अशी एक वारी
शंकर मोरे आज नाईलाजानेच कामावर जाण्यास तयार झाला . त्याच्या नाराजीचे कारणच तसे होते . आज आषाढी एकादशी होती. महराष्ट्रात सणावाराला तोटा नाही पण हेच सण मुंबईतीच्या ट्रॅफिकची वाट लावून टाकतात आणि शंकरसारख्यांचा दिवस खराब जातो.
आहो , आमचा शंकर महाष्ट्रातील सर्वात मोठ्या बस वाहतूक कंपनीत बस वाहक अर्थात कंडक्टर आहे.गेली तीस ते पस्तीस वर्ष तो आपले काम इमानेइतबारे करतोय.
पण हे सण आले की सर्व जनता हौसेने रस्त्यावर उतरते आणि मग ट्रॅफिकची वाट लागते. बरे ह्याचे काम तर उभ्यानेच .त्यात गर्दी असेल तर , म्हणजे ती नेहमीच असते मग वाटच लागते .त्यात हा प्रामाणिक कामगार .ह्याच्या बसमधून कोण फुकट प्रवास करेल तर शपथ .बस स्टॉपवर उभी करून तिकीट फाडेल पण कोणाला फुकट प्रवास करू देणार नाही .
नाखुषीनेच तो तयार झाला .निघताना त्याचा आवडता रुमाल हातात देऊन बायकोने संध्याकाळी इथेतिथे भटकत न राहता घरी या, देवळात जायचे आहे अशी तंबी दिलीच.
एन्ट्री करून त्याने बस आगाराबाहेर काढली आणि ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला . ब्रेक मारताच शंकरच्या तोंडातून सणसणीत शिवी बाहेर पडली. तितक्यात मागच्या दारातून तो आत शिरला आणि कमरेवर हात ठेवून उभा राहिला.
" काय रे , चालत्या बसमध्ये कसा चढतोस ? पडला असता म्हणजे ? आधीच डोक्याला ताप कमी आहे का ? त्यात तुझी भानगड नको " शंकर चिडूनच म्हणाला तसा तो मागे वळला .
तो साधारण बुटकाच होता . काळा रापलेला रंग .कपाळावर पांढरा शुभ्र टिळा , डोक्यावर पांढरी टोपी, उपरणे ,पांढरा सदरा आणि काळपट झालेला लेंगा.
" वा , वारकरी दिसतोस .मग नियम पाळा की " शंकर चिडून म्हणाला . तसा तो हसला.
" मुंबईकर नेहमीच घाईत असतो असे ऐकून होतो .तुमच्या बोलण्यावरून ते खरेच आहे असे दिसते. "
त्याचे हास्यच इतके आश्वासक आणि गोड होते की शंकर गप्प झाला .
" आहो, या मुंबईत पावलापावलावर सावध राहायला हवे .इथे काही घडले की पाहिले टार्गेट बस नंतर ट्रेन . बॉम्बस्फोट करायचाय, मग घुसा बसमध्ये , गोळीबार करायचाय ,या बससमोर , दंगल करायचीय मारा बसवर दगड "शंकराचा पट्टा सुरू झाला .
" हो हो ,पुरे .मला तर विठ्ठलाच्या देवळात जायचे आहे " तो हात वर करून म्हणाला .
" पंधरा रुपये " तिकीट मशीन हातात घेऊन शंकर म्हणाला आणि त्याने तिकीट फाडले ही.
" मास्तर , माझ्याकडे पैसे नाहीत " तो गांगरून म्हणाला
" काय ?" मुंबईत खिश्यात पैसे न ठेवता माणूस फिरू शकतो हे शंकरसाठी नवीन होते .नसले तरी बसमध्ये कोणी चढणार नाही याचीही त्याला खात्री होती.
" हो, मी आजच मुंबईत आलोय .पैश्याची कधी गरज पडली नाही मला " तो हसत म्हणाला .
" मग हे वारकरी चालत जातायत, त्यांच्या सोबत जा " संध्याकाळपर्यंत पोचाल." रस्त्यावरून चालणाऱ्या दिंडीकडे बोट दाखवत शंकर म्हणाला.
"आहो मुंबईत इतकी गर्दी आणि ट्रॅफिक आहे ,बसने गेलो तरी संध्याकाळपर्यंत पोचेन .गावात वारकऱ्यांसोबत वारीला जाण्याची मजा वेगळीच असते .सगळे कसे शिस्तीत चालते .एकमुखाने एकाच तालासुरात विठ्ठलाचा गजर करीत चालतो तेव्हा वेगळीच अनुभूती असते पण इथे खूप कंटाळा येतो हो .रणरणते ऊन, गाड्यांचे हॉर्न , वेडीवाकडी गर्दी ,धक्के मारीत धावणारे मुंबईकर. कंटाळा आला हो .तुमची बस बाहेर पडली म्हणून पटकन चढलो त्यात ही एसी बस छान थंडगार प्रवास होईल " तो पुन्हा कमरेवर हात ठेवून रिकाम्या सीटवर बसला .
" ओ साहेब, ती लेडीज सीट आहे , पहिल्या दोन अपंग आणि वृद्धांसाठी आरक्षित आहे " शंकर छद्मीपणे म्हणाला .
" बापरे इथेही आरक्षण . महिलांना समान हक्क कधी मिळणार देवा .बरे झाले मला भेटणारे सर्वच एका वर्गात येतात तो म्हणजे माणूस " तो पुन्हा हसत म्हणाला .
" पैसे नसतील तर उतर " शंकर आता शांत झाला .
" मास्तर ,देवाला भेटायला चाललो आहे .पोचेपर्यंत कर ऍडजस्ट " तो केविलवाण्या चेहऱ्याने म्हणाला आणि बाहेरून जात असलेल्या पंधरा ते वीस जणांच्या दिंडीला हाका मारून बसमध्ये बोलावले .
त्याने हाक मारताच ती दिंडी बसमध्ये शिरली .डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला , तुकारामाच्या वेशात असलेला वारकरी आणि इतरजण टाळ चिपळ्या वाजवत विठ्ठलाचा गजर करीत होते. एका क्षणात बसमधील वातावरण भक्तिमय झाले.
"आहो यांचे तिकीट ?" आता शंकर हतबल झाला .
आषाढी निमित्त मुंबईत कडेकोट बंदोबस्त होता .पोलीस वारकर्यांना बघून काहीच बोलणार नव्हते .शंकरने मुकाट्याने सर्वांची तिकीट्स फाडली पण कोणीही पैसे देण्याच्या मनःस्थितीत नव्हते .आज बहुतेक मेमो मिळणार याची जवळजवळ खात्रीच त्याला झाली.
बसमध्ये सर्व वारकरी तन्मयतेने भजन गात होते .रस्त्यावरील लोक मोबाईलमध्ये या अनोख्या दिंडीचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते .
अचानक त्यांच्या बाजूने जाणारी बस रस्त्यावरचा दुभाजक तोडून बाजूच्या लेनमधून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका मोठ्या ट्रकवर आदळली .
तो अपघात पाहून शंकर ला काहीच सुचेना . तो नुसता पाहत बसला .
" ओ मास्तर ,चला धावा ,आत माणसे अडकली असतील ." कोणीतरी जोराने ओरडले .
त्याबरोबर सर्व दिंडी खाली उतरून बसच्या दिशेने धावली .जखमींना ताबडतोब शंकरच्या बसमध्ये घेतले वारकर्यांनी आपले पागोटे ,उपरणे काढून जखमा बांधल्या .त्यानेही आपले उपरणे काढून एका जखमी व्यक्तीला बांधले .बस हॉस्पिटलकडे सुसाट निघाली.
जखमींना बसमधून बाहेर काढताना एक पत्रा त्याच्या हाताला लागून रक्त वाहत होते.शंकरने आपला रुमाल काढून त्याच्या हातावर बांधला .ते पाहून तो पुन्हा हसला .
काही होणार नाही मी आहे असे जणू तो सांगतोय असा भास शंकरला झाला . हॉस्पिटलमध्ये जखमींना रक्त देण्यासाठी दिंडीतील सर्व वारकरी तयार होतेच . सर्व सोपस्कार पार पाडून संध्याकाळी उशिरा शंकर घरी निघाला तेव्हा वारकरी हात जोडून पुढे निघून गेले .
" किती उशीर ? तुम्हाला सांगितले होते लवकर घरी या .कधी ऐकलं तर शपथ " बायको चिडून म्हणाली .
काही न बोलता शंकरने कपडे बदलले आणि बायकोसोबत विठ्ठलाच्या देवळात शिरला. त्याचवेळी एक वारकरी त्याच्या हातात पाकीट देऊन गेला . त्याने पाकीट उघडले त्यात वारकऱ्यांची बस तिकीट्स आणि पैसे होते .
आश्चर्यचकित होत , डोळे मिटून तो विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभा राहिला. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तो कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला दिसला. दचकून त्याने डोळे उघडले तेव्हा विठ्ठलाच्या हातावर त्याचाच रुमाल बांधलेला दिसला आणि चेहऱ्यावर तेच आश्वासक हसू विलसत होते.
No comments:
Post a Comment