस्टार मामुटीचा उल्लेख आणि त्याचा रेफरन्स घेतला आहे. 
मल्याळम चित्रपटात रहस्य चांगल्या पद्धतीने मांडले जाते त्यामुळे चित्रपट मध्येच सोडून जाता येत नाही.यात हाणामारी रक्तपात नाहीच. आहे फक्त एका रहस्याचा शोध आहे जो अतिशय रोमांचकारी आहे.
चित्रपट सोनी लिव्हवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, April 9, 2025

टेस्ट

Test
टेस्ट
अर्जुन सध्याचा भारताचा टॉप क्लास क्रिकेटपटू. पण आता तो फॉर्ममध्ये नाहीय. त्यातच भारत पाकिस्तानची तिसरी आणि फायनल टेस्ट मॅच तीन दिवसांवर आलीय.कर्णधार आणि कोच अर्जुनला खेळवायला नाखूष आहेत पण अर्जुनला स्वतःविषयी खात्री आहे . त्याला नाही निवडले तर तो मिडियाकडे जाईन अशी धमकी देतो. त्याला छोटा मुलगा आहे जो शाळेतून क्रिकेट खेळतो.
सर्वाना उर्फ सारा एमआयटीमधून शिकून आलाय. पाण्यापासून इंधन बनवायचे त्याचे स्वप्न आहे.प्रोजेक्ट तयार आहे तो अप्रुव्हलसाठी फिरतोय.सध्या तो एक कॅन्टीन चालवतोय . कॅन्टीनसाठी कर्जाने घेतलेले पैसे तो प्रोजेक्टसाठी वापरतोय.
कुमुध साराची पत्नी.लग्नाला बरीच वर्षे झाली पण त्यांना मूल नाही.तिला ट्रीटमेंटसाठी पैश्याची गरज आहे.सारा तिला फक्त आश्वासन देतोय. ती शाळेत टीचर आहे जिथे अर्जुनचा मुलगा अदित्य शिकतोय.कुमुद अर्जुनची बालमैत्रीण आहे आणि तिचे वडील अर्जुनचे पाहिले कोच होते.
काळ्या बाजारात भारत पाकिस्तान सामन्यावर मोठा सट्टा लावला गेलाय. साराला कर्ज देणारी माणसेही या सट्टामध्ये गुंतली आहेत.ते अर्जुनला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करतायत. त्याचबरोबर ते  पन्नास लाखासाठी साराच्या मागे लागलेत.
 अर्जुनची तिसऱ्या टेस्टसाठी नाईलाजाने निवड होते. पण अर्जुन यात चांगला खेळेल ?
साराचा प्रोजेक्ट अप्रुव्ह होईल का ? तो पन्नास लाखाचे कर्ज फेडण्यासाठी कोणते पाऊल उचलतो.
कुमुद आपल्या ट्रीटमेंटसाठी पैश्याची व्यवस्था करेल का ?
या सर्वांची उत्तरे मिळवायची असतील तर नेटफ्लिक्सवर टेस्ट पाहायला हवा.
नयनताराने हतबल झालेली कुमुद उभी केलीय.तर माधवन अगदी सहजपणे साराची भूमिका जगतोय.सतत टेन्शनमध्ये असलेला अर्जुन सिध्दार्धने छान रंगविला आहे.
नेटफ्लिक्स वर हिंदी भाषेत हा चित्रपट एकदा पाहण्यालायक आहे.

Tuesday, April 8, 2025

एक समाजसेवा अशी ही

एक समाजसेवा अशीही
आज आरतीला बंड्या नाही बघूनच थोडे  आश्चर्य वाटले . घरात गणपती आणि हा आरतीला हजर नाही ? थोडा चिडलोच . न राहवून त्याच्या आईला विचारले "बंड्या "? 
" गेलाय कर्जतला , जळली मेली ती समाजसेवा,"  तिने थोड्या रागातच उत्तर दिले.
मी त्याच्या बाबांकडे नजर टाकली. तर ते फक्त हसले .
आरती संपता संपता बंड्या दारात हजर झाला. पण आत शिरला नाही तसाच मागच्या दारातून बाथरूममध्ये घुसला . 
हा काय प्रकार आहे ते कळेना . मी बंड्याशी बोलायचे ठरविले . तशीही सौ.गणपतीसाठी चार दिवस गावी गेली होती त्यामुळे माझ्याकडे हि वेळ होता .
" भाऊ तुम्ही घरी बसा ,मी येतो तुमच्याकडे " माझ्या मनातले विचार ओळखूनच बंड्या म्हणाला.
थोड्या वेळाने तो घरात शिरला आणि समोर बसला " काय रे ? घरातला गणपती सोडून कुठे बाहेर  फिरतोस ? हे पाच दिवस तरी घरी राहा .नंतर तुलाच करायचे आहे सगळे , कुठे गेलेलास भटकायला ? " माझा प्रश्नाचा भडीमार चालू झाला .
"प्रेताला "  बंड्याने मान खाली घालून  उत्तर दिले .
मला भयानक धक्का बसला ,"अरे कोणाच्या ?  घरचे बोलले कसे नाही मला ? कोण गेले "? मला राहवत नव्हते.
" भाऊ , ती आजी कोण आहे ? होती ? मला माहित नाही .पण ती अनाथ होती आणि तिच्या मागे करणारे कोण नव्हते एव्हडेच मला माहित आहे " बंड्याने पडलेल्या चेहऱ्याने उत्तर दिले .
'काय चाललंय ते नीट सांग बंड्या "? मी रागाने बोललो .
 "भाऊ  मागच्या महिन्यात आमचा ग्रुप कर्जतला गेलेला ,आठवतंय "? 
"अरे तू नेहमीच कुठे तरी भटकत असतोस . पुढे बोल ".मी म्हटले.
 " तिथे सहज आम्ही एका वृद्धाश्रमाला भेट दिली .तेव्हा तिथे एका वृद्ध माणसाचे निधन झाले होते आणि सर्वजण महानगरपालिकेच्या गाडीची वाट पाहत होते .आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे नजर टाकली आणि कुठेतरी मनातून हाललो .त्याच्या चेहऱ्यावर  वेदना होती ,एक दुःख दडलेले दिसत होते.न राहवून आम्ही त्याची चौकशी केली .तर एका मोठ्या सरकारी कंपनीतून मोठ्या पदावरून निवृत्त झालेला वृद्ध होता तो .दोन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन परदेशात होती ,इथे कोणीच नाही. वेळच्या वेळी त्यांच्या खात्यात पैसे जमा होत होते. पण कोण भेटायला येत नव्हते .नेहमी बोलायचे खूप काही कमावले मी आयुष्यात. पण खांद्यावर घेऊन जाणारी चार माणसे जमवू शकलो नाही .ते ऐकून आम्ही ठरविले याचे अंत्यसंस्कार आम्ही करू.आम्ही विधिपूर्वक त्याचे अंत्यसंस्कार केले .चितेवर ठेवताना का कुणास ठाऊक त्यांचा चेहरा समाधानी दिसला . आम्हालाही काहीतरी केल्याचा आनंद झाला .तेव्हापासून आम्ही त्या आश्रमातील बेवारशी मृतदेहांचे विधिपूर्वक अंत्यसंस्कार करायचे ठरविले ,.आज तिसरी व्यक्ती होती जिचे अंत्यसंस्कार आम्ही करुंन आलो.भाऊ कसे हे आयुष्य हो .तरुणपणी या माणसांनी खूप मजा केली असेल .कुटुंबासाठी खूप कष्ट घेतले असतील . मित्रासाठी रात्री अपरात्री धावून गेले असतील.पार्ट्या केल्या असतील. पण आज ते एकटे पडलेत .त्यांचे कोणी ऐकत नाही. त्यांना सांभाळायला नको म्हणून इथे आणून टाकतात. पण जिवंत आहेत कि मेलेत हे हि पाहत नाहीत. काय वाटत असेल हो त्यांना ? म्हणून आम्ही ठरविले कमीत कमी याना बेवारशी मरण येऊ नये याची काळजी आम्ही घेऊ .त्यांचे विधिपूर्वक अंत्यसंस्कार करू . मला कळतंय हे असे  कोणाच्याही बाबतीत घडू नये. पण हे घडतेय मग आमच्यापरीने जे जे काही होईल ते आम्ही करू." 
मला काही सुचेना. हि कसली समाजसेवा ?आणि तीही या वयात .
मी म्हटले " अरे तुझ्या घरचे काय म्हणतील ?" 
" आई नाराज आहे . पण बाबा काहीच म्हणाले नाहीत ."
" ठीक आहे ,मी बोलतो बाबांशी " मी त्याला  आश्वासन दिले .
दुसऱ्या दिवशी त्याचे बाबा रस्त्यातच भेटले.
 " काल बंड्या बोलला माझ्याशी .तुमचे काय मत आहे ? मी डायरेक्ट विचारले.
 "खरे सांगू का  ? बाबा म्हणाले " आज अभिमान वाटतो मला बंड्याचा , तो जे करतोय ते समाजाच्या दृष्टीने चुकीचे असेल .रूढी परंपरेच्या विरुद्ध असेल पण त्याला जे योग्य वाटतेय तो ते करतोय .आज माझे संस्कार कामी आले त्याच्या " 
मी ताबडतोब बंड्याला फोन केला " बंड्या पुढच्यावेळी जाशील तेव्हा सांग मला .मीही खांदा द्यायला येईन .
© श्री. किरण कृष्णा बोरकर.