Saturday, May 28, 2022

बाळासाहेब ठाकरे हंशा आणि टाळ्या .!

बाळासाहेब ठाकरे हंशा आणि टाळ्या .!
संकलन .....योगेंद्र ठाकूर 
आमोद प्रकाशन 
बाळासाहेब ठाकरेंच्या ७५ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांची गाजलेली भाषणे संग्रहित केली आहेत.या सर्व भाषणात त्यांचा मिश्किल स्वभाव ,रोखठोकपणा दिसून येतो. विविध ठिकाणी केलेली सोळा भाषणे  व्यंगचित्रकार म्हणून त्यांची माहिती आणि काही गाजलेली व्यंग्यचित्रे यात समाविष्ट आहेत.
१९८९ साली लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे १४ खासदार निवडून आले होते .त्यावेळी त्यांचा सत्कार शिवाजी पार्क येथे संपन्न झाला .त्यावेळी त्यांचा शपथविधी शिवतीर्थावर होईल अशी घोषणा त्यांनी केली.
मार्च १९९५ साली  सेना भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. त्याआधी बाळासाहेबांनी अनेक प्रचारसभा घेतल्या.त्यातील नगर तालुक्यातील सोनई गावातील जाहीर सभेत आपले धगधगते विचार मांडले.
१९९७ साली मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूक प्रचाराची नरेपार्क परेल येथील सभा.त्यावेळी बंडखोर उमेदवारांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला .
स्वातंत्रवीर सावरकर स्मारकात  १९९१ शिवसेनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात केलेले भाषण.
अशी काही गाजलेली भाषणे ,त्यावेळी त्यांना मिळालेला प्रतिसाद, लोकांच्या उस्फूर्त प्रतिक्रिया आपल्याला अनुभवायला मिळतात.
पाकधार्जिण मुस्लिमाना त्यांनी प्रत्येक भाषणात शिव्या दिल्या तर राष्ट्रप्रेमी मुस्लिमांचा  नेहमीच आदर केला . झोपडपट्टीवासीयाना मोफत घरे  ,मुंबई पुणे चौपदरी रस्ता ही त्यांची स्वप्ने होती आणि वेळोवेळी त्यांनी आपल्या भाषणात या गोष्टींचा उल्लेख केला.
काँग्रेस आणि शरद पवार त्यांचे कट्टर शत्रू ,त्यांनी  त्यांच्यावर नेहमीच तिखट भाषेत टीका केली .
आज काळाआड गेलेली त्यांची भाषणे त्यांचे विचार वाचणे आपल्याला नक्कीच आवडेल.

Thursday, May 19, 2022

मुंबईकर आणि मोबाईल

मुंबईकर आणि मोबाईल
काही म्हणा पण मोबाईलवर  बोलणे ही एक कलाच आहे .  हो...! आता मला जमत नाही म्हणजे ती कलाच नाही का ...??  तुमच्यात कोणतीच कला नाही असे सौ म्हणते ते बरोबरच आहे .
जाऊ दे , उगाच विषयांतर नको . तर ...त्याचे काय झाले. मी आपला नेहमीसारखा 8.40 ची  फास्ट पकडायला घाईघाईत निघालो आणि  अण्णाच्या टपरीसमोरच मागून बाईकवाला  कट मारून गेला . समोरच्या रेणू निवासमधील  ज्युलि फर्नांडिसकडे मी बघत चाललो होतो म्हणून तो बाईकवाला मला दिसला नाही.असे भाऊ आणि विक्रम चार लोकांना दुसऱ्या दिवशी सांगणार हे नक्की.  मी अश्या फालतू गोष्टीकडे लक्षच देत नाही . पण मला कट मारून जाताना त्या बाईकवाल्याने कान आणि खांद्यामध्ये पकडलेला  मोबाईल सोडला नाही याचे जास्त आश्चर्य वाटले.
कसे जमते हो याना असे फोनवर बोलायला..?? .त्या दिवशी स्टेशनबाहेर  गोखले बाई माझ्याकडे पाहून हसत येत होत्या .च्यायला.. !  मीच की मागचा, या विचाराने दोनदा तीनदा मागे , आजूबाजूला वळून वळून पाहिले तर कोणीच नाही . मग मीही हसलो. जवळ आल्यावर लक्षात आले त्यांनी कानात पॉड टाकले होते आणि फोनवर हसत बोलत होत्या .तश्या त्या मूडमध्ये असल्यावर हसतात कधीकधी . आम्ही रोजचे प्रवासी ना ...एकमेकांकडे पाहून समजते राईट टायमात आहोत.
हल्ली स्मार्टफोनचा जमाना आलाय .माझ्याकडेही आहे म्हणा . हो..हो.. माझ्या पैश्यानेच घेतलेला  तोही हप्त्यावर .मेव्हणाने एकदा नोकियाचा बटनाचा फोन दिला म्हणून काय प्रत्येकवेळी तो देईल का ...?? 
8.40 ला नेहमीप्रमाणे उभे राहायला मिळाले .पण हल्ली पूर्वीसारखी भांडणे होत नाही .मारामारी होत नाही .एकमेकांच्या सात पिढ्या खाली येत नाहीत. जोतो स्वतः ला ऍडजस्ट करून मोबाईलमध्ये डोके खुपसून बसतो . कोणी व्हाट्सअप , कोणी चित्रपट , तर कोणी गेम खेळत बसतो. मी आपला चौथी सीट कधी कुठे मिळेल याचाच शोध घेत असतो. 
पण या घारपुरेला अजूनही फोनवर व्यवस्थीत बोलता येत नाही . आज डब्यात पावटे दिलेत आणि सॅलेड घरी विसरला म्हणून बायकोशी भांडत बसलाय फोनवर. तर तो चव्हाण बघा... चुलतसासरे वरती गेल्यावर इस्टेटीचे वाटे कसे करायचे याचे सल्ले देतोय. आख्खा डब्बा त्यांची बोलणे ऐकतोय . 
पण त्या कोपऱ्यातल्या कॉलेज तरुणावर  काही फरक पडत नाही . तो आपला स्वतःशी गालातल्या गालात हसत फोन ओठांच्या जवळ नेऊन बोलतोय. बाजूला बसलेला आमचा प्रभू कान लावून त्याचे बोलणे ऐकायचे प्रयत्न करतोय पण काहीच ऐकू येत नसेल त्याला  आणि तो म्हातारा बघा , चेहऱ्यावरील भाव पाहूनच काय बघत असेल ते कळते.
खरच फोनवर बोलणे ही एक कलाच आहे . सौ एका सुरातच सगळ्यांशी बोलत असते अगदी बिनधास्त . पण हळू आणि प्रेमाने बोलत असली की समजावे माहेरचा कॉल आहे.पोरगा बऱ्याचवेळा सांगतो हळू बोल माझे ऑनलाईन काम सुरू आहे पण काहीच फरक पडत नाही तिला . 
पोरगी इतकी  हळू बोलते की तिचे तिलाच कळत असेल की नाही याची शंका वाटते .पोरगा तर केविलवाणा चेहरा करूनच बोलत असतो.वर्क फ्रॉम होमचा परिणाम असेल. 
माझे काय म्हणता .... ?? आहो मी फक्त हो ..बरे, चालेल ,बाकी काय, इतकेच बोलतो .समोरचा संधीच देत नाही बोलायला आणि मला कोण फोन करणार म्हणा ....एक बॉस किंवा घरचेच  आता त्यांच्यापुढे कोणाची हिंमत असते का बोलायची .
 लोकल  शेवटच्या स्टॉपवर आली तरी त्या कोपऱ्यातल्या तरुणांचे बोलणे संपले नाही .चालता चालता बोलत निघाला बघा .
ओ ताई .! रस्ता ओलांडताना  मोबाईल कश्याला बघता . तो कारवाला बघा तुम्हाला शिव्या देतोय.थोडक्यात वाचलात तुम्ही. चालताना तरी मोबाईल पर्समध्ये ठेवा .
आणि हे काय ...दाते मॅडम सुट्टीवरून लवकर परतल्या .च्यायला... गळ्यातील मंगळसूत्र कुठे गेले ..?? हल्ली मोबाईलमध्ये सतत लक्ष घालून होत्या . विचारुयाच काय झाले ...?? झाले,  मानकामे घुसला सवयीप्रमाणे पुढे . अरे देवा ...सकाळी निघताना  नेहमीप्रमाणे नेकबँड घातला आणि  मंगळसूत्र काढून ठेवले आणि पुन्हा घालायला विसरली म्हणे ..
धन्य आहे तो फोन 
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

Tuesday, May 17, 2022

टार्गेट... डेव्हिड बॅल्डसी

टार्गेट... डेव्हिड बॅल्डसी
अनुवाद ..डॉ. चंद्रशेखर चिंगरे 
श्रीराम बुक एजन्सी 
विल रॉबी आणि जेसीका रील अमेरिकेचे सर्वोत्तम एजंट समजले जातात. अतिशय कठीण आणि घातक कामगिऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्याविरुद्ध बंड करण्याची योजना अयशस्वी होते. दुसऱ्या क्रमांकाचा नेता जनरल पाक या बंडाचा नेता होता. या बंडाला अमेरिकेचा पाठिंबा आहे.  पण आपला पाठिंबा उघडकीस येऊ नये म्हणून अमेरिका जनरल पाकला मारण्यासाठी जेसीका रील आणि विल रॉबी याना पाठविते.मृत्यूपूर्वी  जनरल पाक अमेरिकेकडे आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करण्याची मागणी करतो.
राष्ट्राध्यक्ष जनरल पाकच्या कुटुंबियांना उत्तर कोरियातील छळ छावणीतून सुटका करण्यासाठी रील आणि रॉबीची नेमणूक करतो. ते पाकच्या कुटुंबियांची छळछावणीतून सुटका करतात .पण उत्तर कोरियातील सर्वोच्च नेता हा आपला अपमान समजतो आणि राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबियाला जीवे मारण्याचा हुकूम देतो.
चुंग चा ही उत्तर कोरियातील सर्वोत्कृष्ट मारेकरी आहे.अतिशय थंड रक्ताची ,क्रूर स्त्री म्हणून ओळखली जाते. ती राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी आणि दोन मुलांना ठार करण्यासाठी अमेरिकेत दाखल झाली आहे. पण रील आणि रॉबी हे तिच्या मार्गातील प्रमुख अडसर आहेत.खरोखर ती आपल्या कामगिरीत यशस्वी होईल.
शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी कादंबरी .

Friday, May 6, 2022

रोझलिंड फ्रॅंकलीन

रोझलिंड फ्रॅंकलीन
द डार्क लेडी ऑफ डीएनए.... वीणा गवाणकर
शात्रज्ञ म्हणून स्त्रियांना जगभरात नेहमीच दुय्यम स्थान मिळाले आहे.अगदी अमेरिकेसारख्या प्रगत देशातही संशोधनक्षेत्रात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली गेली.अश्या वेळी स्त्री शास्त्रज्ञांना आपले स्थान टिकविण्यासाठी खूप परिश्रम करावे लागले.काहींनी तर विनावेतन काम केले. योग्यता असून दुय्यम स्थान स्वीकारावे लागले.
नोबेल पुरस्कार विजेते  डॉ. जेम्स डी. वॉटसन याना त्यांच्या डीएनए संशोधनाबाबत प्रश्न विचारले जातात तेव्हा डॉ. रोझलिंड फ्रॅंकलीन हिच्या योगदानाबद्दल प्रश्न केला जातो.
डॉ. जेम्स डी. वॉटसन याना डीएनए रेणू रचनेचा शोध लावल्याबद्दल नोबेल पुरस्कार त्रिभागून मिळाला होता.डीएनए शोधामुळे माणसाच्या जनुकांचे रहस्य उलगडणार होते.
डॉ. जेम्स डी. वॉटसन यांनी आपल्या "द डबल हेलिक्स" पुस्तकात डॉ. रोझलिंडविषयी जी भाषा वापरली ती अनेकांना रुचली नाही .डॉ. रोझलिंडने केलेले संशोधन आणि तिने घेतलेली छायाचित्रे तिच्या नकळत आम्ही वापरली.तिच्या संशोधनाविषयी आम्ही किती जाणून होतो हे तिला कधी समजलच नाही .असे जाहीर केले आणि सर्व वाद उफाळून आला.
लंडन येथे रोझलिंडचा जन्म झाला.फ्रँकलिन हे मूळचे ज्यू.फ्रॅंकलिन घराणे श्रीमंत होते.लंडन येथे त्यांचे अनेक व्यवसाय होते.
रोझीलिंड जन्मतः हुशार होती.लहानपणी ती बिनचूक गणिते सोडवीत असे.पण त्यावेळी स्त्रियांना  फक्त घरकामात लक्ष देण्यास सांगितले जात असे.खुद्द तिचे वडील ही स्त्रियांनी नोकरी करण्याच्या विरोधात होते.तब्बेतीच्या कारणांमुळे रोझीलिंडला कुटुंबापासून दूर बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवले तेव्हापासून ती अंतर्मुख झाली. बहुतेक सर्व शालेय विषयात ती पहिलीच असायची .विज्ञानात ओढा असल्यामुळे घरच्यांचा विरोध पत्करून तिने शात्रज्ञ होण्याचे ठरविले. कोळसा ,डीएनए, आरएनए विषाणू  या क्षेत्रात तिने विपुल संशोधन केले . बाहेरील जगतात तिचे नाव फारसे कोणाला माहीत नव्हते .पण डॉ. जेम्स डी. वॉटसन यांच्या द डबल हेलिक्स या पुस्तकातील तिच्यावर केलेल्या वादग्रस्त चित्रणामुळे ती चर्चेत आली.
डॉ.मारिस विल्किंन्स यांनी रोझलिंडच्या नकळत तिचे संशोधन डॉ. वॉटसन आणि क्रीकना देऊन त्यांच्या डीएनए मॉडेल उभारणीला मदत केली.