Wednesday, December 22, 2021

काळेकरडे स्ट्रोक्स... प्रणव सखदेव

काळेकरडे स्ट्रोक्स... प्रणव सखदेव
रोहन प्रकाशन 
काहीजण कथा कादंबरी लिहितात त्यातून त्यांना नेमके काय सांगायचे असते ते कळत नाही . साधारणतः प्रत्येक पुस्तकात काहीतरी एक सूत्र असते आत्मचरित्रात संघर्ष असतो ,चरित्रात थोरांविषयी माहिती असते. कादंबरीत कथा असते.पण एखाद्याच्या आयुष्यात काही वेगळे घडत नसेल तो त्याचे आयुष्य त्याला हव्या त्या पद्धतीने जगत असेल तर तो कादंबरीचा विषय होऊ शकतो का ...??
नेमके हेच काळेकरडे स्ट्रोक्स या कादंबरीत आहे .
यातील नायक  कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकणारा कोवळा तरुण .ज्याला फिल्म डायरेक्टर बनायचे आहे आणि त्यासाठी त्याने रुईया कॉलेजमध्ये मासकॉमला ऍडमिशन घेतलीय. त्याचे आईवडील मध्यमवर्गीय.. डोंबिवलीत राहणारे . हा कॉलेजचे लेक्चर कधीच अटेंड करताना दिसत नाही.हा रुईयाच्या कट्ट्यावर आपला अंध मित्र आणि त्याच्या मैत्रिणीसोबत असतो . हा तिथे  त्याच्या बुथवर  सिगारेट  पीत बसलेला असतो. संध्याकाळी  चायनीज गाडीच्या पाठीमागे काळोखात दारू पितो.
आईबाप त्याला जेव्हाजेव्हा उपदेश करायला जातात तेव्हा तो त्यांच्याशी भांडून बाहेर पडतो .तो बापाच्या खिशातील पैसे चोरतो.त्या पैशांनी दारू पितो सिगारेट ओढतो .
पुढे त्या अंध मित्राचे अपघातात निधन  होते तेव्हा हा त्याच्या मैत्रिणीला मानसिक आधार देतो .तिच्यासोबत दारू पितो सिगारेट ओढतो .एका गाफील क्षणी दोघात संभोग घडतो .मग ती त्याच्यापासून दूर निघून जाते आणि तो पश्चातापाने जळत राहतो. पुढे त्याला दुसरा मित्र भेटतो . तो त्याला गांजाची सवय लावतो .वेश्यांची  ओळख करून देतो . त्याचवेळी त्याला दुसरी मैत्रीण भेटते .ती एका आजाराने त्रस्त झालेली असते तरीही तिला दारू सिगारेट चे आकर्षण असते . हा तिच्यासोबत डॉक्टरकडे जातो .तिच्या सोबत असतो .
हे सगळे चालू असतानाच अंध मित्राची मैत्रीण पुन्हा त्याला भेटायला बोलावते .त्याला भेटल्यावर ती आत्महत्या करते. पुन्हा हा वेडापिसा होतो . दारू पितो गांजा ओढतो आणि त्या नशेत आपल्या मैत्रिणीला भर लेक्चरमधून हात पकडून जेन्ट्स टॉयलेट मध्ये नेतो . तिथे दोघेही नको त्या अवस्थेत सापडतात . सर्व न्यूज पेपरमध्ये बातमी येते . त्याला कॉलेजमधून काढून टाकतात .पुन्हा घरी भांडण करतो तेव्हा बाप याला घराबाहेर काढतो हा घराबाहेर पडताना कपाटातील लॉकरमधून पैसे चोरतो आणि हिमालयात निघून जातो .
त्यानंतर एकदम तो फिल्म डायरेक्टर बनूनच रुईयाच्या कट्ट्यावर येतो.बोलण्यातून कळते की याच्या दोन तीन फिल्म विविध फेस्टिवलमध्ये दाखविल्या जातात .पुन्हा तो आपल्या मैत्रिणीला शोधून काढतो .
संपली गोष्ट 
यात इतका तरुण मुलगा मोठ्यांसारखा गोंधळलेला अलिप्त कसा राहतो. तो नेहमी मैत्रिणीसमोर सिगारेट गांजा कसा ओढू शकतो .त्यांची घरे नेहमी रिकामी कशी असतात  सेक्स त्यांच्यासाठी इतका सहज सोपा कसा असू शकतो .इतके सगळे घडूनही त्याचा डायरेक्ट बनण्याचा प्रवास  एक दोन ओळीत कसा मांडला जातो .
एका तरुणांचा वाईट मार्गावरचा प्रवास असेच या पुस्तकाच्या बाबतीत म्हणू शकतो

Tuesday, December 14, 2021

स्क्रीम फॉर मी....करेन रोझ

स्क्रीम फॉर मी....करेन रोझ
अनुवाद....दीपक कुलकर्णी 
मेहता पब्लिकेशन
त्याने आपल्या बळीची निवड काळजीपूर्वक केली होती.ठार मारण्यापूर्वी त्याने तिला मनमुराद उपभोगले होते. मग तिला तपकिरी रंगाच्या ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून दिवसा अगदी सहजपणे सापडेल अश्या ठिकाणी नेऊन टाकले होते.त्याचा हा डाव यशस्वी झाला . डटन जॉर्जिया येथील वार्षिक क्रॉस कंट्री सायकल स्पर्धेतील शेकडो सायकलपटू या रस्त्यानेच जाणार होते आणि त्यातील अनेकजण हे दृश्य पाहणार होते.
बरोबर तेरा वर्षांपूर्वी डटन जॉर्जिया येथे असाच एक खून झालाय.मृत तरुणीची जुळी बहीण अँलेक्स अजूनही त्या धक्क्यातून सावरली नाहीय. तिच्या समोर आईने गोळी झाडून आत्महत्या केली होती. मावशीने सावत्र बापाच्या तावडीतून तिची सुटका केली होती .
आज तेरा वर्षांनी तिची सावत्र बहीण बेली गायब झालीय असा तिला फोन आला आणि म्हणून ती घाईघाईने  डटन जॉर्जिया इथल्या घरी निघाली होती. तिच्या सावत्रबहिणीला एक सहा वर्षाची मुलगी ही आहे हे तिला आजच कळले होते.
स्पेशल एजंट डॅनियल याची या केससाठी नेमणूक झालीय. डॅनियल मुळातच डटनचा रहिवासी आहे .आठवड्यापूर्वीच त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तो आला होता .
तेरा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती आता घडणार का ...?? कोण करतोय हे खून ...?? का ?? कशासाठी ...??? अलेक्सचा या खुनाशी काय संबंध आहे ?? डॅनियलचा छोटा भाऊ सायमन ज्याला डॅनियलने स्वतःच्या हाताने ठार मारलाय त्याचा या खुनाशी काही संबंध आहे का ....?? की तेरा वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनेत सायमनचा प्रमुख सहभाग आहे ..??
या प्रकरणात गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती ही गुंतल्या आहेत.आणि खुन्याची नजर आता अलेक्सकडे वळली आहे .

Sunday, December 5, 2021

द गन्स ऑफ नॅव्हारन ...अँलिस्टर मॅक्लिन

द गन्स ऑफ नॅव्हारन ...अँलिस्टर मॅक्लिन
अनुवाद.…..अशोक पाध्ये
मेहता पब्लिशिंग हाऊस
दुसऱ्या महायुद्धवर अनेक पुस्तके लिहिली गेली अनेक चित्रपट निघाले . त्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लेखकाने एका घातकी मोहिमेवर हे पुस्तक लिहिले . त्यावर नंतर चित्रपटही बनविला गेला.
 तुर्कस्थानजवळील खेरोस या छोट्या बेटावर बाराशे ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते . काही दिवसांनी या सैनिकांना जर्मन सेनेने मारून टाकले असते. 
खेरोस  बेटावर जाताना नॅव्हारन गाव पार करून जावे लागणार होते . ते गाव जर्मनीच्या ताब्यात होते .नॅव्हारान गावातील किल्यात दोन महाकाय तोफा समुद्राच्या दिशेने तोंड करून उभ्या होत्या. त्यामुळे कोणतीही बोट अथवा विमान नॅव्हारन पार करून खेरोसला पोचू शकत नव्हते .
ब्रिटिशांनी नॅव्हारनच्या तोफा उध्वस्त करायची योजना आखली. पण ते फार कठीण होते. जर्मन आणि इटली सैन्याचा कडेकोट बंदोबस्त असलेल्या किल्यात शिरणे सोपे नव्हते . किल्याच्या एका बाजूला सरळसोट कडा होता . जो कोणत्याही गिर्यारोहकाला चढून जाणे शक्य नव्हते .त्यामुळे तिथून कोणी येणार नाही याची खात्री जर्मनाना होती.
कॅप्टन किथ मॅलरीला या मोहिमेसाठी निवडले गेले . किथ हा उत्कृष्ट गिर्यारोहक होता . युद्धाआधी त्याने न्यूझीलंड येथील अनेक शिखरांवर यशस्वी चढाई केली होती . घातपाती युद्धात तो निपुण होता . त्याच्या जोडीला अजून चार माणसे देण्यात आली .जी आपापल्या कामात तरबेज होती.
आता कॅप्टन किथ मॅलरीला या चार सैनिकांना सोबत घेऊन कोणाच्याही मदतीशिवाय तो सरळसोट कडा ओलांडून नॅव्हारनच्या तोफा नष्ट करायच्या होत्या .त्याचवेळी जर्मन सेना ही खेरोस बेटावर हल्ला करायच्या तयारीला लागले होते .ब्रिटिश आरमारही आपल्या सैनिकांना सोडविण्यासाठी निघाले होते. ते नॅव्हारनच्या तोफेसमोर येण्याआधीच मॅलरी आणि त्याची टीम त्या नष्ट करतील का ..??
एक थरारक रोमांचकारी अनुभव 
द गन्स ऑफ नॅव्हारन हा चित्रपट 1961 साली प्रदर्शित झाला होता . त्यात  सुप्रसिद्ध अभिनेता ग्रेगरी पॅकने कॅप्टन किथ मॅलिरी ची भूमिका केली होती .