Monday, November 21, 2022

पाटलीपुत्राचे राजपुत्र

पाटलीपुत्राचे राजपुत्र 
चाणक्य- चंद्रगुप्त-अशोक - त्रिधारा कादंबरी १
श्रेयस भावे 
अनुवाद..डॉ. वैशाली जुंदरे
राजहंस प्रकाशन 
संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल असावा .हे आर्य चाणक्यचे स्वप्न चंद्रगुप्ताने पूर्ण केले .त्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसारने हे साम्राज्य पुढे वाढविले.पण आता बिंदुसार मृत्यूशय्येवर आहे. त्याचे शंभर राजपुत्र वेगवेगळ्या राज्यात पसरले आहेत. बिंदुसारचा जेष्ठ पुत्र सुमेष आता राज्याची धुरा सांभाळतोय.पण तो सम्राट नाही . त्यासाठी त्याने अश्वमेध यज्ञ सुरू केला.
बिंदुसारला आपल्या आई आणि पित्याच्या मृत्यूचे कारण कळले आणि त्याने आर्य चाणक्यना  राज्याबाहेर हाकलवून दिले.आर्य चाणक्य आता कौटिल्य नावाने शहराबाहेर एक वेश्यालय चालवितात.खरे तर हा व्यवसाय म्हणजे त्यांचा एक बुरखा आहे. ते आजही तक्षशिलावर बारीक नजर ठेवून आहेत.ते आपल्या गुप्तचरांमार्फत अनेक मोहिमा घडवून आणतात. तक्षशिलाचा महामंत्री राधागुप्त त्यांचाच माणूस आहे .
अशोक हा बिंदुसारचा नावडता पुत्र. त्याची आई वैश्य म्हणून त्याचा राग करतात. त्याचे आयुष्य फक्त लढाया करण्यात  गेलंय. आताही त्याला अवंती नगरीतील बंड मोडायला जायचंय. सर्व सैन्य त्याच्या मर्जीवर चालतेय म्हणून बिंदुसार त्याला परवानगी देत नाही पण राजकुमार सुमेष त्याला परवानगी देतो.
ही कथा दोन कालावधीत घडतेय . दोन्ही घटनांमध्ये कालावधी साधारण पन्नास वर्षाचा आहे. 
पन्नास वर्षांपूर्वी 
ग्रीक सम्राट अलेक्झांडरने भारतात प्रवेश करून अनेक राज्य जिंकली. पण  पौरव राज्याचा  राजा पौरसने त्याला आव्हान दिले.पौरसला मदत कर हे सांगण्यासाठी चाणक्य  तक्षशिलेचे महाराज आंभीकडे जातात पण आंभी त्याला नकार देतो आणि अलेक्झांडरला मदत करतो.मग चाणक्य  नंद घराण्यातील धनानंदांकडेकडे जातो. पण तिथेही त्याला चोर म्हणून तुरुंगात टाकले जाते. कृतीदलाचे सभासद त्याला तुरुंगातून सोडवितात . पुढे तो चंद्रगुप्ताला सम्राट बनवितो.
त्यानंतर पन्नास वर्षांनी आज चाणक्यला सम्राट बिंदुसारनंतर अशोकला सम्राट बनवायचे आहे आणि तो पुन्हा आपली  चाणक्यनीती वापरून अशोकला सम्राट बनवेल का ?? त्यासाठी तो काय काय खेळी करतो ? अश्या अनेक रहस्याची  उकल सोडविण्यासाठी हे  पुस्तक वाचावे लागेल.

Friday, November 18, 2022

भयकथा दिवाळी अंक 2022

भयकथा दिवाळी अंक 2022
संपादक.. मानसी ताम्हणकर
निशांत म्हात्रे एक तरुण बस कंडक्टर बस क्रमांक  84 च्या  रूटवर असतो. त्या दिवशी रात्री अकरा वाजता एक सुंदर तरुणी मरिन लाईन्सच्या स्टॉपवरुन बसमध्ये चढली. तिकीट काढताना निशांत आणि तिची थोडी बाचाबाची झालीच .पण तरीही त्याने तिला बांद्रा स्टेशनवरून बँड स्टँडला कसे जायचे याचे मार्गदर्शन केलेच. 
नंतर तो रोज तिची वाट पाहू लागला .बस ड्रायव्हर जाधव मामाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही.एक दिवस बांद्रा स्टेशनला उतरताना तिने निशांतला नावाने हाक मारून दिलेली दहाची नोट चेक कर असे सांगितले.त्या नोटेवर तिने त्याला दादरच्या हॉटेलात दुपारी बारा वाजता भेटायला बोलावले होते.मनात धाकधूक ठेवून निशांत तिला भेटायला गेला तेव्हा तिने तिचे नाव नयन कामत सांगितले आणि निशांतची पूर्ण माहिती सांगितली. आपली इतकी अचूक माहिती ऐकून निशांत स्तब्ध झाला.नंतर तिने निशांतला लग्नाची मागणी घातली.अचानक लग्नाचा प्रस्ताव ऐकून निशांत चाट पडला.लग्न आणि तेही चार दिवसात कसे शक्य आहे ? थोडा विचार करायला वेळ दे असे सांगताच नयन चिडली आणि निघून गेली. कोण आहे नयन कामत ?? ती निशांत आणि त्याच्या परिवाराला कसे ओळखते ?? तिला ताबडतोब लग्न का करायचे आहे ?? या प्रश्नांचा शोध घेताना अनपेक्षित सत्य निशांतच्या समोर आले आणि तो हादरून गेला.
भयकथा .. 84 लिमिटेड ..मंदार माधव जोशी 
अश्या अनेक गूढ  अतर्क्य कथा आपल्याला वाचायला मिळतील भयकथा या दिवाळी अंकात

Monday, November 7, 2022

इनसाईड मॅन

इनसाईड मॅन
नेटफ्लिक्स
सत्य लपविण्यासाठी एक खोटे बोलले की मग पुढे काय घडत जाते त्यासाठी ही वेब सिरीज पाहायला हवी.
हॅरी एक पार्ट टाईम पाद्री अर्थात फादर .आठवड्यातील काही तास तो चर्चला देतो .त्याच्या घरी बायको मॅरी आणि तरुण मुलगा बेन .बेनला शिकविण्यासाठी येणारी ट्युशन टीचर जेनिस .
त्या दिवशी चर्च संपल्यावर हॅरीचा सेवक एडवर्ड आपला पेन ड्राईव्ह हॅरीला देतो.त्यात काही पॉर्न विडिओ आहेत असे सांगतो आणि आईला तो पेन ड्राईव्ह सापडू नये अशी त्याची इच्छा असते. एडवर्ड थोडासा मानसिक रुग्ण असतो. याविषयी कोणाला सांगणार नाही असे सांगून हॅरी घरी येतो .
घरी  जेनिस आलेली असते.ती काही गोष्टी बेनला देण्यासाठी पेन ड्राईव्ह मागते आणि घाईघाईत हॅरीकडील पेन ड्राईव्ह तो तिला देतो. गोंधळलेला हॅरी बेनला त्या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे ते सांगतो .
तोपर्यंत जेनिसने पेन ड्राईव्ह ओपन केलेला असतो . त्यातील विडिओ पाहून तिला धक्का बसतो. वडिलांना वाचविण्यासाठी बेन तो पेन ड्राईव्ह त्याचाच आहे असे जेनिसला सांगतो .
पण त्या पेन ड्राईव्हमध्ये साधे पॉर्न नसते तर लहान मुलांचे लैंगिक शोषणाचे विडिओ असतात. पाद्रीच्या नियमानुसार हॅरीला तो पेन ड्राईव्ह कोणाचा आहे तो सांगता येत नाही .तर जेनिसला तो पेन ड्राईव्ह बेनचा आहे अशी खात्री पटते.जेनिस पोलिसांकडे जाईल म्हणून नाईलाजाने हॅरी तिला तळघरात कोंडून ठेवतो .
त्या तुरुंगात मृत्युदंड दिलेले दोन कैदी आहेत.एक विकृत खुनी ज्याने पंधरा स्त्रियांचे खून केले आहेत पण त्याची मेमरी पक्की आहे .तर दुसरा डॉ. जेफ्री ज्याने आपल्या पत्नीचा खून करून तिचे डोके लपवून ठेवले आहे आणि गुन्हा कबूल केला आहे.डॉ. जेफ्री क्रिमिनोलॉजिमध्ये डॉक्टर आहे .इतरांपेक्षा तो नेहमी वेगळा आणि दुसऱ्या बाजूने विचार करतो. काहीजण आपल्या अडचणीच्या केस घेऊन जेफ्रीकडे येतात.त्या योग्य असतील तर जेफ्री सोडवून देतो.
बेथची आणि जेसिकाची ओळख ट्रेनमध्ये झाली. बेथ एक पत्रकार आहे.बेथने तिला कॉफीसाठी बोलावले होते .पण तिचा काहीच रिप्लाय येत नाही .उलट एक गोंधळून टाकणारा मेसेज येतो. जेसिकाचा फोन लागत नाही .ती कुठे आहे हे तिला माहीत नाही.नाईलाजाने ती डॉ. जेफ्रीकडे मदत मागते.पण त्या आधी तिला जेफ्रीच्या वेगळ्या केसमध्ये मदत करावी लागते .
हॅरी स्वतः ला आणि बेनला निरपराध शाबीत करेल का ? त्यासाठी तो आपले नियम मोडेल का ? जेफ्री असे कोणते तर्क काढेल ज्यामुळे बेथला जेसिकाचा शोध लागेल. एक सत्य लपविण्यासाठी हॅरी कोणत्या थराला जाईल ?
पहिला सिजन फक्त चार भागाचा आहे.साधारण एक तासाचा एक एपिसोड .अनेक तर्कवितर्क लढवीत ही मालिका उत्कंठा वाढवीत पुढे सरकते.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .मोजकी पात्रे सलग घटनाक्रम यामुळे मालिका पकड घेते.

Saturday, November 5, 2022

काय लागतं जगायला ?....डॉ. नम्रता पडवळ

काय लागतं जगायला ?....डॉ. नम्रता पडवळ 
लोकव्रत प्रकाशन 
लेखिका व्यवसायाने फिजिओथेरिपिस्ट आहे.आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी ती कागदावर उतरवते. तिचे हे म्हणणे शब्दशः खरे आहे हे हा कथासंग्रह वाचल्यावर कळते. यात गोष्टी छोट्या आहेत.शब्दानेही आणि विषयानेही . पण त्या वाचताना आपण नकळत गुंतत जातो.त्या कथेचा एक भाग बनतो.त्यातील घडणाऱ्या घटनांच्या जवळपास आपण हजर आहोत आणि आपल्या डोळ्यासमोर ते घडतेय असे वाटते.
तिच्या पहिल्या वासरू कथेत गाय आणि वासराचे निर्मळ नाते उलगडून दाखविले आहे . परिस्थितीनुसार वासरात होणाऱ्या बदलाचे सूक्ष्मपणे निरीक्षण केले आहे.
मर्मबंधातील ठेव यात लेखिकेने आपल्या मराठी विषयाच्या शिक्षिकेला शालांत परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवून एक प्रकारची भेटच दिली आहे .तीच मर्मबंधातील ठेव आहे तिच्यासाठी.
गोंडस गुलाबी गाठोडं आणि चिरंजीव या दोन कथेत त्यांनी सहा वर्षाच्या मुलाचा खोडकरपणा आणि आपल्या लहान बहिणीबद्दलचे प्रेम काळजी आणि समजूतदारपणा दाखविला आहे.या दोन्ही गोष्टी त्यांनी इतक्या सहज सोप्या आणि गोड भाषेत लिहिल्या आहेत त्याबद्दल कौतुक करावे तितके कमीच.प्रत्येकाला आपल्या मुलाच्या बालपणीच्या खोड्या आठवतील.माझ्यामते त्यांनी चिरंजीव या पात्रावर अनेक कथांची मालिका लिहावी.
लेखिकेने छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद असतो आणि तो कसा मिळवावा हेच या पुस्तकातून सांगितले आहे.मनावर जर ताण असेल तर हे पुस्तक काढून त्यातील कोणतीही एक कथा वाचून ताण हलका करावा असेच हे पुस्तक आहे.
मी यातील इतर कथांविषयी लिहीत नाही .तुम्हीच पुस्तक वाचून आनंद घ्या .
डॉ. नम्रता मॅडमनी वेळातवेळ काढून माझ्या घरी येऊन पुस्तक भेट दिले यासाठी त्यांचे मनापासून आभार .यापुढेही त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित होवो आणि साहित्याची सेवा घडो .