Saturday, February 21, 2026

साऊथ बाय जावा हेड

साऊथ बाय जावा हेड
अलिस्टर मॅक्लीन
अनुवाद ... अशोक पाध्ये
मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने..378
दुसऱ्या महायुद्धात जपान आघाडीवर होता.त्यांनी पूर्व गोलार्धातील समुद्रावर आपली पकड घट्ट केली होती.हळूहळू ते सिंगापूरही ताब्यात घेत होते.सिंगापूरमधील प्रत्येक इमारत ,समुद्रावरील जहाजे , वृद्ध, तरुण ,लहान मुले ठार करत होते. आता तर सिंगापूरमधून बाहेर पडणे अशक्यच झाले होते.
बिग्रेडियर जनरल फार्नहोमला काहीही करून ऑस्ट्रेलियाला पोचायचे आहे आणि त्यासाठी तो वाटेल ती किंमत द्यायला तयार आहे.त्याचे कारण ही तसेच आहे . त्याच्याकडे असे काही पुरावे आहेत जे योग्यवेळी ऑस्ट्रेलियाला पोचली नाहीत तर  जपान तो देशच नष्ट करेल.
वीस ते पंचवीस जखमी आणि मानसिकदृष्ट्या खचलेली सैनिकांची तुकडी  आपल्या संरक्षणासाठी आश्रय शोधत होती.त्यांनाही माघार घेण्याची ऑर्डर दिली होती .कोणत्याही परिस्थितीत  त्यांना सिंगापूरमधून  बाहेर पडायचे होते.
दोन नर्स आणि एक दोन वर्षांचा अनाथ मुलगा तिथे अडकून पडले होते .त्यांनाही सिंगापूरमधून बाहेर पडायचे आहे.
शेवटी द केरी डान्सर नावाचे छोटे जहाज त्यांना घेऊन जायला तयार झाले.हे सर्व जीवावर उदार होऊन सिंगापूरमधून बाहेर पडले .दुर्दैवाने जपानी हवाई दलाने त्या जहाजावर हल्ला केला.जहाज बुडण्याच्या बेतात असताना विरोमा ह्या तेलवाहू जहाजाने त्यांना वाचविले.
विरोमा एक बारा हजार टनी  मोठी बोट होती . फ्रँसिस फाईडहॉर्न हा तिचा कॅप्टन होता. हे जहाज ब्रिटिश कंपनीचे होते. निकोलसंन  त्या जहाजावर चीफ ऑफिसर म्हणून काम करत होता.
द केरी डान्सर जहाजवर जे जिवंत राहिले होते त्यांना घेऊन विरोमा पुढे निघाली पण ते जपान्यांच्या नजरेतून फार काळ लपू शकणार नव्हते.
विरोमाचा खडतर प्रवास आता कुठे सुरू झालाय. ह्या अफाट समुद्रावर जिथे फक्त जपानी आरमार आणि हवाई दलाचे राज्य आहे तिथे किती काळ लपून राहून प्रवास करतील ?
एक असा जीवघेणा प्रवास जो क्षणाक्षणाला मृत्यूच्या दाढेत नेतोय .नजर जाईल तिथपर्यंत फक्त समुद्र ,खायला अन्न नाही पिण्यास पाणी नाही ,अर्धे लोक जखमी तर काही भ्रमिष्ट होण्याच्या स्थितीत असलेले .
हे सर्व सुखरूप आपल्या मुक्कामावर पोचतील का ??
ही जीवघेणी भयानक समुद्र सफर तुम्हाला अनुभवायची असेल तर नक्की वाचा.

Monday, January 19, 2026

Kalamkaval

Kalamkaval
कलांकवल
इंस्पेक्टर जयकृष्णन एका केसवर काम करताना त्याला त्यासंबंधित काही अनपेक्षित गोष्टी कळतात. केरळ आणि तामिळनाडू राज्यात काही स्त्रिया बेपत्ता झाल्या आहेत.या सर्व स्त्रिया विधवा, घटस्फोटीत आणि बिनलग्नाच्या वयाने मोठ्या स्त्रिया आहेत. यासर्व घरातून स्वखुशीने बाहेर पडल्या होत्या असे प्रथमदर्शनी दिसून येते.जयकृष्णन हुशार अधिकारी आहे त्याला बाझ या टोपणनावाने ओळखले जाते.
या बेपत्ता असलेल्या सर्व स्त्रियांचा खून झालाय हे त्याच्या लक्षात येते . तो या प्रकरणाचा  तपास सुरू करतो.
खरे तर यात खुनी कोण हे आपल्याला सुरवातीलाच कळते. तो खून कसे करतो हेही आपल्याला दिसते पण तो कोण आहे हे कळताच आपण हादरून जातो.
इन्स्पेक्टर स्टॅनली दास तामिळनाडू पोलीस क्राईम ब्रँचला आहे.त्याला या प्रकरणाची बऱ्यापैकी माहीती आहे  म्हणून जयकृष्ण त्याला सोबतीला घेतो .
केरळमधून बेपत्ता झालेल्या स्त्रिया तामिळनाडूमध्ये असल्याचे पुरावे सापडतात तर तामिळनाडूमधील स्त्रिया केरळमध्ये असल्याचा संशय असतो.
एक श्वास रोखून धरणारा खुनी आणि पोलीसांचा उंदीर मांजराचा खेळ अतिशय रोमांचक होत जातो.
सोनी लिव्हवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहेत.
इन्स्पेक्टर स्टॅनली दासच्या अफलातून भूमिकेत मामूटी आहे तर त्याच्या विरोधी शांत पण अचूक खेळ खेळणारा जयकृष्णन  विनायकनने रंगविला आहे.
खरे तर याविषयावर एक वेब सिरीज आणि एक साऊथ चित्रपट ही आलेला आहे पण त्यामुळे पुढे काय होणार हे बघणाऱ्याला कळते.
मामूटी असल्यामुळे थोडी मांडणी वेगळी आहे आणि त्याचे चित्रपट पाहायला मजाच येते.

Monday, January 12, 2026

टार्गेट

टार्गेट
डेव्हिड बॅल्डासी
अनुवाद...डॉ. चंद्रशेखर चिंगरे 
बिल रॉबि आणि जेसिका रिल सीआयएला नकोसे झालेले एजंट. प्रत्यक्षात ते दोघेही फिल्डवर सर्वोत्कृष्ट आहेत. उत्तर कोरियात अमेरिकेचे एक ऑपरेशन फसते.यात जनरल पाक उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्याचा उजवा हात मानला जाणारा सामील असतो.पण फसलेल्या ऑपरेशनमुळे तो उघडा पडतो.त्याला फ्रान्सहून अमेरिकेत आणायची कामगिरी त्यांच्यावर पडते पण त्यांच्यापुढ्यात जनरल पाक आत्महत्या करतो आणि माझ्या कुटुंबियांना वाचवा असा निरोप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाना देतो.
आता जनरल पाकच्या कुटुंबाला उत्तर कोरियातील छळछावणीतून सुखरूपपणे आणायची कामगिरी पुन्हा रॉबि आणि रिलवर येते. ते यात यशस्वी होतील का ?? 
उत्तर कोरियात हुकूमशाही आहे.तिथे शिरणे आणि बाहेर पडणे अमेरिकन लोकांसाठी अवघड आहे.बिल आणि रीलला जमेल ?
चुंग चा उत्तर कोरियातील छळ छावणीतून एक प्रशिक्षित मारेकरी बनून बाहेर पडली आहे. सर्वोच्च नेत्याच्या आदेशावरून हत्या करायची हे तिचे काम.बिल आणि रिल जनरल  पाक जवळ होते हे उत्तर कोरियाला कळले होते.यामागे अमेरिका आहे हेही त्यांना कळले आहे .अमेरिकेला सर्वात मोठा धक्का देण्याचे त्यांनी ठरविले आणि या कामी चुंग चा निवड केली .चुंग चा ने बिल आणि रीलला ठार मारायचे असा आदेश दिलाय.
चुंग चा आपल्या कामगिरीत यशस्वी होईल ?
दोन देशातील सर्वोत्तम एजंटच्या या जीवघेण्या खेळात कोण बाजी मारेल ?
अमेरिका उत्तर कोरियाचा कट उधळून लावेल का ?
एक थरारक कादंबरी

Friday, January 9, 2026

स्मृती पालवी

स्मृती पालवी
अनिल हरि देशपांडे 
साहित्यसंपदा प्रकाशन
आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक आठवणी जाग्या होतात.जणू त्या आठवणींना नव्याने पालवी फुटत असते.किती छोट्या छोट्या असतात ह्या आठवणी .त्यावेळी आपण नेहमीच्या वापरातील आहेत म्हणून फारसे लक्ष देत नाही पण नंतर किती सुंदर आहेत असे समजून जातो.
अनिल देशपांडे यांचा हा ललित कथासंग्रह वाचताना आपल्याही अश्याच आठवणी आहेत हे जाणवते पण आपण त्या लिहू शकलो नाही याचे नक्कीच वाईट वाटते.लेखकाने लिहिणे किती सोपे असते हे या कथासंग्रहातून आपल्याला शिकवले आहे त्याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजे.
अतिशय सोप्या सरळ भाषेत त्यांनी या आठवणी मांडल्या आहेत.साधारण पंचेचाळीस कथा ह्या संग्रहात आहे आणि प्रत्येक कथा आपल्या सर्वांच्या आठवणींशी संबंधित आहे.
यातील कथा फार मोठ्या नाहीत. साधारण दोन ते तीन पानात कथा संपते पण वाचताना आपण त्यात रमून जातो आणि हे माझ्याही बाबतीत घडलंय याची जाणीव होते. 
पहिला पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात येतो .काहीजणांना तो त्रासदायक असतो तर काही लोकांसाठी आनंददायी .पण तो लिहून काढणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही .लेखकाने ते केलंय. प्रत्येकजण कोणत्यातरी वाहनाने प्रवास करतो लेखकाची एक सायकल होती.त्या सायकलची आठवण या पुस्तकानिमित्ताने लिहिली गेलीय.वस्तू तर सर्वांच्या कधी ना कधी हरवल्या असतील पण त्या सापडल्यावर होणारा आनंद आणि वस्तू परत करणाऱ्याचे उपकार त्यांनी वस्तू हरवली माणुसकी सापडली या लेखात शब्दबद्ध केली आहे.
चहा, काठी म्हातारपणीची, जेष्ठ नागरिक दिवस, कल्हईवाला, पहिला आंबा आशा अनेक गोष्टीतून ते आपल्याला ही आठवणीत घेऊन जातात.आपण वाचताना आपल्याच आठवणीत रमतो.
अनिल देशपांडे सरांनी स्मृती पालवी  लिहून वाचकांना  एक वेगळीच सफर घडवून आणलीय  हे निश्चित.

Thursday, January 8, 2026

इको

Eko
इको
संरक्षण आणि नियंत्रण कधीकधी एकसारखेच दिसतात.यातच इकोचा गर्भितार्थ दडला आहे.
ती उंच टेकडीच्या माथ्यावर डोळ्यावर दुर्बीण ठेवून समोर लक्ष ठेवणारी मलेशियन म्हातारी .गूढ नजरेने तिच्याकडे पाहणारा तो तरुण आणि मागे  डोळे रोखून पाहणारी ,जगातून नामशेष होत चाललेली मलेशियातील खतरनाक कुत्र्याची जात.
ही कथा आहे कुरियचनच्या शोधाची .
कुरियचन कोण आहे ? 
कुरियचन एक उत्कृष्ट डॉग ट्रेनर अर्थात कुत्रांचा शिक्षक आणि हाडाचा शिकारी आहे.केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर त्याची साधारण दीडशे एकर जमीन आहे. तो नेहमीच उत्कृष्ट कुत्र्यांच्या जातीच्या शोधात आहे. त्यासाठी तो दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान मलेशियातही गेला होता .मलेशियातील एका माणसाकडे शिकारी कुत्र्याची जात आहे जी आता नष्ट होत चालली आहे .कुरियचन त्यासाठी तिथे जातो आणि अपघाताने त्याच्या पत्नीला मलाथीला घेऊन भारतात येतो.
मलाथी आता वृद्ध झालीय.ती त्या जंगतील सर्वात मोठ्या टेकडीवर  एकटीच राहतेय.काही महिन्यांपूर्वी शहरात राहणाऱ्या तिच्या मुलाने पियुसला तिची काळजी घेण्यासाठी पाठविले आहे.पियुस साधारण पंचवीस वर्षाचा तरुण आत्मीयतेने मलाथीची काळजी घेतोय.  घरात मलाथी ,पियुस आणि काही कुत्रे राहतात .ते कुत्रे जणू मलाथी आणि घराचे रक्षण करतायत .हे तेच मलेशियातील नामशेष होणाऱ्या उत्कृष्ट जातीचे कुत्रे आहेत.
अनेक जण कुरियाचनचा शोध घेतायत . पोलिसांना तो गुन्हेगार म्हणून हवाय तर काहीजण त्याला वैयक्तिक कारणासाठी शोधतायत. तो मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.त्याला मलाथी सोडून अजून दोन बायका आहेत.
पण त्याला शोधणाऱ्यांचा अपघाताने किंवा इतर कारणाने मृत्यू होतायत. अगदी आठ महिन्यांपूर्वी कुरियचनचा खास मित्रही कुत्र्याला घेऊन त्याला शोधायला आला होता पण दरीत पडून त्याचा मृत्यू झाला.
शेवटपर्यंत कुरियचनचा शोध लागत नाही. पण त्यामागची कारणे आपल्याला हळूहळू समजू लागतात .
हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत गूढपणे आपल्याला गुंतवून ठेवतो.अतिशय घनदाट असे केरळ कर्नाटकातील जंगल सुंदर आहे पण तितकेच भीतीदायक आहे. कथेमध्ये कुत्र्यांचा वापर प्रभावीपणे केला आहे किंबहुना कुत्रेच चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.
मेघालयातील कलाकार बियाना मोमीनने वृद्ध मलाथीची भूमिका शांतपणे केली आहे. सौरभ सचदेवने कुरियाचन आणि संदीप प्रदीपने पियुसची भूमिका प्रभावीपणे केली आहे.
जागेवरून हलू न देणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Friday, January 2, 2026

कॅशहिरो

Cashero
कॅशहिरो
सुपरहिरो म्हटला की अफाट ताकदीचा चपळ दुष्टांचा संहार करणारा डोळ्यासमोर येतो .होय, कांगसांग ऊंग हा असाच एक सुपरहिरो आहे .त्याला ही सुपर पॉवर वडिलोपार्जित मिळाली आहे पण ती पॉवर त्याला खिश्यात पैसे असले तरच वापरता येईल.जितके जास्त पैसे तितकी जास्त पॉवर. तो जसजशी पॉवर वापरतो तसतसे त्याच्या खिशातील पैसे कमी होत जातात आणि त्यापैश्याचे रूपांतर चिल्लर नाण्यात होते.
मुळात कांगसांग ऊंग साधा तरुण आहे जो आपल्या किंग मिंग सुक प्रेयसी सोबत सुखी संसाराचे स्वप्न बघतोय .पण आता सुपर पॉवर अंगात असल्यामुळे जनतेची सेवा करायची आहे आणि त्यासोबत खिशातील पैसे ही गमवायचे आहेत.
पण अशी सुपर पॉवर  असलेला कांग सांग ऊंग एकटा नाहीय. बँग युन मी ही एक तरुणी आहे जीला बन खाल्यावर सुपर पॉवर येते आणि ब्येऑन हो हा वकील आहे ज्याच्याकडे दारू प्यायल्यावर पॉवर येते.
जो ऍन च्या वडिलांना अश्या सुपर हिरोची पॉवर काढून घ्यायची आहे.त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे.जो ऍन आपल्या वडिलांना त्यासाठी मदत करतेय.आता ती कांग सांग ऊनच्या मागे लागली आहे.
खिश्यात पैसे नसताना कांग सांग ऊन त्यांच्याशी लढू शकेल का ?
अतिशय सुंदर सर्व कुटुंबांनी सोबत बसून पहायची ही फँटसी सिरीज हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

विदेशी गुप्तहेर कथा

विदेशी गुप्तहेर कथा ....पंकज कालुवाला
परम मित्र पब्लिकेशन 
गुप्तचर विभाग अर्थात हेरगिरी हा प्रत्येक देशाचा प्रमुख पाया असतो.पुरातनकाळापासून राजे महाराजांनी आपले राज्य टिकविण्यासाठी हेरगिरीचे जाळे सभोवती विणले होते.आर्य चाणक्यानी हेरगिरी कशी करावी ?हेर कसा असावा ? याची माहिती चाणक्यनितीत दिली आहे.
पंकज कालुवाला सरांचा आतंरराष्ट्रीय राजकारण आणि हेरगिरी या विषयांचा दांडगा अनुभव आहे.त्यांची हेरगिरीवर आधारित बरीच पुस्तके प्रकाशित झालीय. त्यातही त्यांचे इस्त्रायलच्या मोसादवर जास्त प्रेम आहे असे दिसून येते.
या कथासंग्रहात एकूण दहा कथा आहेत त्यात साधारण आठ कथा मोसादच्या आहेत.खरे तर इस्त्रायल देश स्थापन झाल्यापासूनच त्यांना सभोवती असलेल्या शत्रूंपासून सतत सावध राहावे लागते. जगातील सर्व अरब राष्ट्रांनी उघडपणे इस्त्रायलशी शत्रुत्व घेतले आहे आणि त्यामुळे साहजिकच मोसादला नेहमी सावध राहून शत्रूच्या देशविरोधी कारवाया हाणून पाडावी लागतात.
एखाद्या हेराला पकडताना काय काळजी घ्यावी लागते ,किती सहनशीलता लागते आणि कसे सापळे लावावे लागतात याचे बारीक वर्णन लेखकाने केले आहे. एखादी मोहीम यशस्वी करताना टेक्निकल ,नैसर्गिक अडचणी याचाही विचार करावा लागतो आणि प्रसंगावधान वापरून मोहीम पार पाडावी लागते हे ऑपरेशन नोहाज आर्क .२ आणि ऑपरेशन रुस्टर मध्ये दाखविले आहे.
आपल्या सैन्यातील बंडखोर सैनिकांना अलेक्झांडर कसे शोधून काढतो हे अलेक्झांडरचा कावा याकथेत रंजकपणे लिहिले आहे.
कालुवाला सरांची भाषा अतिशय सोपी असल्यामुळे हेरगिरीतील क्लिष्ट शब्द सहज समजून येतात.
हेरगिरी आणि साहस कथा आवडणाऱ्या वाचकांना हे पुस्तक आवडेल याची खात्री आहे.