Tuesday, January 30, 2018

पाळी

"काय ग....! नक्की कशाची जाहिरात आहे ही.... ?? आजीने सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात पाहून आरोहीला प्रश्न विचारला.तशी आरोही चपापली.काहीच न सुचल्यामुळे तिने आईकडे पाहिले .शुभदाही नेमकी तिच्याकडे पाहत होती.हसून तिने खुणेनेच सांगितले दे उत्तर .. लाजून आरोहीने मान वळवली.
तशी शुभदा आईकडे वळून म्हणाली "अग….. पाळीच्यावेळी वापरायचे पॅड आहेत ते.हल्ली कापड वापरणे बंद झालंय.हेच वापरतात सगळीकडे".इतके बोलून आत गेली आणि एक नॅपकिन आणून आईच्या हातात दिला.
"अग्गो बाई...! किती छान ग.. किती सुधारणा झालीय.तरीच हल्ली गावात कोणाच्या मागच्या अंगणात छोटे कपडे वाळताना दिसत नाहीत".आजी कौतुकाने म्हणाली.
त्यांचा हा संवाद ऐकून आरोही बेडरूममध्ये जाण्यास निघाली.तसे शुभदाने तिला रोखले आणि बसण्यास सांगितले.
"खरच ग ..खूप बदल झालेत".
शुभदाची आई आता 85 वर्षाची होती.संपूर्ण आयुष्य गावी गेलेले.तेही छोट्या खेडयात.वडील आणि नवरा दोघेही स्वातंत्रसैनिक.त्यामुळे ही पहिल्यापासून कणखर .
"अग आरोही ...! तुला माहीत आहे का आमच्या वेळी असे काही नव्हते ग.मला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा मी नदीवर कपडे धुवायला गेली होती आईबरोबर .अचानक रक्त पाहून आई लगबगीने घरी घेऊन आली . मग अंगणातले गवत एकत्र बांधून ते माझ्या मांड्यांमध्ये ठेवले आणि कोपऱ्यात बसवून ठेवले . वर ओरडली आता इथून कुठे बाहेर जायचे नाही. देवाला स्पर्श करायचा नाही .रोज हे बदलायचे.असे बोलून गवताच्या जुड्या कश्या करायच्या ते शिकवले.मला कळेना काय अपराध झाला माझा.. ?? रोज जवळ घेऊन जेवण भरवणारी आई आज अशी का वागते..?? मग तिने सांगितले यापूढे दर महिन्यात चार दिवस असेच येणार तेव्हा असेच लावायचे आणि लोकांना टाळायचे. पुढे लग्न झाले नशिबाने नवरा चांगला मिळाला.त्याने खूप सवलत दिली मला.शिकण्यासाठी मदत केली . माझ्या कोणत्याही गोष्टीस विरोध केला नाही . शुभदा झाली तेव्हा नातेवाईकांची खूप टोमणा खावे लागले.मुलगी झाली ना...? पण त्यांनी खूप आधार दिला".
"हो ..खरे आहे .." शुभदा बोलू लागली." लहान असताना त्या दिवसात आई बाहेर बसायची नाही म्हणून इतर बायका खूप बोलायच्या तिला. पण बाबा खंबीर होते .त्यांनी या गोष्टीला विरोध केला.जेव्हा मला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा मी शाळेत होते.बाईने ताबडतोब मला घरी पाठविले. भर रस्त्यातून रक्ताने भिजलेल्या परकरवर मी घरी आले.तेव्हा आईने धीर दिला अग... हे होणारच. मोठी झालीस तू असे म्हणत कपडे बदलले मग वहीवर छान चित्र काढून हे असे का होते ते समजावले.जुन्या सुती साडीचे  चौकोनी तुकडे फाडून ते कसे वापरायचे हे शिकवले.या दिवसात जास्त काम करू नकोस असे समजावले . इतरजण रागावतील म्हणून देवघरात जाऊ नकोस असे सांगितले . तिने कधीही मला पाळी येणे म्हणजे काही विचित्र आहे असे भासू दिले नाही .हा एक स्त्रियांचा शरीरधर्म आहे ती एक नॉर्मल प्रोसेस आहे हेच मनावर बिंबविले. पुढे माझे लग्न झाले तेव्हाही तिने माझी मुलगी मासिक पाळीचा फार बाऊ करणार नाही असे सासरच्याना स्पष्ट सांगितले . तुझ्या बाबांनीही नेहमी मला साथ दिली . हळू हळू कपड्याच्या जागी पॅड आले.आरोही.. तू भाग्यवान आहेस की यागोष्टीची भीषणता ,मानहानीचा  त्रास तू भोगला नाहीस . शाळेत आणि नेटवरच या गोष्टीची कल्पना आधीच तुम्हाला दिली गेली होती.अत्याधुनिक गोष्टी तुमच्यासाठी आहेत.पाळीत तुम्ही नॉर्मल वागू शकता.आणि तरीही अजून यागोष्टीची चर्चा करायला तुम्हाला लाज वाटते ?? आज बरेच बदल घडलेत. आजीला या गोष्टीची उत्सुकता आहे .तुम्ही आम्हाला या गोष्टी शिकविल्या पाहिजेत."
हे ऐकून आरोही भानावर आली तिने ताबडतोब आजीला सॉरी म्हटले आणि तिच्या बाजूला बसून टीव्ही पाहू लागली .

© श्री. किरण बोरकर

Friday, January 26, 2018

आचार्यांच्या खुनाच प्रकरण

आचार्यांच्या खुनाच प्रकरण + एक कथा ...सत्यजित रे
अनुवाद .....अशोक जैन
रोहन प्रकाशन
सत्यजित रे यांचा लाडका गुप्तहेर फेलुदा याच्या ह्या दोन कथा.ह्यांच्या कथेचे वैशिष्ट म्हणजे यात कुठेही भडक हिंसा नाही . चित्तथरारक पाठलाग नाही .गोळीबार नाही . निव्वळ तर्कशास्त्राच्या आधारे  अचूक निरीक्षण करून पुरावा गोळा करून खरा अपराधी समोर आणला  जातो .  सर्वांसाठी उत्तम मनोरंजन असलेली फेलुदा मालिका नक्की वाचा .

Monday, January 22, 2018

वंदना

"हाय केके ...." !! बऱ्याच वर्षांनी कानावर तो परिचित आवाज पडला आणि माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. मी चिडून मागे पाहिले तर तीच होती.चेहऱ्यावर छद्मी हास्य ठेवून माझ्याकडे बघत होती.ओळख झाल्यापासून केके म्हणणारी ती एकमेव. मला राग येतो हे माहीत असूनही तिने ते थांबविले नव्हते.
वंदना ...माझी बालपणापासूनची मैत्रीण . दिसायाला साधारण ,अनाकर्षक .पण आपल्या चेहऱ्याची कसर तिने बोलण्यात,लिहिण्यात भरून काढली.कॉलेजमधील वक्तृत्व ,वादविवाद स्पर्धेत भाग घेऊन आपल्या ज्ञानाचा वापर करून बक्षिसे मिळवायची.गेली कित्येक वर्षे आमचा कॉन्टॅक्ट नव्हता अर्थात मला त्याचे कधीही दुःख झाले नाही.मी आज इन्कमटॅक्स ऑफिसमध्ये कामासाठी आलो होतो.तेव्हा तिने मला पाहून हाक मारली.
"अरे वंदना मॅडम .... मीही उलट उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण तिने तो उडवून लावला,
"इकडे कुठे ...?? माझ्या ऑफिसमध्ये ..?? भुवया उंचावत तिने प्रश्न विचारला .
मी आश्चर्यचकित झालो." तू इथे .."???
"हो ...मी इथेच ऑफिसर आहे ".असे बोलून माझे काम एक शिपायाकडे दिले आणि मला घेऊन केबिनमध्ये शिरली.
" बोल काय चालू आहे ..."मी विचारले.
"मस्त....दोन  नवरे ,एक मुलगी आणि दोन फ्लॅट.सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारी नोकरी" असे बोलून विषादाने हसली.
मी कपाळावर आठ्या आणल्या."अजूनही तुझे बोलणे सुधारले नाही का ..?? सरळ बोल आणि एक नवरा काय.... ?? सर्वाना एक नवरा ,एक बायको असते".
"पण मला दोन आहेत ना ..??? हा दुसरा . पाहिल्याशी घटस्फोट झालाय.. पण होता ना तो ??ती हसत म्हणाली.
" सरळ बोल ग".मी कॉफीचा घोट घेऊन म्हणालो.
"हे बघ केके.... मी तुम्हाला कधीच आवडत नव्हते हे माहीत आहे मला.विक्रम तर मान फिरवून जायचा . . तू बोलायचास तरी . कॉलेज संपल्यावर आम्ही दुसरीकडे राहायला गेलो .मला इथे नोकरी मिळाली पण सुंदर नसल्यामुळे लग्न लांबणीवर पडले . शेवटी आत्याने एक स्थळ आणले त्यांनी न पाहताच होकार दिला .मीही हो म्हणून लग्नाला उभी राहिले . लग्न झाल्यावर सासरी आले आणि काही दिवसात कळले की हे लग्न म्हणजे तडजोड आहे . माझ्या नवऱ्याचे दुसऱ्याच बाईबरोबर संबंध आणि तेही घरातच .माझ्या समोरच त्यांचे चाळे चालायचे .त्यांना वाटले हिच्यावर उपकारच केलेत लग्न करून . किती दिवस सहन करणार ,शेवटी चिडले दोघांना शिव्या देऊनच घराबाहेर पडले . पण मुलीचे लग्न केले आता तिची जबाबदारी नवऱ्यावर असा आपला समाज . घरचे ही घरात घेईना.गावात बोंबाबोंब  नवऱ्याला सोडलेली म्हणून ...समाजाने वाळीत टाकले .नशीब नोकरी होती . काही दिवस होस्टेलमध्ये राहिले .नंतर प्रयत्न करून ऑफिसचे घर  मिळाले . दोन वर्षे एकटीने काढली . खूप काही भोगले . असे वाटायचे परिस्थितीला शरण जावे पण पुन्हा नवऱ्याचे वागणे आठवायचे . नातेवाईकांची ,घरच्यांची बोलणी आठवायची आणि मन पेटून  उठायचे . नाही यांच्या नाकावर टिच्चून उभे राहायचे . काही वर्षांनी परिस्थिती निवळली .आई ,भाऊ शांत झाले मग पुन्हा येणे जाणे चालू झाले .तेव्हा दुसरे स्थळ आले . त्याला सर्व सांगितले आणि लग्नाला तयार झाले . त्याचेही दुसरे लग्न होते . मग एक मुलगी झाली . पण त्यानंतर त्याचेही वागणे बदलले . कधी तुसाडेपणे, हेकटपणे वागू लागला . मला काही कळेना का असे वागतोय . हळू हळू मुलींचेही कान भरू लागला .त्याची नोकरी सुटली म्हणून तो वेगवेगळे बिझनेस करू लागला . राजकारणात उडी घेतली. हे सगळे माझ्या नोकरीच्या जीवावर .मी दिवसभर ऑफिस . हा आणि मुलगी घरात . साहजिकच घरात दोन विरुद्ध एक असे प्रमाण.मी त्यांच्या न कळत एक फ्लॅट बुक केला . धोक्याची जाणीव झाली असे समज.मग एकदा घरी कडाक्याचे भांडण झाले . नवरा म्हणाला नीघ ..मुलगी शांतपणे पाहत होती . मी बॅग घेतली आणि निघाले . नवीन फ्लॅटमध्ये जाऊन राहिले .दोन दिवसात नवरा ,मुलगी वठणीवर आले . परत माफी मागून घरी घेऊन गेले .आता एक कळले तुमच्याकडे पैश्याचे आणि एक छपराचे पाठबळ असेल तर कसलीच भीती नाही . आता भांडण होत नाही आणि झाले तरी नवरा घर सोडून ज असे म्हणत नाही".
"तूला खरेच वाटते हा यावर हा उपाय आहे..." ?? मी विचारले .
"माहीत नाही ..."?? लहानपणापासून रुपावरून  खूप ऐकले आहे मी. माझा सतत वापर केला गेला असे वाटते मला . माझे ज्ञान ,वक्तृत्व ,लिखाण याकडे कोणी पहिलेच नाही . ही काय करणार आपले वाकडे.... ?? कोण विचारतोय हिला ..?? असेच वाटत होते सगळ्यांना .त्यामुळे मी घराबाहेर एकटी राहू शकते कळल्याबरोबर बहुतेकांची धाबी दणाणली. आणि मी कुरूप त्यामुळे इतरांसारखा धोका नाहीच.घरच्यांना कळले आता पैसे येणे बंद .काही बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागले . पण हरकत नाही . माझी पॉवर तरी दिसली . सध्यातरी ठीक आहे पुढे बघू."
इतक्यात शिपायाने माझ्या हातात पेपर आणून दिले . तिचा मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करत तिचा निरोप घेतला
© श्री .किरण बोरकर

Saturday, January 20, 2018

भास

पूर्वी बरेचसे कारखाने गावाबाहेरील मोकळ्या जागेत उभारले जायचे त्यामुळे तेथे एक गूढ वातावरण निर्माण व्हायचे.आजूबाजूला ओढा किंवा नाला तर स्मशानही असायचे.हळूहळू वस्ती वाढू लागली आणि तिथे शहरे निर्माण झाली .मग त्यातील गुढपणा कमी झाला.तरीही अधूनमधून काही गूढ गोष्टी सांगितल्या जातातच.
मी एके ठिकाणी कामाला होतो त्या फॅक्टरीच्या बाजूला मुसलमानांचे कब्रस्थान होते.आमच्या बॉयलर हाऊसमधून ते दिसायचे . रात्री तिथे खूप भीती वाटायची.आमचे ऑपरेटर जागे असायचे.नुकतेच एका ऑपरेटरचे निधन झाले होते .त्याचे जोडीदार कधी कधी सांगायचे "अरे ....डुलकी लागली की हा कानाजवळ येऊन ओरडतो. झोपू नकोस बॉयलर चालू आहे .कधी कधी कानाजवळ आवाज येतो पाणी चेक कर". खरेखोटे देव जाणे पण मला कधी त्रास झाला नाही.
त्यानंतर मी दुसऱ्या कंपनीत गेलो. तिथेही बाजूला पारशी लोकांची स्मशानभूमी आहे . तिथेही मला कधीच प्रेत दिसले नाही.पण कंपनीत एक स्त्री रात्री राऊंड मारते अशी माहिती होती . कधी कधी रविवारी मी नाईट शिफ्ट ला एकटा असलो की कॉम्प्रेसर रूममध्ये जाऊन झोपायचो . त्यावेळी मध्येच कोणतरी बाजूने गेल्याचा भास व्हायचा . कधी बारीक पैंजनाचा आवाज . मग मी उठून माझ्या जाग्यावर येऊन झोपायचो.गेटवर चहा पिता पिता सिक्युरिटी गार्ड सांगायचे त्या स्त्री बद्दल.वंजारी समाजातील ती स्त्री मागच्या गेटमधून आत येते. मग कॉम्प्रेसर रूममधून मागे पाण्याच्या टाकीवर जाते .तिथून ती ऑफिस बिल्डिंगमध्ये जाते मग गच्चीवर आणि परत खाली येऊन मागे फिरते .योगायोग असा की त्या त्या  ठिकाणी  काहीजणांनी तिला पाहिले आहे .
मला भास बऱ्याच वेळा झालेत पण प्रत्यक्षात त्या स्त्रीला पाहिले नाही . कॅबिनमध्येही एक दोनदा भीतीदायक प्रसंगाला सामोरे जावे लागले . खुर्चीवर झोपलो असताना छातीवर कोणतरी प्रचंड दाब देतोय असे जाणवले . तोंडातून आवाजही फुटत नव्हता तर डोळेही उघडू शकत नव्हतो.हातपाय झाडून ते  ओझे हटविले आणि डोळे उघडले तर समोर कोणी नाही . हातापायांची थरथर चालू झाली होती .असे नक्की का होते हे अजूनही कळले नाही.
© श्री. किरण बोरकर

Friday, January 19, 2018

यू ओन्ली लिव्ह टवाईस..... इयान फ्लेमिंग

यू ओन्ली लिव्ह टवाईस..... इयान फ्लेमिंग
अनुवाद ........जयवंत चुनेकर
मेहता पब्लिकेशन
अन्सर्ट ब्लोफेल्ड एक हुशार पण क्रूर शात्रज्ञ . मृत्यूवर वनस्पतीद्वारे वेगवेगळे प्रयोग करणारा . जपानमध्ये त्याचा मोठा किल्ला आहे त्यामध्ये त्याचे हे प्रयोग चालतात . त्याचे दोन प्रकल्प जेम्स बॉण्ड उध्वस्त करतो म्हणून तो बॉण्डच्या पत्नीची हत्या करतो . त्या धक्क्यातून बॉण्ड सावरावा म्हणून एम त्याच्यावर एक धाडसी कामगिरी सोपवतो . जापानमधून एक विशिष्ट माहिती आणावी असे या कामगिरीचे स्वरूप असते . पण जापानचा गुप्तहेरप्रमुख त्याबदल्यात त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीची मागणी करतो . त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी बॉण्ड ब्लोफेलच्या त्या गूढ किल्ल्यात प्रवेश करतो आणि पुन्हा आपल्या जुन्या शत्रूला सामोरे जातो .आता कोणाचातरी शेवट अटळ आहे .कोण जिंकेल यात ??????

Thursday, January 18, 2018

फुटपाथ

शेजारचा तन्मय हातात वही पुस्तक घेऊन घरात शिरला तेव्हाच मी चरफडलो . आता हा वेगवेगळे प्रश्न विचारून माझे डोके खाणार हे नक्की ....... मी हसरा चेहरा करून तयारीत बसलो .
"भाऊकाका .......मला हे वाहतुकीचे नियम समजावून सांगा"...एक हाताने वही पुस्तक आणि दुसऱ्या हाताने पॅन्ट सावरत त्याने मला आज्ञा केली.शेवटी पाचवीतल्या मुलाला शिकवायची जबाबदारी माझ्यावर पडलीच. "बोल ...."मी वैतागून विचारले.
"चालताना नेहमी फुटपाथचा वापर करावा"..त्याने वाचून सांगितले.
"एकदम बरोबर.." मी ठामपणे बोललो.
" ते ठीक आहे हो... .पण फुटपाथ म्हणजे नक्की काय ..?? कुठे असतो तो.." ??  त्याने निरागस चेहरा करून माझ्याकडे पाहिले.
"अरे तुला फुटपाथ माहीत नाही...?? रस्त्याच्या बाजूला माणसांना चालण्यासाठी जी जागा असते त्याला फुटपाथ म्हणतात".
"चला दाखवा मला प्रत्यक्षात ...". तोही आता हट्टाला पेटला.
"च्यायला......!! एव्हडा हट्ट बापाकडे कधी केलास का ??? मी मनात म्हणत त्याला घेऊन बाहेर पडलो.
घरासमोरच्या फुटपाथपाशी त्याला घेऊन आलो आणि म्हणालो" हा बघ ...???
त्याने परत विचारले" हा कुठे ..?? इथे तर सर्व झोपड्या आहेत. समोर फेरीवाले बसलेत . तो बघा भाजीवाला..आई नेहमी त्याच्याकडूनच भाजी घेते .इथे कुठे माणसे चालतात .सर्वजण खालून रस्त्यावरून चालतात . तो बघा तिथे एक माणूस चक्क आंघोळ करतोय आणि समोर तर 4/5 बाईक पार्क केल्यात . ह्याला फूटपाथ म्हणता तुम्ही भाऊकाका..??
मी काहीच न सुचून शांत बसलो.थोड्यावेळाने म्हणालो" अरे हाच फुटपाथ आहे ..पण काहीजणांनी अतिक्रमण केलेय.
"मग आपण कुठून चालायचे ..?. नियम कसे पाळायचे.अपघात झाले की जबाबदार कोण "?? त्याने सहज स्वरात हा प्रश्न विचारला .
खरेच.... हे चित्र तर सगळ्या फुटपाथवर आहे . माझ्या ऑफिससमोरच्या फुटपाथवरही असेच फेरीवाले बसलेले असतात. तर काही ठिकाणी ते खणलेले असतात. गटारे उघडी असतात.तर काही ठिकाणी मुले  क्रिकेटही खेळतात आणि माणसे रस्त्यावरून चालत असतात.मागून येणाऱ्या गाड्या चुकवताना त्यांची कसरत चालली असते . आपण मुंबईकर नेहमी फास्ट जीवन जगत असतो या गोष्टीकडे कधीच लक्ष देत नाही . पण आज एक पाचवीतल्या मुलाने माझ्यासमोर हे भयानक सत्य उघड केले होते . मी काही न बोलता परत त्याला घरी घेऊन आलो.
© श्री. किरण बोरकर

Monday, January 15, 2018

द गोल्डन रॉदेव्ह्यू ....ऍलिस्टर मॅक्लिन

द गोल्डन रॉदेव्ह्यू ....ऍलिस्टर मॅक्लिन
अनुवाद ......अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
कॅम्परी हे मालवाहतूक जहाज होते तसेच ते गर्भश्रीमंत लोकांसाठी प्रवासी जहाजही होते . फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवतील अश्या सुखसोयी होत्या तिथे . पण प्रवास सुरु होताच जहाजातील तीन अधिकारी एकामागून एक नाहीसे झाले . तर एक शात्रज्ञ छोट्या अणुबॉम्बसह पळून गेला होता आणि तो या जहाजवरच असेल असा संशय होता.. शेवटी एक भीती खरी ठरली . कॅम्परीचे अपहरण केले गेले . मार्गात येणाऱ्या दुसऱ्या बोटीवरील सोने लुटण्यासाठी तिचा वापर केला जाणार होता . या सगळ्या प्रकाराविरुद्ध  फर्स्ट ऑफिसर कार्टर उभा राहिलाय . तो आपल्या जीवाची बाजी लावून अपहरणकर्त्यांचा डाव उलथून टाकतो . कसा ???? ते वाचून पहा .

Friday, January 12, 2018

मराठी मालिका

वेळ संध्याकाळ
कोणतीतरी तरी एक मराठी वहिनी
मालिका एक .... नायिका अतिशय हुशार.लग्न  होण्याआधी खूपच बंडखोर. स्त्रीमुक्तीवाली.नाईलाजाने न आवडणाऱ्या मुलाशी लग्न करते मग हळू हळू पतीवर प्रेम. त्यासाठी सासरचा सर्व जाच सहन करते. नवऱ्याच्या सर्व चूक माफ . पती हा परमेश्वर.
मालिका दोन .... नायिका हुशार डॉक्टर.एका लहान मुलीच्या प्रेमाखातर तिच्या वडिलांबरोबर लग्न करते नंतर त्यामुलींसाठी डॉक्टरकी सोडते . सासू आणि दिराचा छळ सहन करते . नवऱ्याचा तिरसटपणा सहन करते .धन्य ती आई
मालिका तीन .... नायिका गावंढळ तर नवरा मोठ्या पदावर अधिकारी .आधुनिक .दुसऱ्या मुलीच्या मागे.तिच्यासाठी बायकोला सोडतो .तरीही नायिका सहन करतेय . बरेच दिवस सहन केल्यावर आता विनोदी मार्गाने त्याला वठणीवर आणायचे काम चालू आहे .धन्य ती बायको
मालिका चार .. नायकाला सैन्यात जायचे आहे .त्याआधीच तो प्रेमात पडलाय . प्रेक्षक वाट पाहतायत हा कधी सैन्यात जाऊन देशाची सेवा करतोय . प्रेक्षकांचा अंत पाहून शेवटी त्याला सैन्यात जावे लागले . तिथेही त्याची प्रेम कहाणी चालूच आहे .त्यासाठी अधिकारीही त्याला मदत करतात . हा सैनिक बनेल की प्रेमवीर हेच प्रेक्षकांना अजून कळत नाही .
मालिका पाच ..... नायिका शिक्षिका तर नायक अशिक्षित.अति भोळा पण जमीनदार. तरीही त्यांचे प्रेम नंतर लग्न . सासरी सासू नाही पण जाउबाई आहेत त्रास द्यायला . कळत असूनही  सहन करतेय.धन्य ती पत्नी
मालिका  सहा.... नायक नायिकेचे लग्न झालेय.ती सरकारी नोकर तर हा आयटीवाला . लग्नानंतर तिचा स्वभाव उफाळून आलाय त्याचा परिणाम घटस्फोटात होतोय .परत त्यांची ऍडजस्टमेंट .परत भांडणे . ती नवऱ्यासाठी सासूच्या वेगवेगळ्या परीक्षेतला सामोरी जाते.सासूची तिला त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या योजतेय .नवऱ्यासाठी काहीही.
मालिका सात.... नायक श्रीमंत उद्योगपती नाईलाजाने गरीब घरच्या मुलीशी लग्न .त्याच्या उधळ्या लाडावलेल्या बहिणीचे तिच्या भावाशी लग्न . नायकाचे खरे दुसऱ्या श्रीमंत उद्योगपती मुलीशी प्रेमसंबंध . तरीही नायिकेला ते कळत नाही की दाखवत नाही ???ती नेहमी मान खाली घालून सहन करणारी . पती हाच परमेश्वर मानणारी . सर्व त्रास आनंदाने सहन करणारी .
मालिका आठ....... नायिकेला लग्न करायचे नाही तिला तिचे करियर करायचे आहे . तिच्याशी लग्न करणाऱ्या नायकाचे दुसऱ्या मुलीवर प्रेम. घरच्यांचा विरोध म्हणून नायक आणि नायिकेला जबरदस्तीने लग्न करावे लागते . आता नायिका नवऱ्याला त्याचे पाहिले प्रेम मिळवून द्यायचे प्रयत्न करतेय . त्यासाठी ती सासरच्या जाचक अटी ही सहन करते . आजी सासूचा त्रास सहन करतेय . नवऱ्याला आणि त्याच्या मैत्रिणीला होईल तितकी मदत करतेय . स्वतःचे करियर विसरून गेलीय . धन्य ती पत्नी .
मालिका नऊ  ..... नायक सुशिक्षित परदेशात राहून आलेला . नायिका गरीब अशिक्षित अडाणी . काही वेगळ्या परिस्थितीमुळे त्यांचे लग्न होते . पुन्हा सासूचा ,मामाचा त्रास आहेच . नवराही संशय घेईल असे प्रसंग ,शेवटी ती गायब नायक दुसरे लग्न करतो . तीही सालस सुशील पती हाच परमेश्वर मानणारी . परत मूळ नायिकेचे आगमन . नवऱ्यावरील प्रचंड प्रेमाने तिला दुसरी पत्नी स्वीकारावी लागलीय . नंतर दुसरी पत्नी गायब . मग परत नायिका गायब . तशीच दिसणारी दुसरी नायिकेचे आगमन . सासूच्या कारवाया सुरूच . मूळ नायिका दुसरीकडे आहेच . देवा काय चालू आहे हे कोणालाच माहीत नाही . पण नायिकेचा पती हाच परमेश्वर
मालिका दहा ..... ( रिऍलिटी शो)
संगीतावर आधारित कार्यक्रम . गायन स्पर्धा . काही वर्षांपूर्वी ह्याच कार्यक्रमातून विजेते झालेले आता एक सूत्रसंचालक आणि एक परीक्षक ,दुसरे एक दिग्दर्शक आणि एक सिनेमामुळे प्रसिद्धीस आलेले गायक . अतिशय घाईघाईत कार्यक्रम संपविला गेला . फायनलही live झाली . कार्यक्रम कधी आला कधी गेला ते कळलेच नाही
प्रत्यक्षात
रात्रीचे दोन वाजलेत माझा दारावरची बेल वाजली म्हणून मी घाईत दरवाजा उघडला तर समोर विक्रम उभा . अर्थात स्वारी फुल होती ते सांगायलाच नको. "बायको घरात घेत नाही म्हणून तुझ्याकडे आलो .बाहेर झोपतो सकाळी जाईन."असे म्हणत आत शिरला . तितक्यात सौ बाहेर आली  " भावोजी ..! तुम्ही घरात यायची गरज नाही पाहिजे तर याना घेऊन बाहेर जा .मीही तुम्हाला घरात घेणार नाही . आणि हो घरात खायला ही काही नाही . असे म्हणून आम्हा दोघांनाही घराबाहेर ढकलले .
सकाळी बंड्या रस्त्यात भेटला म्हणाला" च्यायलाभाऊ... असे वाटते मराठी सिरियलमधील एक नायिका बायको म्हणून मिळावी . सर्व कश्या सोशिक नाजूक ,सुंदर आणि मुख्य म्हणजे पती हाच परमेश्वर मानून त्याच्या सर्व चूक माफ करणाऱ्या . सासू विरुद्ध एकही शब्द न बोलणाऱ्या.मी रागाने त्याच्याकडे पाहिले . काही न कळून तो सरळ चालू पडला .घरी आलो तर शेजारचा गौरव डिस्कवरी चॅनल लावून बसला होता . विचारले तर म्हणाला " आई म्हणाली नुसते माझा देश माझे सैनिक त्यांना सलाम असे म्हणू नकोस तर ते कसे राहतात त्यांचे ट्रेनिंग कसे हे ही बघ म्हणून काल रात्री टीव्ही लावला तर तिने चॅनल बदलला म्हणाली मला ती सिरीयल पहायची आहे आज त्यात नायिकेच्या खुनाचा प्रयत्न होणार आहे . आज सकाळी पाहायला गेलो तर म्हणाली मला दुसरी सिरीयल पहायची आहे त्यात नायिका तिच्या नवऱ्याच्या प्रेयसीला रंगेहाथ पकडणार आहे .म्हणून तुमच्याकडे येऊन बघतोय .
© श्री. किरण बोरकर

Wednesday, January 10, 2018

व्योमकेश बक्षी  रहस्यकथा

व्योमकेश बक्षी  रहस्यकथा .... शरदिन्दू बंद्योपाध्याय
अनुवाद ......अशोक जैन
रोहन प्रकाशन
भारतीय शेलरॉक होम्स असे ज्याचे वर्णन केले जाते त्या व्योमकेश बक्षीच्या दोन कथा यात आहेत . प्राणिसंग्रहालय आणि चित्रचोर अश्या या कथा .  अतिशय गुंतागुंतीच्या तरीही वाचताना आनंद देणाऱ्या कथा वाचकांना गुंतवून ठेवतात हे निश्चितच .