शिक्षण
सदाशिव वाघुले अर्थात सदाभाऊ . आयुष्यभर या माणसाने फक्त कीर्तन केले. तरीही ते कधीच कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध झाले नाही. त्यांचे कीर्तन फक्त विभागातील देवळात किंवा गावी गेले की गावाच्या देवळात. त्यांचा आवाजही बेताचाच .अर्थात त्यांना स्वतःची कुवत माहीत होती त्यामुळे कोणत्याही स्पर्धेत किंवा मोठ्या समारंभात कीर्तन करायचे टाळत .
तसे ते दिवसभर कीर्तन करत नाहीत.फावल्या वेळात चाळीतील मुलांना चांगले संस्कार देण्याचे प्रयत्न करतात.
चाळीतील लहान मुले त्यांच्याकडे हौसेने येत पण आता तीच मुले मोठी झाली आणि त्यांच्या मुलांना मोबाईलमधून डोके वर करायला वेळ नाही .
सदाभाऊना शिक्षणाची खूप आवड .परिस्थितीमुळे आपण शिक्षण घेऊ शकलो नाही याची खंत त्यांना नेहमीच जाणवत असते .त्यामुळेच वेळ मिळेल तसा लहानमोठ्याना कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व सांगायचे प्रयत्न करीत.
पण त्यांची एक गोष्ट फारच कमीजणांना माहीत होती. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून जितके पैसे मिळत ते पैसे आपल्या विभागातील रात्रशाळेतील मुलांवर खर्च करीत असत.काही गरजू होतकरू विद्यार्थ्यांची फी ही ते भरत होते.
नेहमीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशीजवळ आली होती. आषाढी एकादशी म्हटले की ते मनातून खुश होत.वारी सुरू झाल्यापासून कोणी ना कोणी त्यांना कीर्तनाला बोलावत असे .ते देतील तितके पैसे कपाळाला लावून ते बाहेर पडत . आषाढीत थोडे जास्त पैसे मिळत हे नक्की.
पण गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना घश्याचा त्रास जाणवू लागला होता.तस काही फार गंभीर नसल्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही .पण आता तो जास्तच जाणवू लागला .इतका की त्या दिवशी घरात बसून कीर्तन करताना अचानक आवाज बसला . यावर्षी काय पण यापुढे कीर्तन करू शकणार नाही याची भीती त्यांना जाणवू लागली .
आताही ते घरात बसले असताना शेजारचा अमित एका गृहस्थाला त्यांच्याकडे घेऊन आला . आत शिरताच त्या गृहस्थाने हात जोडून त्यांना नमस्कार केला.
थोडासा स्थूल ,बुटका ,काळसर वर्णाचा , कपाळावर पांढरा टिळा . मळकट झालेला सदरा ,तसाच लेंगा ,डोक्यावर पांढरी टोपी अश्या अवतारात तो सदाभाऊंपुढे उभा राहिला.
" माफ करा मी यापुढे कीर्तन करू शकणार नाही " तो काही बोलायच्या आधीच सदाभाऊने आपले पत्ते उघड केले.तसा तो चमकला .
"आहो भाऊ ,मी कीर्तनाचे आमंत्रण द्यायला आलो नाही " कमरेवर हात ठेवून तो हसत म्हणाला .त्याचे हास्य खूपच आश्वासक आणि मधुर होते.ते पाहूनच सदाभाऊ आपले दुखणे विसरले.
" मग कशाला आलात " सदाभाऊने उत्सुकतेने विचारले .
" मी पंढरीनाथ , त्या नाक्यावरच्या रात्रशाळेत शिकतो .दरवर्षी तुम्हीच आम्हाला शैक्षणिक वस्तू देता. दहावीच्या मुलांची परीक्षा फी भरता .मी आता दहावीला आहे . सकाळी मिळेल ती कामे करतो आणि रात्रशाळेत शिकतो.तुमची समोरच्या विठ्ठलाच्या देवळातील कीर्तन ऐकली आहेत मी .मला पुस्तके लवकर हवी आहेत आणि यावर्षी माझी परीक्षा फीही भरायची आहे म्हणून तुम्हाला लवकर भेटायला आलोय " तो पुन्हा हात जोडत म्हणाला.
" तू दहावीला आहेस "? पंढरीनाथकडे निरखून पाहत सदभाऊनी विचारले.
" होय, शिकण्यासाठी वय नसते असे तुम्हीच कीर्तनातून सांगतात ना ? आणि एका साहेबानी मला दहावी पास झाल्यावर कॉम्प्युटर शिकवणार असे वचन दिले आहे." पंढरीनाथ छाती पुढे काढून म्हणाला .
" अरे वा ! छान ! पण माफ कर .यावर्षीपासून मी कीर्तन करू शकणार नाही . मला घश्याचा त्रास होतोय. " दुःखी आवाजात सदाभाऊनी सांगितले.
" अरे पांडुरंगा ! पंढरीनाथ चकित होऊन म्हणाला .मग यावर्षी माझी आणि माझ्या वर्गाची दहावी बुडणार का ?
" अरे काळजी करू नकोस . तो आहे ना . करील काहीतरी तुमची व्यवस्था " भिंतीवरच्या विठ्ठलाच्या फोटोकडे बोट दाखवीत सदाभाऊ उत्तरले.
"भाऊ, तुमचे कीर्तन मी केले तर "? पंढरीनाथ चुटकी वाजवत म्हणाला.
" काहीतरी काय .त्यासाठी चांगला आवाज पाहिजे.कीर्तनातून समाजाला प्रबोधन करायचे असते त्यासाठी माहिती असावी लागते .कीर्तनाचा सराव असावा लागतो " सदाभाऊ हसत म्हणाले.
" भाऊ, मी नेहमीच तुमचे कीर्तन ऐकतो .मी समोरच असतो पण तुमचे लक्ष नसते माझ्याकडे .तुम्ही तल्लीन होऊन समोर बसलेल्या श्रोत्यांना कीर्तन सांगत असतात. " तो हसत म्हणाला ." राहिला आवाज, कीर्तन पाठ असेल तर आवाजाचा प्रॉब्लेम होणार नाही.तसा थोडाफार चांगला आहे माझा आवाज " तो हसत म्हणाला.
" ठीक आहे ,बघू प्रयत्न करून.हे करून तुमच्या फीचे पैसे भरता आले तर आनंदच आहे .पुढच्या वर्षीचे पुढच्या वर्षी बघू " सदाभाऊनी थोड्या नाखुषीनेच परवानगी दिली.
पहिल्याच कार्यक्रमात सदाभाऊनी जमलेल्या श्रोत्यांची माफी मागून त्यांच्याऐवजी पंढरीनाथ कीर्तन करणार असे जाहीर केले.
पंढरीनाथने कीर्तन सुरू केले आणि काही वेळातच संपूर्ण कार्यक्रम मंत्रमुग्ध केला. हा आपल्यापेक्षा चांगले कीर्तन करतो हे सदभाऊना जाणवले आणि आपला वारसा त्याने चालू ठेवावा अशी विनंती करण्याचे त्यांनी ठरविले.
प्रत्येक कार्यक्रमत मिळणारे पैसे त्याने न चुकता सदाभाऊना दिले.त्यातूनच रात्रशाळेतील मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघाला.
आज आषाढी एकादशी .आज सर्व विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार होते .आज कुठेच कीर्तनाचा कार्यक्रम नव्हता .सकाळीच पंढरीनाथ त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आला .पंढरीनाथाने त्यांचे चरणस्पर्श करताच त्यांना गहिवरून आले. नकळत त्यांनी त्याला मिठीत घेतले आणि स्वतःच्या खिशाला लावलेले पेन त्याच्या सदर्याच्या खिशाला अडकवले .
" आतातरी हेच मी देऊ शकतो तुला .ह्या पेनानेच पेपर लिही " डोळे पुसत सदाभाऊ पुटपुटले.
तो हसला .ते हास्य पाहताच एक अदभुतआनंदाची जाणीव सदभाऊंच्या शरीरात पसरली .
तो मागे वळून न पाहताच निघून गेला .संध्याकाळी गर्दी कमी होताच सदाभाऊ विठ्ठलाच्या मंदिरात गेले. त्यांनी डोळे मिटून भक्तिभावाने विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि ते चमकले.
एका अनामिक भीतीने त्यांनी डोळे उघडून विठ्ठलाकडे पाहिले .पंढरीनाथच्या चेहऱ्यावरील हास्य विठ्ठलाच्या मुखावर झळकत होते आणि त्याच्या उपरण्याला सदभाऊंचे पेन लटकत होते.
No comments:
Post a Comment