Monday, June 2, 2025

Thudarum

Thudarum
थुदारम
बेंझ पूर्वी चित्रपटात फाईट मास्तर होता.आता तो बायको, मुलगा आणि मुलीसह  छोट्या गावात राहतोय.त्याच्याकडे जुनी अँम्बसीटर गाडी आहे.ती गाडी तो टॅक्सी म्हणून वापरतो .लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि छोट्या प्रवासासाठी वापरतो.त्या गाडीवर त्याचे खूप प्रेम आहे. 
एक दिवस मुलाचे मित्र ती गाडी चालवतात म्हणून तो मुलावर खूप रागावतो . तो गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये देतो पण दुसऱ्या दिवशी  पोलीस ती गाडी जप्त करतात .गॅरेजवाला त्यातून गांजा घेऊन जाताना गाडी पकडली असे पोलीस इंस्पेक्टर बेनी त्याला सांगतो आणि गाडी सोडण्यास नकार देतो.
बेंझ सिनियर इंस्पेक्टर जॉर्जकडे जातो तेव्हा जॉर्ज गाडी त्याच्या ताब्यात देतो पण काही ठिकाणी आम्हाला सोड अशी विनंती करतो.मग जॉर्ज बेनी आणि कॉन्स्टेबल सुदेश त्याच्या गाडीतून जंगलाच्या आत जातात आणि गाडीच्या डिकीतून एक प्रेत काढून जंगलात पुरतात . या गोष्टीची कुठेही वाच्यता करायची नाही असे बेंझला बजावतात.
हादरलेला बेंझ सकाळी घरी येतो तेव्हा मुलगा अजून घरी आला नाही असे त्याची पत्नी सांगते. जॉर्ज पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार करतो .
त्या रात्रीच्या जोरदार पावसात डोंगर खचतो आणि त्यातूनच एक पोत्यात बांधलेले प्रेत पोलिसांना सापडते.
कोणाचे आहे ते शव ? बेंझला मुलाचे सत्य कळेल का ? अपराधी पोलिसांना शिक्षा मिळेल का ?
सुरवातीला विनोदी वाटणारा हा चित्रपट पुढेपुढे गंभीर वळण घेत जातो आणि शेवटी अंगावर काटा आणतो .
मोहनलाल बेंझच्या प्रमुख भूमिकेत आहे .सुरवातीला साधाभोळा आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा,  पोलिसांसोबत फिरताना घाबरट आणि सत्य कळल्यावर पेटून उठणारा बेंझ मोहनलालने छान रंगविला आहे तर शोभनाने त्याची पत्नी म्हणून उत्तम साथ दिली आहे .
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Sunday, June 1, 2025

डिपार्टमेंट क्यू

Department Q
डिपार्टमेंट क्यू 
पोलीस ऑफिसर कार्ल मोर्क आणि त्याचा सहकारी एका घरात बाहेर पोलीस कॉन्स्टेबल उभा असलेला पाहून शिरतात. तिथे एक खून झालेला असतो. अचानक एक बुरखेधारी व्यक्ती येऊन त्यांच्यावर गोळीबार करतो. एक गोळी कार्लला लागते. दुसरी त्याच्या सहकार्याला आणि पोलीस कॉन्स्टेबल मारला जातो. 
या घटनेला चार महिने उलटून गेलेत.कार्ल आता ठीक आहे .नियमानुसार त्याचे मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार चालू आहेत.पण त्याचा सहकारी कमरेखाली पांगळा झालाय. 
मेरीट लिंगार्ड एक महत्त्वाकांक्षी तरुण वकील .ती हुशार आहे पण तितकीच फटकळ .आपला मंद भाऊ विलीयमशिवाय ती कोणाशीच जवळीक करत नाही . आपल्या वडिलांना भेटायला ती विलियम सोबत निघाली पण त्या फेरीबोटीतच नाहीशी झालीय.या गोष्टीला चार वर्षे उलटून गेलीय.पोलिसांनी ती केस अनसॉंल्व्ह  केसमध्ये टाकली .
पोलीस कमिशनरला एक डिपार्टमेंट सुरू करायची ऑर्डर येते .यात ज्या केसेस निकालात नाही अर्थात अनसॉल्व्ह केसेस पुन्हा ओपन करून त्याचा तपास करायचा आहे .पोलीस कमिशनर त्या डिपार्टमेंटचा ताबा कार्लला देतात.
अक्रम सिरियातून आलाय .तो  आयटी इंजिनियर आहे .पण त्याचा स्वभाव गूढ आहे.त्याला नोकरीची गरज आहे म्हणून कार्लच्या सोबतीला दिले जाते.
रोज डेस्क जॉब करणारी पोलीस ऑफिसर .ती थोडी मनाने खचलेली आहे .कार्ल तिलाही सोबत घेतो.
मेरिट लिंगार्ड ही त्याची पहिली केस आहे.त्या प्रकरणाचे काहीच पुरावे त्यांच्याकडे नाहीत.ती जिवंत आहे का ? तेही माहीत नाही .
होय ,मेरिट लिंगार्ड जिवंत आहे .पण ती कोठे आहे ? कशी आहे हे कोणालाच माहीत नाही .
डिपार्टमेंट क्यू मेरिट लिंगार्डला शोधून कढेल का ?
एक थरारक आणि उत्कंठावर्धक तपास कार्य ज्यात तुम्ही तहानभूक विसरून सामील व्हाल .
नेटफ्लिक्सवर चुकवू नये अशी  ही सिरीज  हिंदी भाषेत आहे .

Friday, May 30, 2025

हिट :द थर्ड केस

HIT : The Third Case
हिट : द थर्ड केस 
आधीच्या दोन केसच्या विरुद्ध अशी ही थर्ड केस आहे. कदाचित यात नानी आहे म्हणून चित्रपटाचा चेहरामोहरा बदलून टाकला असावा.
थर्ड केस ही टिपिकल साऊथ इंडियन फिल्म आहे. यात तपास कार्य कमी आणि रक्तपात जास्त आहे. आधीच्या दोन्ही केस रहस्यमय आणि थ्रिलर होत्या तर ही एक्शन फिल्म आहे.
देशभारत काहीजणांना अतिशय क्रूरपणे उलटे लटकावून खून केले जातायत आणि विशेष म्हणजे याचे चित्रीकरण करून ते डार्क वेबवर पोस्ट केले जातात.त्याचबरोबर खून झालेल्या व्यक्तींचे काही मानवी अवयव गायब आहेत.खरे तर ते अवयव दुसऱ्या व्यक्तींना काहीच उपयोगाचे नाही .
पोलीस ऑफिसर अर्जुन सरकारची बदली वायझॅगला होते पण ड्युटीवर जॉईन होण्यापूर्वी तो ही अश्याच प्रकारे एका व्यक्तीची हत्या करतो.
ऑफिसर अर्जुन भडक माथ्याचा म्हणून ओळखला जातो.
काय आहे अश्या खुनाचे रहस्य ज्यात अर्जुनही फसलाय. 
हल्ली किल चित्रपटापासून अति हिंसाचार आणि क्रूरपणा दाखविण्यास सुरवात झालीय. रक्ताने माखलेला नायक प्रेक्षकांना आवडतो.तो कितीही जखमी झाला तरी गुंडांना अंगावर शहारे येतील अशा पद्धतीने संपवितो.कोणाला उभा फाडतो तर कोणाचे मुंडके छाटतो.
ज्यांना अति हिंसाचार आणि अंगावर येणारा रक्तपात पाहायला आवडते त्यांनी हिट : थर्ड केस नक्की बघावा. ज्यांना रक्तपात आवडत नाही त्यांनी मुळीच पाहू नये.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .चौथ्या केसमध्ये पोलीस ऑफिसर कोण असेल याचीही झलक आपल्याला मिळते.