Tuesday, October 31, 2023

पोलीस स्टोरी लॉकडाऊन

पोलीस स्टोरी लॉकडाऊन
Police story Lockdown
त्या दिवशी डिटेक्टिव्ह झोन्ग वेन आपल्या मुलीला भेटायला वू बारमध्ये गेला होता. मिओ डॉक्टर होती आणि वू जियांगची गर्लफ्रेंड होती. वू जियांग वू बारचा मालक होता.
आपले वडील पोलीस ऑफिसर आहेत हे मिओने वू जियांगला सांगितले नव्हते. आज बारमध्ये जास्तच गर्दी होती.झोन्ग वेनचे आपल्या मुलींबरोबरचे संबंध थोडे ताणलेले होते.पण तरीही त्याचे मुलीवर प्रेम होते.
झोन्ग वेन बारमध्ये आपल्या मुलीशी बोलत असताना वू जियांगने सर्व कस्टमरला बंदी बनवले.त्याने झोन्ग वेनला ही पकडले. सर्वांच्या सुटकेच्या बदल्यात त्याने तुरुंगातील एका कैद्याच्या सुटकेची मागणी केली .
झोन्ग वेनने त्याची मागणी पूर्ण करायची तयारी दाखवली .पण एका साध्या कैद्याची मागणी वू जियांग का करतोय हा प्रश्न त्याला पडला होता .
काय कसेल त्यामागचे कारण ? झोन्ग वेन  सर्वांची सुटका करेल का ? आपल्या मुलींबरोबरचे संबंध पूर्ववत होतील का ??
पोलीस स्टोरी सिरीजमधील हा चित्रपट 2013  ला रिलीज झाला.आता पोलीस ऑफिसर झोन्ग वेन म्हातारा झालाय.तो पूर्वीसारखा चपळ आणि गरम डोक्याचा राहिला नाही.त्याच्या हालचालींवर बंधन आलीत.पण आता तो शांतपणे विचार करतो.परिस्थितीला सामोरे जातो. सामोपचाराने वाद मिटवतो पण शक्य असेल तेव्हा प्राणपणाने लढतो .
प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.जॅकी चेन प्रेमींनी आवर्जून पाहावा.

Saturday, October 28, 2023

IRAIVAN

IRAIVAN
इराईवन
एसीपी अर्जुन कडक प्रामाणिक ऑफिसर आहे.त्याच्या सनकी स्वभावामुळे सगळेच घाबरून असतात.तो पोलीस असूनही कायदे पाळणारा नसतो.
शहरात तरुण मुलींचे क्रूरपणे खून होत असतात .खुनी स्वतःला स्मायली मॅन  म्हणवून घेतो.त्याला शोधण्याची जबाबदारी अर्जुन आणि आंद्रेववर आहे.अर्जुन आणि आंद्रेव खास मित्र.आंद्रेवची बहीण प्रिया अर्जुनवर प्रेम करतेय. खूप प्रयत्न करून अर्जुन स्मायली किलरला पकडतो पण त्यात आंद्रेव मारला जातो .या प्रकरणाचा धक्का बसून अर्जुन  नोकरी सोडून प्रियासोबत कॉफी शॉप उघडतो.
स्मायली मॅन तुरुंगातून पळून जातो.  तिथे अर्जुनची बहीण नाहीशी होते.अर्जुन पुन्हा स्मायली मॅनला पकडतो आणि पोलीस त्याला गोळ्या घालतात .
स्मायली मॅन एकटाच नाही तर अजून कोणीतरी त्याला मदत करतोय याची अर्जुनला खात्री पटते पण पोलीस त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.
शेवटी दुसरा स्मायली मॅन पकडला जातो का ? तो कोण आहे ? त्याची कोणती किंमत अर्जुनला द्यावी लागते.
जा
जयम रवीने अर्जुनची भूमिका जोशात केली आहे.तर नयनताराला प्रियाच्या भूमिकेत फारसा वाव नाही.स्मायली मॅन राहुल बोस भाव खाऊन जातो.
पण चित्रपट खूपच लांबला आहे.रक्तरंजित दृश्ये खूप आहेत त्या मानाने रहस्य फारसे नाही .उगाच लांबविला असे वाटते .
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Friday, October 27, 2023

बॉडीस

Bodies
बॉडीस
साल 1890 इंग्लंडमधील लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटवर  इन्स्पेक्टर आल्फ्रेड हिलींगवूडला एका माणसाची बॉडी सापडते .तो माणूस नग्न असतो .त्याच्या डोळ्यात गोळी घुसून मृत्यू झालाय . मनगटावर एक विशिष्ट निशाणी आहे.पण पोस्टमार्टेममध्ये गोळी सापडत नाही.
साल 1941 इंग्लमधील  पोलीस मुख्यालयात इंस्पेक्टर चार्ल्स व्हाईटमनला एक फोन येतो .लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटवर एक बॉडी पडलेली आहे  तिची विल्हेवाट लाव. व्हाईटमन तिथे जातो.तिथे एक नग्न बॉडी पडलेली आहे.तिच्या डोळ्यात गोळी घुसून मृत्यू झाला आहे .मनगटावर एक विशिष्ठ निशाणी आहे.व्हाईटमन ती बॉडी घेऊन जाताना एक सहकारी त्याचा पाठलाग करतो पण महायुद्धात होणाऱ्या बॉम्बहल्ल्यात दोघेही जखमी होतात .त्याचा फायदा घेऊन व्हाईटमन आपल्या सहकाऱ्याला ठार करतो आणि बॉडी त्याच्याच डिकीत सापडली असे भासवितो.
साल 2023 लंडनमध्ये काही लोकांनी आंदोलन केलंय.  महिला इंस्पेक्टर शहारा हसन  बंदोबस्तासाठी तिथे आहे.एक तरुण मुलगा संशयास्पदरित्या फिरताना तिला दिसतो .त्याच्या हातात बंदूक आहे.ती त्याचा पाठलाग करत लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटकडे जाते.तिथे तिला एक नग्न पुरुषाची बॉडी आढळते .त्याच्या डोळ्यात गोळी लागून मृत्यू झालेला असतो तर मनगटावर एक विशिष्ट खूण असते.शेजारी तो तरुण मुलगा गन घेऊन असतो .पोस्टमार्टेममध्ये गोळी सापडत नाही.
साल 2052 महिला इंस्पेक्टर इरिस मापेलवूड काही संशयितांच्या मागावर लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटवर जाते .तिथे तिला एक नग्न माणूस पडलेला सापडतो .त्याच्या डोळ्यात गोळी घुसलीय आणि मनगटावर विशिष्ट खूण आहे.तिला तो मेलाय असे वाटते पण जवळ जाताच तो डोळे उघडतो . ती त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करते. तिथे तो जिवंत आहे पण कोमात आहे.ती त्याचा डीएनए घेऊन खरी ओळख काढते तेव्हा तो एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे असे कळते.ती कॉलेजमध्ये जाते तेव्हा तो तिथे लेक्चर देत असतो .ती हैराण होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते तेव्हा हॉस्पिटलमधील बॉडी मृत होते.
काय आहे हा प्रकार ?? हादरून गेलात ना ?? चार वेगवेगळ्या काळात एकच बॉडी एकाच ठिकाणी एकाच विशिष्ट प्रकारे सापडली जाते. चारही काळात आपल्यापरीने त्या गुन्ह्याचा शोध घेतला जातोय.यात तपासात भाग घेणाऱ्या इंस्पेक्टरची फारच महत्वाची भूमिका आहे.प्रत्येक एपिसोड डोळ्यांची पापणी न हलविता पाहिला पाहिजे.शेवटच्या दोन एपिसोडमध्ये हे रहस्य सुटत जाते.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे.नक्की पहावी अशी सिरीज आहे.

Wednesday, October 25, 2023

काला पानी

काला पानी
Kaala Paani
साल 2027 
अंदमानमध्ये स्वराज महोत्सव होणार आहे.खूप माणसे त्यासाठी अंदमानात आलीत. फक्त हेल्थ डिपार्टमेंट कडून परमिशन बाकी आहे.डॉ.सौदामिनी सिंह त्यासाठी सही करायला तयार नाहीत.तिला एका विचित्र रोगाची चिंता आहे.मानेवर काळे डाग असणारा हा रोग पहिल्यांदा बरा होतो पण काही दिवसांनी त्या व्यक्तीला उचक्या सुरू होतात आणि तोंडातून काळे रक्त बाहेर पडून ती व्यक्ती मृत्यू पावते.
गव्हर्नर  झिब्रांन काद्री डॉ. सौदामिनी सिंहवर दबाव टाकून ती परमिशन घेतात. एसीपी केतन कामतला अंदामानातून बाहेर पडायचे आहे.त्यासाठी तो आटोसच्या प्रमुखाला सर्वतोपरी मदत करत.आटोसचे मोठे प्रोजेक्ट अंदमानात चालू आहेत.स्वराज महोत्सव ही त्यांनीच भरविला आहे.
शेवटी डॉ.सौदामिनी सिहने त्या आजाराचे मूळ  कारण शोधून काढले.हा रोग पाण्यातून पसरतोय हे तिच्या लक्षात येते.ते पाणी एका तलावातून ऑटोसच्या पाईपलाईन मधून शहरात आणले जातेय. पण ते इतरांना कळण्याआधीच तिचा अपघाती मृत्यू झाला.
आता तो आजार सगळीकडे पसरला आहे. अंदमानातून कोणीही बाहेर जाऊ शकत नाही आणि कोणीही आत येऊ शकत नाही . अंदमान जगासाठी सील झाले आहे.त्या आजाराचे औषध शोधून काढायचे प्रयत्न सर्व स्तरातून चालू आहेत.
ओराको आदिवासी जमातीकडे या रोगावर औषध आहे पण ती जमात कुठेतरी गायब झाली आहे.असे म्हणतात त्यांना शेकडो वर्षांपासून या रोगाची कल्पना आहे. 
अंदमानात हाहाकार माजला आहे.शेवटी गव्हर्नर काद्रीने एक उपाय शोधून काढला .पण त्यात ते यशस्वी होतील का ??
आपल्याला पुन्हा करोना काळात घेऊन जाणारी ही सिरीज आहे.मानवी स्वभाव परिस्थितीनुसार कसा बदलत जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही सिरीज आहे.
मोनासिंह , चिन्मय मांडलेकर, अमेय वाघ ,आशुतोष गोवारीकर ,अशी स्टार मंडळी यात आहे.प्रत्येक एपिसोड आपली उत्कंठा वाढवतो.अंदमानातील जंगल आपल्या अंगावर येते.याचा दुसरा सिजन येणार याची कल्पना शेवटच्या भागात मिळते.
ही सिरीज नेटफ्लिक्सवर आहे

Guns of the Magnificent Seven (1969 )

Guns of the Magnificent Seven (1969 )
 मॅग्नफीसंट सेवन सिरीजचा हा चित्रपट आहे . मेक्सिकोतील क्रांतिकारी नेता क्वांटेरॉ  प्रेसिडन्टच्या सैन्याकडून पकडला जातो .अटकेपूर्वी तो  सहाशे डॉलर आपल्या मॅक्स नावाच्या अधिकाऱ्याकडे देतो आणि आपल्या सुटकेसाठी ह्याचा वापर कर असे सांगतो .
मॅक्स मेक्सिको बॉर्डर पार करून क्रिस ऍडमला भेटतो.क्रिस व्यावसायिक आहे .तो या कामासाठी काही माणसे निवडतो .किनो घोडेचोर आणि हाणामारीत तरबेज आहे.कॅस्सी बॉम्ब बनविण्यात हुशार आहे. स्लॅटर एका हाताने अधू आहे पण निशाणेबाज आहे. मॉर्गन सुरफेकीत निष्णात आहे.
हे सर्व मॅक्स सोबत मेक्सिकोत येतात .आता तुरुंगात जाऊन क्वांटेराला कसे सोडवितात हे पाहणे उत्कंठावर्धक आहे.
हा एक क्लासिक वेस्टर्न चित्रपट आहे.मेक्सिकोतील ओसाड जमीन , रखरखीत ऊन ,तुफान घोडेस्वारी आणि पिस्तुलबाजीची रेलचेल असलेला हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर इंग्रजी भाषेत आहे.
ज्यांना जुने वेस्टर्न चित्रपट आवडतात त्यांनी हा चित्रपट चुकवू नये.

Saturday, October 21, 2023

king of kotha

KING OF KOTHA
किंग ऑफ कोथा
राजू ,कन्नन, टोनी आणि अजून काहीजण एकत्र फुटबॉल खेळायचे .त्यात राजू आणि कन्नन खास दोस्त.तामिळनाडू केरळच्या बॉर्डरवर समुद्रकिनारी कोथा नावाचे छोटे गाव होते .तिथे हे राहायचे.
राजूचे वडील रवी त्यावेळचे मोठे गँगस्टर होते .त्यामुळे राजूलाही गुंडगिरीची सवय लागली.आता गावात राजूचेच राज्य होते पण काही गोष्टीवरून त्याचा आणि कन्ननचा वाद झाला दोघात वैर आले आणि राजू कोथा सोडून गेला . 
या गोष्टीला दहा वर्षे  उलटून गेलीत .आता कोथामध्ये कन्ननचे राज्य आहे.गुंडगिरी ,अमली पदार्थ यात तो राजा आहे .त्याला थांबविणारा कोणीच नाही . टोनी पोलीस अधिकारी झालाय पण तो ही शांत आहे.
सिनियर इंस्पेक्टर शाहुल हसनची बदली कोथात झालीय.एक कडक ऑफिसर म्हणून त्याचे नाव आहे .आल्याआल्या तो कन्ननच्या कॅसिनोमध्ये जातो पण तिथे त्यालाच धमकी दिली जाते.कन्नन त्याच्या कपाळावर बंदूक ठेवतो .अपमानित होऊन शाहुल तेथून निघून जातो तेव्हा टोनी त्याला राजू आणि कन्ननची कथा सांगतो.कन्ननला संपविणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे राजू.
शाहुल कन्ननला संपविण्यासाठी एक योजना बनवतो.तो राजूला शोधतो आणि कोथाला बोलवून घेतो .आता फक्त त्याला राजू आणि कन्ननच्या युद्धात प्रेक्षकांची भूमिका घ्यायची आहे .
राजू कन्ननला संपवेल का ?? 
पण इथेच सर्व संपत नाही .कदाचित दुसऱ्या भागात आपल्याला अजून काही भयानक पाहायला मिळेल.
दुलकर सलमानने राजू उभा केलाय तर शबीर कल्लारक्कलने कन्नन .
एक तुफान हाणामारीने भरलेला चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.ज्यांना हाणामारी असलेले असलेले साऊथचे चित्रपट आवडतात त्यांनी नक्की पहावा.

Thursday, October 19, 2023

THIRUCHITRAMBALAM

THIRUCHITRAMBALAM
थिरुचित्रामबालम
थिरुचित्रामबालम उर्फ डरपोक डोनिकमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करतोय. तो स्वभावाने शांत आणि भित्रा आहे, म्हणूनच त्याला डरपोक नाव पडलेय. घरी त्याचे वडील आणि आजोबा आहेत.घरात स्त्री कोणीच नाही. डरपोकचे वडील इन्स्पेक्टर आहेत .पण त्याचे आणि डरपोकचे पटत नाही .दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. दोघांच्यात आजोबाच एकमेव दुवा आहेत.
डरपोकची फक्त एकच मैत्रीण आहे .शोभना लहानपणापासूनच डरपोकसोबत आहेत.दोघेही एकाच बिल्डिंगमध्ये राहतात.शोभना खाली तर डरपोक वरच्या मजल्यावर.दोघांच्या कुटुंबाचेही खूप चांगले संबंध आहेत.
डरपोकला जी तरुणी आवडते ते तो शोभनाशी शेयर करीत असतो . एक दिवस लहान मुले पळविणार्या टोळीची माहिती डरपोक पोलिसांना देतो आणि डरपोकचा बाप त्या गुंडांना पकडतो. 
काही दिवसांनी डरपोकच्या बापाला पॅरॅलीसिसचा अटॅक येतो. त्यातून त्यांचे संबंध चांगले होतात. पण डरपोकचा घाबरट स्वभाव काही जात नाही .ते आजोळी एका लग्नाला जातात तिथेही डरपोक एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि ते शोभनाला सांगतो .पण तिथेही फेल होतो. 
आजोबा डरपोकला एक सल्ला देतो . पण त्या सल्लाचे परिणाम वाईट होतात आणि शोभनाशी असलेले संबंध दुरावतात .शोभना कॅनडाला जॉबसाठी निघून जाते. असे काय घडते की इतकी सुंदर निखळ मैत्री तुटायला येते. 
फक्त डरपोकच आहे जो पुढाकार घेऊन शोभनाबरोबर पूर्वीसारखी मैत्री जुळवू शकतो .पण डरपोक पुढाकार घेईल का ?
एक अतिशय सुंदर ,निखळ मैत्री कशी असते हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे पहावा.
धनुषने डरपोक उत्तम सादर केलाय.त्याचे बुजरेपण ,मुलीला प्रपोज करणे,शोभनाशी निखळ स्वच्छ मैत्री.,आजोबांसोबत मित्रांसारखे वागणे तर बापाशी फटकून बोलणे सुरेख सादर केलंय. प्रकाशराजने डरपोकचा बाप आणि इन्स्पेक्टर सादर केलाय.पॅरालिसिस अटॅक आल्यावर आलेली हतबलता .आपल्या बापावर अवलंबून रहाणे, डरपोकची माफी मागणे पाहून हलायला होते.
नित्या मेननने शोभना बनून धमाल उडवली आहे.डरपोकबरोबर भांडणारी , त्याची टेर खेचणारी पण त्यासाठी इतरांशी भांडणारी, काळजी करणारी शोभना. आपलीही मैत्रीण अशी असावी असे वाटते.
सगळ्यात धमाल केली आहे ते डरपोकचा आजोबा बनलेल्या भारतीराजाने. आपला मुलगा आणि नातू यांच्यामधील दुवा बनलेला. नातवासोबत दारू पिणारा तर मुलाची सेवा करणारा बाप सुरेख रंगविला आहे. तो जीवनाकडे खूपच सकारात्मक नजरेने पाहतो आणि आनंदाने दिवसाचे स्वागत करतो .
एक छान कौटुंबिक चित्रपट धनुषने आपल्याला दिला आहे.
चित्रपट प्राईमवर हिंदी भाषेत आहे.