Monday, January 23, 2017

मी झारा गहरमानी एक देशद्रोही

मी झारा गहरमानी एक देशद्रोही ...झारा गहरमानी ... अनुवाद .रेश्मा कुलकर्णी पाठारे
ही कथा आहे एका सामान्य मुलीची ,इराण मधील खोमेनीच्या जुलमी राजवटीविरुद्ध वागणारी झाराची ,तुरुंगात खितपत पडल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्याकडे केलेल्या प्रवासाची . या प्रवासात तिला स्वतःचे सामर्थ्य  कळले आणि त्याचा योग्य वापर कसा करावा याची जाणीव झाली .एका सामान्य पर्शियन मुलीपासून ती एका करारी कार्यकर्तीत कशी परावर्तित झाली याची हि कथा.
माय लाईफ ऍज अ ट्रेटर  या मूळ पुस्तकाचा सुंदर अनुवाद

Tuesday, January 17, 2017

कावळा

",च्यायला ,!!"इथे रहाणे हीच मोठी शिक्षा आहे माझ्यासाठी ",पंख फडफडवत तो उद्गारला आणि परत नुकत्याच ठेवलेल्या पिंडावर सूर मारला . तेच तेच अन्न ,तेच दुर्मुखलेले चेहरे आणि चोच मारल्यावर सुटकेचे भाव पाहून तो कंटाळला होता . गेल्या वर्षभरापासून तो बदलीसाठी प्रयत्न करत होता पण आखिल भारतीय कावळे संघटना अध्यक्ष त्याची मागणी धुडकावून लावत होते . अरे त्याच्या जागेवर कोण यायलाच  तयार नव्हते तर कोण काय करणार??
. पहिल्यांदा त्याला खूप गंमत वाटत होती . काही काम न करता फक्त बसून राहायचे आणि पिंड ठेवला कि झडप मारायची . त्यावर लोक पाया पडायची ते वेगळेच . म्हणजे पिंडावर चोच मारून जणू आपण उपकारच केले असे वाटायचे त्याला . मग तो त्यांची गंमत करू लागला. काही काही पिंडाना मुद्दाम स्पर्श नाही करायचा ,आलेल्या सर्व नातेवाईकांची गम्मत पाहत तो लांब बसून राहायचा ,एक एक जण येऊन त्याची मनधरणी करायचे ,हाथ जोडायचे . कुठेतरी त्याला बरे वाटायचे ,खिडकीत बसलो कि हकालवून लावणारे आज त्याच्या पाया पडत होते .  कशी असतात हि माणसे ?? किती स्वार्थी ,जोपर्यंत मी चोच मारीत नाही तोपर्यंत हे इथून निघणार नाहीत या जाणिवेनेच तो सुखवायचा .
पण असे किती वर्षे चालणार . सारखे तेच तेच खाऊन दुसरे अन्न असते हे विसरूनच गेले होता तो .सकाळी 7 ते 9  हेच काम होते त्याचे  आणि त्यानंतर  प्रेताबरोबर आलेल्या  वस्तूवर जगावे लागत असे त्याला . हळू हळू त्याच्या लक्षात येऊ लागले कि का इथे कोण येत नाही? का ठेवलेल्या पिंडाला चोच मारायचे टाळतात ??. खूप वेळ त्याला ओरडून सांगावेसे वाटते ",आहो बदल करा काहीतरी ,कंटाळा आलाय आम्हाला तेच तेच खाऊन, पण फक्त काव काव उमटायचे . एकदिवस कंटाळून त्याने एका पिंडाला चोच मारलीच नाही ,बघुया काय होतेय ,बराच वेळ वाट पाहून ,पाया पडून ,विनवणी करून शेवटी सर्व घरी गेले ,कुतूहल म्हणून तोही उडत उडत त्यांच्या घरी गेला  तर पिंडाला चोच न लावण्याची त्याची कृती त्या बिचार्या बाईला भोगावी लागत होती . सर्व नातेवाईक तिला शिव्या देत होते ,मेल्यानंतर हि नवर्याला शांती नाही म्हंणत  सर्व खापर तिच्यावर फोडत होते. अरे बापरे माझ्या कृतीची शिक्षा तिला का ?? आहो तिची काही चुकी नाही असे ओरडून सांगावेसे वाटले त्याला पण काव काव शिवाय काही उमटले नाही . खरेच आपल्या कृतीचे इतके भयानक परिणाम होऊ शकतात हे पाहूनच तो हादरून  गेला . आपण गेल्यावर काय होईल मग ??  नको नको निदान या लोकांसाठी तरी थांबवे लागेल आपल्याला ,असा विचार करत त्यानेबदलीचा  अर्ज फाडून टाकला

श्री. किरण बोरकर

Sunday, January 15, 2017

शेरलॉक होम्सचा  पुनर्जन्म ..... पंढरीनाथ सावंत 

,

शेरलॉक होम्सचा  पुनर्जन्म ..... पंढरीनाथ सावंत 
जगातील पहिल्या नंबरचा गुप्तहेर म्हणून होम्स ओळखला जातो . सर कॉनन डॉयल यांनी  एका कथेत  मुत्यू दाखवून त्याचा अवतार संपविण्याचे ठरविले होते पण लोकांचा संताप पाहून त्यांनी त्याला "रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स " या कथासंग्रहातून परत आणले आणि त्यानंतर त्याला मारण्याचे धैर्य झाले नाही . त्यांनी होम्सला रिटायर केला पण लोकांच्या प्रेमाखातर परत त्यांना  कथा लिहाव्या लागल्या .  एकूण बारा कथा वाचकांच्या मनोरंजनासाठी या पुस्तकात आहेत .

Friday, January 13, 2017

सहल

आज सकाळी सरस्वती विद्या मंदिर च्या बाहेर पिकनिकला जाणाऱ्या मुलांच्या गाड्या उभ्या होत्या. गाडीत छोटी छोटी मुले दंगामस्ती करीत होती , तर कोणी खिडकीतून डोके बाहेर काढून आपल्या पालकांशी बोलत होते .पालकही हौसेने मुलांचे फोटो काढीत होते . वातावरणात एक प्रकारची निरागसता ,प्रसन्नता दिसून येत होती . आपला मुलगा / मुलगी आपल्यापासून काही वेळ का होईना पण दूर राहणार याची काळजी प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. तर मुलेही थोडी भांबावलेली होती पण पिकनिकला जाण्याचा आनंद काही लपत नव्हता. त्या रस्त्यावरून येणारा जाणारा  प्रत्येकजण ह्याचा आनंद घेत होता . खरेच जुने दिवस आठवले ,एके काळी आम्ही बसमध्ये बसून आपल्या पालकांच्या सूचना ऐकत होतो आणि आज आपण आपल्या मुलांना सूचना देतोय . खरेच किती छान दिवस होते ते

Monday, January 9, 2017

द जहीर ....... पाउलो कोयलो

द जहीर ....... पाउलो कोयलो   अनुवाद .. नितीन कोत्तापल्ले
जी गोष्ट एकदा पाहील्यानंतर किंवा स्पर्शील्यानंतर आपण विसरूच शकत नाही ,उलट तिचा आपल्यावरचा प्रभाव इतका वाढत जातो की, तिच्याशिवाय दुसरे कुठलेच विचार मनामध्ये येत नाहीत . इतके कि आपण वेडे होतो ,ती गोष्ट म्हणजे जहीर . अल्केमिस्ट मुळे प्रसिद्ध झालेला पाउलो याची हि कादंबरी .
एका सुप्रसिद्ध लेखकाची युद्धवार्ताहर असलेली पत्नी गायब होते .कोणताही धागेदोरे न सोडता ती गायब होते ,तिच्याबरोबर तिचा दुभाष्या मिखाईल असतो .लेखक  पुढे खूप प्रसिद्ध होतो ,पण आपल्या पत्नीची आठवण त्याला स्वस्थ बसू देत नाही . नेमके काय घडले ?? कशी गायब झाली? कि स्वतःहुन निघून गेली ?हा प्रश्न नेहमी त्याला पडलेला असतो . तो या प्रश्नांची  उत्तरे मिळविण्यासाठी तिच्या शोधात निघतो . हा प्रवास करताना त्याला प्रेमाचा खरा अर्थ कळू लागतो . पाउलोला गूढ शक्ती ,प्राचीन पंथ ,काळी जादू याचे आकर्षण आहे . त्याची झलक हि संपूर्ण पुस्तकात दिसून येते.

Friday, January 6, 2017

कॉन्ट्रॅक्ट

कंजूरमार्ग रेल्वे स्टेशन वरून ट्रेन मध्ये 2 IT वाले तरुण चढले .माझी सीट रिकामी असल्यामुळे माझ्या बाजूला बसले आणि त्यांच्या गप्पा चालू झाल्या . बाजूला बसून मोबाईल न काढता गप्पा मारणारे तरुण पाहून माझे कुतूहल जागृत झाले आणि मीही पुस्तक बंद करून त्यांच्या गप्पांकडे कान देऊ लागलो .
तरुण १ ला ---च्यायला घरचे लागले आता मागे , लग्न कर लग्न कर .
तरुण २ रा --- मग काय हरकत आहे ,माझे हि लागले होते . त्यांचे कामच आहे ते .
तरुण १ --- अरे हरकत काही नाही ,पण आपली नोकरी अशी . कधीही आपण कामावर सुट्टी अशी नाही  वेळेचे बंधन नाही . काय वेळ देणार बायकोला.
तरुण २ ---- हो ते हि खरेच ,शिवाय घरी गेल्यावर त्यांचे रुसवे फुगवे काढा . त्यांना फिरायला घेऊन जा .
तरुण १---- आणि असा किती वेळ देणार त्यांना दिवसातला??
तरुण २ --- एक मनात आले आहे ,बघ पटते का ??
तरुण १ ----अरे बोल यार ,बिनधास्त .
तरुण २ -- हे बघ आपल्याला फक्त मुलगी कंपनी म्हणून हवी आहे ,जी आपल्याला पाहिजे तेव्हा वेळ देईल,आपल्याबरोबर जेवायला येईल आणि कधीतरी शारीरिक सुख देऊ शकेल.
तरुण  १--- हो तेही खरेच ,तेव्हढाच आपला टाईम पास
तरुण २-- आपण एक जाहिरात देऊ ,सोशल साईट वर ,एक तरुण मुलगी सहकारी म्हणून हवी आहे .आठवड्यातून २ ते ३ वेळा भेटणे ,जेवणे ,गप्पा मारणे आणि महिन्यातून कमाल ४ वेळा सेक्स.
तरुण १ -- अरे बापरे हे पण ?? कोणती मुलगी तयार होईल ?
तरुण २ -- होईल रे ,हल्ली बहुतेक अश्याच विचार करतात ,म्हणून तर सोशल साईट बोलतोय.आपण त्यांना महिन्याला ठराविक रक्कम देऊ ,त्या पेक्षा जास्त झाले तर थोडे जास्त पैसे . शिवाय खाणे पिणे, फिरणे याचा सर्व खर्च आपलाच ना ?? हो आणि कधी एखादी रात्र बाहेर जायचे असेल तर ३ स्टार हॉटेलमध्ये मुक्काम ,५ स्टार ट्रीटमेंट, आणित्याच्यावेगळाअलाऊन्स ,वर्षाला २ भारी ड्रेस ,३ महिन्यातून एखादे  भारीगिफ्ट ,मोबाइल बिल  भरू
तरुण १ -- अरे हो पण सेक्समधून पुढे काही घडले तर ???
तरुण २--- ती काळजी तिने घ्यायची ,ती जबाबदारी आपली नाही .
तरुण १-- अरे आधी होय बोलेल, नंतर गळ्यात पडेल .
तरुण २--- ह्या !!!आपण सर्व बॉण्ड पेपरवर लिहून घेऊ . वकील करू ,कॉन्ट्रॅक्ट करू आणि ते रजिस्टरहि करू . दोन्हीकडून एक एक साक्षीदार आणू . रजिस्ट्रेशन खर्च आपला . दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट परिस्थितीनुसार रेन्यू करू .
तरुण १--- अरे हे असे होऊ शकते ???
तरुण २-- का नाही?? आपल्यासारख्या अनेक मुलीहि आहेत त्यांनाही गरज आहे ,आपल्यासारख्या त्याही बाहेरून आल्यात ,आपल्यासारख्याच  २४ तास कामात बिझी ,त्या नक्कीच तयार होतील .
तरुण १- मग ठीक आहे . पण असे किती काळचालेल??
तरुण २ -जोपर्यंतआपल्याला किंवा तिला कंटाळा येत नाही तो पर्यंत.
तरुण १- आणि कंटाळा आला कि ??
तरुण २ -- आपल्याला आला कि एक महिन्याचे पेमेंट करायचे ,तिला आला कि तिने पेमेंट सोडून जायचे ,सोपे आहे .
असे बोलून दोघेही हसू लागले आणि दादरला उतरून चालू पडले.
मी बसलेल्या धक्क्यातून बराचवेळ सावरलो नाही .