Friday, May 31, 2019

आमचा मुलगा

आमचा मुलगा
"आहो..... झाली का तयारी...?? की अजून काही बाकी आहे ...."?? तिने नवऱ्याला लटक्या रागाने विचारले.
"हो.. हो ....झाली सर्व तयारी .. आणि असे काय मोठे सामान आहे माझ्याकडे....?? तुझेच जास्त ...".त्यानेही हसून उत्तर दिले .
" वाटले नव्हते हो... हा दिवस येईल ..कोणी वीस बावीस वर्षांपूर्वी तुम्ही परदेशात जाल असे सांगितले असते तर विश्वास बसला असता का... ???  ती भूतकाळात हरवून गेली.
"हो ग.... लग्न तरी होईल का आपले..?? यावर ही विश्वास नव्हता .."तो पुन्हा हसत म्हणाला.
" पण आज लग्न होऊन मुलगा झाला आणि तो नुसता शिकला नाही तर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आणि पदवीदान समारंभाला आपल्याला तिथे बोलाविले आहे हे सारे स्वप्नवत वाटतेय मला" ती भरल्या कंठाने म्हणाली.
"हो ना ...ही सर्व त्याचीच मेहनत आपण फक्त पाठिंबा देणारे ...दुसरे करूच काय शकत होतो आपण.. जन्माला आला तेव्हा  त्याने जोरात हातपाय हलविले ते पाहून किती खुश झाले होते मी ..."ती आठवणीत हरवून गेली होती .
"आणि तू जेव्हा सांगितलंस की लबाड बघा कसा बघून हसला तेव्हाच क्षण तर मी विसरुच शकत नाही". तो ही आता भूतकाळात रमून गेला.
" मग त्याला वाढविताना होणारी तारांबळ ..तू तर दिवसभर दुकानात आणि मी घरी हार बनवीत . आलटून पालटून त्याच्यावर लक्ष ठेवायचो . शाळेत नेताना त्याचे भोकाड पसरणे आणि मग तुझे घरी येऊन रडणे अजूनही विसरता येत नाही . पण तो हळू हळू मोठा कधी झाला ते कळलेच नाही .आपली अवस्था पाहून त्याने स्वतःलाच घडवायला सुरवात केली . आपण आपल्यापरीने त्याला कमी पडू दिले नाही . त्याला चित्रपट दाखवायची जबाबदारी माझी तर संगीताची रुची तुम्ही निर्माण केलीत. शारीरिक मेहनतीचे महत्व तुम्ही पटवून दिलेत त्याला".ती भावनाविवश झाली.
" तो मोठा झाल्यावर दुकानात बसून मला मदत करू लागला घरी आल्यावर तुला या सर्व कामात... तो अभ्यास कधी करायचा ते कळत नव्हते .दहावीला गेल्यावर त्याची हुशारी पाहून पुढे काय करावे यासाठी प्रिंसिपलने मला बोलावले होते .पण मला पाहून त्यांना धक्का बसला" तो हसत म्हणाला.
"मग आंधळ्या पालकाला समोर पाहून धक्काच बसणार ना ....?? तिने हसत विचारले आणि दोघेही हसू लागले.ह्याला कोणाची सहानुभूती आवडायची नाही . अजूनही स्वतःहून कोणाला सांगत नाहीत माझी आई हातापायाने अधू तर वडील आंधळे आहेत .
" मी आंधळा आणि तू अधू . चालताना तुला आधार लागतो .."तसे दोघेही एकमेकांना टाळी देऊन हसू लागले .
"पण आपल्या मुलाने तेअपंगत्व कधीही जाणवू दिले नाही . तो त्याच्यापरीने पुढे जात राहिला. जमेल तसे अभ्यास सांभाळून आपल्याला मदत करीत होता .शिक्षवृत्ती मिळवून पदवीधर झाला आणि पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जायची संधी चालून आली पण आपले काय होईल या विचाराने त्याने प्रथम नकारच दिला होता ...."त्याने डोळे पुसत आठवणी जाग्या केल्या.
"हो पण त्याचवेळी तुम्ही सावरलात त्याला ...तो नसतानाही आम्ही जगत होतो की एकमेकांच्या आधाराने......मुलगा आयुष्यात आला आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळाली . त्याला वाढविण्याच्या उर्मीनेच  नवे बळ मिळाले आम्हाला.. हे समजावले तेव्हा तो परदेशी गेला . पुन्हा आपण आपल्या पूर्वीच्या आयुष्यात परत गेलो . पण आताचे आयुष्य पूर्वीपेक्षाही कठीण होते . कारण त्याच्या असण्याची सवय झाली होती .थोडे परावलंबी झालो होतो. त्याच्या जाण्याने आयुष्यातील मरगळ झटकलीआणि पुन्हा उभे राहिलो. पुन्हा ही दोन वर्षं कशी गेली हे कळलेच नाही...."त्याचा स्वर पुन्हा उत्साहाने भरला.
" हो ना ....आणि चार महिन्यांपूर्वी त्याने पहिल्या श्रेणीत पास झाल्याची बातमी दिली त्याच बरोबर पदवीदान समारंभाला हजर राहण्याचे आमंत्रण ही. आपल्यासारख्या अपंग आईवडिलांच्या दृष्टीने यापेक्षा आनंदाचा क्षण कोणता ..?? बोलता बोलता तिला गहिवरून आले .
"अग वेडे रडू नकोस आता ... हे अश्रू त्याच्या पदवीदान समारंभासाठी जपून ठेव .. दाखवून देऊ सर्वाना ...माणसाचे शरीर अपंग असते मन नाही . मन  तरुण आणि उत्साही असले तर काहीही घडू शकते.." असे बोलून त्याने आपली लाल पांढरी घडीची काठी सरळ केली आणि बायकोचा हात धरून बाहेर पडला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, May 29, 2019

बेअर आयलंड.... अँलिस्टर मॅक्लिन

बेअर आयलंड.... अँलिस्टर मॅक्लिन
अनुवाद ...... अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
त्या जुन्या मालवाहू जहाजाचे  प्रवासी जहाजात रूपांतर झाले होते आणि ते आता एका फिल्म युनिटला घेऊन आर्क्टिक महासागरातील बर्फाच्छादित बेटाकडे निघाले होते . त्या ओसाड बेटावर एका चित्रपटाचे चित्रीकरण होणार होते. पण अचानक त्या प्रवासात काहीजण मरण संशयास्पदरित्या मरण पावले . तर काहीजण बेटावर मरण पावले .खुनी माणूस युनिटमधील आहे . कोण आहे त्यामागे. त्याचा हेतू काय आहे ??? ह्या घटनेचे मूळ दुसऱ्या महायुद्धात दडले आहे का ??? मनाचा ताण वाढविणारी ही कादंबरी वाचायला हवीच .

Sunday, May 26, 2019

गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी

गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी
लेखक ...... शेषराव मोरे
राजहंस प्रकाशन
सावरकरांना न्यायालयाने निर्दोष जाहीर केले तरी गेल्या पंधरा वर्षांपासून परत त्यांच्यावर गांधीहत्येची चिखलफेक चालू आहे .
गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी कपूर आयोग कशासाठी स्थापन केला होता ....?? या आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे मत कसे दिले ...??आयोगासमोर वीस वर्षानंतर कोणता नवीन पुरावा आला होता ..???
सावरकरांचे गांधीजी...गोडसे ..नेहरू ..काँग्रेस...यांच्याशी कसे संबंध होते..??
मुंबई पोलिसांनी गांधीहत्येचा कसा तपास केला ...??
गांधीहत्येनंतर देशात काय परिणाम होतील याचा सावरकरांनी विचार केला नसेल का... ??
अखेरच्या काळात नथुराम गोडसे आणि सावरकरांचे कसे संबंध होते ...??
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे हे पुस्तक

Sunday, May 19, 2019

फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे ....ई. एल. जेम्स

फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे ....ई. एल. जेम्स
अनुवाद.....शोभना शिकनीस
मेहता पब्लिशिंग हाऊस
पदवीधर होणारी ऍनास्टाशिया स्टील कॉलेजच्या मासिकासाठी प्रसिद्ध तरुण उद्योगपती ख्रिश्चन ग्रे याच्या ऑफिसमध्ये शिरते आणि ख्रिश्चन तिच्या प्रेमात पडतो . दोघेही एकमेकांकडे आकर्षिले जातात . पण ख्रिश्चनच्या शारीरिक संबंधविषयी काही अटी आहेत . तो या अटीबाबत आग्रही आहे आणि या अटी पूर्ण करण्यासाठी त्याने एक करारनामा ही तयार केलाय . आपल्याला शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर या करारावर सह्या कराव्या लागतील असे तो ऍनाला सांगतो . तिच्यावर भारी पडून वेदना देऊन सुख मिळवणे हेच ख्रिश्चनसाठी सुख असते .. तिला त्याला गमवायचे ही नाही आणि या अटी स्वीकाराच्या का ?? अश्या पेचात ती अडकते . ती त्यासंबंधी अजून जाणून घेण्यासाठी वेळ घेते .पण पुढे काय घडते .....??
स्त्री पुरुष शारीरिक संबंधाचे अतिरंजित वर्णन केलेले हे पुस्तक आहे . पुरुषांचे संभोगसंबंधी कल्पनाविश्वच यापुस्तकाद्वारे उघड करते. कथा नेहमीच्या प्रेमप्रकरणासारखी पुढे सरकते . अतिश्रीमंत नायक आणि गरीब नायिका . पण त्यांचे संबंध खूपच विस्ताराने आणि रंजकपणे लिहिले आहेत . हीच या पुस्तकाची खरी ओळख आहे . ख्रिश्चनचे खास शयनगृह त्यात असलेली विविध साधने ,त्याचा त्याने केलेला वापर वाचून आपण उद्दीपित होतो .

Monday, May 13, 2019

काश्मीर... .धुमसते बर्फ ...जगमोहन

काश्मीर... .धुमसते बर्फ ...जगमोहन
अनुवाद .......मो. ग . तपस्वी
मोरया प्रकाशन
श्री. जगमोहन हे काश्मीरचे दोनवेळा राज्यपाल होते .पहिल्यांदा एप्रिल 1984 ते जून 1986 आणि दुसर्यावेळी जानेवारी 1990 ते मे 1990 अशी त्यांची कारकीर्द होती . काश्मीरमधील परिस्थितीचा त्यांनी सखोलपणे अभ्यास करूनच हे पुस्तक लिहिले आहे .राज्यपाल या नात्याने त्यांचा ज्या गोष्टींशी संबंध आला त्या घटना प्रामाणिकपणे जनतेसमोर मांडणे हे त्यांनी कर्तव्य समजले . भारतीय राजकारणाचा ढोंगीपणा पाहून ते निराश झाले.त्यांचे धुमसणे पुस्तकरूपाने बाहेर पडले.अतिशय योजनाबद्ध असे हे पुस्तक आहे . यात काश्मीरचा अगदी मुळापासून इतिहास आहे . 370 कलम विस्ताराने लिहिले आहे . डॉ. फारुक अब्दुला.... त्यांची घराणेशाही.... त्यांनी केलेला काश्मीरचा वापर.... अतिशय मोकळेपणाने लिहिले आहे .

Sunday, May 12, 2019

मातृदिन


मातृदिन
नेहमीप्रमाणे तिला आधार देत तो हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये शिरला आणि लिफ्टमॅनने त्याला पाहून ओळखीचा हात दाखविला.तिला घेऊन तिसऱ्या मजल्यावरील डॉक्टरांच्या रूमजवळ येईपर्यंत बरेच  ओळखीचे चेहरे समोर येऊन हसून गेले.तो सर्वांशी हसून ओळख दाखवीत होता फक्त तिच्या चेहऱ्यावर कसलीच ओळख नव्हती.हातात छोटी बाहुली घेऊन ती फक्त तिच्याशीच खेळत होती .मधेच तिच्या छोट्या पर्समधून जेम्सची गोळी हळूच तोंडात टाकत होती . आधाराला तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता.
"कश्या आहात आजी...."???? रिसेप्शनवरील नर्सने गोड हसत तिला विचारले.
"तूच आजी .....असे म्हणत तिने तिला जीभ काढून वेडावले. त्याने हसत तिला वेटिंग रूम मध्ये बसविले.
तिच्याकडे बघताना त्याचे मन भूतकाळात गेले. गेली तीन  वर्षे तो हिला घेऊन हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी येत होता.तिचेही वय झाले होते आणि त्यादिवशी ती बाथरूममध्ये पडली . त्यानंतर जणू ती सर्व विसरूनच गेली.आपले वय काय ...?? आपल्याला मुले आहेत..??? जावई आहे... नातवंडे आहेत ..सर्व काही विसरून ती बालपणात रमू लागली.मग तिची सर्व जबाबदारी ह्याच्यावरच पडली.काय करणार हा तरी .. पत्नी लवकरच देवाघरी गेली. मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेला तो परत यायचे नाव घेत नाही . मुली लग्न करून सासरी गेली . तिलाही तिच्या सासू सासाऱ्यांची काळजी आहेच . मग राहिला कोण ....?? तर हाच .  पण ह्याने तिला टाकले नाही . जमेल तिचे सर्व करत होता . ती आता लहान बाळच झाली होती . मध्येच तिला वर्तमान आठवे पण परत भूतकाळात जायची . यानेही तिची अवस्था पाहून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती . तसेही पैश्याची आता फार गरज नव्हती होता तो पुष्कळ होता . मग आता तिला सांभाळणे हेच त्यांचे काम . तिला आंघोळ घाला..जेवण भरवा गोष्टी सांगा ,तिच्या विविध प्रश्नांची उत्तरे द्या . जीव नुसता भंडावून जात असे . कधी कधी विचार करायचा आपल्या पत्नीने कसे मुलांना आणि आपल्याला सांभाळत संसार केला असेल....?? मनोमन तिच्या पाया पडत असे . कामाच्या गडबडीत आपण कधी या गोष्टीकडे लक्षच दिले नाही . त्याचेच हे फळ आहे की काय ....???
विचार करीत असतानाच डॉक्टरने आत बोलावले . चेकिंग करून झाल्यावर काही सुधारणा नाही या अर्थाने मान डोलावली .
"विचार कर ....तिला वृद्धाश्रमात ठेव. पुढे पुढे परिस्थिती गंभीर होणार आहे ... नाही झेपणार तुला .." डॉक्टर त्याला समजावत होता.अर्थात तो त्याचा लहानपणापासूनचा मित्र त्यामुळे त्याला बोलायचा अधिकार होताच . त्याने हसून नकारार्थी मान डोलावली.
" जमेल तितके करेन ...पण मीच करेन "तसा डॉक्टर वैतागला.
"अरे तिला तिचे इतर नातलग आहेत ना ...?? तुझी ती सासू आहे मान्य ...पण वहिनी गेल्यावर तसा फारसा संबंध राहतो कुठे ..??  कोण आले का तुला मदत करायला तिकडून . उलट हिला ही तुझ्याकडे सोडून गेले . आता विचारत ही नाहीत आई जिवंत आहे की गेली"....तो हसला. स्वतःच्या धुंदीत निरागसपणे बहुलीशी खेळत असलेल्या आपल्या सासूबाईकडे पाहत म्हणाला "मग मी ही तेच करायचे का ....?? अर्ध्या संसारातून बायको सोडून गेली . मुले नुकतीच तारुण्याच्या उंबरठ्यावर .अश्यावेळी ही माझी सासू पुढे आली . मुलांचा सांभाळ केला .त्यांना योग्य वळण लावले . आज हिच्यामुळेच ती योग्य मार्गाला लागली आपले आयुष्य जगतायत .अरे फक्त तीनच वर्ष झाली तिची अशी अवस्था होऊन . आणि  त्रास होतो जमत नाही म्हणून वृद्धाश्रमात सोडायचे . तिची मुलगी म्हणजेच माझी बायको गेल्यावर तिने मुलांना हॉस्टेलला ठेव असा सल्ला नाही दिला तर त्यांना स्वतःच्या पंखाखाली घेतले.. वाढविले .मला सावरले . तसे मलाही मातृसुख नाहीच . बायको ही नाही . मुले आपापले पाहतायत . मग मी का तिला सोडू .सासूच आहे रे ती ......कोणी परकी दूरची नातलग नाही . करेन मी जमेल तितके"असे बोलून तो तिला घेऊन बाहेर पडला. रस्त्यात त्याने मोबाईल चेक केला . मुलाचा आणि मुलीचा हॅप्पी मदर्स डे चे व्हाट्स अप मेसेज होते . त्याने तिला त्यांचे मेसेज दाखविले . मुलांचे फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ती टाळ्या वाजवू लागली . तिचा चेहरा पाहून तो सुखावला . घरी येतानाच तो छोटासा केक घेऊन आला .तिची तयारी करून बायकोच्या फोटोजवळ केक घेऊन उभा राहिला .हॅप्पी मदर्स डे म्हणत केक कापला आणि छोटा तुकडा सासूच्या तोंडात भरविला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, May 8, 2019

विस्मयकारी विज्ञानकथा ...प्रा. सुनील विभुते

विस्मयकारी विज्ञानकथा ...प्रा. सुनील विभुते
मल्टिव्हर्सिटी प्रकाशन
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे.. तोटे.. मनोरंजक सहजसोप्या पद्धतीने मांडलेला हा विज्ञानकथा संग्रह.यामध्ये जैवतंत्रज्ञान...अणूऊर्जा..पॉलिमर कॉम्प्युटर ..अश्या विविध क्षेत्रातील कथा लेखकाने खूपच सोप्या पद्धतीने मांडल्या आहेत .आपल्या नेहमीच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे या आपल्या जीवनातील एक भाग बनू शकतात .अनपेक्षित कलाटणी आणि सहज सोपी पद्धत यामुळे प्रत्येक कथा शेवटपर्यंत वाचनीय आहेत .सर्व थरातील वाचकांना आवडतील अश्या विज्ञानकथा नक्की वाचा