Saturday, February 18, 2023

टार्गेट असद शाह

टार्गेट असद शाह....वसंत वसंत लिमये 
इंद्रायणी साहित्य पुणे
अरबी भाषेत सिंहाला असद शाह म्हणतात .
काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये पहाटे चार वाजता भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध एक मोहीम राबिवली .त्यामध्ये सर्व दहशतवादी मारले गेले .लष्कराला त्यांच्याकडे दोन मोबाईल  मिळाले.कॅप्टन अजयचे त्यातील एका मोबाईलवरचा मेसेज वाचून डोळे फिस्करले . असद शाह को गुलशन दिखाना है असा तो मेसेज होता .
शिलॉग येथील आसाम रायफल्सच्या मेजर मोहंतीला एका खबरीने फोन केला .शस्त्रांस्त्राची मोठी कंसाईनमेंट इंफाळ जाणार आहे .भारत आणि म्यानमार सीमेवर तामु गाव असून शेजारीच मोरे ही भारतातील मोठी बाजारपेठ आहे. ती गाडी याच मार्गाने जाणार होती. पहाटे चार वाजता मेजर मोहंतीने त्या वाटेवर आपल्या तुकडीसमवेत सापळा लावला.त्या हल्ल्यात त्यांचा एक साथीदार मारला गेला तर  सर्व दहशतवादी मारले गेले. त्या गाडीतून अमाप शस्त्रे हाती लागली. मेजरला दहशतवाद्यांकडून मोबाईल सापडले.त्या मोबाईल वर असद शाह को गुलशन दिखाना है हा मेसेज होता.
पीएमओ ऑफिसमधून  या मोहिमेला ऑपरेशन कवच कुंडल हे नाव दिले गेले आणि सगळी जबाबदारी ले.कर्नल पिनाकीन नारायण गद्रे  उर्फ गम्बो या हुशार अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली .
कबीर राजाध्यक्ष  पुण्यातील एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर आणि छोट्या आयटी कंपनीचा मालक .तो भारतीय सैन्याचा डिफेन्स कॉन्ट्रॅक्टरही आहे . त्याच्या वडिलांचा नानासाहेब राजाध्यक्षचा पाच वर्षांपूर्वी काही अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून खून केला होता. त्यांचा शोध अजूनही लागला नाही. त्याने सैन्यदलासाठी नुकतेच एक सॉफ्टवेअर विकसित केले होते आणि त्याचा डेमो दाखविताना आपल्या मशीनद्वारे ऑपरेशन कवचकुंडल हॅक केले .
त्याच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेऊन गम्बोने त्यालाही ऑपरेशन कवचकुंडलमध्ये सामील करून घेतले.
आता एक संपूर्ण टीम असद शाहच्या मेसेजची पाळेमुळे खणून काढण्यास सिद्ध झाली .पण सुरवात कुठून करायची ??? 
लॉक ग्रीफिन आणि विश्वस्त प्रमाणेच एक गुंतागुंतीची थरारक कादंबरी वसंत वसंत लिमयेनी आपल्यासमोर सादर केलीय.
लेखकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीचा खोलवर अभ्यास केलेला दिसतो.भारतीय सैन्यदलाची माहिती.त्यांची युनिट्स, अधिकाऱ्यांचे ऑफिस, घर याची अतिशय तपशीलवार माहिती त्यांनी दिलीय.इतकेच नव्हे तर अत्याधुनिक कॉम्प्युटर प्रणाली ,वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर आणि त्यांची टेक्निकल नावे यासर्वविषयी अचूक ज्ञान त्यांना आहे . 
ऑपरेशन कवचकुंडल यशस्वी होईल का ? असद शाह को गुलशन दिखाना है या मेसेजचा अर्थ शोधून काढून त्यावर काय कारवाई होईल.?? गम्बो आणि त्याची टीम या प्रकरणाचा कसा छडा लावतात हे वाचणे खरोखरच उत्कंठावर्धक आहे .

Tuesday, February 14, 2023

एका लेखकाचा मृत्यू

एका लेखकाचा मृत्यू 😀
संतोष दिघेला उदास चेहऱ्याने घरात शिरताना पाहून मी आश्चर्यचकित झालो.जवळचे कोणी गेलंय असाच त्याचा चेहरा होता.पण तो आमच्याशिवाय जवळचे कोण मानीत नाही.
 तो नाईलाजाने आणि गरजे पुरता आम्हाला जवळचे मानतो असे सौ. म्हणते . अर्थात त्यावर चर्चा करून मी माझा अपमान कधीच करून घेत नाही आणि उगाच या दिघ्यावरून वाद करायला आम्हाला वेळ नाही .
तरीही नेहमी भाऊ .! अशी आरोळी ठोकून घरात प्रवेश करणाऱ्या दिघेचे हे वेगळे रूप पाहून मी घाबरलो.माझ्या खिश्यात नक्की किती रक्कम आहे हे आधी आठवून पाहिले आणि ती न देण्यासाठी मी वेगवेगळी कारणे शोधून ठेवली.
"अरे मित्रा संतोष ये रे ...मी उसने अवसान आणून म्हणालो. "ही बाहेर गेलीय, त्यामुळे चहा काही बनला नाही आपण ती आल्यावर बाहेर जाऊन पिऊ.
इतक्यात सौही मागोमाग घरात शिरली . स्वयंपाकघरात शिरता शिरता तिने संतोषकडे जो तीव्र कटाक्ष टाकला ते पाहून मी चरकलो.
" देवा काही खरे नाही .या दिघ्यामुळे मीही शिव्या खाणार हे नक्की."
"भाऊ कसा आहेस "? थकलेल्या स्वरात दिघेने विचारले.
"आतापर्यंत उत्तम होतो .तू आलास आणि समीकरणे बिघडली" असे स्वयंपाकघरात पाहत हसत म्हटले.
"तुझ्या या विनोदावर हसायची इच्छा नाही माझी" संतोष पडलेल्या आवाजात म्हणाला.
"हरामखोर ,सुंभ जळाला तरी पीळ जात नाही" मी मनात म्हटले.
"हल्ली काय नवीन लिखाण ?? मालिका ??"मी विचारले.काहीतरी विचारायला हवेच.
"काही नाही भाऊ.सध्या बेकारच आहे" तो दीर्घ श्वास घेत म्हणाला . बोंबला म्हणजे मला फटका .
"लोकांना फसविले तर त्यांची हाय लागणारच "आतून आवाज आला आणि मला पुढील धोक्याची सूचना मिळाली.
"काय रे ? काय झाले ?"मी काही न समजून विचारले .
"ते काय बोलतील ?? तोंड आहे का बोलायला ?? सौ तरातरा बाहेर आली ."त्या दिवशी एका सिरीयलच्या शूटिंगला घेऊन गेले .कोणाच्या तरी मृत्यूचा सिन होता .मी नायिकेच्या खांद्यावर हात टाकून तिला समजावते मग फोटोला पाया पडून बाहेर पडते असा सीन होता .."
"अरे हा तर तुझा आवडता सीन. कितीतरी जणांना तू हाक मारायला जातेस" मी कौतुकाने म्हणालो.
"मान्य, पण काही दिवसांनी जो भेटेल तो बोलतो.वहिनी हल्ली बऱ्याच सिरीयल मध्ये दिसता ते ही मृत्यूच्या सीन मध्ये .फेमस झालात हो हाक मारण्यात .." सौ संतोषकडे बघत चिडून म्हणाली 
"अरे किती सिरीयल मध्ये आहेस तू आणि कधी करतेस शूटिंग?? पैसे देतात की नाही वेळेवर ??" मी ताबडतोब प्रश्नांची फैर सुरू केली.
"गप्प बसा हो! हेच ओळखले का मला ? या तुमच्या मित्राला विचारा काय खरे आहे ते ?" सौ चिडून म्हणाली.
" दिघ्या ही काय भानगड ? "सौला कोणी फसवावे ही गोष्टच मी सहन करू शकत नाही.
"अरे भाऊ ! सध्या हेच तर चालू आहे मराठी मालिकेत .सगळ्या सिरीयलमध्ये लग्न सोहळे ,अपघात,मृत्यू, चालू आहेत.त्या दिवशी तीन मालिकेत मृत्यूची घटना होती.यांनी वाहिनीचा तो सीन घेऊन विडिओ एडिटिंग करून बाकीच्या मालिकेत वापरला .अजून काही मालिकेत वापरता येईल " संतोष चिडून म्हणाला .
"अरे देवा म्हणजे मालिकेत आता स्टोरी कथा हा प्रकारच शिल्लक राहिला नाही का ?"मी आश्चर्याने विचारले.
"छे रे ! उठबस हल्ली एकाच टाईपच्या कथा पाहिजे त्यांना .नायिका सोज्ज्वळ सालस सगळ्याना मदत करणारी ,दुष्टांवरही दया करणारी त्यांना माफ करणारी ,त्याग करणारी हवीय .तिला एक हतबल बाप किंवा सतत रडणारी आई हवी .तसेच तिला चार पाच बेकार भावंडे हवी .दुष्ट नणंद किंवा दिर हवा .पन्नास एपिसोड तरी  तिच्यावर छळ हवा .तिचे कोणतेच काम कमीत कमी वीस एपिसोड तरी पूर्ण झाले नाही पाहिजे.पण ती फक्त दोन एपिसोडमध्ये सत्य शोधून काढून सगळ्यांना माफ करायला पाहिजे म्हणजे पुढील पन्नास एपिसोड तिच्याविरुद्ध कट कारस्थान दाखविता आले पाहिजे.अशी निर्मात्यांची मागणी आहे .भरीस भर म्हणून मालिकेत बाल कलाकार हवेत .त्यांना तुझे आई किंवा बाबा किती दुष्ट आहेत आणि कशी कटकारस्थाने करायची याची शिकवणी द्यायची ."संतोषचा राग बाहेर पडत होता.
त्याला कमीतकमी चहा पाजावा या अपेक्षेने मी सौ.कडे पाहिले .पण तिचा चेहरा पाहून मला रात्रीचे जेवण मिळेल का याची खात्री वाटेनाशी झाली आणि चहाचा विचार मी ओठावर येऊ दिला नाही.
"पण दिघ्या तू काहीतरी वेगळे लिहू शकतोस ?" मी त्याचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने म्हटले.
"मी लिहिलेला एक सीन होता .दिघेने सुरवात केली ,नायिकेला लग्नाच्या दिवशी पळवून नेले जाते आणि  दिर तिच्यावर हात उचलतो . यामागे तिचा सासराच असतो .पण ती हुशारीने सुटका करून लग्नमंडपात हजर राहते .त्यानंतर ती एका खोलीत सगळ्या दुष्ट लोकांना बोलावून कानउघडणी करते. मी फक्त ती चिडून सासऱ्याच्या कानाखाली मारते असा सीन लिहिला."संतोष रंगात येऊन म्हणाला. 
" देवा..! मी कपाळावर हात मारला 
"अरे हल्लीची नायिका अशीच हवी .का तिने इतका अन्याय सहन करायचा ?.पण निर्मात्याला आवडले नाही आणि मला डच्चू मिळाला ".रडवेल्या चेहऱ्याने संतोष म्हणाला .
"जाऊ दे भाऊ ,हे आपले क्षेत्र नाही .मी पुन्हा त्या नेहमीच्या शृंगार कथा लिहितो .माझे टॅलेंट तिथेच लागते बघ" तो जोशात म्हणाला 
म्हणजे हा पुन्हा त्या रेल्वे ब्रिजखाली मिळणाऱ्या पिवळ्या पुस्तकात लिहिणार तर .मी मनात म्हटले  खरे आहे शेवटी वळणाचे पाणी वळणावरच जाणार हे विक्रम म्हणतो ते खोटे नाही .
मी मुकाटपणे त्याला चहा पाजायला बाहेर घेऊन गेलो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

Thursday, February 9, 2023

वध

वध
संभूनाथ मिश्रा आणि मंजू मिश्रा हे वृद्ध दांपत्य ग्वालियर येथे आपल्या छोट्या घरात राहतात.त्यांची आर्थिक स्थिती ओढाताणीची आहे. आपल्या तुटपुंज्या पेन्शन आणि लहान मुलांच्या ट्युशनवर त्यांची उपजीविका चालते.त्यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेलाय आणि तिथेच नोकरी लग्न करून स्थायिक झालाय.आता त्याला आईवडिलांशी बोलायला वेळ नाही. तो त्यांना पुरेसे पैसे ही पाठवत नाही.
मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठविताना मिश्रा कर्जबाजारी झालाय.त्याने राहते घरही सावकाराकडे गहाण टाकलंय आणि दर महिन्याला त्याचे हप्ते प्रजापती पांडे या गुंडाकडे देतोय.
पांडे दर महिन्याला त्याच्याकडे एक मुलगी घेऊन येतो.त्यांच्याकडे बसून दारू पितो चिकन खातो.आणि त्यांच्याच बेडरूमचा वापर करतो. मिश्रा हे नाईलाजाने सहन करतोय.
एक दिवस पांडे त्याच्याकडे येऊन घर खाली करायला सांगतो .मिश्रा त्याच्यासमोर हात जोडतो पण तो ऐकत नाही .तो मिश्राला मारहाण करतो.शेवटी तो मिश्राकडे त्याच्याकडे ट्युशनला येणाऱ्या नयना नावाच्या मुलीची मागणी करतो.नयना फक्त बारा वर्षांची आहे .ते ऐकून मिश्रा चिडतो आणि पांडेचा खून करतो.
मंजू पांडेंचे शव पाहून हादरते. मिश्रा त्या प्रेताचे तुकडे करून जाळून टाकतो .मिश्राच्या हातून खून झालाय हे मंजू सहन करू शकत नाही. पोलिस  आणि पांडेची पत्नी मिश्राकडे चौकशी करते पण मिश्रा त्यांना काही सांगत नाही .पांडेंची सहा वर्षाची मुलगी आहे आणि पांडेंचे तिच्यावर खूप प्रेम आहे असे ही सांगते.
शेवटी मंजुच्या प्रेमाखातर मिश्रा पोलीस स्टेशनला जाऊन गुन्ह्याची कबुली देतो पण हवालदार ते हसण्यावारी नेतो आणि त्याला घरी पाठवतो . घरी आल्यावर मिश्रा मंजुला पांडेला मारण्याचे कारण सांगते तेव्हा मंजू त्याने योग्य केले हे कबूल करते आणि मिश्राचे दडपण दूर होते.
इथे तो हवालदार आपल्या साहेबाला शक्ती सिंहला मिश्राचा कबुलीजबाब सांगतो. शक्ती सिंह मिश्राला याबद्दल विचारतो तेव्हा मिश्रा सर्व काही नाकारतो .शक्ती सिंह फक्त पांडेच्या मोबाईलची मागणी करतो पण मिश्रा नाकारतो .
इकडे पांडेचा मालक मिश्राला दोन दिवसात घर खाली करायला सांगतो.तर मोबाईलच्या बदल्यात पांडेचा खून माफ करण्याचे वचन शक्तीसिंह मिश्राला देतो.
शेवटी मिश्रा पांडेचा मोबाईल शोधून काढतो आणि काही धक्कादायक गोष्टी त्याला दिसतात.तो मोबाईल शक्तीसिंहच्या स्वाधीन करतो. शेवटी काय होते ???मिश्रा आपले घर वाचवू शकतो का ??
शंभूनाथ मिश्राच्या भूमिकेत संजय मिश्रा चपखलपणे बसलाय.जणूकाही त्यासाठीच मिश्रा बनलाय असे वाटते.आर्थिक आणि मानसिक दुर्बलता त्याच्या चेहऱ्यावर संपूर्ण चित्रपटभर जाणवते.तर मंजू मिश्राच्या भूमिकेचे नीना गुप्ता त्याच्यासमोर ताकदीने उभी राहते.तिचे गुढग्याचे आजारपण ,मुलांसमोर विडिओ कॉलवर आगतिकपणे बोलणे .पांडेंचे प्रेत आणि मिश्राचा अवतार पाहून हादरणे अतिशय प्रभावीपणे उभे केले.बाकीच्या पात्रांना फारसा वाव नाहीय.
एक तास पन्नास मिनिटांचा हा चित्रपट आपल्याला अस्वस्थ करतो आपली इच्छा असूनही आपल्याला जागेवरून उठू देत नाही .
चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे .

Sunday, February 5, 2023

द इक्विलायझर

द इक्विलायझर 
THE EQUALISER
खरे तर रॉबर्ट मॅकॉलचे आयुष्य सरळ साधे आणि योजनाबद्ध चालू असते.सकाळी मोठ्या मॉलमध्ये जॉब करायचा .मित्रांना मदत करायची आणि संध्याकाळी त्या ठराविक कॉफीशॉप नेहमीच्या टेबलवर बसायचे .सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवून कॉफी पीत शांतपणे पुस्तक वाचत बसायचे .त्याच कॉफीशॉपमध्ये ती धंदेवाईक तरुणीची गिऱ्हाईकाची वाट पाहत असायची.मध्येमध्ये ती रोबर्टची थट्टा करायची.तो ही हसून तिच्याशी मोजकेच बोलायचा.
त्या दिवशी तिची आर्थिक परिस्थिती नाजूकच होती असे वाटते.रोबर्टने तिला कॉफी आणि काही खाणे ऑफर केले आणि ती खुश झाली.हळूहळू तिची आणि रोबर्टची मैत्री झाली.
एके दिवशी तिच्यासोबत जाताना काही रशियन लोक तिला जबरदस्तीने घेऊन गेले.त्यानंतर काही दिवस ती दिसली नाही .चौकशी करता तिला कोणीतरी बेदम मारहाण केली असून ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे असे रॉबर्टला कळले.हॉस्पिटलमध्ये तिची अवस्था खराब होती.उपचारासाठी पैसेही नव्हते असे तिच्या मैत्रिणीने सांगितले.
त्या दिवशी रात्री रॉबर्ट त्या रशियन लोकांना भेटायला त्यांच्या कॅसिनोमध्ये गेला आणि तिच्या उपचारासाठी पैश्याची मागणी केली .तो केवळ पैसे घेऊन निघाला नाही तर मनाशी वेळ मोजून काही क्षणात त्या पाचहीजणाना ठार केले.
पाच जणांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी रशियन माफिया पुस्किनने टेडी रेन्सनला नियुक्त केले आणि त्याच्या मदतीला पोलिसातील काही माणसे दिली.
टेडी रॉबर्टपर्यंत पोचला .पण रोबर्टशी बोलताना त्याने हा साधा माणूस नाहीय हे ओळखले.त्याने रोबर्टची माहिती काढण्याचा प्रयत्न केला .पण कुठेही त्याची माहिती मिळाली नाही. तो रॉबर्टच्या मागे लागला पण रॉबर्ट त्याला गुंगारा देत राहिला .
नाईलाजाने त्याने रोबर्टच्या मित्रांचे अपहरण करून मॉलमध्येच कोंडून ठेवले.पण आपल्या बुद्धीचातुर्याने रॉबर्टने त्यांच्यावर कशी मात केली हे पाहणे मनोरंजक आहे.
डेंझल वॉशिंग्टनसारखा कसलेला अभिनेता रॉबर्टच्या भूमिकेत आहे. त्याची साधी राहणी  ठराविक पद्धतीचे राहणीमान पाहून तो इतका खतरनाक असेल याचा संशय ही आपल्याला येत नाही .चित्रपटात फार मोठे ऍक्शन सिन नसले तरी जे आहेत ते पाहून अंगावर काटा येतो. शूट टू किल हे सूत्र रॉबर्टने वापरले आहे त्यामुळे मॉलमध्ये मारेकऱ्यांना तो एकेकटे खिंडीत गाठून कसे मारतो ते पाहण्यासारखे आहे .एक थ्रिलर ऍक्शन चित्रपट आपल्याला एकाजागी खिळवून ठेवतो.
चित्रपट अमेझॉन प्राईम वर आहे

Saturday, February 4, 2023

ग्लास ओनियन

GLASS ONION : THE KNIVES OUT MYSTERY
ग्लास ओनीयन
माईल्स ब्रॉंन हा एक अब्जाधीश .अल्फा टेक्नॉंलॉजी कंपनीचा मालक .त्याला नेहमीच काही वेगळे करण्याची आवड असते. तो काही मित्रांना आपल्या खाजगी बेटावर पिकनिकसाठी बोलावतो तेही एक कोड्याचे बॉक्स पाठवून.
त्याच्या मित्रांमध्ये एक शास्त्रज्ञ आहे. एक मैत्रीण गव्हर्नर आहे. एक फॅशन डिझायनर, एक खाजगी चॅनेलवरचा सेलिब्रिटी आहे. हे सर्व त्या बॉक्समधील कोडे सोडवून माईल्सच्या बेटावर दाखल होतात.
माईल्सने त्याच्या कंपनीच्या माजी भगीदाराला ही बोलावले असते. कसाद्रा अँडी ही त्याची माजी भागीदार आणि अल्फा टेक्नॉलॉजीची मूळ मालक होती.
पण माईल्सने कपटीपणाने तिच्याकडून कंपनी हिसकावून घेतली असते.तिच्याकडे कंपनी आपली आहे हे सिद्ध करण्यासाठी फक्त एकच पुरावा शिल्लक असतो आणि तो म्हणजे एका पेपर नॅपकिनवर तिच्याच हस्ताक्षरातील कंपनीची मूळ कल्पना.
या सर्व ओळखीच्या पाहुण्यात एक अनोळखी व्यक्ती ही असते जिला माईल्सने आमंत्रण दिले नव्हते. सुप्रसिद्ध खाजगी गुप्तहेर बेनाट ब्लास हा त्यांच्यात सामील होतो.
बेटावरील त्या आलिशान महालात माईल्स स्वतःच्याच हत्येचा प्लॅन करून तो शोधून काढायचा एक खेळ ठरवितो आणि त्यातच त्याचा एक सेलिब्रिटी मित्र  ड्युक सर्वांच्या नजरेसमोर विषप्रयोगाने मरतो.
बेनाट त्याची तपासणी करतो तेव्हा त्याचा मोबाईल आणि पिस्तुल गायब झाले असते. थोडयाच वेळात अँडीवर कोणतरी गोळी झाडतो .आता सर्वजण अँडी मेल्याचे समजून एकमेकांवर संशयाने पाहू लागतात. पण अँडी जिवंत असते आणि तिच्या हातात तो पेपर नॅपकिन असतो .कंपनी तिची असल्याचा तो एकमेव पुरावा .
पण माईल्स चपळाईने तो पुरावा जाळून टाकतो .ड्युकचा खून माईल्सने केलाय हे गुप्तहेर बेनाटला माहीत असते तसेच पुरावा ही माईल्सने सगळ्यांसमोर जाळलाय .सगळे माहीत असूनही पुराव्याअभावी आपण कोर्टात  सिद्ध करू शकत नाही असे बेनोट अँडीला सांगतो .सगळे काही संपले आहे असे सांगून तो एक वेगळाच प्लॅन अँडीला सुचवितो.
माईल्सला धडा शिकविण्यासाठी अँडी कोणता प्लॅन अंमलात आणते हे पाहण्यासाठी डॅनियल क्रेग अभिनित ग्लास ओनियन पाहायला हवा.
खाजगी गुप्तहेर बेनाट ब्लासच्या भूमिकेत डॅनियल क्रेग शोभून दिसतो.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे