Friday, October 28, 2022

अंजान

अंजान स्पेशल क्राईम युनिट
डिस्कव्हरी + 
गोव्यातील तो बीच झपाटलेला बीच म्हणून ओळखला जात होता. रात्री त्या बीचवर कोणीही जात नव्हते.पण त्या दिवशी ते तीन मित्र दारू प्यायला बीचवर आले होते.त्यातील एक तिकडच्या आमदाराचा मुलगा होता . अचानक त्यांना तिथे एक मच्छीमार स्त्री दिसून आली . ती हळूहळू एका पडक्या होडीच्या दिशेने चालू लागली.आमदाराचा मुलगा संमोहित झाल्यासारखा तिच्यामागे चालू लागला आणि गायब झाला. 
स्पेशल क्राईम युनिटच्या एसीपी विक्रांतकडे ही केस दिली गेली. तो गोव्यात आला तेव्हा आमदाराचा मोठा मुलगा ही काही महिन्यांपूर्वी गायब झाल्याचे त्याला आढळून आले . तसेच इतर काहीजणही तिथे असेच गायब झाले होते. गायब झालेल्या व्यक्तींचा काहीही तपास लागला नव्हता.
विक्रांत गावात फिरून चौकशी करू लागला. मध्येमध्ये त्याला एक शाळकरी मुलगा खुणावू लागला . चौकशी दरम्यान त्याला असे कळले की काही महिन्यांपूर्वी एक मच्छीमार आपल्या होडीत मृतावस्थेत सापडला होता आणि त्या नंतर त्याच्या बायकोने आपल्या मुलांसोबत आत्महत्या केली होती. बीचवर जी स्त्री आमदाराच्या मुलाला दिसली होती ती त्या मच्छीमाराचीच पत्नी होती.
असे काय कारण होते की गावातील मोजकीच माणसे गायब होत होती ?? विक्रांत हे शोधून काढेल का ?
नॅशनल पार्कच्या त्या रस्त्याने रात्री कोणीच जात नव्हते .पण त्या दिवशी एका डीजीपीचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत त्या रस्त्याने निघाला .वाटेत त्याला ती लिफ्टसाठी उभी असलेली दिसली.एक सुंदर तरुणी नववधूच्या पोशाखात हातात जड बॅग घेऊन उभी होती.तो तसाच पुढे निघाला आणि पुढच्या वळणावर ती त्याच्या गाडीसमोरच आली. त्या नंतर तो नाहीसा झाला . एसीपी विक्रांतकडे ते प्रकरण सोपवले गेले.  विक्रांतने त्याला शोधून काढले त्यावेळी तो स्वतःशी बडबडत झाडावर काही विचित्र खुणा काढत होता . भूतप्रेत या गोष्टींवर विश्वास नसलेला विक्रांत या केसकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहू लागला . एका बंद पडलेल्या पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीचा फोटो सापडला . दहा वर्षांपासून  ती मुलगी मिसिंग होती.चौकशी करताना कळले की तिच्या लग्नाच्या दिवशीच दागिने घेऊन पळून गेली होती .
मग ती मुलगी त्याच रस्त्यावर आताही कशी दिसते ? त्या भागात काही लोक नाहीसे झाले होते. त्यांचा तर तिच्याशी काही संबंध नसेल ?? विक्रांत ही केस सोडवू शकेल ??
 एसीपी विक्रांतच्या भूमिकेत गश्मीर महाजनीने दमदार अभिनय केला आहे .पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत तो फिट बसतो. ही सिरीजमध्ये अनेक गूढ भयकथा आहेत.काही अतर्क्य अमानवी आहेत .कथेचे सादरीकरण अतिशय सुंदर आहे . कधीकधी काही सिन पाहताना भीती वाटते .
ज्यांना भयकथा गूढकथा आवडतात त्यांना ही सिरीज नक्की आवडेल . 

Thursday, October 20, 2022

द रीडर

द रीडर
बर्नार्ड शिंल्क
अनुवाद..अंबिका सरकार 
दुसरे महायुद्ध आठवले की हिटलर आणि त्याच्या छळछावण्यांचीच आठवण होते.आतापर्यंत या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.पण हे पुस्तक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर वेगळे ठरते.ही एक प्रेमकहाणी आहे .ही नुसती प्रेमकथा नाही तर त्यामागे एक गूढता आहे.
कादंबरी तीन भागात घडते .पहिल्या भागात लेखकाचे बालपण आणि त्यात त्याची नायिकेशी असलेले संबंध यावर आहे.नायक हा पंधरा वर्षाचा शाळेत जाणारा विद्यार्थी आहे तर नायिका ट्राममध्ये कंडक्टर आहे.ती साधारण पस्तीस वर्षाची असेल. नायक आणि नायिकेचे प्रेमसंबंध असतात.त्यांच्यात लैंगिक संबंध ही असतात. ती निरक्षर आहे .त्याच्याकडून वेगवेगळी पुस्तके वाचून घेते .त्यावर चर्चा करते. हे सगळे व्यवस्थित चालू असताना ती अचानक निघून जाते. इथे पहिला भाग संपतो.
दुसऱ्या भागात नायक आता मोठा झालाय.तो कायद्याचा अभ्यास करतोय. काही नाझी एसएस महिला अधिकाऱ्यांवर ज्यू अत्याचाराचा खटला चालू आहे .नायकाला तिथे ती आरोपी म्हणून दिसते. तो संपूर्ण खटला हजर राहतो तिचे निरीक्षण करतो .तीही त्याला पहाते पण लक्ष देत नाही . ती तिच्यावर असलेल्या आरोपाचे खंडन करत नाही. तिचा आरोप सिद्ध होतो आणि तिला जन्मठेपेची शिक्षा होते.
तिसऱ्या भागात नायक वकील झाला आहे. तो नायिकेला अजूनही विसरला नाही .त्याने पुन्हा तिच्या आवडीची पुस्तके वाचायला सुरुवात केली.ती पुस्तके आपल्या आवाजात रेकॉर्ड करून तिला पाठवतो. रिप्लाय म्हणून ती त्याला दोन ओळींचे पत्र पाठवते.त्यानंतर ती त्याला पत्रे पाठवीत राहते. त्याच्याशी चर्चा करण्यासाठी  ती लिहायला वाचायला शिकते. पत्राद्वारे त्याच्याशी वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा करते.
शेवटी तिची तुरुंगातून सुटका होण्याचा दिवस नक्की होतो.त्यावेळी तुरुंगाधिकारी नायकाला बाहेरच्या जगात तिची सोय करशील का म्हणून विचारते.त्यावेळी तो तिला भेटायला तुरुंगात येतो.बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा त्यांची प्रत्यक्षात भेट होते.ती अजूनही त्याला बच्चू म्हणूनच हाक मारते. तो तिच्यासाठी घर शोधतो. नोकरी शोधतो  आणि उत्सुकतेने तिच्या सुटकेची वाट पाहत राहतो.पण ....
 तुरुंगातून सुटका झाल्यावर ती पुन्हा त्याच्यासोबत राहील का ??  तिने खरोखरच छळ छावणीत काही गुन्हे केले होते का ?? ज्या गुन्ह्याची शिक्षा  ती भोगतेय त्यामागील सत्य काय आहे ?? एका नाझी महिला अधिकाऱ्याला जग स्वीकारेल .?? यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्याला शेवटी मिळतील.

Friday, October 14, 2022

कलिंगसंहाराचा न्याय ...श्रेयस भावे

चाणक्य- चंद्रगुप्त- अशोक - त्रिधारा
कादंबरी ...३
कलिंगसंहाराचा न्याय ...श्रेयस भावे
अनुवाद...शिरीष सहस्त्रबुद्धे
चाणक्य चित्रगुप्त अशोक या त्रिधारेतील हे तिसरे पुस्तक 
ही कादंबरी संपूर्णपणे सम्राट अशोक आणि आचार्य चाणक्यभोवती फिरते. सम्राट बिंदुसारनंतर त्याच्या शेकडो पुत्रांपैकी अशोक हा नावडता पुत्र राजा झाला आहे. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आचार्य चाणक्याचा त्याला पाठिंबा होता. सम्राट अशोकाची उमेदीची वर्षे युद्ध करण्यात गेली.नंतर तो राज्यकारभारात लक्ष देऊ लागला . पण त्याच्या राज्यकारभाराची पद्धत महाआमत्य आचार्य चाणक्याला पसंद नव्हती. त्याने आपली चाणक्यनीती वापरून सम्राट अशोकला स्त्री आणि मदिराची चटक लावली.आता सम्राट अशोक पूर्वीसारखा चपळ राहिला नाही. त्याचे पोट वाढले हालचाली मंदावल्या. तो सतत स्त्री सहवास आणि दारूच्या नशेत राहू लागला. त्यात त्याने जिच्यावर जीवापाड प्रेम केले ती देवी त्याची प्रेयसी जळून मरण पावली.नाईलाजाने त्याने दुसरे लग्न केले .
सम्राट अशोक हा मौर्य सम्राट चंद्रगुप्त याचा नातू .आर्य चाणक्यने अखंड भारताचे स्वप्न पाहिले आणि ते चंद्रगुप्ताच्या मदतीने पूर्णत्वास नेले .त्यासाठी त्याने अनेक कुटील कारस्थाने केली. मार्गात आडवे येणाऱ्यांची गय केली नाही. 
कलिंग राज्य मौर्य साम्राज्यात यावे यासाठी त्याने अनेक वर्षाची योजना आखली होती.संपूर्ण कलिंग राज्यात त्याचे हेर अनेक वर्षे कार्यरत होते.
शेवटी तो दिवस आलाच. त्या दिवशी मौर्य सेनेने पूर्ण ताकदीने कलिंगाच्या सेनेवर हल्ला केला. कलिंग सेनेनेही पूर्ण ताकदीनिशी त्यांना प्रत्युत्तर दिले.या युद्धात सम्राट अशोकने प्रत्यक्ष भाग घेतला नाही .पण युद्ध संपल्यावर तो रणभूमीवर आला आणि प्रचंड नरसंहार पाहून हादरला. त्याचे अनेक आप्त स्वकीय मित्र इतकेच नव्हे जीला मृत समजत होता ती त्याची प्रेयसी देवीही होती. या युद्धानंतरच त्याचे मनपरिवर्तन झाले आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला.
 या कादंबरीत महाअमात्य आचार्य चाणक्य यांची ही प्रमुख भूमिका आहे .शंभर वर्षाचा हा म्हातारा आज चाकाच्या खुर्चीवर बसून कुशल राजनीती करतो. जे त्याला हवे तो ते कोणत्याही मार्गाने घडवून आणत असतो.त्याच्या हालचाली मंद झाल्या आहेत पण डोके अजूनही तल्लख आहे. सम्राट अशोकचा ही तो नावडता आहे. राज्य भावनेने नाही तर कठोर होऊन चालवावे लागते हीच चाणक्याची भूमिका आहे.अखंड भारत घडविण्यास तो काहीही करू शकतो आणि कोणत्याही  थराला जाऊ शकतो.
एक वाचनीय सुंदर कादंबरी

Friday, October 7, 2022

2019 मोदींनी भारत कसा जिंकला ?..राजदीप सरदेसाई

2019 मोदींनी भारत कसा जिंकला ?..राजदीप सरदेसाई 
अनुवाद....मीना कर्णिक 
अक्षर प्रकाशन
राजदीप सरदेसाई हे टेलव्हिजन न्यूज मिडियातील जेष्ठ नाव . पंतप्रधान मोदी ,अमित शहा ,आणि देशातील मातब्बर राजकारणी त्यांना प्रत्यक्ष नावानी ओळखतात.भारतीय राजकारणाचा त्यांना दांडगा अभ्यास आहे.
या पुस्तकात त्यांनी मोदींनी 2019 च्या निवडणुकीत कसा दणदणीत विजय मिळवला याचे सविस्तर वर्णन केले आहे. या निवडणुकीसाठी शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.यात कार्पोरेट पद्धतीचे सुनियोजित नियोजन होते. यात नैतिक अनैतिकच्या सीमारेषा पुसल्या गेल्या होत्या.यासाठी प्रचंड संपत्ती आणि साधनांचा वापर केला गेला होता.काहीही करून ही निवडणूक जिंकायचीच हाच एकमेव उद्देश यात होता.
जिथे वर्षानुवर्षे काँग्रेसची सत्ता होती तिथे भाजपने कसा विजय मिळवला.? पाच वर्षात पुन्हा एकदा विरोधकांच्या पुढे जाणे भाजपाला कसे शक्य झाले ? निवडणुकीचा मुख्य मुद्दा कोणता होता ? 
हे निवडणूक युद्ध  मोदी शहानी कसे जिंकले याचे रोमांचकारी विश्लेषण राजदीप सरदेसाई यांनी केले आहे.