Tuesday, August 30, 2022

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया
1
सुपरस्टार विनयकुमार उर्फ विनायक सुर्वे उर्फ विन्या आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये शांतपणे बसून होता.त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.गेली दोन वर्षे करोनामुळे गावी गणपतीला गेला नव्हता. यावर्षी नक्की जायचे हे ठरविले होते.
 पण अचानक साऊथच्या बिग बजेट फिल्मसाठी त्याला बोलाविण्यात आले होते.तसेही करोनामध्ये दोन वर्षे त्याच्याकडे फारसे काम नव्हते. त्याचे स्टेटस पाहून छोटे निर्मातेही त्याला काम देत नव्हते.
 त्याचवेळी साऊथच्या निर्मात्याने त्याला भरपूर मानधन देऊन हा चित्रपट ऑफर केला होता. त्याच्यासोबत साउथचा सुपरस्टार  मेन रोलमध्ये होता. चित्रपट तुफान चालणार याविषयी शंकाच नव्हती. गणपतीच्या दिवसातच शुटिंगचे शेड्युल होते.अश्यावेळी शूटिंग अर्धवट सोडून गणपतीला जाणे परवडणार नव्हते.त्याने मनोमन बाप्पाची माफी मागितली .
इतक्यात दार उघडून त्याचा निर्माता आत आला.
    " विनयजी अपने हिरोने कहा है एक गाना गणपती के सामने हो जाय. आप मराठी है और गणपती के सामने गाना रहेगा तो महाराष्ट्र के लोगभी सिनेमा देखने आएंगे. अगर आपके पास कोई लोकेशन होगा तो बताइये,  वही शूट करेंगे." ते ऐकून विनयकुमार खुश झाला . आपल्या गावाजवळचे लोकेशन फिक्स करण्यासाठी त्याने सेक्रेटरीला फोन केला आणि डायरेक्ट घरी जाऊनच सुदाम दादाला चकित करायचे ठरविले.गणपती बाप्पा मोरया म्हणत त्याने हात जोडले.
2
केरळच्या त्या कार्पोरेट ऑफिसमधील मिटिंग आज भलतीच वादळी ठरली होती. एका मोठ्या कंपनीशी होणारे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले होते.अपयशाचे सर्व खापर  श्री.नामदेव सुर्वे उर्फ नाम्यावर फोडण्यात आले होते. नामदेव खूप चिडला होता.यावर्षी कोणत्याही परिस्थितीत गणपतीला गावी जायचे ठरविले होते. तिकीट्स ही बुक झाल्या होत्या . 
दोन वर्षांनी त्याला  सर्व  भाऊ आणि कुटुंब भेटणार होते.करोनामुळे दोन वर्षे अशीच गेली होती.त्याला गावी जाता आले नव्हते उलट नोकरीतही  त्रास झाला होता.एक मोठे डिल कॅन्सल झाले आणि त्याचे खापर नामदेववर फुटले होते. कोर्टकचेऱ्या होणार हे नक्की.
 आता फक्त नोटीस कधी येणार याची वाट पहायची होती.केरळ कोर्टाने त्याला राज्यातून बाहेर जाण्यास मनाई केली होती. नाईलाजाने  तिकीट रद्द करण्यासाठी फोन करणार इतक्यात त्याचा सेक्रेटरी धावत केबिनमध्ये शिरला . त्याने हातातील पाकीट नामदेवला दिले. त्या कंपनीने वेगवेगळ्या राज्यात असणारे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते आणि खटले त्यात्या राज्यात न चालविता मुंबईत चालविण्याचे ठरविले होते.त्यासाठी त्याने मुंबईत यावे अशी सूचना केली होती.
ते वाचून नामदेव खुश झाला . खटल्याच्या निमित्ताने का होईना मुंबईत तर जायला  मिळेल.तिथून गावी काय कसे ही जाऊ .गणपती बाप्पा मोरया असे मनात म्हणत त्याने हात जोडले .
3
शंकर सुर्वेचे लिव्हकार्ड अजूनही माझ्या टेबलवर आले नाही हे पाहून मला थोडे आश्चर्यच वाटले.दरवर्षी गणपतीला हक्काने गावी जाणारा शंकर यावेळी रजेसाठी अजूनही समोर आला नव्हता. 
मी त्याला केबिनमध्ये बोलाविले तेव्हा तो नाखुषीनेच आत शिरला. "काय मिस्त्री ? अजून रजेचा अर्ज आला नाही तुमचा .गणपतीला जाणार आहे की नाही ?"
 तो केविलवाणे हसला ." करोनामध्ये फॅक्टरी बंद होती.म्हणून बायको पोरांना घेऊन गावी राहिलो .पण तिथेही हालच झाले . दादाची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे .स्वतःचे कसे तरी भागते त्यात आमची भर.पण एकमेकांच्या मदतीने आम्ही सावरले. .फॅक्टरी चालू झाली पण घेतलेली कर्जे अजूनही फेडतोय.त्यात हल्ली पगार ही वेळेवर होत नाही .जायची तर खूप इच्छा आहे .पण सगळी सोंग करता येतात पैश्याची नाही . जायला यायला ही खूप पैसे लागतात .दादाला सांगितले आहे यावर्षी जमणार नाही यायला." असे बोलून तो निघाला .
मी ही कोकणाचाच असल्यामुळे शंकरशी चांगले संबंध होते.त्याची घरची परिस्थितीही माहीत होती.यावेळी शंकर गावी जाणार नाही हे ऐकून वाईट वाटले . 
माझे तर गावी जाणे नक्की झाले होते .खाजगी गाडीचे तिकीट्सही काढले होते.आज रात्रीच निघणार होतो. तितक्यात मोठ्या भावाची सून बाळंत झाल्याची बातमी आली .झाले !  आता सुयेरात गणपतीजवळ कोण जाईल.? शिवाय सुनबाई आणि नातवाची काळजी घ्यायला हवी .आमचे जाणे कॅन्सल झाले . 
मी शंकरला फोन केला.माझ्या तिकीट्स आहे जाणार का ? असे विचारले.
पैश्याचे काय ? त्याचा प्रश्न .
तो किती मानी आहे हे माहीत होते मला .म्हटले दे सावकाश आधी सण तर पार पडू दे. तो घरी आला तोच पेढे घेऊन .भरल्या डोळ्याने त्याने हात जोडले मी त्याच्या हातात परतीची तिकीट्स ही दिले.गणपती बाप्पा मोरया .म्हणत त्याने हात जोडले.
4
कॅनडातील आपल्या ऑफिसमध्ये अरविंद सुर्वे उर्फ अव्या फोनवरून आपल्या सहकार्याला झापत होता.
करोनानंतर आता कुठे त्याचा बिझनेस सावरत होता.गेली दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये बसून काढली होती. विमान प्रवास कठीण झाल्यामुळे कोकणात गावी ही जाऊ शकला नव्हता.
 यावर्षी सगळे सुरळीत चालू झाले होते. गावी जाणार हे पक्के ठरविले होते पण अचानक जेनीच्या वडिलांची म्हणजे त्याच्या सासऱ्यांची तब्बेत बिघडली .एक तातडीची सर्जरी करावी लागणार होती. बहुतेक त्याचे जाणे कॅन्सल होणार हे जवळजवळ निश्चित होते.
आज त्याला पुन्हा डॉक्टरांकडे जायचे होते.सुदाम दादाला फोन करून यावर्षी जमणार नाही असे सांगायचे नक्की करून तो डॉक्टरांच्या क्लीनिकमध्ये शिरला. 
अरे देवा ! जे डॉक्टर सर्जरी  करणार होते ते सुट्टीसाठी भारतात गेले होते आणि आता गणपती विसर्जनानंतरच येणार होते.
भारताचे नाव ऐकताच अव्याचे डोळे चमकले.त्याने भारतात कुठे गेलेत याची चौकशी केली तर ते योगायोगाने मुंबईतच राहणार होते.
अरविंदने ताबडतोब त्यांना कॉन्टॅक्ट केला.आपण भारतीय आणि त्यातही मुंबईकर असल्याची ओळख करून दिली. डॉक्टर ही खुश झाले. त्यांनी मुंबईतच सर्जरी करायची तयारी दर्शवली . अव्याने खुश होऊन गणपती बाप्पा मोरया अशी आरोळी ठोकली. यावेळी कुटुंबासोबत त्याचे सासरेही कोकणात गणेशोत्सव  साजरा करणार होते.
5
 कोकणातील त्या छोट्या गावात सुदाम सुर्वेच्या घरी गणपती उत्सवाची जोरदार तयारी सुरू होती. गेली दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला होता.सुदाम दादांच्या चार भावांपैकी एकही गावी आला नव्हता. पण यावेळी कोणतरी येईल याची खात्री वाटत होती.
 घरात डेकोरेशन चालू होती. त्याच्या हातात चहाचा पेला देत बायकोने विचारले " ह्या वर्षी तरी भाऊजी येतील ना ? सुदामाने हसत देव्हाऱ्यात बसलेल्या गणपतीकडे बोट दाखविले.
"तो हाय ना ? कित्याक काळजी करतस.बघात तो.त्याका काळजी हा सगळ्यांची. "असे म्हणून हसला.
देव्हाऱ्यात बसलेला तो आपली सोंड हलवत गालात हसत होता.
" हे बरे आहे बाप्पा .म्हणजे तुझी पूजा करायला तुलाच माणसे बोलवावी लागतात.सर्व तुझ्यावर सोपवून मोकळे होतात हे भक्त. " शेजारचा उंदीर शेपटी हलवत म्हणाला.
" खरे आहे मूषका अरे मलाच आहे भक्तांची काळजी.म्हणूनच सर्व सुर्वेंची इथे येण्याची सोय करून आलोय मी.भरल्या घरात सर्वांच्या हातून निस्वार्थी सेवा करून घेण्याचा आनंद वेगळाच असतो .उद्या बघ कसे एक एक करीत सर्व सुर्वे हजर होतील माझी सेवा करायला." सोंडेने पुढ्यातील मोदक उचलत त्याने उत्तर दिले.
गणपती बाप्पा मोरया
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Friday, August 26, 2022

नाते

नाते
संतोष दिघेला सौ.सोबत येताना पाहून मी उडालोच. ते नुसते एकत्रच येत नव्हते तर सौ.कडील दोन किलो पिठाची आणि भाजीची पिशवी दिघेच्या हातात होती.तर एखाद्या सापाला गुंडाळून घ्यावे तशी दिघेची शबनम बॅग सौ.च्या गळ्यात होती.
आता आमच्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल हा संतोष दिघे कोण आहे तो ? नाही ? मग खरोखरच तुम्ही चाणाक्ष आहात म्हणून दिघेला लक्षात ठेवले नाही. बरे सौ.तरी लक्षात असेलच . हुश्शह... 
तर हा संतोष दिघे आमचा बालमित्र. तो स्वतःला लेखक समजतो .नाही.. नाही ..त्याविषयी आमची तक्रार नाही हो. फक्त तो कथा सांगायच्या निमित्ताने घरात शिरतो आणि पोटभर खाऊन जातो याचे दुःख आहे. शिवाय तो आला की आमच्या किचनमध्ये जो गोंधळ चालतो तो वेगळाच.
तर हा दिघ्या आज सौ.सोबत हमाली करत घराच्या दिशेने येताना पाहूनच मी आज जेवण जास्त करावे लागणार हे समजून गेलो.पण सौ.च्या चेहऱ्यावर त्याची फिकीर दिसत नव्हती.
शिवाय ती ज्यातऱ्हेने त्याची शबनम बॅग हाताळत होती त्यावरून कळून चुकत होते की बॅग रिकामी आहे. नाहीतर त्या दिघ्याची काय बिशाद बॅग सौ.च्या हाती द्यायची . आहो दादर स्टेशनला रात्री पुलाखाली अजूनही पिवळ्या कव्हर्सची पुस्तके मिळतात याचा पुरावा याच्या बॅगेत  सापडतो.
दोघेही हसतच घरात शिरले.मला पाहताच दिघेच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरले.पण ते क्षणभंगुर ठरणार आहे याची मला खात्री होती.
" ये संतोष ये " मी सहजपणे म्हणालो .पाणी आण ग"
" ह्या, पाणी काय.. भावोजीना सरबत करून देते. बघा किती दमलेत ते.आणि तुम्ही महाबळेश्वरवरून आणलेले सरबत तसेच पडून आहे कित्येक दिवस.आता दोनचार दिवसात फेकूनच देणार होते.भावोजीना तेच देते" असे म्हणत किचनमध्ये गेली.
मी महाबळेश्वरला कधी गेलो होतो असा विचार करेपर्यंत ती सरबताचा ग्लास घेऊनसुद्धा आली. देवा ! दोन वर्षांपूर्वी गेट टू गेदरसाठी महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हाचे सरबत ही बाई अजून ठेवून होती.
"भाऊ.तू ही घे ..." इतक्या प्रेमाने स्वागत पाहून दिघे भारावून गेला.
"नको.त्यांच्यासाठी चहा गरम केलाय.उगाच असल्या सवयी नको." सौ माझ्याकडे पाहून ठसक्यात म्हणाली.
आज दिघ्याची कत्तल होणार हे निश्चित होतेच.सगळी सूत्रे सौ.च्या हाती देऊन मी फक्त प्रेक्षकांची भूमिका घेतली.
"भावोजी आलाच आहेत तर जेवूनच जा.." किचनमधून आज्ञा झाली.
आतामात्र हद्द झाली.मित्राचा इतका अपमान कोण सहन करेल ? मी उठलो ." दिघ्या, चल बाहेर जाऊन बोलू." एक मस्कापाव आणि चहावर भागेल हाच माझा प्रामाणिक हेतू होता .
"अरे वाहिनीनेच बोलावले आहे" 
हे ऐकताच माझा आवेश गळून पडला .
"आहो मीच घेऊन आले त्यांना घरी.मला पाहून वाट वाकडी करून पळत होते.पण मी सोडतेय होय. जाग्यावरूनच जोरात हाक मारून त्यांना बोलावले.आख्या बाजाराने वळून पाहिले माझ्याकडे .मग भाऊजी काय चीज आहे."सौ. हसत म्हणाली.
माझ्यासमोर  एका हातात पिठाची आणि दुसऱ्या हातात  भाजीची पिशवी घेऊन ओरडणारी सौ.उभी राहिली. याची जाहिरात होऊन आता  सौ.ला कोणीच टाळून जाऊ शकणार नाही याची खात्रीही पटली.
" पण तुला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायची का इच्छा झाली.? पडेल स्वरात माझा प्रश्न .
"आहो ,सणवार सुरू झालेत.प्रत्येक सिरीयलमध्ये सण साजरे होत असतात.वट पौर्णिमा झाली , दहीहंडी झाली,सध्या मंगळागौर चालू आहेत. पुढे गणपती येतील . भाऊजी बऱ्याच सिरीयल लिहितात ,त्यांच्या खूप ओळखी आहेत . कुठेतरी मलाही त्यात संधी देतील.म्हणून बोलावले   त्यांना. " सौ लाजत म्हणाली.
तिचे लाजणे पाहून मी ताबडतोब विरघळतो हे तिला माहीत आहे म्हणूनच ती मोजक्याच प्रसंगी लाजते.आताही तसेच झाले आणि तिचा दिघेला घरी घेऊन येण्याचा हेतू स्पष्ट झालं.
"अग त्यासाठी नाचता यायला हवे .थोडा अभिनय यायला हवा .असे कोणीही जाऊ शकत नाही " मी जरा आवाज चढवून म्हटले.
" मी नाचत नाही का? त्या दिवशी भाचीच्या हळदीत किती वेळ नाचत होते. ते ही पूर्ण शुद्धीत .तुमच्यासारखे हे घेऊन नाही ."अंगठा दाखवत ती ओरडली.
"अभिनयही करावा लागतो थोडा.".मी प्रयत्न चालूच ठेवले.
"आतापर्यंत किती अन्याय सहन केले मी, पण कधी चेहऱ्यावर येऊ दिले नाहीत. नेहमी हसतमुखाने सर्वांची सेवा केली.शेजाऱ्यांना विचारा ते म्हणतात तू आहेस म्हणून सहन करतेस हो .."ती रागाने चेहरा फुलवत म्हणाली.
"भाऊ , बघ तिचा अभिनय बघ ." किचनमधून येणाऱ्या खमंग वासाकडे डोळे मोठे करीत दिघे म्हणाला .
" दिघ्या हा तिचा अभिनय नक्कीच नाहिय " मी मनात म्हणालो.
" ठीक आहे ,पण संतोषलाही मर्यादा आहेत.." मी हळू आवाजात म्हणालो.
" कसल्या मर्यादा ..चार मराठी चॅनल ,प्रत्येक चॅनेलवर पाच मराठी मालिका  आणि प्रत्येक मालिकेत पंधराजणी तरी असतात नाचायला.त्यात मी एकटी कुठेही ऍडजस्ट होईन .तुम्ही हो म्हणा मी ताटे वाढते..."सौ.ने शेवटची निर्वाणीची धमकी दिली.तशी संतोषने मान डोलावली .
भरपेट जेवण झाल्यावर मी संतोषसोबत बाहेर पडलो.टपरीवरून त्याने सिगारेट शिलगावली..
" संतोष, तिचे बोलणे मनावर घेऊ नकोस .तुझ्याकडून काही होणार नाही हे माहितीय मला .पण येत जा रे अधूनमधून .बरे वाटते तुझ्याशी बोलून " मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो.
"भाऊ ,वहिनी मला बहीण म्हणून जास्त जवळची आहे रे. तिचे बोलणे कधीच मनावर घेत नाही मी. मला करोना झाला होता तेव्हा तिने सहा महिने मला जेवण दिले होते हे विसरणार नाही मी कधी .आताही तीच मला खेचत घरी घेऊन आली.म्हणाली आमच्या गल्लीतून जाता पण घरी येत नाही. बहिणीची आठवण येत नाही का ..?? भाग्यवान आहेस अशी बायको मिळाली तुला आणि आम्ही ही भाग्यवान अशी वहिनी आहे म्हणून." संतोष डोळे टिपत म्हणाला.
घरी आलो तेव्हा सौ.वाट बघत असल्याप्रमाणे पुढे आली.
"काय ग तू ? काय हे नवीन खूळ काढलेस सिरीयलचे ? त्या दिघ्याचे जेवणाचे वांधे आणि तू तुझ्याविषयी बोलतेस. " मी चिडून म्हटले.
" माहितीय मला.पण भाऊजी रस्त्यावरून जातात पण घरी येत नाहीत असे कळले म्हणून आज मुद्दाम त्याची वाट पाहत उभी राहिले आणि घरी घेऊन आले.आहो आपल्याशिवाय कोण आहे त्यांना.बरे वाटते त्यांनाही आपल्याशी बोलून आणि आपल्याला ही आनंद होतोच.म्हणूनच जेवल्याशिवाय कधीच जाऊ देत नाही त्यांना. यापुढे पंधरा दिवसातून एकदा तरी घरी फेरी मारायची आणि जेवल्याशिवाय जायचे नाही असाच दम दिलाय त्यांना .भले तुमचे मित्र असतील पण मलाही लहान भावासारखे आहेत ते."
"आणि ते सरबत दे फेकून किती दिवस वापरशील" मी ओरडलो.
आहो ,ते केव्हाच संपले.आता पुन्हा बाहेर गेल्याशिवाय नवीन बाटली घरात येणार नाही हे माहितीय मला.म्हणूनच त्या दिवशी नवीन बाटली आणून ठेवली.जरा घरातही लक्ष द्या काय हवे काय नको ते विचारत जा "असे म्हणून फणकार्याने आत निघून गेली.
मी  काही न बोलता  हात जोडले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

पोस्टमार्टेम

पोस्टमार्टेम
त्याला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्येच होता.नाक्याजवळच्या वळणांवरच त्याची बाईक स्लिप झाली. नेहमीप्रमाणे डोक्यावर हेल्मेट नव्हतेच .साधारण दहा फूट घसरत गेला आणि फूटपाथच्या दगडावर आपटला.
आता काय आपण वाचत नाही हीच शेवटची जाणीव. नेहमी हेल्मेट घालूनच बाईकवर बसायचे असे अनेकवेळा ठरविले होते पण अमलात काही येत नव्हते. आज ना उद्या हे होणारच होते.
 पण डोळे उघडताच समोर दिसला तो डॉ. अमन वर्मा.त्याचाच क्लासमेट . बारावीपर्यंत एकत्रच होते . मग हा बीएस्सी आणि अमन डॉक्टर झाला.
"साहेब, झालात का जागे ? अमनने हसून विचारले आणि त्याने फक्त मान डोलावली .
" तुझ्याकडेच आलो का मी ?" त्यानेही हसून विचारले. 
" अरे ,  सरकारी पाहुणा आहेस तू.रस्त्यावर पडला होतास .पोलीस केस झाली .मग इथेच घेऊन येणार ना तुला ," अमन त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला .
" मग आता बरा आहे मी.घरी कधी सोडणार  मला " त्याने सहज स्वरात विचारले.तसा डॉ.अमन थोडा चिंतेत पडला.
"थोडे दिवस थांब मग बघू .डोक्याचा घाव किती गंभीर आहे ते चेक करू" असे म्हणून बाहेर पडला.
काही वेळाने पुन्हा आत शिरला तेव्हा त्याच्या हातात एक फॉर्म होता.
" हा कसला फॉर्म ? " त्याने अमनला विचारले.
" अवयव दानाचा फॉर्म आहे. इथे बर्याचजणाना अवयवांची गरज पडते . पण दाते सहसा मिळत नाहीत.आता तू आलाच आहेस तर हा फॉर्म भरून जा . आपण गेल्यानंतर आपल्या अवयवांचा बऱ्याच जणांना उपयोग होईल .विचार कर. नाहीतरी तू ही बऱ्याचवेळा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतोच.आज ना उद्या तुलाही अवयवाची गरज लागेलच "अमन त्याच्या डोळ्यात रोखून म्हणाला.
" त्यात विचार काय करायचा.आपल्या शरीराचा मेल्यानंतर ही उपयोग होणार यापेक्षा चांगली गोष्ट कोणती ."असे म्हणून त्याने फॉर्मवर सही केली.
"ठीक आहे .झोप आता .सकाळी चेक करून डिस्चार्जचा निर्णय घेऊ."
मध्येच कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. तो उठून खिडकीसमोर जाऊन उभा राहिला.इतक्यात एक वॉर्डबॉय आत आला.
मी वसंत.डॉ.अमननी तुमचे पेपर आणायला पाठविलेय "तो थंड आवाजात  म्हणाला .

"कुठेय डॉ. अमन ? मला भेटता येईल का त्यांना ?" त्याने हसत विचारले.
"चला ," असे म्हणून वसंत चालू लागला.मागे वळून पाहण्याचे कष्टही त्याने घेतले नाहीत.
 एक अंधारा बोळ पार करून दोघेही त्या मोठ्या खोलीत शिरले. तेथील वासानेच त्याला मळमळू लागले. संपूर्ण पांढऱ्या टाईल्स लावलेली ती मोठी खोली होती.तिथे तीन चार सिमेंटचे ओटे बांधले होते.
त्यातील दोन ओट्यावर दोन व्यक्ती संपूर्ण नग्नपणे झोपल्या होत्या.त्यातील एक स्त्री तर एक पुरुष होता.दोघांचेही चेहरे पांढऱ्या वस्त्राने झाकले होते. त्या स्त्रीचे पोट फाडून आतडी बाहेर ठेवली होती.
सॅनिटाईझर आणि प्रेताचा कुबट वास सगळीकडे पसरला होता.
"ओ मला इथे काय आहे ? " तो ओरडला. 
" हे शवगृह आहे.इथे पोस्टमार्टेम होते."वसंत शांतपणे म्हणाला .
डॉ. अमन इथेच आहे का ..?"
"हो डॉक्टर येतील थोड्या वेळाने पोस्टमार्टेमसाठी.  त्या आधी थोडे खाऊन घेतो. "असे म्हणून वसंताने खुंटीवरच्या बॅगेतून डबा काढला आणि त्या मुदड्याशेजारी बसून शांतपणे खाऊ लागला.
"शी..तुला काहीच कसे वाटत नाही .फाडलेल्या प्रेताच्या बाजूला बसून डबा खायला.."त्याने नाक मुरडत विचारले.
"मग कुठे खाऊ ? तुम्ही ही तुमच्या केबिनमध्ये बसूनच डबा खातात ना ..? तुनच्या टेबलवर लॅपटॉप असतो .फाईल, पेन असते. तसेच माझ्या शेजारी मुडदे असतात .ही करवत असते .हातोडी असते.मुडदयाची फाईल असते. इथे रांग लागलेली असते नेहमी.बाहेर कुठे जाणार.म्हणून इथेच जेवतो आम्ही..चपातीचा तुकडा तोंडात टाकत वसंत म्हणाला." ही आमची कामाची जागा आहे. तुम्हाला  ज्या गोष्टींची गरज लागते ताधि इथेही लागते. तो बघ त्या देव्हाऱ्यात गणपतीही आहे.रोज सकाळी देवपूजाही होते इथे. इथेच चहा कॉफी नाश्ता बनविला जातो.
" तुम्ही डॉक्टर नाही तरीही कसे जमते तुम्हाला हे"त्याने कुतूहलाने विचारले.
 आता डॉक्टर काय प्रत्येक मुडदा फाडत बसणार आहेत का  ? ते आम्हाला सांगतात काय हवे आहे त्यांना.तेच आम्हाला शिकवतात .मग प्रॅक्टिस झाल्यावर सर्व काम सोपे असते .या करवतीने कपाळावर कापायचे. मग डोके उघडून त्यातून मेंदू बाहेर काढून ठेवायचा.मग छाती पार खालपर्यंत कापायची.चाकू हातोड्याने पिंजरा फोडून हृदय ,फुफ्फुस, आतडी बाहेर काढून ठेवायची. पहिल्यांदा कठीण जाते पण एकदा हात बसला की काहीच वाटत नाही. दहा मुडदे फाडले की अकरावा सफाईने फाडता येतो.." वसंताने बाजूच्या ओट्यावरील आतडे हातात घेऊन दाखविले आणि हातातील बाटलीतून घोट घेतला.
त्याने घशातून वर येणारी उलटी कशीतरी थांबवली.
आणि हे काय पितोयस तू..बाटलीकडे बोट दाखवत त्याने विचारले.
" हेच औषध आहे ज्याने सर्व जाणिवा नष्ट होतात" असे बोलून वसंत जोरात हसला.
इतक्यात दरवाजातून अमन आत आला .त्याने त्या नग्न पुरुषाच्या बॉडी शेजारील पेपर हातात घेतले. 
" डोक्याला मार लागून गेलाय. डोक्याचा काही उपयोग नाही.मेंदू बाहेर आलाय त्याचा . बाकी शरीर व्यवस्थित आहे.नीट फाड त्याला.आतील सर्व अवयव व्यवस्थित आहेत.कधीपासून सांगतोय त्याला देहदान कर.आज त्याचे अवयव दुसऱ्यांच्या कामी आले असते .नुसता फॉर्म घेऊन जायचा आणि आज आला तो असा.चल कामाला सुरुवात कर "असे बोलून बाहेर पडला.
"हा अमन माझ्याकडे पाहत का नाही ? त्याला मी दिसत नाही तर तुला कसा दिसतो ?"  त्याने वसंतला विचारले.
" कारण तू मेला आहेस. फूटपाथच्या दगडाला डोके आपटून तुझा मृत्यू झाला .डॉ.अमननेच तुला मृत घोषित केले आणि पोस्टमार्टेमला पाठविले.म्हणून तुला इथे घेऊन आलो. हे तुझे शरीर .चल करायची का सुरवात.." असे बोलत वसंताने करवत हातात घेतली.
"एक मिनिटं, मी तुलाच का दिसतो.आणि तुला भीती वाटत नाही का या मुडदयांची,या जागेची."तो नजर रोखून म्हणाला.
"पूर्वी वाटायची आता नाही वाटत. कारण भीतीचीही सवय होते. "त्या नग्न मुदड्याच्या तोंडावरील पांढरे कापड दूर करून हातात करवत घेत वसंत म्हणाला .
त्याने जवळ जाऊन पाहिले तेव्हा तोच ओट्यावर झोपला होता.डोके फुटून त्याचा मेंदू बाहेर आला होता आणि वसंत शांतपणे करवतीने त्याचे डोके कापीत होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Friday, August 19, 2022

श्रीकृष्ण जन्म

श्रीकृष्ण जन्म 
"आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे .लक्षात आहे ना ? रात्री बारा वाजता पूजा करायची आहे त्यानंतर भजन ."सासूने बाहेरून आवाज दिला आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
रात्री एक वाजेपर्यंत ती ऑनलाइन काम करत होती.हल्ली आयटीवाले ही हुशार झालेत . सतत वॉच ठेवून असतात.काम संपायला दीड वाजला आणि नंतर नवऱ्याने बेडवर आपला हक्क गाजवलाच. ह्याचे बरे असते इच्छा झाली की काळवेळ बघणार नाही पण आमची इच्छा झाली की याना कामे असतात.
सकाळी सातला जाग आली.डोळे चोळत ती बेडरूममधून बाहेर आली तेव्हा सासूच्या कपाळावरच्या आठ्या अधिक स्पष्ट झाल्या. सासर्याने हातातील पेपर बाजूला करून फक्त घडाळ्याकडे पाहिले.ती किचनमध्ये चहा पीत असतानाच सासूबाईनी जन्माष्टमीची आठवण करून दिली .
"अरे देवा, म्हणजे आजही जागरण का ? कशाला हा श्रीकृष्ण रात्री बारा वाजता जन्माला आला ? ती मनोमन चरफडली. 
म्हणजे आज साग्रसंगीत जागरण.पैठणी नेसा,दागिने घाला ,नथ घाला. मग नवऱ्याची कौतुकाची नजर पहा .सोसायटीतील इतर बायकांच्या मत्सरी तर पुरुषांच्या वासनेच्या नजरा सहन करा.त्यानंतर भजन ,गाणी ,रात्री बेडरूममध्ये पुन्हा जागरण .देवा का आलास तू रात्री जन्माला ? तिने मनात पुटपुटत हताश नजरेने श्रीकृष्णाच्या फोटोकडे पाहिले. फोटोत तो नेहमीसारखा बासरी वाजवत उभा होता. पण यावेळी अचानक तिला त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमटलेले दिसले.फारसा विचार न करता तिने आवरायला घेतले.
ती एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर होती.कंपनीचे बरेचसे काम परदेशी कंपन्यांसोबत असल्याने तिला दिवसरात्र मिटिंग कराव्या लागत.मोठ्या महत्वाकांक्षा असल्याने तिने सगळे लक्ष कामावरच केंद्रित केले होते.घरी सासुसासरे होते .थोडे जुन्या वळणाचे रीतीभाती,परंपरा, संस्कार  धरून वागणारे. कधी कधी छोट्या कुरबुरी व्हायच्या पण ती फारसे लक्ष देत नव्हती.घरी सणवार असले की हमखास छोटे वाद व्हायचे.
 ही फारशी धार्मिक नव्हती .जमेल तेव्हाच अश्या सण समारंभात भाग घ्यायची .पण रात्र म्हटली की अंगावर काटा यायचा .
शेवटी तिला जे वाटले होते तसेच झाले. मनासारखे झाल्यामुळे सासूबाई खुश होत्या .रात्री नवरा ही खुश. पहाटेचे तीन वाजले झोपायला. उद्याच्या  गोविंदाची सरकारने सुट्टी जाहीर केली होती.त्यामुळे नवऱ्याला उठायची घाई नव्हती पण हिला लोळत राहून कसे चालेल ? घरातली कर्ती गृहलक्ष्मी अशी वागली तर कसे चालेल ? तिला ऑफिस असल्यामुळे सकाळी सहाला उठून तयारी करावीच लागणार होती. रात्री झोपताना देवघरातील बाळकृष्णाकडे नजर टाकून ती झोपायला गेली.पण बाळकृष्ण  मिश्किलपणे हसतोय असे क्षणभर तिला वाटून गेले.
सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये शिरली तेव्हा थोडासा थकवा तिला जाणवत होता.आल्याआल्या बॉसने तिची  नवीन क्लायंटबरोबर मिटिंग फिक्स केली.
"अरे देवा ! आहेच का मिटिंग "? का रे बाबा ह्या श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झाला .सर्व श्येड्युलची वाट लावली याने.समोर तीन लाखाची हंडी आहे तीही पाहायला मुकणार मी ..असे मनात म्हणत तिने लॅपटॉप ऑन केला .
थोड्या वेळाने तिला मिटिंगची नोटिफिकेशन आली.ती क्लीक करताच कॅमेरा ऑन झाला आणि त्या क्लायंटचा चेहरा समोर आला .
तो चेहरा पाहताच ती स्तब्ध झाली. हा चेहरा तिला ओळखीचा वाटू लागला. तो दिसायला सुंदर होता. डोळ्यात एक मिस्कील हास्य होते पण चेहरा आश्वासक होता.हातात फिगेट स्पिनर घेऊन मधेमधे बोटावर फिरवत होता.ती तो कोणत्या देशाचा आहे ते विचारायलाच विसरली.
"सॉरी, आज तुमचा मोठा सण आहे. तरीही मिटिंग फिक्स करावी लागली".त्याने दिलगिरी व्यक्त करत मिटिंगला सुरवात केली. चेहऱ्याप्रमाणे त्याचा स्वरही मधुर होता.
महत्वाचे मुद्दे फायनल होताच त्याने तिची चौकशी करण्यास सुरुवात केली."आज मोठा सण आहे तुमच्या महाराष्ट्रात .बरेच लोक दहीहंडी फोडायला बाहेर पडतात असे ऐकून आहे मी "त्याने विचारले .
"हो आणि मोठमोठे थर लावायच्या उत्साहात हातपाय तोडून घेतात आणि जन्मभर अपंग बनून राहतात. बायकांना त्यांची आयुष्यभर सेवा करत राहावी लागते .खेळ त्यांचा शिक्षा स्त्रियांना. आदल्या दिवशी रात्रीपासूनच घरातील स्त्रीची धावपळ असते ती वेगळीच."ती पटकन रागात बोलून गेली.
"हो हो ..शांत व्हा "तो हसत म्हणाला .सण आहेत तर हे सर्व होणारच .भारतातील बहुसंख्य सणात स्त्रियांना मोठा सहभाग असतो .त्यांचा उत्साह प्रचंड असतो .शिवाय नटण्यामुरडण्याची हौस भागते. 
"सर ,अजूनही इथे स्त्री फक्त शोभेची बाहुली म्हणूनच ओळखली जाते.छान सुंदर दिसावी . नवऱ्याची सेवा करावी.घरच्यांची काळजी घ्यावी यासाठीच स्त्री हवीय.अजूनही स्त्रीकडे समानतेचा दर्जा नाही .मुलगी झाली की घरातील  कमीतकमी एका व्यक्तीचे नाक मुरडले जाते. आता तर काय तिने बाहेरही काम करून पैसे आणावेत आणि घरातली कामे ही करावी अशी अपेक्षा करतात.कालचेच बघा हे आमचे भगवान श्रीकृष्ण रात्री बारा वाजता जन्माला आले म्हणून त्याच वेळी त्यांची पूजा केली जाते शिवाय दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून त्याचा वाढदिवस साजरा केला जातो " ती चिडून म्हणाली तसा समोरचा चपापला.
"आहो, हल्ली बरेचजण रात्री बारा वाजता वाढदिवस साजरे करतात."तो हळुवारपणे म्हणाला.
"हो, पण ते सगळ्यांना वेठीस धरत नाहीत.केक कापतात झोपून जातात."ती अजून चिडली.
"नशिब काल रात्री माझी मिटिंग नव्हती.म्हटले लवकर झोपू तर या देवाचा रात्री बारा वाजता जन्म मग त्यासाठी जागरण. त्यानंतर इतर कामे.असे बोलून ती थांबली .रात्रीच्या आठवणीने तिचा चेहरा गुलाबी झाला.
"ओके ओके कळलं "तो हसून म्हणाला."म्हणजे आता तुमच्या सोयीनुसार सण साजरे करावे का ?"
"होय..काही गोष्टींमुळे आमच्या आयुष्यावर बरे वाईट परिणाम होत असतील तर त्याचा विचार  स्त्रियांनी नक्कीच केला पाहिजे. नाहीतर स्त्रियाना समानतेचा संदेश देऊ नका ."ती चिडून म्हणाली.
"तुमचे विचार फारच वादग्रस्त आहेत.पण बोलून छान वाटले.असे म्हणून तो हसला आणि कॅमेरा बंद केला.त्याचे ते हास्य पाहून ती चमकली.हे हास्य तिने काल पाहिले होते.
इथे लॅपटॉप बंद करून तो उठला.त्याने शेजारी बसलेल्या आपल्या मित्रांकडे पाहिले आणि म्हणाला "खरोखर बारा वाजता मी  जन्म घेऊन आताच्या पिढीला त्रास देतोय का "?
तो मित्र खुर्चीतून उठला आणि  आपल्या अधू पायाने लंगडत त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला "काळाबरोबर काही गोष्टी बदलायला हव्या हे खरे आहे.चल आपण लोणी खाऊ."
दोघेही काही न बोलता एकमेकांच्या गळ्यात हात टाकून ऑफिस मधून बाहेर पडले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, August 4, 2022

इग्लोरीयस बास्टर्ड.

इग्लोरीयस बास्टर्ड...2005
INGLORIOUS BASTERDS
1941
फ्रान्समधील एका छोट्या सुंदर गावात तो शेतकरी आपल्या तीन मुलींसमावेत सुखाने राहत होता . दुसरे महायुद्ध सुरू होते आणि जर्मन सेनेने फ्रांस ताब्यात घेतला होता .अचानक एक दिवस एक जर्मन अधिकारी  कर्नल हांस आपल्या काही सैनिकांना घेऊन त्या शेतकऱ्याच्या  दारात उभा राहिला . कर्नल हांसला  ज्यू हंटर असे टोपण नाव दिले होते.ज्यूना शोधून त्यांचा खातमा करणे हेच त्यांचे प्रमुख काम होते .कर्नल  हांसने अति सभ्यतेचा आव आणत चेहऱ्यावर मिश्किल मित्रत्वाचे हासू खेळवत त्या शेतकऱ्याकडे ज्यूंची चौकशी करू लागला . शेवटी त्याने हतबल होऊन जमिनीखाली लपलेल्या ज्यूंच्या जागेकडे बोट दाखविले. काही क्षणात सैनिकांनी गोळीबार करून त्या ज्यू कुटुंबाला संपविले . पण त्यातील एक ज्यू मुलगी निसटली .
चार वर्षानंतर त्या ज्यू मुलीने पॅरिसमध्ये एक चित्रपटगृह चालवायला घेतले . एक जर्मन अधिकारी फ़ॅड्रीक झोलर ज्याने एकट्याने  तीन दिवसात जवळजवळ तीनशे ब्रिटिश अमेरिकन सैनिक मारले होते तिच्या प्रेमात पडला.जोसेफ गोबल्स हिटलरचा खास माणूस. त्याने अनेक जर्मन चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याने त्या जर्मन अधिकाऱ्यावर अ नेशन प्राईड नावाचा चित्रपट काढला. त्या चित्रपटाचा प्रीमियर त्या मुलीच्या चित्रपटगृहात व्हावी अशी झोलरची इच्छा होती . ती गोबल्सने मान्य केली .
 इग्लोरीयस बास्टर्ड हे अमेरिकेचे छुपे सैनिकी युनिट होते. यात ज्यू सैनिकांचा भरणा होता . युनिफॉर्म घातलेल्या प्रत्येक नाझी सैनिकाला मारणे हेच त्यांचे काम.त्या युनिटची दहशत प्रत्यक्ष हिटलरलाही होती.लेफ्टनंट अल्डो राईन युनिट प्रमुख होता .
 अ नेशन प्राईड पाहायला प्रत्यक्ष हिटलर येणार होता .त्याच्या सोबत  गोरिंग ,बोरमन  मंडळीही हजर राहणार होती. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन या सर्वांना ठार करण्याची योजना आखली गेली आणि  इग्लोरीयस बास्टर्डवर ही कामगिरी सोपविण्यात आली. कर्नल  हांस या योजनेतील प्रमुख अडसर होता .त्याची नजर प्रत्येकावर होती.
ही कामगिरी यशस्वी होईल का ..?? हिटलरला मारण्यासाठी अजून कितीजणांनी योजना आखल्यात ?? कोणाची योजना यशस्वी होईल ..??
चित्रपटात लक्षात राहतो तो कर्नल  हांस लांडा. ख्रिस्तोफ वॉल्टझने हांसची भूमिका केली आहे.थंड रक्ताचा ,क्रूर आणि मनात काही ठाम ठरवून अतिसभ्य आणि नम्रपणाचा आव आणणारा कर्नल त्याने प्रभावीपणे उभा केला आहे . इग्लोरीयस बास्टर्डचा प्रमुख लेफ्टनंट अल्डोची भूमिका ब्रॅन्ड पिटने केली आहे . त्याची भूमिका छोटी आहे .
चित्रपटात लक्षात राहतात ही भयानक दृश्य. डोक्याची कातडी सोलणे, बेसबॉल बॅटने डोके फोडणे .कपाळावर चाकूने नाझीचे स्वस्तिक रेखाटने अशी काही क्रूर दृश्य चित्रपटात पाहताना अंगावर शहारे येतात .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Tuesday, August 2, 2022

माय कम्फर्ट फूड

#संकल्पना
#MyComfortFood
माय कम्फर्ट फूड
खरे तर मी खाण्याच्या बाबतीत फार हौशी नाही . पण बऱ्याचदा वेगळी डिश टेस्ट करायला आवडते. त्यातही मांसाहार करण्यात जास्त भर असतो .मला जेवणाची रेसिपी बघायला खूप आवडते. त्यांचे प्रेझेन्टेशन उत्तम असते.त्यावेळी वाटते जेवण बनविणे फार सोपे आहे पण प्रत्यक्षात कठीणच असते .
ऑम्लेट बऱ्याचजणांना बनविता येते .पहिल्यांदा थोडा त्रास होतो पण हळूहळू हात बसतो .माझाही हात बसला मग त्यानंतर मी अंड्यावर अनेक प्रयोग केले . त्यात बुर्जी, उकडलेल्या अंड्याची बुर्जी कधी कधी तव्यावर  कांदा टोमॅटो टाकून भाजी.तर कधी नुसती फ्राय. सोबतीला पाव असतातच . मग तितके पोट भरण्यासाठी पुरेसे असते .
पण अंडी किती खाणार ??   रोज तेचतेच  खाऊ शकत नाही ना ..?? मग मॅगी आहेच की..! 
 दोन मिनिटात तयार होणाऱ्या या पदार्थाने जगाला भुरळ पाडली आहे . उकळत्या पाण्यात मॅगी टाकायची आणि त्यांनी दिलेला मसाला टाकायचा आणि फक्त दोन मिनिटे ढवळायचे, झाली तुमची डिश तयार. 
पण नंतर त्याचाही कंटाळा आला.चला नवीन प्रयोग करून पाहू .मग त्या मॅगीत कांदा टोमॅटो आला .तिखटपणा हवा म्हणून मसाले आले .फ्रीजमध्ये काही मिळते का ते पाहू लागलो . कधी कधी मक्याचे दाणे असायचे तर कधी चणे.कधी कधी तर कोबी आणि बिट ही सापडायचा . मग ते ही मॅगीत एकरूप व्हायचे .आणि फ्रीझमधील नावडत्या वस्तू ही संपायच्या .
हल्ली रेडी टू इटचा जमाना आलाय .त्यात वेगवेगळे अँप तुम्हाला वेगवेगळ्या रेडी टू इट द्यायला तयार असतात .आहो व्हेज नॉनव्हेज काहीही मिळतील फक्त ऑर्डर करा आणि विडिओ पाहून बनवा .
शेवटी जिथे पैश्याचा आणि चवीचा प्रश्न येतो तेव्हा मॅगी आणि ऑम्लेट हेच आपले कम्फर्ट फूड आहे.
© श्री.किरण कृष्णा बोरकर