Sunday, April 28, 2019

फिफ्टी शेड्स फ्रिड ..... ई .एल. जेम्स

फिफ्टी शेड्स फ्रिड ..... ई .एल. जेम्स
अनुवाद .....डॉ. शुचिता  नांदापुरकर- फडके
मेहता पब्लिकेशन
ई. एल. जेम्सच्या फिफ्टी शेड्सच्या सिरीजमधील हे कदाचित तिसरे पुस्तक . जगभरात विक्रीचे उच्चांक गाठलेल्या फिफ्टी शेड्सचा सरळ सोपा अनुवाद . अतिशय सरळ मार्गाने जाणारे हे पुस्तक.
नायक ख्रिश्चन ग्रे आणि नायिका ऍना स्टील यांचे लग्न होऊन ते हनिमूनला गेले.येथून ही कथा चालू होते . नायक ग्रे हा प्रचंड श्रीमंत असल्यामुळे त्याचा हनिमूनही तितकाच श्रीमंत आणि राजेशाही आहे .हनिमूनवरून आल्यावर नवविवाहितांचा संसार चालू होतो .त्यामध्ये येणारी छोटी मोठी वादळे .....उडणारे खटके ... ग्रे फॅमिलीचे शत्रू ....त्यांच्यावर केलेली मात...आणि शेवटी मूल होऊन चाललेला सुखी संसार  यातच पुस्तक संपते.
मग पुस्तकात असे काय आहे ........??? यात आहेत ग्रे पतीपत्नींच्या वेगवेगळ्या मूड आणि घटनेनुसार होणाऱ्या प्रणयक्रिडा आणि त्याची वर्णने .संपूर्ण पुस्तकात ख्रिश्चन आणि ऍनाच्या वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या प्रणयक्रीडांची वर्णने सहज सोप्या पद्धतीने लिहिली आहेत . त्यात कुठेही किळसवाणे अश्लील वाटत नाही . कथेत आपसूक येणारी वर्णने आहेत असेच वाटत रहाते आणि त्या क्रिया नायकाच्या व्यक्तिमत्वाची बाजू उघड करतात ....आणि हेच पुस्तकाचे मोठे वैशिष्टय आहे . पुस्तक वाचताना ते कुठेही ओंगळवाणे वाटत नाही उलट पुढे काय होईल याची उत्सुकता वाढत जाते .लेखिका ई एल जेम्सची फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे आणि फिफ्टी शेड्स ऑफ डार्कर अशी दोन पुस्तके आहेत बहुतेक ती या आधीची असावीत

Thursday, April 25, 2019

दत्ता

दत्ता
दत्तात्रय नार्वेकर उर्फ दत्ता ...काही माणसे फक्त लोकांच्या शिव्या आणि मार खायालाच जन्माला आली असावीत हे दत्ताकडे बघून पटते . कालपर्यंत तरी त्याने लोकांच्या शिव्या खाल्ल्या आहेत.. टपल्या खाल्ल्या आहेत.प्रसंगी मार ही खाल्ला आहे.पण हा माणूस काही त्यातून शिकला नाही आणि सुधारणार नाही .
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणे तसेच याची ती झलक गार्डनमध्येच दिसून आली.दहावीचा एक पेपर देऊन आम्ही संध्याकाळी गार्डनमध्ये अभ्यासाला जमलो. दुपारी सोडविलेल्या पेपरची चर्चा चालू होती तेव्हाच हा रमत गमत आला. आल्याआल्या त्याला मी विचारले" दत्ता... कसा गेला आजचा पेपर... ??? त्याने हळूच इथेतिथे पाहिले आणि माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला "भाऊ मी आज बोर्डाची जीरवली....." .मी कपाळावर आठ्या आणून "म्हटले कसे रे .."??" अरे... मी आज पेपरच दिला नाही .. .."असे बोलून तो माझ्याकडे पाहून हसला.आईशपथ माझ्याकडेही इतक्या वेगवेगळ्या शिव्यांचा संग्रह आहे हे इतरांनाही त्यादिवशीच कळले असेल.तेव्हापासून आम्ही दत्तापासून थोडे दूरच राहू लागलो.हा कोणाला कधी काय बोलेल आणि काय करेल याची कोणीच खात्री देऊ शकत नव्हता .
एके दिवशी सर्वजण गार्डनमध्ये बसून गप्पा मारत होतो . त्यावेळी बाहेरून एक अंत्ययात्रा जात होती. कोणतरी म्हातारा किंवा म्हातारीच असेल .कारण ती वाजतगाजत भजन म्हणत चालली होती . अचानक बाजूला कोण नाचतेय म्हणून मी पाहिले तर हा .... दत्ता.... एकदम तल्लीन होऊन नाचत होता. विक्रमने त्याच्या डोक्यावर जोरात टपली मारली "हे काय ..?? Xxx...."!! असे बोलून अंगावर धावून गेला . तेव्हा हा निरागसपणे म्हणतो "अरे ह्या म्युझिकवर कसे नाचता येईल ते ट्राय करतोय.कधीतरी गणेशोत्सवात नवीन काही करायच्या कामास येईल".नेमकी ती गोष्ट ह्याच्या शेजाऱ्याने पहिली होती . ती त्याने ह्याच्या बापाला सांगितली आणि घरी गेल्यावर बापाने दत्ताला धू धू धुतला.
अशीच वर्षे  निघून गेली.सर्व मोठे झाले पण दत्ता काही मोठा झाला नाही. तो तसाच राहिला.विक्रमचे लग्न झाले आणि बायकोला घेऊन देवळात चालला होता इतक्यात हा त्याच्यासमोर आला."आयला...!! विक्रम नवीन आयटम.मजा आहे बाबा तुझी ..असे बोलून हसला .काही न बोलता विक्रम निघून गेला आणि अर्ध्या तासाने येऊन दत्तावर चढ चढ चढला.पण खरी मजा तर सहा महिन्यांनी आली जेव्हा विक्रमच्या बायकोने नाक्यावर येऊन दत्ताच्या कानफटात मारली.मी तिला कारण विचारले तेव्हा म्हणाली "हा मला आयटम म्हणाला होता. त्याचा अर्थ आज मला कळला".आम्ही कसेबसे समजावून तिला घरी पाठवले.
कितीतरी वेळा त्याला समजावून सांगितले बाबा तोंड बंद ठेव पण हा ऐकतच नाही.14 ऑगस्टला रात्रीचा शो पाहून बाहेर पडलो आणि एकाला चायनीज खायची इच्छा झाली .एकाने बियर काढल्या आणि रस्त्यावरच कोपऱ्यात प्रोग्रॅम सुरू झाला . इतक्यात राऊंडची व्हॅन आली . त्यातील इन्स्पेक्टर आमच्याजवळ आला."काय चालू आहे तुमचे..."??  त्याने आवाज चढवत विचारले . मी सहजपणे" बियर पितोय .."असे सांगितले."लवकर आटपा.." असे बोलून तो जायला निघाला आणि कोपऱ्यातून  दत्ता "बियर काय दारू नाय हाय .."असे पचकला. झाले ...तो इन्स्पेक्टर वळला आणि सगळ्या बाटल्या फोडून टाकल्या .उलट काहीजणांना काठीचे फटके दिले ते वेगळेच.
परवा थोडा उशिरा कामावर निघालो तेव्हा पाहिले एक तरुण स्त्री त्याला बडबडत होती . पुन्हा मी मध्ये पडून त्याला बाजूला काढले . ती का बडबडली याचे कारण विचारले तेव्हा हा म्हणतो अरे रोज यावेळी समोरासमोर येतो आम्ही . आज तिने चष्म्या लावला म्हणून विचारले आज चष्म्या ...?? वय झाले का ...?? तर ती चिडली ."अरे बाबा ..ती चिडणारच "मी संतापून म्हणालो . हा मात्र माझ्याकडे निरागस चेहऱ्याने पाहत राहिला .
त्या दिवशी सकाळीच बोंबाबोंम झाली एल्फिन्स्टन रेल्वे ब्रिज कोसळला . आम्ही सर्व  हातातील कामे सोडून धावत निघालो . ब्रिज कोसळला नव्हता पण काहीतरी अफवा पसरवून चेंगराचेंगरी झाली . जखमींना मदत करायला सर्व पुढे झाले . दत्ता आणि विक्रमने काही जखमींना हॉस्पिटलमध्ये पोचवले .जखमींची अवस्था  पाहून सर्वच हळहळत होते . त्यांना पाहून दत्ता विक्रम जवळ आला" विकी ...अरे आपण दोन तीन बाटल्या रक्त देऊ शकतो का ?? विचार न डॉक्टरला ... मी तयार आहे रे .अरे सत्तर किलोचा देह आहे माझा  आतापर्यंत कितीजणांचा  मार खाऊन भरपूर रक्त वाया गेलंय . मग अश्या कामासाठी तीनचार बाटल्या घ्यायला सांग ना त्यांना . त्यांना गरज आहे रे रक्ताची . बघ ना किती गंभीर अवस्था आहे त्यांची . तू सांग डॉक्टरला माझे हवे तितके रक्त घ्यायला..."असे म्हणत रडत रडत विक्रमला मिठी मारली.यावेळी मात्र डोळ्यातील अश्रू पुसत विक्रमने त्याला कुशीत घेतले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

फरक

फरक
स्थळ... दुर्गम भागातील एक छोटे खेडे
ठिकाण ... गावाचा पार
वेळ... सकाळी 10
आज गावातील एक तरुण डॉक्टर बनून आला आहे . ग्रामस्थांनी त्याच्या सत्कार करायचे ठरविले आहे . आता तो त्याचे मनोगत व्यक्त करतोय
"सर्वप्रथम गावकऱ्यांचे आभार . त्यांनी वेळात वेळ काढून.घरातील ...शेतातील ..कामे सोडून माझे कौतुक करायला इथे हजर राहिले . पण खरे तर हे तुमच्यामुळेच शक्य झाले आहे .आज मी डॉक्टर बनून इथे आलोय त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. आपल्या वेदना ..आजार.. विसरून तुम्हाला फक्त पोटासाठी कष्ट करणेच माहिती आहे . मुलगा झाला की काही वर्षांनी शेताला मजूर लाभला म्हणून आनंद व्यक्त करायचा आणि मुलगी झाली तर केव्हा एकदा वयात येतेय आणि तिचे लग्न करून परघरी पाठवतोय असे व्हायचे तुम्हाला .गावात बरीच वर्षे वीज फक्त नावालाच आहे .धड सरळ रस्ता नाही ...सरकारी वाहन  दिवसातून स्वतःच्या वेळेप्रमाणे कधीतरी येणार .डॉक्टर हा प्रकार आम्हाला माहितीच नव्हता . मी दहा वर्षाचा असताना माझी चार वर्षाची बहीण वारली. ती का वारली....???कशी वारली ....??हे माहीत नव्हते . सकाळी उठलो तेव्हा आई तिला मांडीवर घेऊन रडत होती .काही दिवसांनी मला म्हणाली तिला डॉक्टरकडे नेले असते तर वाचली असती. कालपर्यंत माझ्या बरोबर  खेळणारा माझ्या वयाचा मित्र सकाळी खेळायला आलाच नाही तेव्हा कळले रात्री ताप येऊन तो देवाघरी गेला ..डॉक्टर असते तर वाचला असता म्हणजे आज डॉक्टर असते तर हे सर्व वाचले असते. मग आपण का डॉक्टर होऊ नये . असा विचार करून मी अभ्यासाला सुरवात केली . ज्या ज्या वेळी नाउमेद व्हायचो त्यावेळी तो मित्र आणि बहीण आठवायची . आणि पुन्हा झपाटून गेल्यासारखे अभ्यासाला लागायचो . मिळेल त्या शिक्षवृत्ती ....मिळेल तशी मदत घेत पुढे जात राहिलो . प्रसंगी लोकांच्या पाया ही पडलो.मेरिटवर प्रवेश मिळावला. डॉक्टर व्हायचे हे पक्के डोक्यात बसले होते . मला माहितीय मी डॉक्टर होऊनही तुमचे प्राण वाचवीनच याची हमी देऊ शकत नाही पण प्राण वाचवायचे प्रयत्न करीन याची हमी देऊ शकतो . माझ्या ज्ञानाचा वापर मी गावसाठीच करेन हा माझा शब्द आहे .धन्यवाद ......
स्थळ.... मुंबई
ठिकाण ... उच्चभ्रू वस्तीतील पॉश हॉटेल
वेळ... रात्री नऊ
आज सोसायटीतील एक मुलगा डॉक्टर झाला होता . त्या यशाची पार्टी त्याने आयोजित केली होती .सोसायटीतील मित्रमैत्रीनिणा त्याने बोलावले होते . टेबलवर उंची दारू ,आणि इतर पेय तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ होते.
"चियर्स फॉर सक्सेस .....असे म्हणत सर्वांनी ग्लास एकमेकांना भिडवले आणि तोंडाला लावले . मग तो उठून उभा राहिला .
"च्यायला ....झालो एकदाचा डॉक्टर ...!!  आई बापाची खूप इच्छा होती पोरगा डॉक्टर व्हावा . आयुष्यभर दोघांनीही नोकरी करून पैसे कमावले .आम्ही काय करतोय...???कसे राहतोय ..?? याकडे लक्ष दिले नाही . फक्त जे पाहिजे ते आणायला पैसे देत राहिले.गरज आहे त्यापेक्षा जास्त दिले . सोसायटीतील मुले डॉक्टर किंवा इंजिनियर बनतात नाहीतर एमबीए .म्हणून मला डॉक्टर बनायला सांगितले . पाहिल्यावर्षी मार्क कमी पडले म्हणून दुसर्यावर्षी नवीन जोमाने प्रयत्न करायला सांगितले . डबल क्लास लावला .शेवटी डोनेशन भरून ऍडमिशन घेतले .वर्षाला दोन दोन लाख फी भरली . त्यासाठी वडिलांनी ओव्हर टाईम केला . आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे हीच अपेक्षा . तरच चार लोकांत ताठ मानेने जगता येईल असे त्यांना वाटले. मला काय वाटते कोणी विचारलेच नाही . एकदा विचारले बाबांना खरेच डॉक्टर होऊन मी लोकांची सेवा करू शकेन का ....??? तर बाबा म्हणतो "हल्ली मुंबईत कोण डॉक्टर सेवा करतो ..?? आणि 70 % लोकांना एकसारखेच आजार सर्दी खोकला ताप .Bp आणि शुगर  आणि ताप चेक करायला मशीन निघाल्यात . जास्त काही समजले नाही तर स्पेशालिस्टची चिट्ठी देऊन पुढे पाठवायचे . आपण शिक्षणासाठी केलेला सर्व खर्च लवकरात लवकर वासून केला पाहिजे .उद्या आम्हाला अभिमानाने सांगता आले पाहिजे आमचा मुलगा डॉक्टर आहे .च्यायला..... मला तर व्हायोलिन शिकायचे होते . संगीत मला प्रिय आहे . बासरी शिकायची आहे . त्याचे कार्यक्रम करायचे आहेत . मागे रात्री बासरी वाजवताना बाबांनी पाहिले सकाळी त्याचे दोन तुकडे  डस्टबिन मध्ये सापडले .हे असे वाजवून काही मिळणार नाही आयुष्यात . असा दमही वर मिळाला . उद्यापासून आता रोज माझी जाहिरात होईल मुलगा डॉक्टर झालाय . दोन वर्षांनी स्वतःचा दवाखाना उघडेन आणि सुरवातीची फी 200 रु घेऊन धंद्याला सुरवात करेन . आज पोटभर पिऊन घ्या चियर्स ...
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, April 12, 2019

सरमिसळ .. जयवंत दळवी

सरमिसळ ..... जयवंत दळवी
साकेत प्रकाशन
गंभीर लेखनासोबत दळवींनी विनोदी कथा ही लिहिल्या.त्यातीलच एक म्हणजे ही सरमिसळ. हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या या कथा वाचताना आपण गुंतून जातो. दळवींचा मानवी मनाचा अभ्यास खूप आहे . त्यावर त्यांनी मार्मिक आणि गंभीर अश्या दोन्ही प्रकाराने लिहिले आहे . एकूण 14 विनोदी कथा आहेत.काही निव्वळ हसवणूक करतात.तर काहींना कारुण्याची झालर आहे . तर काही कथांमध्ये दळवी स्वतःवरच विनोद करतात. अर्थात जयवंत दळवी म्हणजे पुस्तक वाचायलाच हवे.

Tuesday, April 2, 2019

आज आत्ता इथे ( पर्मनंट प्रेझेंट टेन्स )

आज आत्ता इथे ( पर्मनंट प्रेझेंट टेन्स ) सूझन कॉर्किंन
अनुवाद ..... डॉ. चंद्रकांत सहस्त्रबुद्धे
सायन पब्लिकेशन प्रा लि.
एक माणूस फक्त वर्तमानकाळ लक्षात ठेवतो . त्याला एका मिनिटापूर्वी काय घडले ते आठवत नसेल तर काय होईल ..?? कसा राहील तो ..?? होय हे खरे झालेय हेन्री मोलेसनच्या बाबतीत . सत्तावीस वर्षाचा असताना त्याला अपस्मारचे झटके येऊ लागले म्हणून शस्त्रक्रिया करण्यात आली .  पण तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा वेगळीच समस्या घेऊन आला . त्याची स्मृती तयार करण्याची क्षमताच नष्ट झाली होती .त्याला मागचे काहीच आठवत नव्हते इतकंच नाही तर काही वेळापूर्वीही घडलेले त्याला आठवत नव्हते .आता त्याला फक्त वर्तमानकाळातच जगावे लागणार होते . प्रसिद्ध मज्जाशास्त्रज्ञ डॉ. सूझन कॉर्किंन यांनी साधारण पन्नास वर्षे त्याच्यावर उपचार केले . हेन्री डॉ .च्या जीवनातील एक भागच बनला होता .जगातील सर्वाधिक अभ्यासल्या गेलेल्या रुग्णाची हेलावून टाकणारी कहाणी .