Tuesday, January 25, 2022

द सिमीऑन चेंबर.....स्टीव्ह मार्टिनी

द सिमीऑन चेंबर.....स्टीव्ह मार्टिनी
अनुवाद....जयवंत चुनेकर 
मेहता पब्लिशिंग हाऊस
खरे तर सॅम बोगार्डसला वकिलीपेक्षा इतिहासातील गूढ कागदपत्रे शोधायचीच आवड होती. आणि म्हणूनच जेनिफर डॅवीज या सुंदर तरुणीच्या बेपत्ता पित्याची केस त्याने आवडीने स्वीकारली.तिने काही जुनी चर्मपत्रे यानिमित्ताने त्याच्या हवाली केली होती.आपला प्राध्यापक मित्र निक जॉर्गनसन याच्या साहाय्याने ती चर्मपत्रे अस्सल असण्याची खात्री करून घेतली .ती चर्मपत्रे फ्रान्सिस ड्रेक याच्याशी संबंधित होती. कोण आहे हा फ्रान्सिस ड्रेक ..??
फ्रान्सिस ड्रेक हा सोळाव्या शतकातील समुद्री चाचा होता . त्याला इंग्लंडच्या राणीचा आश्रय होता आणि आपल्या लुटीचा प्रचंड हिस्सा घेऊन एका गलबतातून निघाला पण ते गलबत समुद्रात बुडाले. पण त्याने आपल्या प्रत्येक मोहिमेची माहिती व्यवस्थितपणे एका वहीत लिहून ठेवली होती . त्यालाच ड्रेक जर्नल असे नाव पडले होते.
17 एप्रिल 1906 रोजी मारिन काउंटी कॅलिफोर्निया येथील तुरुंगात कैदी  अर्ल ह्युबरला योगायोगाने आपल्या अंधारकोठडीत एक भुयार सापडले . त्या भुयारातून पलायन करताना दुसऱ्या टोकाला त्याच्या अंगावर सोने चांदी मौल्यवान रत्ने याचा वर्षाव झाला आणि त्याखालीच तो गाडला गेला .
या सर्व घटनांचा सॅमच्या हातातील चर्मपत्रांशी संबंध आहे .कारण त्यासाठीच त्याची प्रेमिका आणि सहाय्यक पॅट हीच निर्घृणपणे खून झालाय. खुद्द सॅमवर ही भयानक जीवघेणा हल्ला झालाय.
कोणीतरी त्या चर्मपत्रांच्या मागे आहे. जे आडवे येतील त्यांना ठार मारले जातेय. सॅम निक आणि जेनिफर या रहस्याचा शोध घेतील का ...?? जेनिफरच्या वडिलांचा याच्याशी काय संबंध आहे ??? ते खरोखरच बेपत्ता झालेत का ....?? 
एक उत्कंठापूर्ण थरारक रहस्यकथा

धक्का

धक्का
तो तिला नेहमी कोपर्यावरच्या टपरीत चहा पिताना दिसायचा .राकट चेहरा..  कडक नजर. ती जवळून गेली की त्याची नजर आपल्या पाठीवर रेंगाळतेय याची जाणीव दूरपर्यंत होत असे.  कधी कधी त्याच्यासोबत मित्र असायचे सिगरेट ओढत ...पण ह्याच्या हातात कधीच दिसली नाही .
हळूहळू तिला त्याची सवय होत गेली.तो दिसला नाही तर कावरीबावरी होऊन इथे तिथे नजरेने शोधीत राहायची त्या . त्या दिवशी तो  तिच्या नजरेला नजर देत हसला आणि काळजात एक कळ उठली.
ती घरात मोठी...एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होती. आई शिक्षिका तर बाबा बँकेत. लहान भाऊ कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला. छोटे सुखी सरळ कुटुंब .सरळमार्गी जगणारे.  घरी वातावरण  मोकळेच होते. त्यामुळे मित्र मैत्रिणींची दोघांनाही कमी नव्हती.
त्या दिवशी संध्याकाळी ती मार्केटला गेली होती.डेअरीमधून एक लिटर दुध घेतले आणि ऑनलाइन पेमेंट करायला मोबाईल उघडला.
अरे देवा ....!! नेट पॅक संपला होता आणि पर्समध्ये सुटे पैसेही नव्हते. " ओ शीट...आता काय करू ..."?? ती स्वतःशी पुटपुटली.
"मी काही मदत करू का..." ?? एक दमदार आवाज कानावर पडला आणि तिने वळून पाहिले. तो तिच्याकडे पाहून विचारत होता. तिचा चेहरा कसानुसा झाला . जणूकाही चोरीच पकडली गेलीय. त्याने तिचा होकार गृहीत धरून स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाइन पेमेंट केले. 
"थँक्स .." ती खाली मान घालून पुटपुटली .
" थँक्स कसले ...!! मला पैसे परत करा ... उपकार फिटले ....तो हसत म्हणाला . मोबाईल नंबर ...??? 
तिने सांगितलेला नंबर त्याने सेव्ह केला . 
"व्हाट्स अप केलाय .....फोन चालू झाला की पेमेंट करा..." असे बोलून तो निघाला.
मनात हुरहूर ठेवूनच ती घरी आली आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे आईला घडलेली गोष्ट सांगितली.
"पोरगा भल्या घराचा दिसतो ...."आई सहज म्हणाली.
रात्री नेट रिचार्ज करून तिने त्याला हाय केले आणि ऑनलाइन पेमेंट करून टाकले . दोन दिवसांनी भावासोबत फिरायला निघाली तेव्हा तो पुन्हा टपरीवर दिसला यावेळी तिने स्वतःहून हाय केले आणि भावाची ही ओळख करून दिली. तिचा भाऊ ही तिच्या सारखाच दिसायचा .हसताना ही तिचीच ठेवण उचलली होती.त्याने  तिच्या भावाची खूप चौकशी केली .काही मदत लागल्यास नक्की विचार असे बोलून आपला मोबाईल नंबर ही दिला. त्याचे दिलखुलास वागणे  पाहून ती सुखावली.
हळू हळू त्यांची मैत्री वाढत चालली होती. मध्येच तो एकदा घरी येऊन आई वडिलांनाही भेटून गेला. मुलांचा मित्र यापलीकडे दोघांनीही फार लक्ष दिले नाही . तो तिच्याशी रोज बोलत होता आणि तितकेच तिच्या भावाशीही . उलट कधी कधी तो त्याच्याशीच जास्त बोलतो असे तिला वाटे .त्याच्या वागण्यावरून आपले मन लवकरच उघडे करेल अशी आशा तिला वाटू लागली . त्याचे वागणे खूपच संयमी होते . कधी कधी ते एकत्र फिरायला जात तेव्हाही तो तिच्याशी अंतर ठेवूनच वागत असे .त्याचा संयमी स्वभावच तिला आवडत होता . 
पण हल्ली घरी तिच्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली होती. तिने आडून त्याच्याकडे विषयही काढला होता पण होईल सर्व व्यवस्थित असे बोलून विषय वाढवला नव्हता .ती दिवसेंदिवस बैचेन होऊ लागली .
आज मात्र तिचे कामात लक्ष लागत नव्हते .वडिलांनी मित्राच्या मुलाचा फोन नंबर देऊन त्याला भेटण्यास सांगितले होते. ती खूपच अस्वस्थ झाली होती . कामात लक्ष लागेना म्हणून सरळ अर्धा दिवसाने घरीच निघाली.
आज त्याला विचारावेच लागेल.त्यासाठी भावासोबत त्याला भेटून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असे मनाशी ठरवूनच ती घरी आली .
स्वतःकडील लॅचकीने दरवाजा उघडून ती आत शिरली. घरात शांतता दिसत होती भावाला फोन लावणार इतक्यात बेडरूममधून कुजबुज ऐकू आली ती दाराजवळ गेली तेव्हा तिला काही सुस्कारे ऐकू आले .मनात  चिंता ठेवून तिने दार लोटले आणि समोरचे दृश्य पाहून  शी..... अशी किंकाळी फोडली . समोर तो आणि तिचा भाऊ  नको त्या अवस्थेत एकमेकांच्या मिठीत होते .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Monday, January 10, 2022

अंतिम इच्छा

अंतिम इच्छा 
माणसाच्या अंतिम इच्छा कधी कधी किती तापदायक ठरू शकतात हे दत्तूनाना गेल्यावर आम्हाला कळले.हो बरोबर.... शेवटी दत्तू नाना वयाच्या 80 व्या वर्षी आम्हाला  सोडून गेले .त्यांच्या जाण्याने आम्हाला दुःख झालेले दिसत नाही असे तुम्ही म्हणत असाल तर तुमचे निरीक्षण योग्यच आहे.आहो खुद्द दत्तूनानांना आपण गेलोय याचे दुःख झाले नसेल.
सत्य नेहमीच कटू असते हे दत्तूनानाचे प्रसिद्ध वाक्य.आपला मुलगा परदेशात जाऊन बसला आणि तो परत कधीही भारतात येणार नाही हे कटू असले तरी सत्य आहे. त्याच्या पैशावर यापुढे आपल्याला अवलंबून राहावे लागणार हे ही सत्य आहे . हे सर्व त्यांनी स्वीकारले आणि स्वतःची जगण्याची पद्धत ठरवली. आमच्या बंड्याच्या भाषेत त्याने एसओपी सेट केली.
मुलगा परदेशात गेला आणि दत्तूनाना मोकळे झाले .म्हाताराम्हातारीने आधी सर्व भारत फिरून घेतला .नातेवाईकांचे समारंभ अटेंड केले.वेळेचा सदुपयोग करून घेतला .माणसे जोडली. उद्या काय झाले तर चार माणसे धावत यायला हवीत हाच प्रामाणिक हेतू त्यामागे होता आणि तसेच झाले .नानी अचानक गेली तेव्हा मुलगा नव्हता पण मानलेली मुले भरपूर होती.
नानी गेल्यावर मात्र दत्तूनाना थोडे गंभीर झाले .काही वर्षे गेली आता दत्तूनानाही थकले .
एक दिवशी अचानक गच्चीवर दत्तूनानांचे फोटो सेशन मी पाहिले आणि धक्का बसला .न राहवून मी बंड्याला फोन केला आणि त्याला ही गोष्ट सांगितली.
" मीच अरेंज केलेय ते ...बंड्याने शांतपणे उत्तर दिले आणि मी हादरलो.
"या वयात हे मॉडेलसारखे फोटो काढणे शोभते का .."?? असे मी विचारताच.
"काय हरकत आहे बरीच जोडपी लग्नाआधी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढतात ते प्रत्येकजण मॉडेल असतात का ...."??असे समोरून उत्तर आले आणि मी फोन खाली ठेवला .
लागोपाठ गेली तीन वर्षे दत्तूनाना स्वतःचे फोटो सेशन करून घेत होते .कधी पुणेरी पगडी धोतरात तर कधी थ्री पीस घालून तर कधी बायकोच्या फोटोसमोर हात जोडताना.कोणी विचारले तर का करू नये...?? असे उलट प्रश्न विचारून समोरच्याला गप्प करायचे .
"अरे भाऊ ..आता किती दिवस राहिले माझे. उलट या आठवणीतच आयुष्य काढायचे आहे .उद्या नातवंडे पतवंडे हे पाहुन माझी आठवण काढतील....".माझ्या खांद्यावर हात ठेवून ते सांगत होते.पण त्याच्या कापऱ्या हाताची थरथर माझ्या मनात घर करून बसणार होती.
शेवटी तो दिवस आला .त्या रात्री दत्तूनाना झोपले ते न उठण्यासाठी. परदेशातून मुलाचा अपेक्षित निरोप आला तुम्ही करून घ्या पैश्याची काळजी नको .त्यांच्या अंतिम इच्छा  पूर्ण करा .
आता सर्व सूत्रे बंड्या आणि विक्रमच्या हातात होती. विक्रमने कमलाकर कदम उर्फ केकेला फोन केला आणि लाईव्ह शूटिंगची तयारी केली तर बंड्याने सर्वाना व्हाट्स अपवर अंत्ययात्रेची माहिती देणारा मेसेज पाठविला.
मलाही मेसेज आला आणि ते बघताच मी उडालो .मेसेजमध्ये दत्तूनानांचा थ्री पिसमधील हसरा फोटो आणि खाली अंत्ययात्रेची वेळ  पत्ता दिला होता पण खाली स्पेशल टीप होती...कृपया अंत्ययात्रेला येताना पांढरे कपडे घालून येणे. आयला ...अंत्ययात्रेला चक्क ड्रेस कोड. 
" हे काय...??मी मेसेज दाखवत बंड्याला विचारले.
"अंतिम इच्छा भाऊ ... आपण अंत्ययात्रेला नेहमी जुने फाटके कपडे घालून जातो .हरी बघा थ्री फोर्थ शिवाय स्मशानात येत नाही .गेलेल्यांचा आदर करण्यासाठी ड्रेसकोड ...."बंड्या हसत उद्गारला 
काही वेळाने आमचे व्यवस्थापक हरी बिल्डिंखाली हजर झाले .त्याने नेहमीची थ्री फोर्थ आणि सार्वजनिक दहीकाला उत्सवाचा  टीशर्ट सोडून चक्क पांढरा कुर्ता पायजमा घातला होता .पण त्यात कुठेही अवघडलेला वाटत नव्हता. मी त्याच्याकडे खालपासून वरपर्यंत पाहिले.
"हे कुठून आणलेस...."?? मी रोखून विचारले.
" पुतण्याच्या साखरपुड्याला  भावाने घेतला होता  त्यानंतर आज कामी आला ..."तो हसत म्हणाला.
"पण यात जमेल ना सर्व विधी करायला ..."मी सावधगिरीने विचारले .
"तर काय ...?? आपले काम महत्वाचे . कपड्यांचे काय घेऊन बसलायत.आणि शिवाय लाईव्ह शूटिंग आहे .माझे कार्य परदेशातही पोचेल ह्या निमित्ताने...हरीने अतिशय सहज स्वरात सांगितले.
माझ्यासमोर चितेभोवती शिव्या देत विधीच्या सूचना  करणारा हरी उभा राहिला .आज जो अंत्यसंस्कार करेल त्याच्या दोन तीन पिढ्या तरी खाली येणार याची खात्री मला होती.
इतक्यात बंड्या चार लोकांना घेऊन येताना दिसला . त्यातील एकाच्या गळ्यात ढोलके आणि दोघांच्या हातात टाळ होते.रस्त्याच्या कडेला चटई टाकून बंड्या म्हणाला इथे बसून सुरवात करा . त्या मंडळीने ताबडतोब बसून भजनाला सुरवात केली. परत बंड्याने माझ्याकडे पाहत अंतिम इच्छा असे खुणावत हात वर केले.
म्हणता म्हणता सर्व तयारी झाली.पारंपरिक पद्धतीने अंत्ययात्रेची तयारी झाली. एका बाजूला भजन सुरू होते .बंड्याने त्यांची सोय व्यवस्थित केलेली दिसत होती त्यामुळे ते न थकता रंगात येऊन भजन म्हणत होते . अधून मधून विक्रमही कोरसमध्ये गाण्याची हौस भागवून घेत होता .
इतक्यात कानावर ती परिचित टाळी ऐकू आली आणि मागोमाग त्याची "क्या रे भाऊ....?? ही परिचित हाकही.
" आता हा कुठे इथे ...?? मी त्याच्याकडे बघितले आणि त्याने तो प्रश्न हेरला.
"बंड्याने बोलावले आहे.कोणतरी म्हातारा गेलाय त्याच्यासाठी रडायचे आहे म्हणाला .माझ्यासोबत ह्यांना ही घेऊन आलोय... .."बरोबर असलेल्या साथीदारांकडे हात दाखवून म्हणाला.म्हाताऱ्याच्या अजून किती अंतिम इच्छा आहेत.मी मनात म्हणालो. 
"भाऊ कोणतरी मोठा माणूस मेलाय का... ?? सर्वजण सफेद कपडे घालून आहेत म्हणून म्हटले ..." त्याने आजूबाजूला पाहत विचारले .
"हो.. त्याच्या मृत्यूवर चारजणानी रडावे अशी त्यांची अंतिम इच्छा होती.चला  करा सुरवात ...."मी घराकडे बोट दाखवून म्हटले. 
ते सर्व घरात शिरले आणि काही क्षणात मोठमोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आला.
अंत्ययात्रेची पूर्ण तयारी झाली होती. तिरडी बांधून तयार होती.
"गाडी नाहीय भाऊ ..माझ्या नजरेतील प्रश्न ओळखून बंड्याने उत्तर दिले .त्यांना खांद्यावरूनच स्मशानात घेऊन जायचे आहे .
"आयचा घो ...भर उन्हात दीड किलोमीटर त्यांना खांद्यावर घेऊन चालत जायचे ...देवा ..कसली या माणसाची अंतिम इच्छा ...." मी चिडून म्हटले अर्थात मनातच.
काही वेळाने दत्तूनानाची अंतिम यात्रा सुरू झाली. दर पाच मिनिटाने कोणतरी पुढे होऊन त्यांना खांदा देत होते. मी ही त्यात होतो. आज बऱ्याच वर्षांनी कोणालातरी खांदा दिला होता .दत्तूनानांना खांदा देताना नकळत डोळ्यातून अश्रू बाहेर पडलेच.
स्मशानात केकेने लाईव्ह प्रसारणाची पूर्ण तयारी केली होती.तीन कॅमेरामन फिरत होते.ड्रोन पाहिजे का..?? असे ही केकेने विचारले पण ते फारच होईल म्हणून विक्रमने ती सूचना बाद केली होती. 
लाईव्ह प्रसारणाची लिंक सर्व सोशल मीडियावर दिली होती.दत्तूनानाना ओळखणारे लोक कोणत्याही सोशल मीडियावरून त्यांचे अंत्यसंकार लाईव्ह बघू शकत होते .स्मशानात एका टीव्ही स्क्रिन वर त्याचे आतापर्यंतचे सर्व फोटो विडिओ दिसत होते.
"हे भारी आहे .."मी टीव्हीकडे पाहत म्हणालो. 
"वाटते ना भारी ...मीच आयडिया दिली होती नानाना ..म्हटले तुमचे फोटोशूट स्मशानात दाखवू अंत्यसंस्काराच्या वेळी.लोकांना भरून येईल.जाम खुश झाले आणि होकार दिला ...." केके उर्फ कमलाकर कदम माझ्या कानात पुटपुटला.
"तू तर मोठा हात मारलास ..." मी चिडून म्हणालो.
"भाऊ ...दत्तूनानांच्या मरणाने माझ्या चार पोरांना पैसे मिळत असतील तर काय हरकत आहे .आणि त्यांचीच अंतिम इच्छा मी पूर्ण करतोय ना ..."?? केके हसत उत्तरला .
अंत्यसंस्काराच्या वेळी हरी फारच उत्साहात दिसत होता.इतरवेळी ज्या विधींना फाटा द्यायचा त्या विधी हौसेने करत होता . आपण जास्तीतजास्त वेळ कॅमेऱ्यासमोर कसे येऊ याची काळजी घेत  होता.
शेवटी सर्व विधी संपले दत्तूनानांच्या चितेला अग्नी देण्यात आला .मी निघणार इतक्यात बंड्याने थांबविले 
"भाऊ ...चार शब्द बोलून जा . लाईव्ह आहे सोशल मीडियावर ...."
हे मात्र जास्तच होतेय. पण काही मान्यवर मात्र दत्तूनानांविषयी चांगले बोलत होते . अर्थात त्या मान्यवरांच्या पंगतीत हरी,नटरंगचा शेट्टी ,टपरीचा अण्णा होते. जाताजाता या लोकांची उधारी देऊनच नाना गेले हे आमच्या लक्षात आले. असो विक्रमही पुढे होऊन चार शब्द बोलला पण यापुढे नानांकडून मिळणारे  दोन पेग बंद झाले याचेच जास्त दुःख दिसत होते.
"काय रे बंड्या.... हे सर्व अति होतेय असे वाटत नाही का तुला ..?? नाना गेल्यावर फार दुःख करायचे नाही हे आपले आधीच ठरले होते पण यासर्व गोष्टी कश्या आल्या मध्येच .....?? मी माझ्या मनातील शंका विचारल्या 
"भाऊ..तुम्हाला माहितीय नाना किती हौशी .कोणाच्या तरी लग्नात त्यांनी प्री वेडिंग शूटिंग पाहिले आणि त्यांच्या मनात बसले . नंतर लग्नात विविध ड्रेस कोड ,पारंपरिक पद्धतीने लग्न पाहून ते भलतेच खूष झाले .लोक पूर्वीसारखी जुन्या रीती रिवाजकडे वळत आहेत तर माझे अंत्यसंस्कारही पारंपरिक रितिरिवाजप्रमाणे का होऊ नयेत असे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी मला हा विचार बोलून दाखविला .मग मी जुन्या पद्धती आणि नवी पद्धती एकत्र करून हे सर्व तयार केले आणि दत्तूनानांनी हीच अंतिम इच्छा मला पूर्ण करायला सांगितली...." बंड्याने सर्व व्यवस्थित समजावले आणि मी मनोमन दोघांना प्रणाम केला.
बाहेर पडताच नेहमीप्रमाणे आम्ही दुःख हलके करण्यास नटरंगचा रस्ता पकडला .मध्येच बंड्याचा फोन आला भाऊ बिल भरू नका आजचा खर्च दत्तूनानाच्या पॅकेजमधून आहे . शेट्टीला लिस्ट दिली आहे.
हे ऐकून मात्र आमच्या डोळ्यातून पाणी आले आणि आज आमचा सच्चा मित्र गमावला याची जाणीव झाली.
©श्री. किरण कृष्णा बोरकर