Friday, December 29, 2023

Curry & Cyanide: The Jolly Joseph Case

Curry & Cyanide : The Jolly Joseph Case
केरळमधील  कुडाथायी गावातील एक सत्यघटना .जोसेफ फॅमिली गावातील प्रतिष्ठित फॅमिली. मोठी सून जॉली इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये प्रोफेसर आहे. 
2002 पासून त्या घरातील काही व्यक्ती अचानक मृत्युमुखी पडतात. फॅमिली जुन्या वळणाची असल्यामुळे पोस्टमार्टेम करू देत नाहीत.पण एक दिवशी तिचा नवरा ही मृत्यू पावतो.त्याच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सायनाईडने मृत्यू झाला असे नमूद केले जाते.
2002 ते 2016पर्यंत  त्या घरात सहा मृत्यू होतात .त्यात एका दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे .या मृत्यूमागे काहीतरी गडबड आहे असे जॉली जोसेफच्या नणंदेला संशय येतो.ती पोलिसात तक्रार करते आणि सगळ्यांच्या कबरी पुन्हा उघडायला लावते.
दहाजणांची एक टीम क्राईम ब्रांचकडून नियुक्त केली गेली. खरोखरच सगळ्यांचे खून झालेत की नैसर्गिक मृत्यू झालाय. ? या मागे कोण आहे ? पंधरा वर्षात झालेल्या मृत्यूचे गूढ केरळ पोलीस उलगडतील का ??
सत्यघटनेवर आधारित ही डॉक्युमेंटरी हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .

Wednesday, December 27, 2023

क्यू आर कोड आणि लग्न

क्यूआर कोड आणि लग्न
आज बऱ्याच दिवसांनी केके उर्फ कमलाकर कदम याला भेटायचा योग आला .
योग कसला केकेनेच फोन करून बोलावले होते.तसाही तो दिवसभर लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये बसूनच असतो.पण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे आम्हाला आवडते. 
गप्पा मारताना त्याच्यासमोर पडलेल्या पाकिटाकडे लक्ष गेले. सहज म्हणून मी ते उघडले तर ती लग्नपत्रिका वाटत होती.पण त्यावर कोणाचेच नाव छापले नव्हते फक्त मोठा क्यूआर कोड होता.
मी ते केके दाखविले.तसा  तो हसला.
"भाऊ डिजिटल लग्नपत्रिका आहे ही "
"अरे वा "असे म्हणून मी माझा फोन काढून तो कोड स्कॅन करायचा प्रयत्न केला पण ते ओपन होत नव्हते.
"भाऊ ज्यांना पत्रिका दिलीय त्यांच्याच नंबरवरून ओपन होईल ते" असे म्हणून त्याने स्वतःचा फोन घेऊन स्कॅन केला .ताबडतोब त्याच्या मोबाईलवर लग्न पत्रिका आणि एक गूगल फॉर्म आला .
" हा फॉर्म भरून द्यावा लागेल .तू येणार आहेस का ? " त्याने विचारले. 
मलाही उत्सुकता वाटली.
 मी होय म्हणालो.
"हे बघ, त्यानी कधी येणार विचारले आहे . म्हणजे सकाळी की संध्याकाळी ?"केकेने विचारले. 
मी गमतीने म्हटले" दोन्ही वेळेस".
त्याने माणसेच्या कॉलममध्ये दोन आकडा टाकला.
"भाऊ, त्याने मला फक्त संध्याकाळी स्वागत समारंभाला बोलावले आहे .म्हणजे संध्याकाळीच जाऊ.सकाळचे दोन स्लॉट आपल्यासाठी बंद आहेत."
"दोन स्लॉट ?" मी प्रश्नार्थक चेहरा केला. 
"सकाळी अक्षता टाकायला एक स्लॉट .जेवायला दुसरा आणि संध्याकाळी स्वागत समारंभाला तिसरा स्लॉट ."त्याने उत्तर दिले.
मग संध्याकाळी किती वाजता जायचे त्याचे टायमिंग लिहिले .
"भाऊ एक तास पुरे का ? आठ ते नऊ लिहितो "त्याने माझा होकार समजून लिहिले .
"जेवण काय हवेय ?" त्याने पुन्हा प्रश्न केला.
"अरे जे आहे ते खाऊ ? "मी चिडून म्हटले.
"तसे नाही भाऊ .हल्ली लग्नात काऊंटरवर दिसतील ते पदार्थ घेतात आणि नंतर टाकून देतात .त्यांनी लिस्ट दिलीय त्यातून पदार्थ निवड" माझ्या हाती फोन देत तो म्हणाला.
जेवणाचे बरेच पदार्थ  लिस्टमध्ये होते.अगदी लोणचे सॅलेड पासून पान सुपारी पर्यंत.वरती माझे नाव होते.
जवळजवळ वीस पदार्थ होते .मी त्यातून भात,पुरी वरण, बासुंदी ,पनीर भाजी, सॅलेड ,आईस्क्रीम सिलेक्ट केले .
"वा भाऊ, मोजकेच जेवतोस ? छान सवय आहे .लग्नाच्या दिवशी संध्याकाळी बरोबर आठ वाजता ये नऊ ला हॉलमधून बाहेर पडू ." केकेने त्याचा मेनू सिलेक्ट करीत फॉर्म सबमिट केला.
लग्नाच्या दिवशी बरोबर आठ वाजता हॉलमध्ये पोचलो .
अरे, हॉलचा दरवाजा बंद होता. लग्न कॅन्सल झाले की काय ?माझ्या मनात शंका .
पण केके बेफिकीर दिसला .त्याने दरवाजावरील क्यू आर कोड स्कॅन केला. ताबडतोब त्याला ओटीपी आला त्याने दरवाजावरील कीपॅडवर ओटीपी दाबला आणि दरवाजा उघडला .
आतमध्ये नेहमीसारखे लग्नाचे वातावरण होते.पण कुठेही गडबड गोंधळ दिसत नव्हता .आम्ही स्टेजवर पाहिले तर वधुवर उभे होते पण त्यांच्या आजूबाजूला फारशी गर्दी दिसत नव्हती.
पण स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे क्यूआर कोड दिसत होते .
"भाऊ आहेर किती देणार ?" केकेने विचारले. 
"पत्रिका तुला आहे मला नाही ?" माझ्यातील मराठी माणूस जागा झाला .
त्याने हसून मान डोलावली आणि नवऱ्याच्या बाजूच्या क्यूआर कोडवर हजार रु स्कॅन केले .पैसे पोचल्याची रिसीट मिळाली .मग त्याने ओळखीच्या लोकांना भेटायला सुरवात केली .
अचानक नवरा नवरीच्या डोक्यावर ठेवलेल्या डिस्प्ले मध्ये केकेचे नाव आले.तसा केके मला घेऊन स्टेजवर गेला .नवऱ्याची आणि माझी माझी ओळख करून दिली .नवरा अर्थात केके ला ओळखत होता . बहुतेक त्याचाच विद्यार्थी असावा.आमचा एक फोटो काढला .
"चल जेवू या ?"
 केके मला घेऊन खाली गेला .तिथेही मोजकीच माणसे जेवत होती . केकेने काऊंटरवर त्याचा नंबर सांगितला आणि आम्ही बाजूच्या टेबलवर बसलो .पाच मिनिटात आमची दोन ताटे घेऊन एक वेटर टेबलवर आला .
आयला ! मी जे पदार्थ सांगितले होते तेच पदार्थ ताटात होते .
"केके ,दुसरा एखादा पदार्थ पाहिजे असेल तर ? "मी केकेच्या ताटातील गुलाबजामकडे पाहून कुतूहलाने विचारले .
"मिळणार नाही ? त्या दिवशी चान्स होता सिलेक्ट करण्याचा तो सोडलास .याला चंचल मन म्हणतात."
केके शांतपणे जेवू लागला .अतिशय मोजकेच पदार्थ असल्यामुळे आमचे जेवण पटकन संपले अर्थात त्यातील पदार्थ पाहिजे तितके घेण्याची सोय होती पण आमचे पोट भरले होते.सवयीनुसार मी बासुंदी वाटी अजून एक मागून घेतली .
"भाऊ नऊ वाजत आले" त्याने मोबाईल दाखविला .
च्यायला ! मोबाईलमध्ये अलार्म वाजत होता .
"अरे कोण ओळखीचा भेटला तर वेळ होणारच ना ?"मी चिडून केकेला म्हटले. 
"त्यासाठी दहा मिनिटे वाढवून दिलीत.पण नंतर बाहेर नाही पडलो तर  दरवाजा आपल्यासाठी लॉक होईल आणि नवरा नवरी सोबतच बाहेर पडू .मंजूर आहे का ?" त्याने शांतपणे मला विचारले.
मी नाईलाजाने मान डोलावली .
तिथे पाच सहा ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉईंट ठेवले होते . त्यावर एक व्हाट्स अप नंबर दिला होता. बहुतेकजण वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होते .ग्रुपफोटो ही बरेचजण काढत होते .फोटो काढले की त्या व्हाट्स अप नंबरवर सेंड करत होते.
"केके हा काय प्रकार ?"माझा पुन्हा एक प्रश्न.
"भाऊ इथे फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवले की त्यात नवरा नवरीचे फोटो एडिट करून टाकण्यात येतील .म्हणजे एकाच लोकेशनवर सारख्याच पोजमध्ये फोटो रिपीट होणार नाहीत आणि स्टेजवरची गर्दी टाळता येईल. " केके सहज स्वरात म्हणाला आणि माझा हात धरून दुसऱ्या दरवाजाने ओटीपी नंबर दाबून बाहेर पडला.
बाहेर येताच मी केके ला विचारले "यामागे डोके तुझेच ना ?"
केके हसला .
"भाऊ लग्न मनासारखे एन्जॉय केलेस ना ? थोडी शिस्त आणि कठोरपणा आहे .पण सर्वाना मनाप्रमाणे एन्जॉय करता आले ना .आता बघ ना तुझा वेळ वाचला .तुला पाहिजे ते मनासारखे खाता आले .अन्न फुकट गेले नाही.लोकांची धक्काबुक्की नाही .वधूवराना घाई नाही .स्टेजवर पाकीट द्यायला रांग नाही .तू जितका वेळ दिलास तितका वेळ तुला लग्न एन्जॉय करता आले . तू एक तास दिलास आम्ही तुला एका तासात मोकळे केले .तू जितका जास्त वेळ दिला असतास तितकाच वेळ आम्हीही घेतला असता ".केके हसून म्हणाला .
"पण ही आयडिया कशी आली तुझ्या डोक्यात ?" मी विचारले.
"त्या दिवशी तुकाराम कदमाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो .लग्न दुपारचे जेवणाची आणि लग्नाची वेळ सारखीच त्यामुळे खूप गडबड उडाली होती.अरे ,लग्नाचे विधीही करू देत नव्हते.वधूवर उभे राहिले की लोक आहेर द्यायला धावायचे.पुन्हा फोटोही काढायचे. जेवायला ही गर्दी .त्यात हॉल छोटा .अन्नाची प्रचंड नासाडी .बिचाऱ्या कदमांनी खूप खर्च करून लग्नाचा घाट घातला होता.त्यांच्याकडून काहीच कसर बाकी ठेवली नाही तरीही लोक बडबड करीत होती .नावे ठेवत होती. पैसे खूपच खर्च केले होते पण नियोजन नव्हते .मग मीच ठरविले यावर काहीतरी मार्ग काढायचा . आपल्या पोरांना क्यू आर कोड तयार करायला लावले म्हटले हेच वापरून नियोजन करायचे.त्यात हे लग्न ठरले .मग मी वधू वर त्यांचे आईवडील आणि खास नातेवाईक याची मिटिंग घेतली आणि ही प्रोसिजर सेट केली. दोन्हीकडून किती माणसे येतील ? त्यात दिवसभर कोण असणार ? पटकन येऊन कोण जाणार ? याची वर्गवारी केली .जेवण फुकट घालवायचे नाही हा दोन्ही पार्ट्याचा प्रमुख आग्रह होता.विधी पूर्ण झाले पाहिजे यावर दोघांचे एकमत होते.थोडा वाईटपणा घ्यायला ते तयार होते .मग काय लावले आपल्या पोरांना कामाला .आपल्या पोरांनाही काम मिळाले माझे ही थोडे सुटले तुलाही मनासारखे जेवण मिळाले "केके माझ्या हातावर टाळी देत म्हणाला .
धन्य आहेस बाबा तू " मी ही त्याला हात जोडीत म्हणालो .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

डोन्ट ब्रिथ

डोन्ट ब्रिथ 
Don't breath
रॉकी ,अलेक्स,मनी तिघे भुरटे चोर. रिकामी घरे फोडून त्यातील किमती ऐवज लुटायचा हे त्यांचे काम .अलेक्स ही तरुणी आहे आणि तिला लहान मुलगी आहे. रॉकीचे वडील सिक्युरिटीमध्ये आहेत त्यामुळे त्याला घराचे लॉक कोड सहज मिळतात.
एका घरात खूप रोख रक्कम आहे अशी माहिती त्यांना मिळते. त्या घराच्या आजूबाजूची घरे ही रिकामी असतात.एका नॉर्मन नावाच्या  माजी सैनिकाचे ते घर असते .नॉर्मनने इराक युद्धात आपले डोळे गमावलेले असतात .आता तो आपल्या कुत्र्यासोबत राहत असतो .
तिघेही त्याच्या घरात लॉक तोडून शिरतात .पण नॉर्मन सावध असतो .त्याला बाजूच्या व्यक्तीचा श्वासही जाणवतो.तो अतिशय क्रूर आहे.आपल्या घरात सहजपणे काठी न घेता हालचाली करतो.तो त्यांना चोरी यशस्वीपणे करून देईल का ??
एक अंध सैनिक त्या घरात तीन चोरांशी कसा सामना करतो हे नक्कीच पाहण्यासारखे आहे.
संपूर्ण चित्रपट एका घरात चित्रित झालाय .मोजून चार पात्रे आणि कुत्रा यात आहेत.अंगावर काटा आणणारा पुढे काय होईल ही उत्सुकता ताणून धरणारा हा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

Monday, December 25, 2023

अलक

अलक 
बाजूच्या बर्गर पॉइंटकडे असूयेने पाहत त्याने वडापावच्या गाडीवरून एक वडापाव घेतला.घास घेताना शेजारचा तो वृद्ध आशाळभूतपणे त्याच्याकडे पाहत होता. कसनुस हसत त्याने आपला वडापाव त्याला देऊन दुसरा वडापाव घेतला."च्यायला, ह्याजगात आपल्यापेक्षाही गरीब माणसे राहतात की ?" चेहऱ्यावर रुंद हासू आणत तो पुटपुटला आणि त्या वृद्धाला हात दाखवीत चालू लागला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

द लायन्स गेम

द लायन्स गेम
नेल्सन डेमिल
अनुवाद ..अशोक पाध्ये
मेहता पब्लिशिंग हाऊस
साल १९८६ लिबिया 
त्या रात्री लिबियातील अल अझीझिया गावात शांतता होती. लिबियाचा सर्वेसर्वा कर्नल गडाफी तेथे रात्रीच्या मुक्कामाला होता.त्याचवेळी अमेरिकन वायुदलातील चार विमाने त्या गावावर हल्ला करण्यास निघाली होती.चार विमानात एकूण आठजण होते. त्यांची नावे गुप्त राहणार होती.ठरल्याप्रमाणे हल्ला झाला .गावातील शंभरएक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. त्यात गडाफीची मुलगी , दोन मुले मारली गेली.कर्नल गडाफी आश्चर्यकारकरित्या वाचला.असद खलील हा सोळा वर्षाचा मुलगा ही त्यातून  वाचला.पण तोही आपल्या कुटुंबियांना वाचवू शकला नाही.
वर्तमानकाळ
लिबियातील त्या घटनेला बरीच वर्षे उलटून गेलीत.पोलीस अधिकारी जॉन कोरी एफबीआयच्या दहशतवाद विरोधी पथकात नुकताच कॉन्ट्रॅक्टवर जॉईन झाला होता.तो मूळात एक हुशार पोलीस ऑफिसर आहे. तिरसट ,वरिष्ठाना न जुमानणारा प्रामाणिक अधिकारी म्हणून त्याची ख्याती होती. आज त्याला पॅरिसहून येणाऱ्या एका दहशतवाद्याला आणायला विमानतळावर जायचे होते.त्याची सोबती केट वरिष्ठ एफबीआय ऑफिसर होती.
पॅरिसहून येणाऱ्या विमानाचा संपर्क टॉवरशी होत नव्हता. पण विमान रडारवर दिसत होते. शेवटी विमान धावपट्टीवर उतरले.पण आत सर्व प्रवासी कर्मचारी मृत झाले होते आणि कैदी निसटला होता . त्या कैद्याचे नाव होते असद खलील.
अरबी भाषेत असदचा अर्थ सिंह असा होतो.जो शांतपणे विचारपूर्वक आपल्या सावजाची शिकार करतो.आता असद खलील ही आपल्या सावजांची शिकार करण्यास सज्ज झालाय.त्याने सुरवातच विमानातील तीनशे लोकांना मारून केलीय.त्यानंतर त्याने एफबीआयच्या ऑफिसमधील तीन अधिकाऱ्यांना ठार केलेय. आता तो पुढे निघालाय.तो नक्की काय करेल याविषयी कोणालाच माहीत नाही.
जॉन आपल्या पोलिसी बुद्धिमत्तेवर यामागे असदचा काय प्लॅन आहे ते शोधून काढतो. आता फक्त त्याला सापळ्यात अडकवायचे आहे .
लेखकाने अतिशय बारकाईने सगळा घटनाक्रम लिहिला आहे.त्यामुळे आपल्याला सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडतायत असे वाटते.एफबीआय ची कार्यपद्धती, विमानतळावरील आपत्कालीन परिस्थिती आल्यास कसे वागतात .विमाने  भाड्याने घेण्याची पद्धत, त्यात असणाऱ्या त्रुटी लेखकाने विस्तृतपणे लिहिल्या आहेत.
असदची मारण्याची पद्धत पाहून आपल्या अंगावर शहारे येतात .
पहिल्या पानापासून शेवटपर्यंत उत्सुकता आणि थरार वाढवणारे पुस्तक .

सजीनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ

सजीनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ
Sajini Shinde Ka Viral Video
सजीनी सूर्यकांत शिंदे पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेत फिजिक्स टीचर आहे. सिंगापूरला ती शाळेच्या प्रोजेक्टसाठी जाते.तिच्या प्रिन्सिपलने तिची निवड केली नव्हती . पण तिची मैत्रीण श्रद्धा प्रिन्सिपलशी भांडून तिच्या खर्चाने घेऊन गेली.
सजीनीचे वडील मराठी थिएटरचे लोकप्रिय नट आहेत.त्यांचे नगरचे प्रतिष्ठित घराणे आहे.सजीनीचा होणारा नवरा  बंगळुरूमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो .तो सजीनीला नेहमी मॉर्डन राहायचे सल्ले देत असतो.
त्या दिवशी सजीनीचा वाढदिवस सिंगापूरच्या हॉटेलमध्ये साजरा करतात.त्यावेळी अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले जातात.सजीनीही मद्यधुंद अवस्थेत नाचते.
त्याचवेळी प्रिन्सिपल मॅडम श्रद्धाकडे प्रोजेक्टचे अपडेट्स मागते आणि चुकून श्रद्धा त्यांचे पार्टीतले विडिओ आणि फोटो पाठविते. त्याच दिवशी तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. सगळेजण चवीने तिचा व्हिडिओ पाहतात.शाळेत पालकांचा मोर्चा निघतो. प्रिन्सिपल मॅडम सिंगापूरला गेलेल्या सर्व टीमला काढून टाकतात. सजीनीचा होणारा नवरा तिच्या विरुद्ध जातो.तिचा बाप ही तिला नाकारतो.
अचानक एक दिवस सजीनी गायब होते.तिची एक चिट्ठी सापडते .त्यात तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आणि वडिलांचे नाव लिहिले असते.या दोघांमुळे आपल्याला जास्त त्रास होतोय असे लिहिलेले असते.
सजीनीला शोधायची जबाबदारी स्त्री विभागाच्या इन्स्पेक्टर बेलाकडे आलीय.बेलाला इन्स्पेक्टर राम पवार मदत करतोय.  दोघेही दिवसरात्र तिला शोधायचा प्रयत्न करतायत.ती त्यांना सापडेल का ? तिला कोणीतरी डांबून ठेवलंय की तिने आत्महत्या केलीय?? 
चित्रपटाची पार्श्वभूमी मराठी आहे.सुबोध भावे सजीनीच्या वडिलांच्या सूर्यकांत शिंदेच्या भूमिकेत आहेत .तर इन्स्पेक्टर राम चिन्मय मांडलेकर आहे. राधिका मदन सजीनीच्या भूमिकेत तर इन्स्पेक्टर बेला बरोटच्या भूमिकेत आहे.
एक रहस्यमय चित्रपट म्हणून आपण तो नेटफ्लिक्सवर पाहू शकतो.

Monday, December 18, 2023

कानविंदे हरवले

कानविंदे हरवले
हृषीकेश गुप्ते
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
खरे तर मिसेस कानविंदेचा तो फोन मिहीर इनामदारने घेतला नसता तर पुढच्या घटना कदाचित टळल्या असता.पण जे घडणार आहे ते टाळू शकत नाही.
वासुदेव कानविंदे हे सिनेमा जगतातील मोठे नाव.अर्थात मिहीर इनामदारही त्याच क्षेत्रात आर्ट डायरेक्टर होता म्हणून कानविंदेला नावाने ओळखून होताच.कानविंदे हे प्रसिद्ध ध्वनी संयोजक ,डायरेक्टर आहेत.
त्या दिवशी अचानक एका अनोळखी नंबर वरून मिहीरला फोन आला .कानविंदे हरवले आहेत असे त्यांची पत्नी म्हणत होती.
खरे तर मला का फोन केला ?? माझा काय संबंध ? असे अनेक प्रश्न मिहीरला पडले होते.
आठ दिवसांपूर्वी पहिल्यांदाच त्याला कानविंदेचा फोन आला होता.पण त्या फोनवर काय बोलणे झाले तेच मिहीरला आठवत नव्हते.
मिसेस कानविंदेच्या आग्रहावरून मिहीर त्यांना भेटायला गेला, तेव्हा तिने त्याच्या हातात एक लिफाफा ठेवला. त्यात जुन्या व्हिडिओ कॅसेट लायब्ररीची रिसीट होती. त्यात कानविंदेने एक व्हिडिओ कॅसेट भाड्याने घेतल्याची सही होती.पण अजून दोनजणांनी तीच कॅसेट भाड्याने घेतल्याची नोंद होती. कॅसेट लायब्ररीचा पत्ता मुंबईचा होता. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या कार्डवर तिसरे नाव मीर इनामदार उर्फ मिहीरचे होते.सहीही त्याचीच होती.पुण्यात राहणारा मिहीर मुंबईत जाऊन व्हिडीओ कॅसेट भाड्याने का घेईल ? 
आता मात्र मिहीर गोंधळात पडला .पण व्हिडिओ कॅसेट लायब्ररीचा मालक मुश्ताकभाई होता.जे मिहीरचा बालपणीचा मित्र इनायतचे वडील होते. पण कार्डवर तारीख चौऱ्याणव सालातील होती आणि तेव्हा मिहीर सोळा वर्षाचा होता.
आता मिहीरला मोरब्याला जाऊन मुश्ताकभाईला भेटावेच लागणार होते .कारण त्या कार्डवर लिहिलेली व्हिडीओ कॅसेट महत्वाची होती. त्याच कॅसेटच्या मागे कानविंदे होते.
काय आहे कानविंदेचे रहस्य ? ते कुठे हरविले आहेत ? त्यांचा मिहीर इनामदारशी काय संबंध ?? 
एक अतर्क्य ,गूढ आणि लेखकाच्या नेहमीच्या शैलीला साजेशी अशी गूढरम्य कादंबरी .

Thursday, December 14, 2023

ओरिजिन

ओरिजिन 
डॅन ब्राऊन 
अनुवाद ...मोहन गोखले 
मेहता पब्लिकेशन हाऊस
मानवाची उत्पत्ती कश्यापासून झाली ?? अर्थात  माकडापासून असा डार्विनचा शोध जगाला मान्य आहे.पण हे माकड कुठून आले ? ते देवाने निर्माण केले की विज्ञानाने.
 चर्च आणि विज्ञान यांचा वाद गेली अनेक शतके चालू आहे.गॅलिलिओ विज्ञानाचा आधार घेऊन चर्चशी भांडला .त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी चर्चच्या देवाविषयीच्या अनेक समजुती मोडीत काढल्या .आजही सजीव कसे तयार झाले याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञ करतायत .
आज रात्री स्पेनमध्ये एक महान शोध प्रसिद्ध होणार आहे.जगभरातील प्रसारमाध्यमातून त्याचे लाईव्ह प्रसारण होईल .एडमंड कर्ष हा तरुण उद्योजक ,कॉम्प्युटर तज्ञ, विडिओ गेमचा निर्माता या शोधाच्या पाठीशी आहे .
स्पेनमधील बिलबाओ शहरातील गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयात हा कार्यक्रम होणार आहे . त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रसिद्ध सांकेतिकचिन्ह तज्ञ प्रोफेसर रॉबर्ट लॅग्डन याना खास आमंत्रित केलंय.
खरे तर एडवर्ड कर्ष हा लॅग्डनचा आवडता विद्यार्थी.अतिशय हुशार ,मॉर्डन आर्टचा चाहता.
हा शोध जनतेसमोर आणण्याआधी त्याने बिशप वॉल्डस्पिनो हे स्पेनच्या राजाचे मित्र, ज्यू धर्मगुरू  राब्बो येहुदा आणि इमाम सैय्यद अल फदल या प्रसिद्ध धर्मगुरूसोबत मिटिंग घेतली होती. एडमंडचा शोध पाहून तिघेही हादरून गेले.हा शोध जनतेसमोर आला तर मानवजातीचा विनाश नक्की आहे असे त्यांचे मत झाले.
गुगेनहाईम येथे जमलेल्या सर्व प्रसिद्ध व्यक्तींना एक हेडफोन देण्यात आला होता .रॉबर्टला ही एक हेडफोन होता .त्यातून एडमंडचा खास सहाय्यक विन्स्टन  रॉबर्टला सूचना करीत होता .खरे तर विन्स्टन कोणी पुरुष नसून तो अत्याधुनिक कुत्रीम बुद्धीमत्ता असणारा कॉम्प्युटर होता. कार्यक्रमाची आयोजक गुगेनहाईम म्युझियमची प्रमुख अधिकारी आणि एडमंडची मैत्रीण आणि स्पेनच्या राजपुत्राची नियोजित वधू अँब्रा व्हिडाल होती.
या कार्यक्रमात आयत्यावेळी एक व्यक्ती शिरली होती.राजवाड्यातून त्या व्यक्तीला कार्यक्रमाला येऊ द्यावे अशी विनंती अँब्राला केली होती.
अतिशय नाट्यमयरीतीने कार्यक्रम सुरू झाला आणि मुख्य कार्यक्रमाला काही मिनिटेच बाकी असताना कुठूनशी एक गोळी झाडण्यात आली आणि तिने एडमंड कर्षच्या कपाळाचा वेध घेतला . त्यापूर्वी रॉबर्टला ही धोक्याची जाणीव झाली आणि तो एडमंडच्या दिशेने धावत सुटला.जगभरातील करोडो प्रेक्षकांनी हे दृश्य लाईव्ह पाहिले.
कोण आहेत ज्यांना एडमंडचा हा शोध जगासमोर येऊ द्यायचा नाहीय ? हा शोध माहीत असणारे तीन धर्मगुरू आणि एडमंडच आहेत .त्यातील दोन धर्मगुरूंचा त्यांच्या देशात आणि एडमंडचा आता इथे खून झालाय.स्पेनच्या राजपुत्रालाही अँब्रा आणि एडमंडची जवळीक सहन होत नाहीय.
आपले काही बरेवाईट झाले तर रॉबर्ट आपला शोध जगासमोर आणेल याची खात्री एडमंडला आहे आणि तश्या सूचना त्याने विन्स्टनला दिल्या होत्या.
आपल्या मित्राचा डोळ्यासमोर झालेला खून पाहून अँब्रा हादरली. तिने रॉबर्टला साथ देण्याचे नक्की केले.पण शाही रक्षक ,स्पेनचे लोकल पोलीस यांच्यापासून ते कसे वाचणार ?? 
आपल्या शोधपर्यंत जाण्यासाठी एडमंडने काही खुणा चिन्हे मागे सोडली आहेत .त्या चिन्हांचा आधार घेत रॉबर्टला त्याच्या सुपर कॉम्प्युटरपर्यंत पोचायचे आहे आणि त्याचा शोध जनतेसमोर आणायचा आहे ? रॉबर्ट यात यशस्वी होईल का ?? असा कोणता शोध एडमंड कर्षने लावला आहे की त्यासाठी खून होतायत ?
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी ,एका रात्रीच घडणारी डॅन ब्राऊनच्या नेहमीच्या शैलीतील थरारक कादंबरी.
AI अर्थात आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर या कादंबरीमध्ये केला आहे.

Tuesday, December 12, 2023

जिगर थंडा डबल x

Jigar thanda Double X
जिगर थंडा डबल x
 तामिळनाडूतील कोंबईचे घनदाट जंगल हत्तींसाठी प्रसिद्ध आहे.तिथे अगणित हत्तींच्या शिकारी होतात.शेट्टानी हा तिथला प्रमुख शिकारी.तो सहजपणे हत्तीची शिकार करतो.त्याला अजूनही कोणी पाहिले नाही.त्याचे लागेबांधे वरपर्यंत आहेत. पोलिसांचे एक दल त्याच्या बंदोबस्तासाठी जंगलात तळ ठोकून आहे.पण डीएसपी रतनकुमार गावातील निरपराध लोकांना पकडून त्यांचा छळ करतोय.
ही घटना आहे साठ आणि सत्तर च्या दशकातील . मदुराईतील एक तरुण किरुबन पोलीस खात्यात सिलेक्ट झाल्याचे पत्र घेऊन आपल्या प्रेयसीला भेटायला कॉलेजमध्ये आलाय.तो पोलिसात सिलेक्ट तर झालाय पण रक्त पाहिले की त्याला अटॅक येतो.तो कोणाला साधा दम ही देऊ शकत नाही.त्याची प्रेयसी त्याला मजेत चार तरुणाचे भांडण सोडविण्यास सांगते .थोड्या वेळाने बाहेर गडबड उडते म्हणून ती धावत बाहेर येते तेव्हा ते चार तरुण मरून पडलेले असतात आणि किरुबनच्या हातात सुरा असतो.पोलीस त्याला पकडून घेऊन जातात.
तमिळनाडूत मुख्यमंत्रीपदासाठी चुरस चालू असते. त्यातील एका नेत्याला पाठिंबा देणाऱ्या गुंडाची हत्या करण्याची सुपारी डीएसपी रतनकुमार किरुबनला देतो.त्यांच्यामते तो पोलिसात सिलेक्ट झालेला होता आणि चारजणाची क्रूरपणे हत्या केली होती म्हणून तो हुशार असेल.त्याबदल्यात त्यांच्यावरील सर्व आरोप दूर करण्याचे आश्वासन देतो.
अलियन सिजर शहरातील खतरनाक गुंड .तो हत्तीच्या दातांची तस्करी करतो. त्याला मारायची सुपारी किरुबनला दिलीय. अलियन सिजरला चित्रपटाचे वेड आहे.क्लिंट इस्टवूड त्याचा आवडता हिरो.किरुबन रे दासन बनून त्याच्याकडे जातो आणि त्याच्या जीवनावर चित्रपट बनवायचा आहे असे सिजरला सांगतो.तो त्याच्या प्रत्येक गोष्टीची शूटिंग करतो .पण संधी मिळूनही मारू शकत नाही.शेवटी शेट्टानीला जिवंत पकडून दिल्यास तू राज्यात हिरो बनशील आणि चित्रपट हिट होईल असे सांगतो. शेट्टानी सिजरला नक्की ठार मारेल असा त्याला विश्वास असतो.
सिजर जंगलात जातो पण पुढे अश्या काही अनपेक्षित गोष्टी घडतात ज्या पडद्यावर पहाणेच योग्य ठरेल .
पावणेतीन तासाचा हा चित्रपट सुरवातीस विनोदी वाटतो पण मध्यभागी हिंसक बनतो आणि शेवटी अनपेक्षित वळण घेतो.
राघव लॉरेन्सने अलियन सिजरची भूमिका सहजपणे केलीय.त्याचा क्रूर चेहरा धडकी भरवितो. एस. के.सुर्या किरूबनच्या भूमिकते सहानुभूती मिळवतो .
पर्यावरण ,आदिवासी ,अवैध शिकार त्यावर चालणारे राजकारण यावर प्रकाश टाकणारा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.
यातील vfx पाहण्यासारखे आहे.विशेषतः हत्तीची शिकार पाहताना अंगावर काटा येतो.

Sunday, December 10, 2023

कडक सिंह

कडक सिंह
Kadak Singh 
ए. के.श्रीवास्तवने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे ऐकून कोणाचाच विश्वास बसला नाही. सरकारच्या आर्थिक गुन्हे विभागात त्याच्याइतका स्वच्छ प्रतिमेचा आणि कठोर अधिकारी दुसरा कोणीच नव्हता.
 त्यांचे काम इतके अचूक आहे की आत्महत्या करण्यात ही चूक होणार नाही असे त्यांचा सहकारी अर्जुन म्हणतो.
पण सध्या परिस्थितीच वाईट आलीय.अशोक अग्रवालने चिट फंड घोटाळा करून हजारो भागीदारकांचे पैसे बुडविले आहेत.त्या प्रकरणात ए के च्या एका सहकऱ्याने देखील आत्महत्या केलीय.
ए. के. ला शुद्धीवर काहीच आठवत नाही.साक्षी नावाची तरुणी त्याला भेटायला येते आणि त्याची मुलगी म्हणून ओळख सांगते. तेव्हा तो नकार देतो.आदित्य नावाचा पाच वर्षांचा मुलगा आपल्याला आहे असे तो सांगतो.पण आता आदित्य सतरा वर्षाचा आहे. तरीही तो साक्षीची संपूर्ण गोष्ट ऐकून घेतो. घरी आपल्याला कडकसिंह म्हणतात हे ऐकून त्याला हसू येते.
मग त्यागी येतो.त्यागी त्याचा बॉस. तोही ए .के. कोण आहे , तो इथे कसा आला ,चिट फंडची काय भानगड आहे ते सांगतो.ए .के. शांतपणे तेही ऐकून घेतो.
त्यानंतर अर्जुन त्याला त्याच्याकडे असलेली माहिती देतो .मग नैना येते.ती ए. के. ची मैत्रीण असल्याचे सांगते.या सर्व गोष्टी ए. के. आपली नर्स मिस कन्नन सोबत एन्जॉय करत ऐकत असतो.काही गोष्टींची पडताळणी मिस कन्नन करून तो करून घेतो.
एका झटापटीत अशोक अग्रवाल मारला जातो. काही कागदपत्रे तपासल्यावर साक्षीला वाटते आपले वडील आत्महत्या करू शकत नाहीत.
असे काय घडते की ए. के.सारखा कठोर अधिकारी आत्महत्येचे पाऊल उचलेलं ??चिट फंड घोटाळ्यात नक्की कोण कोण अडकले आहेत ? ए. के.ची स्मृती खरच गेलीय की तो नाटक करतोय. 
ह्या सर्वांची उत्तरे हवी असतील तर झी 5 वर कडक सिंह पहायलाच हवा.
कडक सिंहच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी सोडला तर कोणीही नावाजलेले कलाकार यात नाहीत.अर्धा चित्रपट हॉस्पिटलच्या रूममध्ये आणि पंकज त्रिपाठी बेडवर असताना आहे. पण एक एक धागा जोडत या प्रकरणाच्या शेवटी काय होते हे पाहणे मजेशीर आहे.

Friday, December 8, 2023

अलक

अलक 
"आताच्या काळात प्रेतालाही चार माणसे जमणे मुश्किल."त्याचा आजारी बाप हातात हात घेऊन पुटपुटला.
"काळजी नको बाबा, पन्नास माणसे नक्कीच जमतील तुमच्या अंत्ययात्रेला."त्याने ही हसत उत्तर दिले.
आज खरोखरच पन्नास माणसे बाबांच्या अंत्ययात्रेत उपस्थित होती.स्मशानभूमीतून बाहेर पडल्यावर त्याने प्रत्येकाच्या हाती दोनशेची नोट देत नमस्कार केला. "पैशाने हल्ली बरीच कामे होतात हे पटले आज."तो माझ्याकडे पाहून डोळे पुसत म्हणाला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

The Italian Job

The Italian Job
द इटालियन जॉब 
जॉन ब्रिगर आणि त्याची टीम प्रोफेशनल चोर आहेत.त्यात चार्ली योजना आखण्यात पटाईत आहे.तर रॉब गाडी चालविण्यात. जॉन आयुष्यातील शेवटची चोरी करणार असतो.इटलीतील व्हेनिस शहरात ते एका माफियाकडील सोने लुटतात .सोने घेऊन पळताना त्यांचाच एक साथीदार स्टिव्ह गद्दारी करून ते सोने ताब्यात घेऊन सर्वाना ठार मारायचा प्रयत्न करतो त्यात जॉन मारला जातो.
जॉनची मुलगी स्टेलाही तिजोरी खोलण्यात तरबेज आहे.ती पोलिसांना मदत करते.एका वर्षांनी चार्ली तिला फिलाडेल्फियात भेटतो आणि स्टिव्हचा पत्ता लागल्याचे सांगतो.आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी स्टेला चार्लीला साथ देण्याचे ठरविते.
स्टिव्ह एका मोठ्या बंगल्यात राहतो .त्याच्या तिजोरीतून सोने पळविण्याची योजना चार्ली आखतो .पण स्टिव्हला त्यांची योजना कळते .तो ते सोने घेऊन दुसऱ्या देशात पळून जायचे ठरवितो. स्टिव्ह यात यशस्वी होईल का ? की चार्लीला आपली योजना आयत्यावेळी बदलावी लागेल ?? 
एक उत्कंठावर्धक थरारक चोरी पहायची असेल तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट हिंदी भाषेत जरूर पहा.
मार्क वॉलबर्ग, जेसोन स्टेथाम, चार्लीझ थेरोन प्रमुख भूमिकेत आहेत. यात बंदुकबाजी नाही ,हाणामारी नाही .फक्त चोरीचे प्लॅनिंग आणि तुफानी पाठलाग आहे.

Sunday, December 3, 2023

The Equalizer 3

The Equalizer 3
द इक्विलायझर 3
आधीच्या दोन भागापासून हा थोडा वेगळा आहे. यात हिंसा कमी, पण जी आहे ती फारच क्रूर आहे.
सिसलीतील एका वायनरी असलेल्या किल्लेवजा गढीत रॉबर्ट मकॅल हल्ला करून वायनारीच्या मालकाला आणि त्यांच्या मालकाला ठार मारतो.
पण निघताना तो जखमी होतो. एक पोलीस अधिकारी त्याला आपल्या अल्टामोंन्टे या छोट्या गावात घेऊन येतो. तेथील डॉक्टर त्याच्यावर उपचार करतो.रॉबर्ट त्याच गावात राहतो.पण अमेरिकेला त्या गढीतील अंमली पदार्थाची माहिती देतो.
अल्टामोंन्टे गावात माफियाचे राज्य आहे.व्हिसेन्ट आणि त्याचा भाऊ तेथील लोकांशी क्रूरपणे वागतात.अंमली पदार्थाच्या पैशातून इटलीत बॉम्बहल्ले होतात. पोलीस प्रमुख व्हिन्सेंटला हे प्रकार बंद करायला सांगतो पण त्यालाच मारहाण होते.आता रॉबर्टलाच काहीतरी करायला हवे.पण तो एकटा या माफियाशी लढेल का ? 
अतिशय टापटीप आणि स्वच्छतेची काळजी घेणारा .हातातील घड्याळात वेळ लावून समोरच्याला मारणारा रॉबर्ट डेंझल वॉशिंग्टनने नेहमीप्रमाणे सहज रंगविला आहे.पण यात तो आधीच्या दोन भागापेक्षा जास्त अग्रेसिव्ह वाटतो.तो लोकांच्यात मिसळतो .त्यांच्याशी मैत्री करतो.पण शत्रूला मारताना नेहमीसारखा थंड रक्ताने मारतो.
ज्यांनी आधीचे दोन भाग पाहिले आहेत त्यांनी हा भाग नक्कीच पहावा .
चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .