Monday, November 28, 2016

मिशन भारत .. डॉ. प्रदीप पंड्या.. अनुवाद .. , सुषमा लेले

मिशन भारत .. डॉ. प्रदीप पंड्या.. अनुवाद .. , सुषमा लेले
एक राजकीय थ्रिलर कादंबरी असे या कादंबरीचे वर्णन आहे. भारताच्या पाकिस्तान मधील राजदूत म्हणून फातिमा बेग या मुस्लिम महिला प्राध्यापिकेची निवड होते . पण पाकिस्तानात जाताच तिच्यावर जीवघेणा हल्ला होतो. तिच्या मुलीचे अपहरण होऊन हत्या केली जाते . पंतप्रधानांची हत्या करण्यासाठी प्रशिक्षित मारेकरी भारतात दाखल होतो . या सर्वांशी सामना करण्यासाठी रॉचे हेर तयार आहेत .  पोलीसहि आपल्यापरीने मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत . भारतीय नेत्यांचा मवाळपणा आणि त्याचा भारतीय सैन्य आणि गुप्तहेर संघटना यावर होणारा परिणाम या कादंबरीत दाखविले आहे .

Saturday, November 26, 2016

सारंच फार विलक्षण ... विजय देवधर

सारंच फार विलक्षण ... विजय देवधर
अतिशय वेगळा आणि उत्कंठापूर्व असा हा कथासंग्रह आहे . यातील सर्व कथा या खरोखरच विलक्षण आणि अदभूत आहेत . जगाच्या पाठीवर निरनिराळ्या ठिकाणी अतर्क्य घटना घडत असतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही . पण त्या सत्य घटना आहेत .

Friday, November 25, 2016

हँगमन ....ज्योती पुजारी

हँगमन ....ज्योती पुजारी
कठोर आणि भयानक गुन्हे करणार्यांना फाशीची शिक्षा देऊन त्यांना शासन केले जाते . पण त्यांना फासावर लटकावणाऱ्या जल्लादचे काय ?? त्याच्या मनाचा कोणी विचार केलाय ?? कसा जगत असेल तो?? हि कथा आहे सरावन कचरू या हँगमनची ,जो रोज मनाने मरतोय. मनुष्यहत्या हे मोठे पाप मानले जाते तिथे हा अधिकृतरित्या हत्या करतोय. त्याला हि अपराधीपणाची भावना छळत नसेल का ?? फाशी देऊन घरी गेल्यावर कसा वागत असेल तो घरच्यांशी ? कौटुंबिक आणि जेलचे जीवन अश्या दोन पातळीवरन हि कादंबरी पुढे सरकत जाते.

Tuesday, November 22, 2016

ओसामाची अखेर आणि जीवनाला भिडलेले विज्ञान.... डॉ. बाळ फोंडके

ओसामाची अखेर आणि जीवनाला भिडलेले विज्ञान.... डॉ. बाळ फोंडके
अमेरिकेने शेवटी ओसामाला शोधून काढून त्याला शिक्षा दिली. पण त्याच्या शोधमागे विज्ञानाचा प्रमुख वाटा होता. ते कसे हे वाचणेच महत्वाचे आहे . डॉ. बाळ फोंडके हे आघाडीचे विज्ञानकथाकार आहेत . त्यांच्या ह्या पुस्तकात त्यांनी वेगवेगळ्या कथा लिहिल्या आहेत . यातील प्रत्येक कथा हि मानवी शरीर आणि मन आणि विज्ञान यांची सांगड घालणारी आहे.  साहित्य,कला,दैनंदिन जीवन यासारख्या अनेक पैलूंचा विज्ञानाच्या नजरेतून वेध घेतला आहे

Monday, November 21, 2016

कणकवलीत ई लर्निंग

गणपतीच्या आधी संतोष सावंतचा फोन आला . संतोष आमच्या स्टार्ट गिविंग फाऊंडेशन चा उत्साही सभासद,थोडी राजकीय पार्श्वभूमी असलेला पण त्याचा संबंध कधीच स्टार्ट गिविंगशी येऊ देत नाही . त्याच्या कणकवलीत तरंदळे गावात  जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल स्कूल योजनेअंतर्गत ई लर्निंग अभ्यासक्रम देता येईल का ? याची चौकशी करत होता. संस्थेकडे निधी उपलब्ध होता आणि दुसरी कोणतीही योजना नव्हती  म्हणून पटकन हो म्हटले . दिवाळीनंतर ई लर्निंग शाळेत चालू करावे असे ठरले .
ई लर्निंग सेट घरी आला आणि फक्त TV सेट  कणकवलीतून घ्यावा असे ठरले . नेहमीप्रमाणे ग्रुपवर पोस्ट केले . बऱ्याचजणांनी  वेळेचे बंधन आणि बिझी शेड्युलमुळे येण्यास असमर्थता दाखवली . अर्थात ग्रुपने हे मान्य केले आहे त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याचा प्रश्नच नव्हता . आम्ही तिघे तयार झालो . तारीख ठरली तिकिट्स काढल्या आणि अचानक नोटबंदी लागू झाली . बँकेत पैसे असूनही काढता येत नाहीत . कणकवलीसारख्या ठिकाणी कार्ड स्वीकारतील कि नाही याची खात्री कोण देत नव्हते . आमचे हि खर्चाचे प्रोब्लम होतेच . शेवटी दुकानदाराने चेक स्वीकारण्यास  होकार दिला आणि जीव भांडयात पडला .  पण जाण्याच्या 2 दिवस आधी आमच्यातील एकाने अचानक आलेल्या कामामुळे येण्यास असमर्थता दाखवली . शेवटी आम्ही दोघेच उरलो .
ठरल्या दिवशी दुपारी कणकवलीत पोचलो,संध्याकाळी TV  खरेदी करण्यास गेलो .  काय मनात आले आणि परत मागे फिरून ई लर्निंग युनिट सोबत घेतले आणि दुकानात शिरलो . दोन TV सेट आवडले आणि बजेटमध्येही बसत होते.  पण दुर्दैवाने आमच्याकडील डोंगल त्या पोर्टला व्यवस्थित बसत  नव्हते . नशीब ते बरोबर घेतले आणि दुकानात चेक केले नाहीतर असाच TV घेऊन गेलो असतो तर ?? विचारानेच माझा थरकाप उडाला. शेवटी थोड्या जास्त किमतीचा TV खरेदी करावा लागला . त्याने ताबडतोब शाळेत फिटिंग केला . रात्री आम्हाला असे कळले शाळेच्या कार्यक्रमासाठी स्थानिक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत . परत आम्ही टेन्शनमध्ये.!!!! कारण इतर ठिकाणी  आमचा हा कार्यक्रम फक्त मुख्याद्यापक  ,शिक्षक ,विद्यार्थी ,आणि गावातील काही प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थित व्हायचा.त्यामुळे काही अडचण आली तर सांभाळून घ्यायचे ,पण इथे सगळे नेते मंडळी  आणि संपूर्ण गाव जमा होणार होता . त्यांच्यासमोर काही अडचण आली तर ??  म्हणून शाळेत लवकरच गेलो ,डोंगल लावून युनिट चालू केले ,ट्रायल चालू असताना विद्यार्थी कुतूहलापोटी जमा झाले आणि TV वर जे काही दिसले ते पाहून खुश झाले ,आनंदाने ओरडू लागले उड्या मारू लागले . त्यांचे हसरे उत्साही चेहरे पाहूनच आमचे टेन्शन कुठल्याकुठे पळून गेले . केवळ ह्याच क्षणासाठीच स्टार्ट गिविंग फौंडेशन काम करते आहे. हीच आमची मिळकत आहे . 
आता आम्हाला हळू हळू  कळू लागले कि केवळ पैसे असून सर्व काही शक्य होते हा समज चुकीचा आहे . कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी इतर छोट्या छोट्या गोष्टीही किती आवश्यक आहेत हेहि तिथे लक्षात आले .
मला आमच्या सभासदांचा अभिमान वाटतो कि त्यांनी मोठ्या विश्वसाने आमच्यावर हि जबादारी सोपवली आणि आम्ही त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला . हाच विश्वास आम्हाला पुढील वर्षी नव्या  जोमाने काम करण्याची ताकद देईल.

Sunday, November 13, 2016

विरोध

केवळ विरोधी पक्ष आहे म्हणून सरकारच्या प्रत्येक निर्णयावर विरोध करायचा का ?? आज सरकारने भ्रष्टचार आणि काळा पैश्याच्या विरोधात एक पाऊल पुढे टाकले आहे . त्याचा थोडाफार त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतोय पण त्यांनी हा त्रास आनंदाने स्वीकारला आहे . पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्या पोटात फार दुखू लागले आहे . आज विरोधक सर्वसामान्य जनतेला किती त्रास होतोय ते सांगतायत पण त्यांना इतर त्रास वर्षानुवर्षे होतोय त्याकडे लक्ष देत नाहीत . पाण्याची समस्या,रस्त्यावरील खड्डे,शेतकऱ्यांच्या आत्महत्या याकडे लक्ष न देता अशा गोष्टीवर बोंब मारतायत . सरकारने संपूर्ण चलन तर बाद केले नाही . घर चालविण्यासाठी आणि इतर आवश्यक गोष्टीसाठी 500/ 1000 च्या नोटा काही दिवस वापरायची परवानगी सरकारने दिली आहेच .  या आधीच्या पंतप्रधानांनी काही धाडसी निर्णय घेतले होते आणि विरोधकांनी त्यांनाही विरोध केला होता . इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरात सैनिकी कारवाई केली होती आणि त्यावेळी राष्ट्रपतीहि शीख होते तर त्या कारवाईचे प्रमुख हि शीख होते पण त्यानंतर खलिस्तान चळवळ पूर्णपणे थंडावली होती ,राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतिसेना पाठवून तामिळ बंडखोरावर अंकुश आणला त्यालाही विरोध केलाच पण त्यानंतर LTTE चा जोर कमी झाला .पण त्याचा परिणाम आपल्या पंतप्रधानांच्या हत्येत झाला . वैयक्तिक स्वरूपात आपल्या पंतप्रधानांचे  खूप नुकसान झाले . पण देशावरचे दहशतवादाचे संकट टळले. आज सरकार बहुमताने निवडुंन आले आहे आणि त्यांनी जे निर्णय घेतले त्याचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे .आपण या गोष्टीसाठीच त्यांना निवडून दिले आहे मग त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिलाच पाहिजे. नुसती चर्चा आणि फक्त चर्चा करण्यापेक्षा काहीतरी कृती केली ते महावाचे आहे असे वाटत नाही का ?  उद्या त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता आज त्या कृतीमुळे काय घडले ते पाहूया .  आज या संपूर्ण प्रक्रियेत बँक कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे ,ते हि दिवसरात्र जनतेची सेवा करतायत. काल रात्री 11 वाजेपर्यंत माझा एक मित्र बँकेत काम करीत होता ,तर पुण्यातील माझी मैत्रीण मेधा नाईक तिचा अपुरा स्टाफ सोबतीला घेऊन दिवसभर जनतेला पैसे बदलण्यासाठी ,खात्यात पैसे भरण्यासाठी हसतमुख चेहऱ्याने मदत करतेय . आपण त्यांचे अभिनंदन केले पाहिजे त्यांच्या कामाची कदर केली पाहिजे. आणि देशहितासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.

Friday, November 11, 2016

Emergency नोट

धाडकन दरवाजा लोटून विक्रम घरात शिरला .अचानक आत शिरलेला पाहून हातातला लाडू लपवताना माझी तारांबळ उडाली .पण विक्रमचे लाडूकडे मुळीच लक्ष नव्हते ." चल १०० तरी दे" ,म्हणत हाथ पुढे केला. मी बावचळून लाडू त्याच्या हातात दिला . त्याने एक तीक्ष्ण नजर माझ्यावर टाकली आणि परत ओरडला "१०० दे " मी म्हटले "कुठून आणू ,अरे नुकतीच बायको 200 रु घेऊन बाजारात गेलीय "साला उद्याचा बुधवार फक्त अंडी खाऊन जाणार ." मी चिडून पुट्पुटलो. "अरे तुझ्याकडे अंडी तरी मिळतील, पण मला पालेभाजी खाऊ लागेल बहुतेक.  मोदी सरकारने 500 आणि 1000च्या नोटा अचानक बंद केल्यामुळे अशी परिस्थिती उद्बभवली होती . नेमके माझ्या खिश्यात 250 रु आणि 500च्या 4 नोटा होत्या. बुधवार सुट्टी असल्यामुळे मी घराबाहेर पडणार नव्हतो . त्यामुळे मी खुश होतो पण विक्रमच्या रुपात असे संकट येईल वाटले नव्हते. मुळात विक्रमवर हि पाळी येईल असे वाटले नव्हते .  कारण तो  पैसे जपून वापरणारा. दारूहि पिणार!! पण contribution मध्ये ,आज त्याचेहि असे वांधे बघून आश्चर्य वाटले.खिश्यात ढीगभर पैसे असून खायचे वांधे झालेत ,असे बोलून हातातला लाडू त्याने तोंडात कोंबला . मी हळूच विचारले अरे विक्रम ते emergancy चे पैसे बाहेर काढ . तेव्हा तो परत चिडला ,पाकीट माझ्या हातात कोंबून म्हणाला "तूच बघ ते emmergency चे पैसे .  खरेच  त्याच्या पाकिटात 100 ची 1 ,50 ची 1 आणि 500 च्या 5 नोटा होत्या,चोरकपप्यातली नोट नाहीशी झाली होती . मला आठवते जेव्हा ठाण्याला कॉलेजला जात होतो तेव्हा वडिलांनी त्याच्या हातात 50 रु दिले होते आणि म्हटले अत्यंत आणीबाणीच्या काळात या नोटेचा वापर कर आणि दुसऱ्या दिवशी परत 50 मागून घे ,पण घरच्या संस्कारांनी विक्रमवर ती वेळ कधीच आली नव्हती ,खूप मजा केली आम्ही ,खूप अडचणी आल्या पण त्याचा हाथ त्या 50 रु कडे कधीच वळला नाही .पुढे नोकरी लागली आणि 50 च्या जागी 100 आले ,पाकीट बदलले गेले पण नोट तशीच असायची फक्त तिचे घर बदलायचे .पुढे पगार वाढला आणि 500 च्या नोटा चलनात आल्या तेव्हा 100 ची जागा 500 नी घेतली ती आजतागायत .या गोष्टीवरून आम्ही विक्रमची खूप खेचत असू पण त्याने त्या नोटेचा वापर कधीही केला नाही . याचा अर्थ असा नव्हे त्याला काही अडचणीचं आल्या नाहीत पण तो अडचणींवर मात करून पुढे जायचा .पण आज  बदलण्यासाठी का होईना त्याला ती नोट बाहेर काढाविच लागली .

Wednesday, November 9, 2016

मार्डूकाच्या प्रदेशात ...डॉ. चंद्रशेखर चिंगरे

मार्डूकाच्या प्रदेशात ...डॉ. चंद्रशेखर चिंगरे
लेखकाचा नवीन गूढभयकथा संग्रह ,या कथा वाचताना नारायण धारपाच्या कथांची आठवण येते . पण साऱ्या कथा  नेहमीच्या पद्धतीच्या आहेत . जारण मरण  ,मंत्र तंत्र ,चेटूक ,भयाण वाडा यांनी भरलेल्या.हल्ली तोचतोचपणा येऊ लागला आहे असे वाटू लागले आहे .

Monday, November 7, 2016

प्रतीक्षा... प्रभाकर पेंढारकर

प्रतीक्षा... प्रभाकर पेंढारकर ....
सैनिकांबद्दल सगळ्यांना आदर असतो .त्यांच्या शूरपणाचे कौतुक असते .त्यांची कडक वर्दी ,छातीवरचे मेडल्स,यांचे खूप आकर्षण असते .अनेक चित्रपटातही सैनिक हा खूप शूर निधड्या छातीचा जवान दाखवला जातो . पण पेंढारकरांनी या वर्दीतला माणूस दाखवला आहे . ज्याला संकटात सापडल्यावर आपल्या घरच्यांची आठवण येते.जुन्या आठवणी जाग्या होतात .कथेचा नायक हा पॅराट्रूपर कमांडो आहे . पण विमानातून उडी मारताना अजूनही तो काही क्षण अस्वथ असतो . काही पाकिस्तानी सैनिक हे पॅराशूटच्या साहाय्याने भारतीय हद्दीत उतरले आहेत आणि त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी नायकावर सोपवली जाते.तो एका हुशार पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेतो .शोध घेताना येणारी संकटे ,पकडल्या गेल्यावर होणारी मनाची अवस्था यांचे सुंदर आणि अचूक वर्णन पेंढारकरांनी केले आहे .त्यामुळे नायक हा आपल्यातला एक सर्वसामान्य पण प्रशिक्षित केलेला माणूस वाटतो.

Saturday, November 5, 2016

मनःशांती

सकाळपासून थोडा अस्वस्थ होतो .थोडे उदासवाणे वाटत होते .त्यात कामावरही दिवस चांगला गेला नाही .
घरी आलो तरी कशातही मन लागेना . चला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जावे तिथे शांती मिळेल म्हणून बाहेर पडलो. कोपऱ्यावर बंड्या उभाच होता "काय भाऊ ?? कुठे ? खरे तर त्यालाही टाळायचे होते पण जमले नाही ."आज मूड दिसत नाही तुमचा भाऊ ?,मी मुकाटपणे हो म्हटले "चला तर मग !!,मारुया का 1/1 पेग?" त्याने हसत विचारले .पटकन तोंडातून हो बाहेर पडले .त्याने आश्चर्याने विचारले" काय बोलता हे ?".आहो उदासमनाने कधी दारू पिऊ नये हि तुमची शिकवण आणि आज तुम्हीच हो म्हणता" ?? नको ,त्यापेक्षा मी तुमच्यासोबत येतो ,जिथे जाल तिथे येतो".हा काही ऐकणार नाही याची खात्री होती.
दोघेही सिद्धिविनायक मंदिरात शिरलो ,दारातच एका मुलीने जबरदस्तीने हातात हार दिला आणि पळून गेली . "जाऊ दे ,"बंड्या म्हणाला .आत त्या गर्दीतून वाट काढत कसाबसा गाभाऱ्यात शिरलो आणि नुसते देवाचे तोंड बघितले इतक्यात सुरक्षा रक्षकाने "चला चला VIP आलेत म्हणून बाहेर काढले .  हिरमुसला होऊन बाहेर पडलो तोच बंड्या म्हणाला "चला गार्डन मध्ये ".बंड्याला पाहताच तिथे अभ्यास करणारी 5/6 मुले धावत आली .बंड्या त्या घोळक्यात घुसला,चहाची ऑर्डर सर्वांसाठी  दिली आणि त्यांच्यात रमून गेला .त्यांचे प्रॉब्लेम्स सोडविण्यात गुंतून गेला . मला माझे तरूणपणाचे दिवस आठवले .इथेच आम्ही  सगळे अभ्यास करायचो .अचानक माझ्याकडे वळून बंड्या म्हणाला " भाऊ मुलांना काही शिकवा ,तुमचे अनुभव सांगा त्यांना . भविष्यात काय करायचे ,तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत यांच्या ".तसा मी पुढे झालो आणि त्यामुलांच्यात वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही .मग तो म्हणाला चला आता समुद्रावर जाऊ .थोड्या वेळाने दोघेही शांतपणे समुद्राच्या लाटांचा धीर गंभीर आवाज ऐकत कट्ट्यावर बसून होतो .निःशब्द ,कानावर दूरवरच्या मठात चालू असलेल्या आरतीतील टाळ मृदूंगचा आवाज ऐकू येत होता . लाटांच्या आणि आरतीच्या नादाने एक वेगळीच लय पकडली होती.वातावरणात एक उत्साह दिसू लागला.माझाही मूड परत येऊ लागला. बंड्याने अलगद खांद्यावर हाथ ठेवला . भाऊ फेकून द्या सगळा मनस्ताप ,चिंता ,काळजी या समुद्रात .शेवटी आपल्याला कुठे शांती ,आनंद मिळेल हे महत्वाचे .प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतातच .मला कितीवेळा सावरले तुम्ही .चला घरी जाऊ उद्याचा दिवस नक्की वेगळा असेल" . खरेच आज जे काही क्षण आम्ही उपभोगले ते नक्कीच वेगळे होते त्यामुळे पुन्हा आयुष्याला नवीन उभारी मिळाली.