Wednesday, June 30, 2021

द ब्रोकर.... जॉन ग्रीशॅम

द ब्रोकर.... जॉन ग्रीशॅम
अनुवाद...अशोक पाध्ये 
मेहता पब्लिशिंग हाऊस
खरे तर राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला का माफी दिली हे खुद्द जोएल बॅकमनला ही माहीत नव्हते.तो तुरुंगात वीस वर्षाची सजा भोगत होता आणि त्यातील फक्त सहा वर्षेच संपली होती.
पण मावळते राष्ट्राध्यक्ष मॉर्गन यांनी पदउतार होण्याच्या आधल्या रात्रीच सीआयए संचालकांच्या सांगण्यावरून बॅकमनच्या माफीनाम्यावर सही केली.बॅकमनच्याकडे काही गुपिते आहेत त्यामुळे त्याला माफी देऊन परदेशात नेऊन त्याच्या शत्रूकडून काटा काढावा अशी सरळ सोपी योजना होती .
कोण होता जोएल बॅकमन..?? 
बॅकमन हा एक हुशार वकील होता .अनेक मोठ्या व्यवहारात तो मध्यस्थची भूमिका करायचा. त्याला सगळेजण दलाल म्हणत....अर्थात ब्रोकर .मोठमोठे उद्योगपती ,खासदार ,त्याला भेटण्यासाठी काम करून घेण्यासाठी वाटेल तितके पैसे खर्च करायला तयार असत.त्याची मिटिंग फी पाच हजार डॉलर होती.
काराचीतील तीन संगणकतज्ञ तरुणांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करता करता काही अज्ञात गुप्त उपग्रह शोधले.ती नऊ उपग्रहाची मालिका होती .त्यांनी त्या मालिकेवर नजर ठेवणारे सॉफ्टवेअर बनविले आणि त्यातूनच त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचे ही सॉफ्टवेअर जन्मास आले.ते सॉफ्टवेअर विकण्यासाठी त्यांना श्रीमंत देश किंवा उद्योगपती हवेत. यासाठी त्यांना बॅकमन माध्यस्थीसाठी हवाय.
पण अचानक काही घडते आणि त्या तीन तरुणांची हत्या होते .या व्यवहारात गुंतलेल्या एका सिनेटरचीही  हत्या  होते. बॅकमन सर्व आरोप स्वतःवर घेऊन आपल्या भागीदारांना यातून बाहेर काढतो आणि त्याला वीस वर्षे तुरुंगवास होतो.
पण सीआयएला बॅकमनच्या मागावर नक्की कोणता देश आहे...??  याचा शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठी सीआयएने त्याला अंगावरच्या कपड्यानिशी देशाबाहेर काढून  दुसऱ्या देशात पाठविले . आता त्याच्याकडे स्वतःची कोणतीही ओळख नाही ,क्रेडिट कार्ड नाही पासपोर्ट नाही .
नवीन राष्ट्राध्यक्षांना जोएल बॅकमन विषयी माहिती हवीय पण सीआयए संचालक ती माहिती द्यायला नकार देतात .परिणामतः त्यांना पदावरून दूर केले जाते पण जाताजाता जोएल कुठे आहे याची माहिती ते वेगवेगळ्या देशातील हेरखात्यात पसरवतात. मग ते देश जोएलच्या पाठी लागतात.
आपल्या योजनेत सीआयए यशस्वी होईल ...?? जोएल त्या सर्वांपासून आपले प्राण वाचवेल का ...?? ते सॉफ्टवेअर कोणाकडे आहे ..?? ते अनोळखी उपग्रह कोणी सोडलेत ....?? या सर्वाची उत्तरे हवी असल्यास ब्रोकर वाचायला हवे.

Sunday, June 27, 2021

सर्व्हिस

सर्व्हिस 
केके उर्फ कमलाकर कदम मला त्या हॉस्पिटलच्या गेटजवळ दिसला तेव्हा मुळीच आश्चर्य वाटले नाही.तो कुठेही संचार करू शकतो . प्रत्येक ठिकाणी त्याची माणसे हजर असतात.तो तुम्हाला कोणतीही सेवा देऊ शकतो. त्यासाठी तुमच्या खिश्यात कमीतकमी एक रुपया तरी हवा. हो... कोणतेही काम फुकट करायचे नाही हा त्याचा नियम.
मी त्या दिवशी एक औषध आणायला हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये गेलो. तिथे हा समोर आला.
" भाऊ ...आज इथे ...?? कोणाला भेटायला आलास ...." ?? मी त्याला औषध दाखविले.
"आयला ...!! ह्यासाठी तू इथे. अरे.. फोन करायचा. घरी आणून दिले असते .. "तो ओरडला.
मी मुकाटपणे हात जोडले आणि खांद्यावर हात टाकून समोरच्या हॉटेलात शिरलो.
" सध्या काय चालू तुझे ..."?? मी त्याला नेहमीचा प्रश्न विचारला.अर्थात त्याची कामे जगावेगळी असतात म्हणून मला उत्सुकता .
" नेहमीचेच रे ...पण सध्या एक ब्युरो चालू केले आहे .मेम्बर कमी आहेत... पण आहेत ती पैसेवाले आहेत.."
"म्हणजे.... तू आता लग्न वगैरे जुळवतोस का दुसऱ्यांची ....." मी डोळे मिचकावत विचारले.
" नाही रे ... त्या भानगडीत कोण पडेल .उगाच नंतर दोघांचे बिनसले तर मध्यस्थी करणाऱ्याला शिव्या..तो हसत म्हणाला." पण असेच काही समज. मी जोड्या जुळवतो पण बीन लग्नाच्या ".
" म्हणजे ..."?? मी आश्चर्यचकित 
" हे बघ भाऊ .. हल्ली बरेचजण लग्न न करता एकत्र राहतात. त्यांना फक्त एकमेकांची कंपनी हवी असते. गप्पा..एकत्र फिरणे...पिकनिक आणि शारीरिक सुख यासाठीच एकत्र असतात .एकमेकांवर हक्क गाजवायचा नाही. भावविन गुंतणे नाही.तसेच एकमेकांवर जास्त खर्चही करायचा नाही .पुन्हा जॉब बदलला.दुसरीकडे पोस्टिंग झाली की सगळे सोडून नवीन ठिकाणी नवीन आयुष्य सुरू करायचे हा फंडा जोरात चालू आहे .मी अश्या जोड्या जुळवतो...."केके चहाचा घोट म्हणाला.
" ए बाबा ..नीट सांग समजावून ..." मी पुन्हा हात जोडत म्हटले .
"थांब.... मी तुला उदाहरण देतो. समजा एक मुलगा आणि  एक मुलगी आहे. त्यांना लग्नाच्या बंधनात अडकायचे नाही .दोघेही चांगल्या पगाराच्या नोकरीत आहेत. स्वतंत्र वृत्तीचे आहे .त्यानी माझ्याकडे नावे नोंदवली आणि त्यांना पार्टनर हवे आहेत .मग मी त्यांना एकत्र आणतो . त्यांनी एकमेकांसोबत राहायचे ठरविले की मी कायदेशीर ऍग्रिमेंट करतो .दोघांकडून दर महिना ठराविक रक्कम घेतो . त्यांना सर्व प्रकारची सर्व्हिस देतो .अगदी जेवणापासून...बिल भरणे...लौंड्रि ...मेडिकल ...जे ते म्हणतील ते .... आपले मीटर चालू...आपली पोर आहेतच यासाठी " तो हसत म्हणाला .
"मग त्यांची भांडणे ही सोडवत असशील तू .त्याचाही चार्ज घेतोस ना ... " मी छद्मीपणे विचारले.
"भाऊ .... त्यांची भांडणेच होत नाहीत.एकमेकांवर हक्कच नाही ना....स्वतःचीच जबाबदारी घेतात. म्हणजे बघ... सकाळी एकमेकांना गुड मॉर्निंग करून बाहेर पडतात ते रात्रीच घरी येतात. इतका उशीर का ...??कोणाबरोबर होतास..?? जेवलास का.. ??? आता जेवणार का... ?? मी भेंड्याची भाजी केलीय गरम करून घे .... हे असले प्रश्नच नसतात .उलट दोघे छान गप्पा मारतात .आपल्या कामाची चर्चा करतात .कधी कधी बाहेर जाऊन जेवतात . आपापले बिल भरतात आणि येऊन झोपतात .."
"एकत्र ...."?? माझे कुतूहल
"असतील ही नसतील ही ...इतकं खोलवर मी विचारत नाही ...." केके सिगारेट शिलगावत म्हणाला .
"पण त्यातील कोण आजारी पडले तर ....?? काही अपघात झाला तर ....." मी अजून एक प्रश्न मारला.
"त्यासाठीच हा केके आहे ....तो मान ताठ करीत म्हणाला . ऍग्रिमेंट करतानाच मी दोघांच्या मेडिक्लेम पॉलिसी नंबर माझ्याकडे मागून घेतो. दोघांचीही फिटनेस सर्टिफिकेट एकमेकांना देतो .त्यात दोघांपैकी कोणाला काही झाले की मी त्यांची काळजी घेतो .अरे आताच बघ ना....मी एकाला ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आलोय. सकाळी त्याच्या पार्टनरचा फोन आला हा बाथरूममध्ये पडलाय .तिला अर्जंट मिटिंग होती .तिने मला फोन केला . मी येईपर्यंत त्याच्यासोबत होती . मी दहा मिनिटात तिथे पोचलो त्याला उचलले आणि इथे ऍडमिट केले.आता बरा होईपर्यंत मीच काळजी घेणार त्याची आणि नंतर माझा सर्व्हिस चार्ज लावणार ....." केके टाळी देत म्हणाला .
" पण केके... खरच असे असते....?? .इतकी भावनाशून्य माणसे आहेत या जगात ..".मी थोडया विषादाने विचारले.
"आहेत रे भाऊ ...हल्ली जगात चांगली माणसे कमी आणि वाईट स्वार्थी माणसे जास्त झालीत.सगळेच चांगले असते तर हे अनाथाश्रम.. वृद्धाश्रम असते का ..?? घटस्फोट झाले असते का ...?? हल्ली कोणाला दुसऱ्याची जबाबदारी घ्यायची इच्छा नाही . भरमसाठ पैसे असले की सर्व काही मिळते असेच वाटते त्यांना .मुख्य म्हणजे सर्वप्रकारची सेवा देणारे आमच्यासारखे आहेत . हातातील फोनमधील एका अँपवर जे हवे ते मिळते .मग दुसऱ्याचे लोढणे का अंगावर घ्यावे ...?? मान्य आहे हे आपल्यासारख्या जुन्या लोकांना पटत नाही. पण जो बदल आहे त्याचा फायदा करून घेतलाच पाहिजे .... यांच्यामुळेच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या मुलांचे पोट भरतोय मी.. "केके माझ्या खांद्यावर थाप मारीत म्हणाला .
" पण यातून काही वाईट घडले तर ...."?? मी पेचात टाकणारा प्रश्न विचारला .
"काय वाईट घडणार ... ?? शारीरिक संबंध..??? शारीरिक इजा...?? मारहाण...?? अपघात...?? आर्थिक व्यवहार ..?? अरे हे सर्व आधीच त्या ऍग्रिमेंटमध्ये क्लिअर केलेले असते .त्यांना कुठे थांबायचे ते कळतेच आणि अजूनपर्यंत तरी मला विचित्र अनुभव आला नाही.उलट वेगळे होतानाही फार त्रास होतो असे कधीच दिसले नाही मला . कोणालाही असले रिलेशन संपवायचे असेल ते एका फोनवर संपवू शकतात .चोवीस तासात कधीही ....."
"यात तूझा रोल काय..."?? मी विचारले.
" भाऊ ....मी ते सांगतील ती कामे करतो .अगदी लाईट बिल भरण्यापासून ते किराणा आणून देण्यापर्यंत .आपली पोर यात एक्सपर्ट आहेत. प्रत्येक सर्व्हिसवर भरमसाठ चार्ज लावतो..." असे म्हणून जोरात हसला .
"धन्य आहेस तू केके..." असे म्हणून मी पुन्हा हात जोडले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, June 25, 2021

चाणक्य .....भा.द. खेर

चाणक्य .....भा.द. खेर
मेहता पब्लिशिंग हाऊस
 विष्णू मगध राज्यात आचार्य असणाऱ्या कपिलदेव यांचा मुलगा. लहानपणापासूनच हुशार..कुशाग्र बुद्धीचा .
मगधचा राजा धनानंद नंद वंशाचा आहे. अतिशय जुलमी , ऐशआरामात राहणारा .राज्यात विविध कर लावून त्याने नागरिकांना त्रस्त केले आहे.
शकदाल हा राज्याचा महामंत्री कपिलदेवाचा मित्र . शकदाल नेहमीच राज्याच्या भल्याचा आणि विकासाचा विचार करतो. तो राज्याशी एकनिष्ठ आहे.पण एका अवैध संपत्ती घोटाळ्यात तो राजाविरुद्ध उभा राहतो.धनानंद त्याला तुरुंगात टाकतो त्यानंतर कपिलदेवावर ही तीच पाळी येते.कपिलदेव तुरुंगात जातात आणि विष्णूची आई प्राण सोडते .राज्यात विष्णूला वाळीत टाकण्याची आज्ञा होते . 
विष्णू तक्षशिला विद्यापीठात उच्चशिक्षण घेण्याचे ठरवितो .तिथे तो वैद्यकशास्त्र आणि राजनीतीशास्त्रात पारंगत होतो .तक्षशिला विद्यापीठात प्रवेश घेताना तो आपले नाव चाणक्य आहे असे सांगतो.चाणक्यची कीर्ती एक हुशार आचार्य म्हणून सगळीकडे पसरली जाते तेव्हा राजा धनानंद आपल्याकडे दानाध्यक्ष म्हणून आमंत्रित करतो आणि चाणक्य पुन्हा मगध राज्यात परततो.
ग्रीक राजा सिकंदर जगज्जेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून भारताच्या सीमेवर उभा ठाकलाय. चाणक्यच्या मते ही चिंतेची गोष्ट आहे. त्याला संपूर्ण भारत एकसंघ करायचा आहे. हेच त्यांचे स्वप्न आहे. तो धनानंद राजाला भरसभेत सिकंदरच्या आक्रमणाची कल्पना देतो पण धनानंद त्याचा अपमान करतो . तुला  सिंहासनावरून  पायउतार केल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार नाही अशी प्रतिज्ञा करून चाणक्य दरबारातून बाहेर पडतो .
पुढचा इतिहास सर्वांना माहीतच आहे .पुस्तक अतिशय साधे सरळ आहे . सर्वसामान्य वाचकांच्या लक्षात येईल अशातऱ्हेने पुस्तकाची मांडणी केली आहे .
चाणक्य हे कुशल राजनीतीतज्ञ म्हणून ओळखले जातात. राजकारण कसे करावे ...?? राज्य कसे चालवावे ...?? हे चाणक्यनीतीत लिहिले आहे .पण यात कुठेही चाणक्यचे राजकारण दिसून येत नाही .पण चाणक्यचा इतिहास समजण्यासाठी हे पुस्तक पुरेसे आहे .

Sunday, June 20, 2021

व्हेन वी वेअर ऑर्फन्स...काझुओ इशिगुरी

व्हेन वी वेअर ऑर्फन्स...काझुओ इशिगुरी
अनुवाद...सुश्रुत कुलकर्णी 
एका प्रकाशन 
लेखक २०१७ सालातील साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते आहेत .लेखकाचा नायक हा खाजगी गुप्तहेर आहे. तो मुळात ब्रिटिश असला तरी त्याचे लहानपण शांघायमध्ये गेलेले आहे.ही कथा साधारण  १९३० सालापासून घडते .ख्रिस्तोफर बॅंक्स हा आपल्या आईवडिलांसोबत शांघायमधील आंतरराष्ट्रीय वसाहतीत राहतोय. त्याचा मित्र अकिरा हा जापनीज आहे .चीनमध्ये अफूचा व्यवसाय जोरात आहे. अनेक चिनी तरुण अफूच्या आहारी गेले होते. ख्रिस्तोफरच्या आईने त्याविरुद्ध जोरदार चळवळ उभी केली .पण एके दिवशी ख्रिस्तोफरचे वडील गायब झाले . त्यानंतर काही काळाने त्याची आई ही गायब झाली.त्यामुळे ख्रिस्तोफरला लंडनला परतावे लागले.
 पुढे तो मोठा प्रसिद्ध खाजगी गुप्तहेर झाला. काही वर्षांनी पुन्हा शांघाईला येऊन त्याने आपल्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. चीन जपानचे युद्ध चालू असताना देखील त्याने आपले प्रयत्न सोडले नाहीत .
ख्रिस्तोफर आपल्या आईवडिलांचा कसा शोध घेतो..?? त्यासाठी त्याला कोण मदत करतात ?? युद्धाचा सामान्य माणसांवर काय परिणाम होतो याचे चित्रण लेखकाने अतिशय वेगळ्या आणि संथ पद्धतीने केले आहे. एक रहस्यकथा असूनही ती अतिशय सरळपणे जाते .

Tuesday, June 15, 2021

ट्वेल रेड हेरीग्ज ...जेफ्री आर्चर

ट्वेल रेड हेरीग्ज ...जेफ्री आर्चर
अनुवाद...डॉ. देवदत्त केतकर
मेहता पब्लिशिंग हाऊस
एकूण बारा छोट्या छोट्या गोष्टी.फसवणुकीच्या...लबाडीच्या... चतुरपणाच्या ..जेफ्री आर्चरच्या कथा वाचताना  प्रत्येक वाक्य नीट समजून वाचावे  लागते. कारण त्या एका वाक्याने कथेचा अर्थ बदलून जातो .
रिचर्ड कूपर एक मोठा उद्योगपती पण पत्नीच्या प्रियकराच्या खुनाच्या आरोपात अडकला जातो.तिच्या प्रियकराचा मृतदेह सापडत नाही.तो जिवंत आहे याची खात्री रिचर्डला आहे तरीही तो दोषी ठरतो. पण तुरुंगातूनच आपल्या सुटकेसाठी एक योजना बनवतो आणि त्यात यशस्वी होतो . ते कसे हे वाचनीय आहे .
अश्या प्रकारच्या सर्व कथा असतील असे आपल्याला वाटत असतानाच दुसरी कथा येते. ती वेगळ्या प्रकारची असते . तर काही कथा समजत नाहीत.
काही कथा सत्यघटनेवर आधारित आहे असे लिहिले आहे .
जेफ्री आर्चरची भाषा अतिशय सोपी आहे. पुस्तक वाचायला मजा येते .

Thursday, June 10, 2021

किमयागार..... अच्युत गोडबोले

किमयागार..... अच्युत गोडबोले 
राजहंस प्रकाशन 
विज्ञान म्हटले की फक्त शालांत आणि महाविद्यालयीन परीक्षेत जास्तीतजास्त मार्क मिळविण्यासाठी उपयोग हेच ध्येय असते.आपण विज्ञान जगत नाही तर फक्त शिकतोअसे लेखक म्हणतो.
डॉक्टर ..,इंजिनियर ..,बनण्यासाठी विज्ञानाचा वापर करावा हीच बऱ्याचजणांची वृत्ती असते. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र ,जीवशास्त्र अश्या विज्ञानाच्या तीन शाखा . यात भौतिकशास्त्र सगळ्यात श्रेष्ठ पण बर्याचजणाना याचाच कंटाळा येतो . अंतराळ.. पृथ्वी.. तारे ..नक्षत्र यांचा अभ्यास करण्यासाठी खूपच सहनशक्ती चिकाटी लागते .
लेखकाने या पुस्तकात अश्या शास्त्रज्ञांची माहिती दिली  आहे ज्यांनी या विश्वात बरेच बदल घडवून आणले आहेत ,बरेच शोध लावले आहेत.आपल्याला ह्या शास्त्रज्ञांनी काय शोध लावले आहेत याची माहिती आहे . पण ते कसे होते ,त्यांचा स्वभाव त्यांचे राहणीमान... त्यांच्या आयुष्यातील चढउतार याबद्दल फार काही माहीत नसते . ती माहिती यातून आपल्याला मिळते .
इसवी सन पूर्व पासून विज्ञानाचा वापर चालू आहे .थोर खगोलशास्त्रज्ञ आर्यभट याने पृथ्वीचा परीघ मोजला होता तर एका वर्षात 365 दिवस 6 तास 12 मिन आणि 30 सेकंद असतात हेही काढलं होत.
पृथ्वी कशी निर्माण झाली...?? मानवाची निर्मिती कशी झाली..?? जीव कसे निर्माण झाले .?? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे हजारो वर्षांपासून शास्त्रज्ञ शोधतायत .प्रत्येकवेळी नवीन नवीन अनुमान काढले जातात .
अँरिस्टोटल हा ग्रीक तत्वज्ञ ख्रिस्तपूर्व 384 साली जन्मला .त्याने पृथ्वी आणि सजीव यांच्याबाबत अनेक सिद्धांत मांडले पण कालांतराने बरेचसे चुकीचे ठरविले गेले .
दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ हा नेहमीच बायबल आणि चर्चच्या विरुद्ध होता. त्यासाठी त्याने तुरुंगवास ही भोगला .चर्चची मते किती चुकीची आहेत हे गॅलिलिओने प्रयोगाद्वारे सिद्ध केले . 
गतीचे नियम मांडणाऱ्या आयझॅक न्यूटनने विज्ञानाचे स्वरूपच पालटून टाकले. गुरुत्वाकर्षण हा न्यूटनचा जगप्रसिद्ध शोध .
इलेट्रोमॅग्नेटिझम शोधणारा मॅक्सवेल. तर केवळ खिशातील फाउंटन पेन हीच माझी प्रयोगशाळा असे म्हणणारा आईन्स्टाईन यांच्याविषयी सर्व काही जाणून घेण्यात गंमत वाटते .
क्ष किरण शोधणारा रंटजेन..रेडिएशन शोधणारी मेरी क्युरी ,इलेक्ट्रॉन शोधणारा जे.जे.थॉम्पसन..अणू-रेणू वर संशोधन करणारा रदरफोर्ड तर क्वांटम मेकानिझमची सुरवात करणारा प्लॅक याची मेहनत चिकाटी सहनशीलता पाहून आपण थक्क होतो.
खरेच यांनी खिश्यात पैसे नसताना,जन विरोधात जाऊन वर्षानुवर्षे प्रयोग करून नवनवीन कल्पना सत्यात आणून त्याचा मानवी जीवनाला कसा उपयोग होईल याचाच विचार केला .
लेखकांनी यात जवळजवळ सर्वच प्रसिद्ध शास्त्रज्ञांची माहिती दिलीय . त्यात त्यांचे खाजगी जीवन कसे होते... त्यांची शिकविण्याची पद्धत.. सर्व काही मनोरंजक पद्धतीने लिहिले आहे . त्यामुळे वैज्ञानिक क्लिष्ट शब्द असूनही आपल्याला कंटाळा येत नाही .
पुस्तकाच्या शेवटी आपल्याला यात  भारतीय शास्त्रज्ञ नाहीत हे लक्षात येते .पण त्याचे स्पष्टीकरणही  ही लेखक करतो .
न कंटाळता विज्ञानाची बेसिक माहिती हवी असेल तर हे पुस्तक आपल्या प्रत्येकाच्या घरात हवे .