Saturday, March 22, 2025

अस्तित्व

अस्तित्व
शहरात आज तंग वातावरण होते. जिकडे बघावे तिकडे पोलीस . सायकल ,मोटारसायकलवरून जाणाऱ्यांची चौकशी होत होती.भले त्यांच्यासोबत स्त्री लहान मुले असो. संशय आलेल्या व्यक्तींना बाजूला काढले जात होते. शहरातील मस्जिद ,देवळे , महापुरुषांचे पुतळे याना विशेष संरक्षण दिले गेले होते. भिकाऱ्यांना मारून हटवले जात होते. तर हॉस्पिटलजवळ मोफत अन्नदानही आज बंदच दिसत होते.
" वाईन शॉपतरी उघडे असू दे बाबा " बंड्या स्वतःशी पुटपुटत हातातील कापडी पिशवी खिश्यात सारत चालला होता.
" परिस्थिती कोणतीही असो वाईन शॉप उघडेच राहणार बाळा,  ते फक्त ड्रायडे ला बंद असतात " अचानक बाजूने आवाज आला तसा बंड्या दचकला.
त्याच्या बाजूनेच तो चालत होता. जीर्ण झालेले कपडे, लांबलचक पांढरी शुभ्र दाढी , गळ्यात माळ ,हातातील काठीचा आधार घेत तो बंड्याच्याच बाजूने चालत होता. बंड्याने त्याच्याकडे पाहतच तो हसला.
" बाबा तुम्ही सुद्धा ?" बंड्या अंगठा ओठाजवळ नेऊन आश्चर्याने विचारले.
" नाही रे , आयुष्यात कधीही मद्याला स्पर्श केला नाही मी. हो पण दुसर्यांना रोखलेही नाही ." त्या म्हाताऱ्याने हसत हसत सांगितले .
" मग इतक्या तणावपूर्ण वातावरणात काय करतायत " 
" बघायला आलोय काय होणार ते "
" काय होणार ? येत्या  काही वर्षांत यादेशातून आपले इतिहासातील शत्रू नाहीसे होणार . "  बंड्या हसत म्हणाला.
" कदाचित इतिहास देखील अस्तित्वात राहणार नाही. कारण त्यासाठी लागणारे पुरावेही नष्ट होतील " कुत्सितपणे तो म्हातारा म्हणाला.
"आमचे महापुरुष नेहमीच आमच्या मनात राहतील." बंड्या छाती फुगवून म्हणाला.
" तुमच्या मनात तर तुमचे देवही आहेत . पण काहीजण अजूनही देव भूत अस्तितवात नाही असे म्हणतात." तो म्हातारा आजूबाजूला पाहत म्हणाला.
" बाबा तुम्ही घाबरू नका .इथे म्हाताऱ्यांना कोणीच हात लावत नाही ." बंड्या आश्वासक स्वरात म्हणाला.
" पण स्त्रियांना लावतात . मग ती सात वर्षाची असो की साठ वर्षाची " उपरोधिकपणे हसत म्हातारा उद्गारला.
" बाबा,  नको त्या विषयांवर चर्चा नको "बंड्या चिडून म्हणाला. 
" का रे बाबा ? तुला घेतल्यावरच अश्या गोष्टींवर चर्चा करावीशी वाटते का ? " अंगठा ओठाजवळ नेऊन तो म्हातारा म्हणाला.
" अरे  तुम्ही ज्या महापुरुषांची पूजा करता ना ते किती महान होते याची तीळभरही कल्पना नाही तुम्हाला ",आठवणीत हरवून जात तो म्हातारा पुटपुटला.
" दाढी पांढरी झाली म्हणून सर्व  इतिहास  येतो का तुम्हाला " ?  बंड्या चिडला
" बाळा आज तुझे पणजोबा ज्या वयाचे असते त्यापेक्षा जास्त वयाचा असेन मी .इतिहास  कोळून प्यायलोय किंबहुना इतिहास मीच लिहिला आहे असे समज." म्हातारा हसत म्हणाला.
" मग त्यालाही तुम्ही ओळखत असाल ? " पोलीस बंदोबस्तात असलेल्या त्या कबरीकडे बोट दाखवून बंड्याने विचारले.
" मी त्यांनाही लहानपणापासून ओळखतो."अश्वारूढ असलेल्या त्या तेजस्वी मूर्तीकडे काठी दाखवत म्हातारा म्हणाला. पण बोलताना त्याची काठी थरथरत होती आणि नजरेत भीतीची एक चमक क्षणात निघून गेली हे मात्र बंड्याला दिसले नाही.
" त्यांना कोण ओळखत नाही " पुतळ्याला मनोभावे नमस्कार करीत बंड्या हळवा झाला.
" पण तुझी मुले ओळखतील का त्यांना " पुन्हा कुत्सित स्वरात म्हातारा म्हणाला." हा तोच महापुरुष आहे ज्याने सामान्य जनतेवर जुलूम होताच तलवार उपसली. अन्यायाविरुद्ध लढला.लोकांना स्वाभिमानाने जगायला शिकवले.सैन्य उभारले. वाहतुकीचे मार्ग बनविले.समुद्रावर सैन्य निर्माण केले. स्त्रियांना हक्क दिले." म्हातारा आवेशात म्हणाला.
" बघा बाबा ,तुम्हाला ही ते मान्य आहे ना ? मग त्यांच्या शत्रूच्या आठवणी निशाण्या का आपण ठेवायच्या  " बंड्याचा स्वर समजावण्याचा झाला.
" कारण तुझ्या पुढच्या पिढीला हे कळावे म्हणून. नाहीतर  तुझा मुलगा किंवा  तुझा नातू उद्या विचारेल हे महापुरुष कोणाच्या विरुद्ध लढले.त्यांच्या शत्रूंचे काहीच पुरावे दिसत नाहीत तेव्हा काय उत्तर द्याल ." म्हातारा हसत म्हणाला .
" चल उशीर झाला मी निघतो " अचानक तो म्हातारा म्हणाला.
" बाबा तुमचे नाव तरी सांगा. नाहीतर घरी चला चहा प्यायला ." बंड्याने त्यांना प्रेमाने विचारले.
" मी असा माणूस आहे ज्याकडे सर्व काही होते पण शेवटपर्यंत तो अपयशी राहिला. आपले घरदार सोडून तो इथे येऊन राहिला आणि आता स्वगृही जाऊ शकत नाही .मी एक कमनशिबी आहे जो फक्त निंदा सहन करीत राहणार " खिन्नपणे मान हलवीत तो म्हातारा पुटपुटला आणि समोरच्या गर्दीत दिसेनासा झाला .

शहराबाहेर असणाऱ्या मोठ्या कार्पोरेट  ऑफिसमध्ये तो म्हातारा भव्य टेबलमागे बसलेल्या दोन व्यक्तींपुढे उभा होता. यशवंत मनोहर राज उर्फ यमराज बोटात बुलेटची किचेन गरागरा फिरवत त्याच्याकडे छद्मीपणे पाहत होते.तर बाजूला त्यांचे सचिव चिंतामणी त्रंबक गुप्त उर्फ चित्रगुप्त लॅपटॉपवर बोटे चालवत होते.
" फिटली का हौस फिरून यायची . बरे जायचे तर दिल्लीला तुमच्या मूळगावी जायचे ते नाही तर म्हणे मला माझीच कबर बघायला जायचे आहे .आज मरून साडे तीनशे वर्ष झाली असतील पण शहेनशहा बनायची हौस फिटली नाही " यमराज तावातावाने बोलत होते.
" महाराज माझ्या कबरीवरून वाद चालू आहेत असे ऐकले म्हणून तुमच्याकडे पॅरोलसाठी अर्ज केला . खाली परिस्थिती बिकट आहे .पुढे अजून बिकट होतील.खरे सांगू हा औरंगजेब होता म्हणूनच शूर महापुरुष निर्माण झाले . त्यानंतर आमच्याविरुद्ध लढायला मराठ्यांच्या अनेक पिढ्या तयार झाल्या .पण उद्या आमचेच अस्तित्व नष्ट झाले तर ?"  औरंगजेबाने उदास होऊन विचारले आणि केबिनच्या बाहेर पडला.

No comments:

Post a Comment