Friday, June 30, 2023

बांशी

बांशी
BANSHEE
 तो नुकताच पंधरा वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलाय. बाहेर आल्यावर तो बांशीमध्ये दाखल होतो.
बांशी हे छोटेसे गाव आहे.तिथल्या बारमध्ये बसून तो दारू पिताना अजून दोन व्यक्ती तिथे येतात.चेहऱ्यावरूनच ते गुंड वाटतात .त्याची आणि त्या गुंडांची बाचाबाची होते इतक्यात बारमध्ये अजून एक व्यक्ती प्रवेश करते .ती व्यक्ती दुसऱ्या दिवसापासून शेरीफ म्हणून बांशीमध्ये रुजू होणार असते. त्या व्यक्तीलाही गावात कोणीच ओळखत नसते.
अचानक बाचाबाची वाढत जाऊन हाणामारीपर्यंत येते आणि त्यात त्या दोन्ही व्यक्ती आणि शेरीफ मारला जातो. तो बारमालकाच्या मदतीने तिघांच्या मृत्यूदेहाची विल्हेवाट लावतो .पण त्या आधी शेरीफचा मोबाईल आणि आयकार्ड काढून घेतो .
दुसऱ्या दिवशी तो शेरीफ हूड बनून पोलीस स्टेशनमध्ये रुजू होतो.योगायोगाने त्याच्या पूर्वाआयुष्याची प्रेयसी तिथेच राहतेय. 
आता तोतया शेरीफ हूडला स्वतःचे अस्तिव लपवून शेरीफची भूमिका पार पाडायची आहे.त्यासाठी त्याच्यासमोर खूप आव्हाने येतात.त्याच्या पूर्वाआयुष्यातील व्यक्तीही समोर येतात.त्याने केलेले गुन्हे त्याची पाठ सोडत नाही.
शेवट काय होईल ते ही सिरीज पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल .

हा सिजन पहिला आहे .याचे एकूण चार सीजन आहेत.
सिरीजमध्ये प्रचंड हाणामारी ,गोळीबार आणि रक्तपात आहे.काही दृश्ये कुटुंबासोबत पाहू शकत नाही .
सिरीज दुसऱ्या सिजनमध्ये काय घडेल याची उत्सुकता ताणून ठेवते.
ही सिरीज जिओसिनेमावर उपलब्ध आहे.

Wednesday, June 28, 2023

फुटफेरी

फूटफैरी 
FOOTFAIRY
 मुंबई शहर कधीच झोपत नाही असे म्हणतात.पण अजूनही रात्री काही सुनसान ठिकाणी गुन्हे घडत असतात. 
रात्रीच्या वेळी एकट्या घरी जाणाऱ्या तरुणींचे अचानक खून होऊ लागतात.खुनी त्यांच्यावर कोणतेही लैंगिक अत्याचार करीत नाही .तो फक्त त्यांचे पाय घोट्यापासून पासून घेऊन जातो आणि त्यांना एका मोठ्या सुटकेसमध्ये कोंबून रेल्वे रुळाच्या बाजूला फेकून देतो.
सीबीआय ऑफिसर विवान देशमुख या प्रकरणाची चौकशी करतोय. तो खुन्याला पकडण्यासाठी दिवसरात्र एक करतोय.
अचानक त्याला एक संशयित सापडतो.जेशुआ मॅथ्यूज नावाची व्यक्ती एक छोटे कॅफे चालवत असते.जेशुआला स्त्रियांच्या पायाविषयी खूप आकर्षण असते.तो मध्येमध्ये शहरातून गायबही होतो.
विवानला खात्री आहे की येशुआ मॅथ्यूजच सिरीयल किलर आहे पण ते सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे पुरावा नसतो.
शेवटी विवान हे प्रकरण सोडवेल का ?? खरोखर येशूआ मॅथ्यूज खुनी आहे की दुसराच कोणी आहे. 
गुलशन देवाईहने विवान देशमुखची भूमिका केली आहे.त्याची दहाड वेब सिरीजमधील पोलीस अधिकाऱ्यांची भूमिकाही प्रसिद्ध आहे .कुणाल रॉय कपूरने येशूआ मॅथ्यूजची छोटी पण प्रभावी भूमिका साकारली आहे.

Tuesday, June 27, 2023

जॉन विक

जॉन विक 
JOHN WICK
एखाद्याला आपण करत असलेले वाईट काम सोडून एक सरळ साधे आयुष्य जगायचे आहे .पण ते किती कठीण आहे आणि त्यावर चार भागाचा  चित्रपट बनू शकतो हे जॉन विक पाहिल्यावरच कळते.
जसे नेहमीसारखे जग आहे तशीच गुन्हेगारांची एक काळी दुनिया आहे. ती टेबल या नावाने ओळखली जाते.अनेक कुप्रसिद्ध मारेकरी या टेबलसाठी काम करीत असतात. जगभर या टेबलची ठिकाणे आहेत.हॉटेल्स आहेत.तसेच टेबलचे काही नियमही आहेत आणि ते सर्वांनीच काटेकोरपणे पाळायचे असतात.
टेबल आपल्या मारेकऱ्यांना संरक्षणही देते तर नियमाविरुद्ध वागल्यास ठारही मारते. टेबलच्या ऑफिसमध्ये, हॉटेल्समध्ये हाणामारी करायची नाही तर ज्यांनी आश्रय घेतलाय त्यांना ठार मारायचे नाही असाही नियम आहे. एखाद्या व्यक्तीला ठार मारल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची यंत्रणाही टेबलकडे आहे.
 ज्यांना एखाद्याला ठार मारायचे आहे ते टेबलकडे सुपारी देतात आणि आपल्या यंत्रणेमार्फत टेबल मारेकऱ्याची निवड करते. कधी कधी ही सुपारी ओपन असते म्हणजे कोणताही मारेकरी टार्गेटला मारू शकतो.
जॉन विक हा टेबलचा सर्वोकृष्ठ मारेकरी आहे .त्याची पत्नी वारल्यावर तो या कामातून बाहेर पडायचे ठरवितो. त्याच्या पत्नीने मरणापूर्वी एक कुत्रा त्याला गिफ्ट दिलेला असतो.आता कुत्राच जॉनचा मित्र,सोबती आहे.त्याचे आयुष्य व्यवस्थित चालू आहे पण एके दिवशी सहज झालेल्या धक्काबुक्कीचे पर्यवसन जॉनच्या कुत्र्याच्या मरणात होते.
आपल्या प्राणप्रिय कुत्र्याच्या मृत्यूचा बदला जॉन त्यांना ठार मारून घेतो.पण विषय तिथेच संपत नाही.मग सुरू होते मोठे युद्ध. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी जॉनला नाईलाजाने लढावे लागते. मागावर असलेल्या मारेकऱ्यांचा जीव घ्यावा लागतो . यात तो टेबलच्या नियमांचे उल्लंघन करतो आणि टेबल त्याच्या विरुद्ध जाते.या युद्धाचे आतापर्यंत एकूण चार भाग आलेत.प्रत्येक भाग सरस आहेत.
जॉन विकच्या प्रत्येक भागात प्रचंड हाणामारी आहे ,रक्ताचे पाट वाहिले जातात.अटीतटीच्या मारामारी आहेत.गोळीबार आहे.हातात येईल त्या वस्तूने समोरच्याचा जीव घेतला जातो .
अंगावर काटा आणणारा चित्रपट लायन्सगेट वर उपलब्ध आहे.

ब्लॅक साईट

ब्लॅक साईट
BLACK SITE
इस्ताबूलमधील हॉस्पिटलवर एक बॉम्बहल्ला होतो आणि त्यात ऍबीचा डॉक्टर नवरा आणि छोटी मुलगी मारली जाते. ऍबी सीआयएची एनालिस्ट म्हणून काम करतेय. ती या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.आता तिची बदली सीआयएच्या जॉर्डन येथे असलेल्या सिटाडेलमध्ये झालीय.
सिटाडेल अमेरिकेची ब्लॅक साईट म्हणून ओळखली जाते. ती जॉर्डनच्या वाळवंटात गुप्त ठिकाणी आहे. जगभरातील खतरनाक अतिरेकी तिथे चौकशीसाठी आणले जातात.फरहान हा अतिरेकीही तिथेच आहे.इस्ताबूल हॉस्पिटल बॉम्बस्फोटाची फरहानला नक्की काहीतरी माहिती आहे असा ऍबीला संशय आहे.
हॅचेट हा एक  मोठा राजकीय कैदी  सीटाडेलमध्ये चौकशीसाठी आणला जातो. इस्ताबूलमधील बॉम्बस्फोटाचा हाच प्रमुख सूत्रधार आहे याची ऍबीला खात्री आहे आणि तो फरहानसाठी इथे आलाय हे कळून चुकते.
चौकशी दरम्यान काही अधिकाऱ्यांचा खून करून हॅचेट आपली सुटका करून घेतो आणि फरहानच्या शोधात निघतो .ऍबी हुशारीने सीटाडेल लॉक करते. पण तिची कम्युनिकेशन यंत्रणा बंद पडते.एक तास सीटाडेलची कम्युनिकेशन यंत्रणा चालू झाली नाही तर ड्रोनहल्ला होऊन संपूर्ण सीटाडेल नष्ट होणार अशी सिस्टीम सेट केलेली आहे.
आता ऍबीच्या हातात फक्त एक तास आहे . हॅचेट त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला मारत सुटलाय.तिला हॅचेटलाही संपवायचे आहे आणि ड्रोन हल्ल्यातून सीटाडेलही वाचवायचे आहे.तिला शक्य होईल का ?? इस्ताबूल हॉस्पिटल बॉम्बस्फोटामागे नक्की कोणते षडयंत्र आहे तिला कळेल का ??
एक थरारक वेगवान ऍक्शन चित्रपट अमेझॉन प्राईमवर हिंदी भाषेत आहे.

Monday, June 26, 2023

मेडेलीन

मेडेलीन
MEDELLIN
रेडा एक बॉक्सिंग प्रशिक्षक आणि  जिमचा मॅनेजर आहे. खरे तर त्याने बॉक्सिंगची कोणतीही स्पर्धा जिंकली नाही आणि नाही कधी फारशी बॉक्सिंग खेळला.त्याचा भाऊ त्याचा भाऊ ब्राहिम सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे आणि तो स्वतःला कुप्रसिद्ध डॉन पाब्लो समजत असतो .
एके दिवशी ब्राहिमचे अपहरण होते ते अपहरण पब्लोने केले असे रेडाला वाटते आणि तो काहीही करून ब्राहिमला सोडविण्याचे ठरवितो.त्यासाठी तो आपल्या दोन मित्राची मदत घेतो.
स्टॅन आणि चॅफिक्स हे दोन मित्र रेडाच्या मदतीला येतात.चॅफिक्स हा बुटका चार फूट उंचीचा आहे.आता त्या तिघांनाही हाणामारीची अजिबात सवय नाही .ते मेडेलीनमध्ये घुसतात .एका बारमध्ये जाऊन एका बार डान्सरच्या मदतीने एल डब्लिओ या कुप्रसिद्ध डॉनच्या मुलाचे अपहरण करतात.
रेडा त्या मुलाचे विडिओ काढून एल डब्लिओला पाठवून आपल्या भावाच्या सुटकेची मागणी करतो .पण थोड्या वेळाने त्याला ब्राहिमचा फोन येतो की त्याचे अपहरण झालेच नाही त्याने हे सर्व प्रसिद्धीसाठी केले आहे.
आता त्या तिघांनाही कळून चुकते की त्यांनी मोठी चूक केली आहे .एल डब्लिओ पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे लागतो .तो सर्वप्रथम ब्राहिमला ताब्यात घेतो .
पुढे काय ..? ज्यांना हाणामारीची अजिबात सवय नाही .बंदूक कधी हातात धरली नाही असे तीन तरुण मेंडेलीनच्या सर्वात मोठ्या गँगस्टरशी टक्कर घेऊ शकतील का ?? कोण येतील त्यांच्या मदतीला ? रेडा आपल्या भावाला सुखरूप सोडवेल का ?? त्यासाठी मेंडलीन पाहायला हवा.
हा खरोखरच एक ऍक्शन कॉमेडी चित्रपट आहे जो आपल्याला प्रत्येक मिनिटाला तुफान हसवितो.हिंदी भाषेतील संवाद छान लिहिले आहेत. एल डब्लिओच्या गुंडांशी लढताना उडणारी त्यांची तारांबळ बघण्यासारखी आहे.यात तुफान हाणामारी आहे .भरधाव वेगात गाड्यांचा पाठलाग आहे.या सर्वाला ते कसे तोंड देतात पाहण्यासारखे आहे.
अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.

Wednesday, June 21, 2023

बेकेट

बेकेट
BECKETT
 बेकेट आणि एप्रिल एक प्रेमी युगुल सुट्टी साजरी करायला ग्रीसला आलेत. अथेन्स शहरात राजकीय अराजकता असल्यामुळे ते अथेन्सपासून दूर एका गावी जातात.रात्री परतत असताना बेकेटच्या डोळ्यावर झापड येते आणि त्यांच्या कारचा भयानक अपघात होतो. कार रस्ता सोडून एका घरावर आढळते.बेशुद्ध होण्यापूर्वी बेकेटला एप्रिल जखमी झालेली दिसते.त्याला घरात एक सोनेरी केसांचा मुलगा आणि स्त्री दिसते तो त्यांच्याकडे मदत मागतो पण ती स्त्री मुलाला बाहेर घेऊन जाते.
शुद्धीवर येतो तेव्हा एप्रिलचा मृत्यू झाल्याचे त्याला कळते.जबानी देताना तो पोलिसांना त्या घरात एक मुलगा आणि स्त्री असल्याचे सांगतो.पोलिसांच्या मते त्या घरात कोणीच नव्हते.
दोन दिवसांनी बेकेट पुन्हा त्या अपघातस्थळी जातो.एप्रिलचा मृतदेह जिथे पडला होता तिथे तो जाऊन उभा राहतो तेव्हा अचानक त्याच्यावर गोळी झाडली जाते. तो आश्चर्यचकित होतो आणि पळतो. बाहेर त्याची जबानी घेतलेला पोलीस अधिकारी आणि एक तरुण स्त्री त्याच्यावर गोळ्या झाडत असतात.तो जीव वाचवायला जंगलात उंच पहाडावर चढतो.तिथून तो गावकऱ्यांच्या मदतीने अमेरिकी दूतावासात फोन करतो . अमेरिकन दूतावास त्याला अथेन्सला यायला सांगते .
आता बेकेटला त्या पोलीस अधिकाऱ्यांना चुकवून अथेन्सला जायचे आहे.तो कसा तिथे पोचतो हे बघण्यासारखे आहे.पण तिथे पोचल्यावरही त्यांच्यावरील संकटे दूर होत नाहीत .
हे सर्व काय आहे ?? का पोलीस त्याच्या जीवावर  उठलेत ?? तो मुलगा खरोखर अस्तित्वात आहे का ??त्याचा बेकेटशी काय संबंध आहे ??
सुरवातीची दहा मिनिटे प्रेमकथा वाटणारा हा चित्रपट अचानक आपल्याला धक्के देतो आणि बेकेटसोबत आपणही त्या पाठलागात सामील होतो.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Tuesday, June 20, 2023

क्लिओ

क्लिओ
साल 1987 जर्मनी दोन भागात विभागला गेला होता.पूर्व जर्मनी जे अजूनही कम्युनिस्ट राजवटीत होते तर दुसरीकडे पश्चिम जर्मनी ज्यात आधुनिकरणाचे वारे वाहत होते. या दोन्हीच्यामध्ये बर्लिनची सुप्रसिद्ध भिंत होती.
क्लिओ पूर्व जर्मनीतील सिक्रेट सर्व्हिस एजंट. तिचे आजोबा गुप्तचर खात्याचे प्रमुख आहेत.ती हुशार मारेकरी आहे.पूर्व जर्मनीच्या शत्रूंना मारणे हे तिचे काम.
आता तिला पश्चिम जर्मनीत जाऊन एका शत्रूला ठार मारायचे आहे.सुरवातीलाच ती बर्लिनच्या भिंतीखालच्या भुयारातून पश्चिम जर्मनीत दाखल होते.तेथे ती वेशभूषा बदलून एका बारमध्ये दाखल होते आणि टार्गेटला टॉयलेटमध्ये नेऊन मारते.खरे तर तिचे काम इथेच समाप्त होते. पण  एक पोलीस अधिकारी तिला पाहतो आणि नंतर तो टॉयलेटमध्ये खून झालेली व्यक्तीही पाहतो .तो आपल्या वरिष्ठांना ही बातमी देतो.
इथे पूर्व जर्मनीत क्लिओला अटक होते.तिच्यावर पूर्व जर्मनीतील काही गुपिते पश्चिम जर्मनीला विकल्याचा आरोप होतो .तिचे आरोप सिद्धही होतात आणि तिला कारावास होतो .
पुढे 1990 साली बर्लिनची भिंत पाडली जाते आणि दोन्ही देश एक होतात.याचाच फायदा क्लिओला मिळतो आणि तिची सुटका होते. 
पण आपल्या अटकेमागे मागे कोणाचा हात आहे याचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करते.पण आता पूर्व जर्मनीतील सिक्रेट सर्व्हिस बंद झाली आहे.तिच्या अटके मागे हात असलेले कित्येक अधिकारी गायब झाले आहेत. 
आता क्लिओ त्या सर्वांच्या मागावर आहे जे या प्रकरणात आहेत.त्यात तिचे आजोबाही प्रमुख संशयित आहे.या प्रकरणाचा माग घेताना तिला आपल्या टार्गेटकडे एक लाल सुटकेस होती आणि त्या सुटकेसमध्येच सर्व पुरावे आहेत ही नवीन माहिती कळते. ती त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने सुटकेस शोधायचा प्रयत्न करते.
आठ भागाची ही मालिका आपल्याला इतकी गुंतवून ठेवते की पूर्ण पाहिल्याशिवाय आपण उठूच शकत नाही.यातील प्रमुख नायिका क्लिओ ही अतिशय हसतमुख ,अजिबात टेन्शन न घेणारी आणि सहज समोरच्याला ठार करणारी आहे. मालिका हलकी फुलकी दिसत असली तरी भरपूर हाणामारी आणि रोमांचक थ्रिलर आहे.
 मूळ जर्मन भाषेतील मालिका नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Monday, June 19, 2023

फ्रेक्स

फ्रेक्स
FREAKS 
वेंडी एका छोट्या रेस्टोरंटमध्ये काम करते. लहानपणापासून ती थोडी अबनॉर्मल आहे म्हणून एका डॉक्टरने तिला दररोज गोळ्या घ्यायला सांगितल्या होत्या.ती अजूनही त्या गोळ्या घेतेय.ती नवरा आणि दहा वर्षाच्या मुलांसोबत छान आयुष्य जगतेय. 
अचानक एके दिवशी तो भिकारी तिला रेस्टोरंट बाहेर भेटतो.तिच्याकडे कचऱ्यातील चिकन मागतो आणि तू आमच्यामधलीच आहे असे सांगतो.तिला काही कळत नाही.पुन्हा दुसऱ्या रात्री तो तिला भेटतो आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खाऊ नकोस असे सांगतो.
ती त्याचे ऐकून काही दिवस गोळ्या घेत नाही आणि तिला तिच्यातील सुपरपॉवरची जाणीव होते.तिने मारलेल्या किकवर फुटबॉल दिसेनासा होतो.तर पबमध्ये ती काही गुंडांना भरपूर चोप देते.
रेस्टोरंटमधील तिचा सहकारी  एलमरही त्याच गोळ्या घेतोय .ती त्यालाही गोळ्या न घेण्याचा सल्ला देते आणि त्यांच्यातील सुपरपॉवर जागविते.त्याच्यात विजेची शक्ती असते.
ते आपल्या अंगात आलेल्या सुपरपॉवरमुळे खुश होतात .आणि अजून काही अश्या व्यक्ती आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात .त्यात काही सुरक्षा रक्षकांचा जीव जातो.
वेंडी हा प्रकार पाहून हादरते. ती एलमरला हे सगळे थांबवायला सांगते.पण एलमरला आपल्या सुपरपॉवरचा गर्व झालेला असतो.त्याला सुपरपॉवर आपल्या फायद्यासाठी वापरायची असते.तो वेंडीला आपले करू पाहतो त्यासाठी तो तिच्या नवऱ्यावर हल्ला करतो ,मुलासही वेठीस धरतो .
डॉक्टर पोलिसांच्या मदतीने वेंडीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करते. पण एलमर तिथेही हल्ला करतो .वेंडी आपल्या कुटुंबाला वाचवेल का ??
सुपरपॉवर असणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना कंट्रोल केले नाही तर त्याचे भयानक परिणाम होऊ शकतात हेच या चित्रपटातून आपल्याला दाखविले आहे.
मूळ जर्मन भाषेतील हा चित्रपट इंग्लिश भाषेत नेटफ्लिक्सवर आहे 

Saturday, June 17, 2023

कंदहार

कंदहार
KANDAHAR
 इराणच्या न्यूक्लिअर प्लांटमध्ये टॉम हॅरिस इंटरनेट टेक्निशियन म्हणून घुसतो आणि त्याची सर्व माहिती अमेरिकेला देतो. टॉम एक अंडरकव्हर एजंट आहे आणि सध्या तो CIA साठी काम करतोय.अमेरिका न्यूक्लिअर प्लांट उध्वस्त करते. पण कोणाकडून तरी ती बातमी लिक होते आणि टॉमचे नाव जगभर पसरते.इराणी सैन्य त्याच्या पाठी लागते.त्याचा साथीदार मारला जातो .एजन्सी कसेही करून कंदहारला पोचण्याची ऑर्डर देते.
आता टॉमला कसेही करून कंदहारला पोचायचे आहे.त्याच्यासोबत एक दुभाषी आहे.ज्याला आपल्या कुटुंबाला भेटायचे आहे.पण दोघांच्यामध्ये आहेत इराणी सैन्य ,गुप्तचर ,आणि सर्वात मोठा धोका म्हणजे तालिबान .
टॉम या सर्वांवर मात करून आपल्या दुभाष्यासोबत कंदहारला पोचेल का ??
संपूर्ण चित्रपटात आपण टॉमसोबत असतो.त्याच्याबरोबर धावतो.गोळीबार करतो.तो ठरलेल्या ठिकाणी सुखरूप पोचू दे अशी प्रार्थना करतो.युद्ध हे शेवटी आपल्याच माणसांसाठी लढले जाते याची प्रचिती चित्रपट पाहताना येते.
अफगाणिस्तान ,इराणच्या ओसाड रुक्ष प्रदेशात चित्रीकरण केलेला हा चित्रपट नक्की पाहायला हवा.
गेरार्ड बटलर टॉम हॅरिसच्या प्रमुख भूमिकेत आहे .तर अली फझल या भारतीय अभिनेत्याने त्याला चांगली साथ दिली आहे .
चित्रपट प्राईम व्हिडिओवर आहे.

Thursday, June 15, 2023

द टेकओव्हर


द टेकओव्हर
एक कंपनी हाय टेक सेल्फ ड्राईव्ह बस लॉन्च करणार आहे.तिच्या सॉफ्टवेअर सर्टिफिकेट  क्लिअर करण्यासाठी मेल ही तरुणी आलीय.त्यांच्या सर्व्हरमध्ये जाऊन सॉफ्टवेअर चेक करताना तिला छोटा व्हायरस सापडतो जो बसमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे चेहरे स्कॅन करून त्यांचा डेटा दुसरीकडे पाठवीत असतो.
मेल ट्रोजन हॉर्स नावाचा एक सॉफ्टवेअर टाकून तो व्हायरस तात्पुरता बंद करते आणि आपल्या डेटवर निघून जाते. दुसऱ्या दिवशी रात्री तिच्यावर हल्ला होतो .नंतर एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्यात ती एका व्यक्तीचा गोळ्या झाडून खून करतेय .आता पोलीस आणि काही गुंड तिच्या मागे लागतात.
ती यातून सुटण्यासाठी आपल्या गुरुची मदत घेते.पण तो तिला वाचवेल का ??
गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ इतका स्पष्ट आहे की त्यात कोणीही चूक काढू शकत नाही.शेवटी तिलाच यातून मार्ग काढायचा आहे .
एक वेगवान हाय टेक चित्रपट आपल्याला या पाठलागात गुंतवून ठेवतो 
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, June 14, 2023

मिसिंग

मिसिंग
जून आता  अठरा वर्षाची झालीय.ती आणि तिची आई ग्रेस दोघेच राहतात..सहा वर्षाची असताना वडील ब्रेन ट्युमरने गेले.त्यांचा शेवटचा व्हिडिओ हीच तिच्याकडे असलेली वडिलांची एकमेव आठवण.
ग्रेसला आता सोशल मीडियावरून केविन नावाचा मित्र मिळालाय.ती त्याच्यासोबत कोलंबियाच्या सहलीचा प्लॅन करतेय.सोमवारी ते परत येणार आहेत त्यांनी जूनला एअरपोर्टवर बोलाविले होते.
सोमवारी जून त्यांना आणायला एअरपोर्टला गेली पण ते दोघेही आलेच नाही . तिने कोलंबियाला त्यांच्या हॉटेलमध्ये चौकशी केली तेव्हा ते सामान सोडून गेलेत असे सांगण्यात आले.
अमेरिकेत राहून  केवळ इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या मदतीने जून आपल्या आईचा कसा शोध घेत त्यातून कोणती रहस्ये बाहेर येतात हे बघण्यासारखे आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडियाने आपल्या जीवनात किती खोलवर प्रवेश केलाय त्याची कल्पना आपल्याला हा चित्रपट पाहताना येते.स्पॅनिश भाषा येत नसताना जून केवळ इंटरनेटच्या मदतीने हॉटेल कर्मचाऱ्याशी स्पॅनिशमध्ये बोलते.केविन आणि ग्रेसचे पासवर्ड शोधून काढते. तासाला आठ डॉलर घेणारा एक खाजगी गुप्तहेर शोधून त्याला कोलंबियात मार्गदर्शन करते .
इंटरनेट सोशल मीडिया किती फायद्याचे आणि किती तोट्याचे आहे हे चित्रपट पाहून लक्षात येते.
चित्रपट नेटफिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Monday, June 12, 2023

द पॉईंट मेन

द पॉईंट मेन 
अमेरिकेतील ट्वीन टॉवर वर आत्मघाती हल्ला झाला आणि त्यानंतर अमेरिकासह अनेक देशांनी अफगाणिस्तान आपले टार्गेट बनविले.
अमेरिकेत यावर अनेक चित्रपट बनले गेले.अजूनही बनतायत. दक्षिण कोरियाही या लढाईत अमेरिकेसोबत होता.त्यांच्या काही तुकड्या आणि सिक्रेट सर्व्हिस एजंट्स अफगाणिस्तानात होते.
एके दिवशी दक्षिण कोरियातील साधारण 23 पर्यटकांचे तालिबानी अपहरण करतात .त्यांच्या सुटकेच्या बदल्यात दक्षिण कोरियाने आपले सैन्य माघारी घ्यावे आणि तालिबानी कैद्यांची सुटका करावी अश्या दोनच मागण्या मांडते.
आता सुरू होतो वाटाघाटीचा खेळ .दक्षिण कोरिया शांततेच्या मार्गांनी ओलिसांना सोडविण्याचा प्रयत्न करते.त्यासाठी एक शिष्टमंडळ अफगाणिस्तानात दाखल होते. त्या बरोबरच एक सिक्रेट सर्व्हिस एजंट दुसऱ्या बाजूने त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करत असतो .अफगाण सरकार तालिबानी कैद्यांना सोडण्यास नकार देते.
ओलिसांच्या सुटकेसाठी अनेक दलाल ,ब्रोकर पुढे येतात .पैश्याचा खेळ सुरू होतो.काही वेळा कोरियन शिष्टमंडळ हतबल होते.
हा अतिशय सुंदर कोरियन चित्रपट आहे.यात फार हाणामारी नाही .पण संपूर्ण चित्रपटात भीतीचे वातावरण आहे.अचानक भर बाजारात होणारा आत्मघाती हल्ला .अफगाणिस्तानातील रुक्ष ,ओसाड वातावरण  आपल्या अंगावर काटा आणतो.कोरियन सरकारची हतबलता ,शिष्टमंडळाच्या वाटाघाटी आपल्याला खिळवून ठेवते .
शेवटी शिष्टमंडळ वाटाघाटीत यशस्वी होते का ?? ओलीस सुखरूप परत येतील का ??
अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.

Tuesday, June 6, 2023

एक वटपौर्णिमा

एक वटपौर्णिमा 
नेहमीच गजबजाट असलेल्या त्या भल्यामोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आज शांतता दिसत होती.ऑफिसमध्ये कोणीही नसले तरी मुख्य कॅबिनमध्ये दोन माणसे हजर होती..त्यातील एकाच्या चेहऱ्यावर प्रचंड वैताग दिसत होता तर दुसरा मात्र त्याच्याकडे छद्मीपणे हसत होता.
" तुला हसायला काय जाते चित्रगुप्ता , ही अशी परंपरागत वेशभूषा करून मलाच पृथ्वीवर जायचे आहे ना ? आपले खांद्यावरचे उपरणे सांभाळत आणि डोक्यावरचा मुकुट एका हाताने व्यवस्थित ठेवायची कसरत करीत ती उंच काळी आणि उग्र चेहऱ्याची व्यक्ती चिडून बोलली.
 त्या दोन व्यक्ती कोण हे आमच्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.त्यातील एक होती चिन्मय त्रंबक गुप्त अर्थात चित्रगुप्त आणि दुसरे त्याचे साहेब यशवंत मनोहर राज अर्थात यमराज .
आज वटपौर्णिमा असल्यामुळे त्यांच्यासाठी तो खासच दिवस होता . आजच्या दिवशीच यमराजांना पारंपरिक वेशभूषा करून पृथ्वीवर जावे लागत असे.
" तुम्ही हजारो वर्षांपूर्वी केलेल्या त्या एका चुकीची शिक्षा इतकी वर्षे भोगावी लागेल याची कल्पना नव्हती मला" मान खाली घालुन पण तिरक्या नजरेने यमराजांकडे पाहत चित्रगुप्त छद्मीपणे म्हणाले.
" बघ ना , मला काय माहित भावनेच्या भरात दिलेल्या वचनाचे इतके गंभीर परिणाम होतील. बरे सध्याच्या परिस्थितीनुसार वेशभूषा करून जाईन असा अर्ज दरवर्षी देतो पण तोही फेटाळला जातो. पारंपारिक कपडे घालूनच जा अशीच वरून ऑर्डर येते .नाही रे जमत यात मला " यमराज रडकुंडीला येऊन म्हणाले.
इतक्यात बाहेर कोणीतरी मोठ्याने हंबरले.लॅपटॉपवरील स्क्रिनकडे पाहत चित्रगुप्त ओरडले "महाराज तुमचे  पारंपारिक वाहन बाहेर तुमची आठवण काढतोय ". बाहेर उभ्या असलेल्या रेड्याकडे पाहत त्यांनी आपल्या बुलेटची चावी चित्रगुप्ताकडे फेकली आणि दोरीचा फास हातात घेतला .
"खबरदार माझ्या बुलेटला हात लावशील तर "? असे  रागानेच बोलून बाहेर पडले.
इथे चित्रनगरीत एका सेटवर खूपच गडबड दिसत होती.एक माणूस सारखा हातातील घड्याळाकडे पाहत सतत मोबाईलवर बोलत होता.त्या सेटवर आज वटपौर्णिमेचे शूटिंग चालू होते. मराठी चित्रपट नाटक आणि सिरीयलमधील  प्रसिद्ध अभिनेत्री चित्रलेखा मॅडम सेटवर हजर होत्या.
चित्रलेखा मॅडम म्हणजे भारतीय स्त्रीचा आदर्श नमुना असे म्हटले जात होते.आदर्श माता आदर्श सून आदर्श मुलगी अश्या वेगवेगळ्या भूमिका तिने केल्या होत्या .अन्याय सहन करणारी ,कधीही कपट कारस्थान न करता सत्याच्या मार्गाने लढा देणारी, सर्वानी कितीही पापे केली तरी माफ करणारी  स्त्री अशी तिची प्रतिमा होती.
" काय झाले सर ? शूटिंग का खोळंबली आहे " तिने डायरेक्टरला त्रासून विचारले.
" काही नाही रेडा आणि यम यायचा आहे " डायरेक्टर हसून म्हणाला . इतक्यात मगाशी मोबाईलवर बोलणारा माणूस आपल्या सोबत यम आणि रेड्याला घेऊन आलाच.
" अरे वा डायरेक्ट मेकअप करूनच आणला की " डायरेक्टर कौतुकाने त्याच्याकडे पाहत म्हणाला आणि हा खरा रेडा आहे .बघ हो ते प्राणीमित्र इथे आले तर तुलाच सेटवरून बाहेर फेकून देईन "डायरेक्टर धमकीच्या आवाजात म्हणाला .
" चला मॅडम शूटिंगला सुरवात करू ,काय रे तुला माहीत आहे का सीन" ? त्याने यमराजकडे पाहत विचारले.
"मला सर्व माहीत आहे ".एक रागीट नजर टाकून यमराज उत्तरले .
"आयला.! पूर्ण भूमिकेत शिरूनच आलेला दिसतोय .चला सुरवात करू "डायरेक्ट  सेटवर जात म्हणाला.
रात्री नऊ वाजता चित्रलेखा आपल्या आलिशान रो हाऊसमध्ये शिरली तेव्हा पूर्ण थकून गेली होती.यावेळी  नवऱ्याचे प्राण यमाकडे मागतानाच्या सीनचे जरा जास्तच रिटेक झाले होते. तो कलाकार जास्तच यमराजाच्या भूमिकेत शिरला होता असे तिला वाटले.
त्याने तिच्याकडून अनेक प्रकारात मनधरणी करून घेतली होती.एकदातर ती चिडून त्याच्या अंगावर धावूनही गेली होती. 
अंगावरचे कपडे फेकून देतच ती बाथरूममध्ये शिरली .मस्तपैकी शॉवर घेऊन ती बाहेर पडली आणि जोरात किंचाळली. समोर तो उभा होता .तिचा नवरा ..हातात कॉफीचा फेसाळता मग घेऊन.ती कॉफी तिच्या आवडीची होती पण समोरच्याचा क्रूर चेहरा ती विसरू शकत नव्हती .
पण हा इथे कसा ? आणि इतकी वर्षे तो कुठे होता ? जगाच्या दृष्टीने तो दोन वर्षांपूर्वीच गायब झाला होता.तो परदेशात बिझनेससाठी गेलाय असेच सर्व समजून होते आणि काही न कळवता तो आज हजर झाला होता .
ती धावतच रो हाऊसच्या मागच्या बाजूला गेली . हातात फावडे घेऊन तेथील वडाच्या झाडाखाली खणू लागली .पण तिथे काहीच नव्हते.
" काही सापडणार नाही तुला "मागून आवाज आला .तिने दचकून वळून पाहिले तेव्हा तो रेड्यावर बसून तिच्याकडे पाहत होता .हातातील दोरीचा फास तो सतत गरगर फिरवीत होता .
" पण का "? तिने रडत विचारले 
"का ?? अग किती खोटी कामे करशील अजून.अन्याय सहन करणारी आदर्श स्त्री. हजारो वर्षांपूर्वीची स्त्रियांची इमेज कधी बदलणार तुम्ही. का सतत स्त्री सासू नवरा नणंद यांचा जाच सहन करणारी दाखवता. तुमच्या अश्या कामांमुळेच स्त्रीची प्रतिमा दुबळीच राहिली आहे. प्रत्यक्ष आयुष्यात तू नवऱ्याचा छळ सहन केला नाहीस आणि त्याचा खून केलास .त्याला इथेच पुरलेस आणि तो परदेशी गेलाय अशी बातमी पसरवलीस .याचीच शिक्षा म्हणून आज तुझ्या नवऱ्याला जिवंत केलेय मी .आता बघू प्रत्यक्ष आयुष्यात आदर्श स्त्री म्हणून कसा अभिनय करतेस ती "असे म्हणून यमराज गायब झाले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर