Tuesday, November 27, 2018

ब्रह्माडाची  कवाड ......संपादन..लक्ष्मण लोंढे /डॉ. मेघश्री दळवी

ब्रह्माडाची  कवाड ......संपादन..लक्ष्मण लोंढे /डॉ. मेघश्री दळवी
गार्गीज प्रकाशन
मराठी विज्ञान परिषदेने फेब्रुवारी 2012 मध्ये विज्ञानकथा लिहीणार्या लेखकांचे शिबिर आयोजित केले होते . शिबिर संपल्यानंतरही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होते .त्यातूनच साय-फाय कट्टा स्थापन झाला .त्यातील काही लेखकांच्या कथांचा हा विज्ञानकथा संग्रह .एकूण सोळा विज्ञानकथा यात आहेत . प्रत्येक कथा वेगळ्या धाटणीची आहे . कॅप्टन  सुनील सुळे,सुरेश भावे,स्मिता पोतनीस  यांच्यासारख्या लेखकांच्या कथा समाविष्ट केल्या आहेत . विज्ञानकथा प्रेमींना निश्चितच आवडेल असा हा कथासंग्रह आहे .

Saturday, November 24, 2018

त्याच्या नंतर

आज त्याला जाऊन पंधरा दिवस झाले .घरातील गडबड शांत झाली .तिच्या सासरचे... माहेरचे ...तेरा दिवस झाल्यावरच घरी परतले होते. कधी एकदा हे सोपस्कार संपतात याचीच जणू वाट पाहत होते .
त्याचे अचानक जाणे हा जणू तिचाच दोष धरला गेला होता . सोनूलीला कुशीत घेऊन शांतपणे गॅलरीत बसून होती ती . संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर जणू रिकामे उभे होते . अचानक डोअरबेलने ती जागी झाली .दरवाजा उघडला तेव्हा समोर छोटा दिर उभा.
"वहिनी.... पुण्याला कामासाठी चाललो आहे .गाडी घेऊन जाऊ ......"? दरवाजातूनच विचारले.तिने काही न बोलता कारची चावी हातात दिली.
त्याने पहिली ऍक्टिव्हा घेतली तेव्हा सोनूलीचा जन्म ही झाला नव्हता.हिच्या मागे लागायचा ...शिकून घे. पण ही ऐकली नाही. "तुम्ही आहात ना...?? मग काय गरज मला शिकायची ..??मग सोनूली झाल्यावर कार घेतली . पण हिला शिकायचा कंटाळा. तो असता तर कोणाची हिंमत होती का  गाडीची चावी मागायची....?? . जाऊदे नाहीतरी पडून राहणार अश्याच . वापरतील आपलीच माणसे ....
इतक्यात त्याचा मोबाईल वाजला .कोणत्यातरी कंपनीचा होता ."मॅडम काही पेमेंट राहिले आहे त्याची आठवण करून द्यायला फोन केला .ऑनलाईन पेमेंट करा.
" बापरे ही काय भानगड ..??? कुठे कुठे यांनी पैसे गुंतवलेत देव जाणे . . तरी सारखे सांगत होते लक्ष दे ,इंटरनेट बँकिंग शिक. पण ही हसून टाळत होती.. ते पैश्याचे तुम्ही पहा मी घरातील पाहीन . तिने  कपाटातील लॉकरमधून त्याची पर्सनल फाईल काढली   देवा .... इतके पेपर्स . इतकी कार्ड्स . यातील मला काहीच माहिती नाही .आता कोणाला विचारू ...??
इतक्यात टॉयलेटमधून सोनूलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला .काळजीने तिने हाक मारली तेव्हा रडत बाहेर आली . हातात कमोडचा स्प्रे होता ."मम्मी ....तुटला .... त्याही स्थितीत ती हसली . ताबडतोब  दुरुस्त कर तुला माहितीय त्याशिवाय मला जमत नाही. तिने मान डोलावली.ही पण त्याचीच शिकवण .आपल्या मुलीला सगळे अत्याधुनिक द्यायचे हा त्याचा हट्ट . आजच्या युगात तिला सर्व वापरता आले पाहिजे आपल्यासारखे अडाणी आणि जुने नको .
पण आता हे दुरुस्त कोण करेल .....??सगळे काही तोच बघत होता .कसातरी प्लंबरचा नंबर शोधून त्याला फोन केला पण त्याने ताबडतोब यायला नकार दिला . फोनवर बोलताना त्याचा वेगळाच स्वर ऐकून चमकली. आता हे एकटीला सहन करावेच लागेल.... मनाशी काही ठरवून ती जुना स्प्रे घेऊन बाहेर पडली . जवळपास कुठेतरी याचे दुकान आहे हे आठवत होते तिला . ती चौकशी करत निघाली .
समोरून सोसायटील रेगे येत होते . तिला पाहतच त्यांच्या नजरेत वेगळीच चमक आली . तशीही अनेकवेळा अनेकांच्या नजरेत तिने अशी चमक पहिली होती .पण आज ती जास्तच तीव्र वाटली .
"वहिनी तुम्ही कुठे निघालात ...?? काही हवे आहे का...... ??? न लाजता सांगा ...आहे मी .असे म्हणत हसला.तिला एकदम शिसारी आली .आतापर्यंत लांबून नजर ठेवणारे लांडगे आता जवळ सरकू लागले होते.गेटजवळ बसलेल्या टपोरी मुलांच्या लोचट नजरा सहन करीत बाहेर पडली .
दुकानदाराला तो स्प्रे दाखवताच त्याने नवीन दिला . आता  लावेल कोण ...?? ती मनाशी म्हणाली .घरी येताच तिने भाऊला फोन लावला पण तो गावी आहे असे कळताच खट्टू झाली . मग विक्रम.....?? त्याने फोन उचलला तिचा प्रॉब्लेम ऐकताच "आता मीटिंग सोडून तुझ्या संडासात स्प्रे फिट करायला येऊ का ....???? असा चिडून प्रश्न केला .
तिने काही न बोलता फोन ठेवला . घरातील टूल बॉक्स काढून योग्य ती हत्यारे काढली आणि कमोडवर बसून स्प्रे लावायची खटपट करू लागली दीड तास खटपट करून झाल्यावर स्प्रे बदली केला तेव्हा ती स्वतःवर खुश झाली .आपल्याला जमू शकते तर ..???
संध्याकाळी सासू घरी आली . बोलता बोलता तिने मुलाच्या बँक अकाउंटचा विषय काढला .दुसरा मुलगा सर्व व्यवहार पाहिल असे आश्वासन दिले . ती काही न बोलता ऐकून घेत होती . हळूहळू आपल्यासमोर उभ्या ठाकणाऱ्या अडचणींचा तिला अंदाज येऊ लागला.
तिने ताबडतोब विक्रमला फोन करून गाड्या विकून टाकायचा निर्णय सांगितला तसा विक्रम पंधरा मिनिटात घरी हजर झाला . यावेळी सोबत वनिता होती.
" मामा.... मम्मीने कमोडचा स्प्रे बदलला..."त्याच्या अंगावर उडी मारत सोनूली हसत म्हणाली.
"तिला सर्व येते सोनू ...फक्त आळशी आहे ती "चॉकलेट तिच्या हाती देत विक्रम म्हणाला." दोन्ही गाड्या विकायची काही गरज नाही. पुढच्या महिन्यात कार विकून टाकू पण स्कुटर ठेवू तुझ्यासाठी "
"अरे पण मला नाही चालवता येत ..ती रडवेला चेहरा करून म्हणाली.
"पुढचे पंधरा दिवस वनिता शिकवेल तुला .."तो वनिताकडे पाहत म्हणाला "फक्त पंधरा दिवस देतोय माझी बायको देतोय तुला... स्कुटर ..गाडी ,बँकिंग सगळे शिकून घे तिच्याकडून .नंतर तुझे तूच बघ . इथे तुझ्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही . नंतर कार विकून टाकू .
"हे सर्व जमेल का मला पंधरा दिवसात ...? तिने काळजीने विचारले .
"कमोडचा स्प्रे बदललास ना दीड तासात ...?? यापुढे तुझे तू बघ ..वाईट नजरेचा कसा सामना ते तूच ठरव.आम्ही फक्त पंधरा दिवस तुझ्या सोबत आहोत . मग तू आणि तुझी मुलगी आणि तुमचे आयुष्य .."मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनिताला हाताने थोपवत विक्रम म्हणाला .
वनिताने हताश होऊन तिच्याकडे पाहिले तशी ती हसली ."वनिता.... उद्या सकाळी आठ वाजता मी तुझ्या बिल्डिंगखाली येते . बँकेत जायचे आहे आपल्याला त्यानंतर इन्शुरन्स ऑफिसमध्ये.."तिच्या आवाजातील बदल पाहून विक्रमने सुटकेचा सुस्कारा सोडला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, November 22, 2018

शिवगामी कथा (खंड १)...आनंद निलकंठन

शिवगामी कथा (खंड १)...आनंद निलकंठन
अनुवाद..........भारती पांडे
वेस्टलँड पब्लिकेशन
आपल्या वडिलांना देशद्रोही ठरवून त्यांची हत्या केली याची शिवगामीला चीड आहे . वयाच्या सतराव्या वर्षी ती आपल्या सील केलेल्या हवेलीत चोरमार्गाने प्रवेश करते आणि गुप्तखणात ठेवलेले हस्तलिखित पुस्तक ताब्यात घेते.आपल्या वडिलांच्या निरपराधी असण्याचा पुरावा त्यात आहे याची तिला खात्री आहे .
त्याच वेळी कट्टपा हा दास महिष्पती राज्याच्या राजकुमाराच्या सेवेसी दाखल होतो.त्याने आपली संपूर्ण निष्ठा राजकुमाराच्या पायाशी वाहिली आहे तर त्याचा भाऊ बंडखोर झालाय.
हस्तलिखितांचे वाचन करताना शिवगामीला कळून चुकले महिष्पती राज्य कटकारस्थान , भ्रष्ट अधिकारी यांनी वेढून गेले आहे . पैसा आणि तलवार  याच्या जोरावर महिष्पती राज्यात काहीही घडू शकते.
एका सत्तर वर्षाच्या स्त्रीच्या हाताखाली एक गुप्त गट दासांचा व्यापार बंद करण्यासाठी योजना आखतोय.तर एक शूर आदिवासी जमात आपले स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बंड करण्याच्या तयारीत आहे .
एका कट करस्थानांनी ,रहस्यांनी वेढलेल्या महिष्पती राज्याची अंगावर काटा आणणारी ही कथा .
एस. एस. राजमौली यांनी निर्माण केलेला बाहुबली या प्रसिद्ध चित्रपटाची प्रारंभापूर्वीची ही कथा निश्चितच सर्वाना आवडेल .

Monday, November 19, 2018

द ब्रोकर....जॉन ग्रिशम

द ब्रोकर....जॉन ग्रिशम
अनुवाद...अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अखेरच्या काही तासात त्यांनी जोएल बॅकमनला माफी दिली आणि त्याची सहा वर्षांनी सुटका झाली.
कोण आहे हा बॅकमन ....?? एक हुशार वकील ..
पण सर्व त्याला ब्रोकर म्हणतात....
एक दलाल .
तो कोणालाही सत्तेतून खाली खेचू शकतो.कोणालाही वर आणू शकतो.त्याच्याकडे अनेक गुपिते आहेत. पण शेवटी त्याला तुरुंगवास झाला .आपल्या साथीदारांचा जीव वाचावा म्हणून त्याने काही आरोप स्वीकारले . पण आता तो सुटून बाहेर येणार आहे .सीआयए ने त्याला नवीन देशात ठेवले. त्याला नवीन घर नवीन ओळख दिली .  पण त्याचबरोबर त्याचा पत्ता जगातील प्रमुख गुप्तहेर संघटनांना दिला. त्याला कोण येऊन मारणार आहे हेच त्यांना पहायचे होते. अशी कोणती रहस्ये त्याच्याकडे आहेत ते हुडकून काढायचे होते....
पण काही भलतेच घडले... या प्रकरणाला वेगळीच अनपेक्षित कलाटणी मिळाली . असे काय होते की सारेच चकित झाले .

Sunday, November 18, 2018

द ओल्ड मॅन अँड द सी...अर्नेस्ट हेमीग्वे

द ओल्ड मॅन अँड द सी...अर्नेस्ट हेमीग्वे
एका कोळीयाने........ पु.ल. देशपांडे
देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स
सुप्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हेमिग्वे यांच्या नोबेल पारितोषिक प्राप्त कलाकृतीचा पु. ल. देशपांडे यांनी केलेला अनुवाद.
ही कथा आहे एका म्हाताऱ्या कोळ्याची.त्याने भर समुद्रात एका भल्या मोठ्या माशाशी केलेल्या संघर्षाची .....लढाईची....
तो म्हातारा कोळी रोज समुद्रात जातो आणि रिकाम्या हाताने परत येतो. त्याच्या जोडीला शेजारचा तरुण मुलगा आहे पण मासे मिळत नाही म्हणून त्याच्या आई वडिलांनी आज त्याच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली नाही . एकूण पंच्याऐशी दिवस म्हाताऱ्या कोळ्याला एकही मासा मिळाला नाही . आज तो एकटाच खोल समुद्रात मासेमारी करायला गेला आहे आणि त्याच्या गळात अठरा फूट लांबीचा मासा सापडतो . सलग दोन दिवस  एकटा स्वतःशी बडबडत तो त्या अजस्त्र माश्याशी झुंज देतो.आपला अनुभव पणाला लावून त्याच्यावर विजय मिळवतो आणि त्याला होडीच्या शेजारी बांधून परतीच्या प्रवासाला निघतो.
पण परतीच्या प्रवासात त्याला शार्क माश्यांच्या झुंडीशी सामना करावा लागतो . जेव्हा तो किनाऱ्याला लागतो तेव्हा माश्याचा फक्त सांगाडा उरलेला असतो.
अतिशय रोमांचक असे हे पुस्तक आहे . पु.ल.नी लेखकाचा आदर ठेवून जशास तसा अनुवाद केला आहे . यात कुठेही पु.ल.ची शैली दिसत नाही.
१९५५ साली वि. स. खांडेकर यांनी लेखकाकडे भाषांतराची परवानगी मागितली आणि त्यांना ताबडतोब मिळालीही. खांडेकरांनी १९५५ ते १९५८ पर्यंत भाषांतराचा प्रयत्न केला पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे काम सोडून द्यावे लागले .मग ते काम अनंत काणेकर यांच्याकडे आले . पण कामाच्या व्यापात त्यांनाही ते जमेना म्हणून प्रकाशकाला परत केले . शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पु.ल.ना विचारणा केली . पु.ल. नी नाकारले असते तर ते पुस्तक मूळ लेखकाला परत करायचे असे ठरले .पु.ल.आणि सुनीताबाईनी चार वर्षानी त्याचे भाषांतर पूर्ण केले . दरम्यान हेमीग्वे यांचा मृत्यू झाला . त्यामुळे हे पुस्तक हेमीग्वे याना पाठविण्याची इच्छा अपूर्णच राहिली .१९६५ साली याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली . मूळ पुस्तकातील चित्रांपासून सगळे काही जसेच्या तसे देण्याचा प्रकाशकांनी प्रयत्न केला आहे .

नरभक्षक

नरभक्षक
खरेतर शेरखानच्या हातात बाटली आणि तोंडात मासाचा तुकडा पाहूनच अंकल समजून गेला आपल्या संध्याकाळची वाट लागली आहे. नदीत छानपैकी डुंबत अंगावर सोंडेने पाणी उडवत एखाद्या तरुण हत्तीणीची छेड काढीत बसायचा त्याचा बेत होता पण आता सगळ्याचाच बट्ट्याबोळ झालाय हे लक्षात आले त्याच्या.,मुकाटपणे त्याने शेरखानचे स्वागत केले.
शेरखान बाटली समोर ठेवून बसला मग एक चिरुट काढून शिलगावला आणि अंकलला ऑफर केला.नकार देत अंकलने मोठ्या बांबूपासून बनवलेला  चिरुट तोंडात धरून शिलगावला.
" बोल शेरु ....!!आज बऱ्याच दिवसांनी प्रोग्रॅम ...?? त्याने शांतपणे विचारले.
"हो .....म्हटले तुला बरेच दिवस भेटलो नाही.म्हणून आलो" शेरखान बाटलीतील एक घोट घेत म्हणाला.
" च्यायला.....बायको घरात मुलांसमोर पिऊ देत नाही म्हणून माझी आठवण आली ...अंकल मनातच म्हणाला.
"काय झाले शेरु .....?? तुझा चेहरा दुःखी दिसतोय". अंकलने हळुवारपणे विचारले.
"आज त्यांनी अवंतीला गोळ्या घालून मारले" बोलता बोलता शेरखानच्या डोळ्यातून अश्रू आले .
'हम्मम्म ....ऐकले मी ते .लग्नाआधी ती तुझ्याबरोबर फिरत होती ना ...?? अचानक अंकलचा प्रश्न अंगावर येताच तो हडबडला.
"ते सर्व तरुणपणी रे …..नंतर मी इथे आलो "शेरखान लाजत म्हणाला." पण ती अचानक नरभक्षक कशी झाली ..."??.तो स्वतःशी विचार करत बोलला.
"अन्न मिळाले नाही की तुम्हा मांसाहारी प्राण्यांचे तेच होणार .. "अंकल म्हणाला .
"मग काय करायचे आम्ही ...?? उपाशी मरायचे ....?? हे बघ अंकल.. या जगात सर्वाना जगण्याचा ..आपले अन्न मिळवायचा अधिकार आहे .." शेरखान उसळून म्हणाला .
"म्हणजे तिला अन्न मिळाले नसेल आणि उपाशी असेल म्हणून तिने माणसे खाल्ली ..."अंकल म्हणाला.
"माहीत नाही .. तसेही असू शकेल .. नाहीतरी इथेही हल्ली आम्हाला शिकार मिळणे कमीच झालेय.मी तर नसबंदी करायचा विचार करतोय . आयला नवीन पोर पैदा करून त्यांना खायला काय देऊ..?? आहे त्या पोरांना सांगितलंय तुमचे तुम्ही बघा . उलट मी तर सभेत असा ठराव करणार की आम्हाला अल्पसंख्याक  म्हणून मंजुरी द्या..
"काय बोलतोस ते कळते का ...??? अंकल हसत म्हणाला.अरे या जंगलाचा राजा आहेस तू ...
"मग काय झाले .. ?? आहे ते आहे . त्या माणसांची संख्या बेसुमार वाढलीय त्यांना राहायला जागा नाही .खायला अन्न नाही म्हणून ते जंगलतोड करतायत.माझ्या प्रजेची शिकार करतायत .त्यामुळे आमचे क्षेत्र कमी कमी झाले . आमचे अन्न कमी झाले . अरे साध्या कोंबड्या ही मिळणे  मुश्किल झालेय. साली ती डुकरेही गावात शेतात घुसतात .मग आम्ही काय करायचे ...?? आणि तुला तर माहितीय आम्ही गरज असल्याशिवाय शिकार करीत नाही . ती माणसे जंगलात येतात आणि साप दिसला की विषारी की बिनविषारी याचा विचार न करता मारून टाकतात.कोणताही प्राणी दिसला की त्याच्यावर हल्ला करतात.
" तुला नक्की राग कसला आहे .... ??अंकल नजर रोखून म्हणाला.
"मला राग त्या माणसांचा आहे जे अवंतीवर राजकारण करतायत .काही म्हणतात ती नरभक्षक नव्हती तिला जिवंत पकडता आले असते ..तर काही म्हणतायत तिला मारायला हवे होते. कोसो दूर असलेली माणसे जी कधी जंगलात आली नव्हती ती तिच्याबद्दल अधिकारवाणीने बोलतात..,सल्ले देतात...,टीव्ही वर मुलाखती देतात . झाली असेल ती नरभक्षक पण त्या मागे आपणच आहोत हे विसरतायत. अवंतीचा त्रास त्यांना होऊ लागला आणि अवंतीला त्यांचा . दोघेही आपल्या अस्तित्वासाठी लढू लागले आणि जो बलवान हुशार तोच जिंकतो.यामागे काय राजकारण आहे ते माहीत नाही पण खरेच राजकारण असेल तर ते सिद्ध करा आमचा वापर करू नका. मी तर म्हणतो  इतकी बोंब मारण्यापेक्षा आम्हाला दत्तक घ्या रोज अन्नाची सोय करा. कशाला आम्ही माणसांच्या वाट्याला जाऊ.अंकल पोटाला चिमटा बसला की सर्व विसरायला होते आठवते ती फक्त भूक . माणसे नाहीत का गरज पडल्यावर स्वतःच्या माणसांना खात ...?? मग त्यांनाही मारून टाकायचे का ..?. शेरखानने एक मोठा घोट घेतला आणि मासाचा तुकडा तोडला .
"म्हणजे तुला अवंतीला मारण्याचे दुःख नाही  त्यामागे बोंबाबोंब चाललीय त्याचे दुःख आहे तर ....?? खरे आहे शेरू आपण फक्त जगण्यासाठी शिकार करतो पण हे मानव आपल्या स्वार्थासाठी शिकार करतात.पण सध्यातरी आपल्याला त्यांच्या तालावर नाचण्याशिवाय पर्याय नाही "असे म्हणत अंकलने त्याच्या हातातली बाटली आपल्या घशात रिकामी केली .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, November 15, 2018

महेश्वर नेचर पार्क .....मिलिंद बोकील

महेश्वर नेचर पार्क .....मिलिंद बोकील
मौज प्रकाशन
निसर्गाच्या सानिध्यात किंवा नैसर्गिक वातावरणात माणूस फार काळ एकटा राहू शकत नाही . शेवटी त्याला समाजात परतावे लागतेच . सर्व भावनांचा किंवा जाणिवांचा तो त्याग करू शकत नाही .यात दोन कथा आहे .महेश्वर या कथेत गणिताचा प्राध्यापक काही दिवस एका गडावर राहायला जातो . तिथे तो एकटाच गुहेत राहतो . गडावरील देवाची पूजा करायची जबाबदारी त्याच्यावर पडते. गडाखालील लोक बाबा त्याला समजू लागतात. पण काही दिवसांनी त्याची पत्नी येते आणि तो तिच्याबरोबर गडाखाली उतरतो . तर नेचर पार्क या कथेत एक श्रीमंत मध्यमवयीन दाम्पत्य परदेशात एका रिसॉर्टवर  जाते . जंगलात एकांत ठिकाणी असलेल्या त्या रिसॉर्टवर सर्व नैसर्गिक अवस्थेत राहतात .सुट्टी संपवून घरी येताना  नवरा आपल्या बायकोला साडी नेसायची सूचना करतो . पुस्तक वाचायला कंटाळा येत नाही .

Monday, November 12, 2018

ऑनलाईन डॉक्टर

ऑनलाईन डॉक्टर
रविवारच्या दुपारी भरपेट जेवून आरामात झोपून आवडीचे पुस्तक वाचत पडणे यासारखे दुसरे सुख नाही . पुस्तक वाचता वाचता कधी झोप लागते ते कळत ही नाही आणि नेमका तोच आनंद मी घेत होतो . पण अचानक कोणीतरी  खांदा धरून हलवतोय याचा भास होऊ लागला .थोड्या वेळाने भास अधिक तीव्र झाला म्हणून नाईलाजाने मी डोळे उघडले तर समोर दिलीप उभा ."भाऊ उठा.....बाबा कसे तरी करतायत ".तो काळजीने म्हणाला .तसा मी उठलो. काल तुझ्या बाबांचा शनिवार फारच जोरात होता असे बोलावेसे वाटले.. पण गप्प बसलो. म्हटले चल बघू आणि त्याच्या बरोबर निघालो.
दिलीप आमच्या बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होता .त्याच्या घरी पोचलो तर बाबा तळमळत होते."काय करायचे भाऊ ...?? आज रविवार ... डॉक्टरही नसेल दवाखान्यात .हॉस्पिटलमध्ये न्यायचे का ....."?? तो काळजीने म्हणाला.
"नाही  तितके काही सिरीयस दिसत नाही. ऍसिडिटीचा त्रास होत असेल...".मी म्हणालो. मनात म्हटले नको नको म्हणताना तिसरा पेग घेतला की असेच होणार त्यानंतर ते चायनीज खाणे ."त्यांना लिंबू पाणी दे नाहीतर .... मी म्हटले "मी डॉक्टर पाहतो " खरे तर इतका मोठा देह आम्ही दोघे तिघे चौथ्या मजल्यावरून खाली आणायच्या कल्पनेनेच मला घाम फुटला होता .
मी फोन करून बंड्याला बोलावले आणि त्याला सर्व परिस्थितीची कल्पना दिली.बंड्याने हसून सर्व समजले अशी खूण केली आणि म्हणाला "काळजी करू नका मी सोय करतो डॉक्टरची ."असे बोलून एक फोन लावला .समोरच्या व्यक्तीला आपला अड्रेस देऊन फोन बंद केला . पाच मिनिटात डॉक्टर येईल . आणि खरेच सातव्या मिनिटाला डॉक्टर बिल्डिंग खाली बाईक पार्क करत होता. .बंड्या त्यांना वरती घेऊन आला .आणि आमची ओळख करून दिली" हे डॉक्टर अतुल सहस्त्रबुध्ये .."त्यांना  पाहिल्यावर माझे त्यांच्याविषयी मत चांगले झाले .साधारण 35 ते 37 चा तरुण दिसत होता . आता जाऊन त्याने बाबांना चेक केले .बॅगेतून एक इंजेक्शन काढून त्यांना दिले .मग त्याच्या पॅडवर काही औषधें लिहून दिलीपच्या हाती कागद दिला .ही औषधे द्या दोन दिवस.अपचन झालेय .. यावयात खाण्यावर कंट्रोल असावा . असे म्हणून हसला.मग खिश्यातून मोबाइल काढून त्याने बाबांचा फोटो काढला  नंतर त्याने बाबांच्या तब्बेती विषयी सर्व माहिती दिलीपच्या विचारून मोबाईलमध्ये भरून घेतली .
"डॉक्टर तुमचे किती झाले.......मी विचारले तसे त्यांनी सातशे रुपये असे सांगितले"मी नॉर्मली पाचशे घेतो पण आज रविवार आणि त्यात त्यांना माझ्याकडेच इंजेक्शन दिले त्याचे जास्त पैसे.." त्याने हसत हसत स्पष्टीकरण दिले.
"हरकत नाही हो .. पण तुमचा दवाखाना कुठेय....??.या विभागात तुमचा दवाखाना पाहिल्याचे आठवत नाही" मी सहज विचारले .
"नाही हो.... माझा दवाखानाच नाहीय. मी मोबाइल डॉक्टर आहे".तोही सहज म्हणाला.
"म्हणजे ..."?? मी आश्चर्याने विचारले.
"म्हणजे मी तुमच्या घरी येऊन उपचार करतो . त्यासाठी तुमच्याकडे फक्त माझा फोन नंबर पाहिजे.आता पहा ना....?? मी जागा शोधणार.. मग दवाखाना बनविणार ...त्यात लाखो रुपये गुंतवणार आणि पेशंटची वाट पाहत बसणार. पेशंटही इथे आपला नंबर कधी लागेल याची वाट पाहत बसणार . आणि  दवाखान्यात रोज यावे लागणार मला.. माझीही कामे  अडतात. म्हणून विचार केला आपणच पेशंटकडे जायचे.नाहीतरी लांबचे पेशंट दवाखान्यात येत नाहीत आणि घरी येऊन डॉक्टर सर्व्हिस देणार असेल तर कोणाला नकोय..??त्यांचाही वेळ वाचतोय. डॉक्टरांनी समजावले .
"पण डॉक्टर ...काही उपकरणे दवाखान्यात असतात त्यामुळे तिथे ट्रीटमेंट करणे सोपे नाही का ...?? दिलीप ने प्रश्न केला .
"कसली उपकरणे  बेड...?? मग बाबा इथेही बेडवर आहेत . त्यांचे बीपी आणि डायबेटीस तपासायचे यंत्र माझ्याकडे आहे . माझ्या पेपरवर मी लिहून दिलेली औषधे तुम्हाला कोणत्याही मेडिकल दुकानातून मिळू शकतात . तसेच नॉर्मल ताप,सर्दी खोकलाची औषधें माझ्या बॅगेत असतात . टाके मारायचे नवीन उपकरण ही माझ्याकडे आहे .ह्या सर्व तपासण्या मी इथेही करू शकतो . मदतीला पेशंटचे नातेवाईक असतात .आता यानंतर मला दुसऱ्या पेशंटचा कॉल येईपर्यंत मी माझी पर्सनल कामे करू शकतो"डॉक्टरांनी आपली बॅग उघडून दाखवली.
" पण मग तुमचे चार्जेस कसे ..."?? मी मूळ मुद्द्यावर आलो.
"हो .. तो महत्वाचा प्रश्न  आहे. पण मी घरी जाऊन चेक करणार म्हणजे इतर डॉक्टरांपेक्षा जास्त चार्ज घेतो हे खरे ...मी माझ्या चार्जमध्ये माझ्या येण्याजाण्याचे  पैसे ऍड करतो . म्हणजे बघा ना तुम्ही याना जवळच्या दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता तर कमीत कमी पंचवीस रुपये  टॅक्सीचे लागले असते त्यामध्ये तुमचा अर्धा तास गेला असता मग मी एकूण 100 रु तुमच्या बीलात लावले . इंजेक्शन चे दोनशे आणि माझे दोनशे असे पाचशे रु पण तुम्ही रविवारी बोलावलात म्हणून अधिक दोनशे रुपये घेतले .काही चुकीचा हिशोब आहे का ..."?? त्याने आम्हालाच प्रश्न केला.
"अजिबात नाही डॉक्टर .. बंड्या अचानक बोलला.नाहीतरी मोठ्या आजारासाठी लोक स्पेशालिस्टकडे जातात आणि तिकडे जाण्याचा सल्ला ही तुमच्याकडून येतो .दवाखान्यात फक्त बेसिक आजारासाठी लोक येतात त्यानं बऱ्याचजणांना सर्दी खोकला ताप असेच आजार असतात .काही टेस्ट करायच्या झाल्या तर तुम्ही त्या तुमच्या लेटरहेडवर लिहून देतात.औषधे ही बाहेतून आणायला सांगतात.मग त्यासाठी दवाखान्यात यायची गरज काय...??आणि लोक हल्ली सांगेल तेव्हडी फी निमूटपणे देतात".
"पण आता माझे बाबा सिरीयस असते तर?? दिलीपचा प्रश्न ..
"मग मी ताबडतोब तुम्हाला औषधें आणायला सांगितली असती .तुम्हाला वेळ लागत असेल तर मी माझ्या केमिस्टकाढून मागवली असती. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची परिस्थिती असती तर मीच फोन करून अँबूलन्स मागवली असती आणि तुम्हाला त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचे आहे ते विचारले असते तुमच्याकडे हॉस्पिटलचा पर्याय नसता तर त्याचीही व्यवस्था मी केली असती . अँबुलन्समधून त्यांच्या बरोबर गेलो असतो आणि त्यांना ऍडमिट करून उपचार चालू होईपर्यंत त्यांच्यासोबत राहिलो असतो. पण तासागणिक माझा चार्ज वाढत गेला असता".
अरे बापरे हे फुल तयारीतच  असतात मी मनात म्हटले. "पण डॉक्टर अश्यावेळी तुम्हाला दुसऱ्या पेशंटचा कॉल आला तर ... "बंड्याने तोंड उघडले.
"तर मी दुसऱ्या डॉक्टरला फोन करून त्याच्याकडे पाठविला असता "ते हसत म्हणाले" काय आहे बंड्या..... इथे हल्ली लोकांना सर्व घरबसल्या हवे आहे . फोनवरून सर्व मागविण्याची सवय लागली आहे . घरापासून ते अंत्ययात्रेच्या सामानापर्यंत सर्व ऑनलाईन मागवितात मग डॉक्टर का नको .लोकांना कोणताही त्रास नकोय ...त्यांना दवाखान्यात लाईन लावायची नाही .त्यासाठी ते जास्त पैसेही द्यायला तयार आहेत.अरे खाली येऊन साखरही घ्यायचा त्यांना कंटाळा येतो तीच साखर ते दहा रुपये जास्त देऊन ऑनलाईन मागवितात मग आपण तशी सेवा का देऊ नये ...??म्हणून मीही ऑनलाईन सेवा सुरू केली . माझ्यासारखे पाच सहा डॉक्टर आहेत . एकमेकांकडे पेशंट फिरवतो आम्ही . म्हणून ह्या पेशंटची सगळी माहिती फोटो सेव्ह केलाय . पुढच्यावेळी मला फोन केला आणि मी दुसरीकडे असलो तर दुसरा येईल पण त्याच्याकडे यांची सगळी माहिती पोचविण्याचे व्यवस्था झालेली असेल" डॉक्टर हसत म्हणाले.
" पण पेशंट मिळतात का तुम्हाला ..."??मी विचारले.
" हो मिळतात की .....दिवसाला दहा ते पंधरा पेशंट कुठे जात नाहीत. पुरे आहेत...,आम्हालाही आमच्या फॅमिलीसाठी वेळ मिळतो.पुरेसा पैसा मिळतो . माझा फोन नंबर लक्षात ठेवा आणि कधीही गरज लागली तर बोलवा मी किंवा कोणीतरी येऊन पेशंटवर योग्य उपचार करतील याची खात्री देतो तुम्हाला"असे बोलून सर्वांशी हात मिळवून ते बाहेर पडले आणि बाईक स्टार्ट करून निघूनही गेले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर