Saturday, July 5, 2025

काम

काम
बाईकच्या साध्याशा धडकेने आपले इतके नुकसान होईल हे सीताराम भोजणेच्या ध्यानीमनीही नव्हते.
तो बिचारा त्यादिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आपली सायकल घेऊन घराबाहेर कामासाठी बाहेर पडला आणि पहिल्याच  वळणावर त्या बाईकस्वाराने सायकलच्या कोपर्याला धडक दिली. तोल जाऊन तो पडला आणि हॉस्पिटलमधून पायाला भले मोठे प्लास्टर बांधूनच घरी आला .
आता हा सीताराम भोजणे कोण ? मी का त्याच्याविषयी इतके सांगतोय ? अपघात काय होत नाहीत का ?
नाही हो . सीताराम भोजणे हा पापभिरू माणूस .तो अशिक्षित  आहे, त्यामुळे मिळेल ते काम करून स्वतःचे पोट भरतो . त्याची कामे निश्चित नसतात . बोलावतात तिथे जातो आणि सांगतील ती कामे करतो . 
पण दरवर्षी आषाढी एकादशीच्या वारीचे काम त्याच्याकडे फिक्स असते . नाही हो , तो कुठे विठ्ठल विठ्ठल करत भक्ती करणारा . दिंडी सुरू झाली की साफसफाईसाठी याची निवड होते . महिनाभर वारकऱ्यांच्या गर्दीत राहून जेवणखाण सुटते ,थोडे मनोरंजन होते , थोडे जास्त पैसे मिळतात आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद मिळतो म्हणून तो जातो. दिंडी देवळाजवळ आली की ह्याचे काम संपले .तो विठ्ठलाच्या दर्शनालाही कधी गेला नाही .
आता पायाला प्लास्टर असल्यामुळे महिनाभर घरीच रहावे लागणार आणि पैशाचाही प्रॉब्लेम होणार याच चिंतेत सीताराम घरात बसून होता . फक्त वारीला जाऊन विठ्ठल विठ्ठल करत नुसते खायचे हे त्याला मान्य नव्हते आणि मुळात त्याच्या मनात देवाविषयी  फारशी भक्ती ही नव्हती .
" सीतारामभाऊ आहेत का घरी ? " दारात आवाज आला आणि त्यांची तंद्री तुटली .
"आत या " त्याने आवाज देताच एक व्यक्ती घरात शिरली .
थोडी बुटकी , काळसर रंगाची ,कपाळावर पांढरा टिळा  ढगळ लेंगा , थोडा जुनाट झालेला सदरा, आणि डोक्यावर पांढरी टोपी अश्या अवतारात तो सीतारामसमोर हात जोडून  हसत उभा राहिला . त्याच्या  शरीराशी विसंगत त्याचे हास्य होते.त्याचे प्रेमळ डोळे  खूपच आश्वासक होते .वरून तरी ते एकदम बावळट ध्यान दिसत होते.
" बोला काय काम ? " सीताराम कंटाळलेल्या स्वरात म्हणाला .
"  मी पंढरीनाथ . मालकांनी पाठवलंय .ते म्हणले सीतारामसोबत वारीला जा आणि तो सांगेल तसे काम कर .तरच पैसे मिळतील " तो कमरेवर हात ठेवून म्हणाला .
" असा उभा राहिलास तर काम कसे करणार तू ?" सीतारामने हसत विचारले .
"सवय आहे बघा "तो लाजून म्हणाला.
" पण यावर्षी मला जमणार नाही "सीताराम पायातल्या प्लास्टरकडे बोट दाखवून म्हणाला ."मला काम करता येणार नाही "
" आहो भाऊ असे बोलू नका . तुम्ही नाही तर मलाही काम मिळणार नाही .कायपण करून चला " तो हात जोडून म्हणाला.
" अरे, पण काही काम जमणार नाही तर कशाला येऊ ? उगाच दुसऱ्यांवर बोज " सीताराम चिडला.
" मी तुमची काळजी घेईन भाऊ  . पण चला .माझ्यातले थोडे पैसे देईन मी . पण तुम्ही चला " तो हात जोडून विनवणी करत राहिला तसा सीताराम तयार झाला .
वारीच्या दिवशी सकाळीच तो सीतारामला घ्यायला घरी आला होता .कुबड्या घेऊन सीताराम त्याच्यासोबत वारीच्या ठिकाणी आला .
यावर्षी आपण काहीच काम न करता नुसते बसणार याचे त्याला वाईट वाटत होते. तरीही जमेल तितके काम करण्याचे मनाशी ठरवले .पंढरीनाथ सीतारामला विचारूनच कामे करत होता. हळू हळू सीताराम ही जेवण वाढायची , कचरा गोळा करण्याची , कामे करू लागला .वारकरी त्याला कामे करू देत नव्हते पण हा कोणाचे ऐकत नव्हता मग वारकऱ्यांनीच त्याला मदत करायची ठरविले .
कधीकधी पंढरीनाथ कामे सोडून वारकऱ्यांच्या भजनात दंग होऊन जातो . तेव्हा सीताराम त्याला हात धरून बाहेर काढत असे. आपण इथे काम करण्यासाठी आलोय आणि मालक त्याचे पैसे देणार आहे याची आठवण तो करून देत असे. 
मग संपूर्ण वारीत पंढरीनाथने मनापासून वारकऱ्यांची सेवा  केली. त्याचे काम पाहून सीतारामही खुश झाला .खुश होऊन विठ्ठलाचा फोटो असलेला ताईत पंढरीनाथला भेट दिला .
आषाढी एकादशीला दिंडी देवळाजवळ पोचली तसा सीताराम मागे फिरला आणि पंढरीनाथच्या खांद्यावर हात ठेवून निघण्याची खूण केली .
" हे काय भाऊ ? आता आलो तर दर्शन घेऊन जाऊ ना . नशिबाने आज दर्शन मिळतेय ते का सोडा " पंढरीनाथ हात जोडून सीतारामला म्हणाला.
" आपले काम इथेच संपते.आपण काम करायला आलो आणि त्याचे पैसे मिळतात .देव इथेही आहे आणि माझ्या घरीही आहे .यावर्षी तू नसतात तर मी घरीच देवाकडे पाहत बसलो असतो .तुझे खरेच आभार ,आज तुझ्यामुळे मी चार पैसे कमवू शकलो ."असे म्हणून तो पंढरीनाथला नमस्कार करून मागे फिरला .
घरात शिरताच त्याच्या मोबाईलवर बँक अकाउंटवर पैसे क्रेडिट झाल्याचा  मेसेज आला .स्वतःशी हसत तो समोरच्या कॅलेंडरवर असलेल्या विठ्ठलाच्या फोटोपुढे हात जोडण्यासाठी उभा राहिला आणि विठ्ठलाच्या गळ्यात पंढरीनाथला दिलेला ताईत पाहून हादरून गेला .
© श्री .किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment