Saturday, March 29, 2025

अडोलेसेन्स

Adolescence
अडोलेसेन्स
लहान मुलांचे विश्व खूपच नाजूक असते.जी मुले तारुण्याच्या उंबरठ्यावर येतात तेव्हा तर त्यांना फारच जपावे लागते.काही पालक मुलांकडे फारसे लक्ष देत नाहीत ते शाळेवर अवलंबून असतात तर शाळेत आपला पाल्य नक्की काय करतोय तेच पालकांना माहीत नसते.
  त्या छोट्याश्या गावात सकाळी सहा वाजता काही पोलीस दरवाजा तोडून मिलरच्या घरात घुसले आणि कोणाला काही कळायच्या आत तेरा वर्षीय जेमी मिलरला त्याच्या वर्गातील कॅथी लिनोर्डच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली. जेमीचे वडील एडी मिलर ,मोठी बहीण ,आणि आई याना त्या विषयी काहीच माहीत नाही .जेमीला अटक होताच त्याला त्याच्या अधिकाराची जाणीव करून दिली .मग त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले .तो अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या सोबत वडील होते.मग पोलीस स्टेशनमध्ये नियमानुसार जेमीला  वागविण्यात आले. जेमी मी निरपराध आहे असेच म्हणतोय पण पुरावे सर्व त्याच्या विरुद्ध आहे.जेमीच्या वडिलांना एडीला या घटनेचा प्रचंड धक्का बसलाय.
दुसऱ्या भागात पोलीस जेमीच्या शाळेत चौकशीला जातात.पोलीस अधिकाऱ्याचा मुलगाही त्याच शाळेत शिकतोय. शाळेत शिक्षक मुलांना कंट्रोल करू शकत नाहीत .विद्यार्थी शिक्षकांना जुमानत नाहीत.सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय.पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा जेमीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरच्या कंमेंटवरून त्याच्या बाबतीत काय घडतेय हे सांगतो.
तिसऱ्या भागात एक स्त्री मानसोपचारतज्ञ जेमीची भेट घेते.जेमीच्या केसवर तिची नेमणूक झालीय.जेमीशी बोलताना हळूहळू त्याच्या स्वभाव ,त्याच्या या वयात घडणारे बदल तिच्या लक्षात येतात आणि ती हादरून जाते.गुन्हा का आणि कसा घडला हे स्पष्ट होते.
चौथ्या भागात आता जेमीला अटक होऊन तेरा महिने झालेत.त्याचे कुटुंब आता सावरले आहेत. पण मध्येमध्ये एडी मिलर खूपच अस्वस्थ असतात. अजूनही गावातील मुले त्यांना जेमीवरून त्रास देतात. त्यांच्या गाडीवर काहीतरी लिहितात.मग ते सर्व राग आपल्या मुलीवर पत्नीवर काढतात.शेजाऱ्यांशी नीट बोलत नाहीत. वाढदिवसादिवशी ते जेमीशी बोलताना भावुक होतात .शेवटी जेमी आपला गुन्हा कबूल करायची तयारी दाखवतो.
चार भागात असलेली ही सिरीज आपल्याला खूप अस्वस्थ करते. यातील प्रत्येकजण आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक आहे पण तरीही हे सर्व घडतेय .
अस्वस्थ करणारी  ही सिरीज हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर  आहे.

No comments:

Post a Comment