Sunday, February 25, 2018

दादर एक पिनाकोलाडा .... द्वारकानाथ संझगिरी

दादर एक पिनाकोलाडा .... द्वारकानाथ संझगिरी
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
मुंबईतील दादर हा प्रमुख विभाग . साहित्य ,क्रीडा ,राजकारण ,सांस्कृतिक या सर्व क्षेत्रातील दादा माणसे दादरमध्ये राहतात . भारतीय क्रिकेटला मोठं मोठे क्रिकेटपटू या दादर विभागातील शिवजीपार्क ,पारशी जिमखानाने दिले . स्वातंत्रवीर सावरकर हेही दादर शिवजीपार्क येथेच राहायचे .लेखक तुम्हाला दादर विभागातील सर्व क्षेत्रातील रंजक गोष्टी सांगतो ते वाचून आपण थक्क होतो . भगवानदादांचा बहरलेला काळ आणि त्यानंतरच उतरता काळ वाचून डोळ्यात पाणी येते .दादर युनियन आणि शिवाजीपार्क जिमखान्याचे क्रिकेट मधील हाडवैर पाहून हसायला येते. प्रबोधनकार ठाकरे ,आचार्य अत्रे बाळासाहेब ठाकरे  यांच्या सभेची वर्णने वाचून अंगावर काटा येतो . खरेच खूप काही दिले आहे या दादरने समाजाला,देशाला . ते वाचल्यावरच लक्षात येईल .

सिझरिंग

आज एका थोर नेत्याची जयंती असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती.बाहेर सारे व्यवहार बंद असल्यामुळे घरातच बसून होतो.इतक्यात विक्रमचा फोन आला"भाऊ ....रोहनला मुलगा झाला. ताबडतोब दिवेचा नर्सिंग होमला ये.मीही निघतोय".
रोहन विक्रमचा लाडका भाचा.त्याला पहिलेच अपत्य झाल्यामुळे विक्रम खुश होता.मीही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी केली. सौ. कौतुकाने बोलली"पोरगा भाग्यवान दिसतोय.. आज छान दिवस आहे हो.मोठेपणी हा थोर नेता बनेल".मी हसून मान डोलावली आणि निघालो.
हॉस्पिटलमध्ये मला पाहताच विक्रमने आनंदाने मिठी मारली"भाऊ ..आजचा दिवस खूप भाग्यचा.आजच या थोर नेत्याचा जन्मदिवस आणि रोहनला ही आजच मुलगा व्हावा किती भाग्याची गोष्ट".
मी रोहनचे अभिनंदन केले आणि बाळाला पाहायला आत शिरलो.फारच गोंडस बाळ होते पण खूप अशक्त वाटत होते.बाळाची आईही थकलेली भासत होती . अजूनही तिची गुंगी उतरली नव्हती .मी शंभर रु नोट बाळाच्या हाताजवळ ठेवली आणि बाहेर पडलो.
बाहेर येताच अचानक विक्रमने "हाय अरु ....!! असे ओरडत एक लेडी डॉक्टरला मिठी मारली तिनेही हाय विकी म्हणत जोरदार उत्तर दिले. मी आश्चर्याने पाहत असतानाच त्याने ही माझी जुनी मैत्रीण अरुंधती अशी ओळख करून दिली.बोलताना असे कळले ती इथेच डॉक्टर होती . पुढच्या डिलिव्हरीसाठी एक  तास अवकाश आहे तोपर्यंत कॉफी पिऊ असे म्हणत आम्हाला खाली घेऊन गेली .
"आज खूप लोड आहे कामाचा.अजून चार डिलिव्हरी बाकी आहेत.तरी बरे आज त्या नेत्यांची जयंती आहे म्हणून कमी लोड.चांगला सण ,मुहूर्त असेल तर  जेवायला वेळ मिळत नाही"असे बोलून कॉफीचा एक घोट घेतला.
"म्हणजे नक्की काय... ??आज गर्दी का. ?? विक्रम न समजून म्हणाला.
"अरे मित्रा.... हल्ली तुला माहीत नाही का आपल्याला पाहिजे तेव्हा डिलिव्हरी करायची पद्धत सुरू  झालीय...?? तिने आमच्याकडे डोळे मिचकवत म्हटले"हल्ली नैसर्गिक डिलिव्हरीची कोण वाट पाहत नाही . चांगला मुहूर्त असेल तर दोन तीन दिवस आधीच सिझरिंग करून मोकळे होतात. काहीजण त्यातही ज्योतिष्याकडून मुहूर्त काढून येतात आणि त्याच वेळी डिलिव्हरी झाली पाहिजे असे सांगतात.चौदा फेब्रुवारी.सव्वीस  जानेवारी ,एक मे या दिवशीही डिलिव्हरी झाली पाहिजे असे मागणी करणारे आहेत.आता एक डिलिव्हरी आहे ती त्यांनी सांगितले वेळीच करायची आहे म्हणून मी इथे बसली आहे ".
"बापरे ..!! हे कठीण आहे ?? म्हणजे हल्ली नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही का.. ?? मी विचारले
"होते ना....? जे सर्वसामान्य आहेत. अशी नाटके परवडत नाहीत ,प्रसूतीवेदना सहन करायची ताकद आहे त्या नॉर्मल डिलिव्हरी करतात . पण ज्यांना आपला तो मार्ग जसा आहे तसा ठेवायचा आहे . प्रसूती वेदना नको.बाळाची योग्य आणि चांगली जन्मवेळ आणि भरपूर पैसा असेल ते सिझरिंगचा मार्ग स्वीकारतात. मित्रानो हल्ली विज्ञान खूप प्रगत झाले आहे . त्याचा कोणीही कसाही वापर करून घेते . काहीजण आपल्याला योग्यवेळी मूल कसे होईल ते कसे असेल याची प्लॅनिंग करून संभोग करतात . त्यासाठी योग्यवेळ ,योग्य ठिकाण ही कोणती हेही ठरवून घेतात".तिने गंभीरपणे आम्हाला सांगितले .
"म्हणजे ...!! आज जो माझ्या भाच्याला मुलगा झालाय तोही सिझरिंग करून ठरवून झालाय का" ?? विक्रमने उत्सुकतेने  विचारले
"हो ..असेलच ...कारण आज येथे कोणाचीच नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही" अरूने उत्तर दिले .
"मग यात धोका काही नाही ना ...??? विक्रमने काळजीने विचारले.
"हे बघ विकी..... धोका कशात नाही.. ?? ते प्रत्येकाच्या वयावर आणि तब्बेतीवर अवलंबून आहे . पण एक नक्की जे नैसर्गिक ते नैसर्गिक . आपण हल्ली बऱ्याच गोष्टी निसर्गचक्राविरुद्ध करतो . सिझरिंग ही नैसर्गीक पद्धत नाहीच . बाईचा त्रास कमी व्हावा आणि डिलिव्हरीवेळी काही अडचण येते तेव्हा सिझरिंग चा पर्याय वापरला जातो. पण हल्ली कोणालाच वेळ नाही कोण थांबायला तयार नाही .हातात पैसा आहे मग करा सिझरिंग .केवळ हीच गोष्ट नाही तर हल्ली अनेक गोष्टी निसर्गनियमाविरुद्ध चालू आहेत . भविष्यात त्याचा योग्य उपयोग झाला तर ठीक नाहीतर फार मोठे भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत हे नक्की. रजनीकांतचा रोबोट चित्रपट पाहिला ना.. ?? तुम्ही एका रोबोटच्या मनात भावना फीड केल्या की किती गंभीर परिणाम होऊ शकतात  ते पहिले . आणि हल्लीच एक देशाने एक रोबोटला नागरिकत्वाचा हक्क दिला .मला तर वाटते काही वर्षांनी डॉक्टर ही संकल्पनाच निघून जाईल . काहीही झाले की तुम्ही एक मशीनमध्ये शिराल आणि ती मशीन तुमचे आजार शोधून तिथेच ट्रीटमेंट करेल कदाचित छोटेमोठे ऑपरेशन ही करेल . औषध देईल आणि जेव्हा बाहेर पडाल तेव्हा पूर्ण बरे झाले असाल". तिने उठत उठत आम्हाला मोठा धक्का दिला.आमच्या आ वासलेल्या तोंडाकडे बघून ती हसत हसत निघून गेली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, February 18, 2018

विश्वस्त ... वसंत वसंत लिमये

विश्वस्त...... वसंत वसंत लिमये
राजहंस प्रकाशन
प्रसंग एक .... काळ महाभारतातील उत्तरकाळ  कश्यपमुनींच्या शापानुसार यादव वंशाचा विनाश चालू झालाय . वृद्ध झालेल्या श्रीकृष्णाला आपल्या डोळ्यादेखत तो संहार पहावा लागतोय . तरीही त्याने काही शूर यादवना आपले कूळ वाचवायची जबाबदारी सोपवली आहे . त्याने चारी दिशांना त्या यादवना अगणित संपत्ती ,कुटुंबियासमावेत  रवाना केले .
प्रसंग 2 ....साल 2013.... पुण्यातील काही तरुणांचा कंपू स्वतःला जेएफके नावाने ओळखतो . ऐतिहासिक रहस्य शोधून काढणे हा त्यांचा छंद . त्यात एक स्कॉटलंडची तरुणीदेखील आहे . एक गडावरील भ्रमंतीत त्यांना जीर्ण असे ताम्रपत्र मिळाले . त्यावर काही श्लोक होते . त्या श्लोकात श्रीकृष्ण आणि चाणक्य विष्णुगुप्त यांचा संबंध दाखविला होता . . काय आहे हे रहस्य ?? कुठे भगवान श्रीकृष्ण आणि कुठे चाणक्य विष्णुगुप्त एक हजारो वर्षांपूर्वी तर दुसरा इसवीसनपूर्व 323च्या काळातील..... .काय संबंध त्यांचा ????
प्रसंग तिसरा ....  इसवीसन पूर्व 323... मगधांच्या जुलमी कारभाराला विरोध करण्यासाठी चंद्रगुप्ताचा उदय झाला आहे आणि त्याच्यामागे उभे आहेत त्याचे गुरू आचार्य चाणक्य विष्णुगुप्त .मगध सम्राटावर शेवटचा घाव घालण्याची त्यांची योजना सुरू आहे . विष्णुगुप्तांनी गुरुदक्षिणा म्हणून सह्यपर्वतावर श्रीकृष्णाचे मंदिर बांधावे अशी मागणी चंद्रगुप्तांकडे केली .
प्रसंग 4...सन 1026... महमूद गजनीने सतराव्यांदा हिंदुस्थानावर स्वारी केली .पण यावेळी सुलतानाला क्षय रोगाने पछाडले होते .यावेळी त्याने सोमनाथ मंदिरावर धडक मारली होती . काय शोधत होता तो त्या मंदिरात ????? त्याच्या हातातील जीर्ण रेशमी कापडात काही श्लोक होते. त्या श्लोकांचा अर्थ तो शोधत होता .आपली फसवणूक झाल्याचे कळताच तो पिसाळला आणि त्याने मंदिराची वाताहत केली .त्या मंदिरात असे काय होते की ज्याचे आकर्षण सुलतान मेहमूद गजनीला होते ????
या सर्व प्रसंगांचा एकमेकांशी संबंध आहे आणि तेच जेएफकेच्या टीमला शोधायचे आहे . त्यांच्याकडे अत्याधुनिक साधने आहेत . पाठपुरवठा करण्याची चिकाटी आहे . साहसाची आवड आहे . एक अज्ञात इतिहास आणि वर्तमानातील वास्तव यांचा मेळ जुळवायचा आहे . वाचकांना खिळवून ठेवणारी वेगवान कादंबरी

होळी

आज शंकर खूष दिसत होता.त्याचे कारण आम्हा सर्वाना माहीत होते. होळी जवळ आली की शंकर गावी जायच्या कल्पनेनेच खुश असायचा.नेहमीप्रमाणे त्याने आधीच रजा मंजूर करून घेतली होती.अर्थात नाही केली असती तरीही तो बिनपगारी रजा घेऊन  गेला असता याची खात्री होतीच.
सवयीप्रमाणे तो दुसर्या पाळीत कामावर आला.रात्रीची गाडी होती त्यामुळे दोन तास आधी निघणार होता.मीही सर्व कामे आटपून घरी आलो.
अचानक रात्री साडेनऊला फोन वाजला.पाहिले तर कंपनीतुन होता. रात्री वेळीअवेळी कंपनीतून फोन येतात याची सौ.ला सवय होतीच.पण नेहमीप्रमाणे तिच्या कपाळावर आठी पडली.मी फोन उचलला.माझा दुसर्यापाळीचा सुपरवाझर फोनवर होता
"साहेब इथे मोठे ब्रेकडाऊन झालेय.पूर्ण प्लांट बंद पडलाय. काही सुचत नाहीय.सगळीकडून फोन येतायत" त्याचा स्वर काळजीचा होता.
" काळजी करू नकोस. मी करतो काहीतरी".असे म्हणून दुसऱ्या कोणाला तरी कंपनीत पाठवायचा विचार करू लागलो. इतक्यात परत फोन आला .पाहिले तर तो शंकरचा होता. त्याने स्पष्टपणे मला सांगितले "साहेब... काळजी करू नका मी आलोय.आता बघतो काय करायचे ते".
" अरे... पण तू घरी गेलेलास ना..???मग परत कसा आलास"?? मी आश्चर्यचकित होऊन विचारले .कारण शंकर निघून गेला असणार याची खात्री होती मला आणि आता त्याला बोलावून आणणे काही उपयोगाचे नव्हते.
"ते सर्व नंतर... आधी काम आटपतो मग बोलू . मी  सुटकेचा निःश्वास सोडत फोन ठेवला . आता कसलीच काळजी नव्हती.
शंकर एक अनुभवी मेकॅनिक होता आणि खात्रीलायक माणूस .तो काम पूर्ण करेल याची खात्री होती . पण हा अचानक कसा आला याचेही कोडे होते. जाऊदे ....विचारू नंतर असे मनात म्हणत जेवायला बसलो.
रात्री साडेबाराला शंकरचा फोन आला.
" साहेब काम झाले. प्लांट चालू झालाय.मी निघतो.
" अरे आता रात्रीचा कुठे निघतोस ..??झोपून जा आरामात. तुझा  पूर्ण ओव्हरटाईम लिहितो मी"मी समजावले त्याला .
"नको.... मी आता मिळेल ती गाडी पकडून गावाला जातो.
"अरे हो ....आता सांग तू परत कसा आलास ?? लवकर निघाला होतास ना ?? मला वाटले नव्हते तू येशील". मी उत्सुकतेनेच विचारले.
" साहेब मी निघालोच होतो पण स्टेशनवर आलो आणि सुपरवायझरचा फोन आला . प्लांट बंद आहे ऐकून मला राहवत नव्हते . पण गावाच्या पालखीचे टेन्शन . इतक्या वर्षांची परंपरा  कशी मोडायची. खूप द्विधा मनस्थितीत होतो .शेवटी घरी फोन करून बायकोला सर्व परिस्थिती सांगितली.ती बिचारी काय बोलणार . निघायची सर्व तयारी झालेली.शेवटी मोठ्या मुलाने फोन घेतला आणि म्हणाला बाबा ..तुम्ही काळजी करू नका .मी घेऊन जातो सर्वाना पुढे.तुम्ही या मागवून .पण आधी कंपनीतील काम पूर्ण करा. नाही यायला जमले तर यावर्षी पालखी मी घेईन खांद्यावर .तुम्ही बिनधास्त राहा. खरे सांगू त्याक्षणी जाणवले मी खूप काही कमावले आहे .आज माझ्या मुलाला जबाबदारीची जाणीव झाली.ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे . एक मोठ्या जबाबदारीतून मोकळे झाल्याची जाणीव झाली . त्याच जोशात मी परत फॅक्टरीत आलो आणि तुम्हाला फोन केला .साहेब गावावरून मुंबईत आलो ते रोजीरोटीसाठीच ना..?? मग आज आपली रोजीरोटी संकटात आहे हे कोणता कोकणी माणूस सहन करेल .मी नसतो तर तुम्हीही घरातून बाहेर पडला असतात हे नक्की.आता काय मी एकटाच कसाही गावी जाईन . पोरांनाही दाखवून देईन कितीही झाले तरी काम पाहिले आणि मग रीतिरिवाज आणि परंपरा . चला आता मिळेल ती गाडी पकडतो आणि गावी पोचून पोरांना चकित करतो".शंकरच्या आवाजातील आनंद मला जाणवत होता .
"खरेच शंकर ....आज तू नवीन पिढीसमोर एक आदर्श ठेवलास की मनात असेल तर सगळ्या गोष्टी शक्य असतात.धन्य  आहेस तू . आमच्यातर्फे देवीची ओटी भर आणि आशीर्वाद मग सर्वांसाठी" असे बोलून फोन ठेवला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, February 15, 2018

बर्म्युडा ट्रँगलचे गूढ ......मंदाकिनी भारद्वाज

बर्म्युडा ट्रँगलचे गूढ ......मंदाकिनी भारद्वाज
रिया पब्लिकेशन .. अजब
बर्म्युडा बेटापासून ते मियामी दक्षिण फ्लोरिडा ते बहामा बेटाला वळसा घालून परत बर्म्युडाकडे जाणारा हा भाग बर्म्युडा ट्रँगल म्हणून ओळखला जातो . आतापर्यंत त्याभागातून प्रवास करणाऱ्या शेकडो बोटी जहाजे तर वरून प्रवास करणारी शेकडो विमाने जणू हवेत विरघळून जावीत अशी गायब झालीत . अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागला नाही . त्यांचे कोणतेही अवशेष मिळाले नाहीत ना त्यामधील प्रवाश्यांचा शोध लागला . हे सर्व का घडते याचे समाधानकारक उत्तरे कोणालाच देत आली नाहीत .

Wednesday, February 14, 2018

व्हॅलेन्टाईन डे

तो आणि ती हातात हात गुंफून कट्ट्यावर बसून समोरच्या मावळणारा सूर्य पाहत होते . "आज काय संकल्प करायचा ...?? त्याने हसून विचारले आणि हातातील वेफर्सचे पॅकेट तिच्या हाती दिले.तिने एक वेफर तोंडात टाकला आणि किंचाळली " शी ...!!! तुला माहितीय ना. मला खारट वेफर्स आवडत नाही. तुला बघून घेता येत नाहीत का.... ???
तसा तो हसला "बघून...??  अग बाई... लोकांना घाई किती आज. सर्व व्हॅलेन्टाईनच्या मूडमध्ये . त्याने घाईघाईत माझ्या हातात पॅकेट कोंबले मग मीही तसाच घेऊन आलो.जाताना परत घेऊ .तो अगदी सहज म्हणाला.
"तरी बरे ..चाफा बरोबर आणलास" ती हसून म्हणाली.
"त्याचा वास येतो"..त्याने लटक्या रागात उत्तर दिले.
"आपण राहुल देशपांडेंच्या प्रोग्रॅमला जायचे का.... ??? त्याने लाडाने तिला विचारले.
" ह्या ...! तो नाही मला आवडत".. ती फणकार्याने नाक उडवून म्हणाली.
" अग बाई ....आपल्याला गाणी ऐकायला जायची आहे त्याला थोडेच बघायचे आहे".तो हसून उत्तराला.
इतक्यात शेजारून कुजबुज ऐकू आली . दोघेही शांत बसून त्यांची कुजबुज ऐकू लागले . ती त्याला म्हणत होती "इथून किती छान सूर्यास्त दिसेल पण सगळ्या जागा आज पॅक आहेत.आज तुझ्याबरोबर सूर्यास्त पाहताना किती मजा आली असती"
त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि एकसुरात त्यांना आवाज दिला."या मॅडम ..इथे बसा आम्हाला काही फरक पडत नाही".असे बोलून ते उभे राहिले. त्या तरुणीने त्यांना थँक्स म्हटले.
त्याने उठून आपल्या हातातली पांढरी लाल फोल्डिंगची काठी सरळ केलीआणि  तिला आवाज दिला" चल निघायचे का..." ??
तिने हसून चल म्हटले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून दोघेही चालू लागले .
रस्ता ओलांडताना गर्दीमुळे तो थोडा पुढे गेला आणि ती मागे राहिली .अचानक जोरात ब्रेक मारल्याचा आवाज ऐकू आला आणि मागोमाग एकाचे जोरात ओरडणे" बघून चालता येत नाही का मॅडम..... ?? काय आंधळ्या आहात का...??  एक क्षणात काय घडले असेल याची जाणीव त्याला झाली. तो तसाच मागे वळला . आवाजाच्या रोखाने त्याच्याकडे गेला.
"हो सर ....आंधळीच आहे ती . माझ्यावर विश्वास ठेवून कधी काठी नाही वापरात ती.पण आज कळले की हा विश्वासही किती कुचकामी आहे. या वर्षीपासून एक नवीन संकल्प तुमच्यामुळे मिळाला . उद्यापासून आम्ही एकमेकांच्या आधाराशिवाय जगण्याचा प्रयत्न करू . पुढच्या व्हॅलेन्टाईन ला इथेच कदाचित आम्ही तुम्हाला भेटू तेव्हा दोघेही  इतरांसारखे स्वतंत्रपणे रस्ता क्रॉस करताना दिसू".
तिने मागून येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला "आजचे गिफ्ट घ्यायचे राहिलेच.आज तू मला ही काठी घेऊन दे.मी तुला वचन देते पुढच्या व्हॅलेन्टाईनला मी तुझ्या बरोबरीने रस्ता क्रॉस करेन.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, February 13, 2018

ग्राफीटी वॉल ....... कविता महाजन

ग्राफीटी वॉल ....... कविता महाजन
राजहंस प्रकाशन
एक लेखिका म्हणून समाजात वावरताना आपल्याला आलेले चांगले वाईट अनुभव आपण लिहून काढावे असे लेखिकेला वाटले . आणि त्यातून निर्माण झाली ग्राफीटी वॉल .अतिशय मोकळेपणाने आणि स्पष्टपणे लेखिकेने आपली मते ,समाजाने त्यांच्याकडे आणि त्यांनी समाजाकडे बघण्याची वृत्ती मांडली आहे .  एक स्त्री लेखिका म्हणून त्यांना मिळालेली वागणूक स्त्रियांचा दृष्टीकोन यावरही त्या परखडपणे लिहितात.प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक

Monday, February 12, 2018

आहेर

जोगळेकरांच्या मुलीचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आणि सर्वांनी सुखाचा निश्वास टाकला.ते आमचे जुने शेजारी त्यमुळे घरचेच लग्न होते.
रविवारी ते माझ्याकडे आले आणि म्हणाले" भाऊ.. वेळ असेल तर आहेराची पाकिटे फोडूया का ?? बऱ्याच जणांचे पैसे द्यायचे आहेत. आलेत तर देऊन टाकू.मीही तयार झालो. इतक्यात दारात विक्रम येऊन उभा. पैश्याचा व्यवहार होता म्हणून विक्रम जवळ असलेला बरा म्हणून विक्रमलाही बरोबर घेतले.
आम्ही तिघेही आहेर मोजायला बसलो. विक्रम एक एक पाकीट फोडत होता आणि रक्कम बाजूला ठेवत होता. अचानक एक पाकीट उघडताना त्याने दणकून शिवी दिली."च्यायला.....!! ह्या लोकांना पाकीटही नीट चिकटवता येत नाही .दोन हजारचा आहेर आहे पण नोट पूर्ण पाकिटाला चिकटली आहे.आता ही नोट गेली फुकट".
ह्याला पैश्याची किती काळजी आहे हे मला माहित असल्यामुळे मी पटकन त्याच्याकडून ते पाकीट ओढून घेतले आणि अतिशय हळुवारपणे ती नोट बाजूला केली.एक तिरस्कारयुक्त नजर टाकून विक्रमने आपले कार्य पुढे चालू केले .काही वेळाने अजून एक पाकीट नोटेला चिकटलेले आढळले . आतील नोट पाचशेची होती .ती तर फारच चिकटलेली दिसत होती . यावेळी मात्र त्याने ते पाकीट माझ्याकडे फेकले . मीही अगदी पाणी लावून ती नोट वेगळी केली.
" लोकांना पाकीट कसे भरायचे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे " विक्रम चिडून उद्गारला. पुढे पुढे बरीच पाकिटे आम्हाला अशी सापडली . सगळ्यांच्याच नोटा आम्हाला वेगळ्या करता आल्या नाहीत .पण अशी पाकिटे देणार्याला शिव्या देत आम्ही सर्व पाकिटे पूर्ण केली.
नंतर हिशोब करताना कळले पाचशेच्या पाच नोटा ,दोन हजारच्या सहा नोटा आणि शंभरच्या बारा नोटा पूर्णपणे  खराब झाल्या  होत्या . विक्रमने बेफिकीरपणे जोगळेकरना सांगितले" काका ...सोळा हजार गेले तुमचे".
जोगळेकरांनी चेहरा पडून माझ्याकडे पाहिले.
" अरे खूप प्रेमाने आणि आपलेपणाने इतका मोठा आहेर दिला होता त्यांनी मला. मी बऱ्याच ठिकाणाहून कर्ज काढले होते या लग्नासाठी आणि म्हणून विचारतील त्यांना सांगत होतो जमल्यास कॅश घाला गिफ्ट देऊ नका . त्याला प्रतिसाद म्हणून बऱ्याच लोकांनी कॅश दिली पण निष्काळजीपणामुळे माझे खूप नुकसान झाले .पर्यायाने त्यांचेही झाले".जोगळेकर हळहळले .
"खरे आहे काका... मी म्हणालो." पण यापुढे आपण नक्की काळजी घेऊ आणि इतरांनाही सांगू काळजी घ्यायला".
" होय काका मीही यापुढे नक्की काळजी घेईन "असे बोलून विक्रमने मोजलेली रक्कम त्यांच्या हाती दिली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, February 8, 2018

गुंतवणूक

सोमवारी सकाळीच बंड्याला दारात हजर पाहून आश्चर्य वाटले.मी ऑफिसला निघायच्या गडबडीत होतो.तरीही त्याला बसवून सौ.ला चहाची ऑर्डर देऊन त्याच्या समोर बसलो.
"बोला...!! बंडूशेठ काल रात्री जास्त झालेली दिसते.पिताश्रीची बोलणी खायला नको म्हणून इथे हजर झालात का..."?
"तसे नाही हो भाऊ...माझ्या पार्ट्या सतत चालू असतात हे बाबाना माहीत आहे .कालही होती. पण काल वेगळीच गोष्ट घडली .रविवारी संध्याकाळी आमचा एक मित्र एका गृहस्थाला घेऊन आला. त्याने आमच्यासोबत दारू पिता पिताआमचे किती सेविंग आहे ??कोण कुठे सेविंग करतो?? ते विचारले.गंमत म्हणजे आमच्यापैकी बऱ्याच जणांना सेविंग कसे करायचे हे माहीतच नव्हते.आलेला पैसे पार्टीत उडवा,शॉपिंग करा ,गाड्या घ्या यातच जातो.मग इन्कमटॅक्स कापला जातो तेव्हा कुठे थोडे गुंतवणूतिच्या मागे लागतो .काही मोजक्याच योजना सोडल्या तर आम्हाला काहीच माहीत नसते.पण काल जे गृहस्थ आले त्यानी अतिशय सोप्या भाषेत आम्हाला गुंतवणुकीचे फायदे समजावले .आहो अगदी पाचशे रुपयापासूनही आपण गुंतवणूक करू शकतो हे काल मला कळले". बंड्या उत्साहाने बोलत होता .
"अरे ....वा..! मग चांगलेच आहे की. पण पैसे उरतात का तुमच्याकडे महिन्याच्या अखेरीस ?? मी थोड्या उपहासानेच विचारले .तसा बंड्या थोडा खजील झाला.
"बरोबर आहे हो भाऊ...खरेच कसे पैसे जातात तेच कळत नाही. आता कालच तीन हजार खर्च झाले तेही फक्त दोन दिवसात.म्हणून  विचार केला असे पैसे आपण घालवतो तर त्यातले कमीतकमी पाचशे रु. तरी गुंतवणुकीसाठी खर्च का करू नये .... ?? काल रात्री खूप विचार केला आणि तुमच्याकडे यायचे ठरविले. तो गुंतवणुकीचा सल्ला आणि मदत करणारा तुमचा मित्र आहे ना त्याचा नंबर द्या .आज संध्याकाळी त्याला भेटतो आणि दर महिना काहीतरी पैसे गुंतवता येतील अशा योजना स्वीकारतो "
मी खुश होऊन त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हटले "यावर्षीचा पहिला योग्य निर्णय तू घेतला आहेस.चल चहा पी."
© श्री. किरण कृष्णा बोरकर