Friday, June 29, 2018

मुंबईकर आणि घड्याळ

खरे तर आम्हा मुंबईकरांचे .....त्यातल्या त्यात चाकरमान्यांचे जीवन इतके चाकोरीबद्ध असते की आम्हाला घड्याळाची गरजच भासत नाही . दुसऱ्यांच्या हलचालीतून आम्ही आमची वेळ ठरवतो.म्हणजे बघाना... सकाळी लाईट लागला की समजावे सौ. उठल्या म्हणजे अजून अर्धा तासाची झोप आहे.बरे बाथरूममध्ये शिरलो की समोरच्या बाथरूममध्ये ओळखीची सावली आंघोळ करताना दिसते म्हणजे वेळेत उठलो आहोत हे लक्षात येते .  आंघोळ करून बाहेर खिडकीत उभे राहिलो की समोरच्या बिल्डिंगमधली भाभी सूर्याला नमस्कार करायला बाल्कनीत येतेच .सौ. आत असल्याचे पाहून थोडा जास्तच रेंगाळतो . बाहेर पडताना लिफ्टमधून खाली उतरतो तेव्हा सिक्युरिटी डोळे चोळत उठतो .च्यायला .....!! हा आपल्याला बघून घड्याळ लावतो का ...? अशीही शंका मनात येते आणि दूधवाला सायकलची घंटी वाजवत आत शिरतो.चला... अजूनही राईट टायमावर आहोत. स्टेशनच्या रस्त्यावरील देवळात सदाभाऊ पेपर वाचताना दिसतात त्यांना नेहमीप्रमाणे हात दाखवून पुढे सरकतो आणि ऍक्टिवा वर बसलेली ती कॉलेजकुमारी पास होते .कानात इयरफोन ....डोळ्यावर गॉगल चढवून ह्यांना गाडी कशी चालवता येते तेच कळत नाही . तर समोरून ती येते . पाठीला सॅक ......सुतकी चेहरा ....जणू या जगात जन्म घेऊन मी मोठे पापच केले आहे . हिला हसता येते का.... ???? एकदा विचारणार आहे तिला.. कधी तरी हसरा चेहरा ठेवून चला.तुमच्याबरोबर इतरांना ही प्रसन्न वाटेल.... पुढे चहाच्या टपरीवर तो आहेच. एका हातात कटिंग आणि सिगारेट तर दुसऱ्या हातात फोन कानाला लावून बोलतोय. मला पाहूनच चहा घेणार का ....??? अशी नेहमीची खुण केली. मीही अंगठा दाखवत नाही म्हटले .त्यानेही परत अंगठा दाखविला . खरेच पाजेल का तो चहा ....???? एकदा ट्राय केली पाहिजे .पण इतकी वर्षे बघतोय त्याच्या कानावरून फोन बाजूला झालेला . अरे वा .... !! आज स्टेशनच्या दारातच गोखले बाई .......नेहमी त्या आधी दिसतात .....!!  च्यायला ....मी तीन मिनिटे लवकर आलो की तिला  उशीर झालाय ..?? नाही बरोबर आहे .......नाहीतर चेहरा वाकडा करून गुड मॉर्निंग केले असते .छान ..... प्लॅटफॉर्मवर देशपांडे दुसऱ्याच्या पेपरमध्ये मान खुपसून उभा आहे म्हणजे नेहमीची ट्रेन अजून आलेली नाही . हुश्शहह कशाला घड्याळाची गरज आहे आपल्याला ......?????
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, June 28, 2018

दंशकाल .... हृषिकेश  गुप्ते

दंशकाल .... हृषिकेश  गुप्ते
राजहंस प्रकाशन
पहिल्या पानापासून खिळवून ठेवणारी कादंबरी . ही कथा आहे भुगावाच्या देशमुख घराण्याची . त्यांच्यातील एकमेकांत गुंतलेल्या नात्यांची . कोकणातील चालीरीतींची .अंधश्रद्धेची. जमिनीच्या वादाची. अनिरुद्ध हा कादंबरीचा नायक आहे . आयुष्यभर नेभळट आयुष्य जगलेला मानसोपचारतज्ञ आहे . त्याचे वडील अण्णा ..दुसरा काका नंदाकाका.. आणि तिसरा वेडसर अंगात दर गुरुवारी दादूमिया नावाचा फकीर येणारा वेडा भानुकाका आणि त्याची बायको ..आजी ...आते... तिचे लोभी यजमान यांच्याभोवती पूर्ण कथानक फिरते . भानुकाकाच्या वेडसरपणाचा कसा फायदा घेतला जातो . त्याला देव बनविले जाते आणि शेवटी त्याची आणि पर्यायाने देशमुखांची कशी वाताहत होते याचे अंगावर काटा येणारे लिखाण लेखकाने केले आहे . कोकणातील भाषा कधी कधी गलिच्छ वाटते पण तीच खरी भाषा आहे .तिचा योग्य वापरही लेखकाने केला आहे .लेखकाने शेवटच्या पानापर्यंत गूढ वातावरण कायम ठेवले आहे .

द सिक्सथ सेन्स

मला मेलेली माणसे दिसतात आणि बोलतात पण त्यांना माहीत नाहीय आपण मेलोय .तो नऊ वर्षाचा मुलगा समोरच्या मानसोपचारतज्ञाला सांगत होता .त्याची आई मुलाच्या विचित्र वागणुकीला आणि घरात घडणाऱ्या अतर्क्य गोष्टीला घाबरली होती. शेवटी तिने एका मानसोपचारतज्ञाची मदत घेतली.बघताबघता तो डॉक्टर त्या मुलात गुंतून गेला .त्या मुलाने त्यांना घेऊन काही मृत व्यक्तींच्या केसेस सोडविल्या . यात त्या डॉक्टरचे खाजगी आयुष्य ही संपुष्टात येण्याची चिन्ह दिसू लागली.पण शेवटी काय घडते .........?????
द सिक्सथ सेन्स नावाचा  एम. नाईट श्यामलन या भारतीय वंशाच्या दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट अतिशय गाजला. थेट ऑस्करपर्यंत या चित्रपटाने उडी मारली.या चित्रपटाचा शेवट अतिशय धक्कादायक होता . शेवटपर्यंत प्रेक्षकांनी या शेवटाची कल्पना केली नव्हती .

Thursday, June 21, 2018

अखेरचे क्षण

काल एका पोस्टमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी हिटलर आणि इव्हा ब्राऊनमध्ये शेवटच्या क्षणी काय बोलणे झाले असेल असा मुद्दा होता. त्यांचे माहीत नाही पण भारतात असे घडले असते तर काय बोलणे झाले असते ते मांडायचा प्रयत्न केलाय . जास्त विचार न करता वाचून आनंद घ्या आणि विसरून जा .
"मग तू तयार आहेस ना... ???  बंकरमध्ये प्रवेश करताच तो तिला म्हणाला.
"नाहीतर दुसरा पर्याय तुम्ही ठेवलाय कुठे .? ती त्याच्या डोळ्यात बघून बोलली.
"तस नाही ग राणी.....नकार दिलास तरी तुझ्या डोक्यात गोळी मारणारच आहे मी .पण विचारायची पद्धत असते"तो हसत म्हणाला .आता बघ ...त्या अण्णा खोताकडे  पोर नारळ काढू म्हणून विचारायला जातात पण त्या आधीच त्याचे पन्नास नारळ घरात चोरून ठेवलेले असतात"
"तुम्हाला  अश्या वेळी बरे असे  सुचते.. मी काय म्हणते.. थोडा वेळ थांबुया ...वाट बघू ..बाहेरचे जातील निघून..."ती म्हणाली .
"च्यायला ती काय मालवणकरची कुत्री आहेत काय...??आळशी नुसती .....फिरून निघून जायला.. सैनिक आहेत ते" तो चिडून म्हणाला.
"काय दिवस आलेत .. एके काळी राणी बनून राहिले होते. रोज चार पैठण्या नेसत होते. पापलेट...सुरमईशिवाय जेवत नव्हती. पण तुमच्या ह्या एक निर्णयामुळे सगळं पाण्यात गेले.. कशाला त्या लोकांच्या नादी लागलात.बर....तुमच्या नावावर त्या मेल्यानी इतके लोक मारले पण एक सोन्याचा दातपण तुम्हाला दाखविला नाही . किती दिवस नवी नथ करायची बोलत होती पण तुमचा लक्ष नाय माझ्याकडे".ती चरफडत बोलली.
" अगो बाय .....माझा माझ्याकडे तरी कुठे लक्ष आहे . आज पंधरा दिवस झाले . हा घातलेला धोतर बदलायला वेळ नाही.आज तर चार वेळा टॉयलेटमधून पळत आलो.."तो संतापून म्हणाला .
"पण मी काय म्हणते..??काय गरज होती तुम्हाला हे सर्व करायची ...??  इलेक्शन तर आरामात जिंकलात.ते तुमच्या विरुद्ध उभे राहिलेले चारजण कुठे गायब झाले ते कोणालाही कळले नाही आतापर्यंत. पण नंतर गावासाठी काय कमी केलात ....?? रवळनाथाचा मंदिर बांधलात. घराघरातून संडास बांधलात . आपल्या गावात आपण सुखी होतो. .कशाला त्यामाणसांना गावाबाहेर काढलात..बरे काढलात तर दुसऱ्या गावातली पण कशाला काढली....?? ती अजून चिडलेली होती .
"अग....त्या संडासानेच सगळा घोटाळा केला बघ... रात्रीचे कोण घराबाहेरच पडतच नाहीत आता. मग शत्रू घुसले ते कळलेच नाही मला ....तो म्हणाला .
"बर....आपल्यानंतर मागची इस्टेट सर्वाना समान वाटली आहे ना ....?? नाहीतर सर्व रवळनाथाला देऊन टाका.दहाव्या तेराव्याला भानगडी नको हो ....  सगळी भावकी जमा होईल .." तिला भावकीची काळजी.
" तू काय काळजी करू नकोस .... सर्व व्यवस्थित करून ठेवलाय मी .. तू मरायला तयार हो .."तो घाई करत म्हणाला.
"बर... बर..तसा माझा तुमच्यावर विश्वास आहे..तरी मला वाटते आपण आधी  लग्न केले  असते तर चार  सण तरी साजरे करता आले असते ...माहेरी जाऊन चार दिवस राहून आले असते .भावकीत तुमचे नाव सांगून भाव खाता आला असता.शेवटी सगळं स्वप्नात राहिले . नशीब मरायच्या आधी तरी लग्न केलात.पण मला गोळी घातल्यावर तुम्ही नक्की स्वतः ला गोळी मारणार ना...??नाहीतर जाल दुसरीच्या मागे .. तुम्हा पुरुषांचा काही भरोसा नाही.."शेवटी तिने मनातले बोलूनच टाकले .
त्याने हताश होऊन पिस्तुल खाली टाकले आणि कोपरापासून हात जोडले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Monday, June 18, 2018

विसावी वावटळ..... बाबूराव अर्नाळकर

विसावी वावटळ..... बाबूराव अर्नाळकर
मनोरमा प्रकाशन
आपला आवडीचा नायक झुंझार याच्या दोन कथा अर्नाळकर आपल्यासमोर घेऊन आले आहेत .हलक्या फुलक्या नर्म विनोदानी नटलेल्या ह्या कथा वाचताना आपण त्यात गुंतून जातो . झुंझार आणि आनंदराव यांची जुगलबंदी वाचताना खूप हसू येते आणि प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात .

Sunday, June 17, 2018

फादर्स डे

शेरखानला जबड्यात लुसलुशीत कोकरू घेऊन जाताना पाहून अंकल आश्चर्यचकित झाला." काय शेरू.... आज सकाळी सकाळी कुठे .....?? तेही स्वतः शिकार घेऊन ..... जबड्यातील शिकार खाली ठेवून मिश्या पुसत शेरखान हसला."अरे.... हे पोरांनी काहीतरी नवीन काढले बघ. सकाळपासून मागे लागलीत .आजोबांना शिकार घेऊन जा .आज  फादर्स डे आहे म्हणे .....आजोबांना विश करून या. च्यायला......मी पहिली शिकार केल्याबरोबर म्हातारा मला यापुढे तुझे तूच बघ म्हणून दुसरीकडे निघून गेला . पुढे मीच माझ्या कर्तृत्वावर मोठा झालो. आता म्हातारा झालाय पण मस्ती कमी नाही झालीय .म्हटले घरी चल तर ऐकत नाही . जमेल तशी शिकार करून जगतोय. आज पोर म्हणाली भेटून या.… काहीतरी गिफ्ट घेऊन जा म्हणून ही शिकार केली .चांगले कोवळे हरीण मारले आज...."
अंकल सोंड वर करून हसला" खरे आहे..... तुझा बाप खूप मानी .पण तुझ्यावर खूप प्रेम. तुझ्या जन्माच्या वेळी अस्वस्थ होऊन गुहेबाहेर फेऱ्या मारताना मी पाहिलंय त्याला .तर तुझ्या जन्माचा आनंद होऊन डरकाळ्यानी अख्खे जंगल दणाणून सोडले होते .त्या खुशीत त्याने  एकदम पाच हरणे मारली होती.. तू लहान असताना शिकार्यांनी गुहेवर हल्ला चढविला होता . तेव्हा लपून छपून तुम्हाला दूर घेऊन जाताना त्याच्या चेहऱ्यावरचे काळजीचे भाव कधीही विसरणार नाही मी .आयुष्यात प्रथमच घाबरलेले पाहिले मी त्याला . तुझ्याबद्दल त्याला नेहमी काळजी वाटायची . तू एक नंबरचा आळशी ..कसे होईल ह्याचे या जंगलात..... म्हणून सारखा माझ्याकडे येऊन काळजी करत बसायचा . किती तरी दिवस तुला शिकारीचे धडे देत होता . पण आयुष्यात पहिल्यांदा तू स्वतंत्र शिकार केलीस तेव्हा त्याला किती आनंद झाला ते मलाच माहितीय. त्या खुशीत त्याने त्या दिवशी एकही शिकार केली नाही . तीनजणाना तरी जीवदान दिले असेल . रात्री माझ्याकडे आला होता . आज मोठ्या जबाबदारीतून मोकळा झालो असे म्हणत मला पाच भले मोठे ऊस दिले आणि स्वतः छोटा ससा खाल्ला".
"मग तो निघून का गेला... ?? शेरखानने चिडून विचारले.
"हाच तर जंगलाचा कायदा आहे शेरू.....आपले पालक फक्त आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवतात मग पुढची जबाबदारी आपली. त्यांनी आपल्याला जन्म दिला आपल्याला मोठे केले. यापेक्षा अजून काय करावे ....?? अंकल त्याला समजावत म्हणाला.
"खरे आहे अंकल ...बरे झाले पोरांनी आठवण करून दिली .या फादर्स डे च्या निमित्ताने का होईना त्यांची आठवण झाली ..."असे म्हणून पुन्हा शिकार जबड्यात पकडली आणि चालू लागला .
नेहमीच्या तालात चालत असताना शेजारची हालचाल त्याच्या लक्षात आली नाही . अचानक समोरच्या झाडीतून दोन माणसे बंदूक घेऊन पुढे आली . आपल्या बेसावधपणामुळे आपण फसलो हे शेरखानच्या लक्षात आले पण आता उशीर झाला होता. त्याने पळण्यासाठी आजूबाजूला पाहिले .. शिकार्यांनी नेम धरला इतक्यात मागून ती ओळखीची डरकाळी त्याला ऐकू आली . आणि क्षणार्धात त्या म्हातारा वाघ  उंच उडी मारून त्यांच्या मध्ये उभा राहिला. दुसरा वाघ पाहून दोन्ही शिकारी हडबडून गेले . स्वतःला सावरत ते पळून गेले.
म्हातारा वाघ हळू हळू शेरखान जवळ चालत आला . बाबा ....म्हणून शेरखानने त्याला हाक मारली तितक्यात त्याचा एक पंजा वर आला आणि सणकून शेरखानच्या तोंडावर आपटला."अजूनही आळस अंगात आहेच तुझ्या.... कितीवेळा सांगितले सावधगिरीने चाल.राजालाही धोका असू शकतो .अरे ..बाप आहे मी तुझा .म्हणून लक्ष ठेवून आहे मी .पण दरवेळी हा बाप तुला वाचवायला येणार नाही. शेरखान निमूटपणे खाली मान घालून म्हणाला "हॅपी फादर्स डे बाबा ....."
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, June 15, 2018

करारनामा

विक्रमने मला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये बोलावले तेव्हा मला आश्चर्य वाटले.आता हा कसले रजिस्ट्रेशन करतोय ...??? त्याला विटनेस म्हणून नेहमी मीच हवा असतो. मनाशी अंदाज बांधतच मी तिथे पोचलो.मला बघताच नेहमीप्रमाणे त्याने चिडून किती उशीर ..?असा चेहरा केला आणि हात धरूनच त्या साहेबांच्या पुढ्यात घेऊन गेला . मुख्य म्हणजे त्याची दोन्ही मुलेही तिथे हजर होती .त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे छान चौकोनी कुटुंब आहे. दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत होती.त्यांनी सांगितलेल्या पेपरवर मी काही न बोलता सह्या केल्या. मुलांनीही सह्या केल्या.सगळे सोपस्कार पूर्ण होताच मुले मला बाय करून निघून गेली आणि आम्ही नेहमीप्रमाणे हॉटेल मध्ये घुसलो.
मनपसंद पदार्थांची ऑर्डर करून झाली आणि मी विक्रमला विचारले" कसल्या सह्या घेतल्यास बाबा ...."?
" तूला का काळजी .....?? तुझ्याकडचे काही घेत नाही मी …...नाहीतरी आहे काय तुझ्याकडे ...??असे बोलून मोठ्याने हसला.
"तरीही मला विचारायचा हक्क आहे ..." मी मोठ्याने ओरडलो.तसा तोही हसला आणि हात पुढे करून म्हणाला " दे टाळी ....!! ह्या हक्कासाठीच वीटनेस म्हणून तुझ्या सह्या घेतल्या.माझ्या दोन्ही अपत्यानी शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागल्यानंतर आम्हाला दरमहा ठराविक रक्कम द्यावी अशी कागदपत्रे बनवली मी " विक्रम शांतपणे म्हणाला .
"काय ....!! मी भान न राहवून ओरडलो . आजूबाजूची माणसे आमच्याकडे पाहू लागली "अरे वेड लागले का तुला....?? असे कोण पेपर्स बनवते का.... ?? मुले आहेत ती ..आयला संभाळणारच आणि त्याना मनासारखे शिक्षण देणे आपले कर्तव्य आहे....मी त्याला समजावले .
"मान्य.... पण आपली ऐपत नसताना त्यांना शिकवणे आणि नंतर त्याचा परतावा मागणे यात गैर काय ...??तो शांत होता.
"ते कसे....? मीही चिडूनच विचारले.
"हे बघ भाऊ ....मी आणि वनिता दोघेही जॉब करतो . वर्षाला दोघांची मिळून पंधरा लाखाची कमाई आहे . महिन्याला साधारण लाख रु घरात येतात . त्यात नवीन घराचे कर्ज ,लाईट बिल,टेलिफोन बिल,इंटरनेट बिल,केबलचा खर्च वेगळा .घरात किराणा माल,गाडीचे मेंटेनन्स,पेट्रोल ..हाही खर्च.उरलेल्या पैशात दोन्ही मुलांचे शिक्षण ,विविध गुंतवणुकीचे हप्ते आणि मेडिकल या सर्व गोष्टीत पैसे संपून जातात . हातात काहीच शिल्लक राहत नाही . येईल तितका पैसा कमीच पडतो.शिवाय दर चार महिन्यांनी काहीतरी खरेदी असतेच. त्यात कपडे ,शूज असतातच.अरे इथून पैसा येतो आणि तिथून जातो. आमच्यासाठी काहीच शिल्लक नाही. वयात आलो शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीला लागून घरची जबाबदारी घेतली . त्यानंतर लग्न केले आणि ताबडतोब वर्षात मुलगी झाली दोन वर्षांनी मुलगा झाला . मग त्यांच्या जबाबदारीत गुरफटलो. ते आता पर्यंत..... मुलांना जास्तीत जास्त उत्तम शिक्षण मिळावे हा अट्टाहास . मग चाळीतून या मोठ्या घरात आलो. गावी घर दुरुस्त केले .साला ...आता लक्षात येतेय आपण आपल्यासाठी काहीच केले नाही......दुसऱ्यांचा आनंद आपला मानत राहिलो. आई बाबा नेहमी कौतुक करतात .चार लोकांत अभिमानाने सांगतात माझ्याबद्दल.पण वनिताचे काय ?? तीही माझ्याबरोबर वाहवत गेली . तिची स्वप्ने काय ते विचारलेच नाही मी .ते कोणत्यातरी चित्रपटातील वाक्य आहे ना ....अरे आयुष्याच्या उत्तरार्धात कळले की आमचे एकमेकांवर प्रेम करणे राहून गेले".असे बोलून तो हसू लागला.
मी गंभीर झालो "नाही विकी...हे कारण नाही आहे . तू तसा विचार करणारा नाहीस ..खरे बोल .."मी थोडे हळुवारपणे विचारले.
तसा तो केविलवाणा हसला"साला ...खरा मित्र आहेस .बरोबर ओळखलेस तू. ऐक... मोठी मुलगी उच्च शिक्षणासाठी तीन वर्षे परदेशी जाण्याचे ठरविते आहे . तीन वर्षांचा साधारण पंचवीस लाख खर्च आहे . त्यानंतर छोटे चिरंजीव आहेतच तयार .त्याच्यासाठीही पंचवीस लाख धर.पुढील आठ वर्षात 50 लाख अधिक शिक्षणावर खर्च होणार .तोवर मी निवृत्तीजवळ येणार ...मग त्यानंतर आमचे काय ??? आमच्याकडे म्हातारपणासाठी काय राहील.??
"अरे ....मुले काय तुम्हाला वाऱ्यावर सोडून देणार का ...??उलट चांगले सुखात ठेवतील तुम्हाला ....?? मी सहज म्हटले.
" गॅरंटी देतोस का भाऊ... ?? त्याने तीक्ष्णपणे विचारले. मी काही न सुचून शांत बसलो."सरळ हिशोब आहे भाऊ. निवृत्तीनंतर हातात इतकी रक्कम येणार नाही की त्याच्या व्याजावर आम्ही दोघे जगू . मुलगी काय उद्या लग्न होऊन सासरी जाईल.मुलगा परदेशात गेला तर परत येईल की नाही ही शंका आणि कितीही झाले तरी त्या दोघांच्या जीवावर उर्वरित आयुष्य काढणे आम्हाला पसंत नाही.म्हणून त्यावर उपाय एकच . उच्च शिक्षणासाठी आम्ही तुमच्यावर केलेला खर्च आम्हाला परत करा . नोकरी लागताच दर महिन्याला ठराविक रक्कम आमच्या खात्यात जमा व्हायला हवी .तसेच दरवर्षी त्यात किमान दहा टक्के वाढ हवी .आम्ही त्यातून आमचा खर्च करू .आमचे आयुष्य जगू.."
मग त्यासाठी हे पेपर्स बनवायची काय गरज ?? दोन्ही मुले समजूतदार आहेत . न बोलता तुला पैसे देतील.."मी आत्मविश्वासाने सांगितले.
"भाऊ इथे भावनिक होऊ नकोस . आपण खूप अनुभव घेतले आहेत . पुढे कोण कसे वागेल हे आता सांगू शकत  नाही . त्यामुळे हे पेपर्स केलेले बरे . उद्या मुलाकडे भीक मागण्यापेक्षा हक्काचे पैसे मागणे केव्हाही चांगले . माझा सिंघनिया होऊ नये हीच माझी इच्छा.मी माझ्यापुरता विचार केलाय तू तुझा विचार कर ". असे बोलून समोरचा थंड झालेला चहा एका घोटात संपवून उठला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, June 13, 2018

अशी ही वट पौर्णिमा

खिडकीतून समोरच्या वडाची पूजा करणाऱ्या सुहासनीना ती लक्ष देऊन पाहत होती.या दिवशी ती घराबाहेर पडत नव्हती.आजूबाजूंच्या स्त्रियांच्या नजरा ती टाळू शकत नव्हती.तसा तिचा आणि त्याचा फारसा संबंधच नाही आला . एक तडजोड म्हणून ते लग्न होते........दोघांसाठी .
तेव्हा ती तारुण्याच्या मस्तीत होती .प्रेम करावे बघून असे म्हणत एकाच्या प्रेमात पडली मग वाहवत गेली आणि पाळी चुकल्यावर भानावर आली. अगदी हिंदी चित्रपट असल्याप्रमाणे . अर्थात त्याला समजल्यावर तो पळून गेला आणि तिला घरून शिव्या आणि मारहाण.... अबोर्शन करायला गेली तेव्हा तिथूनही नकार आला . हताश होऊन खाली असलेल्या हॉटेलमध्ये कॉफी प्यायला शिरली तेव्हा समोरच हा येऊन बसला. तिच्याकडे बघून हसताच एक तिरस्कारयुक्त नजर त्याच्याकडे टाकली . त्याने हसूनच ती परतावली. "स्वतःला सती सावित्री समजू नका हो .. कुठून आलात ते माहितीय मला..."तो छद्मीपणे म्हणाला . ती संतापून काही बोलणार तेव्हा त्याने हात उंचावून थांबविले."मला शिव्या देऊन तुमचा प्रॉब्लेम सुटणार असेल तर दिवसभर शिव्या घाला मला .."ती शांत बसली. खरेच पुढे पुढे खूप त्रास होणार मला मग ह्याला बोलून काय उपयोग..???
" माफ करा... पण तुमची अवस्था माहीत आहे मला . तो डॉक्टर माझा मित्र आहे . माझी एक ट्रीटमेंट चालू आहे त्यानिमित्ताने मी याच्याशी चर्चा करायला येतो . आज तुम्हाला पाहिले .आवडला तुम्ही मला . तुमची केस फारच पुढे गेलीय ते कळले मला . यावर उपाय काय तुमच्याकडे ...??? आत्महत्या की कुमारी माता..? बरे माता झाल्यावर पुढे काय.. ?? नोकरी आहे का ??? घर आहे का ..?? की आजचा दिवस माझा या तत्वाने जगणार ..."आता तिलाही त्याचे बोलणे हवेहवेसे वाटू लागले . खरेच पुढे काय ते तिला माहीत नव्हते . आत्महत्या करायची तिच्यात हिम्मत नव्हती . घरातून या जन्मात तरी माफ करणार नव्हतेच .
"मग तुम्ही लग्न करणार का माझ्याशी...?? तिने तिरकसपणे विचारले.
" का नाही ..?? तुमची इच्छा असेल तर नक्की .." तोही त्याच टोनमध्ये बोलला . तिचा रागाने फुललेला चेहरा पाहून त्याने परत हात वर केले. "एक डील करू ...विचार करा ... मला  कॅन्सर आहे . काही वर्षाचाच सोबती आहे मी . चांगली नोकरी आहे पण या आजारामुळे कोणीही माझ्याशी लग्न करायला तयार नाही . कोण करेल  माझ्याशी लग्न .... ??? तुम्ही माझ्याशी लग्न कराल..."?.त्याचा गोळीसारखा प्रश्न अंगावर येताच ती हादरली .
"काहीतरीच काय .....?? ती उत्तरली.
" का..... ? मी चांगला शिकलेला आहे. चांगली नोकरी आहे . मुख्य म्हणजे माझ्याशी लग्न करून तुम्हाला घर मिळेल.होणाऱ्या बाळाला नाव मिळेल आणि माझ्या मृत्यूनंतर तुम्हाला नोकरीही मिळेल" त्याने सहजपणे सांगितले.
" हा सर्व माझा फायदा झाला ..पण त्यातून तुला काय मिळेल....?? माझ्यावर हे उपकार का .."?? तिने नजर रोखुन विचारले.
" च्यायला..... वाटलेच हे प्रश्न येणार ....हे बघ.. मी मरणारच आहे हे नक्की . मग मरणापूर्वी संसारातील सुख उपभोगून का जाऊ नये ...?? माझाही संसार असावा ,तडजोड करून संसार करणारी बायको असावी असे का वाटू नये मला ..?? पण कोणतरी अडचणीत असणारीच माझ्याशी लग्न करेल. मी अश्याच मुलीच्या शोधात होतो. तुझा फॉर्म चोरून वाचला..मुलाला जन्म देण्याखेरीज तुझ्याकडे पर्याय नाही .म्हणूनच मी विचारले तुला.नवरा बायको म्हणून नाही तर मित्र म्हणून राहू . तुझ्या बाळाला नाव ,तुला स्थर्य , मला संसार मिळेल .बघू किती वर्षे टिकतो ते..."असे बोलून त्याने हात पुढे केला . तिने क्षणभर विचार करून त्याच्या हाती हात दिला .
त्यांचे लग्न दोन्हीकडे पचनी पडले नाही . पण त्याची कल्पना असल्यामुळे  त्याने आधीच  दुसरी रूम घेऊन ठेवली होती . त्यामुळे फारसा त्रास झालाच नाही . मग काही महिन्यांनी सोनूलीचा जन्म झाला . आपलीच मुलगी असल्यासारखा त्याने  सगळीकडे बर्फी वाटून आनंद साजरा केला . त्यानंतर ती त्याच्या जवळ कधी गेली हे तिलाच कळले नाही . दोन वर्षांनी त्याच्या आजाराच्या खुणा शरीरावर दिसू लागल्या तेव्हा ती हादरली . सत्य माहीत असूनही ते स्वीकारणे जड गेले तिला .पण आता तिची पाळी होती . कंबर कसून तिने त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली .शेवटी सहा महिन्यातच तो गेला .पण शब्द दिल्याप्रमाणे आपली नोकरी आणि घर तिला देऊन गेला . तो जिवंत असे पर्यंत तिला कधी वट पौर्णिमेचे व्रत करायची गरज भासली नव्हती पण आता वाटू लागले की हाच पती पुढच्या सात जन्मी का लाभू नये ...??
ती उठली मनाशी काहीतरी ठाम निर्णय घेऊन समोरील वडाच्या दिशेने निघाली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर