Saturday, September 30, 2017

मुंबईकर

आता उद्यापासून परत मुंबईकर धावायला लागतील....
आणि.. सगळीकडे बातमी येईल.
बघा मुंबईकरांचे स्पिरिट....घंटा स्पिरिट !!! च्यायला... आम्हाला काय मज्जा येतेय धावत रेल्वे स्टेशन गाठायला?? .आहो ..त्या झोपलेल्या मुलांची पप्पीही घेता येत नाही.... .ती घेत बसलो तर पाच चाळीस सुटेल आणि नंतर पंधरा मिनिटे गाडी नाही . ...ती मिळाली की कंपनीची बस चुकणार मग ऑटोला पंचवीस रुपये म्हणजे पोरांची पप्पी पंचवीस रुपयाला पडली....नको !!!!..चौथी सीट मिळाली तरी चालेल पण ट्रेन चुकायला नको.
च्यायला पाच दिवस झाले तो रेल्वे ब्रिज बंद आहे .म्हणजे अजून धावले पाहिजे तरच प्लॅटफॉर्मवर वेळेवर पोचू ..
ओहो... सॉरी मॅडम चुकून धक्का लागला.डोळे वटारून नका हो पाहू ...खरे तर तुमच्यापेक्षाही सुंदर बायको आहे घरी पण घाईघाईत लागतो धक्का .... माफ करा. पण जाऊद्या ...हो ती बघा ट्रेन आलीय.
अरे देवा .....कितीही गर्दी ब्रिजवर .कमी व्हायची वाट बघत बसलो तर तीन ट्रेन सोडव्या लागतील ,म्हणजे लेट मार्क झालाच आणि साहेबांच्या शिव्या ...वर बोनसच . आमच्या साहेबांनी सगळेच ऑनलाइन केलेय .अंगठा दाबून हजेरी लावा ,त्यामुळे उशिराच अंगठा लागला की आपोआप पैसे कट ....पगारातून.
आमच्या विभागातील नगरसेवक ,आमदार, खासदारांना या ब्रिजवरून चालायला लावले पाहिजे एकदा .म्हणजे कळेल त्यांचा लाडका मतदार कसा प्रवास करतोय .
जाऊ दे बोलून काय उपयोग??...आता या गर्दीत तर घुसले पाहिजे नाहीतर डायरेक्ट हाफडेला जावे लागेल.
साला ....लोकांनापण मानले पाहिजे .माहितीय ह्या गर्दीत अडकलो तर जीवही जाईल पण तरीही घुसतात.मीही कोण वेगळा नाही म्हणा ...पोटासाठी हे ही करावे लागते.चला रोजच्यासारखे देवाचे नाव घ्या आणि घुसा या गर्दीत .
ओ.. मामा... जरा हळू .धक्के आता लागणारच इथे . तुमच्याकडे दुसरा काही पर्याय आहे का ???? ताई व्हा तुम्ही पुढे ,तुम्हालाच घाई आहे आम्ही तर फिरायलाच आलोय इथे .अरे!! अरे !!अरे!!.. हे कांय ती माणसे का धावतायत इथे तिथे देवा हे सर्व इथेच येतात ,आली अंगावर सर्व वादळासारखी ....नको नको ...माझी बॅग गेली खाली.आहो बायकोने सकाळी चार वाजता उठून डबा बनवून दिला आहे हो . कॅन्टीनचे खाणे झेपत नाही त्रास होतो तुम्हाला असे सारखे बोलत असते .आई ग!!..कोणीतरी हातावरच पाय ठेवला ...कोणी तोंडावर..नको नको.... सगळेच अंगावरून धावत जातायत . मीच का हो सापडलो यात.माझी काय चुकी आहे ??. दरवर्षी नेमाने इन्कम टॅक्स कापून घेतात . पास संपायच्या आधीच दुसरा पास काढतो . ट्रेन लेट झाली तरी काही बोलत नाही . ट्रॅकवर पाणी साचले तरी स्टेशनवर बसून राहतो . अजून काय करायला हवे मी ??? 
मग आज मीच का ???? मुलांची पप्पी घेत राहिलो असतो तर आज ही वेळ आली नसती हो ........

© श्री. किरण बोरकर

Friday, September 29, 2017

नववी माळ

नववी माळ ..... रंग ??
सकाळी उठून ती तयार झाली .आजच्या रंगाची साडी आणि मॅचिंग सर्व आधीच काढून ठेवले होते .स्वतःचे पटापट आवरून  साडी नेसून तयार झाली . नेहमीप्रमाणे सासूबाईंच्या वेगळा नाश्ता ,मुलांचा वेगळा ,नवऱ्याचा डबा तयार करून ती सासूबाईंना भरवायला गेली . गेले सहा महिने सासूबाई अंथरूणावरच पडून होत्या .त्यांना भरवून औषध देऊन त्यांची सर्व तयारी करून ती  इतर कामाकडे वळली. सर्वांचे कपडे धुणे ,पाणी भरणे यात वेळ गेला .मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतली.मध्ये मध्ये येणारे फोन तिलाच घ्यावे लागत होते .
दुपारी जेवण झाल्यावर तिने सासूबाईंना जेवण भरविले . सासूने नजरेनेच तिच्याकडे पाहून छान दिसतेस अशी खूण केली . तशी ती लाजली . अश्या अवस्थेतही सासूचे आपल्यावर लक्ष आहे हे पाहून ती सुखावली.दुपारी विजेचे बिल भरून आली .येता येता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करीतच आली  .मुलाने आज वेगळ्या डिशची फर्माईश केली होती .त्याचे मित्र घरी येणार होते .तर नवरा परस्पर बाहेर पार्टीला जाणार होता  .मुलाचे मित्र घरी येणार म्हणून घर आवरायला घेतले . सकाळी सर्वांनी जाताना घरात पसारा करून ठेवला होता तो अजून आवरला नव्हताच.
बघता बघता संध्याकाळ झाली .सासूबाई सारख्या बेल वाजवत होत्या . त्यांच्या नाश्त्याची औषधाची वेळ झाली होती .बरेच दिवस हिचे गुढगे दुखत आहे .रोज डॉक्टरकडे जाईन म्हणते पण वेळच मिळत नाही . काहींना काही कामे निघातातच .पण तिलाही हल्ली स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता ?.सासूबाईना पुन्हा भरवून औषधे देऊन ती संध्याकाळच्या जेवणाकडे वळली .जेवण करता करता अचानक आठवले उद्या कोणता रंग आहे ??. पेपर बघायलाही वेळ नव्हता म्हणून मैत्रिणीला फोन करून उद्याचा रंग विचारून घेतला .
"अरे देवा ....!! या रंगाची साडीच नाही माझ्याकडे आणि ड्रेसही नाही . तिचा चेहरा पडला .आता स्वयंपाकाकडे  लक्ष लागेना . कसेबसे  स्वयंपाक  आटपला. आता बाहेर जाऊन ही काही फायदा नाही . लवकरच दुकाने बंद होतील .थोड्याच वेळाने मुलाचे मित्र आले आणि हसत खेळत गप्पा मारीत जेऊनही गेले.
सासूबाईंना भरविताना हिच्या डोक्यात उद्याचेच विचार चालू होते . सासूबाईंनी खुणेनेच विचारले काय झाले ??? हिने भडाभडा आपली तळमळ तिच्यासमोर मांडली .त्याही स्थितीत सासू हसली . खुणेने आपल्या कपाटाकडे बोट दाखविले आणि उशीखालच्या चाव्या नजरेने खुणावल्या . तिने चकित होत कपाट उघडले .आतमध्ये काही साड्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या होत्या .अर्थात हेही काम तिचेच होते म्हणा.. .त्यामध्ये उद्याच्या रंगाची साडी होती आणि मॅचिंग ब्लाउज ही .ते पाहूनच हीचा  चेहरा खुलला . आज रात्री हाताने टाके मारून ब्लाउज व्यवस्थित करता येईल .तिने साडी बाहेर काढून लहान मुलीसारखे सासूबाईंकडे बघितले .तिच्या नजरेतील आनंद पाहून सासूबाईंच्या डोळ्यातुन अश्रू ओघळले . होय त्या दोघीही देवी आहेत.

© श्री.किरण बोरकर

Thursday, September 28, 2017

आठवी माळ

आठवी माळ .....रंग ?????
"अरे ...!! हे काय "?? "तू पण रंगाच्या चक्रात अडकलीस का ".?? आजच्या रंगाचा ड्रेस घालून आलेल्या मधूकडे पाहत मी कौतुकाने म्हटले .
आमची मधू म्हणजे टॉमबॉय .हे असले साड्या नेसणे .ड्रेस घालणे तिला फार आवडत नव्हते . तशीही ती परदेशातच राहत होती .आता नवरात्रीला इथे आली होती.
"मी काय बाई नाही का "?? माझ्या पाठीवर थाप मारून लटक्या रागाने बोलली."खरे तर तुमच्यासोबत राहून राहून मी माझे बाईपण विसरूनच गेले होते .आणि नंतर परदेशात गेले .तिथे कुठेरे हे सर्व करायला मिळते .इथे संधी मिळतेय तर करून घेऊ हौसमौज " मधुचं हसत हसत रिप्लाय मिळाला .
इतक्यात बाजूच्या बिल्डिंगमधले अण्णा गेल्याची बातमी आली . म्हातारा म्हातारी दोघेच राहत होते .मुले बाहेरच असायची . चोवीस तास एक माणूस मदतीला ठेवला होता .आम्ही सर्व तेथे पोचलो .मधूही चांगलेच ओळखत होती त्यांना .तिथे गेल्यावर तीही आमच्याबरोबर कामाला लागली .नवरात्र आणि बऱ्याच घरी घट बसविले असल्यामुळे पुढे यायला फारसे कोणी तयार नव्हते . लांबच्या एक पुतण्याला सर्व काही करायचे अधिकार मुलांनी देऊन ठेवले होते . तोही हजर झाला.
सर्व तयारी झाली आता खांदा कोण देणार ??? आपल्या नात्यातला नाही म्हणून कोण पुढे यायला तयार नव्हते .शेवटी  कसेबसे  तीन नातेवाईक  तयार झाले .कोणी पुढे आला नाही तर मी जाईन असे मनात ठरविले .इतक्यात मधू अनपेक्षितपणे पुढे झाली.
"मी देते खांदा ?? असे तिने म्हणताच आम्ही हादरलोच .
"हे बघ भाऊ कोण खांदादेते हे आता महत्वाचे  नाही तर यांचे अंत्यसंस्कार होणे महत्वाचे आहे . माझ्या वडिलांच्या वेळीही अंत्यसंस्कार करायला तुम्ही मला पाठिंबा दिलात तसाच पाठिंबा द्या .काही दिवसांनी मी परत जाईन पण जाता जाता या परिस्थितीत अण्णा साठी काही करू शकले नाही ही चुटपुट नको"
मी अभिमानाने माझ्या मैत्रिणीकडे पाहिले . होय ती देवीच आहे .

© श्री.किरण बोरकर

Wednesday, September 27, 2017

सातवी माळ

सातवी माळ .....रंग ??
तीन वर्षांपूर्वी ती जगातील सर्वात सुखी स्त्री होती .प्रत्येक सण हौसेने साजरा व्हायचा तिच्याकडे.पण एके दिवशी पतीचा अपघाती मृत्यू झाला आणि सगळे संपले . मुलीच्या भविष्यकाळासाठी जगणे हेच आयुष्याचे ध्येय ठरले.
सणासुदीला सजलेल्या नटलेल्या बायका पाहून जीव तुटायचा तिचा . कपाटतर साड्यानी भरले होते .पण कश्या नेसणार ?? आता नवरात्र उत्सव चालू झालेत.पेपरमध्ये आलेल्या सगळ्या रंगाच्या साड्या कपाटात आहेत .पण लोक काय म्हणतील ? वयात आलेली मुलगी काय म्हणेल ?? तिच्या मनाची घालमेल सुरू होती . सकाळी उठून सर्व तयारी झाली . सवयीने पेपरमध्ये आजचा रंग पहिला . म्हणजे चुकून  त्या रंगाची साडी नेसायला नको . वेगळ्याच रंगाची साडी बाहेर काढून ती आंघोळीला गेली .आंघोळ करून बाहेर येऊन बघते तर साडी गायब होती .असे कसे विचार करीत असतानाच मुलगी आत आली. तिच्या हातात आजच्या रंगाची साडी होती .काही न बोलता तिने तिच्या हाती दिली."आज ही साडी नेसून जा.मी तुझ्या पाठीशी आहे".असे बोलून मागे फिरली .होय ती देवीच आहे .

© श्री.किरण बोरकर

Tuesday, September 26, 2017

सहावी माळ

सहावी माळ ....रंग ???
हॉस्पिटलमध्ये आजच्या रंगाचा ड्रेस घालून शिरताना तिला कसेतरीच वाटत होते .पण एक निरस वृत्तीची डॉक्टर हा शिक्का तिला पुसून काढायचा होता . आपले काम प्रामाणिकपणे करणारी डॉक्टर म्हणून तिचा नावलौकिक होता.सतत कामाच्या गडबडीत असल्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष झाले होते .पण हल्ली नवरात्रात रोज रोज ठराविक रंगाचे कपडे घालून वावरणाऱ्या बायका पाहुन तिलाही आपण करावे असे वाटू लागले .मग त्या ड्रेसच्या रंगाचे मॅचिंग असे सगळेच घालावे लागले.
हॉस्पिटलमध्ये शिरताच स्टाफच्या आश्चर्य युक्त नजरा पाहून ती लाजून गेली .आज संपूर्ण हॉस्पिटलमध्ये हिचीच चर्चा होणार हे निश्चित. केबिनमध्ये बसून कॉफीचा पहिला घुटका घेतला आणि इमर्जन्सी आली . तशीच ती पळाली.
चार नंबर वार्डमधील पेशंटला अचानक प्रसूतीवेदना चालू झाल्या.असे कसे अचानक घडले ?? कुठे चुकलो आपण दिवस मोजायला ?? ती धावता धावता विचार करीत होती . घाईघाईने पेशंटकडे आली आणि पेशंटनेही त्याच रंगाचा गाऊन घातलेला पाहून त्यापरिस्थितही तिला हसू आले . पेशंट ही समजून गेली .पोटातल्या कळा दाबून ती म्हणाली "डॉक्टर तुम्ही सुद्धा "?? आणि गोड हसली. तिच्या हास्यानेच नवीन ऊर्जा निर्माण झाली . ताबडतोब ऑपरेशन थिएटर मध्ये घेतले .केस किचकट आहे हे तिच्या लक्षात आले .काहीही करून दोन्ही जीवाला वाचवायचे हाच निर्धार करून ती कामाला लागली . तीन तासांच्या अथक प्रयत्नाने पेशंट प्रसूत झाली . मुलगी झाली हो .....ती भान न राहवून ऑपरेशन थिएटर मध्येच ओरडली .बरोबरीचा स्टाफ ही आनंदाने तिच्याकडे पाहू लागला.
थोड्यावेळाने पेशंटच्या हाती आजच्या रंगाच्या मऊशार गोधडीत गुंडाळलेले तिचे बाळ देताना काहीतरी वेगळेच काही वाटत होते .होय ती देवीच आहे .

© श्री.किरण बोरकर

Monday, September 25, 2017

पाचवी माळ

पाचवी माळ ...रंग ????
आता धंदा करायचा म्हणजे सगळ्या रंगाचे कपडे हवेच .खरे तर पूर्ण वर्षभर असे रंग ठरवले पाहिजे म्हणजे स्वतःच्या निवडीचा त्रास वाचेल .अशीही स्वतःची आवड निवड राहिलीच नाही .जो येईल त्याला अंगावर घ्यायचे .आजच्या रंगाचे उत्तेजक कपडे घालून ती पिंजऱ्यात उभी होती .सगळ्यांच्या वासनेने भरलेल्या नजरा न्याहाळत .खालून ती दोन तरुण मुले तिच्याकडेच पाहत होती .एकाच्या नजरेत बेफिकीरपणा तर दुसऱ्याच्या नजरेत कुतूहल .तिने इशारा केला आणि ते वर आले.
"बैठना है क्या" ? दोघांनीही माना डोलावल्या. एक तरुण तिच्याबरोबर आत शिरला .त्याचे नवखेपण तिने ओळखले.
"नया है क्या ?? पहिली बार "?? तिने हसत विचारले. "हा.. त्याने मान खाली घालून उत्तर दिले .अचानक तिला त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली .त्याचा निरागस चेहरा तिला भावला.
"क्यू इस गंदगीमे आया है?? अच्छे घर के दिखते हो ?? त्याने मान डोलावली.
तिने हळू हळू आपले सर्व कपडे उतरविले ."देख ऎसी दिखती है नंगी औरत ".त्याचे डोळे फिस्करले .
"चल अब भाग .वापस इस एरियामे कभी मत आना??असे बोलून तिने त्याला बाहेर काढले .
होय ती देवीच आहे .

© श्री.किरण बोरकर

Sunday, September 24, 2017

चौथी माळ

चौथी माळ ...रंग ????
तिच्याकडे आधीच सर्व रंगाचे ड्रेस तयार होते .बॉलीवूडमध्ये टिकायचे असेल तर अश्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या .आजच्या रंगाचा लांब गाऊन वर त्याच रंगाची उबदार शाल अंगावर घेऊन ती पार्टीसाठी निघाली .सिग्नलला नेहमीची भिकारीण आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन तिच्या गाडीजवळ आली .आज त्या भिकरणीनेही त्याच रंगाची साडी नेसली होती तर मुलाचे टी शर्ट ही त्याच रंगाचे .त्यांना पैसे देताना तिला हसू आले .खरच...! हौस सर्वानाच असते .मध्यरात्री पार्टीवरून परत येताना एक कोपऱ्यात ती आपल्या मुलाला कुशीत घेऊन झोपलेली तिने पाहिले .थंडीने कुडकुडत होती पण मुलाला आपली ऊब देण्याचा प्रयत्न करीत होती.ती गाडीतून उतरून त्यांच्या जवळ गेली .आपल्या अंगावरची शाल काढून तिने त्यांच्यावर पांघरली .आणि परत गाडीत बसून निघून गेली .होय ती देवीच आहे .

© श्री.किरण बोरकर

तिसरी माळ

तिसरी माळ ....रंग ????
BSF च्या जवानांसाठी कुठले सण ?? सतत सीमेवर रक्षणासाठी उभे ?? तरीही ती जमेल त्या पद्धतीने सण साजरे करायची .आजच्या रंगाचे तर काहीच नव्हते तिच्याकडे .शेवटी तिच्या सहकाऱ्याने आजच्या रंगाचा कपडा आणून दिला .तिनेही तो हौसेने आपल्या AK 47 ला प्रेमाने गुंडाळला .ती रायफलच तिची साथीदार आणि अंगाचाच  एक भाग होता . रात्रीच्या अंधारात तिला अतिरेक्यांच्या मागावर जाण्याची सूचना मिळाली .त्या अतिरेक्याना  कोंडीत पकडल्यावर लक्ष्यात आले त्यात स्त्रियाही आहेत . पण त्यांच्यावर गोळ्या झाडताना तिचे हात थरथरते नाहीत .आजचा रंग तिच्या डोळ्यात उतरलेल्या रक्तासमोर फिका पडला होता .होय ती चण्डिका आहे .ती देवीच आहे .

दुसरी माळ.. रंग

दुसरी माळ ....रंग???
खरे तर कोणी ठरवलेल्या रंगाचे ड्रेस घालून जायची कल्पनाच तिला पटत नव्हती .आणि त्या त्या रंगाच्या साड्या आणि ड्रेस तिच्याकडे असतीलच याची खात्री नव्हती .तरीही सर्वांचा  आग्रह म्हणून आजच्या कलरचा ड्रेस तिने घातला होता .नशीब आजच पगार झाला ,म्हणून खरेदीसाठी मार्केट मध्ये आली होती .उद्याचा कलर कोणता हे पाहून त्या रंगाचा टॉप तिने घेतला .अचानक शेजारच्या दुकानातील फुटबॉलकडे तिचे लक्ष गेले .छोटा भाऊ बरेच दिवस फुटबॉल मागत होता . आईबाबा लक्ष देत नव्हते तो बिचारा मिळेल त्या वस्तूवर लाथा मारीत फुटबॉल खेळत होता.न राहवून तिने तो टॉप परत केला आणि त्याच्यासाठी फुटबॉल विकत घेतला .उद्या टॉप घालून मिळणाऱ्या आनंदापेक्षा भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला नक्कीच आवडेल तिला .ती बहिणच आहे .ती देवीच आहे.

© श्री. किरण बोरकर

पहिली माळ

पहिली माळ ....रंग ????
ती नेहमीप्रमाणे लवकर उठून कॉलेजला निघाली होती .पेपरमधील आजचा रंग कोणता ते पाहून ड्रेस निवडला होता . हाफ पॅन्ट आणि टी शर्ट .कानात सेम कलरचे डुल आणि गळ्यात माळ .रस्त्यावरील लोकांच्या नजरा झेलत ती निघाली .सार्वजनिक नवरात्र मंडळात देवीचे दर्शन घेण्यासाठी थांबली .शांतचित्ताने देवीसमोर हातजोडून उभे असताना तिच्या कानावर कंमेंट्स पडल्या .स्वतःशी हसून ती त्या मुलांकडे वळली .कमरेवर हात ठेवून त्यांच्यावर आपली धारधार नजर रोखून म्हणाली "हिम्मत असेल तर समोर येऊन कंमेंट्स करा".काही न बोलता त्या मुलांनी मान खाली घातली आणि मंडपातून निघून गेले .होय ती देवीचं आहे

©श्री.किरण बोरकर

Saturday, September 23, 2017

द मॅड तिबेटीयन ......दीप्ती नवल

द मॅड तिबेटीयन ......दीप्ती नवल
अनुवाद ...सुनंदा अमरापूरकर
मेहता पब्लिकेशन
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रकार दीप्ती नवल यांचा हा कथासंग्रह .यातील कथा छोट्या आहेत .पण त्या वाचताना आपण त्यात गुंतून जातो .जणूकाही आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या या गोष्टी आहेत.त्यांच्या पियानो ट्युनर मधील हताश म्हातारा .तर डोके भादरले म्हणून सैरभैर झालेल्या दोन छोट्या बहिणी .अपघाताची जाणीव झालेला आणि स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करणारा तरुण.या कथा वाचून मन हेलावून जाते .

द्विदल ....डॉ. बाळ फोंडके

द्विदल.….डॉ. बाळ फोंडके
मेहता पब्लिकेशन हाऊस
विज्ञान गुन्हेगारी कथा असे याचे वर्णन करता येईल.गुन्हेगारांच्या शोधासाठी विज्ञानाचा वापर कसा करता येईल याची माहिती लेखकाने अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली आहे.यात दोन कथा आहेत.खुर्चीत विकलांग बनून असलेल्या शात्रज्ञावर घरात हल्ला होतो .तो कोणी केला याची उकल विज्ञानाच्या साहाय्याने केली जाते .तर टेस्ट ट्यूब बेबी किंवा सोरोगेट आईचे भविष्यात येणारे संभाव्य धोके ,दुष्परिणाम कसे असू शकतात याची कथा ही मनोरंजनात्मक पद्धतीने मांडली आहे .तंत्रज्ञान किती पुढे गेले आहे हे पाहून आपण अचंबित होतो .

Thursday, September 21, 2017

माऊली

शनिवारी वातावरणच छान होते .अश्यावेळी विक्रम गाडी घेऊन घरी आला.
"भाऊ ..! चल जरा गावी चक्कर मारून येऊ.या पावसाने घराची काय वाट लावलीय ते बघून येऊ.च्यायला.!! दरवर्षी नवीन खर्च असतो घराला". विक्रम वैतागून म्हणाला.
मीही ताबडतोब तयार झालो.मस्तपैकी किशोरकुमार ऐकत आम्ही दोघे निघालो .पनवेलच्या पुढे आम्हाला एक बस पास झाली .त्या बसच्या एका खिडकीतून लहान मुलाने आमच्याकडे पाहून हात हलविला आणि गोड हसला .त्याच्या  निरागस हास्याने आम्हालाही हसविले .मग चालू झालाआमचा पाठलाग .कधी ती बस पुढे तर कधी आमची कार .हा खेळ फक्त आमच्या तिघातच चालू होता.मध्येच त्या मुलाच्या आईने काय चाललंय म्हणून मान काढून बाहेर बघितले .आमचा खेळ लक्षात येताच तीही हसली. मी मोबाइलवरून त्या मुलाचे फोटो काढले.मनात म्हटले किती छान आयुष्य आहे याचे .कसलेच दडपण नाही ,जबाबदारी नाही .आईवडिलांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकून चालायचे.
मध्येच एक धाब्यावर चहासाठी आम्ही कार थांबवली .तेव्हा ती बस फार पुढे निघून गेली .थोडावेळ आराम करून पोटपूजा करून आम्ही निघालो .काही अंतर जाताच आम्हाला एक वळणावर खूप गर्दी दिसून आली .मूळच्या स्वभावानुसार विक्रमने लगेच स्वतःची गाडी एक कोपऱ्यात लावली आणि धावत गर्दीच्या ठिकाणी निघाला .मीही आरामात त्याच्या मागे गेलो .जवळ जावून पाहिले तर आमच्या पुढे गेलेली बस उलटी झाली होती .गाडीतून आक्रोश चालू होता .विक्रम तर कधीच बसजवळ पोचला होता .त्याने मदतकार्य चालूही केले होते . याबाबतीत फारच ऍक्टिव्ह होता तो.मीही पुढे जाऊन जखमींना मदत करू लागलो.
इतक्यात एक स्त्रीच्या किंकाळ्या ऐकू आला "माझा मुलगा कुठे आहे ??माझा सोनू कुठे गेला ?? पाहिले तर त्या मुलाची आई मोठमोठ्याने आक्रोश करीत होती .आम्हा दोघांनाही धडकी भरली .एकाच शंकेने आम्ही  एकमेकांकडे पाहिले .पटकन विक्रमने निर्णय घेतला", भाऊ तू तिथे बघ.मी इथे खाली उतरतो.एका क्षणात आम्ही दूर झालो आनि त्या छोट्याला शोधू लागलो.शोधताना सारखा त्याचा हसरा आम्हाला पाहून हात हलविणारा चेहरा नजरेसमोर येत होता .त्याची आई तर धाय मोकलून रडत होती.
अचानक लोकांचा गलका कानी आला.सापडला....!! सापडला...!! पाहतो तर काय..? विक्रम त्याला उचलून आणत होता . त्याचा चेहरा पाहून माझ्या छातीत धस्स झाले .विक्रमच्या हातात त्याला निपचित पडलेले पाहून त्या माऊलीची अवस्था अजून बिकट झाली .विक्रमच्या हातातून त्याला खेचून घेऊन ति त्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करू लागली .आम्हाला क्षणभर काही सुचेना .विक्रमने त्याला शुद्धीवर आणायचे प्रयत्न चालू केले .तिचे रडणे आता वाढू लागले.सगळे संपले की काय ?? अचानक त्या मुलाने खोकत खोकत डोळे उघडले .त्याच क्षणी त्याच्या आईचे रडणे थांबले .धक्का बसल्यागत तिने त्याच्याकडे पाहिले .आणि पुन्हा एकदा मोठ्याने हंबरठा फोडत तिने त्याला कुशीत गेले.यावेळीही अश्रू तेच होते फक्त भावना बदलल्या होत्या.दुःखाची जागा आनंदाने घेतली होती .एक क्षणात सर्व वातावरण बदलले होते.
मी खिशातून मोबाइल काढला आणि त्या क्षणाचे चित्रीकरण करू लागलो .तितक्यात विक्रमने माझ्या हातून मोबाईल काढून घेतला.
"नको भाऊ.. त्या माऊलीचे चेहऱ्यावरील भाव कॅमेरात कैद करू नकोस .ते डोळ्यात साठव .ते अनुभव .अरे भाग्यवान आहोत आपण म्हणून जगातील सर्वात आनंदी स्त्री बघतोय आज.आपण कल्पनाच करू शकत नाही.. ती काय अनुभवतेय आज.आपण तिचा हा आनंद जगजाहीर करू शकत नाही".
मी हसून मान डोलावली आणि हळूच विक्रमच्या डोळ्यातील अश्रू पुसले."THIS IS THE LIFE " असे म्हणत विक्रमने माझ्या खांद्यावर हात टाकला आणि कारच्या दिशेने वळला .
© श्री. किरण बोरकर

Monday, September 18, 2017

हॅकर

दिलीप माझा बालपणापासूनचा मित्र.खूप मजा करायचो आम्ही.त्याला पहिल्यापासून दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसायची आवड .प्रत्येकाचा इतिहास ,भूगोल खाणून काढण्याची सवय.मोठे झाल्यावर त्याने कॉम्पुटर क्षेत्र निवडले . अर्धे जग फिरून आला .कधी भेटल्यावर त्याच्या क्षेत्रातील गमती जमती सांगायचा .कधी कधी तो पोलिसांसाठी हॅकर म्हणूनही मदत करायचा .
काल तो अचानक रस्त्यात भेटला . "भाऊ चल घरी.मस्त गप्पा मारू".असे म्हणत हात पकडून घरी घेऊन गेला.त्याचे घर म्हणजे एक प्रकारची सिक्युरिटी केबिन  होती . दोन मोठे स्क्रिन ,लॅपटॉप ,बऱ्याच केबलची गुंडाळी.
"बस.. असे म्हणत फ्रीजमधून टिन काढला."तुझे काम जोरात चाललेले दिसतेय "?? मी सर्वत्र नजर फिरवून म्हटले.
"अरे हीच आवड आहे माझी .चल ...बोल तुला कोणाच्या आयुष्यात डोकावयाचे आहे ?? कोणाच्या अकाउंट मध्ये किती रक्कम आहे ती बघायची आहे .?? तुझ्या कंपनीच्या कामगारांचा पगार बघायचा आहे का ?? बोल बोल"?? तो पाठीवर थाप मारून म्हणाला.
"ह्या ....!! हे सर्व शक्य असते का?? पासवर्ड लागतो त्याला.काहीतरी बोलू नकोस",मी चिडूनच म्हटले.
" अरे ...!! सर्व शक्य असते भाऊ.आम्हा हॅकर लोकांचे हेच काम असते दिवसभर . आणि तुम्ही लोकच आम्हाला संधी देतात ते सर्व शोधायची ".तो हसून म्हणाला.
"कसे बुवा "?? मी प्रश्न केला.
"ऐक मग....साधी गोष्ट घे ,तुम्ही लोक फेसबुक अकाउंट उघडता.त्यात तुमची पर्सनल माहिती भरता पण सेटिंग मध्ये जाऊन सिक्युरिटी सेटिंग करीत नाही .मग तुमचे मित्र जॉईन होतात .त्यानंतर हौसेने तुम्ही स्वतःचे पर्सनल फोटो टाकता.आज मी कुठे आहे .कोणता चित्रपट पाहतोय .कोणाबरोबर पाहतोय हे ही पोस्ट करता .आम्ही लोक तुमच्यावर लक्ष ठेवतो.तुमच्या प्रोफाइल वरून तुमच्या घरी कोण आहेत .कितीजण आहेत याची माहिती काढतो..तुमच्या गाडीच्या नंबर प्लेट वरून तुम्ही कुठे रहाता याचा शोध घेतो .तुमच्या कंमेंट करण्याच्या पद्धतीवरून तुमचा स्वभाव ओळखतो .तुमची आर्थिक स्थितीही लक्षात येते .आणि कधीतरी तुम्ही चुकून कोणालातरी कंमेंट मधून आपली पर्सनल माहिती ही देत असता .त्यामध्ये बँक अकाउंट कुठे आहे .पुढचे प्लांनिंग काय आहे .ते सर्व तुमच्या नकळत सांगत असता सर्वाना.आता हेच बघ ना...विक्रम कुटुंबासमवेत पुढच्या शनिवारी गडकरींला गाण्यांच्या प्रोग्रॅमला जाणार आहे .म्हणजे कमीतकमी पाच तास त्याचे घर रिकामे असेल . काही लोक या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात".दिलीप गंभीरपणे म्हणाला .
"अरे बापरे....!! हे असेही असते का" ?? मी हादरून विचारले.
"केवळ  फेसबुक नाही भाऊ .तर तुझे क्रेडिट, डेबिट कार्ड वापरलेस तर तू कुठून काय खरेदी केले ते ही कळेल मला .हल्ली बऱ्याच सोशल साईट निघाल्या आहेत .कोणत्या साईटवर तुझा फोटो अपलोड करू बोल ??? 
"तो कसा ?? आता मला ही इंटरेस्ट वाटू लागला.
" अरे तुझे फोटो फेसबुक वरून डाउनलोड करतो आणि त्या साईटवर टाकतो .खूप सोपे आहे ते"
"म्हणजे आता खाजगी काही राहिले नाहीच का"?? मी हताश होऊन  विचारले .
"नाही भाऊ...! पण ते कंट्रोल करणे आपल्या हाती आहे .आपली माहीती कमीत कमी लोकांना मिळेल याची काळजी घ्यावी.ऑनलाइन बँकिंग शक्यतो एकाच बँकेतून करावी.त्यात जरुरीपूर्तीच रक्कम ठेवावी .पासवर्ड बदलत रहावा .आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करू नये .कोणत्याही वादग्रस्त गोष्टीत सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करू नये.हे गूगल भाऊ खूप चौकस बुद्धीचे आहेत .ते तुमचा सर्व डाटा स्वतःकडे जपून ठेवतात ,आणि तुम्हाला वेगवेगळी आमिष दाखवीत राहतात . उदारणार्थ तूला चित्रपट.संगीत याची आवड आहे तर ते त्याच प्रकारच्या वेगवेगळ्या साईट तुझ्या समोर आणतील आणि तुला त्यात गुंतवून ठेवतील .
"अरे देवा ....!!! मी अचंबित होऊन उद्गारलो.",बरे झाले हे सर्व सांगितलेस अरे सर्वच जण नेट  वापरतात आणि सोपे आहे येता जाता टाइमपास होतो म्हणून  मीही वापरतो .पण असे ही असते हे आज कळले मला.
भाऊ तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला पाहिजे तसा आपण करू शकतो.चांगली माणसे याचा चांगल्यासाठी वापर करतात पण वाईट वृत्तीची माणसे याच्या स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करतात.शेवटी हे सर्व आपणच निर्माण केले आहे त्यामुळे ते कसे वापरावे हे आपल्यालाच कळले पाहिजे .
© श्री. किरण बोरकर