Saturday, November 6, 2021

द कृष्णा की.... अश्विन संघी

द कृष्णा की.... अश्विन संघी
अनुवाद...डॉ. मीना शेटे- संभू
अमेय प्रकाशन
श्रीकृष्ण आपल्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतची कहाणी आपल्याला सांगतोय पण त्याचवेळी वर्तमानकाळात अनिल वर्षने राजस्थानातील छोट्या गावात एका साध्या घरात आपल्याला सापडलेल्या पुरातन वस्तूचा अभ्यास करीत होता .तो भारतातील सर्वात तरुण आणि हुशार सांकेतिक भाषा आणि लिपीतज्ञ आहे.त्याच्यासमोरच एक चौरसाकृती मुद्रा पडली होती.कोणत्यातरी तबकडीच्या खाचेत बसणारी ती मुद्रा होती.त्याचा अभ्यास चालू असतानाच त्या अनोळखी तरुणाने त्याच्या घरात प्रवेश केला होता आणि काही कळायच्या आत त्याला बेशुद्ध केले होते.त्यानंतर त्याला काटकोनात बसवून त्याच्या कपाळावर एक रबरी शिक्का मारला.त्यामुळे वर्षनेच्या कपाळावर एका चक्राची खूण उमटली. मग एका धारधार चाकूने त्याच्या डाव्या पायाच्या टाचेत घुसवून मास बाहेर काढले.मग त्याच रक्ताने एक श्लोक भिंतीवर लिहून ती मुद्रा घेऊन बाहेर पडला .
रवी मोहन सैनी हा वर्षने मित्र .खून होण्यापूर्वी काही तास आधी तो आपल्या मित्राला भेटला होता .रवी सैनी पुराणकथाचा इतिहास शिकवीतो. महाभारत श्रीकृष्ण यांच्यावर त्याचा सखोल अभ्यास होता .प्रवासात अनिल वर्षनेने त्याला आपल्याकडील मुद्रा दाखविली होती आणि अजून तीन मुद्रा कुठे आहेत हे ही सांगितले .या मुद्रा द्वारकाकालीन असाव्या असा त्याचा अंदाज होता .कदाचित द्वारकेत प्रवेश करण्याचा पासपोर्ट किंवा एका पुरातन रहस्याची चावी .
वर्षनेचा मारेकरी आता उरलेल्या तीन मुद्रांच्या मागे आहे . त्याला माहितीय त्या मुद्रा कोणाकडे आहेत आणि त्या ताब्यात घेताना त्यांच्या मालकांचीही वर्षने सारखीच गत होणार आहे .
राधिकासिंग ही महिला अधिकारी वर्षनेच्या खुनाचा तपास करतेय.सर्व पुरावा रवी सैनीच मारेकरी असल्याचे स्पष्ट करतोय.तिने रवीच्या कॉलेजमधूनच त्याला अटक केलीय .
मुद्रा गायब झाल्याचे ऐकून बाकीच्या मुद्रा शोधण्याचा ही प्रयत्न होणार हे रवी सैनी ओळखतो आणि आपल्या विद्यार्थिनीच्या मदतीने तो तुरुंगातून पळ काढतो .पण तो ज्यांना भेटायला जातो त्यांचा आधीच खून होऊन मुद्रा गायब झालेली असते .
असे कोणते रहस्य आहे जे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला जगापासून लपवून ठेवायचे आहे आणि त्यासाठी त्याने इतकी गुंतागुंतीची रचना करून ठेवली आहे .
अश्विन संघीने नेहमीप्रमाणे इतिहास पौराणिक आणि वर्तमानाचा सुंदर मिलाफ करून ही कादंबरी आपल्यासमोर मांडली आहे .यात अनेक पात्र आहेत हळूहळू सर्वांचा संबंध जुळत जातो. एक श्वास रोखून ठेवणारा पाठलाग आपल्याला वाचायला मिळतो.
 श्रीकृष्णाने आपल्या जन्माआधीपासून कथा सांगायला सुरुवात केली. त्याचा अवतार घेण्याचे कारण..., कंसाचा मृत्यू...मथुरेतून द्वारकेत येणे.यादव कुळाचा इतिहास ..त्यांचा नाश ..महाभारताचे युद्ध ..हे सर्व काही तो आपल्याला सांगत असतो .
डॅन ब्राऊनच्या परंपरेतील भारतीय लेखकाची ही थरारक कादंबरी .