Monday, May 26, 2025

बेट

Bet
बेट
सेंट डोमनिक कॉलेज हे एकमात्र कॉलेज आहे जिथे जगातील उत्कृष्ट जुगारी तयार होतात. कॉलेजच्या संचालक मंडळावर मान्यवर उद्योगपती आहेत आणि त्यांची मुलेही कॉलेजच्या स्टुडंट  कौन्सिलवर आहेत.हे सर्व अतिशय क्रूर जुगारी आहेत.कॉलेजमध्ये कोणीही कोणाशी बेट लावू शकतो.जुगारात पूर्ण हरला की तो गुलाम बनून सर्वांची सेवा करीत राहतो.
युमेको कवामोटो ही तरुणी डोमनिक कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते.तिचे आईवडील ह्या कॉलेजचे संस्थापक होते आणि तिच्या डोळ्यासमोरच कार स्फोटात मारले गेले होते.आपल्या आईवडिलांच्या मृत्यूचा डोमनिक कॉलेजशी काहीतरी संबंध आहे असा संशय युमेकाला आहे.युमेका स्वतः उत्कृष्ट जुगारी आहे. स्टुडंट कौन्सिलमध्ये स्वतःसाठी जागा तयार करून या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढायची आणि दोषींना शिक्षा द्यायची असा तिचा हेतू आहे.यासाठी ती रायन आणि मेरीची मदत घेते .
एक रहस्यपूर्ण आणि उत्कंठावर्धक सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Monday, May 19, 2025

American Manhunt : Osama bin ladenअमेरिकन मॅन हंट : ओसामा बीन लादेन

American Manhunt : Osama bin laden
अमेरिकन मॅन हंट : ओसामा बीन लादेन
9/11/ 2001 अमेरिकेच्या वर्ड ट्रेंड सेंटरवर आत्मघाती हल्ला होऊन दोन्ही इमारती बेचिराख झाल्या . अल कायदा गटाने हे कृत्य केले आणि त्याचा प्रमुख ओसामा बीन लादेनचे नाव प्रमुख आरोपी म्हणून घेतले गेले.
राष्ट्राध्यक्ष बुश यांनी ओसामा बीन लादेनला जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश दिले.अमेरिकेतील प्रत्येक गुप्तहेरखात्याचे ओसामा बीन लादेन हेच प्रमुख लक्ष होते.  त्यासाठी अफगाणिस्तानमध्ये तालिबानशी युद्ध केले .तोरा बोराच्या हल्ल्यात ओसामा बीन लादेन मरण पावला अशीच सगळ्यांशी समजूत झाली पण काही वर्षांनी त्याने लंडन आणि इतर युरोपियन देशात आत्मघाती हल्ले झाले आणि ओसामा बीन लादेन जिवंत आहे हे जगाला कळले.
आता बुश नंतर बाराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि ओसामाला पकडण्याची मोहीम तीव्र झाली. शेवटी ओसामा बीन लादेन पाकिस्तानात आहे असे सूत्रांनी माहिती दिली आणि सुरू झाली एक मोहीम .
अतिशय वेगवान अशी ही सिरीज तीन भागात आहे. यात सीआयए ,एफबीआय आणि या मोहिमेत जे सामील होते त्यांचे अनुभव यात आहेत .
अंगावर काटा आणणारी ही सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, May 17, 2025

gangers

Gangers
गँगर्स 
एक हलकाफुलका मजेशीर थोडीफार  एक्शन आणि थ्रिलर चित्रपट पाहायचा असेल तर गँगर्स पाहायला हरकत नाही.
एका छोट्या गावात शाळेत जाणारी मुलगी गायब होते.गरीब असल्यामुळे त्या प्रकरणात कोणीही लक्ष देत नाही तेव्हा शाळेतील शिक्षिका सुजीता  पोलीस महासंचालकला मेल करून सगळी माहिती सांगते आणि पोलीस महासंचालक एका गुप्त पोलिसाची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमणूक करतात.तो पोलीस त्या शाळेत एक शिक्षक म्हणून काम करणार असतो.
शाळेत अजून दोन पीटी टीचर नवीन आले आहेत.श्रवण धाडसी तरुण आहे तर सिंगाराम वेंधळा. शाळेत अनेक गुन्हेगारी व्यवसाय चालतात .श्रवण गुप्त राहून सगळ्यांना चोप देतो त्यामुळे तोच गुप्त पोलीस आहे असे सुजिताला वाटते.ती श्रवणच्या प्रेमात पडते.
इथे श्रवणला शाळेच्या संचालकाकडे दडवून ठेवलेले शंभर कोटी रुपये शोधून काढायचे आहेत.ते शंभर कोटी रुपये एका भल्या मोठ्या तिजोरीत ठेवलेले असणार आणि ती तिजोरी लपवायला तितकीच मोठी जागा हवी.
श्रवणने सुजिता, सिंगाराम ,नवीन आलेले घाबरट मॅथस टीचर आणि शत्रूपक्षातील एक माणूस याना एकत्र करून ते शंभर कोटी रुपये चोरायची योजना आखतो.
त्याची योजना यशस्वी होईल का ?? गुप्त पोलीस खरोखर आहे का आणि असला तर कोण आहे ?
नवशिखे , बावळट ,घाबरट लोकांना एकत्र करून शंभर कोटीची चोरी ही पाहण्यासारखी आहे .
यात भरपूर विनोद आहेत ,कुठेही गंभीर प्रसंग नाहीत आणि हाणामारीही मजेशीर आहे .
प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे .

Wednesday, May 14, 2025

The General's Daughter

The General's Daughter
द जनरलस डॉटर
पॉल ब्रेनर आर्मी पोलीस ऑफिसर .प्रामाणिक आणि अतिशय हुशार . त्याला गुप्त राहून काम करायला आवडते.
 सध्या जोसेफ कॅम्पेबल आर्मीचा जनरल आहे. पण तो आता निवृत्त होऊन राजकारणात प्रवेश करणार अशी बातमी आहे. त्याची मुलगी एलिसाबेथही आर्मीत कॅप्टन पदावर आहे. त्यावेळी अमेरिकेने नुकतीच आर्मीमध्ये महिलांना संधी दिली होती त्यामुळे फारच कमी महिला आर्मीत होत्या.कॅप्टन एलिसाबेथ त्यांच्या डिव्हिजनमध्ये हुशार ऑफिसर होती.
एके रात्री कॅप्टन एलिसाबेथ आर्मी बेस ग्राउंडवर मृतावेस्थेत आढळते .तिला बांधून ठेवलेले असते .गळ्याभोवती दोरी आवळलेली आणि अंगावर एकही कपडा नसतो. प्रथमदर्शनी तिच्यावर बलात्कार होऊन नंतर खून झालाय असेच दिसते.
पॉल ब्रेनरची या केसच्या तपासाची जबाबदारी येते. त्याच्या जोडीला जुनी मैत्रीण आणि बलात्कार स्पेशालिस्ट सारा सनहिल मदतीला येते.
एका जनरलच्या मुलीची हत्या ही बातमी अमेरिकन सैन्यासाठी धोकादायक आहे.अश्या बातमीमुळे कोणीही महिला सैन्यात येणार नाही .जनरल दोन दिवसांची मुदत पॉलला  देतो . त्यानंतर मीडिया आणि एफबीआय यांचा प्रवेश होणार हे निश्चित .
पॉल आणि सारा जसजसे या प्रकरणाचा शोध घेतात तेव्हा काही अनपेक्षित गोष्टी नजरेस पडतात . सात वर्षांपूर्वी घडलेल्या एका गोष्टीशी या खुनाचा संबंध आहे .
एक चक्रावून टाकणारा तपास जो आपल्याला अनपेक्षित धक्का देतो .
 जॉन ट्राव्हेलटाने आर्मी ऑफिसर पॉल ब्रेनर दिमाखदारपणे उभा केलाय .तर त्याच्या साथीला मेलेडीन स्टोव्ह आहे.
1999चा हा गाजलेला चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.