Friday, July 25, 2025

The Hunt

The Hunt : The Rajiv Gandhi Assassination Case
द हंट : राजीव गांधी असासीनेशन केस
भारतीय राजकारणातील सर्वात मोठे क्रूर हत्याकांड आणि  त्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी  यांचा बळी. त्यावेळी संपूर्ण देश या हत्येने हादरून गेला होता . तामिळनाडू येथील एका सभेत आत्मघातकी बॉम्ब घातलेल्या मुलीने त्यांचा बळी घेतला होता. ताबडतोब एक स्पेशल टीम नियुक्त केली गेली.
सीबीआय ऑफिसर डी. आर.कार्तिकेयन प्रमुख होते.नव्वद दिवसात यामागचे सर्व अपराधी पकडले गेले तर काहींनी सायनाईड खाऊन आत्महत्या केल्या.
या हत्येचा संपूर्ण तपास अत्यंत उत्कंठावर्धकरितीने आपल्या समोर मांडला जातो.ज्यांनी कार्तिकेयनचे शोध राजीव हत्येचा हे पुस्तक वाचले आहे त्यांना हा तपास टीव्हीवर पाहायला नक्कीच आवडेल.
 हा तपास सुरू होतो तेव्हा हातात कोणतेही पुरावे ,धागेदोरे नसतात.पण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीतून तपास पुढे सरकत जातो आणि एकेक नावे पुढे येतात .यात धानु आहे .शिवरासन , मुरूगेशन , नलिनी, शोभा अशी एलटीटीइची बलाढ्य नावे पुढे येतात .
या तपासामागे  कार्तिकेयन आणि त्यांच्या टीमची प्रचंड मेहनत दिसून येते.आतासारखी अत्यानुधिक उपकरणे ,मोबाईल फोन नसताना त्यांनी अथक परिश्रम करून खऱ्या आरोपींना पकडले .
दिग्दर्शक नागेश कुकनूरने नेहमीचे कलाकार न निवडता थोडे वेगळे आपल्याला नवीन असणारे  निवडले आहे.
 अमित सिएल  कार्तिकेनच्या प्रमुख भूमिकेत आहे. अतिशय शांत आणि संयमित भूमिका त्याने रंगवली आहे रेड 1 आणि 2 मधील भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्ध ही भूमिका आहे. भगवती पेरूमल  हा दाक्षिणात्य अभिनेता के. रंगोथमान या आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे .
ही तपासकथा हिंदी भाषेत सोनी लिववर आहे.

Sunday, July 20, 2025

kuberaa

Kuberaa
कुबेर 
बंगालच्या उपसागरात तेलाचा प्रचंड साठा मिळतो. ह्या तेलाचे कॉन्ट्रॅक्ट प्रसिद्ध उद्योगपती नीरज मित्राला हवेय. त्यासाठी मंत्री सिद्धप्पा त्याच्याकडे एक लाख कोटीची मागणी करतो. पन्नास हजार कोटी कॅश तर पन्नास हजार कोटी स्विस अकाउंटला . त्यांच्याकडे कोणाला किती पैसे द्यायचे याची लिस्ट आहे पण इतक्या मोठ्या रकमा  देणार कश्या.
दीपक तेज एक प्रामाणिक सीबीआय ऑफीसर .भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन तो तुरुंगात आहे.आता तो सिस्टीमवर चिडून नीरज मित्राला मदत करण्याचे ठरवितो. त्यासाठी तो तिरुपतीच्या चार भिकाऱ्यांची निवड करतो.देवा निरक्षर आहे पण त्याची स्मरणशक्ती दांडगी आहे. खुशबू गरोदर आहे. एक नेपाळी आहे तर एक थोडा अधू. ह्या चार भिकाऱ्यांना घेऊन दीपक मुंबईत येतो.
चारही जणांच्या नावाने तो खोट्या कंपनी उभ्या करून प्रत्येकाच्या अकाउंटवरून प्रत्येकी  दहा हजार कोटी स्विस अकाउंटला ट्रान्स्फर करायची योजना असते.ट्रान्सफर पूर्ण झाल्यावर नीरज त्यांना ठार करायचा हुकून देतो. योगायोगाने ती योजना देवाला कळते पण त्याआधीच दोन भिकारी ठार झालेले असतात.
देवाच्या वेळी पैसे ट्रान्स्फर होत नाही आणि देवा स्वतःची सुटका करून घेतो. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी देवाचे जिवंत राहणे आवश्यक आहे. देवाला ह्याविषयी काहीच माहिती नाही.पण आपल्याला ठार मारणार या भीतीने तो पळतो आणि रेल्वे स्टेशनवर समीरा भेटते.समीरा आपल्या मित्रांसोबत पळून जाणार आहे पण तो येतच नाही. नाईलाजाने का होईना समीरा देवाला मदत करते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालते.
आता दीपक आणि नीरजची माणसे देवा आणि समीराच्या मागावर आहे. देवा आणि समीरा स्वतःचा जीव वाचवून हे सर्व प्रकरण उघडकीस आणतील का ?
नागार्जुनने दिपक तेज या हताश आणि असहाय्य सीबीआय ऑफिसर आणि काही अंशी खलनायकाची भूमिका रंगवली आहे.चित्रपटात त्याची भूमिका मोठी दिसते. धनुष्यने भिकारी देवा रंगविला आहे. भिकार्याची निरागसता  ,बोलणी खाताना रडवेला चेहरा खरोखरच्या भिकार्याची आठवण करून देतो.रश्मीका हतबल झालेली आणि नाईलाजाने मदत करणारी समीरा झाली आहे.
उत्कंठावर्धक आणि वेगवान  थोड्या वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर हिंदी भाषेत आहे.

ठग लाईफ

Thug Life
ठग लाईफ
1994 सालात एके दिवशी सकाळी जुन्या दिल्लीत गँगस्टर सदानंद यादव आणि त्याचा प्रतिस्पर्धी रंगाराया शक्तीवेलू आणि त्याचा भाऊ माणिकम  मिटिंगसाठी एकत्र येतात . पण सदानंद यादवने या मिटिंगची माहिती आधीच दिल्ली पोलिसांना दिलेली असते .पोलिसांनी त्या चाळीला वेढा घातलेला असतो.
सहा वर्षाचा अमर आपल्या वडिलांसोबत चाळीत पेपर टाकतोय .त्याच्यासोबत त्याची चार वर्षांची बहीण चंद्राही आहे.अचानक गोळीबार सुरू होतो आणि अमरचा बाप त्यात मारला जातो.शक्ती अमरला वाचवतो पण चंद्रा या गोंधळात हरवते . पुढे अमर मोठा होऊन शक्तीवेलूचा उजवा हात बनतो .
शक्तीवेलू आणि सदानंदची दुश्मनी अजून चालू आहे .आता सदानंद राजकारणात प्रवेश करतोय. आपल्या नंतर सगळा कारभार अमर पाहिल हे शक्तीवेलूने जाहीर केलंय. बारमधून सोडवून आणलेली इंद्राणी शक्तीवेलूची रखेल म्हणून राहतेय .पण अमरही तिच्यावर प्रेम करतोय.
अमरच्या वडिलांना शक्तीवेलूने गोळी घातली हे माणिकम आणि त्याचे साथीदार अमरच्या डोक्यात भरवितात आणि अमर शक्तीवेलूला मारण्याचा प्लॅन करतो. 
मानस सरोवर यात्रेला शक्तीवेलू  त्याच्या साथीदारांसोबत जातो आणि तिथेच शक्तीवेलू सर्व हल्ला करतात . खोल  दरीत शक्तीवेलू फेकला जातो .सर्वाना वाटते तो मेलाय.
पण खरंच शक्तीवेलू मेलाय .यमराजाचे आपल्यावर प्रेम आहे .तो मला सोडून माझ्या जवळच्या माणसांना मारतो असे शक्तीवेलू नेहमीच म्हणतो . ते खरे आहे का ??
कमल हसन ,मणिरत्नम, ए. आर. रहमान यांनी एकत्र येऊन बनविलेला हा चित्रपट टिपिकल गुन्हेगारीविश्वावर आधारित आहे .यात फितुरी आहे ,धोकेबाजी आहे आणि नंतर टिपिकल बदला आहे.संपूर्ण चित्रपट कमल हसनचा आहे .
चित्रपट नेटफिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Thursday, July 17, 2025

कार्य

कार्य
सुरेशभाऊ पालकर गेले तेव्हा मी गावी होतो . पण त्यांच्या कार्याला हजर राहायचे हे मनाशी पक्के करूनच कामे उरकली आणि परतलो.
कार्याचे एक बरे असते . बरेचसे नातेवाईक आणि मित्रमंडळी भेटतात . ते जणू एक छोटे गेट टू गेडर असते. यावेळी ज्याचे कार्य आहे त्याच्या विषयी कोण चर्चा करत नाही पण गावातील वाद ,मुलांचे शिक्षण ,जमीन ,भावकी , देऊळ असे बरेच विषय चर्चिले जातात .
सुरेशभाऊच्या दशविधी कार्याला काही वेगळे चित्र नव्हते. त्यांचा मुलगा अंकित निर्विकार चेहऱ्याने भटजी सांगेल ते करत होता.
अर्थात वयाच्या नव्वदाव्या वर्षी नातवंडांची लग्ने पाहणाऱ्या व्यक्तीच्या जाण्याचे कोणाला दुःख होईल म्हणा. 
पण सुरेशभाऊनी माणसे खूप जोडून ठेवली होती. स्मशानात नाही म्हणायला पन्नास साठ जण उपस्थित होती. मी रजा घेतली असल्यामुळे घाईत नव्हतो.त्यातच  काही जुने मित्र आणि ओळखीचे काहीजण स्मशानात नेहमीप्रमाणे भेटले आणि त्यांची विचारपूस ही झाली.
सुरेशभाऊंच्या दशक्रियाविधी शेजारीच साधारण पंचविशीचा एक तरुण विधी करायला बसला होता . त्याच्यासोबत कोणीच दिसत नव्हते. त्याचा तो केस काढलेला गुळगुळीत चेहरा पाहून मी हळहळलो. बिचारा .. तरुण वयातच हे असे विधी करायला किती यातना होत असतील त्याला .शिवाय धीर द्यायलाही कोणी हजर नाही.आपले कोणी गेल्याचे दुःख एकट्याने सहन करायचे म्हणजे साधी गोष्ट नाही . मी त्याच्याकडे पाहत हाच विचार करीत होतो .
काही वेळाने सुरेशभाऊंचे कार्य संपले .कावळेही जणू पिंडाची वाटच पाहत होते.अंकितची पाठ वळताच तीन कावळ्यांनी पिंडावर एकदम हल्ला केला आणि अंकितसह उपस्थित सर्वांनी हुश्श केले आणि पैसे लावायला  रांग लावली.
त्या तरुणाचेही सर्व आटपले आणि पाचच मिनिटात त्याने ठेवलेल्या  पिंडाला कावळा शिवला.  
मी सवयीप्रमाणे हुश्श केले पण त्याच्या चेहऱ्यावरची माशी हलली नाही. सर्व संपल्यावर त्याने भटजीला नमस्कार केला आणि बाराव्याची वेळ विचारून घेतली. त्याने जाताजाता आपले कार्ड काढून गुरुजींना दिले , हे माझ्यासाठी थोडे विचित्रच होते . साधारणतः भटजी आपले कार्ड देतात पण इथे उलट होते .मी फारसे मनात न ठेवता सर्वांसोबत घरी परतलो .
आज सुरेशभाऊंना जाऊन महिना झाला. मित्राचा फोन आला म्हणून ऑफिसमधून बाहेर पडलो आणि समोरच्या कॉफीशॉपमध्ये बसलो . त्याच्याशी गप्पा मारताना रस्त्यावर नजर होती . समोरच्या गल्लीतून एक प्रेतयात्रा बाहेर पडत होती. हल्ली कोणीही  प्रेताला खांद्यावर घेऊन स्मशानात जात नाही . त्यासाठी विभागातील समाजसेवकांनी वेगवेगळे रथ तयार केलेले असतात .
अश्याच एका रथावरून ती प्रेतयात्रा चालली होती .त्या रथावर हातात मडके धरून बसलेल्या तरुणांकडे पाहून मी उडालोच .हा तोच तरुण होता जो स्मशानात अंकितच्या बाजूला कार्याला बसलेला होता.
"अरे रे ..!! बिचाऱ्यावर दुःखाचा डोंगरच कोसळलेला दिसतोय. महिन्याभरापूर्वी एकाला गमावले आणि आता दुसऱ्याला " मी स्वतःशी पुटपुटलो.
 दोन दिवस त्याचा चेहरा नजरेसमोरून जाईना .मी मनाशी दिवस मोजले आणि दहाव्या दिवशी सकाळी स्मशानात हजर झालो.अर्थात तिथे नेहमीप्रमाणे कोणी ना कोणी ओळखीचे भेटलेच , त्याची विचारपूस करतानाच माझी नजर त्याला शोधू लागली आणि एका कोपऱ्यात गुरुजींच्यासमोर कार्याला बसलेला  तो दिसलाच.
त्या दिवशीसारखाचा तो एकटाच कार्य करत होता . आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते .मी  माणुसकी म्हणून त्याच्यामागे उभा राहिलो . खरे तर आता स्मशानात सकाळीसकाळी आलोच आहे तर कोणाच्या तरी पिंडाला पैसे लावूनच जाऊ हा सुप्त हेतू होताच .
कार्य होताच तो पिंड ठेवायला पुढे गेला आणि हात जोडून कावळ्याची वाट पाहत उभा राहिला.पाच मिनिटात कावळ्याने पिंडाला चोच मारली. मी सवयीप्रमाणे पैसे लावायला पुढे झालो तसा तो थबकला.काही न बोलता त्याने मला पाया पडायला दिले नंतर सर्व सामान गोळा करून समुद्रात सोडायला गेला. जाताना त्याने आपले कार्ड भटजीला दिले. ते पाहून मला पुन्हा आश्चर्य वाटले.
तो स्मशानाबाहेर पडला आणि मी त्याच्या मागून जात हाक मारली .
"अरे मित्रा " 
तसा तो वळला आणि माझ्याकडे पाहून ओळखीचे हसला .
" तुम्ही महिन्यांपूर्वी इथे आला होतात " तो हसून म्हणाला ."कोणी गेले का पुन्हा ?"
" नाही , पण यावेळी तुला भेटायला आलो होतो.दहा दिवसापूर्वी तुला रथावर मडके घेऊन बसलेले पाहिजे.महिन्याभरात दोन कार्य आणि सोबतीला कोणीच नाही म्हणून आश्चर्य वाटले .म्हणून मुद्दाम तुझ्यासाठी आलो " मी म्हणालो.
तसा तो हसला आणि खिशातून कार्ड काढून माझ्यासमोर धरले आणि म्हणाला "चला चहा पिवू ."
कार्डवर त्याचे नाव आणि  मोबाईल नंबर होता पाठीमागे एकच वाक्य होते मी आहे.
" हे काय " चहाचा घोट घेत मी विचारले.
"एका कार्याचे  कमीत कमी पंचवीस हजार घेतो . भटजी आणि सामानाचे वेगळे." तो शांतपणे म्हणाला.
म्हणजे "मी चकित होऊन विचारले .
" ज्यांचे कोणीच नाही .पण त्यांच्याकडे पैसे आहेत . माणसे नाहीत अश्याच्या कार्याची जबाबदारी मी घेतो .त्यांच्या अंत्ययात्रेपासून दिवसापर्यंत इतकेच नव्हे तर वर्षश्राद्धपर्यंत सर्व कार्य व्यवस्थित करण्याची जबाबदारी मी घेतो आणि त्यानुसार पैसे आकारतो " तो सहजपणे म्हणाला .
"अहो पण अंत्यसंस्कार तर आमचा बंड्याही करतो . तेही फुकट " मी ऐटीत म्हणालो.
" पण तो दशक्रिया ,बारावे , तेरावे, श्राद्ध  करतो का "? त्याने विचारले. 
तसा मी निरुत्तर झालो. 
" बंड्या अंत्यसंस्कार करून मोकळा होतो पण पुढे काय ? बंड्या चांगले काम करतो मान्य आहे पण मृत्यूनंतर बाकीची कार्य केल्याशिवाय आत्म्याला मुक्ती मिळत नाही अशी आपली समजूत आहे .मग ती कामे मी करतो अर्थात पैसे घेऊनच " तो सहजपणे म्हणाला.
" सुरवात कशी झाली ? " मी कुतूहलाने विचारले.
" माझ्या मित्राचे लांबचे काका होते.ते निपुत्रिक होते आणि शेवटी वृद्धाश्रमात राहत होते.ते गेल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार मित्रच करणार होता पण नेमका काही दिवसासाठी बाहेरगावी गेला आणि ते वारले.त्यांच्या मृत्यूनंतर सगळी कार्य व्यवस्थित रितिरिवाजनुसार व्हावे अशी त्यांची इच्छा . मित्राने मला फोन केला . मीच त्यांचे अंत्यसंस्कार केले .नंतर वृद्धाश्रमाने साठ हजार माझ्या हातात दिले आणि अंतिम इच्छेनुसार त्यांची सर्व कार्य करायला सांगितले.मी त्यांचे दहावे बारावे ,वर्ष श्राद्ध केले .सर्व मिळून पंचवीस हजार खर्च झाले .मित्राने उरलेले पैसे तुलाच ठेव असे सांगितले . एकेक दिवसाची तीन कार्य आणि तीही दोन दोन तासाची .साधारण पस्तीस हजार मिळाले .मीही खुश ,मित्र खुश ,त्याचे काका वर जाऊन खुश .नंतर त्या वृद्धाश्रमाने अजून दोन तीन जणांची कार्य करायला सांगितली .त्यातही पैसे मिळाले .मग ह्यातच गुंतून गेलो. " तो हसत म्हणाला.
" तरीही पैसे घेऊन दुसऱ्याची कार्य करणे हे पटते का तुम्हाला " मी धाडस करून विचारले.
" भाऊ, भटजी पैसे घेऊन विधी करतो . हजाम पैसे घेऊन केस कापतो. स्मशानात लाकडे फुकट देतात तरीही आपण तिथे चिता पेटवणार्याला दोनशे रुपये टीप देतो.पोलिसांना  बॉडी सोडविण्यासाठी पैसे देतो . मग अंत्यसंस्कार आणि इतर विधी करणाऱ्याला का पैसे देऊ नये ? तसेही हल्ली बरेचसे वृद्ध आपल्यानंतर अंत्यसंस्काराची आधीच तयारी करून ठेवतात. मग त्यांच्या इच्छा माझ्यामार्फत पूर्ण होतात " तो सहजपणे म्हणाला.
त्याचे चुकीचे काहीच वाटत नव्हते .तो कोणाला फसवत नव्हता . अगदी त्यांच्या अंतिम इच्छेनुसार सर्व कार्ये करीत होता.
" मग किती ऑर्डर असतात महिन्यात ? "मी हसत विचारले .
"सरासरी महिन्याला चार ते पाच .लाख दीड लाख सुटतात महिन्याला .आता तर स्मशानातील भटजीही ओळखीचे झालेत .कधी ते मला बोलावतात तर कधी मी त्यांना ऑर्डर देतो .तुम्हाला सांगतो भाऊ हल्ली वेळ कोणालाच नसतो.लोक दशक्रियेला पाया पडून इथूनच ऑफिसला जातात .बाराव्याला जेवायला कोण येत नाहीत .खांदेकरी वेळ मिळेल तेव्हा येऊन खांदे उतरवून जातात . विधुर मिळत नाही, जोडपे मिळत नाही मग मीच काहींना पैसे देऊन बोलावतो ." त्याने आपल्या धंद्यातील अडचणी सांगायला सुरुवात केली. 
अरे बापरे ,हा आता मलाही एखादी ऑफर देईल की काय ? अशी भीती वाटू लागली .
" मग त्या केसाचे काय ? " मी हसत विचारले.
" मी आता हीच स्टाईल ठेवलीय .त्याने शेंडी दाखवत सांगितले. पैसे महत्वाचे .डोक्यावर भरमसाठ केस असणे महत्त्वाचे नाही " असे बोलून तो उठला  आणि चहाचे पैसे देऊ लागला.
" मी देतो " मी त्याला थांबवत म्हणालो.
" नको भाऊ , हे पॅकेजमधून आहे . या कार्यातून बारा ते पंधरा हजार तरी मिळतील "  तो हसत म्हणाला .
मी हात मिळवून पुढे निघालो . मागून पुन्हा त्याने हाक मारली .
" भाऊ ,भेटू पुन्हा इथेच कधीतरी .नाहीतर या वीस तारखेला भेटा .एकाचे वर्षश्राद्ध आहे.चांगल्या दहा पदार्थांचा मेनू आहे विथ आईस्क्रीम. हॉल घेतलाय .बघा प्रयत्न करा ." तो हसत म्हणाला.
मी लांबूनच हात जोडले आणि हसत हसत पुढे निघालो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Tuesday, July 8, 2025

Head Of State

Heads Of State 
हेड्स ऑफ स्टेट
MI6 आणि CIA चे जॉईंट ऑपरेशन स्पेनमध्ये चालू असते.रशियन आर्म डीलर व्हिक्टरला पकडायचे आहे पण बाजी त्यांच्यावरच उलटते आणि सर्व एजंट मारले जातात .त्यात टीम प्रमुख नोएलही आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान सॅम क्लार्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल डेरिंगजर यांचे एकमेकांशी फारसे पटत नाही.विल हा हॉलिवूडचा सुपरस्टार आणि एक्शन हिरो होता .त्यामुळे तो प्रत्येक गोष्ट हसण्यावारी घेतो राजकारण त्याला येत नाही असे सॅमचे मत .सॅम स्वतः सैनिक म्हणून युद्ध लढला आहे .
हे दोघे नाटो परिषदेत एकत्र येणार आहे तत्पूर्वी सॅमला विलीने आपल्या एअर फोर्स वनमधून फिरवून आणावे असा सल्ला विलीचे सल्लागार देतात .त्यामुळे दोघांतील तणाव कमी होईल असे त्यांना वाटते.
नाईलाजाने विली सॅमला आमंत्रण देतो आणि सॅमही नाईलाजाने ते स्वीकारतो .
पण हवेतच एअर फोर्स वन वर हल्ला होतो त्यात विली आणि सॅम सोडून सगळे मारले जातात .विली आणि सॅम एका जंगलात अडकतात .त्यांच्या दुर्दैवाने तो देश दोघांचा शत्रू असतो .
व्हिक्टरने अमेरिकेचे नवे सॉफ्टवेअर हॅक केलेले आहे त्यामुळे त्याला त्या दोघांच्याही हालचाली आणि ठावठिकाणा कळतोय.ते जिथेजिथे जातात तिथे त्यांच्यावर व्हिक्टरची माणसे हल्ला करतात .
नाटो आता रद्द होणार आहे .नाटोतील बहुसंख्य सदस्यांनी आपला सहभाग मागे घेण्यास सुरुवात केलीय.जर विली आणि सॅम वेळेवर पोचले तरच नाटो वाचेल.
पण विली आणि सॅम सर्व धोकादायक अडचणीतून मार्ग काढीत नाटो परिषदेत पोचतील का ?
अमेरिकन राष्ट्राध्यक्षच्या भूमिकेत जॉन सीना आहे.तर ब्रिटिश पंतप्रधान सॅम क्लार्कच्या भूमिकेत इडरिस एल्बा आहे.
नोएलच्या महत्वाच्या भूमिकेत प्रियांका चोप्राला पाहून आनंद होतो .तिने एक्शन सीन चांगले केले आहेत.
चित्रपट एक्शन कॉमेडी असल्यामुळे पाहताना मजा येते.संपूर्ण कुटुंबासोबत पहावा असा चित्रपट प्राईम व्हिडीओवर हिंदी भाषेत आहे .

Monday, July 7, 2025

शिक्षण

शिक्षण
सदाशिव वाघुले अर्थात सदाभाऊ . आयुष्यभर या माणसाने फक्त कीर्तन केले. तरीही ते कधीच कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध झाले नाही. त्यांचे कीर्तन फक्त विभागातील देवळात किंवा गावी गेले की गावाच्या देवळात. त्यांचा आवाजही बेताचाच .अर्थात त्यांना स्वतःची कुवत माहीत होती त्यामुळे कोणत्याही स्पर्धेत किंवा मोठ्या समारंभात कीर्तन करायचे टाळत .
तसे ते दिवसभर कीर्तन करत नाहीत.फावल्या वेळात चाळीतील मुलांना चांगले संस्कार देण्याचे प्रयत्न करतात.
 चाळीतील लहान मुले त्यांच्याकडे हौसेने येत पण आता तीच मुले मोठी झाली आणि त्यांच्या मुलांना मोबाईलमधून डोके वर करायला वेळ नाही .
सदाभाऊना शिक्षणाची खूप आवड .परिस्थितीमुळे आपण शिक्षण घेऊ शकलो नाही याची खंत त्यांना नेहमीच जाणवत असते .त्यामुळेच वेळ मिळेल तसा लहानमोठ्याना कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व सांगायचे प्रयत्न करीत. 
पण त्यांची एक गोष्ट फारच कमीजणांना माहीत होती. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून जितके पैसे मिळत ते पैसे आपल्या विभागातील रात्रशाळेतील मुलांवर खर्च करीत असत.काही गरजू होतकरू विद्यार्थ्यांची फी ही ते भरत होते.
नेहमीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशीजवळ आली होती. आषाढी एकादशी म्हटले की ते मनातून खुश होत.वारी सुरू झाल्यापासून कोणी ना कोणी त्यांना कीर्तनाला बोलावत असे .ते देतील तितके पैसे कपाळाला लावून ते बाहेर पडत . आषाढीत थोडे जास्त पैसे मिळत हे नक्की.
पण गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना घश्याचा त्रास जाणवू लागला होता.तस काही फार गंभीर नसल्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही .पण आता तो जास्तच जाणवू लागला .इतका की त्या दिवशी घरात बसून कीर्तन करताना अचानक आवाज बसला . यावर्षी काय पण यापुढे कीर्तन करू शकणार नाही याची भीती त्यांना जाणवू लागली .
आताही ते घरात बसले असताना शेजारचा अमित एका गृहस्थाला त्यांच्याकडे घेऊन आला . आत शिरताच त्या गृहस्थाने हात जोडून त्यांना नमस्कार केला. 
थोडासा स्थूल ,बुटका ,काळसर वर्णाचा , कपाळावर पांढरा टिळा . मळकट झालेला सदरा ,तसाच लेंगा ,डोक्यावर पांढरी टोपी अश्या अवतारात तो सदाभाऊंपुढे उभा राहिला.
" माफ करा मी यापुढे कीर्तन करू शकणार नाही " तो काही बोलायच्या आधीच सदाभाऊने आपले पत्ते उघड केले.तसा तो चमकला .
"आहो भाऊ ,मी कीर्तनाचे आमंत्रण द्यायला आलो नाही "  कमरेवर हात ठेवून  तो हसत म्हणाला .त्याचे हास्य खूपच आश्वासक आणि मधुर होते.ते पाहूनच सदाभाऊ आपले दुखणे विसरले.
" मग कशाला आलात " सदाभाऊने उत्सुकतेने विचारले .
" मी पंढरीनाथ , त्या नाक्यावरच्या रात्रशाळेत शिकतो .दरवर्षी तुम्हीच आम्हाला शैक्षणिक वस्तू देता. दहावीच्या मुलांची परीक्षा फी भरता .मी आता दहावीला आहे . सकाळी मिळेल ती कामे करतो आणि रात्रशाळेत शिकतो.तुमची समोरच्या विठ्ठलाच्या देवळातील कीर्तन ऐकली आहेत मी .मला पुस्तके लवकर हवी आहेत आणि यावर्षी माझी परीक्षा फीही भरायची आहे म्हणून तुम्हाला लवकर भेटायला आलोय " तो पुन्हा हात जोडत म्हणाला.
" तू दहावीला आहेस "? पंढरीनाथकडे निरखून पाहत  सदभाऊनी विचारले.
" होय, शिकण्यासाठी वय नसते असे तुम्हीच कीर्तनातून सांगतात ना ? आणि एका  साहेबानी मला दहावी पास झाल्यावर कॉम्प्युटर शिकवणार असे वचन दिले आहे." पंढरीनाथ छाती पुढे काढून म्हणाला .
" अरे वा ! छान ! पण माफ कर .यावर्षीपासून मी कीर्तन करू शकणार नाही . मला घश्याचा त्रास होतोय. " दुःखी आवाजात सदाभाऊनी सांगितले.
" अरे पांडुरंगा ! पंढरीनाथ चकित होऊन म्हणाला .मग यावर्षी माझी आणि माझ्या वर्गाची दहावी बुडणार का ?
" अरे काळजी करू नकोस . तो आहे ना . करील काहीतरी तुमची व्यवस्था " भिंतीवरच्या विठ्ठलाच्या फोटोकडे बोट दाखवीत सदाभाऊ उत्तरले.
"भाऊ, तुमचे कीर्तन मी केले तर "? पंढरीनाथ चुटकी वाजवत म्हणाला.
" काहीतरी काय .त्यासाठी चांगला आवाज पाहिजे.कीर्तनातून समाजाला प्रबोधन करायचे असते त्यासाठी माहिती असावी लागते .कीर्तनाचा सराव असावा लागतो " सदाभाऊ हसत म्हणाले.
" भाऊ, मी नेहमीच तुमचे कीर्तन ऐकतो .मी समोरच असतो पण तुमचे लक्ष नसते माझ्याकडे .तुम्ही तल्लीन होऊन समोर बसलेल्या श्रोत्यांना कीर्तन सांगत असतात. " तो हसत म्हणाला ." राहिला आवाज,  कीर्तन पाठ असेल तर आवाजाचा प्रॉब्लेम होणार नाही.तसा थोडाफार चांगला आहे माझा आवाज " तो हसत म्हणाला.
" ठीक आहे ,बघू प्रयत्न करून.हे करून तुमच्या फीचे पैसे भरता आले तर आनंदच आहे .पुढच्या वर्षीचे पुढच्या वर्षी बघू " सदाभाऊनी थोड्या नाखुषीनेच परवानगी दिली.
पहिल्याच कार्यक्रमात सदाभाऊनी जमलेल्या श्रोत्यांची माफी मागून त्यांच्याऐवजी पंढरीनाथ कीर्तन करणार असे जाहीर केले. 
पंढरीनाथने कीर्तन सुरू केले आणि काही वेळातच संपूर्ण कार्यक्रम मंत्रमुग्ध केला. हा आपल्यापेक्षा चांगले कीर्तन करतो हे सदभाऊना जाणवले आणि आपला वारसा त्याने चालू ठेवावा अशी विनंती करण्याचे त्यांनी ठरविले.
प्रत्येक कार्यक्रमत मिळणारे पैसे त्याने न चुकता सदाभाऊना दिले.त्यातूनच रात्रशाळेतील मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघाला.
आज आषाढी  एकादशी .आज सर्व विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार होते .आज कुठेच कीर्तनाचा कार्यक्रम नव्हता .सकाळीच पंढरीनाथ त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आला .पंढरीनाथाने त्यांचे चरणस्पर्श करताच त्यांना गहिवरून आले. नकळत त्यांनी त्याला मिठीत घेतले आणि स्वतःच्या खिशाला लावलेले पेन त्याच्या  सदर्याच्या खिशाला अडकवले .
" आतातरी हेच मी देऊ शकतो तुला .ह्या पेनानेच पेपर लिही " डोळे पुसत सदाभाऊ पुटपुटले.
तो हसला .ते हास्य पाहताच एक अदभुतआनंदाची जाणीव सदभाऊंच्या शरीरात पसरली .
तो मागे वळून न पाहताच निघून गेला .संध्याकाळी गर्दी कमी होताच  सदाभाऊ विठ्ठलाच्या मंदिरात गेले. त्यांनी डोळे मिटून भक्तिभावाने विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि ते चमकले.
एका अनामिक भीतीने त्यांनी डोळे उघडून विठ्ठलाकडे पाहिले .पंढरीनाथच्या चेहऱ्यावरील हास्य विठ्ठलाच्या मुखावर झळकत होते आणि त्याच्या उपरण्याला सदभाऊंचे पेन लटकत होते.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Sunday, July 6, 2025

अशी एक वारी

अशी एक वारी
शंकर मोरे आज नाईलाजानेच कामावर जाण्यास तयार झाला . त्याच्या नाराजीचे कारणच तसे होते . आज आषाढी एकादशी होती. महराष्ट्रात सणावाराला तोटा नाही पण हेच सण मुंबईतीच्या ट्रॅफिकची वाट लावून टाकतात आणि शंकरसारख्यांचा दिवस खराब जातो.
 आहो , आमचा शंकर महाष्ट्रातील सर्वात मोठ्या बस वाहतूक कंपनीत बस वाहक अर्थात कंडक्टर आहे.गेली तीस ते पस्तीस वर्ष तो आपले काम इमानेइतबारे करतोय.
पण हे सण आले की सर्व जनता हौसेने रस्त्यावर उतरते आणि मग ट्रॅफिकची वाट लागते.  बरे ह्याचे काम तर उभ्यानेच .त्यात गर्दी असेल तर , म्हणजे ती नेहमीच असते मग वाटच लागते .त्यात हा प्रामाणिक कामगार .ह्याच्या बसमधून कोण फुकट प्रवास करेल तर शपथ .बस स्टॉपवर उभी करून तिकीट फाडेल पण कोणाला फुकट प्रवास करू देणार नाही .
नाखुषीनेच तो तयार झाला .निघताना  त्याचा आवडता रुमाल हातात देऊन बायकोने संध्याकाळी इथेतिथे भटकत न राहता घरी या, देवळात जायचे आहे अशी तंबी दिलीच.
एन्ट्री करून त्याने बस आगाराबाहेर काढली आणि ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला . ब्रेक मारताच शंकरच्या तोंडातून सणसणीत शिवी बाहेर पडली.  तितक्यात मागच्या दारातून तो आत शिरला आणि कमरेवर हात ठेवून उभा राहिला. 
" काय रे , चालत्या बसमध्ये कसा चढतोस ? पडला असता म्हणजे ? आधीच डोक्याला ताप कमी आहे का ? त्यात तुझी भानगड नको " शंकर चिडूनच म्हणाला तसा तो मागे वळला .
तो साधारण बुटकाच होता . काळा रापलेला  रंग .कपाळावर पांढरा शुभ्र टिळा , डोक्यावर पांढरी टोपी,  उपरणे ,पांढरा सदरा आणि काळपट झालेला लेंगा. 
" वा , वारकरी दिसतोस .मग नियम पाळा की " शंकर चिडून म्हणाला . तसा तो हसला.
 " मुंबईकर नेहमीच घाईत असतो असे ऐकून होतो .तुमच्या बोलण्यावरून ते खरेच आहे असे दिसते. "
त्याचे हास्यच इतके आश्वासक  आणि गोड होते की शंकर गप्प झाला .
" आहो,  या मुंबईत पावलापावलावर सावध राहायला हवे .इथे काही घडले की पाहिले टार्गेट बस नंतर ट्रेन . बॉम्बस्फोट करायचाय, मग घुसा बसमध्ये , गोळीबार करायचाय ,या बससमोर , दंगल करायचीय मारा बसवर दगड "शंकराचा पट्टा सुरू झाला .
" हो हो ,पुरे .मला तर विठ्ठलाच्या देवळात जायचे आहे " तो हात वर करून म्हणाला .
" पंधरा रुपये " तिकीट मशीन हातात घेऊन शंकर म्हणाला आणि त्याने तिकीट फाडले ही.
" मास्तर , माझ्याकडे पैसे नाहीत " तो गांगरून म्हणाला 
" काय ?"  मुंबईत खिश्यात पैसे न ठेवता माणूस फिरू शकतो हे शंकरसाठी नवीन होते .नसले तरी बसमध्ये कोणी चढणार नाही याचीही त्याला खात्री होती.
" हो, मी आजच मुंबईत आलोय .पैश्याची कधी गरज पडली नाही मला " तो हसत म्हणाला .
" मग हे वारकरी चालत जातायत, त्यांच्या सोबत जा " संध्याकाळपर्यंत पोचाल." रस्त्यावरून चालणाऱ्या दिंडीकडे बोट दाखवत शंकर म्हणाला.
"आहो मुंबईत इतकी गर्दी आणि ट्रॅफिक आहे ,बसने गेलो तरी संध्याकाळपर्यंत पोचेन .गावात वारकऱ्यांसोबत वारीला जाण्याची मजा वेगळीच असते .सगळे कसे शिस्तीत चालते .एकमुखाने एकाच तालासुरात विठ्ठलाचा गजर करीत चालतो तेव्हा वेगळीच अनुभूती असते पण इथे खूप कंटाळा येतो हो .रणरणते ऊन, गाड्यांचे हॉर्न , वेडीवाकडी गर्दी ,धक्के मारीत धावणारे मुंबईकर.  कंटाळा आला हो .तुमची बस बाहेर पडली म्हणून पटकन चढलो त्यात ही एसी बस छान थंडगार प्रवास होईल " तो पुन्हा कमरेवर हात ठेवून रिकाम्या सीटवर बसला .
" ओ साहेब,  ती लेडीज सीट आहे , पहिल्या दोन अपंग आणि वृद्धांसाठी आरक्षित आहे " शंकर छद्मीपणे म्हणाला .
" बापरे इथेही आरक्षण . महिलांना समान हक्क कधी मिळणार देवा .बरे झाले मला भेटणारे सर्वच एका वर्गात येतात तो म्हणजे माणूस " तो पुन्हा हसत म्हणाला .
" पैसे नसतील तर उतर " शंकर आता शांत झाला . 
" मास्तर ,देवाला भेटायला चाललो आहे .पोचेपर्यंत कर ऍडजस्ट " तो केविलवाण्या चेहऱ्याने म्हणाला आणि बाहेरून जात असलेल्या पंधरा ते वीस जणांच्या दिंडीला हाका मारून बसमध्ये बोलावले .
त्याने हाक मारताच ती दिंडी बसमध्ये शिरली .डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला , तुकारामाच्या वेशात असलेला वारकरी  आणि इतरजण टाळ चिपळ्या वाजवत विठ्ठलाचा गजर करीत होते. एका क्षणात बसमधील वातावरण भक्तिमय झाले.
"आहो यांचे तिकीट ?" आता शंकर हतबल झाला .
आषाढी निमित्त मुंबईत कडेकोट बंदोबस्त होता .पोलीस वारकर्यांना बघून काहीच बोलणार नव्हते .शंकरने मुकाट्याने सर्वांची तिकीट्स फाडली पण कोणीही पैसे देण्याच्या मनःस्थितीत नव्हते .आज बहुतेक मेमो मिळणार याची जवळजवळ खात्रीच त्याला झाली.
बसमध्ये सर्व वारकरी तन्मयतेने भजन गात होते .रस्त्यावरील लोक मोबाईलमध्ये या अनोख्या दिंडीचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते .
अचानक त्यांच्या बाजूने जाणारी बस रस्त्यावरचा दुभाजक तोडून बाजूच्या लेनमधून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका मोठ्या ट्रकवर आदळली . 
तो अपघात पाहून शंकर ला काहीच सुचेना . तो नुसता पाहत बसला .
" ओ मास्तर ,चला धावा ,आत माणसे अडकली असतील ." कोणीतरी जोराने ओरडले .
त्याबरोबर सर्व दिंडी खाली उतरून बसच्या दिशेने धावली .जखमींना ताबडतोब शंकरच्या बसमध्ये घेतले वारकर्यांनी आपले पागोटे ,उपरणे काढून जखमा बांधल्या .त्यानेही आपले उपरणे काढून एका जखमी व्यक्तीला बांधले .बस हॉस्पिटलकडे सुसाट निघाली.
जखमींना बसमधून बाहेर काढताना एक पत्रा त्याच्या हाताला लागून रक्त वाहत होते.शंकरने  आपला रुमाल काढून त्याच्या हातावर बांधला .ते पाहून तो पुन्हा हसला .
काही होणार नाही मी आहे असे जणू तो सांगतोय असा भास शंकरला झाला . हॉस्पिटलमध्ये जखमींना रक्त देण्यासाठी दिंडीतील सर्व वारकरी तयार होतेच . सर्व सोपस्कार पार पाडून संध्याकाळी उशिरा शंकर घरी निघाला तेव्हा  वारकरी  हात जोडून पुढे निघून गेले .
" किती उशीर ? तुम्हाला सांगितले होते लवकर घरी या .कधी ऐकलं तर शपथ " बायको चिडून म्हणाली .
काही न बोलता शंकरने कपडे बदलले आणि बायकोसोबत विठ्ठलाच्या देवळात शिरला.  त्याचवेळी एक वारकरी त्याच्या हातात पाकीट देऊन गेला . त्याने पाकीट उघडले त्यात वारकऱ्यांची बस तिकीट्स आणि पैसे होते .
आश्चर्यचकित होत , डोळे मिटून तो विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभा राहिला. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तो कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला  दिसला.  दचकून त्याने डोळे उघडले तेव्हा विठ्ठलाच्या हातावर त्याचाच  रुमाल बांधलेला दिसला आणि चेहऱ्यावर तेच आश्वासक हसू विलसत होते.
© श्री .किरण कृष्णा बोरकर