Wednesday, December 24, 2025

Nobody 2

Nobody 2
नोबडी 2
ज्यांनी नोबडी पाहिलाय त्यांना हच मॅनसेल कोण आहे हे माहीतच असेल.आता तर त्याच्या घरच्यांनाही कळलंय .पण अजूनही त्यांचे आयुष्य निरसच आहे.हचला अधूनमधून  त्याची कामे मिळतच असतात .त्याच्यावर खूप मोठे कर्ज असल्यामुळे तो ही कामे करतोय.तो मुळातच कुशल आणि प्रशिक्षित मारेकरी आहे. 
आता त्याला कुटुंबाला घेऊन पिकनिकला जायचे आहे.यामुळे आपल्या कुटुंबाशी दुरावत चालले संबंध परत जुळतील अशी आशा आहे. तो बॉसशी भांडून सुट्टी घेतो आणि कुटुंबाला घेऊन प्लमरवीला येथील विस्कॉसीन पार्कमध्ये जातो.
पण नेहमीप्रमाणे तिथेही त्याचे एका व्यक्तीशी भांडण होते आणि ती व्यक्ती तेथील डॉन असते. हच नंतर त्यांची माफी मागायला जातो पण आता ते प्रकरण फारच पुढे गेलंय. 
पहिल्या भागाप्रमाणे आताही हच त्या डॉनचे पैसे आणि ड्रग जाळून टाकतो तेव्हा त्या मालाची मालकीण आणि संपूर्ण शहरावर राज्य करणारी लेंडीना आपल्या साथीदारांसह हच आणि त्याच्या कुटुंबियांच्या मागे लागते.
पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भाग ही हाणामारीने आणि भरपूर रक्तपाताने भरलेला आहे. पण हा चित्रपट पाहताना मजा येते ,त्यासाठी पहिला भाग पाहावा लागेल .
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Thursday, December 18, 2025

The Price Of Confession

The Price Of Confession
आहान यून सून आपल्या पतीसोबत सुखाने संसार करत होती. दोघेही आर्ट शिक्षक होते.पण एके दिवशी तिच्या नवऱ्याचा खून झाला आणि आरोपी म्हणून तिलाच अटक केली .तिला कोर्टात कबुलीजबाब द्यावा लागला आणि  तिची रवानगी तुरुंगात झाली.
मो युन आपल्याच टीचर पतिपत्नीची विष देऊन हत्या करते आणि शांतपणे पोलिसांच्या स्वाधीन होते.तिची आणि युन सूनची काळकोठडी बाजूबाजूलाच असते . युन सून समोर  मो युन एक प्रस्ताव ठेवते.तिच्या पतीच्या हत्येची जबाबदारी मी घेईन त्याबदल्यात तुरुंगातून सुटल्यावर युन सूनने आपले एक काम करावे.
युन सूनचा होकार येताच मो युन योजना बनवून कोर्टात आपण युन सूनच्या पतीची हत्या केल्याचे कबूल करते आणि पुराव्यानुसार कबुलीजबाब ही देते.
युन सून तुरुंगातून जामीनावर बाहेर येते.पण पोलिसांनी तिच्या पायात जीपीएस ट्रॅकर बांधला आहे . 
आता तिला मो युनने सांगितलेले काम पूर्ण करायचे आहे .ते काम नाही केले तर कोर्टात मो युन कबुलीजबाब फिरवेल आणि युन सूनला पुन्हा तुरुंगात जावे लागेल.
बारा भागाची ही सिरीज आपल्याला एका बैठकीत संपवावीशी वाटेल इतकी थरारक आणि श्वास रोखून ठेवणारी आहे.
ही सिरीज अतिशय शांत आहे.यात हिंसाचार अजिबात नाही .पण पुढे काय घडणार याची उत्सुकता ताणून धरते.
नेटफ्लिक्स ही कोरियन सिरीज हिंदीत आहे.

Monday, December 15, 2025

शोध दहशतवादाचा


शोध दहशतवादाचा ..पुरुषोत्तम महाले
संपादन ..डॉ. अभिजित महाले
अक्षर प्रकाशन
11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील ट्वीन टॉवर अलकायदा आत्मघातकी पथकाने विमानाच्या साहाय्याने जमीनदोस्त केले आणि बलाढ्य अशा अमेरिकेलाही आपण हादरा देऊ शकतो हे दाखवून दिले. ह्या पुस्तकाची सुरवात ट्वीन टॉवरवर विमाने आदळली त्यापासून सुरू होते आणि 14 मार्च 2012 ला ओसामा बीन लादेनचा खतमा झाला तिथे संपते.
हल्ला झाला तेव्हा अमेरिकेच्या गुप्तचर विभागात आणि सरकार दरबारी कशा हालचाली सुरू झाल्या . ते कसे गोंधळून गेले.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश त्यावेळी फ्लोरिडा येथे होते आणि त्यांना एका सुरक्षित ठिकाणी हलविले गेले. त्यामुळे त्यांची जनतेतील प्रतिमा डागाळली गेली.
यात फक्त 9/11 चा हल्ला हाच विषय आहे. डिक क्लार्क यांनी सीआयए, एनएससी, एफबीआय आणि सर्व महत्वाच्या विभागांना  काहीतरी भयंकर घडणार आहे असे आधीच सांगून सावध केले होते पण कोणीही त्यांचे ऐकले नाही.बुश यांची भेटही होत नव्हती.ओसामा बीन लादेन आणि अलकायदा यांच्यापासून अमेरिकेला सर्वात मोठा धोका आहे असेही त्यांनी सांगितले होते पण काहीजणांना अलकायदाविषयी माहितीच नव्हती . 
बुश याना सर्व खापर इराकवर फोडायचे होते. त्यांच्यासाठी इराक हाच मोठा शत्रू होता .
9/11/2001 ते 14 /3/2012 या कालावधीत काय घडले ते वाचायचे असेल तर हे पुस्तक वाचायलाच लागेल.

Wednesday, December 10, 2025

स्टिफन

Stephen
स्टिफन
स्टिफनने  नऊ तरुणींचे खून केले .शेवटी पोलिसांना खुनी कोण हे कळले आणि त्यांनी सापळा रचला .पण स्टिफन स्वतःहून पोलिसांना शरण आला.
संपूर्ण जनमत स्टिफन विरुद्ध होते .पोलिसांनी स्टिफनला कोर्टात उभे केले.स्टिफनने वकिलाला नकार दिला.न्यायाधीशांनी स्टिफनची मानसिक स्थिती चेक करण्याची ऑर्डर दिली.
सीमा मानसोपचारतज्ञ आहे.स्टिफनच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी तिची नेमणूक झालीय.स्टिफन तिला संपूर्ण सहकार्य करतोय. पण काहीतरी गडबड आहे असेच तिला वाटतेय.
मायकल या तपासाचा मुख्य पोलीस अधिकारी आहे.त्यालाही वाटतेय काहीतरी चुकतेय.स्टिफन स्वतःहून शरण आलाय आणि तो पोलिसांना ,डॉक्टरला सहकार्य करतोय हे त्यालाही खटकतय.
सीमा आणि मायकल एकत्र येऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवितात. तपासाअंती स्टिफन मनोरुग्ण आहे असे सीमा कोर्टात सांगते .
पण सत्य काही वेगळेच आहे.
काय आहे स्टिफनचे सत्य ? त्याने नक्की किती आणि कोणाचे खून केलेत ? त्यामागे नक्की हेतू काय आहे ?
कदाचित दुसऱ्या भागात आपल्याला संपूर्ण सत्य कळेल .पण आता जे आपल्याला कळले ते हादरविणारे आहे .
गोमटी शंकर स्टिफनच्या प्रमुख भूमिकेत आहे.
उत्कंठा वाढविणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Monday, December 8, 2025

dies irae

DIES IRAE
डायस इराई
रोहन एक आर्किटेक्ट .त्याची स्वतःची फर्म आहे.आलिशान बंगल्यात एकटाच राहतो. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत खेळतो ,पार्टी करतो .एक छान आयुष्य जगतोय.
कनी भरतनाट्यम डान्सर .ती रोहनची क्लासमेट होती.काहीकाळ रोहनच्या प्रेमात होती.रोहनच्या आयुष्यात काही तरुणी आल्या त्यातील ती एक . अचानक तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.तिच्या आत्महत्येचे कारण माहीत नाही.
रोहनला ही गोष्ट कळली आणि तो मित्राला सोबत घेऊन तिच्या घरी गेला.तिच्या भावाला किरणला भेटला.किरण अस्वस्थ वाटत होता. 
रोहन घरी आला पण आपल्या घरात कोणीतरी आहे असा त्याला भास होऊ लागला.आपल्या मनातून कनी जात नाही म्हणून असे भास होत असतील असे तो समजून चालत होता पण ते भास वाढू लागले .त्याच्यावर कोणतरी हल्ला करतोय असे वाटू लागले .
नाईलाजाने त्याने कनीचे शेजारी मधूला जाऊन भेटला .सोळा दिवस आत्मा पृथ्वीवर फिरत असतो कदाचित त्याचा त्रास होत असेल असे मधू सांगतो .
तरीही रोहनचे भास कमी होत नाहीत.आता तर त्याच्यासमोर किरणवर जीवघेणा हल्ला होतो .हल्ला करणारा रोहनला दिसत नाही. पण या हल्ल्यामागे कनी नक्की नाही याची खात्री रोहन आणि मधूला पटते.ते कनीच्या आत्महत्येची कारणे शोधायचा प्रयत्न करतात आणि एका भयानक सत्य त्यांच्यासमोर येते.
सुपरस्टार मोहनलालचा मुलगा प्रणव मोहनलाल यात रोहनच्या प्रमुख भूमिकेत आहे.अतिशय संयमित अभिनय केला आहे. संपूर्ण चित्रपटात त्याचाच वावर आहे आणि आपणही त्याच्यासोबत असतो.
थ्रिलर आणि हॉरर प्रकारातील हा चित्रपट आपला श्वास रोखून धरायला लावतो. चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, November 29, 2025

आर्यन

Aaryan
आर्यन
त्या प्रसिद्ध चॅनेलवर  लाईव्ह मुलाखत द्यायला एक मंत्री अचानक नकार देतो आणि ऐनवेळी वादग्रस्त चित्रपट नायक मुलाखतीला येतो. नयना त्याला अडचणीत आणणारे प्रश्न विचारते पण त्यापेक्षा जास्त प्रश्न प्रेक्षकांमधून येतात.प्रश्न विचारणारा एक मध्यमवयीन पांढरी दाढीवाला मनुष्य स्टेजवर हातात बंदूक घेऊन प्रवेश करतो.
तो स्वतःचे नाव अझगर सांगत एक लेखक असल्याची ओळख करून देतो .त्याची पुस्तके समाजाने नाकारली आहेत असे त्याचे म्हणणे.पण यापुढे उद्यापासून पाच दिवस रोज एक व्यक्ती मृत्यू पावेल असे सांगून स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या करतो.
आरोपीच मेलाय असे समजून पोलीस गाफील होतात. कोण मृत्यू पावणार याची नावे ही जाहीर झालेली नसतात.पण दुसऱ्या दिवशी सर्व टीव्ही चॅनेलवर  सिरीयल चालू असताना त्याचा व्हिडिओ झळकतो .यापुढील एका तासात अशोकचा  मृत्यू होईल असे सांगतो.बरोबर आठ वाजता एक अधू असलेला सिक्युरिटी गार्ड टेलिफोन बूथमधून फोन लावतो आणि बॉम्बस्फोटात मरण पावतो. त्याचे नाव अशोक असते.
डीसीपी नांबीला या प्रकरणाचा तपास करण्याची ऑर्डर मिळते. त्याचा तपास चालू असताना दुसऱ्या दिवशी रजिया नावाच्या स्त्रीचा मृत्यू होईल असा व्हिडिओ अझगर सगळ्यांना पाठवतो .एका भरतनाट्यम नृत्याच्या कार्यक्रमात मुख्य नर्तिका अचानक कोसळते .तिचे नाव रजिया असून तिच्यावर विषप्रयोग झालेला असतो.
डीसीपी नांबीच्या पुढे हे प्रकरण सोडवायचे मोठे आव्हान आहे .पाच मृत्यूपैकी दोन झाले आहेत आता कमीतकमी एकाला तरी वाचवायचे असा निश्चय तो करतो .
या प्रकरणाचा तपास करताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात.समाजाचा एक दुर्लक्षित भाग ही समोर येतो .
नम्बी किती जणांना वाचवेल. तो या खुनामागची कारणे शोधून काढेल का ? अझगरच्या अप्रकाशित आर्यन पुस्तकात नक्की काय आहे ?
शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा आणि अनपेक्षित धक्का देणारा हा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे. ज्यांना रहस्य ,मर्डर मिष्ट्री आवडते त्यांनी नक्की पहावा .
विष्णू विशाल नम्बी ,तर सेलवाराघवन अझगरच्या भूमिकेत आहेत.

Friday, November 21, 2025

dilhi crime 3

Delhi Crime 3
दिल्ली क्राईम 3
वर्तिका चतुर्वेदीची ट्रान्स्फर आसामला होते.कदाचित मागच्या केसचा हा परिणाम आहे. तिला एका आर्म ट्रान्सपोर्टची टीप मिळते. पण त्यात शस्त्रे नसून तरुण मुली असतात. हा ट्रक दिल्लीला जात होता.वर्तिका या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरविते. त्यासाठी ती वरिष्ठ अधिकाऱ्यानाही नाराज करते.
दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलच्या दारात एक तरुणी दोन वर्षांच्या मुलीला जखमी अवस्थेत सोडून जाते. ती केस एसीपी नीती सिहकडे आलीय.
अधिक तपास करताना दिल्लीत आणि हरयाणात मोठ्या प्रमाणात महिलांना विकले जातेय असे उघडकीस येते. 
दिल्ली सरकार टास्क फोर्स बनवते.यात पुन्हा वर्तिका चतुर्वेदी ,इन्स्पेक्टर भूपींदरसिंह, नीती सिंह आणि इतर अधिकारी एकत्र येतात आणि एका मोठ्या करस्थानाचा तपास सुरू होतो.
सिजन एक आणि दोन प्रमाणेच हा तिसरा सिजन थरारक आणि उत्कंठावर्धक आहे.यात हुमा कुरेशी मुख्य खलनायिका आहे. तर शेफाली शाह ,राजेश तेलंग, रसिका दुगल आपल्या नेहमीच्या भूमिकेत रंग आणतात.
सहा भागात असणारी ही सिरीज एका बैठकीत बघण्यासारखी आहे.

Thursday, November 20, 2025

ऑपरेशन ब्लू स्टार

ऑपरेशन ब्लू स्टार जसं घडलं तस
ले. जन. के. एस. ब्रार
अनुवाद ..भगवान दातार 
रोहन प्रकाशन 
पाने १५२
किंमत 195 रु
ऑपरेशन ब्लू स्टार ही जगातील सर्वात वादग्रस्त आणि दुर्दैवी लष्करी कारवाई होती असे म्हटले जाते.पण खरोखरच ही कारवाई आवश्यक होती का याचे उत्तर होय असेच आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ही कारवाई रोखण्याचे प्रयत्न केले.चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या .पण संत भिद्रनवाले आणि लोंगोवाल गटात दोन मतप्रवाह होते.
अखेरच्या क्षणी ले. जन. के. एस. ब्रार याना मीरतवरून दिल्लीला बोलावण्यात आले तेव्हा ते मनिलाला जाण्याची तयारी करत होते.
ब्रार स्वतः शीख होते. कारवाईची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.सुवर्णमंदिरात पाचशेशीख अतिरेकी असावेत असा अंदाज होता.त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. लष्करातून निवृत्त झालेले मेजर जनरल शाबेग सिंग संत भिद्रनवालेचा उजवा हात होता.त्याला प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव असल्यामुळे आतून योग्य मोर्चा बांधणी केली होती.तर भारतीय लष्कराच्या मर्यादा तोकड्या होत्या. तुमच्यावर गोळ्या झाडल्या तरी चालेल पण हरमंदिर साहेब च्या दिशेने एकही गोळी झाडायची नाही असा भारतीय लष्कराला थेट आदेश होत्या . त्यामुळे प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी होत असताना आपल्या जवानांनी जो संयम दाखवला तो कौतुकास्पद आहे.
प्रत्यक्ष कारवाईला सुरवात झाली त्यानंतर भारतीय सैन्याचे सगळे अंदाज आणि प्लॅनिंग चुकत गेले.अतिरेक्यांकडे रॉकेट लॉन्चर होते तसेच ते मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक शस्त्रे घेऊन बसले होते.
दोन दिवस चालेल असा अंदाज असणारी कारवाई प्रत्यक्षात चार ते पाच दिवस चालली.लेखक स्वतः या कारवाईचे प्रमुख असल्यामुळे त्यानी अत्यंत अचूक आणि तटस्थपणे या कारवाईचे वर्णन केले आहे.
हे पुस्तक भारतीयांच्या मनातील सगळे गैरसमज दूर करते.
 हे थरारक पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे.

Wednesday, November 12, 2025

बारामुल्ला

Baramulla
बारामुल्ला
काश्मीर अजूनही अशांतच आहे. त्यात बारामुल्ला गाव जास्तच संवेदनशील गाव.या गावातच काही लहान मुले अचानक गायब होऊ लागली.एक मुलगा तर जादूगाराच्या पेटीत शिरला आणि तिथून बाहेर पडलाच नाही .स्वतः जादूगार ही हैराण आहे तो गेला कुठे म्हणून .तर दुसरा होडीतून गायब झालाय .
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल ऑफिसर रिदवान सय्यदची नेमणूक झालीय. सध्या रिदवान आपली बायको ,मुलगी ,आणि मुलगा याना घेऊन एका मोठ्या हवेलीत राहतोय. तो या प्रकरणात पूर्ण गुंतून गेलाय त्यामुळे घरी त्याचे फार लक्ष नाही.
त्याचा सहा वर्षाचा मुलगा अयानला हवेलीतील बंद खोलीचे आकर्षण आहे.त्या खोलीतून वेगवेगळे आवाज येतायत .कधी लहान मुलाच्या खेळण्याचे तर कधी रडण्याचे .मोठी मुलगी नुरीला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो तर कधी घाणेरडा वास येतोय.
एक दिवस नुरीही अचानक गायब होते .ती हवेलीतच आहे असे रिदवानची पत्नी जीव तोडून सांगतेय पण तो लक्ष देत नाही. तपास करताना त्याच्या हाती खालिद लागतो आणि एका रहस्याचा उलगडा होतो .
एक सुपरनॅचरल , थ्रिलर , काश्मीरची परिस्थिती थोडक्यात मांडणारा ,थोडा भीतीदायक  असा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .एकदा पाहायला हरकत नाही.

Tuesday, November 11, 2025

The Clibers

The Climbers
द क्लिंबर्स
एव्हरेस्टवर चढाई करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न आहे. जगातील सर्वात मोठ्या शिखरावर पोचून आपल्या देशाचे नाव उंचावणे ही इच्छा प्रत्येकाची असते.आजही अत्यानुधिक उपकरणांच्या काळातही एव्हरेस्टवर पोचणे सर्वात खडतर आणि कठीण समजले जाते. तर मग 1960 साली काय परिस्थिती असेल ?
चीनच्या गिर्यारोहकांची एक तुकडी एव्हरेस्ट शिखराच्या दिशेने चालू लागली . जसजसे शिखर जवळ येत होते तसतसे वातावरण बदलू लागले .अचानक निसर्गाचे रूप बदलले एक जीवघेणे वादळ त्यांच्या दिशेने येऊ लागले. या वादळात ग्रुप कॅप्टन मरण पावला तर फोटोग्राफरला वाचवताना कॅमेरा खोल दरीत पडला. शेवटी फॅन ऊझु ,फोटोग्राफर  क्यू सोंगीन आणि एक सहकारी एव्हरेस्टवर पोचले. पण दुर्दैवाने त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता.आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक संघटनेने चीनचा दावा फेटाळला आणि त्यांची नाचक्की झाली.
1971 साली पुन्हा एकदा चीनने नवीन तुकडी एव्हरेस्टवर पाठविण्याचा निर्णय घेतला. आता फांग ऊझो एका बॉयलर हाऊसमध्ये काम करतोय  .त्याला पुन्हा टीम लीडरची जबाबदारी देण्यात आलीय.चीन सरकारचा या मोहिमेला पूर्ण पाठिंबा आहे.
यावेळी फांग ऊझु आणि त्याची टीम एव्हरेस्टवर पोचतील का ?
एक श्वास रोखून ठेवणारा अनुभव घ्यायचा असेल तर प्राईम व्हिडिओवर नक्की पहा.
एव्हरेस्टवर चढाईचे  ,मध्येच येणारे जीवघेणे वादळ ,त्याला सामोरी जाणारी गिर्यारोहकांची टीम, याचे अप्रतिम  चित्रीकरण यात आहे.
ज्यांना थ्रिलर चित्रपट आवडत असेल त्यांनी हा चित्रपट नक्की पहावा.
चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.

Sunday, November 2, 2025

इडली कढई

Idli kadai
इडली कढई
त्या छोट्या गावात शिवनेसनचे छोटे इडलीचे दुकान होते.तो आणि त्याची पत्नी पहाटे तीनला उठून इडलीची तयारी करायचे आणि दुकानात जायचे. कधी कधी शाळेला सुट्टी असली की छोटा मुरुगनही त्याच्या सोबत जायचा. शिवनेसन आपल्या कामात प्रामाणिक होता.इडलीच्या क्वालिटीत तो कोणतीही तडजोड करत नव्हता म्हणूनच गावात त्याला मान आणि इडलीची चर्चा होती.
मुरुगन मोठा झाला तेव्हा त्याने वडिलांचा व्यवसाय वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण शिवनेसनने त्याचे काहीही ऐकले नाही.शेवटी कंटाळून मुरूगन बँकॉकला गेला आणि त्याचे आईवडील त्या गावातच इडलीचे दुकान चालवत राहिले.
आज मुरुगन एका मोठ्या फूड कंपनीत कामाला आहे .त्या कंपनीचा मालक विष्णूवर्धनच्या मुलीशी मीराशी त्याचे लग्न ठरले आहे. पण मीराचा भाऊ अश्विन त्याचा द्वेष करतोय.
साखरपुड्याच्या दिवशीच शिवनेसनच्या मृत्यूची बातमी येते आणि मुरुगन  अंत्यसंस्कारासाठी गावी  येतो.आपल्या मृत्यूनंतर हे दुकान कोणालाही न विकता ते मुरुगनने चालवावे अशी त्यांची इच्छा होते .तर बँकॉकला त्याच्या लग्नासाठी जगभरातून मोठी लोक येणार आहेत त्यामुळे लग्न पुढे ढकलू नये अशी विष्णुवर्धनची इच्छा आहे. पण काही दिवसात मुरुगनची आई ही मरण पावते.
गावातील  दुकानदार मरीयास्वामीला ते इडलीचे दुकान हवे आहे .त्यासाठी तो दुप्पट किंमत द्यायला तयार आहे . मुरुगनची बालपणाची मैत्रीण कायल त्याच्या आईवडिलांचा सांभाळ करत होती . ह्या दुकानाचा वारसा मुरुगनने चालू ठेवावा अशी तिचीही इच्छा आहे.
शेवटी अखेरच्या क्षणी मुरुगन दुकानाच्या विक्रीचा व्यवहार मोडतो आणि स्वतः दुकान चालविण्याचे ठरवतो .त्यासाठी तो मिराशी लग्न मोडतो.
हे ऐकून अश्विन चिडतो आणि स्वतः गावात दाखल होतो.
पुढे काय होणार. ते बघण्यासारखे आहे.
अतिशय सुंदर आणि आणि काळजाचा ठाव घेणारा हा चित्रपट आपल्याला भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवतो. हळूहळू गावाच्या मातीशी आणि माणसांशी जुळत जाणारे मुरुगनचे नाते आणि अश्विन ,विष्णूवर्धनला समजावणे हे बघण्यासारखे आहे.
खरे तर यात कोणीही खलनायक नाही .जो तो आपल्या बाजूने योग्य आहे आणि स्वतःची प्रतिष्ठा सांभाळायचा प्रयत्न करतायत .
 मुरुगनसाठीच धनुष बनलेला आहे.अतिशय शांत ,संयमी भूमिका त्याने केलीय.कायल बनून नित्या मेननने त्याला योग्य साथ दिलीय. बाकी सत्यराज ,शालिनी पांडे, अरुण विजय आपल्या जागी योग्य आहे.
संपूर्ण कुटुंबाने सोबत बसून पहावा असा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, October 29, 2025

bhadrakaali

भद्रकाली
Bhadrakaali
अभ्यंकर श्रीनिवास राजकारणाततील किंग समजला जातो. त्याला पाठीमागून सर्व सूत्रे हलवायला आवडतात.पण त्याचीही काळी बाजू आहेच.
किट्टू त्याच्याकडे लहानपणापासून कामाला होता.घरातील छोटी मोठी कामे करत मोठा झाला .तो अनाथ आहे .त्याच्या आईने आत्महत्या केली होती अशी पोलीस दप्तरी नोंद आहे.
आता किट्टू मोठा होऊन एक एजंट झालाय. जी कामे कोणी करू शकत नाही अशी कामे तो करतो.यात त्याला भरपूर कमिशन मिळते. तो कोणत्याही ऑफिसरची बदली त्यांना पाहिजे त्या ठिकाणी करू शकतो.करोडो रुपयांचे जमिनीचे व्यवहार करतो.कॉलेजमध्ये ऍडमिशन करतो.
केंद्रीय मंत्री लताचा भाऊ मूर्ती किट्टूला जपानचा प्रोजेक्ट होणारी तीनशे एकर जमीन स्वतःच्या नावावर करण्याचे काम देतो . त्याबदल्यात तो दोनशे कोटी  कमिशन देण्याचे वचन देतो.
किट्टू एक मोठी योजना बनवतो आणि जमीन मूर्तीच्या नावावर होते.पण ह्यामागे काहीतरी घडलंय असा संशय लताला येतो आणि ती अभ्यंकरला सांगते.
अभ्यंकर या घटनेची चौकशी करतो आणि किट्टूचे नाव समोर येतो.आपला नोकर यामागे आहे हे समजताच अभ्यंकर हादरतो आणि तो हात धुवून किट्टूच्या मागे लागतो. अधिक तपास करताना जवळजवळ सहा हजार कोटींचा घोटाळा किट्टूने केलाय असे निष्पन्न होते .
किट्टू आणि त्याच्या साथीदारांना अटक होते प्रचंड मारहाण होते त्याच्यावर दीडशेपेक्षा जास्त केसेस केल्या जातात. शेवटी नाईलाजाने किट्टू त्यांना पैसे कुठे दडवले आहे ते सांगून स्वतःची आणि साथीदारांची जामीनावर सुटका करून घेतो. त्याची पत्नीही आता गरोदर आहे त्याला तिचीही काळजी आहे.
किट्टूला रोज वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागते .त्याचा पूर्ण दिवस त्यातच निघून जातोय. त्याच्यावर पोलिसांची ,अभ्यंकरच्या गुंडांची नजर आहे .आता त्याला काहीच करता येत नाही.
पण आता योग्य वेळ आलीय किट्टूला स्वतःची खेळी करायची .त्याने याची तयारी फार पूर्वीपासूनच केलीय.
किट्टू या सर्वांना कसे उघडे पाडतो हे बघण्यात वेगळीच मजा आहे.
हा एक बुद्धिबळाचा खेळ आहे यात कधी किट्टू माघार घेतो तर कधी अभ्यंकर .पण ते पुन्हा एकमेकांवर बाजी पलटविण्याचा प्रयत्न करतात.यात विजय कोणाचा  आणि कसा होतो हे बघण्यासारखे आहे.
यात हाणामारी ,रक्तपात नाही फक्त चातुर्य आहे ,योजना आहेत ,पैश्याचा खेळ आहे ,राजकारणातील डावपेच आहे.
विजय अँटनी किट्टूच्या प्रमुख भूमिकेत आहे. विजय अँटनीचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे आणि त्याच्या भूमिकाही वेगळ्याच प्रकारच्या असतात .
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.ज्यांना हाणामारी नको पण थ्रिलर आवडत असेल त्यांनी नक्कीच पहावा., 

Tuesday, October 28, 2025

Thanal

Thanal
टनल 
7 जुलैला काही बॅंक लुटणाऱ्या तरुणांचे पोलिसांकडून एन्काऊंटर होते. पोलीस ऑफिसर रामकृष्णन त्या पाचही चोरांना गोळ्या घालून ठार मारतो .पण पुढच्याच वर्षी 7 जुलैला रामकृष्णन आणि काही पोलीस मारले जातात.
आज 7 जुलै आहे. अकिलन रंगनाथन आणि काही काही तरुण कॉन्स्टेबल पदावर जॉईन होण्यासाठी  कुमार नगर पोलीस स्टेशनला  आलेत.
अकिलनच्या आईचे ऑपरेशन आहे आणि त्यासाठी लागणारे पैसे त्यांनी बँक लॉकरमध्ये ठेवले आहेत.जॉइनिंग लेटर हातात पडल्यावर बँकेत जाऊन पैसे काढतो असा निरोप तो वडिलांना देतो .पण सिनियर पोलीस ऑफिसर अजून आलेले नाही म्हणून सर्वांना बाहेर थांबवून ठेवण्यात येते आणि थोड्या वेळाने त्यांना विभागात गस्त घालण्यासाठी पाठविले जाते.
ते जिथे गस्त घालतात तिथे झोपडपट्टी आहे .अचानक एक व्यक्ती जमिनीखालच्या गटारातून बाहेर येते आणि त्यांना त्यांना पाहून त्या झोपडपट्टीत शिरते.सर्वजण त्याच्यामागे त्या झोपडपट्टीत शिरतात .आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या झोपडपट्टीत मनुष्यवस्ती दिसत नाही .  झोपडपट्टीच्या मध्यभागी काही कामगार चर्चा करीत असतात त्यांना हटकताच ते  सर्व कॉन्स्टेबलवर  हल्ला करतात आता जीव वाचवायची पाळी पोलिसांवरच येते.
त्या झोपडपट्टीच्या गल्लीबोळातून अकिलन आणि इतर कॉन्स्टेबल पळत राहतात .स्वतःचा जीव वाचवताना अकिलनला भुयारी मार्गाचा नकाशा सापडतो आणि त्यांचे जॉइनिंग लेटरही तिथेच सापडतात.
नकाशात असलेला भुयारी मार्ग त्या भागातील सर्व बँकांच्या खालून जात असतो.त्या विभागातील सर्व बँक एका रात्रीच लुटण्याचा प्लॅन आहे हे अकिलनला  समजते .आणि त्याची प्रेयसीचेही या गुंडांनी अपहरण केले आहे असे समजते.
आपल्या आईच्या ऑपरेशनसाठी जमा केलेले पैसेही लुटले जाणार या विचाराने अकिलन हादरतो. आपले जॉइनिंग लेटरही इथे कसे ? आणि आपल्या प्रेयसीला का आणले आहे हेही त्याच्या लक्षात येत नाही .
कोण आहेत हे बँक लुटणारे गुंड ?अकिलन आणि त्यांचा काय संबंध ? अकिलन त्यांचा डाव उधळून लावेल का ? 
एक चक्रावून टाकणारी एका रात्रीत घडणारी आणि आपला श्वास रोखून ठेवणारी कथा .
चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.

Sunday, October 26, 2025

द स्पाय

The Spy
द स्पाय
मोसादचा गुप्तहेर एली कोहेनच्या जीवनावर आधारित ही सिरीज आपल्याला गुप्तहेरच्या जीवनात घेऊन जाते.
देशभक्त एली कोहेन आपल्या बायकोला आणि कुटुंबियांना सोडून सीरियामध्ये गुप्तहेर म्हणून दाखल होतो.त्याआधी त्याने सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेतले असते. हळूहळू तो सीरियाच्या राजकीय वरिष्ठ वर्तुळात प्रवेश करतो.तो इतका पुढे जातो की सिरियाचे राष्ट्राध्यक्ष त्याला संरक्षण मंत्री करायचे ठरवितात .पण शेवटी एक साधी चूक आणि अति आत्मविश्वास त्याला नडतो.
त्याने इस्त्रायलला अतिशय महत्त्वाची माहिती पुरवली आणि त्याचा भरपूर फायदा इस्त्रायल सिरियाचे सहा दिवसाचे युद्ध झाले त्यात झाला.
ही सिरीज अतिशय उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारी आहे. एका गुप्तहेराचे जीवन अतिशय जवळून दाखविले आहे.शत्रूच्या गोटात शिरून योग्य माहिती मिळवणे किती धोकादायक आणि धाडसाचे असते हे ह्या सिरीजमध्ये दाखविले आहे.
नेटफ्लिक्सवर ही सिरीज हिंदी भाषेत आहे.

Monday, October 13, 2025

केदारनाथ १७जून

केदारनाथ १७ जून
डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे
एलोरा पब्लिकेशन 
१७ जून २०१३ साली केदारनाथ येथे महापूर आला .ढगफुटी झाली .संपूर्ण गावे नष्ट झाली. वादळी पावसाने समोर येईल त्याला नष्ट करून टाकले.
हा जीवघेणा प्रवास आहे या महापुरात वाचलेल्या डॉ. सिद्धार्थ या मानसोपचारतज्ञाचा. त्याने जगण्यासाठी  केलेली धडपड पाहून अंगावर काटा येतो.
डॉ. सिद्धार्थ पुण्यातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ .लग्नानंतर बरीच वर्षे त्यांना मूल झाले नाही .शेवटी त्याच्या बायकोने मूल झाले तर तुला एकत्र भेटायला येऊ असा नवस केदारनाथला केला आणि त्यांना मुलगा झाला.
आज ते एकत्र केदारनाथला निघाले.डॉ. सिद्धार्थच्या मित्राने श्रेयसने त्यांची सर्व व्यवस्था केलीय.श्रेयस भारतीय सैन्यात अधिकारी असल्यामुळे सर्व व्यवस्था उत्तम आहे.श्रेयस ही त्याच्या पत्नीला आणि मुलाला घेऊन सिद्धार्थ सोबत आहे.श्रेयसचा मुलगा सहा वर्षाचा असून त्याला ऑटीझम आहे.
केदारनाथला रात्रभर पाऊस पडत होता .मंदाकिनी नदीला पूर आला आणि तिने रौद्र रूप धारण केले. त्यात सिद्धार्थ आणि श्रेयस राहत असलेले हॉटेल ही वाहून गेले.सिद्धार्थ आणि त्याची पत्नी आणि मुलगा एकमेकांच्या मिठीत राहिले आणि वाहून गेले.
जाग आली तेव्हा सिद्धार्थ एका चिखलात अडकून बसला होता.आजूबाजूला फक्त प्रेतच दिसत होती. अचानक सिद्धार्थला त्या चिखलात ओळखीचा चेहरा दिसला .तो श्रेयसच्या सहा वर्षाच्या मुलाचा होता.आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मुलगा जिवंत होता.
त्याला घेऊन डॉ सिद्धार्थचा स्वतः ला सुरक्षित ठेवण्याचा जीवघेणा प्रवास सुरु होतो.
डॉ. सिद्धार्थ त्या छोट्या मुलाला घेऊन सुरक्षित ठिकाणी जाईल का ? त्यांना वाचवायला कोण येईल का ??
हा प्रवास  अतिशय जिवाघेणा आणि अंगावर काटा आणणारा आहे. देवभूमी म्हणून ओळखले जाणारे सुंदर केदारनाथ आता फक्त चिखलमय झाले आहे .हजारो प्रेते तेथे कुजत पडली आहेत.दूरवर कुठेही माणूस दिसत नाही .पूर आलाय पण पाणी पिण्यायोग्य नाही.खायला अन्न नाही.अंग झाकायला कपडे नाहीत त्यात जिथे जखमा झाल्यात त्या सडू लागल्या आहेत. डॉ. सिद्धार्थपुढे परिस्थितीला शरण जाण्यावाचून पर्याय नाही .पण त्या मुलासाठी  त्याला जिवंत राहायचे आहे .
एक जिवाघेणा प्रवास अनुभवण्यासाठी केदारनाथ १७ जून नक्की वाचा.

Sunday, October 12, 2025

शोध प्राचीन हेरगिरीचा

शोध प्राचीन हेरगिरीचा
वरुण ते बहिर्जी.... रवी आमले
मनोविकास प्रकाशन 
भारतीय इतिहासात हेरगिरी विभाग महत्वाचा आहे.अगदी चाणक्यनीतीमध्ये गुप्तचर कसे असावे त्याचा वापर कसा करावा याचे वर्णन केले आहे.शिवरायांच्या कारकिर्दीत हेरगिरी प्रमुख खाते होते .गुप्तचर विभागाचा प्रमुख बहिर्जी नाईक हा छत्रपती शिवाजी महाराजांना डायरेक्ट रिपोर्ट करायचा . पण शिवरायांची हेरव्यवस्था कशी होती ?  त्यांचे गुप्तचर कसे होते ? गुप्तचर विभागाची व्याप्ती कशी होती ? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळतील.आणि ही उत्तरे शोधताना आपल्याला प्राचीन काळात जावे लागते .वरुण हा पुराण काळातील पहिला हेर समजला जातो.
रवी आमले यांचा गुप्तहेर विभागावर  प्रचंड अभ्यास आहे .त्यांचे रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा हे पुस्तक खूपच प्रसिद्ध आहे .
भारतीय गुप्तचर यंत्रणेचा प्राचीन इतिहास वाचायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा .

Sunday, September 21, 2025

Ice Road

Ice Road : Vengeance
आईस रोड : वेंगेअन्स
माईक एक उत्तम गिर्यारोहक .त्याचा लहान भाऊ सैनिक  आणि उत्तम  गिर्यारोहक होता. पण इराण युद्धात मारला गेला. आपल्या अस्थी माउंट एव्हरेस्टवर विसर्जित कराव्या हीच त्यांची अंतिम इच्छा होती.आपल्या भावाची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी माईक नेपाळला येतो.
रुद्र यश एक  स्थानिक गुंड. कोदारी गावात लोकांच्या जमिनी हडपून मोठे धरण  बांधायचे त्याची योजना आहे.पण जमीन गणेश रायच्या नावावर आहे. गणेश रायचा धरणाला विरोध आहे .
माईक लोकल गाईड धानीच्या मदतीने एव्हरेस्ट टूर ठरवितो .त्यासाठी तो किवी एक्सप्रेसच्या बसमध्ये बसतो . गणेश रायचा मुलगा विजय रायही बसमध्ये चढतो .पण रस्त्यात यशचे गुंड हल्ला करतात आणि त्याच्यासकट बस ताब्यात घेतात .
आता सुरू होतो एक अप्रतिम थरारपट .धानी गाईड होण्यापूर्वी सैन्यात होती.ती आणि माईक विजयला गुंडांच्या तावडीतून सोडवतात आणि चीन बॉर्डरच्या दिशेने निघतात. चीन बॉर्डर पार केल्यावर ते सुरक्षित होतील पण प्रवास  खडतर आणि धोकादायक आहे. त्यात मागावर गुंड आणि नेपाळ पोलीसही आहेत. बसही जुनी आहे .माईक आणि धानी विजयला घेऊन चीन बॉर्डर पार करतील का ?
लियाम निसन माईकच्या प्रमुख भूमिकेत आहे. एक जीवघेणा पाठलाग आणि अप्रतिम थरार पाहायचा असेल तर प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत असलेला हा चित्रपट चुकवू नका.

Monday, September 1, 2025

लोकमान्य

लोकमान्य
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेगवेगळ्या मंडपांत तो फिरत होता. त्याच्या वेशभूषेमुळे तो इतरांच्या नजरेत लगेच भरत होता.
टिपिकल पुणेरी वेश होता त्याचा . शुभ्र पांढरे धोतर, लांबलचक सदरा, खांद्यावर उपरणे, हातात काठी, आणि डोक्यावर पुणेरी पगडी. चेहरा लक्षात राहील असा; पण जास्त भीतीदायक होती ती त्यांची करडी नजर. जाड झुपकेदार मिशा, भव्य कपाळ . सर्व काही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देत होतं.
ते अस्वस्थपणे समोर दिसेल त्या गणपती मंडपात जात होते. गणेशाच्या मूर्तीकडे बारकाईने पाहत, कधी नाराजीने काठी आपटत ते ताडताड निघून जात. त्यांच्या देहबोलीतली अस्वस्थता पाहून मंडपातील मखरात बसलेला तोही गोंधळून जात होता.
आताही ते एका मंडपातून नाराजीने बाहेर पडत होते, इतक्यात समोरून एक तरुण आला.
 "सर, काय झालं? इतक्या रागावलेल्या चेहऱ्याने बाहेर का पडताय? काही प्रॉब्लेम आहे का?"
तो मंडप एका सुप्रसिद्ध मंडळाचा होता.
 "रागावू नको तर काय करू? आत शिरूच देत नाहीत कार्यकर्ते. म्हणतात, ‘लाइन लावा’. सगळे रांगेतूनच येतात म्हणे!" ते संतापाने म्हणाले.
 "बरोबर आहे ना. नियमच आहे तो. रांग न लावली तर गोंधळ उडेल. लाखो लोक येतात इथे दर्शनाला." तरुण हसत म्हणाला. हसताना त्याचा कोपऱ्यावरचा तुटका दात उठून दिसत होता.
 "म्हणजे तुलाही बाहेर काढलंय तर ! पण मग मंडपाच्या मागून जे थेट मूर्तीच्या पायाजवळ जातात, ते कोण ?" करडी नजर रोखून त्यांनी विचारलं.
तरुण थोडा चपापला.
"मी इथला कार्यकर्ता आहे. विनायक नाव माझं. ती लोक मोठी माणसं आहेत. त्यांना रांगेत उभं करायचं कसं? त्यांचा वेळ देशासाठी महत्त्वाचा आहे," तो हळू आवाजात म्हणाला.
 "त्यांच्या घरीही गणपती बसले असतील ना? मग इथे का येतात? पाहा त्या बिचाऱ्याला .तीन तास लहान मुलाला घेऊन रांगेत उभा आहे. आता दर्शनाला येईल तर पाच सेकंदही थांबू देणार नाहीत, हात धरून बाहेर काढतील." त्यांनी गर्दीकडे बोट दाखवलं.
 "मी करतो त्याच्यासाठी काहीतरी," असं म्हणून विनायक त्या दिशेने गेला.
 "अशा किती जणांची मदत करणार तू? कित्येक स्त्रियांना ढकलून बाजूला केलं जातं, त्यासाठी काही करणार का?" पुन्हा करडी नजर रोखून त्यांनी विचारलं.
विनायक गप्प बसला.
"यासाठीच का आम्ही घरातील गणपती बाहेर काढून सार्वजनिक केला ?" ते पुटपुटत पुढे निघाले. विनायकही मागून गेला.
 "आता कुठे येतोस मागेमागे?"
 "मलाही काही काम नाही. येतो तुमच्यासोबत, लोकमान्य."
ते चमकले.
 "तू ओळखलंस मला? अजूनही माझी ओळख आहे तर!" ते हलकेसे हसले.
 "तुम्हाला कोण विसरेल, लोकमान्य! हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय, ते तुमच्यामुळेच."
 "माझ्यामुळे? मी ज्या हेतूने सुरू केला तो हेतू आता कुठे दिसतोय? मी घरातून बाहेर काढला गणपती, जनजागृतीसाठी. रात्रभर व्याख्यानं, कथाकथन, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं गुणगान,  बालगंधर्वांची नाटकं…  बाबासाहेबांची व्याख्याने काय दिवस होते ते!" लोकमान्य आठवणीत रंगले.
"बरोबर आहे, पण आता गर्दी एवढी असते की असं काही करणं अवघड आहे. शिवाय सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांचं वेड आलंय. सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न आहे."
ते बोलता बोलता एका गल्लीत गेले. छोटा मंडप दिसला. शांतता होती. काही कार्यकर्ते कॅरम खेळत होते; काही झोपून मोबाईल पाहत होते. दर्शनाला कोणीच नव्हतं.
 "इथे तर विरुद्ध परिस्थिती आहे. उंदीर आरामात नैवेद्य खातोय; कुणाला पर्वा नाही! इथे कार्यक्रम करायला काय हरकत आहे? आपल्याच भागात किती होतकरू कलाकार आहेत. त्यांनाच सेलिब्रिटी बनवा! पण मनावर घ्यायला हवं ना." लोकमान्यांचा आवाज चढला.
 "जग बदलतंय, तसे उत्सवही बदलतील. पण सामाजिक कर्तव्यं विसरलेली नाहीत अजून. जमा होणारा पैसा लोककल्याणासाठी वापरला जातोय." विनायक समजावत म्हणाला.
 "खरं आहे. चला, पहाट होतेय. निघतो मी."
 "मला एखाद्या मंडपापर्यंत सोबत चला."
ते हसले.
एका मंडपाजवळ पोहोचल्यावर अचानक त्यांनी विचारलं 
 "तुला घरातून बाहेर काढून सार्वजनिक बनवलं, त्याचं दुःख नाही ना?"
विनायक थोडा चिडून म्हणाला —
 "कधी घराबाहेर काढलंत तुम्ही? तुम्ही खरंच स्वतःला लोकमान्य समजता का?"
ते पुन्हा हसले आणि वळून चालू लागले.
त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विनायकाने नम्रपणे नमस्कार केला.

मंडपात शिरल्यावर उंदीर बोलला  "आता काय, रात्रीची गस्त सुरू केलीत का? कंटाळा येतो म्हणून कोणासोबतही फिरायला जाता का ?"
तो चिडून म्हणाला  "तोंड सांभाळून बोल, मूषका. लोकमान्य होते ते. आज खरंच इथे येण्याचं सार्थक झालं."
 "पण म्हणून इतकं भ्यायचं का त्यांना? मान खाली घालून किती हळू आवाजात बोलत होता, निघताना पाया पडला. शेवटी मानवच आहेत ते."

तो गंभीर होत म्हणाला " काही माणसं कर्तृत्वानं देवापेक्षाही मोठी होतात. त्यांच्या नजरेला नजर दिली की आपोआपच मान झुकते. असं सहवास लाभणं हे भाग्यच. पण त्यांच्यापासून स्वतःला लपवू शकलो नाही, हे कायम लक्षात राहील."

© श्री.किरण कृष्णा बोरकर

Sunday, August 31, 2025

वधूवर सूचक मंडळ

वधुवर सूचक मंडळ
" ह्या वर्षी अमोलचे लग्न ठरले नाही तर पुढच्या वर्षीपासून तुला घरी आणणे बंद " हातातली घंटा जोरजोरात बडवत रघुवीर कदम कडाडले .
त्यांचा  आवाज ऐकून धुप आणि अगरबत्तीचा मंद सुवास अनुभवत असलेला तो खडबडून जागा झाला तर आता लवकरच  भक्तांच्या घरी जाण्यासाठी तोंडाला फेशियल पॅक आणि  डोळ्यावर काकडीचे काप ठेवून आराम करीत असलेला उंदीरही बेडवरून पडला. 
" आयला, हा कदम पूजा करतोय की धमकी देतोय ?" थोड्या चिंतीत आवाजात त्याने आपल्या उंदराला विचारले.
" घ्या, करा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण .मग हे असेच चढून बसतात आणि काहीही नवस मागतात .पण  तुम्हाला तर सवय झालीय तथास्तु म्हणायची ' तो शेपटी आपटत  काकडीचे काप तोंडात टाकीत छद्मीपणे म्हणाला.
" अरे माझे ठीक आहे पण तू का दचकलास ? "त्याने हसत विचारले.
" का म्हणजे ? आता पुढच्या वर्षी ह्याचे घर आपल्यासाठी बंद झाले तर नैवेद्याचे काय ? प्रमिला काकू किती हौसेने दर दिवशी वेगवेगळे नैवेद्य बनवितात .एकदम डायट वाले .म्हणून आपले वजन कंट्रोलमध्ये राहते." तो चिडून नवीन काकडीचे काप डोळ्यावर  ठेवीत म्हणाला. 
" हो हो पण ते पुढच्या वर्षी ना .अजून एक वर्ष आहे आपल्या हातात .करू काहीतरी " तो सोंड हलवीत बेफिकीरपणे म्हणाला.
" म्हणजे आता तुम्ही लग्नेही जुळवणार तर ? देवा काय हे .अजून काय काय करणार तुम्ही स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी.  अंत्यसंस्कार काय केले . पोस्टमार्टेम केले .रस्त्यावरचा ट्रॅफीकही कंट्रोल केलात. तुम्ही कितीही करा आपले भक्त सुधारणार नाहीत." असे बोलून त्याने शेपटी जोरात आपटली.
" कितीही झाले तरी ते आपलेच आहेत.आज वर्षानुवर्षे आपली त्याच भक्तिभावाने सेवा करतायत .भले पद्धती बदलल्या तरी मनातील श्रद्धा तीच आहे ." तो हसत म्हणाला .
अंबादास चाळीत कोपर्यावरच्या खोलीत नुकतेच एक ऑफिस उघडले होते. विनायक वधुवर सूचक मंडळ असे नाव दिले होते .पण विनायकाचा फोटो कुठेच दिसत नव्हता. दहा बाय दहाच्या खोलीत एक तरुण टेबल वर लॅपटॉप ठेवून काम करताना दिसायचा तर माळ्यावर उंदीर बिनधास्त फिरत होता.
रघुवीर कदम त्याच रस्त्याने ऑफिसला जायचे. दोन दिवस ते फक्त नजर टाकून जात होते पण आत शिरायची हिंमत होत नव्हती .शेवटी आज धीर करून आत शिरलेच.
समोरच्या खुर्चीत बसलेला तरुण त्यांच्याकडे पाहून ओळखीचे हसला जणू काही तो त्यांचीच वाट पाहत होता .
" मी रघुवीर कदम " ते हात जोडून म्हणाले .
" मी अथर्व " समोरच्या तरुणाने उत्तर दिले.
" तुमचे लग्न करायचे आहे का ?" अथर्वने असे बोलून लॅपटॉप उघडला .
" काहीही काय ? माझा मुलगा लग्नाचा आहे .वय वर्षे सत्तावीस .बँकेत आसिस्टंट मॅनेजर आहे ." रघुवीर कदम एका झटक्यात बोलले.
" अरे सॉरी , तुम्हाला इतका मोठा मुलगा आहे हे पटत नाही " अथर्व हसत म्हणाला तसे कदम मनातून सुखावले.
" कोणी आहे का बघण्यात एखादी चांगली मुलगी " त्यांनी  हळुवारपणे  विचारले.
" आहेत ना .पण चांगल्या मुलीची तुमच्या मते व्याख्या काय ? " अथर्व लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाला .
"चांगली म्हणजे  सासू सासर्याना सांभाळणारी , घरात सगळ्याचा आदर करणारी .नवऱ्याच्या संसारात हातभार लावणारी . पारंपरिक सण साजरे करणारी " कदम म्हणाले.
"म्हणजे तुम्हाला सून हवीय " अथर्व पुटपुटला.
" म्हणजे ? " कदम चिडून म्हणाले 
" आहो हल्ली बायको आणि सून असे दोन प्रकारे मुली पाहतात .बायको पाहिजे म्हणजे फक्त नवऱ्याकडे लक्ष देणारी आणि सून पाहिजे म्हणजे संपूर्ण कुटुंब सांभाळणारी . बायको फक्त नवऱ्यासोबत राहते .तिला स्वतःचे आणि नवऱ्याचे आई वडील नको .कोणाची जबाबदारी नको .आपले आणि नवऱ्याचे सुख पहायचे मजामस्ती करायची . ह्या मुली जास्त शिकलेल्या ,श्रीमंत  आणि आधुनिक परिवारातून आलेल्या असतात त्यांची नोकरी ही चांगली असते काहींचा व्यवसाय असतो . सून पाहिजे तर पदवी पर्यंत शिकलेल्या , मध्यम वर्गीय ,साधारण नोकरी करणाऱ्या ,घरात आर्थिक मदत करणाऱ्या , उपवास करणाऱ्या .नवऱ्याशी ऍडजस्ट करणाऱ्या  " अथर्व शांतपणे म्हणाला .
" हे असे असते होय हल्ली . आम्हाला आमचा मुलगा सुखी झालेला हवाय .त्यामुळे जी मिळेल ती चालेल .आम्हीच ऍडजस्ट करू " शेवटी रघुवीरमधील बाप जागा झालाच .
" ओके चला माहिती सांगा पटापट ." खिडकीत खुडबुड करणाऱ्या उंदरकडे हळूच पाहत अथर्वने लॅपटॉप जवळ ओढला.
आरती साने समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहत होती. बिल्डिंग कसली हो .साधारण तीस वर्षे जुनी तीन मजल्याची चाळच ती. तिचे वडील सरकारी खात्यात क्लार्क .ही कशीबशी ग्रॅज्युएट झाली आणि छोट्याश्या ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करते. दरवर्षी गणपती आले की घरगुती मखर बनवून विकायची . खोट्या गोष्टींचा तिला राग होता .तिच्या तिखट स्वभावामुळे कोण मुलगा लग्न  करत नाही अशी बापाची तक्रार . 
त्या दिवशी मखर बनवायचे सामान घरी घेऊन येत होती.भली मोठी सामानाची गोण घेऊन मैत्रिणीच्या मागे स्कुटरवर कशीबशी बसली आणि दोघी निघाल्या. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे रस्त्यावर बरीच गर्दी होती .संथ गतीने ट्रॅफीक पुढे सरकत होता .पाऊस आल्यामुळे रस्त्यावर ओलावा होता आणि अचानक स्कुटर घसरली . ती आणि तिची मैत्रीण दोघीही खाली कोसळल्या .आपल्या पेक्षा सामानाचे काय झाले याकडे आरतीने पाहिले लक्ष दिले आणि सामानाची अवस्था पाहून तिने खच्चून दोन शिव्या हासडल्या.  मैत्रिणीने शांतपणे एका दिशेने बोट दाखविले .एक म्हातारा स्कुटरचा धक्का लागून बाजूला बसला होता .इतके लागूनही त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसत नव्हती.
" ओ बाबा ,सरळ बघून चाला ना .किती नुकसान झाले बघा .आता याची भरपाई कोण करेल ? " आरतीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला .
" मी भरेन ना .फक्त समोरच्या बँकेत मला घेऊन चला .मी पैसे देतो " ते बाबा लागलीच म्हणाले.
" चला , आता तर आरती हट्टाला पेटली. भांडण न होता नुकसानभरपाई मिळतेय यात ती खुश होती. म्हाताऱ्याचा हात धरून बँकेत शिरली .
" त्यांचे केवायसी करावे लागेल."काउंटरवरची स्त्री चेहऱ्यावर सुरकुती न आणता म्हणाली.
म्हाताऱ्याने हताशपणे आरतीकडे पाहिले.
" माझ्या खात्यात माझेच पैसे आहेत. पण तरीही माझी ओळख मलाच पटवून द्यावी लागते." म्हातारा हसत म्हणाला. "गावी जायचे आहे म्हणून पैसे काढायला आलो तर ही परिस्थिती."
" तुमचे मोठे साहेब कुठेयत " आरतीने शांतपणे  विचारले तर त्या स्त्रीने फक्त अमोल कदमकडे बोट दाखविले.
आरती निमूटपणे त्या बाबांचा हात धरून अमोलच्या केबिनमध्ये शिरली . अमोलने त्रासिक नजरेने तिच्याकडे पाहिले . 
" ह्या बाबांना पैसे हवेत " ती अमोलला म्हणाली .
" मग मी देऊ का ? " अमोलने उत्तर दिले.
" त्यांचे खाते आहे बँकेत " आता आरती चिडली. 
" मग घ्या खात्यातून काढून " अमोल ही तयार होता. 
" केवायसी करायला सांगितली आहे " अजूनही आरती शांत होती
" नियम असतात बँकेचे ते पाळावे लागतात ." अमोल उत्तरला
" आहो नाहीत पेपर त्यांच्याकडे आता ,देतील नंतर  .इतके काटेकोरपणे नियम कधीपासून पाळू लागली तुमची बँक .हे वरिष्ठ नागरिक आहेत .आता सणासुदीचे दिवस आलेत .पैश्याची गरज प्रत्येकाला भासते . थोडेफार इकडे तिकडे होते म्हणून काय पैसे द्यायचे नाहीत का ?" आरती चिडून म्हणाली.
" अरे बापरे पोरगी चिडलेली दिसते . पण तरीही सुंदर दिसते हे मान्य करावे लागेल." अमोल मनात म्हणाला .का कोण जाणे त्याला तिचे आकर्षण वाटू लागले .अमोल साधा होता .स्त्रियांशी मोजकेच बोलायचा. फारसे मित्रही नव्हते त्याचे.
" बाबा बसा,  तो त्यांना म्हणाला , तुमचे नाव "
" विनायक भोला मानस " तो म्हातारा हळुवारपणे म्हणाला
" आयला गणपती फॅमिली आहे .तुमची अमोल हसत म्हणाला "मी तुम्हाला आता पैसे देतो पण माझी अट आहे .तुमच्या सूनबाईना इथे अकाउंट काढावे लागेल " 
" ओ, मी याची कोण नाही आणि माझे लग्न झाले नाही अजून .माझ्या स्कुटरसमोर पडले आणि माझे नुकसान झाले त्यासाठी मी याना घेऊन बँकेत आले "आरती चिडून म्हणाली तरी तिच्या चेहऱ्यावर चढलेली लाली काही लपली नाही .
" तरीही अकाउंट काढावे लागेल .आता हा फॉर्म भरा कागदपत्र उद्या आणून द्या "असे म्हणत त्याने फॉर्म तिच्यासमोर ठेवला 
" माझ्याकडे पैसे नाहीत " आता तिने बचावात्मक पवित्रा घेतला .
" झिरो बॅलन्स अकाउंट काढू . "अमोल आता मागे फिरणार नव्हता.
"आहो पण ही जबरदस्ती का ? "ती चिडून म्हणाली.
" तुमची जबरदस्ती चालते आणि आम्ही विनंती करतोय ते मात्र चालत नाही .ओ बाबा उद्या कागदपत्र घेऊन या  परवा पैसे काढून घेऊन जा " अमोलने पुन्हा लॅपटॉपकडे लक्ष वळविले.
" पोरा मला आज रात्री गावी जायचंय.देव येतक घरात." भिंतीवरच्या गणपतीकडे बोट दाखवून तो म्हातारा म्हणाला.
" बाबा तुम्हाला देव आणायची गरज काय ? तुमच्या नावातच दोन तीन देव आहेत " अमोल हसत म्हणाला .
न राहवून ती ही हसली . 
" फारच गमतीदार स्वभाव आहे तुमचा .बँकेत शोभत नाही .आरती तिरकसपणे म्हणाली. "काढा माझे अकाउंट पण पैसे कट झाले तर माझ्याशी गाठ आहे. तिने आपले बोट त्याच्याकडे रोखून सांगितले.
" हो हो , आता किती पैसे हवेत सांगा असे म्हणत खिशातून पाकीट काढले आणि सांगितलेली रक्कम  तिच्या हातात दिली." 
" हे पैसे तुम्ही का देतायत " आरतीने आश्चर्याने विचारले.
कारण त्यांची प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय पैसे काढता येणार नाही म्हणून माझ्याकडचे देतोय आणि यांनाही माझ्या अकाउंटमधून काढून देतो म्हणजे तुमचे काही अडायला नको "  तो हसत म्हणाला .
"धन्यवाद साहेब " बाबा पैसे घेत म्हणाले .
" मी उद्या कागदपत्र घेऊन येते " आरती खाली मान घालून पुटपुटली.
दुसऱ्या दिवशी ती कागदपत्र घेऊन आलीच पण गणपती डेकोरेशनचे काही फोटो ही अमोलला दाखविले .
घरातल्या गणपतीसाठी त्याने एक मखर सिलेक्ट केले तसेच गावच्या गणपतीसाठी ही एक निवडले .मग चहा पीत बऱ्याच गप्पा झाल्या .हळूहळू दोघांनाही एकमेकांची संगत आवडू लागली .
गणपतीचा मखर सजविण्यासाठी ती अमोलच्या घरी आली तेव्हा सगळ्यांना तिचा स्वभाव आवडला . त्याचवेळी विनायक वधुवर सूचक मंडळाच्या अथर्वने नेमका आरती सानेचा फोटो रघुवीर कदमला दाखविला . फोटो पाहताच रघुवीर खुश झाला आणि ताबडतोब होकार कळवून टाकला.
आज तो रघुवीर कदमच्या डोक्यावर बसून घरात शिरला आणि मखर पाहून खुश झाला .
" पोरीच्या हातात जादू आहे " तो आसनावर ऐसपैस बसत पुटपुटला .
" तर , त्यासाठी काय काय करावे लागले याची कल्पना आहे ना " स्वयंपाक घरात चौकस नजरेने पाहत उंदीर ही पुटपुटला .
" यापुढे हे असेच ब्लॅकमेल करून काम करून घेणार . त्या अमोल आणि आरतीचे जुळवायला दहा दिवस आधी यावे लागले .खाण्यापिण्याचे राहण्याचे किती वांधे झाले माहितीय ना " उंदराने रागाने शेपटी आपटली.
" ते ही खरच म्हणा.  पण हे लग्न जुळवणे फारच कठीण आहे.नशीब त्या आरतीला लहानपणापासून ओळखतोय आपण .कष्ट तर तिच्या पाचवीला पुजले आहेत .अमोल ही साधा आहे म्हणा .आपल्यावर फारशी श्रद्धा नाही पण तिरस्कारही करत नाही . दोघांचे जुळले त्यात आनंदच आहे ." तो लोडाला अलगद टेकून म्हणाला पण टेकताना चेहऱ्यावरची वेदना लपवू शकला नाही .
" त्यादिवशी स्कुटरचा धक्का जरा जास्तच जोरात लागला म्हणा  पण दरवर्षी कदम काकूंचा डायट नैवेद्य खायचा असेल तर हे सहन करायलाच हवे " समोरच्या डायट मोदकाकडे आशाळभूत नजरेने पाहत उंदीर छद्मीपणे म्हणाला .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Saturday, August 30, 2025

ढोलताशे

ढोल ताशे
" ह्या वर्षी गणपती आणताना ढोल ताशे हवेच नायतर गणपती आणूचोच नाय " हट्टाने पेटलेल्या आवाजात गणेश उर्फ गणू ओरडला आणि पॅकिंग करत असलेल्या उंदराच्या हातातून बॅग खाली पडली .
" याला काय अर्थ आहे मालक .हल्ली कोणही उठतो आणि धमकी देतो तुला आणणार नाही म्हणून .आपल्याला मनापासून घरी घेऊन जातायत की आपल्यावर उपकार करतायत.ते काही नाही तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करायलाच हवी" तो कपडे बाहेर फेकत म्हणाला
" मला ही असेच काहीसे वाटू लागले आहे बघ .हल्ली जरा जास्तच धमक्या मिळू लागल्यात .इतका जोर माझा आणि स्वतः चा प्रवास किती सुखकारक होईल यात दाखवायचा .अरे तो कोकणातील प्रवास खूपच त्रास देतो रे " पितांबरची घडी घालून बॅगेत भरत तो उद्गारला .
" आहो मालक , तुम्हीच याना शेफारून ठेवले .चांगले दहा दिवस घरात बसून कौटुंबिक सुट्टी साजरी करत होतो .पण लोकमान्यनी घराबाहेर काढले आणि आपल्याला जनता जनार्दन भक्तांना भेटायची सवय लागली .मग त्यांची दया येऊन मदत करा .हल्ली तुम्ही इथे मखरात असता कुठे ? बघावे तेव्हा भक्तांसाठी धावत असता .आता तर  ढोल ताशे शोधायला जाणार असाल " उंदीर भरजरी माळ गळ्यात घालून आरश्यात पाहत म्हणाला .
" आयडिया काही वाईट नाही आणि मलाही ढोल ताशे वाजवायची संधी मिळेल.नाहीतरी हल्ली काही प्रसिद्ध कलाकार ढोल ताशे वाजवतात की " तो उत्साहाने म्हणाला .
" धन्य आहे तुमची " उंदीर हात जोडून म्हणाला.
" अरे आपला घरगुती गणपती .आपल्याला ढोल ताशे परवडतील का ? सीताराम नागवेकर चिडून गणूला म्हणाले.
" काय हरकत आहे . ढोलताशे काय फक्त सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आहेत का ? मी शोधतो कोणतरी कमी बजेटमधला मिळेलच " गणू उत्साहात म्हणाला.
" आधी चार पैसे  कमवून शिक.मग हवी ती नाटक कर " संगीता काकी चिडून म्हणाल्या.
गणेश नागवेकर पदवीधर झाला पण कामात काही लक्ष नव्हते.नाक्यावर बसून मोठ्या वार्ता करायची सवय मात्र होती. 
विठोबा कीर्तिकर पूर्वी तमाशात ढोलकी वाजवायचा .तमाशा बंद झाले तसे काम कमी झाले . हल्ली कमी तिथे आम्ही या धर्तीवर निरनिराळ्या ढोलताशे पथकात  ढोल वाजवायला जायचा .दशवतारात ढोलकी  वाजवायचा .आपले काम प्रामाणिकपणे करायची सवय त्याला होती.
सण आले की त्याला खूप डिमांड असायचा .यावर्षी स्वतःचे पथक बनवावे अशी त्याची इच्छा होती. पण म्हणावी तशी माणसे सापडत नव्हती. त्यामुळे ऑर्डर ही फारश्या नव्हत्या . थोडे कर्ज काढून मोठ्या कष्टाने पथक उभे केले होते. दोन चार ऑर्डर हातात होत्या पण टीम पूर्ण झाली नव्हती. त्या दिवशी थोड्या चिंतेत टपरीवर चहा पीत बसला होता 
" काय विठोबा भाऊ ? नाराज दिसतायत ." कटींग हातात देत अण्णाने विचारले.
" अरे कर्ज घेऊन पथक काढले पण वाजवायला दोन तीन पोर कमी पडायताय .आता थोडेच दिवस राहिलेत गणपतीला .सराव कधी करणार ? दोन ऑर्डर घेऊन बसलोय ." विठोबा काळजीने म्हणाला .
" विठोबा साहेब,  या कागदावर ढोल ताशे पथकासाठी तरुण तरुणी पाहिजे असे लिहून तुमचा फोन नंबर लिहून जा .मी कागद इथे टपरीवर चिकटवतो .माझ्या रेफरन्सने आले तर कमिशन द्या " अण्णा सहज म्हणाला .
" छान कल्पना " विठोबा खुश होऊन म्हणाला .
दुसऱ्या दिवशी विठोबा टपरीवर चहा पिण्यासाठी गेला तेव्हा एक तरुण अण्णाजवळ उभा होता .विठोबा येताच अण्णाने त्याच्याकडे बोट दाखविले तसा तो तरुण विठोबाकडे आला .
" भाऊ , मला पथकात यायचे आहे .माझे नाव ओमकार पर्वते. " तो हात जोडून म्हणाला .
" तुला ढोल ताश्याचे बेसिक ज्ञान तरी आहे का ? विठोबा त्याच्याकडे थोड्या नाराजीने पाहत म्हणाला . तसे मी थोडे शिकविन तुला. पण मध्येच पळून जायचे नाही . गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि विसर्जनाला दिवसभर वाजवावे लागेल " विठोबाने आधी प्रमुख अटी सांगितल्या .
" मान्य आहे . माझा एक मित्र ही येईल वाजवायला ." कोपऱ्यात बिस्कीट खाणाऱ्या उंदरकडे पाहून तो हसत म्हणाला तसा तो उंदीर पळून गेला .
काही वेळाने गणेश ही मित्रांसोबत चहा पियाला टपरीवर आला .त्याने तो कागद वाचला आणि ताबडतोब विठोबाला फोन केला .
बाजूलाच बसलेल्या विठोबाचे त्याचा फोन उचलला .फोन केलेली व्यक्ती बाजूलाच आहे पाहून गणेश खुश झाला .
" काका माझी ऑर्डर घ्या पहिल्या दिवसाची "  गणेश खुशीत म्हणाला .
" सॉरी , आम्ही पूर्ण दिवस बुक आहोत ."ओमकार विठोबा  काही बोलायच्या आधीच उत्तरला .
" अरे बाबा ,मालक मी आहे की तू " विठोबा चिडून म्हणाला.
" धंद्याची ट्रिक आहे भाऊ , पटकन होकार द्यायचा नाही .आपल्या कामावर शंका घेतली जाते."  ओमकार विठोबाच्या कानात पुटपुटला .
" तू कार्पोरेट ऑफिसमध्ये काम कर. इथे नको ." विठोबा चिडून म्हणाला . "तो गेला तर ऑर्डर जाईल आपली " 
" ओ भाऊ , सध्या सर्वच पथक फुल आहेत .तुम्हाला माणसांची गरज आहे म्हणजे ऑर्डर नसतील म्हणून फोन केला तुम्हाला " गणेश पुन्हा हात जोडून म्हणाला.
" यावर्षी ढोल ताशे वाजवीत बाप्पा घरात आणायचा असाच निश्चय केलाय मी " गणेश छाती फुगवत म्हणाला.
" मग आमची अट आहे . " ओमकार उद्गारला 
" अट कशासाठी .तुम्ही पैसे सांगा मी देईन "गणेश उत्तरला .
" तुम्ही आमच्या ढोल पथकात सामील व्हायचे .पहिल्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी ढोल पथकात सामील होऊन ढोल ताशे वाजवायचे." ओमकार ठामपणे उद्गारला.
" च्यायला ,असे कुठे असते का ? मी तुम्हाला ऑर्डर देतोय ऍडव्हान्स देतोय तर तुम्ही मलाच कामाला लावतायत. " गणेश चिडून म्हणाला .
" हे बघ पथक हवे असेल तर आमचे ऐकावे लागेल.नाहीतर दुसरे पथक शोध " आता विठोबाही आवाज चढवून म्हणाला .
आता दुसरे कुठलेही पथक येण्यास तयार होणार नाही याची खात्री गणेशला होती म्हणून नाईलाजाने त्याने होकार दिला .
आज त्याच्या आगमनाचा दिवस होता .सीताराम नागवेकराच्या डोक्यावर बसून तो समोर ढोल ताशे वाजविणाऱ्या ओमकार आणि गणेशाकडे  पाहत हसत मान डोलवत होता .एका कोपऱ्यात उंदरासारखी बारीक मान असलेली व्यक्ती ताशा वाजवीत त्याच्याकडे रागाने पाहत होती.
अर्ध्या तासाने तो सीतारामच्या घरात शिरून मखरात बसला तेव्हा त्याच्यासमोर हात जोडून काकू उभ्या राहिल्या .
" पोराने शब्द खरा केलान हो .ढोल ताशे वाजवत बाप्पाक घरात घेऊन इलो " तिच्या चेहऱ्यावर विजेते हास्य होते.
" शेवटी तू ढोल वाजवायची इच्छा पूर्ण करून घेतलीसच .पण मला का ताशा वाजवायची शिक्षा ? मला ना तुझ्यासोबत यायची इच्छाच होत नाही हल्ली ." उंदीर चिडून शेपटी आपटत म्हणाला .
" अरे कसले भारी वाटते बघ ढोल वाजवताना .एक वेगळीच भक्तीची नशा अंगात भिनते.तरीच ते प्रसिद्ध कलाकार आपली कामे सोडून ढोल ताशे का वाजवतात याचे कारण आज कळले बघ .आज हात दुखतील थोडे रात्री मालीश करून देशील का ? " तो हसत हसत उंदराकडे पाहत म्हणाला.
 " मी फक्त वाहन आहे तुमचा आणि सरकारी नोकरावर तुम्ही काहीच कारवाई करू शकत नाही. पण तुमच्या सोबत त्या गणेशला  का अडकवले तुम्ही " स्वयंपाक घरातून येणाऱ्या प्रसादाचा सुवास घेत उंदराने विचारले.
" अरे तो मला धमकी देतो . त्याची शिक्षा त्याला मिळायला नको . काय तर म्हणे, ढोल ताशे नसतील तर बाप्पाला आणायचे नाही .वा रे वा ,इतकी वर्षे घरी येतोय तर ही तरुण पिढी मला हलक्यात घेऊ लागली .आता वाजव दहा दिवस ढोल ताशे" शांतपणे डोळे मिटत तो म्हणाला .
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Friday, August 29, 2025

विसर्जन

विसर्जन
" आहो , या वर्षी गणपती आणलाच पाहिजे का ? "कावेरी काकू डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली ." प्रतीकला जाऊन महिनाही झाला नाही ."
" प्रतीक कुठेच गेला नाही .तो आहे . काहीही झाले तरी गणपती घरी आलाच पाहिजे हीच त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्याच्या इच्छेचा मान राखायलाच हवा " गणपत नाईक ठाम स्वरात म्हणाले.
" गणपती आगमनाला आठवडा राहिलाय .तू तुझी तयारी कर. मी गणपती ठरवून येतो." असे बोलून ते बाहेर पडले.
गेला महिनाभर नाईक कुटुंब दुःखात होते. त्यांचा मुलगा प्रतीक नाईक सैन्यात सुभेदार होता .नाईक घराण्यात सैन्यात कोणीच गेले नव्हते . ते शेतकरी होते . थोडीफार जमीन होती .काही कलमे होती .त्यातच सुखी होते. गणेशोत्सव जोरात साजरा करायचे. 
प्रतीक सैन्यात गेला हे त्यांना काही रुचले नव्हते पण नंतर स्वीकारले. सैन्यात गेला तरी प्रतीक गणपती विसरला नव्हता .संपूर्ण वर्षात फक्त गणपतीसाठी तीन दिवसच सुट्टी घेऊन घरी यायचा आणि विसर्जन झाले की निघायचा.
यावर्षी त्याची पोस्टिंग काश्मीरला होती. पूर्वीसारखे काश्मिर अतिसंवेदनशील राज्य राहिले नाही .आता खूपच शांत झालेय असे फोन करून आईवडिलांना तो सांगायचा .यावर्षी नेहमीसारखा तीन दिवस घरी येईन आणि विसर्जन करून निघेन असा निरोप ही गणपत नाईकांना दिला होता.
" पोरगो जगाच्या पाठीवर खंयसर पण रावांदे , पण गणपती विसर्जनाक हजर असता. स्वतःच्या डोक्यावरून गणपती विसर्जन करायचा हक्क सोडूचा नाय " गणपत फोन ठेवत हसत म्हणाले.
त्याच रात्री गस्तीवर असताना अतिरेक्यांच्या भयानक गोळीबारात प्रतीक शाहिद झाला. पण मरताना तो साथीदाराच्या कानात काहीतरी पुटपुटला .
दुसऱ्या दिवशी गावात तिरंग्यात लपेटून प्रतीकचे शव गावात आणले आणि सरकारी इतमामाने त्याचे अंत्यसंस्कार ही झाले. कालच फोनवर बोलणारा आपला मुलगा आज शाहिद झाला याचे दुःख नाईक कुटुंबाना सहन होत नव्हते.
यावर्षी गणपती आणायचा नाही हे दोघांनीही ठरविले होते . 
" यावर्षी एक घर तर सुटले .थोडा आराम आहे आपल्याला आणि पोटालाही .तसेही त्या सुतकी घरात काय आदरातिथ्य  होणार आपले "  पलंगावर स्वतःला झोकून देत उंदीर कुत्सितपणे म्हणाला.
" अरे प्रतीक देशासाठी शाहिद झालाय.सैनिकांचा आदर करा हेच आपण शिकवतो आणि तू आराम बघतोस ? यावेळी मलाच तुझी तक्रार केली पाहिजे " तो सोंड आपटत चिडून म्हणाला .
" हे बघ पृथ्वीवरील घराघरात आपले स्थान हळूहळू कमी होणार आहे आणि आपण ग्लोबल होणार आहोत हे सत्य स्वीकार .कोकणातून चाकरमानी मुंबईत आले आणि आता मुंबईतून परदेशी जाऊ लागले .हल्ली आपणही फॉरेन ट्रिप करतोच की " उंदीर शेपटी फिरवत म्हणाला .
पण आताच  एक तरुण नाईकांच्या  दारात उभा राहिला . प्रतीकच्या लॉकरमधील काही वस्तू त्याच्या हातात होत्या .
" मी सिद्धी वर्तक . प्रतीकच्या रेजिमेंटमध्ये आहे. " तो दारातूनच म्हणाला आणि आत शिरला. 
तो आत शिरताच एक चैत्यन्याची लहर घरात शिरली असा भास कावेरी आणि गणपतला झाला.
" या काही वस्तू आहेत प्रतीकच्या . मरणापूर्वी त्या मी  तुमच्याकडे पोचवाव्या अशी त्याची इच्छा होती."असे बोलून त्याने त्या गणपतरावांच्या हाती दिल्या .
सामानात गणपतीची छोटी मूर्ती .ताईत आणि एक चिट्ठी होती. आपण शाहिद झालो तरी गणपती आणणे बंद करू नये. दरवर्षी जसा उत्सव साजरा करतो तसाच साजरा करावा असे त्या चिट्टीत लिहिले होते .
म्हणूनच कावेरी काकूंचा विरोध असला तरी गणपती आणायचा या मतावर गणपतराव ठाम होते.
दरवर्षी प्रमाणे तो गणपतरावांच्या हातावर बसून घरात शिरला तेव्हा घरातील दुःखी वातावरण ताबडतोब जाणवले त्याला . आता गणपतरावांचे हात ही थरथरतायत याचीही जाणीव झाली. कावेरी काकूनी पूजेची तयारी नेहमीसारखीच केली होती.
" यावेळी वेगवेगळ्या नैवेद्याची अपेक्षा करू नकोस " त्याने बसतानाच बाजूला उभ्या असलेल्या उंदराला खडसावले .
" तुमच्या इतका मी दगडी काळजाचा नाही " तो चिडून म्हणाला .
" मी काय केले  आता ? तुझी  नेवेद्य खाण्याची आवड बघूनच तुला सांगितले आणि यावर्षी सगळेच ऍडजस्ट कर आपण दुःखी घरात आहोत ." तो डोळे मिटून म्हणाला.
" पण प्रतीकला वाचवू शकला असता तुम्ही .गोळीबार झाला तेव्हा तुम्हीच बाजूला होता त्याच्या .जास्त नाही पण काही दिवस त्याचे मरण पुढे ढकलता आले असते तुम्हाला " उंदीर शेपटी आवळून घेत म्हणाला.
" मी देव आहे जादूगार नाही . आपल्या जगात काही नियम ठरलेले  आहेत आणि यमराजांच्या कार्यात मी ढवळाढवळ करीत नाही .मी काही नियम मोडले पण कोणाचा मृत्यू थांबवू शकत नाही .त्या सत्यवानाचा जीव परत केला त्याचे परिणाम यमराज अजूनही भोगतायत , माहितीय ना " तो आजूबाजूला नजर फिरवीत पुटपुटला .
पूजा आरती झाल्यावर एक तांब्याचा छोटा कलश गणपतरावानी मूर्तीच्या बाजूला ठेवला .तो कलश लाल कपड्याने बंद केला होता.
" आता हे काय ' उंदीर चिडून म्हणाला .या कलशामुळे त्याची जागा बदलली होती.
" प्रतीकच्या अस्थी आहेत त्या .मीच गणपतरावाना ही आयडिया दिली होती ." तो हसत म्हणाला .
" आधीच मखरात जागा कमी .आपणच कसेतरी राहतोय. मला माझी शेपटीही मनासारखी फिरवता येत नाही .त्यात तुम्ही या स्मशानातील अस्थी इथेच ठेवायची आयडिया दिली. किती विचित्र वास मारतोय."  उंदीर कुरकुरत म्हणाला .
" तोंड सांभाळून बोल . या अस्थीच्या मालकाने आपल्या देशासाठी प्राण दिलेत हे विसरू नकोस .तूच काय माझ्या दर्शनाला येणाऱ्या कोणीही ते विसरू नये म्हणून त्या अस्थी माझ्या शेजारी राहतील . ही एक श्रद्धांजली असेल त्या शहीद प्रतीकला .अरे  त्या बीडीडी चाळीत यापेक्षा ही कमी जागेत आपण राहत होतो . झोपायला जागा नसायची तेव्हा घरातील पुरुष मंडळी बाहेरच्या पॅसेजमध्ये झोपायचे तर आपल्या माखराखाली छोटी मुले झोपायची तेव्हा नाही तक्रार केलीस. " तो चिडून आपली सोंड फिरवीत म्हणाला.
" तेव्हा प्रसाद भरपूर मिळायचा " उंदीर छद्मीपणे हसत म्हणाला .
आज त्याच्या विसर्जनाचा दिवस होता.विसर्जनाच्या  दिवशी प्रतीकची खूपच आठवण नाईक कुटुंबियांना आणि गावाला येत होती .गावातील गणपती हळूहळू बाहेर पडू लागले होते .गणपतराव गणपती उचलण्यास पुढे जाणार इतक्यात दारात सिद्धी वर्तक उभा राहिला .
" काका , प्रतीकचे काही झाले  तर गणपतीचे विसर्जन मी करावे अशी त्याची इच्छा होती .म्हणून आलोय ." सिद्धी हात जोडून म्हणाला .
गणपतरावानी  किंचित हसत मान डोलावली आणि अस्थीचा कलश मखरातून बाहेर काढला .
" काका कलश मूर्तीच्या बाजूलाच ठेवा .त्याचेही विसर्जन करू . गणेशासोबत प्रतीकच्या अस्थीचे विसर्जन ही भाग्याची गोष्ट आहे आणि माझीही इच्छा आहे. " तो कलश गणपती च्या बाजूला ठेवत म्हणाला .
काही न बोलता गणपतरावानी मान डोलावली.
सिद्धीने गणपती डोक्यावर घेतला आणि नदीकडे चालू लागला .आज गावात एक वेगळेच वातावरण होते .प्रत्यक्ष गणपतीच आपल्यासोबत चालतोय असा भास सगळ्यांना होत होता .
उघड्या अंगाने डोक्यावर गणपती आणि हातात अस्थीचा कलश घेऊन सिद्धी पाण्यात शिरला तो परत आलाच नाही .
बराचवेळ वाट पाहून गणपतराव खिन्न मनाने परत फिरले तेव्हा दारातच रिकामा कलश आणि पाट ठेवलेला दिसला .
" आज स्वतःचे विसर्जन स्वतःच केलेत .चला ही हौस ही पूर्ण केलीत आणि अस्थी विसर्जनाचे पुण्यही पदरात पाडून घेतलेत " टॉवेलने डोके पुसत उंदीर कुत्सितपणे म्हणाला.
" एका  शाहिदाचे अस्थी विसर्जन करणे हे पुण्याचेच काम आहे .आपले मरण डोळ्यासमोर दिसत असताना ही पाठ न दाखवणारे हे भारतीय सैनिक आहेत आपण देव म्हणून आपले सर्व करण्यात पुण्य मानणाऱ्या ह्या मानवांसाठी थोडे पुण्य आपण केले तर  काय हरकत आहे ." आपले ओले केस पंख्यापुढे करत तो हसत म्हणाला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, August 28, 2025

इको फ्रेंडली

इको फ्रेंडली
"ती मूर्ती दाखवा " अमेय पावसकर त्या सुंदर बाप्पाच्या मूर्तीकडे बोट दाखवीत म्हणाला.
"ती दहा हजार रुपयांची आहे " कुत्सितपणे मूर्तिकार म्हणाला .
" बापरे , इतकी महाग मूर्ती. आहो, मी साधी मातीची मूर्ती विचारली .पंचधातूंची नाही " अमेय नाराजीने म्हणाला .
 " साहेब , मेहनतीचे पैसे आहेत हो .वर्षातून एकदाच सण येतो आणि मूर्ती एकदाच बनविल्या जातात. त्यात यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे बंद केले आहे . सरकारनेच बंदी घातलीय . मग आता महागाई वाढली तश्या मूर्तीच्या किमती वाढणारच . "  मूर्तिकार नाराजीने म्हणाला .
" भाऊ थोडे कमी करा की, माझ्या मुलीला आवडली आहे  मूर्ती म्हणून विचारतोय " नेत्राच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे पाहत अमेय म्हणाला. नेत्रा अमेयची पंधरा वर्षाची मुलगी .आपला बाबा मनासारखी कोणतीच गोष्ट करत नाही म्हणून सतत बापावर नाराज असलेली आधुनिक कन्या होती.
" जास्तीत जास्त दोनशे रुपये कमी होतील .तेही मुलीचे नाव घेतले म्हणून " मूर्तिकार नेत्राकडे पाहत म्हणाला. 
" दोन हजार तरी कमी करा " अमेय अजिजीने म्हणाला.
 " अजिबात नाही .अजून दहा दिवस आहेत . खूप गिऱ्हाईक येतील . आदल्या दिवशी बारा हजार मागितले तर कोणीही हसत हसत देईल आणि आता हा  उत्सव वाढत जाणार आहे .सरकारने राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला मान्यता दिलीय. पुढच्या वर्षी अजून किमती वाढणार आहेत " मूर्तिकार हसत म्हणाला .
नाईलाजाने अमेय वळला .दुसरीकडे मूर्ती पाहू कदाचित स्वस्तात मिळेल असे नेत्राला समजावले . तरीही नेत्रा नाराज झालीच.
 " दरवर्षी तुझा डिमांड वाढतोच आहे .आता तर तू ऑफिशियल सरकारी पाहुणा झालास " आपली बॅग भरत उंदीर छद्मीपणे म्हणाला .
तसा तो खिन्नपणे हसला . " दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे हे खरेच आहे .सध्या भक्तीपेक्षा  लोक महोत्सव म्हणून बघतायत् . माझ्या मूर्तीचा भाव चालू आहे , त्यावर घासाघीस होतेय . पण भक्तांच्या श्रद्धेचा कोणीच विचार करत नाही .भक्त ही मला या दहा दिवसांतच शोधतात . त्यांना मला वेगवेगळ्या रुपात पहायचे असते . कठीण आहे रे आता सुट्टीत भक्तांच्या घरी जाणे.लोकांनी पर्यावरणाचा विचार करणे ही सोडून दिलंय " तो सुटकेस लॉक करून कपाटात ठेवत म्हणाला .
इथे अमेयला मात्र मनासारखी मूर्ती मिळत नव्हती .जी मूर्ती त्यांना आवडायची ती मूर्ती त्याच्या बजेटच्या बाहेर असायची . खरे तर त्याला मूर्ती महत्वाची नव्हती. देव सगळीकडे प्रत्येक मूर्तीत असतो तो घरातही असतो असे त्याचे म्हणणे पण नेत्रा उत्साही होती तिला या गोष्टी कळत नव्हत्या .ती बाजारात गणेशाची विविध रूपे पाहून हरखून गेली होती. 
" च्यायला , पुढच्या वर्षी गणपती आणायला नकोच.पूर्ण पगार या उत्सवात जातो आणि महिना अखेर मित्रांपुढे हात पसरावे लागतात . काय फायदा या उत्सवाचा . गावी जायचे म्हटले तरी अजून रस्ते सुधारले नाहीत . पूर्ण दिवस प्रवासात जातो . ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही मग उभे राहायला मिळाले तरी नशीब .रोज कामावर जाताना कोपर्यावरच्या गणेश मंदिरात हात जोडू , तरी परवडेल आपल्याला .नकोच तो गणपती .तीन वर्षे झाली अजून इन्क्रीमेंट नाही आणि ह्याच्या किमती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढतायत . अमेय मनात म्हणाला .
हे ऐकून उंदराने आपली बॅग उघडून सगळे कपडे पुन्हा कपाटात ठेवले आणि त्यानेही कपाटातून बॅग काढून आपले पितांबर पुन्हा बाहेर हँगरला लटकविले.
" हा खरच आपल्याला  घरी नेणार नाही याची खात्री तुलाही पटलेली दिसतेय ? मालक दरवर्षी आपली सुट्टी कठीण होत जाणार आहे . तसेही भारतात पर्यटन बजेट खूप वाढलंय. पुढे  दहा दिवसाचे पॅकेज आपल्यालाही परवडणार नाही. मी आजच आपल्या वडिलांकडे अधिकृत निवेदन देतो." उंदीर शेपटी फिरवत म्हणाला. तो काहीच न बोलता डोळे मिटून शांतपणे विचार करीत बसला.
थोड्या उदास मनस्थितीत अमेय घरी निघाला . नेत्रा तर रडवेली झाली होती. तिला  कसे समजवायचे याचाच विचार तो करत होता .
रस्त्याच्या कोपऱ्यात तो हातात काही कागद घेऊन उभा होता .रस्त्यातील येणाऱ्या जाणाऱ्यांना तो कागद देत होता .अमेयच्या हातात ही कागद दिला आणि प्रसन्नपणे हसला. त्याचे हास्य खूपच निरागस आणि आश्वासक होते.हसताना त्याचा कोपऱ्यातील तुटलेला दात दिसत होता पण तो त्याच्या व्यक्तिमत्वात भरच टाकीत होता.
" मी बल्लाळ प्रभुणे , पर्यावरणपूरक अर्थात इको फ्रेंडली गणपती कसे बनवायचे याचा एक दिवसाचा कोर्स घेतो .दोनशे रुपये फक्त. तुम्ही एका दिवसात टाकाऊ वस्तू  पर्यावरणाला हानी न करणाऱ्या वस्तू वापरून गणेश मूर्ती कशी बनवायची ते शिकाल आणि घरीच मूर्ती बनवू शकाल " तो हसत म्हणाला .
" वेडा आहेस का ? मूर्तिकार एका गणपतीचे दहा हजार घेतो आणि तू दोनशे रुपयात शिकवणार ." अमेय हसत म्हणाला .
"साहेब एकदा ट्रायल तरी घ्या आणि तुमच्या ह्या छोट्या मुलीला आवडेल मूर्ती बनवायला .चला तुम्ही दोघे दोनशे रुपयात शिका .छोटीला फ्री ." तो नेत्राच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला .
" पप्पा काय हरकत आहे , तुम्ही दहा हजारही देणार नाही आणि दोनशे रुपयात शिकणारही नाही .मग कसा साजरा करणार आपण गणेशोत्सव ?" नेत्रा गाल फुगवत म्हणाली .
" ठीक आहे .उगाच गाल फुगवू नकोस .शिकूया आपण " खिशातून दोनशे रुपये काढीत अमेय म्हणला.
" उद्या सकाळी दहा वाजता तुमच्या घरी येतो. मोबाईल नंबर द्या " बल्लाळ हसत म्हणाला.
" काय माझ्या घरी येऊन शिकवणार ?" अमेय आश्चर्याने म्हणाला .
" हो ,तुमचे घर ,  पाट पाहून मूर्ती कशी, किती उंचीची बनवायची ते शिकविन मी . त्यासाठी घर पाहायला नको ? आणि मी शिकवताना व्हिडिओ बनवून ठेवा म्हणजे पुढे प्रॉब्लेम नको . माझे कोणतेही चॅनल नाही आणि यू टूब ही नाही " बल्लाळ पुन्हा हसत म्हणाला आणि कोपऱ्यावर कागद खाणाऱ्या उंदरांना हाकलत निघून गेला.
" पप्पा हा आपल्याला चुना तर लावून गेला नाही ना " नेत्रा संशयाने विचारले.
" कसली ही भाषा ग तुझी. दहा हजार जाण्यापेक्षा दोनशे गेलेले बरे आणि विश्वासावर जग चालते ग .आपण ठेवू विश्वास त्याच्यावर " असे  बोलत ते घरात शिरले.
दुसऱ्या दिवशी बरोबर दहा वाजता दारावर बेल वाजली .अमेयने कोण आले असेल ? असा विचार करत दरवाजा उघडला तर समोर बल्लाळ उभा.
" काय साहेब विसरलात का ? आपले ट्रेनिंग सुरू करायचे आहे .चला पटापट तयारी करा .मुलीलाही बोलवा " बल्लाळ घाई करत म्हणाला.
पटापट तयारी करून दोघेही ट्रेनिंगला बसले.बाजूलाच मोबाईल ठेवून शूटिंग चालू होते.त्याने  वर्तमानपत्र ,टाकाऊ नाशवंत वस्तू गोळा करून आणल्या होत्या .त्यापासून आपल्याला पाहिजे तशी मूर्ती कशी बनवता येईल याचे बेसिक ट्रेनिंग दोघांना दिले.नेत्राला तर हा आपल्या शाळेतील प्रोजेक्ट चालू आहे असा भास होत होता .चार तासात त्याने मूर्ती कशी बनवायची ,रंग कसा वापरायचा याचे सुंदर प्रात्यक्षिक दाखविले.
" चला उद्यापासून तुम्ही मूर्ती बनवायला सुरवात करा .हीच मूर्ती बनवा ना " खिशातून मोबाईल काढत त्याने गणपतीच्या मूर्तीचा फोटो दाखविला .
फोटो पाहताच नेत्रा आणि अमेय आश्चर्यचकित झाले.हीच मूर्ती त्याना दहा हजार रुपये सांगितली होती.
" साहेब , मूर्ती तुमच्या मनातून घडते .जितकी भक्ती खरी तितकी मूर्ती सुंदर " बल्लाळ बोलून निघून गेला.
दुसऱ्या दिवशीपासून दोघांनी घरीच मूर्ती बनविण्यास सुरवात केली. काही अडले तर दोघेही व्हिडिओचा आधार घेत होते.
गणेशाच्या आगमनाआधी त्यांची मूर्ती तयार झाली .मूर्ती बनवताना त्यांना एक वेगळीच अनुभूती येत होती .प्रत्यक्षात गणपतीचं आपल्या हातून घडतोय ही भावनाच किती सुखद होती . घरचेही त्यांची मेहनत पाहून आनंदात होते. हे घडत असताना नेत्रा आणि अमेय या पितापुत्रीत एक अनोखे नाते तयार होत होते .दोघांमध्ये चांगला संवाद घडत होता तर दोघेही एकमेकांच्या मताचा आदर करीत होते.
 आज गणेश चतुर्थी . तो अमेयच्या हातातून मखरात येऊन बसला .
" गमाचा वास अजून गेला नाही . शेपटीही चिकट लागतेय " उंदीर नाक मुरडत शेपटी फिरविण्याचा प्रयत्न करीत म्हणाला .
" त्यांच्या मेहनतीची कदर कर.आयते खाऊन आणि उत्तम सेवा  घेऊन तुला माज चढलाय .आता माझाही हात थोडा तिरका झालाय आणि सोंड ही मनासारखी फिरवता येत नाही पण मी तक्रार करतोय का ? कारण त्यांनी मनापासून मला घडवलय. इतकेच नव्हे दोघेही एकमेकांना समजू लागलेत .पुढच्यावर्षी यापेक्षा जास्त प्रगती करतील .अरे हेच तर आपण इथे येण्याचे कारण आहे .विस्कटलेली घडी जोडण्यासाठी , एकमेकांशी चांगले संबंध जोडण्यासाठी आपण येतो .आणि कितीही झाले तरी नैवेद्यात त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही हे तुझ्यासाठी महत्वाचे आहे नाही का ?? समोरच्या ड्रायफ्रुट मोदकाकडे बोट दाखवीत तो हसून म्हणाला .
ही मूर्ती आपल्याला साधारण बल्लाळ सारखी का दिसते याचाच विचार पूजा करताना अमेय करीत होता .
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Wednesday, August 27, 2025

आंदोलन

आंदोलन
रामभाऊ मोहिते निराश मनाने कोकणात जाणाऱ्या गाडीत शिरले. खूप मोठ्या आशेने ते मुंबईत आले होते.
गावातल्या काशिनाथ बिर्जेचा नातू मुंबईत नगरसेवक होता. त्याच्या पक्षाला कोकणाचा आणि मराठीचा अभिमान वाटायचा. जेव्हा कधी गावी यायचा तेव्हा हमखास रामभाऊंच्या घरी यायचा .गावातील समस्यांवर चर्चा करायचा .जमतील ती छोटी मोठी कामे करून जायचा .कधी काही अडचण आली की हक्काने मुंबईत येऊन भेटा असे सांगून जायचा . 
अर्थात आजपर्यंत तशी वेळ रामभाऊंवर आली नव्हती म्हणा आणि मुंबई गोवा महामार्ग हा फक्त रामभाऊंचा नव्हे तर संपूर्ण कोकणचा प्रॉब्लेम होता त्यामुळे रामभाऊ त्याच्या वाटेल कधी गेले नाहीत.
पण यावेळी गावातील एक दोन रस्त्यांची हालत खूपच खराब झाली होती.  तुकाराम परबाची सून तर त्यादिवशी रस्त्यातच बाळंत होणार होती .नशीब जनार्दन खोताची बॉडी घेऊन अँबुलन्स गावात शिरली आणि त्याच अँबुलन्समध्ये खोताच्या बॉडीशेजारीच तिला झोपवून हॉस्पिटलमध्ये नेले. 
जनार्दन खोताची कृपा म्हणून तुकारामाची सून व्यवस्थित बाळंत झाली आणि पोरगा जन्माला आला.आता पोरगा झाला त्याचा आनंद साजरा करायचा की जनार्दन खोत गेला त्याचे दुःख करायचे हा प्रश्न बर्याचजणांना पडला होता पण रामभाऊना मात्र रस्ता कधी चांगला होणार हाच प्रश्न सतावत राहणार होता.
काशिनाथ बिर्जेच्या नातवाने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिले होते पण मुले शाळेत जातात की नाही याकडे लक्ष दिले नव्हते.पावसाने रस्ता धुवून गेला होता.चालताना दोन तीन विद्यार्थी तरी चिखलात घसरून पडत होते. तर बऱ्याच जणांच्या पायाला भेगा पडल्या होत्या .परवाच्या पावसात तर रस्त्यावर इतके पाणी साचले होते की कुशाबा कोळीने आपली होडी बाहेर काढून मुलांना शाळेत पोचविले होते. 
तेव्हा मात्र रामभाऊ संतापले होते. ग्रामपंचायत , तालुक्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस अश्या अनेक ठिकाणी अर्ज विनंत्या करून झाल्या .सर्व ठिकाणाहून काम होईल असे आश्वासन दिले गेले होते . पण कामाला सुरुवात कधी होणार हे कोण सांगू शकले नाहीत.
शेवटी ते काशिनाथच्या नातवाला मुंबईत भेटायला आले. रामभाऊ आले म्हटल्यावर भेट ताबडतोब झालीच .
पण आता मुंबईत भाषेच्या मुद्द्याने जोर धरला असून माझी सगळी ताकद तिथेच लागली असल्याने पाऊस गेला की तुमचे काम होईल असे आश्वासन त्यांना मिळाले .शिवाय सरकारने महिलांसाठी नवीन योजना सुरू केलीय त्याचा लाभ घेण्यासाठी जी काय मदत हवीय ती ताबडतोब देण्याचा  शब्द  दिला.
निराश मनाने रामभाऊ तसेच ट्रेनमध्ये बसले.गणेशोत्सव जवळ आल्यामुळे चाकरमान्यांची कोकणात जाण्याची लगबग चालू होती.ट्रेन तर नेहमीसारखी भरलेली होती. रामभाऊ आरक्षण असलेल्या बोगीत चढणार नव्हतेच कारण ते त्यांच्या तत्वात बसत नव्हते. निमूटपणे जनरल डब्यात शिरून एका कोपऱ्यात उभे राहिले.
"ओ भाऊ ," बाजूच्या सीट वरून कोणीतरी हाक मारली आणि रामभाऊ चमकले. दचकून त्यांनी पाहिले तर खिडकीजवळ एक तरुण त्यांच्याकडे पाहून हात हलवत होता आणि जवळ बोलवत होता.
ते ओळखीचा असेल या आशेने जवळ गेले तसा तो हसला .त्याचे हास्य पाहून रामभाऊ थोडावेळ का होईना आपले दुःख विसरले.
" या रामभाऊ ,बसा " त्याने सरकून जागा बनवली.
" कोणतरी बसले असेल ,मी उभा राहतो थोडा वेळ " रामभाऊ संकोचून म्हणाले.
" आहो मीच जागा अडवून ठेवली होती .कोणतरी ओळखीचा भेटतोच याचा अनुभव आहे मला " तो तरुण हसत म्हणाला .हसताना त्याचा कोपऱ्यातील तुटलेला दात स्पष्ट दिसत होता पण तो त्याला शोभून दिसत होता .
" पण मी तुला ओळखले नाही " रामभाऊनी मनातील प्रश्न विचारलाच .
मी हेरंब भोसले , शंकर भोसलेचा भाचा. मुंबईत असतो .मधल्या आळीतील विहिरीशेजारचे घर .काय भाऊ गणपतीला दररोज आरतीला येतो मी आणि काकूंच्या हातचा प्रसाद खाऊनच निघतो." तो थोड्या आश्चर्याने म्हणाला.
" असे होय तरीच म्हटलंय ओळखीचा चेहरा दिसतोय ," रामभाऊ खुशीत येऊन आरामात बसत म्हणाले.
" मुंबई कसले काम काढले ? हेरंबने हळूच विचारले तसे रामभाऊनी सगळी कथा त्याला ऐकवली.सांगताना ही त्यांचा उर भरून येत होता.
" रामभाऊ ,तुमची लढाई तुम्हीच लढा .दुसरे कोण तुमचे काम करणार नाही .रस्ते , वैद्यकीय उपचार , शिक्षण याबाबतीत आपण खूपच मागे आहोत.पण मंदिरे , धर्म , महिला अत्याचार , कायदे / नियम न पाळणे. एकमेकांवर चुकांचे खापर फोडणे याबाबतीत आपण खूप पुढे आहोत." हेरंब हसत म्हणाला.
" मग आपण काहीच करायचे नाही का ? " रामभाऊ हताशपणे उद्गारले .
" आंदोलन करायचे ,जनजागृती करायची.लोकमान्य टिळकांनी हेच शिकवलंय की आपल्याला . हात धरून त्यांनी गणपतीला वाडीत उभे केले .सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून जनजागृती केली .आताही तेच करायचे .तुम्ही आंदोलन करा " हेरंब हसत म्हणाला .
" कायतरी काय .ह्या वयात रस्त्यावर बॅनर घेऊन बसू .लोक वेडे समजतील मला .आणि आता गणपतीचे दिवस आलेत , सगळे सुट्टीवर कोण लक्ष देईल माझ्याकडे ."रामभाऊ हादरून म्हणाले.
" बघा शिवाजी महाराज जन्मावे पण शेजारी हे म्हणतात ते खरे आहे .तुम्हाला वाटते ना काहीतरी चांगले व्हावे मग सुरवात करा . आज नाही तर उद्या काहीतरी निकाल लागेल. " हेरंब त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला.
त्याचा हात पाठीवर पडताच रामभाऊंच्या शरीरात एक अनामिक ऊर्जा निर्माण झाली .
सकाळी घरी जाताच त्यांनी आंघोळ केली . प्रसन्न मुद्रेने गणपतीच्या फोटोसमोर हात जोडून उभे राहिले काहीतरी पुटपुटले आणि हातात पाण्याची बाटली ,काखेत चटई मारून बाहेर पडले. 
वाटेत एका पुठ्ठयावर चांगला रस्ता आमचा हक्क असे रंगवून घेऊन तो काठीवर उभा करून त्या रस्त्याच्या कोपऱ्यात उभे राहिले.जमिनीला मनोभावे पाया पडून त्यांनी झाडाखाली चटई टाकली .तो बोर्ड जमिनीत घट्ट रोवला आणि मांडी घालून बसले.
येणारे जाणारे त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते .हळूहळू ही बातमी गावभर झाली .रामभाऊंच्या घरातही ही बातमी जायला वेळ लागला नाही .काकूंच्या कानावर जाताच ती किंचित हसली .पोरगा गणपतीच्या मखराची तयारी करत होता त्याने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि हातातील काम चालू ठेवले.
दुपारी काकूंनी जेवणाचा डबा तयार केला . तांब्यात चहा घेतली आणि सरळ रामभाऊंच्या शेजारी येऊन बसली. दोघेही शांतपणे जेवले ,चहा प्यायले आणि काळोख पडताच उठून घरी आले. घरात नेहमीसारखे वातावरण होते.पण पारावर रामभाऊंच्या आंदोलनाची चर्चा रंगली होती. 
दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार. यावेळी रामभाऊच्या मुलीला सुट्टी पडली होती म्हणून तीही चटईवर बसली होती. दुपारी मुलाने थोडा मोठा बॅनर रंगवून आणून दिला .
तिसऱ्या दिवशी मात्र लोक तिथे थांबून चौकशी करू लागले. पोलिसांनीही त्यांना घरी जाण्याची विनंती केली पण रामभाऊ शांत होते. 
उद्या गणेश चतुर्थी .गणपतीची पूजा करण्यासाठी रामभाऊ आंदोलन स्थगित करतील असे सगळ्यांना वाटत होते पण कसले काय .सकाळीच रामभाऊ पत्नीसह आंदोलनाच्या ठिकाणी हजर होते.
" रामभाऊ यावर्षी गणपती नाय काय ? " कोणीतरी जाताजाता विचारलेच .
" आहे ना पण त्यासाठी हे काम का सोडायचे .मुलगा मोठा झालाय तो बघेलच त्याच्याकडे आणि  त्यालाही कळूदे की यावर्षी रामभाऊ का दिसत नाही ते " ते  वर पाहत हसून म्हणाले.
" खरच की यावर्षी तुम्ही दिसला नाहीत आणि तुम्ही इथे आहात असे कळले म्हणून इथेच भेटायला आलो " एक ओळखीचा हसरा आवाज रामभाऊंच्या कानी पडला आणि त्यानी मान वळवली .
त्याच्या मागे हेरंब हसत उभा होता .
भाऊ गणपतीच्या दर्शनाला घरात शिरलो पण तुम्ही आणि काकू दिसला नाहीत आणि तुम्ही इथे आंदोलन करताय असे कळले मग इथेच आलो तुम्हाला भेटायला " हेरंब त्यांच्या बाजूला बसून बॅनर हातात घेत म्हणाला .
" म्हणजे तू पण आमच्यात सामील होणार काय " रामभाऊनी कौतुकाने विचारले .
" होय तर ." जवळ येणाऱ्या उंदराला हाताने हुसकावीत तो हसत म्हणाला .
आता तर रामभाऊंच्या घरी रात्रीच गणपतीची पूजा आणि आरती होत होती .
हळूहळू गावात चलबिचल सुरू झाली.सुट्टीत शाळकरी मुले गणवेश घालून रामभाऊंच्या शेजारी बसू लागली .तर वृद्धही तिथे बसू लागले.
स्थानिक पत्रकाराने ही बातमी पेपरात छापली .तालुक्यातील केबल टीव्हीने त्यांची मुलाखत प्रसारित केली.रामभाऊच्या घरात गणपती एकटाच मखरात बसलेला दाखविला गेला. कलेक्टर कार्यालयात विचारणा होऊ लागली. ग्रामसेवक स्थानिक नेते तिथे येऊ लागले. मुंबईच्या प्रसिद्ध गणेशोत्सवात ही बातमी आली आणि त्यांनीही पत्रक काढून रामभाऊंना पाठिंबा दर्शविला तेव्हा प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनलने ही बातमी राज्यभर केली .
अचानक वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि रस्त्याचे काम सुरू झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी हात जोडून रामभाऊंची माफी मागितली आणि घरी जाण्यास सांगितले.खुश होऊन रामभाऊंनी हेरंबला मिठी मारली.
" जिंकलात तुम्ही रामभाऊ,  शेवटी शांततेने केलेल्या आंदोलनाचा विजय होतो हे सिद्ध केलेत तुम्ही .आज घरी जा ,तो मखरात बसलेला तुमची वाट पाहतोय .काकू नेहमीसारखा छान नैवेद्द करा मी येतोच आरतीला " असे बोलून तो वळला .
रामभाऊंनी घरी येताच मखरात बसलेल्या गणेशाची हात जोडून माफी मागितली .रात्री नेहमीसारखा छान नैवेद्य बनवून काकूंनी तो त्याच्या पुढ्यात ठेवला आणि आरतीला सुरवात केली .आरती झाली तरी हेरंब आला आला कसा नाही याची चौकशी मुलाकडे केली .त्याने आश्चर्याने कोण हेरंब म्हणून विचारले .शंकर भोसलेला हेरंब नावाचा भाचा नाही आणि शंकर भोसले नावाची व्यक्तीही मधल्या आळीत राहत नाही हे सांगितले . 
" आता रस्त्यावर बसून आंदोलन करायचेच बाकी होते का ? नशीब जुन्या काळात इंग्रजांसारखे हल्ली कोणाला  गोळ्या घालीत नाही आणि लाठीमार करत नाही . नाहीतर एक दिवशी चांगलीच पाठ शेकवून घ्याल.मला नाही ताकद राहिली पूर्वीसारखी तुम्हाला पाठीवर झोपवून फिरायची." मखरात बसलेल्या उंदराने चिडून शेपटी  आपटली.
" अरे हल्ली माणसे आपल्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहिली आहेत .निवडून दिले म्हणजे आपले काम झाले असे त्यांना वाटते . पण काम करण्यासाठी इतर मार्ग आहेत हे लक्षातच येत नाही त्यांच्या .मी त्यांना त्याची जाणीव करून दिली ." आरामात मांडी घालून बसत तो म्हणाला .
" मान्य पण म्हणून काय आपल्याला उपाशी ठेवून जायचे का ? ह्याच्या आंदोलनामुळे सकाळपासून उपवास सुरू व्हायचा आणि रात्रीच घाईघाईत केलेला नैवेद्द मिळायचा. त्यात तू  ऊनपावसाची पर्वा न करता त्यांच्या बाजूला तो बॅनर घेऊन बसायचास. मी एक दोनदा यायचा प्रयत्न केला पण दारावरची मांजर हटतच नव्हती .तू त्यांचे काम आंदोलन न करता ही करू शकला असताच " तो कुरकुरत एक फुटाणा तोंडात टाकीत म्हणाला .
" अरे मी देव आहे .जादूगार नाही .आपण फक्त इकडंचे तिकडे करतो .आणि थोडे लढू दे त्यांना. सर्वच आपण केले तर त्यांना काहीच करावे लागणार नाही . आपल्याला थोडा त्रास झाला हे कबूल आहे पण पुढची काही वर्षे आपण या सपाट गुळगुळीत रस्त्यावरून रामभाऊच्या घरी येऊ हे नक्की " तो जांभई देऊन डोळे मिटत म्हणाला .
रात्री आरती करताना मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव आपल्याला ओळखीचे का वाटतायत याचा विचार रामभाऊच्या डोक्यातुन जाणार नव्हता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Sunday, August 24, 2025

Maareesan

Maareesan
मारीसन 
दया एक भुरटा चोर.नुकताच जेलमधून सुटलाय .रस्त्यावरून तो एक मोटारसायकल चोरतो आणि चोरीसाठी घर शोधत फिरतो.फिरताफिरता एका बंद घरापाशी थांबतो. इथे काहीतरी मिळेल या आशेने तो घरात घुसतो तेव्हा वेलायुद्धाम पिल्लई  एका हातात साखळी बांधलेल्या अवस्थेत सापडतो.
तो दयाला आपला मुलगा समजून हाक मारतो.आपल्याला काही आठवत नाही म्हणून मुलगा बांधून ठेवतो असे तो दयाला सांगतो . इथून सोडवले तर तुला पंचवीस हजार रुपये देईन असेही सांगतो.दया त्याला घेऊन एटीएममध्ये जाऊन पैसे काढून घेतो पण अकाउंटमध्ये त्याला पंचवीस लाखाची रक्कम शिल्लक दिसते.वेलू पिल्लईला काही आठवत नाही तेव्हा त्याच्याकडून एटीएम कार्ड घेऊन पसार होऊ असा प्लॅन दया करतो .
वेलू पिल्लई त्याला एक दोन ठिकाणी घेऊन जातो आणि दरवेळी काहीतरी तो विसरतो.तो कधीकधी दयालाही विसरतो. दया ज्याची बाईक चोरतो तो पोलीस स्टेशमला तक्रार करतो . पोलीस बाईक शोधता शोधता एका भयानक सत्याकडे येतात.
प्रवासात वेलू पिलाई आणि दया जिथे जिथे जातात तिथे खून होत असतात.कोणीतरी सिरीयल किलर हे खून करतोय असा पोलिसांचा संशय आहे .त्या खुनाचा आणि दया ,वेलू पिल्लईचा संबंध आहे का ?  
वेलू पिल्लईला आपले उरलेले आयुष्य वृद्धाश्रमात काढायचे आहे त्यासाठी त्याने पैसेही भरले आहेत .
एक अंगावर काटा आणणारे रहस्य ज्यात वेलू पिल्लई आणि दया नकळत का होईना गुंतले आहेत .यातून ते बाहेर कसे पडणार .
फहाद फासीलने सहज आणि नैसर्गिक अभिनयाने दया रंगवला आहे पण खरी धमाल केलीय ती वेलू पिल्लई बनलेल्या वडीवेलूने . अनेक चित्रपटात विनोदी अभिनय केलेल्या या कलाकाराने एक वेगळाच वेलू पिल्लई आपल्यासमोर उभा केलाय .
सुरवातीला सरळ साधा वाटणारा हा चित्रपट नंतर मात्र अनपेक्षित रहस्याकडे वळतो .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, August 20, 2025

त्रिमूर्ती

त्रिमूर्ती  रिपोर्टिंग लाईव्ह फ्रॉम गॅलेक्सी सोसायटी 
कालच या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शिवाजी मंदिर येथे पाहण्याचा योग आला .
मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात मारलेली भरारी आणि त्यामुळे सृष्टीचा नाश होईल याची देवांना वाटणारी भीती या थीमवर आधारलेले हे नाटक .इथली नायिका ही पृथ्वीचे ,नायक मानवाचे प्रतिनिधित्व करतोय.आज मानव उच्च विज्ञान वापरून प्रत्यक्ष देवांवर ही वरचढ होण्याचा प्रयत्न करतोय .सृष्टीचा तो विकास करण्याचा प्रयत्न करतोय.
ही पृथ्वी म्हणजे एक गॅलेक्सी अपार्टमेंट आहे.ब्रह्मदेवाचा पुत्र नारद पृथ्वीवर निरीक्षक म्हणून आलाय.तो मानवाच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून आहे.आपल्या हातातून मानव निसटत चालला आहे याची जाणीव तो ब्रह्मदेवाला करून देतो . 
ब्रह्मदेवही पृथ्वीवर येतो .मानव त्यांना ओळखतो तो त्यांच्या प्रत्येक चालीवर वरचढ होतो. हतबल ब्रह्मदेव विष्णूदेवा बोलावतात  पण मानव त्यालाही धुडकावून लावतो  .सध्या विष्णूदेवही नवीन अवतार घेऊ शकत नाही त्यामुळे तोही हतबल होतो. शेवटी अखेरचे अस्त्र म्हणून शंकराला बोलावले जाते .
मानवाच्या आणि सृष्टीच्या संयोगातून विकासाचा जन्म झाला तर सृष्टीचे नुकसान होईल तिचा नाश होईल याचीच काळजी देवाला आहे .तर मानव देवाने फक्त माकड निर्माण केली त्यापासून माणूस तो स्वकर्तृत्वावर झाला असे उत्तर देतो . सती प्रथा ,स्त्री भ्रूण हत्या मानवाने थांबविली असे मानवच सांगतो . विज्ञानाने सृष्टीचा नाश नाही तर विकासच होईल हे मानव ठणकावून सांगतोय.काही प्रश्नांची उत्तरे देवांकडेही नसतात.
नाटकातील सर्व कलाकार तरुण आणि उत्साहाने भरलेले आहेत.यात नारद गळ्यात गिटार घेऊन रॅप करतो .तो आधुनिक नारद आहे .पण मूळ नारदासारखा चलाख ,कपटी नाहीय तर भित्रा आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्या आज्ञेत राहणारा आहे. ब्रह्मदेव फोटोत दिसतो तसा आहे कृश ,म्हातारा ,थकलेला  आणि हतबलही .विष्णू काळा कोट ,धोतर ,आणि डोक्यावर मुकुट घालून प्रवेश करतो तर शंकर पोरसावदा ,भोळा ,सरळमार्गी वाटतो .
आजूबाजूला वावरणाऱ्या सहकलाकारानी चांगलीच साथ दिलीय . स्टेजवर एकत्र असताना ,वावरताना ,नृत्य करताना ते कुठेही अडखळत नाहीत. स्टेजवर सेट बदलताना ही कोणाचे लक्ष वेधून घेत नाहीत .त्यांची आणि देवाची रॅप जुगलबंदी ही छान रंगली आहे.
देव आताच्या भाषेत बोलतात .त्यांचे इंग्लिश ही चांगले आहेत .त्याची वेशभूषा ही आधुनिक दाखविली असती तर फारसा फरक पडला नसता.नारद आणि ब्रह्मदेव एका बारमध्ये भेटतात यामागचे कारण ही स्पष्ट होत नाही .
पण काही त्रुटी असल्या तरी नाटकाचा विषय आणि त्याचे सादरीकरण निश्चितच कौतुकपात्र आहे. प्रायोगिक आणि व्यावसायिक यांचे एकत्रीकरण यात दिसून येते. 
नाटकाला मध्यंतर नाही ही थोडी अडचणीची बाब आहे.सलग साधारण पावणेदोन तास एका जागी एसीमध्ये बसून प्रयोग पाहणे शेवटी शेवटी कंटाळवाणे होऊ शकते.सुरवातीला प्रेक्षकांमध्ये निर्माण केलेली ऊर्जा शेवटी संपून जाते. कदाचित मध्यंतर ठेवले तर प्रेक्षक पुन्हा नव्या उत्साहाने दुसरा अंक पाहतील.
एक तरुणाईचा वेगळा प्रयोग ज्यातून काहीतरी शिकवण मिळते. एकदा पाहायला हरकत नाही.

© श्री.किरण कृष्णा बोरकर

Friday, August 15, 2025

इंटरव्हेन्शन.... रॉबिन कुक

इंटरव्हेन्शन.... रॉबिन कुक
अनुवाद ... डॉ. प्रमोद जोगळेकर 
जॅक स्टेपलटन न्यूयॉर्क शहरातील वैद्यकीय अधिकारी. प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ शॉन आणि न्यूयार्कचा आर्शबिशप जेम्स त्याचे कॉलेजचे खास मित्र. पण एकाच शहरात राहून त्याची अनेक वर्षे गाठभेट नाही. जॅकच्या पत्नीचा लाराचा, आर्शबिशप नवऱ्याचा मित्र आहे यावर विश्वास नाही .
सध्या जॅक आणि लारा वेगळ्याच काळजीत आहे .त्यांच्या चार महिन्याच्या मुलाला कॅन्सर झालाय आणि तो उपचारांना प्रतिसाद देत नाही.
सेंट पीटर्सच्या थडग्यातून शॉनला ऑसुअरी सापडते. जिझसच्या काळात मृतांच्या अस्थी गोळा करून त्या दगडासारख्या पेटीत ठेवल्या जात. त्यालाच ऑसुअरी म्हणतात . त्या ऑसुअरीत काय आहे हे जगाला कळले तर हाहाकार होईल आणि लोकांची चर्चवरून  श्रद्धा उडेल असे आर्चबिशप जेम्सला वाटते .तो शॉनला या शोधापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो .त्यासाठी तो जॅककडे मदत मागतो.
त्या ऑसुअरीत असे काय आहे ज्याने इतिहास बदलला जाईल. यात जॅकचे नेमके काम काय आहे .हजारो वर्षांपूर्वीचा डीएनए आताच्या जगात कोणाशी मॅच होतोय ? 
वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडविणारी थरारक कादंबरी 

Wednesday, August 6, 2025

टेल टेल

टेल टेल .…जेफ्री आर्चर
अनुवाद ...लीना सोहोनी
मेहता पब्लिकेशन हाऊस
जेफ्री आर्चरने आपल्या अनुभवातून अनेक कथा ,कादंबरीचे लिखाण केले आहे.टेल टेल हा त्यांचा वेगवेगळ्या अनुभवातून लिहिलेला कथासंग्रह आहे.
एकमेवाद्वितीय ही बरोबर शंभर शब्दाची रहस्यमय कथा आहे. 
इटलीतील छोट्याश्या सुंदर गावात मेयरचा खून होतो आणि प्रत्येक व्यक्ती त्याचा खून मीच केला असे त्या तरुण पोलीस अधिकाऱ्याला सांगत असते पण त्याचा खून कोणी कसा केला ते जाणून घेण्यासाठी मेयरला कुणी मारले ही कथा वाचायला हवी.
दमास्कसच्या वाटेवर या कथेत लेखकाचा मित्र आपल्या वडिलांचा उद्योग पुढे न चालवता बिशप का बनतो हे वाचून आपल्याला धक्का बसतो .
द हॉलिडे ऑफ अ लाईफ टाईम मध्ये निवृत्त मध्यमवर्गीय  पतिपत्नी इन्शुरन्स कंपनीला कसे गंडवून लाखो रुपये कमावतात याची सुरस कहाणी आहे आणि लेखकाने या कथेचे तीन वेगवेगळे शेवट लिहिले आहेत.
सिनियर व्हाईस प्रेसिडन्ट ही दिर्घ कथा आहे .एका बँकेचा सिनियर व्हाईस प्रेसिडन्ट आपल्या कधीही न भेटलेल्या ग्राहकाला कसे गंडावतो याची कहाणी आहे.

तर वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या जमिनीचा फायदा एक तरुण पार्किंगसाठी कसा घेतो याची सुरस कहाणी आपल्याला द कार पार्क अटेंडन्ट मध्ये आहे.
या सर्व कथा आपल्याला शेवटी आश्चर्याचा  अनपेक्षित धक्का देतात.

Sunday, August 3, 2025

द रेसिडन्स

The Residence
द रेसिडन्स
नावावरून ही एक फॅमिली सिरीज वाटत होती पण बघायला सुरवात केली आणि संपूर्ण सिरीज पाहिली.
अगाथा ख्रिस्तीच्या रहस्य मर्डर मिस्ट्रीसारखी ही सिरीज आपल्याला शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. तर्कशास्त्र आणि खोलवर निरीक्षण करून केलेला तपास हे सिरीजचे वैशिष्ट्य आहे.
ए. बी. विंटर हा व्हाईट हाऊसचा चीफ अशर.अशर म्हणजे व्हाईट हाऊसमधील कर्मचारी ज्यात शेफ ,सफाई कामगार ,मेंटेनस ह्या सर्वांचा प्रमुख.व्हाईट हाऊसमधील होणाऱ्या पार्ट्यांची जबाबदारी त्याचीच .जेवण कसे असावे , सजावट कशी असावी . ह्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे . 
आज व्हाईट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर आणि मंत्री जेवायला येणार आहेत .एक दोन हॉलिवूड स्टारही त्यात आहेत.चीफ अशर विंटर सगळ्या व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून आहे . 
अचानक प्रेसिडन्टच्या सासूला एका व्यक्तीची बॉडी त्या खोलीत दिसते आणि ती जोरात ओरडते.
तपास करताच ती व्यक्ती विंटर असल्याचे कळते.व्हाईट हाऊसमध्ये खाली पार्टी चालू आहे आणि वर चीफ अशरचा मृत्यू झालाय. कायद्यानुसार स्थानिक पोलिसांवर त्याच्या तपासाची जबाबदारी येते आणि डिटेक्टिव्ह कॉर्डेलिया कपला बोलावण्यात येते. कप ही निवृत्त झालेली आहे पण पोलिसांची कन्सल्टंट म्हणून काम करते.ती बाई दिसण्यात बुटकी बेढब अजागळ आहे पण हुशार आणि कठोर आहे . ती मुळात एक पक्षी निरीक्षक आहे . तपास करताना ती पक्षी निरीक्षण ही करते आणि त्याचा संबंध तपासाशी जोडते.
ती अतिशय कुशलतेने तपास करते आणि विंटरची आत्महत्या नसून खून  आहे हे सिद्ध करते. यात संपूर्ण व्हाईट हाऊसचा अडकून बसतो प्रत्येकाकडे विंटरला मारायचे कारण आहे .यात प्रेसिडेंटचा सनकी भाऊ आहे .साफसफाई करणारी बाई आहे .प्लंबर आहे .
एकूण आठ भागाची ही सिरीज आपण एका बैठकीत पाहू शकतो इतकी उत्कृष्ट आहे .या वर्षीच्या इम्मी अवॉर्डसाठी तिचे नॉमिनेशन झाले आहे.
ही सिरीज हिंदी भाषेत डब आहे पण हिंदीतही तिचे संवाद सुरेख आहेत. विशेषतः डिटेक्टिव्ह कपचे प्रश्न विचारणे आणि एकटक साक्षीदारांकडे पाहणे .
चुकवू नये अशी ही सिरीज हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

Tuesday, July 29, 2025

ट्रिगर

Trigger
ट्रिगर 
जेव्हा सगळीकडे अराजकता माजते तेव्हा बंदूक हातात घ्यावीशी वाटते आणि तीच बंदूक तुम्हाला कुरियरद्वारे दारात आली तर..?
कॉलेजमध्ये काही ठराविक मुलांवर रॅगिंगचालू आहे.त्याने सरांकडे तक्रार केली आहे पण त्याचा काहीच उपयोग नाही. हातात बंदूक आली तर सगळ्यांना ठार मारीन असे त्याला वाटत असते.
हॉस्टेलमध्ये राहणार तरुण आजूबाजूच्या रूममधून चाललेल्या गोंगाटाला कंटाळला आहे. त्याचा अभ्यास होत नाही.उलट  त्यालाच मारहाण होते.बंदूक हाती आली की सगळ्यांना ठार मारायची त्याची इच्छा आहे.
पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने एका कंपनीत पैसे गुंतविले आणि ती कंपनी बंद झाली .इच्छा असूनही पोलीस अधिकारी कायद्याने त्यांना शिक्षा करू शकत नाही .तो बंदूक घेऊन त्यांना मारायला जातो.
कोरियात सामान्य नागरिकांना बंदूक वापरण्यास बंदी आहे. ली डो पूर्वी सैन्यात होता.बंदुकीचा उपयोग/ दुरुपयोग त्याला माहितीय म्हणून पुन्हा कधीही बंदूक न उचलण्याची शपथ घेतलीय आणि आता पोलिसात साधा ऑफिसर म्हणून राहतोय. शहरात एका हॉस्टेलमध्ये प्रचंड गोळीबार होतो तेव्हा तिथे जाऊन चौकशी करताना काडतूसाचा मोठा साठा आढळतो.अधिक चौकशी करताना कोरियात अनेकांना अश्या बंदूक फ्रिमध्ये मिळाल्यात असे कळते.
मून बॅक या सर्व करस्थानाचा मुख्य सूत्रधार आहे. तो सर्वाना फुकट बंदूक वाटतो. समाजात क्रांती होईल असा त्याचा विश्वास आहे..अन्याय दूर करण्यासाठी बंदूक वापरावीच लागेल असे त्याला सिद्ध करायचे आहे.
खरोखरच बंदुकीच्या जोरावर अन्याय दूर होईल ?
ली डो हे सर्व थांबविण्यासाठी पुन्हा बंदूक हाती घेईल ?
एक अस्वस्थ करणारी ही कोरियन सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, July 26, 2025

केरळ क्राईम फाईल्स 2

Kerala Crime Files
केरळ क्राईम फाईल्स 2
क्राईम थ्रिलरच्या बाबतीत केरळ चित्रपटसृष्टी नेहमीच आघाडीवर राहिली आहे .केरळ क्राईम फाईलचे दोन्ही सिझन उत्कृष्ट आहेत. सिझन दोनमध्ये थोडा वेगळेपणा आहे .
इन्स्पेक्टर अंबिली राजूला निवृत्त व्हायला दोन वर्षे बाकी आहे.एक प्रामाणिक आणि सनकी इन्स्पेक्टर म्हणून त्याची ओळख आहे.केरळ पोलिसखात्यात अनेक ऑफिसरच्या बदली झाल्यात.त्यात अंबिली राजूचे नाव आहे. पण तो अचानक गायब झालाय.सिनियर इन्स्पेक्टर वर्गीसची बदली त्याच्या विभागात झालीय.
आजारी आणि निवृत्त  पोलीस कुत्र्यांचे शेल्टर होम आहे.शहरात नुकतीच एका ज्वेलर्सकडे चोरी झाली आणि तपासकार्य करणारा कुत्रा अचानक विचित्र वागू लागतो . तो आजारी असल्यामुळे त्या शेल्टरमध्ये आलाय.डॉक्टरने त्याची तपासणी करून एक्सरे काढायला सांगितले होते.
अंबाली राजूचा शोध चालू होतो. हा शोध कुठून सुरू होतो आणि कुठे संपून त्यातून कोणते सत्य बाहेर पडते हे पाहून आपण हादरून जातो.
अतिशय रोमांचकारी तपास शोधात पोलिसांसोबत आपण ही गुंतत जातो. अतिशय शांत पण वेगवान कोणतेही हिंसक दृश्य नसलेली ही सिरीज हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.