Saturday, February 29, 2020

झोप

झोप
प्रसंग ..१
ती सकाळी उशिराच उठली.रात्रभर त्याचाच विचार करीत होती. द्यायचा का होकार त्याला....?? आपल्याला स्वीकारेल... पण सोनूलीला मुलगी म्हणून स्वीकारेल का ...?? तिला तो आवडत होता . तो ही तिच्यापाठी बरेच दिवस लग्न कर म्हणून  मागे लागला होता. खरच त्याला बायको हवीय की माझे शरीर...?? पुढे काय होईल या चिंतेत रात्रभर डोळा लागला नव्हता. जणू झोपच पळून गेली होती 
प्रसंग ..२
फ्लॅटचा दरवाजा उघडून तो बाहेर पडला तेव्हा नुकतीच पहाट झाली होती . आतमध्ये बेडवर ती झोपून होती . बऱ्याच दिवसांनी  ती घरात एकटी होती. दोघेही याच संधीची वाट पाहत होते . एकमेकांच्या मिठीत आणि धुंद प्रणयात रात्र कशी सरली तेच कळले नव्हते .रात्रभर त्यांचा खेळ चालू होता .त्या धुंदीत डोळ्याला डोळा लागला नव्हता. प्रणयाच्या धुंदीत झोपच पळून गेली होती .
प्रसंग ...३
आजची सकाळ त्याच्या आयुष्यात कदाचित  वेगळेच वळण घेऊन येणार होती. हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डच्या बेडवर झोपून तो विचार करीत होता.छातीत असणारी नेमकी गाठ कसली आहे...याचा निर्णय आज लागणार होता . सहज छातीवरून हात फिरवताना ती बारीक गाठ त्याच्या हाताला लागली होती. मोठी होत गेली तसा तो डॉक्टरकडे आला आणि डॉक्टरने त्याला ऍडमिट होण्याचा सल्ला दिला होता.  कालच छोटे ऑपरेशन झाले आणि ती गाठ तपासणीसाठी पाठवली होती . रात्रभर गाठेचा विचार करता करता झोपच पळून गेली होती.
प्रसंग ...४
सकाळी बायकोने दरवाजा उघडताच नाश्त्याची पिशवी त्याने बायकोच्या हातात दिली आणि आश्चर्याने आ वासलेल्या चेहऱ्याकडे हसून पाहत तो आत शिरला. रात्रभर केलेल्या जागरणाची खूण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती . काल रात्री बऱ्याच दिवसांनी तो जुगाराला बसला . खिश्यातले दोनशे रुपये संपवून उठायचे असा निश्चय करूनच तो बसला होता. पण आज नशीब जोरावर होते. हळू हळू पत्ता लागत गेला . डाव संपला तेव्हा खिश्यात अडीज हजार रुपये होते आणि बाहेर सकाळ झाली होती.विजयाच्या धुंदीत झोपच पळून गेली होती.
प्रसंग....५
सकाळी हसत हसतच  बिछान्यातून उठला.जणूकाही सकाळ होण्याची वाट पाहत होता. काल रात्री त्याच्या जीवनात अतिशय आनंदाचा क्षण आला होता .दुपारीच त्याच्या पत्नीला प्रसूतीवेदना सुरू झाल्या आणि सासूने तिला ऍडमिट करून त्याला हॉस्पिटलला बोलावून घेतले .तेंव्हापासून तो तिथेच होता . रात्री अकरा वाजता मुलगी झाल्याची बातमी आली आणि तो आनंदाने वेडावला.  लग्नानंतर सात वर्षांनी झालेले पाहिले अपत्य . बायकोच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव पाहून तो डोळे पुसतच घरी आला . बाळाचे कसे करायचे ...??त्याचे नाव काय ठेवायचे .....?? बाळाच्या भविष्याची स्वप्ने पाहत असताना त्याची झोपच पळून गेली.
प्रसंग...६
सकाळी ठीक सात वाजता त्याचा रिलिव्हर त्या ओसाड बंकरमध्ये शिरला.पेंगुळलेल्या डोळ्यांनी त्याने रिलिव्हरच्या सॅल्युटचा स्वीकार केला. रात्रभर तो AK 47 च्या ट्रिगरवर बोट ठेवून बसला होता. रात्री जरा जास्तच गोळाबारी झाली त्यामुळे कोणालाच झोप मिळाली नव्हती . बेकायदेशीर मार्गाने घुसणार्या काही अतिरेक्यांना बहुतेक कंठस्नान घातले होते . सकाळी आलेला रिलिव्हर बहुतेक त्यांची प्रेते शोधायला जाईल. साले ...आमच्या देशात घुसतात .. पण आम्हाला पार करूनच जावे लागेल त्यांना... समोर येणाऱ्या प्रत्येक घुसखोरला गोळ्या घालायच्या या विचारानेच त्याची झोप पळून गेली होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, February 28, 2020

मराठी भाषादिन

मराठी भाषादिन
तसा तो साहेबांचा कट्टर भक्त.कोणत्याही आंदोलनाला .. सभेला...दोन पावले नेहमीच पुढे. दोन तीन केसेस अंगावर अभिमानाने मिरवत होता.तारखेला मोठ्या उत्साहात कोर्टात हजरही असायचा.
कालच वरून आदेश आला होता.उद्या मराठी भाषा दिवस आहे.सगळ्यांशी मराठीतच बोलायचे . जो इतर भाषेत बोलेल त्याला फटकवा.साल्याना कळू दे आपली ताकत... .. 
मग काय.... हा चार इंच छाती पुढे काढीतच घरी आला. येता येता "क्यू साब कैसे हो...."??  विचारणाऱ्या कोपऱ्यातल्या पानवाल्याला खुन्नस दिली.
"कल मराठीमें बोलो.."असा दम देऊन घरी आला . आत शिरताच बायकोचे फोनवर बोलणे कानावर आदळले.
"ऐसा कैसा डायरेक्ट एक रुपया बढाया .. पैसा क्या झाड पे लगता है .हम दुसरा इस्त्रीवाला देखेगा..."हे ऐकून त्याचे टाळले सरकले.
फोन ठेवताच बायकोने सांगितले इस्त्रीवाल्याने एक रुपया वाढविला आहे .
"ठीक आहे उद्या बघतोच त्याला... .." तो जोशात म्हणाला.
"उद्या का ...?? आज का नको ..?? तिने विचारले.
"उद्या साहेबांचा आदेश आहे. आज नाही ..."तो तिला कोड्यात टाकून बाथरूममध्ये शिरला.
फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा छोटी धावत आली."पपा टीचर म्हणाली..कम टूमारो विथ न्यू मराठी पोएम...मला मराठी पोएम शिकवा...
"आयला त्या टीचरच्या.... मराठी कविता ही इंग्लिशमध्ये मागते . उद्या बघतोच तिलाही .."असे मनात म्हणत तिला एक मराठी कविता शिकवली .
दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तोच दारातील पाववाल्याच्या आवाजाने.
"पाव... पाववाला लेलो पाव.." असे ओरडणार्या पाववाल्याच्या आवाजाने साहेबांचा आदेश आठवला आणि त्याच तिमिरीत त्याने त्याच्या कानाखाली आवाज काढला.
 "मराठीत बोल .. ...तो रागात म्हणाला . 
बायकोने धावत येऊन मागे ओढले तसा पाववाला पळून गेला.
" आता लेकीला काय देऊ खायला ...?? ती चिडून म्हणाली.
"चपाती दे.... "तो ठेक्यात म्हणाला.
"जा...दळण घेऊन या..."तीही ठसक्यात म्हणाली. "मराठीसाठी काय पण....." असे म्हणत तो खाली उतरला.
समोरच्या चक्कीवाल्याकडे पीठ दे आमचे असे म्हणतात.... वो  बाद में आवो अभी हुवा नही... असे उत्तर येताच त्याच्या हात वर झाला आणि खाणकन त्या चक्कीवाल्याच्या गालावर आदळला.
"मराठीत बोल ..."असे बोलून तो बाहेर पडला.
 दुपार होईपर्यंत त्याचे हेच चालू होते .अनेक टॅक्सीवाले ...भाजीवाले.. त्याने पळवून लावले.
खुश होऊन तो घरी जेवायला आला. पण ताटात ऑम्लेट आणि भात पाहताच टाळके सरकले .
 "हे काय ..?? वार कोणता ..?? तू देतेस काय ...?? मासे कुठेयत ..?? कालवण कुठेय...?? त्याने चिडून विचारले.
"त्या मासेवाल्याला हिंदीत बोलतो म्हणून मारून पळवलेत. बाजारात  कोळीन घासाघीस करत नाही . जे बोलेन त्या पैशात मासे घेऊन  जा म्हणते .. आपल्याला कुठे परवडतेय..दारातील मासेवाला स्वतात देतो.आज खा ऑम्लेट.. पोरगी पण तेच घेऊन गेलीय डब्यात.... ."बायको चिडून म्हणाली.
 मुकाट्याने जेवून तो बाहेर पडला. खाली नाक्यावर उभा असताना एक मध्यमवयीन जोडपे त्याच्याजवळ येऊन उभे राहिले.त्यांच्याबरोबर साधारण सहा वर्षाची मुलगी होती.
"भाईसाब.... ये सरकारी हॉस्पिटलमें कैसे जाते है बताओगे ...?? त्याला परत आदेश आठवला . चिडून त्याने त्या माणसाची कॉलर पकडली.
"मराठीत बोल ...."?? त्याचा आवेश पाहून त्याच्याबरोबरची स्त्री घाबरली.तिने त्याचे पाय पकडले आणि रडत म्हणाली "माफ करो भैय्या ... आजही बाहरगाव से आये है .इस बच्चीके इलाज के लिये . हमे मराठी नही आती....."ती हात जोडून त्याची विनवणी करू लागली तसा तो थंड झाला . शरमेने त्याची मान खाली गेली . त्याने ताबडतोब त्यांच्यासाठी टॅक्सी शोधण्यास सुरवात केली.एक दोन टॅक्सीवाल्याना त्याने थांबविण्याचा प्रयत्न केला . पण त्याचे ऐकून कोणीच टॅक्सीवाला थांबायला तयार नव्हता . चिडून तो एका टॅक्सीच्या समोर थांबला . 
"हॉस्पिटल चलोगे...." असे चिडून म्हणताच टॅक्सीवाल्याने मान डोलावली . त्यांना  टॅक्सी बसवून ड्रायव्हरला हॉस्पिटलचा पत्ता सांगितला . निघताना त्या स्त्रीने हात जोडून "शुक्रिया भैय्या ...."असे म्हणताच डोळ्यातील अश्रू पुसत तो माघारी वळला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, February 27, 2020

चेटकीण... नारायण धारप

चेटकीण.... नारायण धारप 
दांडेकरांची वाडी तशी श्रीवर्धनपासून एका बाजूला वस्तीपासून दूरच होती .भरतीच्या वेळी पाणी वाडीत शिरल्यानंतर तिचा सगळ्यांपासून संपर्क तुटायचा .
वाडीत दोन घरे .एका घरात आजी आणि तिच्या सोबतीला पूर्वीपासून असलेली रखमा. तर दुसरे घर बंद...ओसाड. त्या घराकडे  कोणीही बघायचेही नाही असा आजीचा हुकूम . वर्षानुवर्षे त्या घरात कोणीच गेले नव्हते.
 पण आजी वारल्यावर तिची नात सोनाली अमेरिकेवरून कार्यासाठी वाडीत आली . तिला पहिल्यापासूनच ते पडके घर खुणावू लागले.आई.. बाबा ..रखमा...मामा.. सगळेच त्या घराकडे पहायचेही नाहीत .विषय काढला तर गप्प बसायचे.
त्यादिवशी ती त्या घराकडे गेली . खिडकीच्या काचेतून तिने आतील भागाचे फोटो काढले . काही फोटो लांबून घेतले . फोटो घेताना तिला जाणवले कोणीतरी या घरात वावरतेय . अचानक आतील एक दरवाजा हळू हळू उघडताना दिसला . तेव्हा ती तिथून पळत सुटली. भूत प्रेत मंत्र तंत्र या गोष्टीवर तिचा विश्वास नव्हताच . पण तरीही या घरात काहीतरी आहे हे तिला जाणवले.
 तिने कॅमेरातील रोल डेव्हलप करायला श्रीवर्धनला दिला आणि फोटो पाहतच ती हादरली . घराच्या छपरावर कोणीतरी माकडासारखे होते . ते तिला प्रत्यक्षात दिसले नाही याची  खात्री होती पण फोटोत स्पष्ट दिसत होते . दुसऱ्या फोटोत तर ती छोटी मुलगी तिच्याकडे रोखून पाहताना स्पष्ट दिसत होती.
कोण आहे ती मुलगी ..?? काय करतेय त्या बंद ओसाड घरात ..  आजीच्या पोथीतून तिला सर्व माहिती मिळाली . आजीने तिलाच त्या घरापासून कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी वारस नेमले होते.आता तिलाच त्या घरापासून सर्वांचे रक्षण करायचे होते . त्या पडक्या घरातील दुष्ट शक्ती एक ना एक दिवस बाहेर येणार याची तिला खात्री होती.

Tuesday, February 25, 2020

प्रतिश्रुती... स्मरणयात्रा भीष्माची ....ध्रुव भट्ट

प्रतिश्रुती... स्मरणयात्रा भीष्माची ....ध्रुव भट्ट
अनुवाद.. अंजनी नरवणे
मेहता पब्लिशिंग हाऊस
बाणांच्या शय्येवर झोपलेले पितामह भीष्म उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहतायत. उत्तरायण सुरू झाले की त्यांना प्राण त्यागायचे आहेत. मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचा जीवनपट तरळतो आहे आणि त्यांचे आत्मपरीक्षण ही चालू आहे. भीष्माच्या प्रतिज्ञेमुळे अनेकांना त्रास झाला आहे तर काहीजण दुखावले गेले आहेत . इच्छामृत्यूचे वरदान मिळाल्यामुळे आज त्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधी प्राप्त झाली आहे .प्रतिज्ञाबद्धते विषयी स्वतः भीष्माना काय वाटते.. त्यांची बाजूही ऐकून घेऊ

Monday, February 24, 2020

होळी आणि सुतक

होळी आणि सुतक
रमाकांत सुर्वे सिरीयस असल्याची बातमी इथे  मुंबईत शंकर सुर्वेला कळली आणि तो चिंतेत पडला.
"शिमगो इलो.....आणि ह्या म्हाताऱ्याक काय झाला..."??बायकोने ताटात चपाती ठेवत विचारले आणि शंकर चिडला.
"माका काय माहीत ..?? मी काय त्याचे पाय चेपूक गेलेलो की काय.. .."?? त्याने तडकूनच उत्तर दिले. त्याचे अर्धे लक्ष कॅलेंडर आणि अर्धे ताटात होते . पण यावेळी  एक बोंबील कमी दिला म्हणून बायकोवर चिडला नव्हता तर नेमक्या पालखीला सुतक येईल का ..?? याच्या चिंतेत तो होता.
आता भावकी म्हटली की हे सर्व आलेच .आधीच दरवर्षी भांडून सुट्टी मंजूर करून घेत होता .कोकणातील माणूस शिमग्याला गावी जाणारच.पण यावेळी सुतक आले तर पालखी खांद्यावर घ्यायला मिळणार नाही.
"गो माय...एकदा घरी येऊन जा मग काय त्या म्हाताऱ्याचा कर ... "मनातल्या मनात देवीला गाऱ्हाणे घालत त्याने जेवायला सुरवात केली.
सुपरस्टार विनयकुमारला ही बातमी कळली तेव्हा तो कृष्णाच्या  वेशात शूटिंग करत होता. तसे ही पालखीला कधी जात नव्हता आणि सुयेरसुतकही पाळीत नव्हता.पण लहानपणी ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो तो रमाकाका आता सिरीयस आहे हे ऐकताच गंभीर झाला. बऱ्याच कालावधीनंतर त्याला काम मिळाले होते. सुपरस्टारची इमेज हळू हळू लोकांच्या मनातुन उतरत चालली होती. काका अचानक गेला तर गावी जावे लागेल .पालखी लांबेल.....काका मेला तर सर्वच घोळ होईल.माते....काकांचे मरण पुढे ढकल .. असे मनात म्हणत त्याने समोरच्या देवाला नमस्कार केला.
केरळातील नामदेव सुर्वेला फोन गेला तेव्हा तो नुकताच ऑफिसमध्ये येऊन बसला होता . गावाशी फक्त गणपतीला जाण्याचा संबंध असलेल्या नामदेव ला रमाकांत सुर्वेच्या जगण्या मरण्याचे फारसे सोयरसुतक नव्हते.तर आपल्या मुलीच्या बाळंतपणाची काळजी होती . या दिवसात ती बाळंत झाली तर भावकीला कळवावे लागणार होते . मग सुयेर चालू झाला तर पालखी लांबणार त्यात रमाकांत काकाचे काही झाले तर सूयेरात सुतक . मुलीचे पाहिले बाळंतपण म्हणून त्याला जास्त काळजी होती . त्याची केरळीयन पत्नी हे सर्व मानत नव्हती पण गावाशी संबंध ठेवायचा तर सर्वांचे ऐकायला हवे."देवा पोरींचे बाळंतपण आणि रमाकाकाचे मरण पुढे ढकल रे .....असे बोलत ऑफिसमधील गणपतीला हात जोडले .
 कॅनडातील अरविंद सुर्वेच्या घरी फोन गेला तेव्हा तिथे मध्यरात्र झाली होती. अश्यावेळी फोन फक्त भारतातून येऊ शकतो हे त्याला माहित होते.विनय... असे म्हणून ऍनाने त्याच्या हाती फोन दिला तेव्हाच काहीतरी घडलंय असे समजून गेला. रमाकाकाचे ऐकून तोही काळजीत पडला . कॅनडात असल्यामुळे तो हे सर्व काही मानत नव्हता पण कॅनडात जाण्यासाठी रमाकाकाने केलेली मदत तो विसरू शकत नव्हता .गणपतीला जायचा तेव्हा प्रत्येकवेळी त्याने पैसे परत देण्याचे प्रयत्न केले होते पण त्यांनी घेतले नव्हते. त्यांचे उपकार मनात ठेवूनच तो जगत होता.  आता त्यांचे वय झाले होते आणि होळीच्या दिवसात त्यांचे जाणे म्हणजे पालखीचे खरे नव्हते.  म्हणजे काका असे गेले तर भावकी शिव्या घालणार हे नक्की. त्यालाही ताबडतोब भारतात निघावे लागले असते . पण नवीन प्रोजेक्टचे काम शेवटच्या टप्प्यात होते. अश्यावेळी भारतात जाणेही परवडले नसते . परमेश्वरा रमाकाकांचे जाणे काही दिवस पुढे ढकल अशी प्रार्थना करून तो पुन्हा आडवा झाला .
शंकर सुर्वे रोज रमाकांत सुर्वेच्या घरी जाऊन त्याची चौकशी करीत होता . कितीही झाले तरी चुलता होता तो. आईबाबा गेल्यानंतर त्याचाच आधार होता त्याला . त्याची आणि त्याचा भावांची काळजी घेतली होती त्याने. अश्या माणसाला अंथरुणात खिळलेले पाहून जीव तुटत होता त्याचा . आपल्यापरीने जमेल तितकी सेवा चालू होती त्याची . पण आता परिस्थिती फारच बिघडली होती . त्याचे हाल बघवत नव्हते .सगळेच विधी बिछान्यात ....आपल्या सर्व भावाना फोन करून तो सिरीयस असल्याची बातमी कळवली होती. आताही तो  म्हाताऱ्याला साफ करून त्याचे कपडे... अंथरूण... बदलून घरी आला. झोपताना देवापुढे हात जोडून म्हणाला "काकांना लवकर घेऊन जा रे बाबा . बिचाऱ्याचे हाल पाहवत नाहीत..
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, February 23, 2020

द रोड...कॉरमॅक मकार्थी

द रोड...कॉरमॅक मकार्थी
अनुवाद...अनिल किणीकर 
वैराण आणि बेचिराख झालेल्या अमेरिकेतून ते बाप लेक दक्षिणेकडे निघाले आहेत. अंगावर पुरेसे कपडे नाहीत.अन्न नाही.. पाणी नाही. आपल्या लहान मुलाचे रक्षण करण्यासाठी तो नेहमीच सावध आहे . लुटारू टोळ्यांपासून रक्षण करण्यासाठी त्याच्याकडे  पिस्तूल आहे .पण त्यात फक्त दोनच गोळ्या आहेत .संपूर्ण बेचिराख झालेल्या प्रदेशातून ते प्रवास करतायत. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक घराची ते तपासणी करतात ,रस्त्यात आणि घरात सडणारी प्रेतेही त्यांनी सोडली नाहीत. अन्नाचा प्रत्येक कण ते जपून वापरतात.. इतके असूनही त्यांना जगण्याची आशा आहे . त्यासाठी प्रयत्न करायची त्यांची तयारी आहे जमल्यास समोरच्याचा जीवही घेण्याची .
कॉरमॅक मकार्थी हे अमेरिकेतील दिग्गज कादंबरीकार मानले जातात तसेच नोबेल परितोषिकांचे प्रबळ दावेदार ही . त्यांच्या या कादंबरीला २००७ चा पुलित्झर हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे .

Friday, February 21, 2020

भीतीचीही सवय होते

भीतीचीही सवय होते
( नारायण धारप यांच्या चेटकीण या कादंबरीत एक वाक्य आहे .. भीतीचीही सवय होते ..त्यावरून सुचलेली ही छोटी लघुकथा )
नटराजच्या दारातच विष्णू आम्हाला भेटला .महिन्यातून एकदा शेट्टीच्या नटराजला भेट द्यायची हा आमचा शिरस्ता.आम्ही आत घुसायला आणि विष्णू बाहेर पडायला एकच गाठ पडली.
"काय विष्णूभाऊ....!! झाली का .….."?? विक्रमने अंगठा ओठाजवळ नेऊन विचारले.
 अर्थात त्याला पाहून विष्णूच्या कपाळावर आठ्या पडल्याच. तरीही तोंडातून होकार निघून गेला.
"आता डायरेक्ट नाईटला का ..."?? मी विचारले.
विष्णू सरकारी हॉस्पिटलमध्ये कामाला होता आणि ड्युटीही शवागृहात होती . त्यामुळे रात्रभर त्या प्रेतांच्या सानिध्यात राहावे लागायचे.त्या एकांतात प्रेतांबरोबर कसे राहत असेल...?? असा प्रश्न नेहमीच पडायचा.पण त्याचे ही उत्तर विक्रमने एकदा शोधून काढले. 
त्या दिवशी नटराजमध्ये विक्रम त्याच्यासमोरच जाऊन बसला आणि त्याच्याच पैशाने एक पेग पियाला.बहुतेक त्यामुळेच विष्णू विक्रमकडे रागाने बघत होता.
"विष्णू ...तुला भीती वाटत नाही का त्या प्रेतांसोबत राहायची....."?? मी विचारले.
"भीतीची ही सवय होते भाऊ ...." त्याने थंड आवाजात उत्तर दिले आणि पुढे निघाला.आम्ही खांदे उडवून आत शिरलो.
इकडे विष्णूची स्वारी बऱ्यापैकी रंगात आली.सवयीप्रमाणे त्याने दुसऱ्या पाळीतील कामगारांकडून चार्ज घेतला आणि नेहमीप्रमाणे शवागृहात चक्कर मारली.त्या थंड वातावरणात प्रेतांच्या सभोवती फिरताना अंगावर शहारे येत होते . तरी  बरे प्रत्येक बॉडी पायापासून डोक्यापर्यंत पांढऱ्या कपड्यात गुंडाळली होती .  तिथे एक भयाण शांतता जाणवत होती . मध्येच खट्ट असा आवाज आला तरी विष्णू दचकत होता . शेवटी तो बाहेर येऊन त्याच्या नेहमीच्या खुर्चीत बसला.
बसल्यावर त्याने खिश्यातून तंबाखूची पिशवी काढली आणि मस्त बार बनवायला सुरवात केली . मनासारखा बार मळून होताच तो दाढेखाली धरणार इतक्यात पाठीमागून आवाज आला.
 " काय विष्णू शेठ ....एकटेच खाणार का .." ?? विष्णू दचकून मागे वळला. समोर अंत्या पवार उभा होता . डोक्यावर पट्टी.. हाताला बँडेज.. बहुदा फ्रॅक्चर असावे .
"च्यायला अंत्या तू ...??हे काय ..?? कुठे पडलास ..?? विष्णूने आश्चर्यचकित होऊन प्रश्नांची फैर झाडली.
"अरे घरी जात होतो.रस्त्यात ऑइल सांडले होते तिथून बाईक घसरली ,चांगले दहा फूट घसरत गेलो . तिथेच बेशुद्ध पडलो.आता जाग आली बघ.बघतो तर आपलेच हॉस्पिटल . आता झोप येत नव्हती . विचार केला तू तर रात्रपाळीत असतोस तुझ्याशीच गप्पा मारू.....म्हणून आलो..." तंबाखूचा बार त्याच्याकडून घेत अंत्या म्हणाला.
"बरे झाले आलास ....मलाही कंटाळा येतो बघ असे बसून . इथे कोण येणार आहे सहज  आणि मी ही फार वेळ जागा राहत नाही .काय आहे इथे चोरी करण्यासारखे ....?? मुडदे ....??  आता गप्पा मारू आणि मग तू जा आरामात झोपायला .." विष्णू खुशीत म्हणाला .
" विष्णू ..तुला इथे भीती नाही वाटत .."?? अंत्या हळूच म्हणाला .
" कोणाची ..?? मुडदयांची...?? की भुताची ..?? विष्णूने सहज विचारले .
" दोघांची ही ....."अंत्याने हसून विचारले .
"वाटायची .... पण आता भीतीचीही सवय झालीय . आता  काहीच वाटत नाही.... तुझ्यासारखे बरेचजण झोप येत नाही म्हणून गप्पा मारून जातात...."थंड आवाजात  विष्णू म्हणाला.
"बरे... घरी कोणाला कळविले आहेस की नाही ..'?? विष्णूने आठवण झाल्यासारखे विचारले .
"माहीत नाही रे ... आता शुद्धीवर आलो तेव्हा सगळे झोपून होते .कोणाला उठवले नाही मी.तुझीच आठवण झाली म्हणून तुला भेटायला आलो तसेही घरच्यांना सवय आहे माझी वेळीअवेळी घरी येण्याची ...."अगदी सहज स्वरात अंत्या म्हणाला .
" ठीक आहे... तू आराम कर सकाळी मी कळवीन घरच्यांना ...." विष्णू जांभई देत म्हणाला .
"ओके ...असे म्हणून अंत्या निघून गेला . थोड्या वेळाने विष्णू तिथेच घोरू लागला .
सकाळी सहा वाजता विष्णू उठला त्याने सवयीप्रमाणे शवागृहात राउंड मारली . सफेद कापडात गुंडाळलेली प्रेते मोजली मग बाहेर येऊन एक फोन लावला.
"बंड्या अंत्या पवार गेला ...?? रोड आक्सिडंटमध्ये . मी त्याचे सर्व पेपर बनवतो बॉडी घेऊन जाऊ .भाऊला सांग त्याच्या घरी कळवायला..तू आणि विक्रम या बॉडी न्यायला .असे बोलून फोन ठेवला.
असे कित्येकजण माझ्याशी रात्रभर येऊन बोलतात . पण मला कळते ते कोण आहेत ..पहिल्यांदा भीती वाटायची पण आता भीतीचीही सवय झालीय.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, February 20, 2020

गेम..थरारक सत्य ...विजयकुमार बांदल

गेम..थरारक सत्य ...विजयकुमार बांदल
आमचा चौथा स्तंभ प्रकाशन
80 च्या दशकात मुंबईत गॅंगवॉर खूप फोफावले होते . दाऊद इब्राहिम...अरुण गवळी..रमा नाईकसारखे नवीन दादा उदयास येत होते.तर हाजी मस्तान .. वरदाराजनसारखे अस्ताला जात होते. यातील एका नवीन दादाची कहाणी विजयकुमार बांदल यांनी या पुस्तकात मांडली आहे .त्याचे नाव बाबू रेशीम.
बाबू रेशीमचा उदय आणि अस्त याची कहाणी जशीच्या तशी या पुस्तकात मांडली आहे .खरे तर मुंबई गॅंगवॉर हा खूप मोठा विषय आहे . लिहायला गेले तर एकामागून एक असे अनेक फाटे फुटतील आणि त्यावर दहा पुस्तके लिहिली जातील.
पण लेखकाने यात फाटे फुटू न देता केवळ बाबू रेशीम या एकाच व्यक्तिरेखेवर आपले लक्ष केंद्रित आहे. गावावरून आलेला बाबू माझगाव डॉक मधील कॅन्टीन मध्ये कामाला लागतो आणि पुढे तेथील युनियन लीडर बनतो .  रमा नाईक आणि अरुण गवळी यांच्याशी मैत्री करून बाबू दादा बनला आणि लूटमार.. खंडणी अशी कृत्ये करू लागला . शेवटी 5 मार्च 1987 ला जेकब सर्कल पोलीस कोठडीत त्याच्या शत्रूने हल्ला करून हत्या केली .
लेखक विजयकुमार बांदल हे सकाळचे क्राईम रिपोर्टर होते .गेली चाळीस वर्षे ते गुन्हेगारी क्षेत्रात राहून प्रामाणिकपणे आपले काम करतायत .एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे .
पुस्तकाला भरकुमार राऊत यांनी प्रस्तवना दिली आहे .
संपूर्ण गॅंगवॉरची माहिती न देता फक्त ठराविक एका दादावर काढलेले हे  पुस्तक असेल. यात त्यांनी बाबू रेशीमवर कोठडीत केलेल्या हल्ल्याचे इतके अचूक वर्णन केले आहे की जणू तेच तिथे हजर राहून संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करतायत असे वाटते .

Thursday, February 13, 2020

किस डे

किस डे
"आज कोणता दिवस आहे ...."?? त्याने फोनवरून तिला विचारले.
"जा हो तुम्ही... .. नको ते सुचत असते तुम्हाला नेहमीच... ..आजूबाजूचे ऐकून काय म्हणतील ".तिने लाजून उत्तर दिले .
"अग कोण ऐकणार आहे ...... खूप दिवसानी मोबाईला रेंज आलीय इथे. त्यामुळे जो तो मोबाईल कानाला लावून घरी बोलत बसलाय.." तो म्हणाला.
"अग बाई ...!!  सगळेच फोनवर...??  मग समोरच्या शत्रूवर लक्ष कोण ठेवतेय..??  आता हे सांगू नका की सीमेपालिकडे ही आताच मोबाईलची रेंज आलीय.........." .ती ही चिडवत म्हणाली.
"मॅडम... आमचे तोंड चालत असले तरी एक बोट ट्रिगरवर आणि नजर समोर आहे म्हटलं ..शेवटी देश ही तुमची सवत आहे हे नेहमी लक्षात ठेवा.."त्याने हसत उत्तर दिले.
"हो का....!!  मग तिलाच विचारा आज कोणता दिवस आहे..."?? तिने लटक्या रागानेच उत्तर दिले . 
"हाय.. हाय ...!! रागावल्यावर तू नेहमीच सुंदर दिसतेस .आताही डोळ्यासमोर उभी राहिलीस बघ......" तो रंगात येऊन म्हणाला . 
"चला काहीतरीच तुमचे .. सासूबाई बघतायत म्हटलं .."ती कुजबुजली.
 "मग सांग आज कोणता डे आहे...??  नाहीतर आईलाच विचारतो.. दे तिला ...." तो ओरडून म्हणाला.
"गप्प बसा हो .. किती हा  चावटपणा .... मुले मोठी झाली आता काही वर्षांनी सून येईल घरात तरी तुमचा तरुनपणा कमी होत नाही .. "ती चिडून म्हणाली . 
"आम्ही जवान आहोत ..म्हातारे कधीच होणार नाही...."त्याने गर्वात म्हटले.
"का सतावतायत मला .... एक तर किती दिवसांनी तुमचा आवाज कानावर पडला आणि मग ही भाषा .. कोणताही दिवस असू दे .. तुम्ही बोलता तो दिवस माझ्यासाठी प्रेमाचा ...."ती भावुक होऊन म्हणाली . 
"माहितीय ग राणी ....पण हेच अजून स्पष्ट बोललीस तर माझा दिवस चांगला जाईल ....."तो अजूनही थट्टेच्या मूड मध्ये होता .
"तुम्ही सुधारणार नाही.असेच सूचक बोलता येते फक्त.आईला कालच डॉक्टरकडून घेऊन आलीय. गोळ्या बदलल्या तिच्या .आता बरे वाटते म्हणाली. हो सांगितले मी तिला तुमचा फोन आहे तसे हात हलवून तुम्हाला आशीर्वाद दिलाय... मी काय म्हणते ..जमले तर लवकर या . आईचे काय खरे वाटत नाही..."  ती काळजीने म्हणाली .
"बघतो... पण शब्द देत नाही. प्रत्येकाला घरची काळजी असते... प्रॉब्लेम असतात.सर्वच असे ठरवत बसले तर इथे कोण राहील .शेवटी देशाच्या प्रति कर्तव्य आहे म्हणूनच इथे या रणरणत्या उन्हात बंदुकीच्या चापावर बोट ठेवून बसलोय ना ...मी कारणे देऊन सुट्टी घेऊ शकत नाही आणि आईही एका सैनिकांची बायको होती... आणि तिचा मुलगा ही सैनिक आहे . तिला काहीच वाटणार नाही उलट मध्येच सुट्टी घेऊन आलो तर चिडेल .."त्याच्या आवाजात कडकपणा आला .
"हो ...पण आपल्या चिरंजीवाला आहे का काही ... सकाळीच बाहेर पडलाय . मोबाईलवर कोण्या तरुणीचा फोटो आहे . विचारले तर म्हणतो मैत्रीण आहे . हल्ली आठवडाभर सकाळी उठून बाहेर जातो . छोटीला विचारले तर म्हणाली व्हॅलेंटाईन विक चालू आहे . त्या दिवशी दोन टेडी बियर  घेऊन आला . म्हणतो गिफ्ट मिळाल्या ... तिने तक्रारीचा सूर लावला 
"आता आलीस लायनीवर .. सांग मग आज कोणता दिवस आहे .... "त्याने पुन्हा हसत विचारले .
"जा हो तुम्ही .. किती छळता.. समोर आलात तर जास्त बोलत ही नाहीत. किती खाणाखुणा केल्या तरी लक्ष नसते बाहेर असल्यावर बरेच काही सुचते तुम्हाला आणि मी का लक्षात ठेवू आज कोणता दिवस आहे ....?? ते ही तुम्ही  समोर नसताना.."?? ती पुन्हा चिडली .
"हो का ..?? मग त्या दिवशी रोझ डे चा मेसेज कोणी केला मला ....'??  तो खट्याळपणे म्हणाला .
"तो मेसेज मला मैत्रिणीने पाठविला म्हणून तुम्हाला फॉरवर्ड केला"तिने पटकन उत्तर दिले.
"मग आजही मैत्रिणीने मेसेज पाठविला असेलच . बोल ना कोणता दिवस आहे आज .उद्या व्हॅलेंटाईन डे आहे . हे तरी माहीत आहे ना ....."??त्याच्या बोलण्यात कौतुक होते .
"हो... ते तर लक्षात ठेवावे लागते .कारण तुम्ही कधीच घरी नसता अश्या वेळी. मग तुमची आठवण काढीत दिवस काढावा लागतो आणि मेला त्या दिवशीच तो दिवस लवकर संपत नाही ... "ती दाटलेल्या कंठाने म्हणाली .
"माफ कर प्रिये ... संसारात बरेच असे आनंदाचे क्षण मी तुला कधीच देऊ शकलो नाही . या देशसेवेच्या व्रतात माझ्याबरोबर तुझीही फरफट झाली..."त्याचा स्वर गंभीर झाला 
"असे नका हो बोलू ...आज तुमच्यामुळे आम्ही समाजात ताठ मानेने वावरतोय.मुलांना तुमचा गर्व वाटतो आहे .माझी सवत मला प्राणांहून प्रिय आहे........." ती अश्रू रोखीत म्हणाली .
"हो ना .. मग आज सांग कोणता दिवस आहे ...."तो पुन्हा मूडमध्ये येत म्हणाला 
"तुम्ही म्हणजे ना .. खूप हट्टी झालायत ...बर बाबा सांगते..." ती हसत म्हणाली
"आता सांगू नकोस कृती करून सांग. फोनवर कळेल मला ...." त्याने अजून चिडवले .
"किती सतावतायत हो .... आज भारीच मूड दिसतोय स्वारीचा .. आज किस डे आहे म्हणून इतकी लाडी गोडी आहे ना ...थांबा डोळे बंद करा देते ... "ती मनोमन मोहरत म्हणाली.
इतक्यात फोन मधून गोळीबाराचा आवाज ऐकू येऊ लागला .
"आहो काय झाले ...?? कसला आवाज हा .. ..??कुठे आहात तुम्ही .. ..?? किस हवा ना ...?? बोला काहीतरी बोला ...?? त्या निर्जीव फोनमध्ये ती एकटीच ओरडत राहिली .

© श्री . किरण कृष्णा बोरकर

Wednesday, February 12, 2020

वचन

वचन
आज तिची मुलगी डॉक्टर झाली.पदवीदान समारंभात ती दाटलेल्या कंठानी आपल्या लेकीकडे पाहत होती .  प्राध्यापक तिचे कौतुक करताना थकत नव्हते . बापविना वाढलेली पोर आईने किती कष्ट घेऊन तिला वाढविले होते याचीच चर्चा सगळीकडे चालली होती. सगळीकडून होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावात मायलेकीने  एकमेकांना मिठी मारली.आज तिच्या डोळ्यात मुलीबद्दल अभिमान स्पष्ट दिसत होता . 
घरी येता येता ती भूतकाळात हरवून गेली . 
त्या कोवळया वयात मिळालेले प्रेम म्हणजे तिला स्वर्गच मिळाल्यासारखे झाले होते.आपला जोडीदार आपल्याशीच एकनिष्ठ आहे याची तिला खात्री होती . पण उपयोग संपताच त्याने तिला आपल्या आयुष्यातून  बाहेर फेकून दिले होते . ती हताश झाली . अबोर्शन आता शक्य नाही असा डॉक्टरकडून निरोप आला आणि ती हादरली.
पण एक देवदूत तिच्या आयुष्यात आला . होय.... देवदूतच होता तो.मोजून तीन वर्षांचे आयुष्य होते त्याला. त्याला पत्नी ..संसार ..हवा होता आणि हिला बाळासाठी बापाचे नाव . त्यासाठी दोघांनीही समजोता केला.
मरेपर्यंत तुला स्पर्श करणार नाही आणि मृत्यूनंतर सगळे होणाऱ्या बाळाच्या नावावर करेन हे वचन त्याने  शेवटपर्यंत पाळले. 
पण तो गेल्यावर ही पुन्हा एकटी झाली.जोडीला दोन वर्षांची सोनूली.नवऱ्याच्या जागेवर नोकरी.. हाच एकमेव आधार.मरणापूर्वी त्याने मुलीला काहीही करून डॉक्टर बनव असे वचन घेतले.आता ते वचन पाळायची अवघड जबाबदारी तिच्यावर आली.
जमेल तसे तिने मुलीला शिकवले. बाप आजारपणात लवकर गेला आणि म्हणून तुला डॉक्टर बनायचे आहे हे तिच्या मनावर बिंबवित राहिली.पुढे मोठी होताच तिनेही आईला डॉक्टर बनेन असे वचन दिले.
आता खरोखरच एकमेकांच्या वचनात सगळे बांधले गेले होते . 
पण डॉक्टर बनायचे हे नुसते ठरवून होत नाही . शिक्षणासाठी पैसे ही लागतात. ते पैसे कसे उभारायचे या विवंचनेत  तिने सामाजिक संस्थेत हेलपाटे घालायला सुरवात केली.
शेवटी एक संस्था तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी पुढे आली. कोणीतरी अनमिकांने तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि तिने सुटकेचा निश्वास टाकला.
आज मुलगी डॉक्टर झाली होती आणि त्या संस्थेकडून तिला त्या दानशूर व्यक्तीला भेटायला जा असा निरोप मिळाला .मुलीला घरी सोडून ती त्याला भेटायला निघाली . 
  त्या उंची सोसायटीतील शेवटच्या मजल्यावरील एकमेव फ्लॅटची बेल तिने दाबली . एका नोकराने दरवाजा उघडला. ती आत शिरली  आणि त्याला पाहून  हादरली.आत तो होता . तीच बेफिकीर नजर, घायाळ करणारे हास्य . 
"अभिनंदन .. !! मुलगी डॉक्टर झाली .... "तो हसत उद्गारला .
"म्हणजे तूच तो... मदत करणारा ...?? ती ओरडली . का केलेस असे ..?? का आलास माझ्या आयुष्यात..?? हुंदके देत तिने विचारले .
"तुला सोडले त्यानंतर माझ्या आयुष्यात अनेक मुली आल्या. पण सगळ्या पैश्यासाठी जवळ आल्या .शेवटी कंटाळा आला आणि शेवटी लग्न केले . बायको सालस सुंदर होती . पण शेवटी माझ्या पापाची फळे तिने भोगली . एक दिवस मोटार अपघातात ती गेली आणि मी जखमी झालो. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून मला वाचविले .पण माझे पौरुषत्व वाचवू शकले नाहीत . यापुढे आयुष्यात कोणत्याही स्त्रीचा मला उपयोग नाही हे कळले. काही महिन्यांनी सावरलो . मग तुझा शोध घेतला . मुलीला डॉक्टर बनविण्याची इच्छा आहे हे कळले आणि मी मदत करायला पुढे झालो. शेवटी माझी ही मुलगी आहे ती पण या पुढे तुझ्या आयुष्यात कधीही येणार नाही मी हे वचन देतो तुला . असे बोलुन त्याने व्हीलचेयर पाठी फिरवली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, February 11, 2020

बोलंदाजी.... द्वारकानाथ संझगिरी

बोलंदाजी.... द्वारकानाथ संझगिरी 
संपादन ... सुप्रिया संझगिरी 
मॅजेस्टिक प्रकाशन 
संझगिरी हे चांगले लेखकच नाहीत तर उत्तम निवेदक आणि क्रीडा समीक्षक देखील आहेत.क्रिकेट इतकेच त्यांचे संगीतावरही प्रेम आहे आणि प्रभुत्वही आहे .
त्यांनी स्टेजवर  विविध संगीताचे कार्यक्रम आयोजित केले . निवेदनात त्यांनी वेगळेपणा यावा म्हणून विविध बदल केले ..नवनवीन प्रयोग केले .
या पुस्तकात त्यांनी आपले स्टेजवर सादर  केलेले कार्यक्रम लिहिले आहेत .त्यातील त्यांचे निवेदन आणि त्यावरील गाणी वाचताना संपूर्ण कार्यक्रम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.
 यातील संगीत षटकार हा कार्यक्रम क्रिकेट आणि गाणी यावर आधारित असून क्रिकेटचे विविध किस्से वाचायला मिळतील.
 ट्रीब्युट टू लिजंड देवानंद मध्ये देवानंदच्या विविध आठवणी आणि गाणी. 
 ट्रीबूट टू शम्मी कपूर मध्ये फक्त शम्मी कपूरच्या विविध आठवणी आणि गाणी वाचायला मिळतील.
 संझगिरी आपल्या नर्म आणि खुसखुशीत निवेदनामुळे प्रेक्षकांत हशा निर्माण करतात आणि कार्यक्रमाची रंगत वाढवितात.

Monday, February 10, 2020

आमचा व्हॅलेंटाईन डे

आमचा व्हॅलेंटाईन डे
मला अचानक समोर आलेले पाहून बंड्या चपापला.हातातील वस्तू मागे लपविण्याचा प्रयत्न करू लागला.
मी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो होतो.पण बंड्याला पाहून हाक मारली " अरे काय लपवतोय मागे .....?? बघू.. बघू... ?? 
बंड्याने लाजून हातातील पॅकेट पुढे केले.गुलाबी रंगाच्या पेपरमध्ये एक चौकोनी बॉक्स होती. हळूच मान खाली घालून म्हणाला "गिफ्ट आहे मैत्रिणीसाठी.. व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय ना... "?? मी हसून मान डोलावली "वा छान...!! आणि त्यात लाजयचे काय एव्हडे .मित्र तशी मैत्रीण ...."आणि पुढे निघालो . 
बंड्या माझ्यासोबत चालू लागला " भाऊ ...तुम्ही कधी साजरा केलाय का व्हॅलेंटाइन डे ...?? 
मी हसलो " का रे .....??  अरे बाबा ....एकेकाळी मीही तरुण होतो .खूप मजा केली तेव्हा ...."
"आता नाही करत का....??? आता वाहिनीवर प्रेम कमी झाले का....??  बंड्याने हसून विचारले.
"  बंड्या ....ज्याचे आपल्या माणसावर प्रेम असते त्यांच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन डे असतो.तिच्यावरच प्रेम दाखवायला कोणत्याही डे ची गरज नसते...."
  "तसे नाही हो ....त्या निमित्ताने वहिनीसाठी गिफ्ट घ्याल तुम्ही..." बंड्या हसून म्हणाला.
 " हे बघ बंड्या .....मला ज्या दिवशी एखादी गोष्ट आवडते आणि ती बायकोला आवडेल असे वाटते त्यावेळी कोणताही विचार न करता मी ती गोष्ट घेतो तेव्हा पैश्याची काळजी करीत नाही .घरी आल्यावर गिफ्ट घेताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जगातील सर्वात सुखी माणूस असल्यासारखे वाटते" मी थोडा भावूक होऊन बोललो ..."बंड्या तुला खरे सांगू का...?? तिचा घरातील  रोजचा वावरच मला रोज  व्हॅलेंटाईन डे असल्यासारखे वाटते.तीची सकाळी उठून माझ्यासाठी....मुलासाठी केलेली धावपळ सुखावते माझ्या मनाला .. तुला एक सांगू लग्नानंतर ऑफिसमध्ये सारखेसारखे येणारे फोन घेऊन कंटाळायचो मी .हातातली कामे सोडून तिच्याशी सारखे बोलणे पटायचे नाही.एक दिवस चिडलो मी ...सारखे सारखे फोन का करतेस ...??? तेव्हा चेहरा पडून म्हणाली" तुमचा फोनवरचा आवाज ऐकून खूप बरे वाटते मला.तो आवाज ऐकण्यासाठीच फोन करते मी .खूप लाज वाटली स्वतः ची. पहिल्या व्हॅलेन्टाईन  डे ला म्हटले चल बाहेर जाऊ फिरायला ..तेव्हा म्हणाली प्रेमाचा दिवस आहे मग तो आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांबरोबर साजरा करू आणि सर्वाना घरी बोलावून गोडाचे जेवण दिले.दुसर्या दिवशी आम्ही फिरायला गेलो तेव्हा म्हणाली बघा आपल्या आयुष्यात दोन व्हॅलेन्टाईन डे आले.बंड्या प्रेमाचे हे फक्त एका दिवसाचे प्रदर्शन करणे पटत नाही आता.तुलाही माझ्या वयाचा होशील तेव्हा असेच काहीसे वाटेल .जेव्हढे प्रेम रोज कराल तेव्हडे ते वाढते. कधी बरे वाटत नसेल तेव्हा जवळच्यांच्या डोळ्यात बघ ..त्यात जी काळजी दिसेल तुझ्याबद्दल... ते प्रेम.तू रात्री दोन वाजता घरी येतोस तेव्हा दादा घरात चिंतेने येरझारा घालत असतात आणि तुला बघून गप  झोपून जातात  ते प्रेम ....आई जेवून आलास का विचारते तो खरा व्हॅलेंटाईन  डे ....." बंड्या भारावून गेला . 
"भाऊ ....तुम्ही कधीच तुमच्या भावना कोणाजवळ व्यक्त केल्या नाहीत .वहिनी तर तुम्हाला दगड म्हणते .खरेच तुम्ही तसे आहात का हो ...?? आमच्याशी बोलतानाही तुमचा स्वर कठीण असतो ..." बंड्या चाचरत म्हणाला .
" अरे वेड्या... घरातील कर्ता म्हणून काही वेळा कठोर व्हावे लागतेच.याचा अर्थ माझे कोणावर प्रेम नाही असे होत नाही .फक्त ते व्यक्त करता येत नाही .मी वेळेवर घरी आलो नाही कि तुझ्या वहिनीचा चेहरा बघ कसा होतो .मी काही तिच्यासाठी ..मुलासाठी घेऊन येतो तेव्हा पळत पळत तुम्हाला दाखवायला घेऊन येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ....अरे असे हजार व्हॅलेंटाईन डे ओवाळून टाकतो त्यांच्यावर..मी आठवणीत गुंग होऊन म्हणालो.
 "खरेच भाऊ ...तुम्ही ग्रेट आहात .हे सर्व माझ्या लक्षातच कधी आले नाही .आज मैत्रिणीला भेटायचे कॅन्सल करतो आणि घरच्या सर्वाना बाहेर घेऊन जातो जेवायला .ती मनीहि बरेच दिवस मागे लागलीय बाहेर जाऊ जेवायला म्हणून. ति ही खुश होईल. मैत्रिणीला उद्या भेटेन .तशी ही उद्या  गर्दी कमी असेल पार्कात.आरामात गप्पा मारत येतील ..."असे बोलून धावतच घरी गेला.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

Sunday, February 9, 2020

चॉकलेट डे

चॉकलेट डे
कंपनीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्याला डायबेटीस असल्याचे निदान झाले आणि त्याचा मूडच गेला. च्यायला...... बापाचा डायबेटीस शेवटी आलाच आपल्यावर ...तो मनात चरफडला. 
खरे तर फार वय नव्हते त्याचे .मुलगा अजून सात वर्षाचा होता .पण ह्याचे गोड खाण्यावर कंट्रोल नाही. आज ना उद्या होणारच होते ते लवकर झाले इतकेच... 
आता घरी कसे सांगायचे....?? याच टेन्शनमध्ये दिवस जाणार होता.वेलेन्टाइन डे चा सप्ताह सुरू झाला होता.आज चॉकलेट डे....तीही हौसेने त्याच्याकडून मिळणाऱ्या चॉकलेटची वाट पाहत असणार होती.
संध्याकाळी सुटताना बॉसने प्रत्येकाला एक छानसे चॉकलेट देऊन हॅपी चॉकलेट डे म्हणत विश केले . ह्याने ते चॉकलेट मुकाटपणे खिश्यात टाकले आणि घरी निघाला .
"अरे देवा ... !! ती हातातील रिपोर्ट पाहत ओरडली.  काल थोडे डोके धरले होते म्हणून बीपी चेक करायला गेली आणि डॉक्टरांनी बीपी बरोबर शुगरही टेस्ट केली . रिपोर्ट तिला शुगर असल्याचे स्पष्टपणे सांगत होता. 
सासर्यांचे डायबेटीस परंपरेनुसार आपल्यातही आले का ...?? असा विचार हिच्या मनात आला.
आता हे सतत गोड खातात.…. कितीतरी वेळा ओरडली असेन ...पण त्यांचे डायबिटीस आपल्या गळ्यात पडेल असे वाटले नव्हते आणि आजच चॉकलेट डे यावा .हे किती प्रेमाने चॉकलेट घेऊन येतात .भले ते इकलेर किंवा मेलडी का असेना पण त्यामागे ही प्रेमच असते ना .....?? ती त्याचा विचार मनात येताच मोहरली . निदान आज तरी बोलायला नको.याबद्दल नंतर बोलू असा विचार करतच घरी निघाली . रस्त्यात तिला जुनी मैत्रीण भेटली . दहावीच्या बॅचची ... दोघीनी एकमेकींना रस्त्यातच मिठी मारली . कोपऱ्यात जाऊन छान गप्पा मारल्या निघता निघता मैत्रिणीने तिच्या हातात छान चॉकलेट दिले . हॅपी चॉकलेट डे डियर.…  असे म्हणून गालावर ओठ टेकवून निघून ही गेली . हीने ते चॉकलेट पर्समध्ये टाकले आणि निघाली .
तो रोजच्या वेळेनुसार घरात शिरला तेव्हा तीही नुकतीच घरी आली होती . दोघांनी हसून एकमेकांकडे पाहिले आणि त्याच क्षणी दोघांनाही जाणीव झाली काहीतरी बिघडलय . एकमेकांच्या डोळ्यातील काळजी स्पष्टपणे दोघांनाही दिसत होती .
इतक्यात छोटा धावत येऊन त्याच्या कुशीत शिरला . त्याने आनंदाने त्याला कवटाळले आणि खिश्यातून चॉकलेट काढून त्याला दिले . बाबांच्या हातात एकच चॉकलेट पाहून तो चक्रावला . तिने ही आश्चर्यचकित होत त्याच्याकडे पाहिले तर त्याने हसून मान उडवली.
तसे हिने ही पर्समधून चॉकलेट काढीत छोट्याच्या हाती दिले . आज आईकडूनही चॉकलेट मिळताच तो आनंदला. 
"हॅपी चॉकलेट डे बेटा ....दोघेही एकदम म्हणाले . "आज दोन दोन चॉकलेट ..मस्त धमाल .. मी यातले एक आजोबांना देतो ..."असे ओरडत छोटा बेडरूमच्या दिशेने धावला.
"अरे नको ...त्यांना डायबेटीस आहे .."दोघेही एकदम ओरडले आणि चमकून एकमेकांकडे पाहिले .
छोटू ओरडत आजोबांच्या खोलीत शिरला तेव्हा ते पुस्तक वाचत बसले होते.त्याने हळूच त्यांच्यापुढे मूठ उघडली . मूठीतील चॉकलेट पाहताच आजोबांचे डोळे चकाकले.
"पण तुम्हाला डायबेटीस आहे... असे आई पप्पा म्हणतात .. "छोटू त्यांच्या कानात कुजबुजला.
" असू दे रे ....नाहीतरी आता किती वर्षे उरलीत..??. ज्या वेळी डायबेटीस आहे कळले तेंव्हापासून तुझ्या बापाकडे पाहत सगळी पथ्यपाणी पाळले . आज तो बाप झालाय .... आतातरी जगू दे मला मस्त मनासारखे ..."असे म्हणत ते चॉकलेट त्यांनी तोंडात टाकले.
"पण मी तुला या चॉकलेटपेक्षाही भारी गोड गोष्ट देतो...."मग त्यांनी हळूच त्याच्या गालावर ओठ टेकविले." बघ ..ही सर्वात गोड गोष्ट आहे. आपल्या प्रेमाच्या माणसालाच देता येते आणि याची किंमत करता येत नाही .."छोटुने आजोबांच्या गळ्यात हात टाकले आणि त्यांच्या गालावर ओठ टेकवून छान पप्पी दिली . मग शांतपणे त्यांच्या मांडीवर बसून चॉकलेट खाऊ लागला .
 बेडरूमच्या दाराआडून ते दोघेही आजोबा नातवाचा हा खेळ पाहत होते . त्यांचे बोलणे ऐकून दोघांनी एकमेकांकडे पाहिले .त्याच्या डोळ्यातील ते भाव बघताच ती मोहरली."अजिबात नाही ह... तीने डोळे वटारले ..आणि किचनमध्ये धावत गेली .तसा तो ही तिच्या मागे पळाला.
किचनच्या ओट्यापाशी ती पाठमोरी उभी होती . त्याने तिला आपल्याकडे फिरवले . गालावर लाजेची लाली पाहून तो वेडावून गेला . अलगद तिच्या ओठावर ओठ टेकवून  कुजबुजला "हॅप्पी चॉकलेट डे ...."
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, February 7, 2020

ब्लॅक लिस्ट ... ब्रॅड थोर

ब्लॅक लिस्ट ....ब्रॅड थॉर
अनुवाद...बाळ भागवत 
मेहता पब्लिकेशन
एटीएस या अमेरिकन कंपनीकडे एक सॉफ्टवेअर आहे . त्यात त्यांनी प्रत्येक अमेरिकन नागरिकांची माहिती साठवली आहे . ते प्रत्येकाचा फोन.. इमेल.. बँक अकाउंट.. हॅक करू शकतात. ते कधीकधी अमेरिकन सरकारला ही मदत करतात .तसेच सरकार ही कोसळवू शकतात.एक भयानक सायबर हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. 
अमेरिकन सरकारने एक ब्लॅक लिस्ट बनवली आहे . या लिस्टमध्ये असलेला कोणीही वाचू शकत नाही . एटीएसला कार्लटन ग्रुपची जास्त भीती आहे . कार्लटन अतिशय हुशार अनुभवी म्हातारा आहे . अमेरिकेच्या रक्षणासाठी तो नेहमी सावध असतो  तसेच त्याचा सहकारी हॉवार्थ अतिशय हुशार आणि धाडसी एजंट आहे . पण एटीएसने अतिशय हुशारीने त्यांचे नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले आहे . आता सीआयए त्या दोघांच्या मागे लागली आहे . 
निकोलस हा बुटका गृहस्थ जगातील सर्वोत्तम हॅकर समजला जातो . त्याची मैत्रीण एटीएसमध्ये कामाला होती . योगायोगाने तिला या हल्ल्याची माहिती लागते . ती सर्व एका फ्लॅश ड्राईव्हमध्ये घेऊन  गुप्त मार्गाने निकोलसकडे पोचविते .यात तिला प्राण गमवावे लागतात . एटीएसला तो फ्लॅश ड्राईव्ह हवाय . त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत . निकोलस,हॉवर्थ कार्लटन एकत्र येऊन तो हल्ला निकामी करतील का ....??  एक उत्कंठावर्धक ,श्वास रोखून वाचायला लावणारी कादंबरी .

Monday, February 3, 2020

ते क्षण

ते क्षण 
सर्विस रोडवरून त्याने जोरदार टर्न मारून बाईक मेन रोडवर आणली. मेनरोडचा सिग्नल सुटायला चार सेकंद बाकी होते . पण तिकडे लक्ष न देता त्याने बाईक पुढे पिटाळली. बाजूच्याच रोडवरून सिग्नल पडेल म्हणून भरधाव वेगाने पुढे येणाऱ्या मोटारला त्याची बाईक आदळली . एक मोठा धडाका झाला .बाईक वरून तो उंच उडाला.मागून येणाऱ्या बसखाली गेला.  अजून चार सेकंद थांबला असता तर .....?? 
समोरच्या ट्रॅकवर येणाऱ्या ट्रेनकडे पाहत तो ब्रिजवरून धावत होता. एका हाताने प्रवासी बॅग सांभाळत दुसऱ्या हाताने पोराचा हात खेचत मागून धावत येणाऱ्या बायकोवर खेकसत होता."चल धाव लवकर ....ही बघ ट्रेन आलीय ... पकडूया...." ती कमरेवरच्या मुलाला सांभाळत त्याच्यामागे भराभर चालत होती .चालता चालता त्याला म्हणाली" आहो ..सोडून द्या ही ट्रेन.. मागून दुसरी येतेय ..ती बघा दिसतेय..."तोपर्यंत तो ट्रेनजवळ पोचलाही होता.समोरच्या गर्दीत धक्का मारत त्याने मुलाला आत ढकलले आणि स्वतः दरवाजात उभा राहून पत्नीला हाक मारू लागला.नवरा ट्रेनमध्ये चढलेला पाहून ती धावत ट्रेनकडे निघाली . इतक्यात ट्रेन चालू झाली . काहीच न सुचून तीने चालता डबा पकडायचा प्रयत्न केला आणि तोल जाऊन खाली पडली .त्यांनी मागची ट्रेन पकडली असती तर ....?? 
रात्रीची वेळ...,हायवेवर तसा अंधारच होता.त्याने भरधाव वेगात गाडी सोडली होती.एका हाताने सिगारेटचे कश चालूच होतेच.ह्याच स्पीडने गेलो तर रात्रीचे जेवण बायको आणि मुलीसोबत घेऊ असा अंदाज बांधला होता त्याने.अचानक समोर ठेवलेला मोबाईल वाजू लागला.घरूनच फोन होता .स्वतःशी हसत त्याने सिगारेट तोंडात ठेवून मोबाईल उचलला . तोंडात सिगारेट ....खांदा आणि कानाच्यामध्ये फोन ठेवून स्टेरिंगवर कंट्रोल करीत त्याने हॅलो केले.तितक्यात तोंडातली सिगारेट मांडीवर पडली . घाईघाईत तो सिगारेट उचलायला गेला . स्टेरिंगवरचा ताबा सुटला आणि गाडी बाजूच्या उतारावरून खाली उतरत गेली. दोन मिनिटे मोबाईल उचलला नसतात तर....?? 
 समुद्राच्या किनाऱ्यावरील खडकांवर ती दोघे एकमेकांचे फोटो काढीत होते . आतापर्यंत भरपूर फोटो सेशन झाले होते .दोघांच्याही हातात लेटेस्ट मोबाइल होते. आजचा पूर्ण दिवस त्यांचा होता . वेगवेगळ्या पोज मधील अनेक फोटो आणि सेल्फी काढून झाले होते . पण तिची हौस काही भागत नव्हती . "अग चल आता.... भरतीची वेळ झालीय . अजून किती फोटो काढशील ...? तो कौतुकाने  म्हणाला."बस दोन मिनिटे ... एक शेवटचा सेल्फी काढू या .."असे म्हणत ती उंच खडकावर त्याला घेऊन गेली.त्याच्या  गळ्यात हात टाकून तिने मोबाईल समोर धरला .यौ...!! म्हणत क्लीक करणार इतक्यात मागून आलेली जोरदार लाट त्यांच्या अंगावरून गेली..तो सेल्फी त्यांनी काढला नसता तर ....??
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

Sunday, February 2, 2020

मसाई..... उमेश कदम

मसाई..... उमेश कदम
राजेंद्र प्रकाशन 
मसाई ही केनिया आणि टांझानिया येथे आढळणारी एक जमात. पशुपालन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय . आपल्याकडील पशूंना ते देवाचा दर्जा देतात.मसाई जमातीची स्वतःची न्यायव्यवस्था असते . ब्रिटिशांनी येथील जमिनी ताब्यात घेऊन त्यांना गुलाम बनविले . 
जेरॉल्ड निकोल्सन आपली सैन्यातील नोकरी सोडून प्रशासकीय अधिकारी म्हणून केनियात गेला . त्याने हर प्रकारे प्रयत्न करून मसाई आणि इतर जमातीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले . दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना अन्न मिळावे म्हणून मसाईचे पशुधन वापरले . त्यात त्याची हत्या झाली . पण त्याची पत्नी जेनिफर हिने मसाईसाठी आणि आफ्रिकेतील इतर जमातींसाठी खूप सामाजिक कार्य केले . स्त्री शिक्षण, स्वच्छता ,बाल मृत्यू याकडे विशेष लक्ष दिले . 
भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरूनी आप्पासाहेब पंत यांची पूर्व आफ्रिकेत राजदूत म्हणून नेमणूक केली आणि तेथील स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा द्यायला सांगितले . जेनीनेही स्वतंत्रलढ्यात भाग घेतला . ती या चळवळीची प्रमुख नेता होती .   केनियाचा स्वातंत्र्यलढा ,भारताचा पाठिंबा आणि जेनिफर  निकोल्सन हीचा प्रमुख सहभाग याची सुंदर माहिती या पुस्तकात आहे .