Tuesday, March 25, 2025

खाकी

खाकी ..द बंगाल चाप्टर
Khakee : The Bengal Chapter
नीरज पांडेंची कलाकृती आहे म्हणजे त्यात वेगळेपणा असणारच आणि ती पाहायलाच हवी.या सिरीजमध्येही त्याने आपल्याला निराश केले नाही.
खाकीचा हा दुसरा सीजन पहिल्या सीजनप्रमाणेच थरारक आणि डावपेचांनी भरलेला आहे.पण एक प्रामाणिक पोलीस अधिकारी काय करू शकतो हे खाकीमध्ये पाहायला मिळते.
शंकर उर्फ बाघा कोलकत्ताचा डॉन .अर्थात सत्ताधारी पार्टीचा वरदहस्त त्याच्यावर आहेच. कोलकात्यातील प्रत्येक काळ्या धंद्यात त्याचा सहभाग आहे. गुन्हेगारीवर  नियंत्रण ठेवण्यासाठी एसआयटी प्रमुख म्हणून सप्तर्षी सिन्हाची नेमणूक होते.सिन्हा प्रामाणिक आणि कायद्यानुसार वागणारा पोलीस ऑफिसर आहे.तो बागाच्या ठिकाणावर धाड मारायचे सुरू करतो. म्हणून बाघाचे  विश्वासू साथीदार रणजित आणि सागोर तालुकदार  बागाच्या विरोधात जाऊन सिन्हाची हत्या करतात.
सगळे पोलीस आता बागाच्या मागे लागतात.  सत्ताधारी पक्षाचा आमदार बरून रॉय बाघाच्या जागी सागोर आणि रणजितला नेमतो. इकडे सिन्हाच्या जागी अर्जुन मैत्राची नियुक्ती होते. तो बागाचे एन्काऊंटर करतो . पण बंगालची गुन्हेगारी आता सागोर आणि रणजितच्या हातात आहे आणि त्यांना मदत करायला बरून रॉय आहे. सागोरला सत्ताधारी पक्षाचे तिकीट मिळालाय.
ही गुन्हेगारी वाढत जाणार हे लक्षात घेऊन अर्जुन एक वेगळाच डाव खेळतो आणि याची कल्पना काही मोजक्याच ऑफिसर्सना असते.
अर्जुन यात यशस्वी होईल ?? बंगालमधील रणजित आणि सागोरचे गुन्हेगारी वर्चस्व संपुष्टात येईल.
आठ भागाची ही सिरीज पाहताना आपल्या अंगावर काटा येतो.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे.-

Monday, March 24, 2025

ऑफिसर ऑन ड्युटी

Officer On Duty
ऑफिसर ऑन ड्युटी
सर्कल इंस्पेक्टर हरिशंकर पुन्हा ड्युटीवर जॉईन झालाय. हरिशंकर उर्फ हरी गरम डोक्याचा आहे. त्याच्या याच गरम स्वभावामुळे मोठ्या मुलीने आत्महत्या केलीय असे त्याची पत्नी गीता समजते. 
चंद्राबाबू बस कंडक्टर . त्याची बायको आजारी म्हणून तो मुलीची सोन्याची चेन विकायला गेला पण ज्वेलर्सने ती चेन खोटी आहे असे सांगितले. हे सर्व प्रकरण हरीकडे आले.त्याने या प्रकरणाची खोलवर चौकशी केली तेव्हा अजून तीन चेन सापडल्या.चंद्राबाबूकडे असलेली चेन खोटी होती हे त्याच्या मुलीने मान्य केले आणि नंतर तीने आत्महत्या केली.
कर्नाटक पोलीस इन्स्पेक्टर जोसेफने ही काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. तर हरीच्या मोठ्या मुलीनेही आत्महत्या केली होती. 
थॉमस हा हरीचा सहकारी . त्याने श्यामला संशयित आरोपी म्हणून पकडले होते .श्यामच्या लॅपटॉपमध्ये थॉमसच्या मुलीचे काही व्हिडिओ होते आणि त्यात हरीच्या मुलींचेही व्हिडिओ होते.ते पाहूनच हरी भडकला आणि चौकशीत त्याने श्यामला ठार मारले .पण थॉमसने सर्व आरोप स्वतःवर घेऊन हरीला वाचविले.या प्रकारणामुळेच त्याच्या मुलीने आत्महत्या केली होती.
आज बऱ्याच वर्षांनी थॉमस सुटून आलाय पण तो घरी येताच काही तरुण मुलांनी त्याची आणि बायकोची हत्या केली.ते सर्व श्यामचे मित्र आहेत . त्यांनी श्यामच्या हत्येचा बदला घेतलाय पण हरीनेच श्यामची हत्या केलीय असे त्यांना कळते आणि आता ते हरीच्या मागावर आहेत.
हरी हळूहळू चेन प्रकरणाचे धागे जोडत श्यामच्या मित्रांपर्यंत पोचतो आणि हे प्रकरण अनपेक्षित वळणावर पोचते ज्याची कल्पनाही हरीने केली नाही.
मल्याळम सिनेमात नेहमीच अनपेक्षित धक्के आपल्याला मिळतात.यात हिंसाचार कमी असतो आणि रहस्य जास्त असते . एक चांगला थ्रिलर चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत पहा .

Saturday, March 22, 2025

अस्तित्व

अस्तित्व
शहरात आज तंग वातावरण होते. जिकडे बघावे तिकडे पोलीस . सायकल ,मोटारसायकलवरून जाणाऱ्यांची चौकशी होत होती.भले त्यांच्यासोबत स्त्री लहान मुले असो. संशय आलेल्या व्यक्तींना बाजूला काढले जात होते. शहरातील मस्जिद ,देवळे , महापुरुषांचे पुतळे याना विशेष संरक्षण दिले गेले होते. भिकाऱ्यांना मारून हटवले जात होते. तर हॉस्पिटलजवळ मोफत अन्नदानही आज बंदच दिसत होते.
" वाईन शॉपतरी उघडे असू दे बाबा " बंड्या स्वतःशी पुटपुटत हातातील कापडी पिशवी खिश्यात सारत चालला होता.
" परिस्थिती कोणतीही असो वाईन शॉप उघडेच राहणार बाळा,  ते फक्त ड्रायडे ला बंद असतात " अचानक बाजूने आवाज आला तसा बंड्या दचकला.
त्याच्या बाजूनेच तो चालत होता. जीर्ण झालेले कपडे, लांबलचक पांढरी शुभ्र दाढी , गळ्यात माळ ,हातातील काठीचा आधार घेत तो बंड्याच्याच बाजूने चालत होता. बंड्याने त्याच्याकडे पाहतच तो हसला.
" बाबा तुम्ही सुद्धा ?" बंड्या अंगठा ओठाजवळ नेऊन आश्चर्याने विचारले.
" नाही रे , आयुष्यात कधीही मद्याला स्पर्श केला नाही मी. हो पण दुसर्यांना रोखलेही नाही ." त्या म्हाताऱ्याने हसत हसत सांगितले .
" मग इतक्या तणावपूर्ण वातावरणात काय करतायत " 
" बघायला आलोय काय होणार ते "
" काय होणार ? येत्या  काही वर्षांत यादेशातून आपले इतिहासातील शत्रू नाहीसे होणार . "  बंड्या हसत म्हणाला.
" कदाचित इतिहास देखील अस्तित्वात राहणार नाही. कारण त्यासाठी लागणारे पुरावेही नष्ट होतील " कुत्सितपणे तो म्हातारा म्हणाला.
"आमचे महापुरुष नेहमीच आमच्या मनात राहतील." बंड्या छाती फुगवून म्हणाला.
" तुमच्या मनात तर तुमचे देवही आहेत . पण काहीजण अजूनही देव भूत अस्तितवात नाही असे म्हणतात." तो म्हातारा आजूबाजूला पाहत म्हणाला.
" बाबा तुम्ही घाबरू नका .इथे म्हाताऱ्यांना कोणीच हात लावत नाही ." बंड्या आश्वासक स्वरात म्हणाला.
" पण स्त्रियांना लावतात . मग ती सात वर्षाची असो की साठ वर्षाची " उपरोधिकपणे हसत म्हातारा उद्गारला.
" बाबा,  नको त्या विषयांवर चर्चा नको "बंड्या चिडून म्हणाला. 
" का रे बाबा ? तुला घेतल्यावरच अश्या गोष्टींवर चर्चा करावीशी वाटते का ? " अंगठा ओठाजवळ नेऊन तो म्हातारा म्हणाला.
" अरे  तुम्ही ज्या महापुरुषांची पूजा करता ना ते किती महान होते याची तीळभरही कल्पना नाही तुम्हाला ",आठवणीत हरवून जात तो म्हातारा पुटपुटला.
" दाढी पांढरी झाली म्हणून सर्व  इतिहास  येतो का तुम्हाला " ?  बंड्या चिडला
" बाळा आज तुझे पणजोबा ज्या वयाचे असते त्यापेक्षा जास्त वयाचा असेन मी .इतिहास  कोळून प्यायलोय किंबहुना इतिहास मीच लिहिला आहे असे समज." म्हातारा हसत म्हणाला.
" मग त्यालाही तुम्ही ओळखत असाल ? " पोलीस बंदोबस्तात असलेल्या त्या कबरीकडे बोट दाखवून बंड्याने विचारले.
" मी त्यांनाही लहानपणापासून ओळखतो."अश्वारूढ असलेल्या त्या तेजस्वी मूर्तीकडे काठी दाखवत म्हातारा म्हणाला. पण बोलताना त्याची काठी थरथरत होती आणि नजरेत भीतीची एक चमक क्षणात निघून गेली हे मात्र बंड्याला दिसले नाही.
" त्यांना कोण ओळखत नाही " पुतळ्याला मनोभावे नमस्कार करीत बंड्या हळवा झाला.
" पण तुझी मुले ओळखतील का त्यांना " पुन्हा कुत्सित स्वरात म्हातारा म्हणाला." हा तोच महापुरुष आहे ज्याने सामान्य जनतेवर जुलूम होताच तलवार उपसली. अन्यायाविरुद्ध लढला.लोकांना स्वाभिमानाने जगायला शिकवले.सैन्य उभारले. वाहतुकीचे मार्ग बनविले.समुद्रावर सैन्य निर्माण केले. स्त्रियांना हक्क दिले." म्हातारा आवेशात म्हणाला.
" बघा बाबा ,तुम्हाला ही ते मान्य आहे ना ? मग त्यांच्या शत्रूच्या आठवणी निशाण्या का आपण ठेवायच्या  " बंड्याचा स्वर समजावण्याचा झाला.
" कारण तुझ्या पुढच्या पिढीला हे कळावे म्हणून. नाहीतर  तुझा मुलगा किंवा  तुझा नातू उद्या विचारेल हे महापुरुष कोणाच्या विरुद्ध लढले.त्यांच्या शत्रूंचे काहीच पुरावे दिसत नाहीत तेव्हा काय उत्तर द्याल ." म्हातारा हसत म्हणाला .
" चल उशीर झाला मी निघतो " अचानक तो म्हातारा म्हणाला.
" बाबा तुमचे नाव तरी सांगा. नाहीतर घरी चला चहा प्यायला ." बंड्याने त्यांना प्रेमाने विचारले.
" मी असा माणूस आहे ज्याकडे सर्व काही होते पण शेवटपर्यंत तो अपयशी राहिला. आपले घरदार सोडून तो इथे येऊन राहिला आणि आता स्वगृही जाऊ शकत नाही .मी एक कमनशिबी आहे जो फक्त निंदा सहन करीत राहणार " खिन्नपणे मान हलवीत तो म्हातारा पुटपुटला आणि समोरच्या गर्दीत दिसेनासा झाला .

शहराबाहेर असणाऱ्या मोठ्या कार्पोरेट  ऑफिसमध्ये तो म्हातारा भव्य टेबलमागे बसलेल्या दोन व्यक्तींपुढे उभा होता. यशवंत मनोहर राज उर्फ यमराज बोटात बुलेटची किचेन गरागरा फिरवत त्याच्याकडे छद्मीपणे पाहत होते.तर बाजूला त्यांचे सचिव चिंतामणी त्रंबक गुप्त उर्फ चित्रगुप्त लॅपटॉपवर बोटे चालवत होते.
" फिटली का हौस फिरून यायची . बरे जायचे तर दिल्लीला तुमच्या मूळगावी जायचे ते नाही तर म्हणे मला माझीच कबर बघायला जायचे आहे .आज मरून साडे तीनशे वर्ष झाली असतील पण शहेनशहा बनायची हौस फिटली नाही " यमराज तावातावाने बोलत होते.
" महाराज माझ्या कबरीवरून वाद चालू आहेत असे ऐकले म्हणून तुमच्याकडे पॅरोलसाठी अर्ज केला . खाली परिस्थिती बिकट आहे .पुढे अजून बिकट होतील.खरे सांगू हा औरंगजेब होता म्हणूनच शूर महापुरुष निर्माण झाले . त्यानंतर आमच्याविरुद्ध लढायला मराठ्यांच्या अनेक पिढ्या तयार झाल्या .पण उद्या आमचेच अस्तित्व नष्ट झाले तर ?"  औरंगजेबाने उदास होऊन विचारले आणि केबिनच्या बाहेर पडला.

Friday, March 21, 2025

woman of the dead season 2

Woman Of The Dead 2
वुमन ऑफ द डेड 2
ज्यांनी पहिला सीजन पाहिला आहे त्यांना हा दुसरा सीजन लक्षात येईल.
ब्लूमने आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेऊन आता दोन वर्षे झाली आहेत.तिचा मृत व्यक्तींना सजवून कॅफिनमध्ये ठेवायचा व्यवसाय अजूनही चालू आहे. तिचे गाव छोटे असल्यामुळे सगळेच सर्वाना ओळखतात .
आज दोन वर्षानंतर स्मशानात कोणाचीतरी कॅफिन बाहेर काढायची तयारी चालू आहे.योगायोगाने  त्याच कॅफिनमध्ये ब्लूमने आपल्या पतीच्या खुन्याचे तुकडे करून भरले आहेत. तिचा सहकारी ही गोष्ट सांगतो आणि ब्लूम रात्रीच त्या कॅफिनमधील तुकडे पळविण्याचा प्रयत्न करते.पण काही तुकडे राहून जातात आणि त्याची ओळख पटते.
आता संशयाची  सुई ब्लूमकडे वळते. पोलीस ब्लूम आणि तिच्या सहकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतात . त्याचवेळी ब्लूमच्या तरुण मुलीचे निशाचे अपहरण होते. निशाच्या सुटकेच्या बदल्यात ब्लूमकडे काही व्हिडिओची मागणी केली जाते ज्याची काहीच माहिती तिला नाही.
ब्लूमला आता स्वतःसोबत आपल्या मुलीचीही सुटका करायची आहे.ती मुलीच्या सुटकेच्या प्रयत्नात असताना काही अनपेक्षित सत्य तिच्या समोर येतात आणि ती हादरून जाते.
एका आईने प्राण पणाला लावून आपल्या मुलीच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न पहायचे असतील तर ही सिरीज नक्की पहा.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे.

Tuesday, March 18, 2025

डब्बा कार्टेल

Dabba Cartel
डब्बा कार्टेल 
विवा लाईफ सोसायटी शहरातील उच्चभ्रू सोसायटी.तिकडचे बहुतेक रहिवासी विवालाईफ फार्मामध्ये कामाला आहेत. सध्या विवालाईफ फार्माचा मॉडेला ड्रग संशयाच्या नजरेत आहे. 
एक ड्रग इंस्पेक्टर पाठक विवालाईफच्या ड्रगचा तपास करत आहे. एक तरुण पोलीस इंस्पेक्टर प्रीती त्याच्या सोबतीला आहे. 
राजी विवालाईफमध्ये राहते.तिचा नवरा विवा फार्मामध्ये कामाला आहे.तो जर्मनीला स्थायिक होण्याची स्वप्न बघतोय. राजीचा टिफिनचा व्यवसाय आहे.ती काही लोकांना टिफिनमधून स्पेशल पावडर देते.सेक्स पॉवर वाढवायची पावडर आहे असे ती सांगते. विवालाईफमध्ये मोलकरणीचे काम करणारी माला तिला टिफिनसाठी मदत करते. तिचा मित्र तिला ब्लॅकमेल करून कोकेन विकायला देतो.  शाहिदा नावाची ब्रोकर ते कोकेन पकडते. पण ते साधारण चाळीस लाखाचे कोकेन मालाच्या हातून नष्ट होते .आता त्या कोकेनसाठी मालाचा मित्र मारला जातो आणि त्याचा बॉस चव्हाण राजी माला च्या मागे लागतो.
त्याचवेळी बा उर्फ शैला त्यांच्या मदतीला येते. शैला राजीची सासू आहे. ती एकेकाळी ड्रग कार्टेलमध्ये होती.ती राजी माला आणि शाहिदाला घेऊन टिफिनच्या माध्यमातून ड्रग पोचवते.
विवा फार्मा आपला संशयित माल मॉडेला सगळ्या गोडावूनमधून नष्ट करते पण एका गोडावूनमध्ये एक लॉट शिल्लक असतो .राजीचा नवरा तो लॉट गोडावूनमधून काढतो पण प्रीती त्याच्या पाठलागावर आहे म्हणून तो माल सोसायटी आणतो.
शैला जमा झालेले पैसे वरुणाकडे आणते. वरूणा एके काळी विवा फार्मामध्ये होती आत्ता तिचा नवरा तिथे मुख्य अधिकारी आहे. वरूणाचे सितारा नावाचे ब्युटीक कर्जात आहे . ती ते पैसे कर्ज फेडण्यासाठी वापरते.
चव्हाण पुन्हा पैश्यासाठी शैलाच्या मागे लागतो .वरूणा त्यांना मॉडेलाच्या गोळ्यातून नवीन ड्रग बनविण्याची कल्पना मांडते. आणि सर्व मिळून सोसायटीत लपवलेला मॉडेलाचा लॉट चोरतात आणि त्यापासून नवीन ड्रग तयार करतात.
आता मार्केटमध्ये तेच ड्रग फेमस झालेय.चव्हाणचे कोकेन कोणी घेत नाही आणि चव्हाणचा बॉस चिकू याला सर्व माहीत झालंय.
राजीच्या डोहाळ जेवण समारंभाला चिकू शैला ,राजी, माला, वरूणा आणि शाहिदाला उचलून आपल्या फार्म हाऊसवर आणतो आणि आपली योजना त्यांच्यासमोर मांडतो.
स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव वाचविण्यासाठी सर्वाना ती योजना मान्य करण्यावाचून पर्याय  नसतो.
पाठक आणि प्रीती मीडियाला सर्व पुरावे देऊन विवा फार्माला उघडे पाडतात.
एका साध्या टिफिनचा प्रवास ड्रग ट्रॅव्हलिंगसाठी कसा होतो हे पाहण्यासारखे आहे.
शबाना आझमी शैलाच्या प्रमुख आणि पॉवरफुल भूमिकेत आहे. तिच्या साथीला ज्योतिका ,सई ताम्हणकर आहेत.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत ही  रोमांचकारी सिरीज आहे.

Friday, March 14, 2025

सुझल 2

सुझल 2
SUZHAL 2
नंदिनीची केस चेल्लाप्पा लढतोय.ते गावातील सिनियर वकील आहेत. नंदिनी खुनाच्या आरोपातून सुटेल याची त्यांना खात्री आहे.इंस्पेक्टर  चक्रवर्ती उर्फ सक्काराई नंदिनीचा मित्र आहे आणि त्याचे संगोपनही चेल्लाप्पाना केलंय.
त्या दिवशी सक्काराइ चेल्लाप्पाला भेटायला त्यांच्या गावाबाहेरच्या कॉटेजमध्ये जातो.कॉटेज आतून बंद असते आणि खिडकीतून सक्काराईला चेल्लाप्पाचा मृतदेह दिसतो .तो पोलिसांना बोलावतो आणि दरवाजा तोडून आत घुसतो तेव्हा चेल्लाप्पाच्या डोक्यात गोळी शिरून त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. प्रथमदर्शनी ही आत्महत्या आहे असे लोकल पोलीस इंस्पेक्टर मूर्थीचे म्हणणे असते .पण एका बंद कपाटात मुत्थू नावाची तरुणी हातात पिस्तुल घेऊन सापडते.
मुथ्यू जरी कपाटात सापडते तरी कपाटाचा दरवाजा बाहेरून कोणी बंद केला हा प्रश्न आहेच.हाय प्रोफाइल केस आहे म्हणून वरिष्ठ सक्कराईलाच ह्या केसची जबाबदारी देतात आणि मूर्थीला त्याचा सहाय्यक बनवितात.
प्रसारमाध्यमातून चेल्लाप्पाच्या खुनाची बातमी पसरते आणि सात तरुणी चेल्लाप्पाचा खून आपण केलाय हे सांगून पोलिसांच्या स्वाधीन होतात .आता त्या आठही तरुणी तुरुंगात जातात जिथे नंदिनी आहे.
सक्काराईला खात्री आहे यातील कोणत्याही तरुणीने खून केला नाही .सगळ्याजणी वेगवेगळ्या शहरातून आल्यात ,सगळ्यांचे राहणीमान वेगळे आहेत ,व्यवसाय नोकरी वेगवेगळी आहे. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध दिसत नाही. पण सर्व अनाथ आहेत.वसतिगृहात वाढल्या आहेत.
सक्काराई नंदिनीच्या मदतीने त्यांची माहिती काढतो आणि एक हादरविणारे सत्य त्याच्या समोर येथे.खरे तर या प्रकरणाची सुरवात दहा वर्षांपूर्वीच झालेली असते.एक मोठे कारस्थान यामागे दडलेले आहे.
साध्या खुनापासून सुरू झालेले हे प्रकरण अनपेक्षित वळणे घेत सत्य बाहेर काढते.
प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे.ज्यांनी पहिला सीजन पाहिलाय त्यांना यातील प्रमुख पात्रे सहज कळतील.

Wednesday, March 12, 2025

फतेह

फतेह
Fateh
भारतात एक सरकारी संस्था आहे जी बेनामी आहे.तिचे एजंटही बेनामी आहेत.फतेहसिंह हा त्यातील एक .देशासाठी त्याने अनेक घातकी कामगिऱ्या पार पाडल्या आहेत.आता तो ही निवृत्त होऊन पंजाबमधील एका छोट्या गावात डेअरी सुपरविझरचे काम करतोय.
निमरीत ही त्याच्या शेजारी राहणारी तरुण मुलगी.तिचे मोबाईल शॉप  आहे.पण ती गावातील लोकांना खाजगी कंपनीद्वारे कर्ज देण्याचे काम करते. पण लोकांचे कर्ज फिटत नसते.यात काही मोठा घोटाळा आहे हे तिच्या लक्षात येते आणि ती दिल्लीला येते.
पण तिथे ती गायबच होते. फतेह सिंह यात लक्ष घालतो तेव्हा हा मोठा सायबर घोटाळा आहे हे त्याच्या लक्षात येते. रजा ,सत्यप्रकाश अशी मोठी माणसे यात गुंतलेली आहेत.
फतेहला पुन्हा आपले कॉन्टॅक्ट वापरून हे प्रकरण उघडकीस आणायचे आहे.याकामी त्याला खुशी मदत करते .पण दुर्दैवाने तेच यात अडकले जातात.
फतेहसिंह पुन्हा आपले जुने रूप धारण करून सर्वाना शिक्षा देईल का ? 
फतेहसिंहला पाहताना डेंझल वॉशिंग्टनच्या  इक्विलायझरची आठवण येते.
सोनू सूदने फतेहसिंहची मुख्य भूमिका केली आहे .तोच चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.