Tuesday, August 4, 2026

कॉन सिटी

Con City 

कॉन सिटी

एका छोट्याशा गावात सर्वना आपल्या पत्नी मित्रा अपंग मुलगा जीवा, मेव्हणा जॅकी आणि आई जानकीसोबत साधं आणि सुखी आयुष्य जगत असतो. सर्वना एक छोटंसं हॉटेल चालवतो. तो फारसा बोलत नाही आणि त्याच्या कुटुंबातही संवाद काहीसा कमीच आहे.

त्याचा मुलगा जीवा व्हीलचेअरवर बसून दररोज शाळेत जातो. आयुष्य अगदी शांतपणे सुरू असताना अचानक एक दिवस सर्व काही बदलून जातं...

जीवा शाळेतून घरीच परतत नाही!

कुटुंबीय त्याचा शोध घेण्यास सुरुवात करतात. त्यानंतर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज समोर येतं. त्यामध्ये एक व्यक्ती जीवाला सोबत घेऊन जाताना स्पष्टपणे दिसते.

पण त्या व्यक्तीचा चेहरा पाहताच सर्वना आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकते!

कारण तो अनोळखी नसतो... तो त्यांच्या भूतकाळाशी जोडलेला असतो.


जीवाचं अपहरण नेमकं का करण्यात आलं?
अपहरणकर्त्याचा सर्वनाच्या कुटुंबाशी काय संबंध आहे?
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जीवाला सुखरूप परत मिळवण्यासाठी या कुटुंबाला नेमकं काय करावं लागणार आहे?

अपहरणकर्ता सर्वना आणि त्याच्या कुटुंबासमोर एक अशक्यप्राय काम ठेवतो. हे काम पूर्ण करण्याची क्षमता फक्त सर्वना आणि त्याच्या कुटुंबाकडेच आहे.

जर त्यांनी हे काम यशस्वीपणे पूर्ण केलं, तर अपहरणकर्त्याला आयुष्यभर बसून खाईल एवढी प्रचंड रक्कम मिळणार आहे.

पण हे काम जितकं धोकादायक आहे, त्याहूनही भयानक आहे त्यामागचं सत्य...

कारण या संपूर्ण खेळाचा संबंध सर्वना आणि त्याच्या कुटुंबाच्या भूतकाळाशी आहे.

आता सर्वना आणि त्याचं कुटुंब या रहस्यमय चक्रातून बाहेर पडू शकेल का? की परिस्थिती त्यांना आणखी खोलवर घेऊन जाईल?

जीवा सुखरूप घरी परत येईल का? आणि या सगळ्यामागे नेमकं कोण आहे?

सुरुवातीला अतिशय साधी, सरळ आणि संथ गतीने पुढे जाणारी ही कथा जसजशी पुढे सरकते, तसतशी तिचा वेग वाढत जातो. त्यानंतर एकामागून एक असे अनपेक्षित ट्विस्ट समोर येतात, जे प्रेक्षकांना अक्षरशः धक्का देतात.

चित्रपटात अर्जुन दास, अन्ना बेन आणि योगी बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कॉन सिटी हा रहस्य, थरार आणि भूतकाळातील गूढ घटनांनी भरलेला चित्रपट आहे. हा चित्रपट  नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत पाहता येतो.

जर तुम्हाला रहस्य आणि थरारक कथा आवडत असतील, तर हा चित्रपट नक्कीच एकदा पाहायला हरकत नाही.

Thursday, July 30, 2026

रॉ हिटमॅन

रॉ हिटमॅन
लेखक: एस. हुसेन झैदी
अनुवाद: उल्का राऊत
प्रकाशक: मंजुल पब्लिशिंग हाऊस

सप्टेंबर २०११ मध्ये उत्तराखंडमधील नैनितालजवळील भोवालीच्या जंगलात कुप्रसिद्ध गँगस्टर राजेंद्र (राजू) परगई आणि अमित आर्य यांची निर्घृण हत्या झाली. ही हत्या भारत सरकारच्या एका गुप्त संघटनेने घडवून आणल्याची चर्चा होती. ही मोहीम पार पाडणारा एजंट 'लिमा' असल्याचे सांगितले जात होते. या घटनेने संपूर्ण उत्तराखंड हादरून गेला. राजू परगईचे अनेक प्रभावशाली राजकारण्यांशी संबंध असल्याच्याही चर्चा रंगल्या.

दुसऱ्याच दिवशी लक्ष्मण उर्फ 'लकी' बिष्ट या एनएसजी (NSG) कमांडोला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. लकीने इस्रायलमध्ये विशेष कमांडो प्रशिक्षण घेतले होते आणि अनेक धोकादायक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या होत्या. तो तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या सुरक्षा पथकातही कार्यरत होता.

राजू परगई आणि अमित आर्य यांच्या हत्येचा आरोप लकीवर ठेवण्यात आला.

खरोखरच एजंट 'लिमा' बनून लकीने या दोघांचा खून केला होता का? जर तसे असेल, तर सरकारने त्याला तब्बल पाच वर्षे तुरुंगात का ठेवले? त्याला सतत वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये का हलविण्यात आले? गुप्तचर संस्था त्याच्या बाबतीत मौन का बाळगत राहिल्या? आणि देशासाठी अनेक धोकादायक मोहिमा पार पाडणाऱ्या एका कमांडोला पोलिसांकडून इतकी अपमानास्पद वागणूक का देण्यात आली?

प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित हे पुस्तक या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत वाचकाला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवते.

Monday, July 20, 2026

द किल लिस्ट

द किल लिस्ट
लेखक : फ्रेडरिक फोरसाइथ
अनुवाद : बाळ भागवत
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

वॉशिंग्टनमधील एका अतिगोपनीय ठिकाणी एक छोटीशी यादी सुरक्षित ठेवलेली आहे. त्या यादीत अशा कुप्रसिद्ध व्यक्तींची नावे असतात, ज्यांना अटक करून न्यायालयात उभे करण्याऐवजी थेट ठार मारण्याचे आदेश दिलेले असतात. ही 'किल लिस्ट' दर मंगळवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पाहणीनंतर अद्ययावत केली जाते.

यावेळी या यादीत एका नव्या नावाची भर पडली आहे. पण तो नेमका कोण आहे? तो कुठे राहतो? त्याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल कोणालाच काहीच माहिती नाही. एवढेच नव्हे, तर जगातील कोणत्याही देशाच्या गुप्तचर संस्थेकडे त्याचा साधा फोटोदेखील उपलब्ध नाही. सर्वांनी त्याला 'प्रीचर' हे टोपणनाव दिले आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून तो जहाल आणि चिथावणीखोर भाषणे देऊन तरुण मुस्लिमांना कट्टरतेकडे प्रवृत्त करतो. त्याच्या प्रभावामुळे अमेरिकेत आठ, तर ब्रिटनमध्ये पाच आत्मघातकी हल्ले घडले आहेत. या हल्ल्यांत राजकारणी, लष्करी अधिकारी आणि उद्योगपती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा बळी गेला आहे.

टोसा ही अशी गुप्त संस्था आहे, जी किल लिस्टमधील व्यक्तींना शोधून त्यांचा कायमचा बंदोबस्त करते. आता प्रीचर हेच त्यांचे प्रमुख लक्ष्य आहे. ट्रॅकर हा टोसाचा सर्वात कुशल शिकारी आहे. त्याचे खरे नाव आणि पद फारच मोजक्या लोकांना माहीत आहे. एरियल हा संगणक क्षेत्रातील एक अफलातून हॅकर आहे. घरातील पोटमाळ्यावर बसून तो जगातील कोणत्याही संगणक प्रणालीमध्ये घुसखोरी करू शकतो. प्रीचरचा माग काढण्यात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

हातात कोणताही ठोस पुरावा नसताना ट्रॅकर प्रीचरचा शोध घेऊन त्याला ठार मारू शकेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना वाचक एका जबरदस्त थरारक, वेगवान आणि उत्कंठावर्धक प्रवासात ओढला जातो. शेवटच्या पानापर्यंत हा थरार वाचकाची उत्सुकता कायम ताणून धरतो.

Monday, July 6, 2026

द सिम्पल ट्रूथ ... डेव्हिड बॉल्डची


द सिम्पल ट्रूथ ... डेव्हिड बॉल्डची 

अनुवाद ...सुधाकर लवाटे

मेहता पब्लिशिंग हाऊस

रुफस हार्म्स गेल्या पंचवीस वर्षांपासून फोर्ट जॅक्सनच्या मिलिटरी तुरुंगात एका लहान मुलीची हत्या करण्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगतोय.तो प्रचंड देहाचा  काळा उंच  आहे. आता त्याची स्मरणशक्ती गेलीय पण त्याला तो प्रसंग आठवतोय.  लहान भाऊ जोश  त्याला नियमितपणे भेटायला येतो .

आज त्याला मिलिटरी कडून एक पत्र आलंय .ज्या पत्राने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली जाणार आहे .ते पत्र वाचून त्याने वकिल रायडरला फोन करून भेटायला बोलावले. रायडरला भेटायला बोलावताना त्याने काही सूचना केल्या .तो येताच अत्यंत शिताफीने ते पत्र त्याला दिले आणि एकदम सुप्रीम कोर्टात अपील करण्यास सांगितले.

ते पत्र वाचून रायडर ही हादरला .त्याने सुप्रीम कोर्टात अपील केले.  कोर्टात  क्लार्क मायकेल फिस्कने ते अपील वाचले आणि पुढे पाठवायच्या आधी त्याने रुफसला भेटायचे ठरविले.

मायकेल रुफसला भेटताच त्याचे मरण निश्चित आहे हे रुफसला कळले . कारण आता रुफसवर कोणतरी करडी नजर ठेवून होता.त्याच्या प्रत्येक हालचाली आणि संवाद टिपले जात होते .पत्रात काय आहे हे रुफसच्या शत्रूंना कळले आणि त्यांनी मायकेलचा खून केला .रायडर आणि त्याच्या पत्नीला देखील ठार करण्यात आहे .

मायकेलचा भाऊ जॉन पूर्वी पोलिसात होता. पण आता तो बचाव पक्षाचा वकील म्हणून काम करतोय.  त्याला मायकेलच्या मृत्यूची बातमी कळली आणि निरीक्षण करताना तो खून आहे असे समजले .तो शोध घेताना रुफसच्या नावापाशी पोचला आणि सुरू झाला एक रहस्यमय तपास.

रुफसचे अपील कोर्टात जाऊ नये आणि त्यासाठी वाटेल ते करायचे यासाठी काहीजण प्रयत्न करतायत .ती माणसे शक्तिशाली आहेत.

त्या पत्रात  असे काय आहे ? ज्यासाठी काहीजणांचा निर्दयपणे खून झालाय .जॉन फिस्कवर हल्ला झालाय. रुफसला मारण्याचे प्रयत्न केले जातायत .

एक थरारक वेगवान कादंबरी.

Thursday, July 2, 2026

SAMPRADAYINI SUPPINI SUDDAPOOSANI

SAMPRADAYINI SUPPINI SUDDAPOOSANI
संप्रदायिनी सुप्पीनी सुद्दापुसनी 
श्रीराम छोट्या गावात पंचायत सेक्रेटरी आहे..अतिशय साधा , शांत , प्रामाणिक आणि लोकांच्या भल्याचाच विचार करणारा . पण त्याचा मुलगा  आणि बायको त्याच्या विरुद्ध स्वभावाच्या. .मुलगा मिट्टू सतत रील बनविण्यात आणि लोकांच्या खोड्या काढण्यात मग्न तर बायको उत्तरा भांडखोर  , मारहाण करणारी .
गावात नवीन आलेला इंस्पेक्टर विक्रम भ्रष्ट्र  ऑफिसर आहे शिवाय त्याला बायकांचे वेड आहे.त्याचे आणि श्रीरामचे भर रस्त्यात भांडण झाले आणि त्याचाच अपमान मनात ठेवून तो संध्याकाळी श्रीरामच्या  घरी येतो. तिथे मिट्टू रील बनवायला त्याची बंदूक घेतो आणि त्यातून विक्रमचा खून होतो.
घरी आल्यावर श्रीरामला सगळी परिस्थिती कळते आणि तो हादरतो. उत्तरा त्याला शव लपविण्याची विनंती करते आणि दोघेही त्याचे मृत शरीर लपविण्याच्या प्रयत्नात शहराबाहेर पडतात.यासाठी श्रीराम शेजाऱ्याची गाडी घेतो .पण त्या गाडीत एक महत्वाची गोष्ट आहे जी एका मंत्र्याला हवीय.त्याची माणसे श्रीरामच्या मागावर निघाली आहेत. इंस्पेक्टर विक्रम ड्युटीवर नाही म्हणून एक पोलीस अधिकारी त्याच्या शोधात आहे .तोही श्रीरामच्या मागावर आहे..श्रीरामला विक्रमच्या मृत शरीराची विल्हेवाट लावायची आहे त्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी जातोय पण प्रत्येक वेळी काहीतरी अडचण येतेय.
शेवटी श्रीराम प्रेताची विल्हेवाट लावतो आणि सुटकेचा श्वास सोडणार इतक्यात एक निनावी फोन येतो आणि समोरचा श्रीरामला ब्लॅकमेल करू लागतो.
काय करेल श्रीराम ? काहीही करून त्याला आपल्या कुटुंबाला यातून सोडवायचे आहे .तो ब्लॅकमेलरला शोधून काढेल ? 
प्रथदर्शीनी हा एक गंभीर  चित्रपट असेल असे वाटते पण पुढे पुढे तो विनोदी रहस्यमय वाटेवर वळतो.चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला हसवत खिळवत ठेवतो .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, June 27, 2026

इलेव्हन्थ अवर

इलेव्हन्थ अवर

लेखक : एस. हुसैन झैदी
प्रकाशक : रोहन प्रकाशन

१९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांचा आरोप पुराव्यानिशी पाकिस्तानवर करण्यात आला होता. त्या कटामागील सत्य आणि त्यातील उरलेल्या धाग्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस सुपरिटेंडंट विक्रम सिंग आणि एनआयएचे अधिकारी मिर्झा तब्बल नऊ वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.

आज पाकिस्तानचे उच्चायुक्त भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. नेहमीप्रमाणे ते राजकीय भाषेत गोलमोल उत्तरे देतात आणि संतापलेल्या विक्रम सिंगकडून त्यांना सणसणीत कानाखाली बसते. या घटनेनंतर विक्रमचे निलंबन निश्चित मानले जाते.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी विक्रमने पकडलेले इंडियन मुजाहिद्दीनचे पाच खतरनाक दहशतवादी भोपाळच्या तुरुंगातून पळून जातात. त्याच वेळी लक्षद्वीपला निघालेल्या तीस पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका क्रूझचे सोमालियन चाच्यांकडून अपहरण होते.

पोलीस दलातील काही मोजक्याच अधिकाऱ्यांना एक गुपित माहिती असते—१९९३ च्या बॉम्बस्फोटांमधील काही दारुगोळा अजूनही कुठेतरी लपवून ठेवलेला आहे आणि तो कधीही वापरला जाऊ शकतो. विक्रम आणि मिर्झाला संशय आहे की आता तो दारुगोळा वापरण्याची वेळ आली आहे.

क्रूझचे अपहरण, तुरुंगातून पळून गेलेले दहशतवादी आणि मुंबईवर घोंगावणारे संकट यांचा एकमेकांशी नक्कीच संबंध आहे; मात्र या सर्वांना जोडणारा पुरावा त्यांच्या हाती नाही.

अपहरणकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
त्या पाच अतिरेक्यांना तुरुंगातून कोणी पळवून नेले?
त्यांचा अंतिम उद्देश काय आहे?
आणि या संपूर्ण कटाचा शेवट कसा होणार?

'इलेव्हन्थ अवर' ही शेवटच्या पानापर्यंत वाचकाला खिळवून ठेवणारी, वेगवान आणि थरारक रहस्यकादंबरी आहे.

DRIDAM

ड्रीदम (DRIDAM) – अंगावर काटा आणणारे रहस्य

विजय राधाकृष्णनची सब-इन्स्पेक्टर म्हणून पहिलीच नियुक्ती कुझीनीलम या छोट्या गावात होते. त्या पोलीस स्टेशनमध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी आणि चार हवालदार आहेत. गाव शांत असून तिथे फारसे गुन्हे घडत नाहीत.

मात्र, काही दिवसांतच एका व्यक्तीच्या खाजगी जमिनीवर एक मृतदेह सापडतो आणि गावात खळबळ उडते. त्यानंतर काही दिवसांनी गावातील पतपेढी लुटली जाते. नवीन नियुक्त झालेल्या विजयसाठी हा मोठा धक्का असतो. पोलीस स्टेशनमध्ये कोणताही वरिष्ठ निरीक्षक नसल्याने तपासाची संपूर्ण जबाबदारी विजयवर येते.

दरम्यान आणखी दोन खून होतात. हे तिन्ही खून एकाच व्यक्तीने केले असावेत, असा विजयला संशय येतो. तपास पुढे सरकत असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात आणि खरे गुन्हेगार कोण आहेत हे समजल्यावर विजय हादरून जातो.

सुरुवातीला अतिशय शांत वाटणारा हा चित्रपट पुढे वेगवान होत जातो आणि प्रेक्षकांना अनपेक्षित धक्के देत राहतो. रहस्य आणि थरार आवडणाऱ्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा.

हा चित्रपट हिंदी भाषेत वर उपलब्ध आहे.

Tuesday, June 23, 2026

धर्म एक कादंबरी


धर्म  एक कादंबरी ....समर

समर पब्लिकेशन 

धर्म म्हणजे काय ? युधिष्ठिराचा धर्म खरा ? तो कधीच अधर्माने वागला नाही का ? कर्ण ,एकलव्य , आणि अश्वत्थामा  धर्माचा खरा अर्थ शोधायला बाहेर पडले आहेत. अश्वत्थामाने अधर्माने वागून झोपेत असलेल्या पांडव कुळाचा नाश केलाय.त्याच्या मते वडील द्रोणाचार्यांना अधर्माने वागूनच वध केलाय.तर एकलव्याला काहीच न शिकवता केवळ तो अर्जुनाच्या वरचढ होऊ नये म्हणून गुरुदक्षिणा रूपाने त्याचा अंगठा मागून घेतला. कर्णाने द्रौपदी वस्त्रहरणात बघ्याची भूमिका घेऊन अधर्माची साथ दिली असा आरोप आहे.

आता ते तिघेही एकत्र येऊन धर्माचा खरा अर्थ शोधायला कोकणातील पचवणी गावात आले.हे गाव जणू संताचे गाव म्हटले जाते. इथली सर्व माणसे सदाचारी आणि धार्मिक आहेत.

गावात आल्यावर तिघेही आपल्या सोयीनुसार काम शोधतात .आणि त्यांना काही अश्या व्यक्ती भेटतात त्यामुळे त्यांच्या मनातील गोंधळ वाढतो.

खरोखर या तिघांना धर्माचा कळेल का ?? की अजून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल ?

Saturday, June 20, 2026

आय विल फाईड यु

I Will Find You
 आय विल फाईड यू
डेव्हिड बुरोजस बोस्टनच्या  तुरुंगात गेली पाच वर्षे शिक्षा भोगतोय. त्याच्यावर आपल्याच  चार वर्षाच्या मुलाची मॅथ्यूची  बेसबॉल बॅटने हत्या केल्याचा आरोप आहे.या घटनेमुळे त्याची डॉक्टर पत्नीही सोडून गेलीय आणि दुसरे लग्न केलंय.  डेव्हिडचा बाप रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे. 
आज पाच वर्षानंतर डेव्हिडला भेटायला त्याची पत्रकार मेव्हणी  रचेल मिल्स तुरुंगात आलीय. तिच्याकडे एक फोटो आहे आणि त्या फोटोत कोपऱ्यात दिसणारा मुलगा मॅथ्यू सारखा दिसतो .कारण मॅथ्यूच्या गालावर जी जन्मखूण आहे तीच त्या मुलाच्या गालावर आहे आणि वयाने सारखे आहेत. मॅथ्यू जिवंत आहे असा रचेलला संशय आहे.
ती भेटून गेल्यावर डेव्हिडवर खुनी हल्ला होतो .तुरुंगातील एक ऑफिसर डेव्हिडवर पहिल्या दिवसापासून नजर ठेवून आहे . तुरुंगाचा वॉर्डन डेव्हिडच्या वडिलांचा मित्र आहे. पोलीस ऑफीसरही डेव्हिडला मारायचा प्रयत्न करतो .  शेवटी वॉर्डन डेव्हिडला तुरुंगातून पळण्यास मदत करतो.
डेव्हिड रचेलच्या मदतीने मॅथ्यूचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तो ज्यांच्याकडे जातो त्यांची हत्या होते आणि आरोप डेव्हिडवर ठेवला जातो.
एफबीआय आणि बोस्टन पोलिसांना चकवून डेव्हिड आपल्या मुलाला  शोधेल का ?
अतिशय उत्कंठावर्धक आणि रहस्यमय थरारक अशी सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Thursday, June 18, 2026

राख

राख (RAAKH)

1978 साल. दिल्लीतील सुखवस्तू अरोरा कुटुंब. कुटुंबात दोन मुले आहेत—सोळा वर्षांची सुमन आणि तिचा तेरा वर्षांचा धाकटा भाऊ साहिल. आज सुमनचा नॅशनल रेडिओवर गाण्याचा कार्यक्रम असतो. ती साहिलला सोबत घेऊन रेडिओ केंद्राकडे निघते. घरी आई-वडील तिचे गाणे ऐकण्यासाठी रेडिओसमोर उत्सुकतेने बसलेले असतात; मात्र कार्यक्रमात सुमनचे गाणे प्रसारितच होत नाही. चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर येते—सुमन आणि साहिल रेडिओ केंद्रावर पोहोचलेलेच नसतात.

दोघांचाही कुठेच पत्ता लागत नसल्याने हे प्रकरण सब-इन्स्पेक्टर जयप्रकाश जाटव याच्याकडे सोपवले जाते. नुकताच सेवेत दाखल झालेला जयप्रकाश हा एका निवृत्त कॉन्स्टेबलचा मुलगा असतो. तो तपासाला सुरुवात करतो आणि काही दिवसांतच दोन्ही मुले जंगलात मृतावस्थेत आढळतात. त्यांच्या शरीरावर असंख्य वार करून अत्यंत अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आलेली असते.

याच काळात दिल्लीत फॉरेन्सिक लॅबची सुरुवात झालेली असते. या लॅबमधून मिळालेल्या पुराव्यांमुळे पोलिसांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळते.

दरम्यान, मुंबईत रज्जो आणि बाबू हे दोन सराईत गुन्हेगार घरफोड्या करत असतात. एका घरात चोरी करून ते फरार होतात. त्यांच्या मार्गात जो कोणी येतो, त्याची ते निर्दयपणे हत्या करतात. तपास पुढे सरकत असताना जयप्रकाशला या दोघांच्या गुन्ह्यांची आणि त्यांनी केलेल्या खुनांच्या मालिकेची माहिती मिळते.

सत्य शोधण्याच्या निर्धाराने जयप्रकाश आपल्या वरिष्ठांचा रोष पत्करतो. तो रज्जो आणि बाबू यांचा माग काढत मुंबईपर्यंत पोहोचतो. मात्र वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न केल्यामुळे त्याला निलंबित करण्यात येते. तरीही तो हार न मानता खुन्यांच्या शोधात राहतो आणि प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवतो.

दिल्लीत 1978 साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ही मालिका मानवी स्वभावातील क्रूरता, विकृती आणि अमानुषता यांचे भयावह दर्शन घडवते. त्याचबरोबर माणुसकी, संवेदनशीलता आणि चांगुलपणाचे पैलूही प्रभावीपणे उलगडते.

या मालिकेत अली फाजल यांनी सब-इन्स्पेक्टर जयप्रकाश जाटव यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच  सोनाली बेंद्रे, अमीर बशीर, रमणदीप यादव, आकाश माखीजाआणि राकेश बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

प्राईम व्हिडिओवर उपलब्ध असलेली ही आठ भागांची हिंदी मालिका गुन्हेगारी तपास, थरार आणि वास्तववादी कथानक आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी निश्चितच पाहण्यासारखी आहे.

Thursday, June 11, 2026

टीच यु अ लेसन





टीच यू अ लेसन (Teach You a Lesson)

कोरियामध्ये विद्यार्थ्यांना खूपच सवलती आणि अधिकार दिले गेले आहेत. अनेक कायदे त्यांच्या बाजूने आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांवर हात उचलू शकत नाहीत किंवा त्यांच्यावर मोठ्याने ओरडूही शकत नाहीत. पालक समितीचीही शिक्षकांना सतत भीती वाटत असते, कारण पालक शिक्षकांविरुद्ध शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार करू शकतात, तसेच त्यांच्यावर खटलेही दाखल करू शकतात.

या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक शाळांमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. ड्रग्जचा वापर आणि पुरवठा गुप्त मार्गाने वाढत आहे. मोठ्या शाळांमध्ये रॅगिंगचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षणमंत्री चॉई गॅंग-सिओ "एज्युकेशन राइट्स प्रोटेक्शन ब्युरो" (ERPB) या विशेष विभागाची स्थापना करतात.

या विभागाचा प्रमुख म्हणून स्पेशल फोर्सचा माजी अधिकारी ना व्हा-जीन याची निरीक्षकपदी नियुक्ती केली जाते. त्याला सहाय्यक म्हणून स्पेशल फोर्समधून आलेली हान रिम ही तरुणी असते.

शाळांमधील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी ERPB ची स्थापना करण्यात आलेली असते. या विभागाला अमर्याद अधिकार देण्यात आलेले असतात. दहा भागांच्या या मालिकेत प्रत्येक भागात वेगवेगळी प्रकरणे समोर येतात; मात्र सर्व भागांना जोडणारा एक समान धागा संपूर्ण कथेत कायम राहतो.

एका भागात रॅगिंग करणारा एक विद्यार्थी आत्महत्या करतो. त्यामागील कारणांचा शोध घेतला जातो. तर दुसऱ्या भागात, आपल्या मुलाबाबत अतिशय काळजी करणाऱ्या एका आईच्या सततच्या दबावामुळे त्या मुलाची वर्गशिक्षिका आत्महत्येचा प्रयत्न करते.

एका विद्यार्थ्याला वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळावा म्हणून त्याची आई त्याला ड्रग्ज देऊन अभ्यास करण्यास भाग पाडते. त्याचबरोबर पालक समितीच्या अध्यक्षांना विविध भेटवस्तू देऊन त्यांना आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न करते.

एका शाळेतील हुशार आणि अव्वल क्रमांकाच्या विद्यार्थ्याने सर्वांत लोकप्रिय शिक्षकावर हात उचलल्यामुळे त्याचीच बदनामी होते. मात्र त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे सत्य उलगडत जाते.

सोशल मीडियाचा वापर करून काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांची बदनामी करतात आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतात. तरीही संबंधित विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही; उलट समाजात शिक्षकांचीच प्रतिमा खराब होते.

किशोरवयीन विद्यार्थ्यांना कायद्याकडून मिळणाऱ्या संरक्षणाचा गैरफायदा घेत काही विद्यार्थी चोरी, ड्रग्ज विक्री आणि इतर गुन्हे करतात. पकडले गेल्यावर केवळ माफी मागून ते सहज सुटतात.

या सर्व प्रकरणांचा ERPB यशस्वीपणे तपास करून त्यांची उकल करते. मात्र या विभागाला विरोध करणारे काही प्रभावशाली लोकही असतात. ते सतत ERPB विरुद्ध कारवाया करून या युनिटला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. अखेरीस ते या विभागाला बंद करण्यातही यशस्वी होतात; पण त्यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे कथेला एक वेगळेच वळण मिळते.

विद्यार्थ्यांच्या समस्या, शिक्षकांची हतबलता, राजकारणी आणि उद्योगपतींचा शाळांमधील हस्तक्षेप, तसेच कायद्याच्या संरक्षणामुळे मनमानी करणारे विद्यार्थी अशा अनेक गंभीर विषयांवर ही मालिका भाष्य करते. त्यामुळे ही कथा कुठेतरी भारतीय शिक्षण व्यवस्थेतील समस्यांशीही नाते सांगताना दिसते.

प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी आवर्जून पाहावी अशी ही उत्कृष्ट मालिका आहे. ही मालिका नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे. 

द इनोसंट मॅन

 द इनोसंट मॅन ....जॉन ग्रिशम
अनुवाद ...संजय गडकरी 
मेहता पब्लिशिंग हाऊस
अडा हे ओक्लाहोमामधील छोटे गाव .गावातील सर्व एकमेकांना ओळखत. रॉन विल्यम्सन त्याच गावात लहानाचा मोठा झाला . तो बेसबॉलचा स्टार खेळाडू .राष्ट्रीय संघात तो निवडला जाणार याची सर्वांना खात्री होती.पण ती प्रसिद्धीच त्याच्या डोक्यात गेली. दारू ,ड्रग ,बायका यात गुरफटून त्याने आपल्या कारकीर्दीची  वाट लावली . शरीरावर आणि मनावर परिणाम होऊन तो अडाला परत आला .
तो परत येताच पुन्हा त्याचे रंगील आयुष्य सुरू झाले. डेबि कार्टर अडातील स्थानिक बारमध्ये वेट्रेस होती. एके दिवशी तिच्यावर बलात्कार होऊन खून झाला . पोलिसांनी पाच वर्षे प्रयत्न करून रॉन विल्यम्सनला अटक केली. खरे तर पोलिसांकडे  फारसे पुरावे नाहीत .त्यांनी केवळ स्थानिक खबऱ्यांच्या साक्षीने त्याला अटक केलीय आणि दोषी ठरविण्यात येऊन मृत्युदंडाची शिक्षाही फर्मावली आहे.
आपण निर्दोष आहोत हे फक्त रॉनीलाच माहीत होते . आता तो मृत्युदंडाच्या शिक्षेची पूर्तता होण्याची वाट पाहत तुरुंगात नरकयातना भोगतोय.
 एका सत्यघटनेवर आधारित अस्वस्थ करणारी कादंबरी.

Monday, June 8, 2026

spider noir

Spider noir
स्पायडर नोइर
बेन रिली वृद्ध खाजगी गुप्तहेर . छोटी छोटी प्रकरणे तो हाताळतो.एके काळी तो सैन्यात मेजर होता.फ्रान्समध्ये त्याने जर्मन हॉस्पिटलमधून आपले काही सैनिक सोडवले होते.त्या सैनिकांवर विविध प्रयोग चालू होते.त्यातीलच एक सैनिक त्याच्या हाताला चावला.बरे होताच त्याला आपल्यातील शक्तीची जाणीव झाली.तो स्पायडरमॅन बनला होता.नंतर त्याने सुपरहिरो बनून अनेकांचे प्राण वाचविले. पण त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्याने हे सर्व सोडून सामान्य गुप्तहेराचे जीवन जगू लागला.
पण आता  हॉस्पिटलमधून वाचविलेल्या मित्राच्या सुपरपॉवर जागृत झाल्यात. पण शहरातील काही व्यक्ती आहेत जे ह्या सुपर हिरोला आपल्या ताब्यात ठेवू पाहतायत.  एक जर्मन डॉक्टर गेली अनेक वर्षे एका  औषधाचा शोध घेतेय जे घेतल्यावर त्यांच्यातील सुपर पॉवर नष्ट होतील.
बेन पुन्हा सुपरहिरो बनून आपल्या मित्रांना वाचवेल का ?
निकोलस केज सारखा मातब्बर अभिनेता पहिल्यांदाच या सिरीज द्वारे ओटीटी क्षेत्रात पदार्पण करतोय.
ही सिरीज ब्लॅक ऍण्ड व्हाईट आणि रंगीत अश्या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
सिरीज हिंदी भाषेत प्राईम व्हिडिओवर आहे.

कारा

कारा

Kara

कारासामी उर्फ कारा हा हाडाचा चोर आहे. चोरी आणि घरफोडी याशिवाय त्याला दुसरे काहीच करता येत नाही. आपल्या आयुष्यातील शेवटची चोरी करण्यासाठी तो एका आमदाराच्या घरात शिरतो; पण दुर्दैवाने तो पकडला जातो.

या चोरीच्या तपासाचे श्रेय मिळवण्यासाठी डीएसपी भारतन पुढे येतो. काराकडून आपल्या मनाप्रमाणे कबुली मिळवण्यासाठी तो त्याच्यावर दबाव आणतो. मात्र, मारहाण करून कारा तेथून पळून जातो.

या घटनेला सहा महिने उलटतात. आता कारा आपल्या पत्नीसोबत एका हॉटेलमध्ये मजुरी करत असतो. त्याचे स्वतःचे हॉटेल सुरू करण्याचे स्वप्न असते. गावात त्याच्या वडिलांकडे आठ एकर जमीन असते; पण सोळा वर्षांचा असतानाच तो वडिलांचे पैसे चोरून घरातून पळून आलेला असतो. त्यामुळे आता पुन्हा कोणत्या तोंडाने वडिलांकडे जायचे, हा प्रश्न त्याला सतावत असतो.

तरीही, जमीन विकून त्या पैशांत हॉटेल सुरू करण्याचा विचार करून तो गावाकडे परतण्याचा निर्णय घेतो. अनेक वर्षांनी मुलाला पाहून त्याचे आई-वडील आनंदित होतात; पण वडिलांनी जमीन गहाण ठेवून कर्ज घेतल्याचे कळताच कारा निराश होतो.

काराचा खरा हेतू समजताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसतो आणि त्यातच त्यांचे निधन होते. मृत्यूपूर्वी त्यांची इच्छा असते की, आपल्या पूर्वजांच्या शेजारी त्यांचे दफन व्हावे. कारा आणि गावकरी त्यांचे दफन करण्यासाठी जातात; पण बँकेचे अधिकारी ती जमीन ताब्यात घेतल्याचे सांगून दफन करण्यास परवानगी देत नाहीत.

नाईलाजाने काराला आपल्या वडिलांचे पार्थिव सरकारी शवागृहात ठेवावे लागते. मात्र, सात दिवसांच्या आत मृतदेह नेला नाही तर त्याच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी सूचना त्याला दिली जाते.

आता वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी काराकडे फक्त सात दिवस उरलेले असतात. ज्या बँकेकडून कर्ज घेतलेले असते, त्या बँकेने अनेक शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात अडकवलेले असते. कर्जाच्या फॉर्ममध्ये अनेक गुंतागुंतीच्या अटी असतात, ज्या शेतकऱ्यांना ना वाचता येतात, ना समजतात.

“मला फक्त घरफोडी करता येते… मग बँक लुटणे हाच एकमेव मार्ग आहे,” असे म्हणत कारा बँक लुटण्याची योजना आखतो.

पण बँक लुटणे इतके सोपे असते का?

डीसीपी भारतनला या योजनेचा सुगावा लागतो आणि जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. तो पुन्हा काराच्या मागावर निघतो.

कारा आपल्या वडिलांचे कर्ज फेडून त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकेल का?

त्याच्या हातात फक्त सात दिवस आहेत.

Dhanush ने नेहमीप्रमाणे संयमित आणि प्रभावी अभिनय केला आहे. चित्रपटात फारशी हाणामारी नसली, तरी कथा वेगाने पुढे सरकते आणि प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवते.

हा चित्रपट हिंदी भाषेत Netflix वर उपलब्ध आहे.

लेडी जल्लाद

आराचर  (मल्याळी ) ... के.आर. मीरा
लेडी जल्लाद .….रेश्मा कुलकर्णी- पाठारे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
भारतात पश्चिम बंगालमध्ये नऊ वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जतीनचंद्रला लहान मुलीवर बलात्कार आणि खुनाचा आरोप सिद्ध झाल्यावर सरकारने कोणाच्याही विरोधाला न जुमानता फाशीची शिक्षा जाहीर केली होती.
फणीभूषण ग्रद्धा मलिक सरकारी अधिकृत जल्लाद आहे.आता तो 88 वर्षाचा आहे.तो राहतोही स्मशानाच्या वाटेवर, जिथून सगळ्या अंत्ययात्रा जातात.त्याचे चहाचे दुकानही आहे.अंत्यसंस्कार झाल्यावर सगळे तिथेच चहा पितात. 
जल्लाद मलिकच्या घराण्याला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे .असे फणीभूषण  ग्रद्धा मलिक अभिमानाने सांगतो. त्याने आता पर्यंत चारशे एकावन्न जणांना फाशी दिलेय असेही सांगतो.तो हुशार आणि स्वार्थी आहे.आपल्या शिवाय सरकारला पर्याय नाही हे त्याला पक्के माहितीय म्हणूनच त्याने सरकारला वेठीस धरून काही मागण्या केल्यात.यात आपल्या मुलीला चेतना ग्रद्धा मलिकला अधिकृत जल्लादाची नेमणूक करावी.फाशीची रक्कम वाढवून देण्यात यावी .अश्या  मागण्या आहेत.
चेतना बावीस वर्षाची तरुणीतिच्या रक्तातच जल्लाद असल्याने तिला कुशलतेने गाठ मारता येते.  आपले घराणे जल्लादाचे असल्याने त्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम तिने भोगले आहे .ती उत्कृष्ट जल्लाद बनेल याची खात्री तिच्या बापाला आहे.
संजीवकुमार मित्रा एका न्यूज चॅनेलचा वार्ताहर .लेडी जल्लाद चेतना मलिकचा आपल्या वाहिनीला कसा फायदा होईल याचाच विचार त्याच्या डोक्यात सतत चालू आहे.त्यासाठी त्याने चेतना आणि फणी मलिकला हाताशी धरले आहे.त्याच्या वाहिनीवर रोज चेतानाची मुलाखत चालू आहे.
ग्रद्धा मलिक कुटुंबात कित्येक शतकातील फाशी आणि जल्लादाच्या कथा आहेत.त्या संदर्भानुसार आपल्या समोर येतात .जतीनचंद्रला फाशी जाहीर  झाल्यापासून ते फाशी देईपर्यंतचा काळ या पुस्तकात लिहिला गेलाय. या  संपूर्ण पुस्तकात  मृत्यू जाणवत राहतो.तो कसा असतो याची जाणीव सतत आपल्याला वाचताना होत असते तरीही आपण ते पुस्तक हातातून सोडवत नाही.आपण ते वाचत राहतो. अंगावर काटा आणत मृत्यू अनुभवत राहतो. 
यात अनेक  पात्रे भेटतात .बहुतेक पात्रे स्वार्थी आहेत. चेतना या सर्वांना सामोरी जात आपले कर्तव्य पार पडेल का ?


Friday, May 29, 2026

शोध

शोध 
मुरलीधर खैरनार
राजहंस प्रकाशन 
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली ती पूर्ण सुरक्षित आणि अचूक योजना आखून .यावेळी त्यांच्याकडे प्रत्येक व्यापाऱ्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची आणि ठिकाणांची माहिती होती .त्यामुळे अतिशय कमी वेळात जास्त लूट मिळाली.ती लूट त्यांनी बाराशे जनावरांवर लादली आणि लुटीचे दोन भाग करून दोन मार्ग आखले. 
एक लूट ठरल्या मार्गावरून स्वराज्यात पोचली.दुसऱ्या लुटीचे जबाबदारी गोंदाजी नारो या दोन हजारी घोडदळाच्या सरदारकडे होती.त्याच्याकडे सुमारे सात हजार जनावरांच्या पाठीवर लादलेली लूट होती.ती घेऊन तो नाशिकमार्गे  स्वराज्याकडे निघाला होता. दाऊदखानाचे मुगल शिपाई सगळ्या मार्गावर त्याच्या मागावर होते. तो त्यांच्याशी लढत पुढे सरकत होता शेवटी जखमी होऊन मुघलांच्या हाती सापडला .पण शेवटपर्यंत सात हजार जनावरांवर लादलेला खजिना मुघलांना सापडला नाही.
केतकी देशपांडे ,शौनक , निनाद  फेसबुक माध्यमातून मित्र झालेले.सर्वांना इतिहासाची आवड त्यामुळे एकत्र आले .इंग्लंडला राहणारी क्लारा रेंजर त्यांची मैत्रीण.ती इतिहासात डॉक्टरेट करत होती आणि कामानिमित्त त्यांना भेटणार होती.तिचे पूर्वज एकेकाळी ईस्ट इंडिया कंपनीत कामाला होते . त्यावेळी मुघलांनी त्यांना एका छाप्यात पकडले आणि त्यांची रवानगी औरंगाबादच्या तुरुंगात झाली .तुरुंगात त्यांना गोंदाजी भेटला.जखमी अवस्थेतील गोंदाजी फार काळ जगू शकणार नाही याची कल्पना दोघांनाही होती.मरताना गोंदाजीने एका कापडावर लिहिलेला निरोप त्यांच्या हाती दिला आणि हा तुकडा कसाही करून शिवाजी महाराजांपर्यंत  पोचवा अशी विनंती केली .दुर्दैवाने  रेंजर तो निरोप महाराजांपर्यंत पोचवू शकले नाहीत आणि ते इंग्लंडला परत गेले.
क्लाराकडे तो कापडाचा तुकडा होता आणि तो मेसेज काय आहे याची उकल तिला मित्रांना भेटून करायची आहे.
सुरतमधील एक प्रसिद्ध व्यापारी घराणेही या लुटीत संपूर्णपणे लुटल गेलंय. त्यांना आपली संपत्ती परत नकोय पण त्यातील एक महत्वाची मौल्यवान वस्तू परत हवीय.त्यासाठी त्यांनी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला ती वस्तू शोधण्याची जबाबदारी दिलीय .त्या व्यक्तीला खोजनार म्हणतात.आज त्या घराण्याचा अठरावा खोजनार ती वस्तू शोधतोय.गोंदाजीने लपवलेल्या खजिन्यात ती वस्तू आहे याची खोजनारला खात्री आहे.
आबाजी स्कायलार्क कंपनीला हाताशी धरून तो खजिना शोधतायत. स्कायलार्क कंपनीचा सीइओ जयंत आबाजीला सगळी मदत देतोय.आबाजी हुशार आणि खुनशी आहेत.खजिन्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला ते संपवितात. त्यांची नजर क्लारावर गेलीय.तिच्याकडे असलेला तो निरोपाचा तुकडा त्यांना हवाय आणि त्यासाठी त्यांनी क्लाराचाही खून केलाय ,त्याचा आळ केतकी ,निनाद आणि शौनकवर आलाय. मुंबई पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
काय आहे या खजिन्याचे रहस्य जे शिवाजी महाराजांपर्यंत शेवटपर्यंत पोचले नाही.मोरोपंत पिंगळे दहा वर्षे नाशिकच्या  कड्याकपारीत तो खजिना शोधत होते. 
आबाजीना काही धागेदोरे मिळाले आहेत तर शौनक आणि केतकीच्या हातात ही काही पुरावे लागले आहेत .पण खरोखरच हा खजिना अस्तित्वात आहे का ? 
असेल तर त्यापर्यंत नक्की कसे पोचायचे ? 
मुरलीधर खैरनारानी अतिशय अचूकपणे याचा शोध घेतला आहे.हा शोध वाचताना आपण पूर्णपणे त्यात गुंतून जातो.  

Friday, May 22, 2026

Kaattaan

Muthu Alias Kaattaan
मुथु उर्फ कत्तन
तामिळनाडूतील छोट्या गावातील पोलीस स्टेशन लवकरच बंद होऊन सर्व पोलिसांची बदली शहरात होणार आहे.तिथे सर्व पोलीस स्थानिक आहेत. एका हवालदाराच्या तर पाच हजार बकऱ्या आहेत. गावात काहीतरी गुन्हा व्हावा यासाठी सर्व पोलीस कामाला लागले आहेत.
त्याचवेळी एका मुलाला गावाच्या बाहेर टेकडीवर एका माणसाचे मुंडके सापडते. मुंडक्याच्या शेजारी  काही पैसेही आहेत  .जो कोणी आपले अंत्यसंस्कार करेल त्याला हे पैसे द्यावेत अशी चिट्ठी त्यात असते.पण त्याचे धड कुठेही सापडत नाही.
गावातील सर्व पोलीस यंत्रणा तपासाला लागते .मुळात त्या शीराची ओळख पटायची आहे .त्याचे धड शोधायचे आहे.
त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्नात पोलिसांचा प्रवास सुरु होतो.त्या व्यक्तीचे नाव मुथु असल्याचे कळते आणि तुकड्या तुकड्यात त्याची ओळख होत जाते. शेवटी त्या मुथुची सलग कहाणी उलगडली जाते.
कोण आहे हा मुथु ? कोणी त्याचा खून केलाय ?? त्याबद्दल फार कोणाला माहीत नाही.जे त्याला ओळखतात ते फक्त काही काळ त्याच्यासोबत राहिले आहेत .
मुथु एक रहस्य आहे . 
एक थरारक रहस्यमय तपास आपली उत्सुकता ताणून धरते .
विजय सेथुपती निर्मित ह्या सिरीजमध्ये  त्यानेच मुथुची प्रमुख भूमिका केली आहे.सिरीजचे कथानक खूप चांगले आहे .
हॉटस्टारवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे .

Monday, May 18, 2026

कालिदास 2

कालिदास 2
Kaalidas 2
त्या मोठ्या हाऊसिंग कॉलीनीत नववर्षाचा कार्यक्रम चालू असताना चार वर्षाची मुलगी गायब होते. इंस्पेक्टर कालिदास तिथे तपासासाठी पोचतो.त्याचा तपास चालू असताना डीसीपी वैष्णवी चार्ज घेते.वैष्णवी कालिदासचा तिरस्कार करते.  तपासात संशय स्टिफनवर जातो. स्टिफन प्रसिद्ध वकिल नटराजनचा सहाय्यक आहे.ते ताबडतोब स्टिफनला सोडवतात. कालिदासला स्टिफन खून करेल याची खात्री नाही पण वैष्णवीला खात्री आहे.
त्याच वेळी कॉलनीत अजून एका मुलीचा खून होतो .सर्वजण पुन्हा स्टिफनवर संशय घेतात.काही वर्षांपूर्वी अश्याच खुनाच्या आरोपातून स्टिफनला नटराजनने सोडविलेले असते .एका तरुण मुलीच्या साक्षीने स्टिफन यातून सुटलेला असतो.
स्टिफनवर चुकीचे आरोप लावले म्हणून वैष्णवी आणि कालिदासला या केस मधून बाहेर काढले जाते .पण कालिदास खरा खुनी शोधून काढतो .
पण कालिदासने पकडलेला खरोखरच खुनी आहे का ? शेवटच्या क्षणी कालिदासला काही अनपेक्षित हादरे बसतात आणि तो चक्रावून जातो.
हा जरी  दुसरा भाग असला तरी पहिल्या भागाशी काही संबंध नाही.त्यामुळे  एकदम दुसरा भाग  बघितला तरी चालेल.
चित्रपट प्राईम व्हिडिओ वर हिंदी भाषेत आहे.

Sunday, May 17, 2026

द हिडन हिंदू

द हिडन हिंदू ( भाग पहिला )
अक्षत गुप्ता 
अनुवाद ..मुक्ता देशपांडे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
अंदमान निकोबारमधील अनेक बेटांपैकी एका बेटावर  त्या गुप्त मोहिमेच्या टीमने अघोरी साधूला बंदिवान केले आहे. या गुप्त टीममध्ये दोन शास्त्रज्ञ, एक कॉम्प्युटर हॅकर तरुणी,  एक मानसोपचार तज्ञ स्त्री डॉक्टर , वीरभद्र नावाचा प्रमुख सिक्युरिटी ऑफिसर आहे.
त्या अघोरी साधूची  चौकशी करण्यासाठी ती टीम एकत्र  आली आणि त्यांना हादरून टाकणारी महिती मिळत गेली.
तो अघोरी साधू स्वतःला ओम शास्त्री म्हणवतो .पण त्याची अनेक नावे आहेत.तो स्वतःला सुषेण ,विदुर ,संजय म्हणवून घेतो.चारही युगात त्याचा संचार होता असे सांगतो.सध्या तो परशुराम आणि अश्वस्थामा यांच्या शोधात आहे.
त्यांच्याकडची गुपिते सर्वांना चक्रावून सोडणारी आहेत. त्याच्याकडे असे काही रहस्य आहेत ज्याचा शोध अनेक युगात घेतला जातोय.ओम शास्त्रीने ती रहस्य जपून ठेवली आहेत पण आता ती शत्रूच्या हाती लागली आहेत.
काय आहेत ही रहस्य ? युगानुयुगे ओम शास्त्रीच्या मागावर कोणते शत्रू आहेत ? ही रहस्य जगात प्रसिद्ध झाली तर किती हाहाकार उडेल याची कल्पनाही ओम शात्री करू शकत नाही .
अक्षत गुप्ताच्या द हिडन हिंदू या तीन भागाच्या पुस्तकाचा भाग पहिला

कर्तव्य

कर्तव्य 
Kartavya
कर्तव्य ....एक अस्वस्थ करणारा अनुभव
आज इन्स्पेक्टर पवन मलिक चाळीसावा वाढदिवस. झारखंडच्या   छोट्या झामली गावातील रेल्वे स्टेशनवर आपल्या सहकारी मित्रांसोबत साजरा करतोय. हवालदार अशोक त्याचा खास मित्र . ते स्टेशनवर एका पत्रकार महिलेला संरक्षण द्यायला आलेत.
अध्यात्मिक गुरू आनंद  श्री गावात प्रतिष्टित व्यक्ती आहेत. लहान मुलांचा ते बेकायदेशीरपणे वापर करतात असा आरोप त्या महिला पत्रकाराचा आहे आणि त्यासाठीच ती गावात आलीय.
पण रस्त्यात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो.पवन एका हल्लेखोराला मारतो तर एक निसटून जातो. पण पत्रकार महिलेला वाचवू शकत नाही.
पळून गेलेला हरपाल एक सोळा वर्षाचा मुलगा आहे .पुरावा नष्ट करण्यासाठी आनंद श्रीची माणसे  त्या मुलाच्या मागावर आहेत.
पवन त्या मुलाला संरक्षण देतो .पण त्याच्यावरही दबाव आहे. सगळे पोलीस नेते आनंद श्री चे भक्त आहेत.
त्याचा भाऊ दुसऱ्या जातीतील मुलीसोबत पळून गेलाय.पवनचा बाप कट्टर जातीवादी आहे.तो स्वतःच्या हाताने दोघांना ठार करेल याची पवनला खात्री आहे.आता भावाच्या संरक्षणाची जबाबदारी ही त्याच्यावर आहे.
वरिष्ठ त्याच्यावर महिला पत्रकाराची केस बंद करण्यासाठी दबाव टाकतात .त्यासाठी ते हरपालला  ठार मारण्याची ऑर्डर देतात. पवन चारही बाजूने यात दाबला गेलाय. 
तो हरपालला वाचविण्यासाठी आनंद श्री सोबत समजोता करतो आणि त्याला अशोकसोबत  अज्ञात ठिकाणी पाठवतो .
पण नंतर काही अश्या गोष्टी घडतात त्या ऐकून पवन हादरून जातो.
पवन परिस्थितीला शरण जाईल की त्याविरुद्ध उभे राहण्याचे ठरवेल ?
सैफ अली खान पवनच्या भूमिकेसाठीच तयार झालाय. हतबल असहाय आणि नंतर संतापाने पेटून उठणारा पवन  अप्रतिम आहे. 
दिल्ली क्राईमच्या तीनही सिझनमध्ये गाजलेली रसिका दुग्गल पवनच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.तर झाकीर हुसेन आणि संजय मिश्रा नेहमीसारखेच अप्रतिम .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.