Wednesday, July 31, 2019

पाण्याची भीक

पाण्याची भीक
दरवर्षीप्रमाणे यंदाही गटारी आली. पण यावेळी विक्रम रिकाम्या हाताने घरात शिरताना पाहून मी चक्रावलो. तसेही सदा..बंड्या..आशु..अजून आले नव्हते.
नेहमीप्रमाणे विक्रमवर सामान आणायची जबाबदारी होती.पण त्याचे रिकामे हात पाहून मी घाबरलो.च्यायला.....!! झालेला पगार संपत आला होता.त्यामुळे सौ हात वर करणार हे नक्की.. विक्रमही दरवर्षी विदेशी माल घेऊन यायचा त्यामुळे त्याची सवय लागलीच होती.
"अरे विकी हे काय ...?? तू रिकामाच ..."??  मी काळजीने विचारले.तसा आतून छद्मीपणे हसण्याचा आवाज ऐकू आला आणि सौ बाहेर येऊन म्हणाली "आहो आम्ही बाहेर जातोय जेवायला. तुमचे तुम्ही बघून घ्या. घरात काही बनवले नाही."मी हताशपणे विक्रमकडे पाहिले.तसे त्यानेही होकारार्थी मान डोलावली.
"खरे आहे भाऊ ....वहिनी ..वनिता आणि इतर बायका आज गटारीसाठी बाहेर चालल्या आहेत . वनिताने मला हेच कारण सांगितले. तुला माहितीय मी तिच्यासमोर काही बोलत नाही .मला वाटले तूच काही रस्ता काढशील वहिनीला समजावशील.." विक्रम हसत म्हणाला.
"अरे हिला मी समजावणार....?? असे म्हणून विक्रमला हात जोडले .
"काळजी करू नकोस ..शेट्टीला फोन करून एक टेबल बुक केलंय.चल निघू .." मग आम्ही दोघे शेट्टीच्या नटरंग कडे निघालो.
आज गटारी असल्यामुळे नटरंग फुल होता. पण आमचे टेबल खाली होते . थोड्यावेळाने सर्व गॅंग जमा झाली . वेटरने प्राथमिक भाग म्हणून सर्वाच्या पुढ्यात पाण्याचे ग्लास ठेवले." अरे पाणी थोडेच प्यायला आलोय इथे...?? तरीही तुझा मान ठेवतो बाबा.." असे म्हणत सदाने ग्लास तोंडाला लावून दोन घोट पाणी प्यायला. प्रत्येकाने मग त्याचेच अनुसरण केले .ऑर्डर घेऊन वेटर निघाला तितक्यात एक तरुण मुलगा आमच्यापाशी आला."साहेब ... माझ्याकडे बघून त्याने आवाज दिला"आता हे पाणी तुम्ही पिणार नाही ना ...."?? टेबलावरील पाण्याच्या ग्लासकडे बोट दाखवून त्याने विचारले ."नाही ..."मी तुटक आवाजात म्हणालो . त्याने ताबडतोब त्या सहा ग्लासातील पाणी एका रिकाम्या बाटलीत जमा केले . ती बाटली भरताच तो लगबगीने बाहेर पडला आणि दुसरी रिकामी बाटली घेऊन आला ."धन्यवाद साहेब ..असे बोलून तो दुसऱ्या  नुकत्याच रिकाम्या होणाऱ्या एका टेबलकडे वळला . तिकडचा गिऱ्हाईक नुकताच बिल देऊन उठत होता . त्याच्या टेबलवर अर्धी भरलेली बिसलरीची बाटली होती . त्याने पुन्हा नम्रपणे ही बाटली घेऊ का असा प्रश्न त्याला विचारला . गिऱ्हाईक फुल तट्टू होते त्यामुळे त्याने एखाद्याला फार मोठे इनाम देतोय अश्या प्रकारे ती बाटली त्याला दिली उलट पाठीवर हात मारून शाबासकी ही दिली.
आमची ऑर्डर आली तसे आम्ही सुरू झालो . बंड्याला नेहमी बिसलरी लागते त्यामुळे बिसलरीचा ओघ आमच्या टेबलवर सुरू झाला . मध्येच आमचे त्या तरुणांकडे लक्ष जायचे .आता त्या तरुणांच्या जोडीला दुसरा तरुण आला.दोघेही सर्व टेबलवर जाऊन ग्लासातील उरलेले पाणी बाटलीत  जमा करत होते.दोन तासात आमचे आटपले आणि आमच्या टेबलवर अर्धी बाटली बिसरली शिल्लक राहिली. आमचे आटपतेय पाहून तोच तरुण पुढे आला तसे विक्रमने काही न बोलता त्याच्या हातात बाटली दिली. तो वळतात मी म्हणालो" मित्रा... पाच मिनिटे देशील का आम्हाला .... ?? तसा तो हसला" का नाही साहेब.....?? मी त्याला समोर बसविले." काही घेणार का.... ??? विक्रमने अंगठा ओठाजवळ नेऊन खूण केली."नाही हो ....मी घेत नाही.." तो हसून म्हणाला."च्यायला....!! तीन तास बारमध्ये राहून दारूला स्पर्श नाही ...?? ग्रेट आहेस . बंड्या हसून म्हणाला . हे तू काय करतोस ...? हातातील बाटलीकडे बोट दाखवीत मी विचारले "मी भीक मागतोय ..... पाण्याची .. तो हसून म्हणाला . पण डोळ्यातील वेदना काही लपली नाही "तुमच्याकडे शिल्लक राहिलेले अन्न तुम्ही भिकार्यांना देता तसेच आम्ही तुमच्याकडील उरलेल्या शिल्लक राहिलेल्या पाण्याची भीक मागतो"
"मित्रा ..सर्व काही नीट समजावून सांग"  विक्रम सहज स्वरात म्हणाला .
"मुंबईत सर्व समस्यांवर पर्याय मिळतो असे म्हणतात  ही तुम्हाला कधीच उपाशी ठेवत नाही . म्हणून आम्ही गावातून काही तरुण मुंबईत आलो .आता इथे आमच्या मेहनती आणि शिक्षणानुसार पैसे कमावतो . पण आमच्या गावात भीषण दुष्काळ आहे. शासनानेही आमचा जिल्हा आणि गाव गंभीर दुष्काळ म्हणून जाहीर केला आहे .आमच्या घरातील सर्वाना रोज प्रत्येकी किमान एक भांडे पाणी आणावे लागते मग तो लहान असो की मोठा . आज माझी आई बहीण.. लहान भाऊ ..बाबा सकाळी उठून डोक्यावर कळशी घेऊन पाणी आणतात .आता ते कसे आणतात..?? त्यासाठी किती कष्ट पडतात ..??ते विचारू नका . प्रत्येकाला व्हाट्स अप फेसबुक मार्फत डोक्यावरून पाणी आणणाऱ्यांचे फोटो येतच असतात.त्यात एखादा फोटो आमच्या कुटुंबातील व्यक्तीचाही असू शकतो. पण मग इथे राहून आम्ही काय करतो ..?? आम्ही पैसे पाठवितो. पण त्याने पाणी विकत घेता येत नाही .आहो पाणीच नाही तर विकणार काय ...?? एखादं दुसरा टँकर ग्रामपंचायत आणते .पण तो किती जणांना पुरणार ..??  प्रत्येक माणसाने दिवसा किमान तीन लिटर पाणी प्यावे असे मी ऐकले आहे . पण आमच्याकडे एक लिटरच पाणी प्रत्येकजण पीत असेल.शेतीचा आणि गुरांचा आम्ही विचारच सोडून दिला आहे .."असे बोलून त्याने कोणाच्या लक्षात न येईल अशा प्रकारे डोळे पुसले .
"मुंबई प्रत्येकाला खूप काही देते.फक्त ते कसे घ्यायचे याची अक्कल हवी.इथे पाणी वाचवा अशी बोंब मारणारा दिवसातून दोनवेळा शॉवर घेतो . तर  मी बिसलरीशिवाय पीत नाही असे बोलणारा अर्धी बाटली फेकून देतो तेव्हा जीव तुटतो. इथे वडील ..मुलगा ..आई एकमेकांच्या उष्ट्याचे पाणी प्यायला आवडत नाही म्हणून सेपरेट बाटली घेतात. तर काळोखी गल्लीत तोंडात तोंड घालणारी  प्रेमी युगल मला तुझ्या उष्ट्याचे पाणी नको असे बोलत स्वतःच्या बाटलीतले पाणी पितात.ते पाहून आम्ही ठरविले हे पाणी गोळा करायचे . बिसलरीचे पंचवीस  लिटरचे कॅन गोळा केले आम्ही . रोज कामावरून सुटल्यावर आम्ही आमच्या विभागातील बार ,रेल्वे स्टेशन ,एस टी डेपोत फिरतो.लोकांनी फेकलेल्या अर्धवट भरलेल्या पाण्याच्या बाटल्या गोळा करतो .लोकलमध्ये प्रवास करताना कोण पाण्याची अर्धी बाटली तशीच ठेवून जातो.ती जमा करतो .हे सर्व पाणी त्या मोठ्या बाटलीत गोळा केले जाते . आणि त्या बाटल्या आम्ही आमच्या गावी जाणाऱ्या ट्रेन ,एसटी ,प्रायव्हेट बसेस यातून पाठवतो .."तो हसत म्हणाला
"त्याने कितीसा फरक पडणार ..."?? सदाचा प्रश्न
"ते माहीत नाही पण आमच्या कुटुंबियांना पाणी मिळते हे महत्वाचे .त्यांच्या पाणी मिळविण्याच्या कष्टात आमचाही सहभाग आहे हेच आमच्यासाठी महत्वाचे आहे . आहो काही नसण्यापेक्षा हे बरे नाही का ...?? आमचे नातेवाईक सकाळी बस स्टॅण्ड ,रेल्वे स्टेशनवर जातात आणि पाण्याच्या बाटल्या ताब्यात घेतात .  कमीत कमी पन्नास ते शंभर लिटर पाणी गावात रोज पोचते . ते तीन ते चार कुटुंबाला पिण्यासाठी पुरते ..त्यातच आनंद आहे . राहता राहिला प्रश्न ट्रान्स्पोर्टचा ..आहो प्रत्येकाला आपल्याकडून काहीतरी समाजकार्य ..कोणाला तरी मदत करावी ..असे नेहमीच वाटत असते .रेल्वेचा गार्ड ड्रायव्हर...एसटी.. प्रायव्हेट गाडीचे ड्रायव्हर हे आम्हाला मदत करायला तत्पर असतात.त्यांनाही आमच्या जिल्ह्यातील दुष्काळाची  कल्पना आहे . रोजचा प्रवास असतो त्यांचा .  पंचवीसलिटरच्या दोन बाटल्या घेऊन जायला त्यांची काहीच हरकत नसते . त्यांना काहीच त्रास नसतो .एका कोपऱ्यात ह्या बाटल्या उभ्या असतात .."हे सर्व सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम होते .
"पण अशी पाण्याची भीक मागताना तुम्हाला खूप त्रास होत असेल ...."?? बंड्याने विचारले
"नाही हो .. मुंबईत पाणी नुसते वाहते आहे . जिथे जाल तिथे पाणी आहे .फक्त तुमची जमा करण्याची तयारी हवी . आता या बारच्या टॉयलेटमध्ये जा तुम्ही .. हात पुढे केला की पाणी सुरू ...?? तुम्ही हात धुता तोपर्यंत पाणी सुरू किती छान आयडिया पण तुमचे हात धुवून झाले तरी पाणी काहीवेळ सुरूच असते ,त्याचा फोर्स ही मोठा असतो . एकदा मी सहज चेक केले तर अर्धी बाटली भरली म्हणजे जवळजवळ पाचशे मिली  पाणी फुकट जात होते . अर्ध्या तासात आठ जण टॉयलेट ला गेले म्हणजे चार लिटर पाणी फुकट गेले ...त्याने हिशोब सांगितला .
"ह्या....!! इतका हिशोब कोण करतोय ..??आशु मध्येच टपकला.
"बरोबर आहे ..ज्यांना मिळते ते करीत नाहीत. एक वृद्ध माणूस घरोघरी जाऊन एक एक थेंब गळत असलेला नळ दुरुस्त करतो त्याचा हिशोब तुम्ही ठेवता आणि त्याचे कौतुक करता पण आम्ही असे केले की हिशोब कोण ठेवतो असेही म्हणता . लग्नात किंवा एखाद्या सेमिनारमध्ये पाण्याच्या छोट्या बाटल्या किंवा सील कप देतात . पण त्यात रिकामे कप ..रिकाम्या बॉटल किती..?? याचा हिशोब कोणी ठेवतो का ..?? एकदा त्या कॅटरर्सला विचारा तो सांगेल किती पाणी वाया जाते ते . ते सोडून द्या . उद्यापासून तुम्हीच घरातील किती जण पाणी कसे वापरतात किती फुकट घालवततात यावकडे लक्ष द्या . जास्त नाही दोन दिवसाचा सर्व्हे करा .तुम्हालाच कळेल आपण किती पाणी वाया घालवतोय . आम्ही तुमच्या हक्काचे पाणी मागत नाही तर जे वाया घालावीता आहात ते पाणी मागतोय . एकही पैसा खर्च न करता आम्ही गावाला चांगले पाणी देतोय याचा आनंद आहे आम्हाला ." असे बोलून हात जोडून तो  उठला.
बिल देताना शेट्टीला विक्रमने सहजपणे त्या युवकांबद्दल  विचारले .. जाने दो ना विकीभाई पागल लडके है वो... बोलते है हमे पानी की भीक चाहीये . यहा वेस्ट जानेवाला पानी हमे दे दो .. मेरा क्या जाता है .  लेके जाव ,वैसेही मै फेकही देने वाला हूं ..
मी आणि विक्रमने कीव भरल्या नजरेने एकमेकांकडे आणि शेट्टीकडे पाहिले आणि एक नवीन धडा शिकून बारबाहेर पडलो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
      दादर मुंबई
8286837133

Monday, July 29, 2019

तू प्रेरणादायी

आजच्या खास दिनी
शुभेच्छा देतो आदराने
स्वीकार त्याचा करशील तू
आईच्या काळजाने

          आलीस तू इथवर
          ध्येयाच्या साथीने
          कधी घडत कधी धडपडत
          सावरलीस जिद्दीने

दररोज होती कसरत
चालत नव्हते बहाणे
जबाबदारीच्या जाणिवांनी
ममतेचे मुक रडणे

         नव्हते सारे सहज सोपे
         समोर उभी आव्हाने
         सांग कसे जमवलेस तू?
         कठीण समयास हाताळणे

  उपासक तू सरस्वतीची
  गुरू माऊली मानाने
  घर असो व असो शाळा
  मुले झळकली संस्काराने

पखरण केली मायेची
प्रत्येक तुझ्या रूपाने
हृदयातून या अमृत झरते
चिमण्यांच्या स्पर्शाने

        आयुष्याच्या या वळणावर
        उभी तू आज समाधाने
        आरोग्यसंपदा तुज लाभो
        तुझ्या कुटुंबाचे हेच मागणे

   © सौ. सलोनी किरण बोरकर

Sunday, July 28, 2019

दोस्ती बडी चीज है

दोन वर्षांनी होणाऱ्या गेटटूगेदरला दुसरी प्राथमिकता देऊन  मेसेजला उत्तर न देणारे मित्र.....
तर पंचवीस वर्षांनी बरेचसे मित्र उद्या भेटणार या आनंदात रात्री उशिरापर्यंत जागा राहून  भेटीची वेगवेगळी स्वप्न बघणारा मित्र....
भर पावसात पुणे मुंबई धोकादायक प्रवास करून ठरविलेल्या स्पॉटवर आल्यावर मित्रांनी स्पॉट बदलला आहे हे कळून तितक्याच उत्साहात नवीन स्पॉटवर येणारा मित्र....
तर सर्व मेसेजेस वाचून अचानक मी येतोय सांगणारा मित्र......
फक्त मित्र भेटणार म्हणून नुसता येऊन बसणार सहज म्हणून मध्येच चकण्याचा तुकडा तोंडात टाकणारा पाण्याचा ग्लास घेऊन बसणारा तरीही समान काँत्रीबुशन देणारा मित्र......
परदेशात राहून आमच्या गेटटूगेदर वर लक्ष ठेवणारे. फोटो पाठविल्यावर खुश होणारे मित्र......
तीन आठवडे आधी सांगूनही डेट ऍडजस्ट न करणारे मित्र....
एकत्र गेट टू गेदर करण्याच्या पोस्टशी आपला काही ही संबंध नाही असे दर्शविणारे मित्र....
आपापल्या उद्योगधंद्यात बिझी असणारे मित्र....
गेटटू गेदर अटेंड कसं करावं ह्या द्विधा मनस्थितीत  असणारे मित्र.....
अचानक काहीतरी इमर्जन्सी काम येऊन सुद्धा आठवणीने तसा मेसेज देणारे मित्र ......
काहीही बोला हो.... पण शेवटी दोस्ती बडी चीज है .... हॅट्स ऑफ मित्रानो ....

© श्री. किरण कृष्णा बोरकर

डेडली गेम ...... विजय देवधर

डेडली गेम ...... विजय देवधर
नावीन्य प्रकाशन
एक सरळ नेहमीची खून कथा.परदेशी कथानक देवधरानी भारतीय स्वरूपात मांडले आहे .सुधाकर हा विमा एजंट . तो सरळमार्गी नाही . त्याला अनेक व्यसन आहेत त्यामुळे तो कर्जबाजारी आहे . नेहमी पैश्याची तंगी असते त्याला . त्यातच मंदाकिनी नावाची सुंदर स्त्री आपल्या दागिन्यांचा विमा काढायचे आहे असे सांगून त्याला घरी बोलावते आणि आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी होते. तिच्या प्रेमाखातर तो तिच्या नवऱ्याची पॉलिसी उतरवून त्याचा खूनही करायचे ठरवितात . त्याप्रमाणे सुधाकर खुनाचा प्लॅनही करतो आणि अंमलातही आणतो . पण विमा कंपनी त्याचा क्लेम पास करेल का...?? जेके नावाचा अतिशय हुशार अधिकारी विमा कंपनीकडे आहे . खोट्या क्लेमचा त्याला पटकन वास येतो . तो या केसच्या मुळाशी जायचे ठरवितो . त्यासाठी तो मंदाकिनीचा भूतकाळ उरकून काढतो त्यात त्याला अनेक धक्कादायक गोष्टी कळतात . मंदाकिनी आणि सुधाकर पॉलिसीचे पैसे मिळविण्यात  यशस्वी होतात का .... ?? त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे .

Friday, July 26, 2019

सेवन सामुराई

सेवन सामुराई
जगप्रसिद्ध जपानी दिग्दर्शक  अकिरा कुरोसोवा यांचा 1954 सालातला जगप्रसिद्ध चित्रपट.
कुरोसोवाचे नाव जगातील सर्वोत्तम दिग्दर्शकात आजही घेतले जाते .त्यांचा रोशोमन हा चित्रपट जागतिक चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड समजला जातो . तर सेवन सामुराई हा चित्रपटही त्या उंचीवर जातो .
दरोडेखोरांपासून गावाचे रक्षण करण्यासाठी गरीब गावकरी बाहेरून योध्ये आणायचे ठरवितात .त्यांना द्यायला पैसे नाहीत म्हणून भुकेलेले ,गरीब सात सामुराई यासाठी निवडले जातात . पहिल्यांदा गावातून त्यांना विरोध होतो पण नंतर त्यांच्यात एक अतूट बंधन तयार होते . ते गावकऱ्यांना प्रशिक्षण देतात आणि गावकाऱ्यांसह दरोडेखोरांशी लढा देतात .सुमारे साडेतीन तासांचा हा ब्लॅक अँड व्हाइट चित्रपट सलग पाहायला कंटाळा येतो. पण एकदा का लय पकडली की आवडीने पहावासा वाटतो .
भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपट शोले हा सेवन सामुराईवरूनच बेतला आहे .इतकेच नव्हे तर याच थीमवर आधारित खोटे सिक्के ,चायना गेट. तर इंग्रजीत मॅग्नीफिशट सेवन ही याच चित्रपटवरून बेतले आहेत.
© श्री. किरण बोरकर

तिचे काय चुकतेय ....??

तिचे काय चुकतेय ....??

सिंड्रेलाच्या रिंगटोनने वाजणाऱ्या मोबाइलकडे ती धडधडत्या अंतःकरणाने पाहत होती . मोबाइलवर स्पष्टपणे दिसत होते फोन कोणाचा आहे. तिला फोन करणारी व्यक्ती माहीत होती म्हणून फोन उचलायची हिम्मत होत नव्हती . तरीही शेवटी नाईलाजाने फोन उचलला आणि तो परिचित आवाज तिच्या कानात शिरला.
"आहेस का अजून तू ...?? माझ्या नवऱ्याला नादी लावू नकोस नाहीतर भर रस्त्यात धिंड काढीन तुझी ..?? तुला माझाच नवरा मिळाला का या जगात फिरवायला ...."?? बापरे काय ही भाषा ... ती शहारली.
"आहो पण ......असे  बोलेपर्यंत फोन कट झाला . ती हताशपणे सोफ्यावर मान टेकवून बसली . हळू हळू तिचे मन भूतकाळात गेले.
ती एका सुखवस्तू घरातून लग्न होऊन आलेली . दिसायला सुंदर  आणि उच्च शिक्षणामुळे चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसायची . साहित्याची आणि कालाक्षेत्राची आवड.त्यानुसार नवराही उत्तम मिळाला होता . तो ही उच्चशिक्षित ,मोठ्या कंपनीत उच्च पदावर कामाला..देखणा... लग्नानंतर काही वर्षे छान गेली .  त्याचे काम जोरात सुरू होते.अधेमधे परदेशवारी ही व्हायची . तर ती घरच्या जबाबदारीत रमली.दिवस कसे गेले ते कळलेच नाहीत.हळू हळू मुले मोठी झालीत. सासू सासरे वर गेले.तर नवऱ्याचे परदेश दौरे वाढले. जबाबदारी अशी कोणतीच राहिली नव्हती. उलट मुलेच बोलू लागली तू तुझे बघ आता . हल्ली तिचा बराचसा वेळ रिकामाच जात होता . मोबाईलवर खेळ, मैत्रिणीशी चॅटिंग कितीवेळ करणार...???
त्यातच तिला तो भेटला . फेसबुकवर कोणाचातरी मित्र होता त्यावरून हिला रिक्वेस्ट आली आणि हिनेही सहज स्वीकारली . मेसेंजरवरून बोलता बोलता फोन नंबर कधी एक्सचेंज झाले हे कळलेच नाही . तो तिच्यासाठी कधीही अव्हेलेबल होता. मुंबईत नोकरी करत होता .इथे एकटाच राहत होता.बाकी कुटुंब गावाला होते . शनिवार रविवार गावी जात होता .बाकीच्या वेळी रिकामाच होता. घराची जबाबदारी अशी काही नव्हतीच . नोकरी आणि तो.व्हाट्स अपचे चाट हळू हळू वाढत गेले .त्याचे बोलणे तिला आवडू लागले . मुख्य म्हणजे तिला पाहिजे तेव्हा तो तिच्यासाठी हजर होता . मग सहज एकदा कॉफी प्यायला एकत्र भेटले.त्याचे  पुढे पुढे करणे तिला आवडत होते . न कळत आपल्या नवऱ्याच्या स्वभावाशी त्याची तुलना होऊ लागली . तिचा प्रत्येक शब्द झेलायला तो तयार होता . एकदा सहजच म्हणाली मला अमीरखान चे चित्रपट आवडतात तेव्हा आठवणीने तिला त्याच्या नवीन चित्रपटाच्या तिकीट्स घेऊन आला. पहिल्यांदाच एका परपुरषासोबत चित्रपट पाहताना ती थरारून गेली . हे काही चांगले नाही असे एक मन सांगत होते तर दुसरे काय हरकत आहे ?? आनंद तर मिळतोय ना ??? असे समजावत होते . तिच्या वाढदिवसाला आठवणीने रात्री बारा वाजता फोन केला आणि तिच्या आवडीचा परफ्यूम गिफ्ट दिला . किती काळजी आहे याला माझी ..?? हळू हळू ती त्याच्यात गुंतत गेली .
त्याचीही अवस्था तशीच होती. दोन दिवस फक्त कुटुंबाचा सहवास त्याला लाभायचा.त्यातही घरात शिरला की बायको अडचणींचा पाढा वाचायची . अडलेली कामे पूर्ण करताना दिवस कसे संपायचे तेच कळायचे नाही. एक दिवस सहजच तिचा फोटो पाहून रिक्वेस्ट पाठवली आणि तिने स्वीकारली . मग हळू हळू चॅटिंग सुरू केले . ती बराच वेळ ऑनलाईन असायची . त्याच्याकडे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या .त्यामुळे तिच्या प्रत्येक प्रश्नाचे आणि प्रॉब्लेमचे उत्तर होते. हळू हळू गोष्टी कॉफी आणि चित्रपटांपर्यंत गेल्या. स्त्रिया खूप लवकर गुंततात हे त्याला पटू लागले . खरेच खूप छान चालू होते त्यांचे . पण अश्या गोष्टी फार काळ लपून राहणार नाहीत .
हल्ली त्याच्या बायकोला काही काही गोष्टी खटकू लागल्या होत्या. त्याचे मोबाईलवर कुजबुजत बोलणे . सतत चॅटिंग . रात्री फारसा जवळही येत नव्हता . स्त्रियांना म्हणे सिक्स सेंथ असतो .तिने भावाची मदत घेतली आणि काही दिवसातच सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या. नवऱ्याला बोलून काही उपयोग नाही . तो दूर झाला तर आपलेच नुकसान इतके ओळखण्याइतपात चाणाक्ष होती ती . तिने तिचा फोन नंबर मिळवला आणि ठरावीक दिवसाच्या अंतराने तिला धमकीचे फोन करू लागली .
त्याच्या बायकोचा फोन यायला सुरुवात झाल्यापासून तिचे आयुष्यच बदलून गेले . तिला तो हवाय त्याची मैत्री हवीय . पण तितकाच नवरा ही प्रिय आहे .त्यालाही ती हवीय पण बायकोशी सामना करण्याची त्यांची हिम्मत नाही . आता तो तिला टाळू लागलाय . तिचे आयुष्य मात्र वादळात सापडलंय.काय उपाय आहे तिच्याकडे यावर ....???

Thursday, July 25, 2019

माझ्यासाठी मी

माझ्यासाठी मी

वाटेवरी अंगार हा
तरी कोमल कळी मी
तडफडे तनमन
परि सांभाळे मज मी
   वेदनेचे मूळ माझ्या
   शोधलेही माझेच मी
   वेदनाच आता शोधे
   अशी भिने तिच्यात मी
आहे जे अटळ ते ते
अंतरीच ताडले मी
ओलांडता वय वर्षे
अनुभव जपले मी
   आशा निराशा झुलती
   झुलवते त्यांनाच मी
   सुखासीन आयुष्याचा
   ध्यास घेते सत्यात मी
जुळवून सारे घेत
सहजच जगले मी
मागितले एक दान
मजसाठी मलाच मी
                
       सौ.सलोनी बोरकर

प्रवास

आयुष्याचा खडतर प्रवास
सुसह्य करताना
शब्द शब्द शोधत राहिले
कळलेच ना परि ते
केव्हा कसे पसार झाले
क्षणांचे ओरखडे असे काही खोल झाले
हृदय ही धडकताना ऑफ बीट होऊ लागले
दिवस ढळता ढळता
नवे धडे मिळू मिळू लागले
हरता हरता जिंकण्यातले
मर्म तेवढे कळू लागले
अपेक्षांचे ओझे पेलताना
स्व इच्छेची माती झाली
कामधेनू होता होता
स्वतः मात्र तुषार्त राहिली
अशावेळी यावे

Sunday, July 21, 2019

साहसी सागरकन्या...... विजय देवधर

साहसी सागरकन्या...... विजय देवधर
नावीन्य प्रकाशन
ग्लेडा आपल्या नवऱ्याबरोबर फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरून मेक्सिकोच्या खाडीत समुद्रस्नानासाठी निघाली होती.समुद्रात उतरून मासेमारी करताना ती आत ओढली गेली .आणि खुल्या समुद्रात आली.आता ती त्या खुल्या समुद्रात एकटीच आहे . तिला मदत कशी मिळेल ....???
फ्रेडी अठरा महिन्याचा सिहाचा छावा होता.त्याचे आपल्या मालकावर टोनीवर खूप प्रेम होते . टोनी हा केनियातील कोरा कॅम्प या सिहाच्या पुनर्वसन केंद्रात काम करीत होता .त्या दिवशी फ्रेडीशी खेळत असताना अचानक पूर्ण वाढ झालेल्या सिहाने त्याच्यावर उडी घेतली .आपल्या जबड्यात टोनीला पकडून त्याचे चावे घेऊ लागला ,पंजाने ओरबाडू लागला . त्यावेळी त्या छोट्या फ्रेडीने मोठ्या सिंहांशी लढा दिला . पण तो टोनीला वाचवू शकला का ...??
मध्यप्रदेशातील एका छोट्या खेड्यात ब्रिटिशांची लष्करी छावणी होती .नवीन आलेला छावणी प्रमुख जॉन बेकरने सर्व सैनिकांच्या परंपरागत चालत आलेल्या भडक रंगीत बेडशीट आणि ब्लॅंकेट्स बदलून लष्कराच्या पांढऱ्या बेडशीट  ब्लॅंकेट्स वापरायची ऑर्डर दिली . अर्थात बरेच सैनिक नाराज झाले . दुसऱ्या दिवशी सकाळी जॉनच्या तंबूत सगळीकडे लाल काळ्या मुंग्या दिसून आल्या . त्या मुंग्यां सगळ्या जमिनीवर,त्याच्या बुटात,पेटीवर पसरल्या होत्या . रोज त्या मुंग्या मारल्या तरी दर दिवशी त्यापेक्षा जास्त मुंग्या जमा होत होत्या . शेवटी कंटाळून त्याने पारंपारिक बेडशीट आणि ब्लॅंकेट्स वापरायला परवानगी दिली आणि मुंग्या तंबूत येणे बंद झाले .काय आहे हे रहस्य ...??
क्युबाच्या अँटोन आणि त्याच्या पत्नीने रबरी टायर ट्यूबचा तराफा बनवून सागरी मार्गाद्वारे क्युबातून अमेरिकेस पलायन केले . कसे .....??
आफ्रिकेतील एक मायनिंग इंजिनियरच्या झोपडीला सिहांच्या कळपाने रात्रभर वेढा घातला होता आणि हल्ला करण्याची संधी शोधत होते . कशी काढली असेल त्याने पूर्ण रात्र त्या झोपडीत ....???
अश्या अनेक सुरस ,चमत्कारिक कथा वाचायच्या असतील तर  हे पुस्तक वाचायलाच हवे